कथा: कोवळ्या सरी- भाग 4 (मृदगंध (Musical turn to story), संगीतमय झालेली ताडोबा सहल आणि कब्बडीचा तो रंगलेला सामना, #Schooldaysof90s)

Submitted by AD75 on 7 April, 2026 - 15:19

Part 1:https://www.maayboli.com/node/88038
Part 2:https://www.maayboli.com/node/88058
Part 3:https://www.maayboli.com/node/88091

कोवळ्या सरींमधे मगिल भागात.....
आठवीचा शेवटचा चित्रकलेचा पेपर संपवून सौरभ आणि त्याच्या मित्रमंडळींनी उन्हाळ्याच्या सुट्टीचे जल्लोषात स्वागत केले. परीक्षेचा ताण विसरण्यासाठी त्यांनी 'अलंकार' टॉकीजमध्ये आवडीचा चित्रपट पाहिला आणि सारंगच्या आजी-आजोबांच्या मायेच्या उबेत काही निवांत क्षण घालवले. ५ मेला निकाल लागला आणि सगळे मित्र चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले, ज्यामुळे सुट्टीचा आनंद द्विगुणित झाला. सुट्टीच्या दिवसात मयंकच्या घरी रंगलेली कलेची मैफल आणि मैदानावरचा क्रिकेटचा खेळ आठवणीत राहणारा ठरला; विशेषतः सावनीच्या भासामुळे सौरभचे लक्ष विचलित होऊन तो बाद झाला, तेव्हा त्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली. सुट्टीची खरी मजा तर पेंचच्या 'जंगल कॅम्प'मध्ये आली, जिथे निसर्गप्रेमी राणे सरांसोबत मुले जंगलाचा अनुभव घेत होती. तिथेच एक विलक्षण योगायोग घडला; सौरभचे वडील, जे स्वतः वन्यजीव तज्ज्ञ होते, आणि सावनीचे वडील, जे सरकारी मुख्य अभियंता होते, यांची अनपेक्षित भेट झाली. विश्रामगृहाच्या गच्चीवरून सावनी हे सर्व कौतुकाने पाहत होती. सौरभच्या वडिलांचे निसर्गाबद्दलचे अफाट ज्ञान आणि त्यांची विद्वत्ता ऐकून ती मनोमन खूप प्रभावित झाली. आपल्या वर्गातल्या शांत सौरभच्या व्यक्तिमत्त्वाचा हा समृद्ध कौटुंबिक वारसा पाहून तिच्या मनात त्याच्याबद्दलचे कुतूहल आणि आदर अधिकच वाढला. अशा प्रकारे, विरहाच्या उन्हाळ्यातही या दोघांच्या नशिबाने त्यांना पुन्हा एकदा एकाच छताखाली आणून सोडले होते.

प्रकण २

मृदगंध
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून जूनच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू झाली होती; यंदा नववीचं वर्ष होतं. उन्हाळ्याची सुट्टी संपली तरी उन्हाळा मात्र संपला नव्हता, प्रचंड उकाडा जाणवत होता. शाळा सुरू होऊन चौथा-पाचवा दिवस असावा. नेहमीप्रमाणे गौरव, सारंग, सौरभ आणि अखिल शाळेत पोहोचले. अखिल दुसऱ्या वर्गात, म्हणजे B सेक्शनला होता. त्याचा वर्ग शाळेत येताना आधी लागायचा, त्यामुळे अखिल आपल्या वर्गात गेला आणि बाकी सगळे पुढे जाऊन आपापल्या वर्गात गेले.
आत शिरताना सौरभ, "थांब, थांब, थांब!" करतच आपल्या बाकाजवळ गेला आणि दप्तर ठेवून पुन्हा तातडीने दरवाजात आला. गौरव आणि सारंग त्याच्या बाजूला उभे राहिले. त्यांची नजर शाळेच्या ऑफिसच्या बाजूला असलेल्या झाडांवर काहीतरी शोधत होती.
इतक्यात गौरव म्हणाला, "तो बघ, तो बघ!"
सौरभलाही तो दिसला. तो म्हणाला, "दिसला मला! रंगा, तुला दिसला का?"
सारंग म्हणाला, "कुठे बे? अजून नाही दिसला मला."
सौरभ वैतागून म्हणाला, "अबे, या पायऱ्या आहेत ना, त्याच्या वर बघ. अगदी तिथेच त्या फांदीवर बसला आहे." सारंग म्हणाला, "हा... दिसला!"
सौरभ हळहळत म्हणाला, "दुर्बीण नाहीये यार!"
सारंग म्हणाला, "हो… ना बे!"
या तिघांना असं वर्गाच्या दारात पाहून वर्गातले मयंक आणि अभय तिथे थबकले. अभयने साशंकतेने विचारलं, "काय पाहून राहिले बे तुम्ही मघापासून?"
सौरभने उत्तर दिलं, "Cuckoo म्हणजे चातक!"
अभय म्हणाला, "काही काय बे! पक्षी-बिक्षि पाहत राहतात हे."
मयंकने विचारलं, "कुठे, कुठे?"
"तो बघ," असं करत सौरभने त्याला खुणेने दाखवलं.
मयंक म्हणाला, "हो बे, दिसला!"
इतक्यात वर्गात सावनी आली. ती जवळ येताच सौरभला याआधीही अनुभवलेला एक मंद सुगंध आला. त्याला शंका आली, त्याने समोर पाहिलं तर ती सावनीच होती! ती या सगळ्यांकडे बघत बघत आपल्या जागेवर गेली. तिला राहवलं नाही, म्हणून तीदेखील दप्तर ठेवून परत फिरली. हे सगळे उभे होते तिथे दरवाजाजवळ आली आणि म्हणाली, "सौरभ, तुम्ही काय पाहताय?"
सौरभ म्हणाला, "त्या झाडावरती समोर चातक पक्षी बसलाय आणि तो त्याच्या नेहमीच्या आवाजात ओरडतोय. अबे चूप बसा ना! हे सगळे चूप बसतील तर ऐकू येईल न. हा... ऐकला? हा आवाज चातकाचा आहे." सावनीला मात्र तो पक्षी काही दिसत नव्हता.
ती म्हणाली, "कुठे आहे रे?"
सौरभ म्हणाला, "इथे समोर ये, दरवाजात उभी राहा आणि बरोबर या आपल्या ऑफिसच्या पायऱ्या आहेत ना, त्याच्या बाजूला वरती बघ. त्या फांदीवर बसलाय तो."
गौरव म्हणाला, "अबे यार, दुर्बीण हवी होती!"
सौरभ म्हणाला, "हो ना यार, खूप स्पष्ट दिसला असता."
थोड्याच वेळात तो सावनीलाही दिसला आणि ती म्हणाली, "अच्छा! खरंच असा पक्षी असतो? मी आतापर्यंत समजायचे की it's an imaginary bird!"
सौरभ पुढे सांगू लागला, "निसर्ग कधीच कल्पनेवर जगत नाही, तो प्रत्यक्ष असतो. Jacobin Cuckoo म्हणजेच ज्याला आपण चातक म्हणून ओळखतो. हा पक्षी मोठा गमतीदार आहे. हा स्वतःचं घरटं बांधत नाही, तर दुसऱ्यांच्या घरट्यामध्ये अंडी घालतो. विशेषतः बुलबुल पक्षाच्या! याची अंडीदेखील त्या पक्षांच्या अंड्यांशी मिळतीजुळती, म्हणजे निळसर असतात. जेव्हा बुलबुल आपल्या पिल्लांना वाढवतात, तेव्हा याचं लक्ष असतं की आपली पिल्लं त्यांच्याबरोबर व्यवस्थित वाढतायत की नाही."
इतक्यात गौरव म्हणाला, "आपल्याला चांदेकर मॅडम सांगायच्या ना चातक पक्षाबद्दल?" सारंग म्हणाला, "एकदम बरोबर बोलला, जुनी आठवण काढलीस!"

सौरभने ने कवितेतल्या काही ओळ म्हंटल्या ,
"'आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!'”

बा. सी. मर्ढेकरांची एक कविता होती आपल्याला सातवीत."

सारंग, गौरव, मयंक, सावनी आणि बाकी सगळे चमकून सौरभकडे पाहू लागले.
सावनी आणि या सगळ्यांना तिथे पाहून वर्गातली आणखी दोन-तीन मुलं आणि मुली तिथे जमल्या. त्यांनी विचारलं, "काय बघताय तुम्ही?" सौरभने सगळ्यांना पुन्हा चातक पक्षी दाखवला आणि त्याबद्दल माहिती सांगितली. सौरभ जेव्हा माहिती सांगत होता, तेव्हा सावनी त्याच्याकडे मोठ्या कुतूहलाने बघत होती.
दुसऱ्या दिवशी उकाडा आणखीनच वाढला होता. गौरव, अखिल, सारंग आणि सौरभ शाळेत जायला निघाले. शाळेत पोहोचेपर्यंत सगळे घामाने डबडबले होते. सौरभ सहज एक गाणं गुणगुणू लागला—
"श्रावणात घननिळा बरसला..."
त्यावर गौरव म्हणाला, "घननिळा कधी बरसणार बे?"
सौरभ म्हणाला, "खूप गरमी आहे ना आज, बरसेल बहुतेक आजच! काल आपण चातक पाहिला ना, आज नक्की पाऊस पडेल."
...आणि झालंही तसंच! मधली सुट्टी संपता संपता आकाशात काळे ढग जमू लागले. सगळीकडे अंधारून आलं. वर्गातही काळोख दाटला. जोरात पाऊस सुरू झाला आणि मातीचा एक सुंदर सुगंध सगळीकडे दरवळू लागला. जसा पाऊस वाढला, तसा तो अधिक गडद झाला. वातावरण बदलून एकदम गारवा निर्माण झाला. टीनाच्या छतावर पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा एकच आवाज होऊ लागला. त्या आवाजामुळे वर्गात शिकवणं अशक्य झालं होतं.
शिक्षक म्हणाले, "हवं ते करा आज. फक्त खूप आवाज करू नका. तुम्हाला आपापसात बोलायचं असेल तर हळू आवाजात बोला."
पावसाचा टीनावर पडणारा तो नाद मयंकला भावला. त्या थेंबांच्या तालाला मयंकने अचूक हेरलं आणि त्याचे हात नैसर्गिकरीत्या बेंचवर तबल्यासारखे वाजू लागले. एक-दोन आवर्तनं झाल्यावर सौरभचंही लक्ष त्या तालाकडे गेलं. पावसाचा तो नाद आणि मयंकचा ताल दोन्ही सौरभच्या मनाला भिडलं आणि नकळत तो मयंकच्या तालाच्या विश्वात शिरला. सौरभ त्याला हळू आवाजात शीळ वाजवत साथ देऊ लागला. सौरभला त्या पावसाळी वातावरणात अचानक एक जुनं गाणं आठवलं, जे त्याच्या घरी कॅसेटवर खूपदा लागायचं—
"गरजत बरसत सावन आयो रे..."
एका छोट्या विश्रांतीनंतर—
"घन-घन माला नभी दाटल्या..." सौरभने हळू आवाजात गायला सुरुवात केली नंतर मयंकही त्याच्या बरोबर गुणगुणू लागला. सौरभ कधी गात होता, तर कधी शब्दांऐवजी शीळ वाजवत होता.
गाणं संपल्यावर एक शांतता पसरली. सारंग आणि मयंक दोघेही एका वेगळ्याच विश्वात होते. मयंक म्हणाला, "थांबला का? पुढचं?" आणि मग दोघांनाही लहानपणीचा तो निरागस पाऊस आठवला. दोघेही एकाच वेळी म्हणाले, "सांग-सांग भोलानाथ?"
दोघेही जोरात ओरडले, "हो!" एकमेकांना टाळी देऊन मयंकने प्रथम डमरूचा ताल धरला आणि सौरभने सुरुवात केली—
"सांग सांग भोळानाथ, पाऊस पडेल काय?"
आजूबाजूचे सगळे या आनंदाचा आस्वाद घेत होते. मयंक मधल्या ओळीत शेवटी बसला होता. त्याच्यानंतर मुलींची ओळ आणि पलीकडे खिडक्या होत्या. सौरभ मयंकच्याच बेंचवर दुसऱ्या बाजूला बसला होता. अचानक सौरभचं लक्ष खिडकीकडे गेलं. खिडकीत सावनी बसली होती. तिथून वाऱ्याची हलकी झुळूक येत होती आणि पावसाचा एखादा तुषार सौरभपर्यंत पोहोचत होता. सावनीने हात बेंच वर ठेऊन तळव्यावर गाल आणि मान ठेवली होती. तिचे केस वाऱ्याने हलकेच उडत होते आणि पावसाचे काही थेंब तिच्या केसांवर पडत होते. तिला सगळं स्पष्ट ऐकू येत नव्हतं, तरी जे काही कानावर पडत होतं, ते खूप सुखावणारं होतं. तिची तंद्री लागली होती! ती सौरभकडे पाहत होती. तिला सौरभचा शीळ वाजवणारा चेहरा दिसत होता. हसताना त्याच्या गालावर खळी पडायची. काल जेव्हा तो पक्षाबद्दल सांगत होता, तेव्हाही तिचं लक्ष सौरभच्या गालावर पडणाऱ्या त्याच्या खळीकडे होतं!
तास संपल्याची घंटा वाजली आणि सौरभ-मयंकने आपली ही मैफिल थांबवली. सारंग आणि गौरवनेही ते सगळं ऐकलं होतं. आजूबाजूचे सगळे दोन मिनिटं स्तब्ध झाले होते. काही सेकंदांच्या शांततेनंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
मयंक म्हणाला, "ये जो बजाया, ऐसा या इसके जैसा कुछ और करते है यार!"
सौरभ म्हणाला, "हा उस्ताद, जरूर!" आणि दोघेही एकमेकांना टाळी देऊन हसले. त्या हसण्यात केवळ निखळ आनंद होता. गौरवही म्हणाला, "हे मस्त होतं बे!"
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हे तिघं शाळेत पोहोचले, तेव्हा वर्गाच्या पायऱ्या चढताना सौरभला पायरीवर तीन इंद्रगोप (मखमली किडे - Red Velvet Mites) दिसले. त्याला असं वाटलं की, जर हे इथेच राहिले तर कोणाचा तरी पाय पडून हे मरतील. म्हणून त्याने ते एका कागदाने उचलले आणि समोरच्या बेंचवर सुरक्षित ठेवले. तो त्या गोजिरवाण्या किड्यांकडे पाहत असतानाच गौरव आणि सारंग तिथे आले. आणखी काही मुलंही कुतूहलाने तिथे थांबली.
इतक्यात सावनी वर्गात आली आणि म्हणाली, "आता आज काय पाहताय तुम्ही?"

सौरभने तिला ते इंद्रगोप दाखवले. सौरभ म्हणाला, "तू हात लावून बघू शकतेस."
सावनीने विचारलं, "ते चावत नाहीत ना?"
सौरभ म्हणाला, "नाही, they are harmless."
तिने त्यांना हलकेच स्पर्श केला. तेव्हा सौरभमधला निसर्गप्रेमी जागा झाला आणि तो माहिती सांगू लागला—
"आपण निसर्गाला इतकं विष पाजलंय की हे जीव आता हरवत चाललेत. नाहीतर पूर्वी पहिला पाऊस पडला की हे जिकडे तिकडे दिसायचे. पण आता हे कमी दिसतात. कित्येक वर्षांनी मी यांना पाहतोय. सगळीकडे वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळे यांची हानी होतेय आणि त्यांची वस्ती (हॅबिटॅट) कमी होते आहे. खरं तर हे खूप उपयोगी आहेत; बागेत नुकसान करणाऱ्या दुसऱ्या किड्यांना, कळ्या खाणाऱ्या किड्यांना हे खातात. पण वाढतं शहरीकरण आणि कीटकनाशकांचा अतिवापर यामुळे हे नष्ट होत आहेत. आता मी यांना सुरक्षित ठिकाणी सोडून येतो, पायरीवर कोणाच्या तरी पायाखाली आले असते."

सौरभने दाखवलेली ही संवेदनशीलता सावनीच्या मनाला भिडली. सौरभ ते किडे बाहेर सोडायला गेला. त्याच्या ओठांवर तो हलकी शीळ वाजवत होता—
"श्रावणात घननिळा बरसला..."
त्याची ती शीळ सावनीच्या मनात घर करून बसली!
घरी गेल्यावर सावनीने ती कॅसेट खूप शोधली, पण तिला मिळाली नाही. शेवटी ती आईच्या मागे लागली, "आई, मला हे गाणं हवं आहे!" तिने इतका हट्ट केला की, सावनीच्या आईने ड्रायव्हरला खास ती कॅसेट आणायला बर्डीवर पाठवलं. त्या दिवसापासून सावनीच्या घरी रोज त्या गाण्याचं पारायण सुरू झालं!

सहल: कब्बडीचा तो रंगलेला सामना!

सरस्वती विद्या मंदिराची एक परंपरा होती. नववीच्या चारही वर्गांची मिळून एक सहल निघायची आणि त्यात सर्वांनी सहभागी व्हावं, अशी अपेक्षा असे. कारण दहावीत सहलीला वेळ मिळत नसे, दुसरं म्हणजे दहावी हे महत्वाचं वर्ष असायचं, बऱ्याच मुलांच्या घरून दहावीतल्या सहलीसाठी प्रोत्साहन मिळत नसे आणि दहावी हे शाळेचं शेवटचं वर्ष असायचं; त्यानंतर सगळे चार दिशांना पांगणार, म्हणून नववीच्या सहलीचं सगळ्यांना विशेष कौतुक होतं. सगळ्यांनी एकत्र मज्जा करण्याचं हे शेवटचं वर्ष होतं, म्हणून शाळाही त्यासाठी प्रयत्न करत असे. शाळा म्हणजे शेवडे सर! शेवडे सर खूप उत्साही होते, ते मुलांमध्ये मुलांसारखेच रमत असत. विद्यार्थी वर्गातही ते सर्वांना हवेहवेसे वाटत. यंदाची सहल ताडोबाला जाणार होती. शनिवारी निघून, एक रात्र तिथे थांबून रविवारी परत, असं सहलीचं वेळापत्रक ठरलेलं होतं. शेवडे सरांना गंधे सरांचं भरपूर साहाय्य लाभलं होतं.
दंगा-मस्ती करत दुपारच्या सुमारास सहल मुक्कामी पोहोचली. सूचना मिळाली त्याप्रमाणे, एका तासात तयार होऊन प्रथम जेवण आणि मग जंगल भ्रमणाचा कार्यक्रम ठरला होता. भ्रमणानंतर थोडा आराम, चहा-अल्पोपहार, त्यानंतर कबड्डीचे सामने आणि शेवटी करमणुकीचा कार्यक्रम, असं त्या दिवसाचं स्वरूप होतं.
जंगल भ्रमण हे बसमधून होणार होतं; जंगलाशी थेट संवादच नव्हता, त्यामुळे सौरभचा थोडा भ्रमनिरास झाला होता. म्हणूनच शाळेच्या सहलीपेक्षा सौरभला निसर्गाशी संवाद साधू देणारी राणे सरांच्या क्लासची सहल जास्त आवडायची. गौरव आणि सारंगची परिस्थिती वेगळी नसली, तरी ते एकूण ट्रिपच्या माहोलमध्ये बुडून गेले होते. मयंक आणि सौरभ आपल्याच संगीतविषयक गप्पांमध्ये रमले होते. मधूनच मयंक बसच्या पत्र्यावर ठेका धरत होता आणि सौरभ त्याला हलक्या आवाजात बासरीने साथ देत होता.
कधी पूरब से सूर्य उगा…वाजवायचा तर कधी अच्युतम केशवम…तर कधी कौसलेचा राम, तर कधी दूरदर्शनवर येणारी जाहिरातही वाजवायचा जस
धारा धारा शुद्ध धारा…

सौरभ काही सेकंद बासरी वाजवायचा आणि थांबायचा. हे सूर कानावर पडले की सगळीकडे शांतता पसरायची. "कोण वाजवत आहे?" असा प्रश्न सगळ्यांना पडत होता. सौररभच्या दृष्टीने अखेर तो कंटाळवाणा जंगल भ्रमणाचा कार्यक्रम संपला.
मुक्कामाच्या ठिकाणी सगळे पोहोचले. चहा आणि अल्पोपहार झाल्यावर कबड्डीच्या सामन्यांची तयारी सुरू झाली. प्राथमिक राऊंड होऊन B विरुद्ध C असा शेवटचा सामना ठरला. खरं तर D ची टीम चांगली होती, पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही आणि प्राथमिक फेरीतच त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. अंतिम सामना म्हणून 15 मिनिटांचा ब्रेक घेण्यात आला. मैदानात पाणी मारण्यात आलं आणि चुन्याने मैदानाची आखणी पुन्हा करण्यात आली. 'C' वर्गाचा एक गडी जखमी होता, त्यामुळे त्यांना एका नवीन खेळाडूची आवश्यकता होती. सारंगने टीम कॅप्टन घाटपांडेला सौरभचं नाव सुचवलं. घाटपांडे तयार झाला, पण सौरभ होता कुठे?
सौरभ आणि मयंक आत की-बोर्ड आणि बासरीत रमले होते. सारंग आणि घाटपांडे त्याला बोलवायला गेले. त्यांनी सौरभला विचारलं, तेव्हा तो म्हणाला, "नाही बे! मी कुठे कबड्डी वगैरे खेळणार? आमचं इथे इतकं मस्त रंगलं आहे, तुम्ही मध्येच कुठे ही कबड्डी घेऊन आलात?"
सारंग म्हणाला, "वर्गाला तुझी गरज आहे! तू उंच आहेस आणि जरा हट्टाकट्टा खेळाडू तुझ्यासारखाच पाहिजे." घाटपांडे म्हणाला, "रंग्या, हा जास्तच नाटकं करून राहिलाय, आपण दुसऱ्या कोणाला तरी विचारू." सारंग म्हणाला, "एक मिनिट घाटपांडे! सौरभ, चल ना बे." सौरभ नाईलाजाने म्हणाला, "बरं, येतो."
सौरभ कपडे बदलून मैदानावर आला. प्रतिस्पर्धी संघ तोडीचा होता, सामना सहजासहजी जिंकणं शक्य नव्हतं. सगळ्यांनी मिळून घाटपांडेलाला समजावलं होतं की, "तू सुरुवातीला काहीही आगाऊपणा करू नकोस, आम्हाला तुला गमावायचं नाहीये." जेव्हा कोणी एन्ट्री घेईल, तेव्हा त्याला पूर्ण आत घुसू द्यायचं, इतका की तो एका कोपऱ्यात अडकला पाहिजे आणि मगच त्याला पकडायचं. सगळ्यांच्या जागा ठरल्या आणि तितक्यात पंचांनी सामना सुरू झाल्याची शिट्टी वाजवली. सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
सामना सुरू झाला आणि काय झालं कुणास ठाऊक, पण 'रोल कॉल' घ्यावा तसा 'क' चमूतील एक-एक जण आऊट होऊ लागला—अजिंक्य, सारंग, घाटपांडे, गौरव, अभय! बघता बघता उरले फक्त सौरभ आणि मोहित. B मधून कोणीतरी एन्ट्री घेतली आणि मोहितही बाद झाला. या क्षणाला B' संघाने सामना जिंकल्यात जमा होता. B विजेता ठरणार यात कोणाला शंका राहिली नव्हती. राहिला होता तो फक्त सौरभ, एकाकी! त्या क्षणी साऱ्या वर्गाचं दडपण सौरभवर होतं. सारंग आणि कॅप्टन घाटपांडे सौरभच्या कानाशी लागले. इतर वेळी 'क' वर्गातील मुला-मुलींचं पटत नसलं, तरी जेव्हा वर्गाचा प्रश्न यायचा, तेव्हा ते "वयं पंचाधिकं शतम्" या उक्तीप्रमाणे वागत. सगळा 'क' वर्ग "सौरभ-सौरभ" म्हणून ओरडत होता. काही मुलं कुजबुजली, "याला कशाला घेतलं बे? पक्षी-प्राणी आणि गाण्यात रमणारा, हा काय आता आपल्याला जिंकवून देणार आहे का?" सावनीसुद्धा हे सगळं पाहत होती आणि ऐकतही होती. तिचीही उत्कंठा वाढली होती.
सौरभला आता एन्ट्री घ्यायची होती. समोर सगळी B ची टीम सौरभला टिपायला तयार होती. "कबड्डी-कबड्डी" करत सौरभने एन्ट्री घेतली. आता किती वेळात B वाले सौरभला धरतात, हीच औपचारिकता शिल्लक होती. सौरभसाठी हा एक जुगारच होता, नाहीतर 'क' वर्गाचा पराभव निश्चित होता.
सौरभ आत घुसला. त्याला कोणाला तरी शिवणं आवश्यक होतं, कारण तसं केलं नसतं, तर पुढच्या एन्ट्रीला कोणीतरी त्याला आऊट केलंच असतं. एकदा-दोनदा तो दोन्ही कोपऱ्यांपर्यंत जाऊन आला, पण कोणी हाती लागलं नाही, ना त्याला धरण्याचा कोणी प्रयत्न केला. त्याचा दम संपत आला होता, माघारी परतण्याशिवाय पर्याय नव्हता. तो मागे परतू लागला आणि पटांगणाच्या मध्यावर आल्यावर त्याने 'ब' संघाकडे पाठ केली. आणि त्याच क्षणी तो झपकन मागे वळला! त्याला पकडायला कोणीतरी पुढे सरसावलं होतं. तितक्यात समोरच्याने त्याला धरलं, आणखी दोघं आले आणि सौरभ पूर्णपणे अडकला.
'क' वर्गातल्या अनेकांनी आता "सगळं संपलं" असं म्हणत डोक्याला हात लावला. स्पोर्ट्स टीचर दाजी सर पंचाचं काम करत होते. त्यांचं लक्ष सौरभच्या "कबड्डी-कबड्डी" म्हणण्याकडे आणि त्याच्या हालचालींकडे होतं. सौरभ मध्यरेषेच्या (central line) खूप जवळ होता. त्याने अंगातली सगळी ताकद एकवटली आणि मध्यरेषेकडे झेप घेतली. डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून त्याने डोळे घट्ट मिटले आणि संपूर्ण ताकदीनिशी तो जमिनीवर पडला. त्याच्या तोंडातून "कबड्डी-कबड्डी" सुरूच होतं. त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याचं मनगट मध्यरेषेवर होतं! त्याच्या पाठीवर कोणीतरी बसलं होतं आणि त्याचे हात-पाय पकडले होते. पण सौरभचं काम फत्ते झालं होतं! त्याची उंची, ताकद, बासरी वाजवल्यामुळे वाढलेला श्वासाचा सराव आणि पोहण्याची सवय आज त्याच्या कामी आली होती.
सगळा '9C' वर्ग जल्लोषात उभा राहिला. सगळीकडे "सौरभ-सौरभ" असा जयघोष सुरू झाला. पंचांनी शिट्टी वाजवली आणि 'ब' तल्या त्या तिघांना बाद घोषित केलं! 'क' मधल्या तिघांना जीवदान मिळालं. घाटपांडे, सारंग आणि अभय पुन्हा आत आले. बघता बघता 'ब' मधील एक-एक खेळाडू बाद होऊ लागला आणि अखेर 'ब' ला 'क' ने लोळवलं आणि विजयश्री खेचून आणली.
सामना जिंकल्यावर घाटपांडे सौरभजवळ आला, त्याला खेचून जवळ घेतलं आणि म्हणाला, "बढिया बे सौरभ! कमाल कर दिया तूने." सारंग, गौरव आणि सौरभने एकमेकांना मिठी मारली. अखिलही तिथे आला आणि म्हणाला, "सौरभ, अबे खतरनाक काम करून टाकलंस बे! कोणाला काही स्कोपच ठेवला नाहीस. आमची काही इज्जतच ठेवली नाहीस!" सौरभला सगळ्यांनी खांद्यावर घेतलं. इतर सेक्शनचे मित्रही त्याचं अभिनंदन करायला आले.
शेवडे सरही म्हणाले, "वाघोबा, मी तुला उगाच नाही वाघोबा म्हणत! आज खरंच डरकाळी फोडलीस तू. Well done, my boy!"
असं म्हणत त्यांनी सौरभची पाठ थोपटली. "कपडे बदलून घे तू, तू आणि मयंक आज काहीतरी सादर करताय ना?"
सौरभ म्हणाला, "हो सर."
सगळं शांत झाल्यावर सावनी आणि काही मुली तिथे आल्या. त्यांनी सौरभचं अभिनंदन केलं. इतर मुली गेल्या, पण सावनी तिथेच थांबली होती. सौरभच्या कोपराला खरचटलेलं दिसत होतं. त्याने पँट वर करून गुडघा पाहिला, तर तिथेही थोडं खरचटलं होतं.
सावनीने विचारलं, "सौरभ, तुझ्याकडे काही ऑइंनमेंट आहे का?"
सौरभ म्हणाला, "नाही ग."
सावनी म्हणाली, "थांब, मी आणते."
सौरभ म्हणाला, "एक काम करतो, मी जरा हात-पाय धुतो आणि कपडे बदलून येतो. माझ्या नाका-तोंडात सुद्धा धूळ गेली आहे. मी तुला तिथे बॉईज एन्ट्रन्सच्या बाजूला भेटतो." सावनी म्हणाली, "हा ओक्के, चालेल."
सौरभ मागे वळला. त्याला पाठमोरा जाताना ती बराच वेळ कुतूहलाने पाहत राहिली! तितक्यात कोणीतरी तिला आवाज दिला आणि ती भानावर आली. आत जाऊन औषध घेऊन आली. ती खोलीबाहेर पडणार इतक्यात तिला मुग्धा नी आवाज दिला “सावनी कुठे चालली? एकदा Practice करू न यार?” स्वनी म्हणाली “आलेच मी wash room la जाऊन”. सावनी ने थाप मारली होती, ती औषध घेऊन सौरभची वाट पाहू लागली. सौरभ तिथे आला आणि गुपचूप कुणालाही न कळत तिच्याकडून त्याने औषध घेतलं.
रात्री शेकोटीभोवती नववीचे सगळे विद्यार्थी बसले होते. तिथे काम करणारी मंडळीही येऊन बसली होती. रंगारंग कार्यक्रमात कोणी वैयक्तिक तर कोणी ग्रुपमध्ये कला सादर करत होतं. कोणी गाणं, कोणी वाद्य, तर कोणी जोक्स सांगत होतं. शेकोटी पेटली होती आणि सर्वजण त्या उबेचा आनंद घेत होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन D सेक्शनचा एक मुलगा आणि A सेक्शनची एक मुलगी करत होते.
पहिले तीन-चार परफॉर्मन्स झाल्यावर सावनी आणि मुग्धाच्या गाण्याची घोषणा झाली. सौरभचे कान टवकारले. मुग्धा आणि सावनी समोर आल्या. सावनीने डार्क रंगाची जीन्स, निळ्या रंगाचा टॉप आणि हाफ स्लीव्ह्सचं पिवळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. तिने केस मोकळे सोडले होते. सौरभचं मुग्धाकडे लक्षही गेलं नाही; त्याची नजर सावनीला पाहण्यातच गुंतली होती. सावनी खूप छान दिसत होती. गाण्याला सुरुवात झाली—
"मै चली मै चली देखो प्यार की गली..."
त्यांनी गाणं सुंदर सादर केलं, त्यांना 'वन्स मोर' मिळाला. त्यांनी पुन्हा गाणं गायलं आणि सौरभ तल्लीन होऊन ऐकत राहिला. हे गाणं कठीण होतं. मुग्धा गाण्यात सावनीपेक्षा थोडी उजवी होती, पण सौरभ मात्र सावनीच्या गाण्याने पूर्णपणे मंत्रमुग्ध झाला होता.
यानंतर आणखी काही सादरीकरणं झाली. शेवटचा परफॉर्मन्स मयंक आणि सौरभचा होता. सौरभच्या हातात बासरी होती आणि मयंक की-बोर्डवर होता. सावनीने सौरभच्या हातात बासरी पाहिली आणि तिला आश्चर्य वाटलं; पण तिच्या डोळ्यात कुतूहल आणि एक वेगळीच चमक होती. सौरभची बासरी ऐकण्यासाठी ती आतुर झाली होती. सावनीसह बऱ्याच जणांना सौरभ बासरी वाजवतो हे माहीत नव्हतं!
मयंकने यमन रागातल्या काही गोड नोट्स वाजवल्या आणि एक छान वातावरण तयार झालं.

नि रे ग म(t) ध नि स' / स' नि ध प / म(t) ग रे स
तेच स्वर सौरभने बासरीतून वाजवले, मग थोडा ठेहराव घेत त्यातलच एक variation वाजवले
अगदी तसंच मयंकनी वाजवलं,
मग एक स्वर मयंक आणि एक स्वर सौरभ अशी थोडी जुगलबंदी झाली
त्यावर प्रचंड टाळ्या झाल्या
मग दोघा जणांनी गाण्यांचे मुखडे वाजवले
नाम गुम जयेगा….मेरी आवाज ही पहचान है
जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की राग
जिंदगी भर ला खूप टाळ्या आणि शिट्या मिळाल्या
यानंतर “शुक्रतारा मंद वारा “ आणि "जब दीप जले आना..."
या दोन्ही गाण्यांचे एक एक अंतरे वाजुवून ते थांबले

त्यांचं वाजवणं आणि त्यांच्यामधलं कमालीचं कोऑर्डिनेशन पाहून सगळेच अवाक झाले. जब दीप जले आना...संपल तरी त्याचे सूर सावनीच्या कानात घुमत होते.
टाळ्यांचा कडकडाट झाला, तेव्हा कुठे सावनी भानावर आली. तिला वाटलं की, बासरी हे तसंच मधुर वाद्य आहे, पण सौरभच्या हातात ती आणखीनच गोड वाटतेय. मुग्धाने सावनीकडे पाहिलं, तेव्हा सावनी कुठल्या तरी विचारात हरवली होती.
मुग्धा म्हणाली, "माहोल आहे ना हे दोघं! सॉलिड! खरंच माहोलच बदलून टाकला त्यांनी."
सावनी म्हणाली, "हो ग, एकदम माहोल!"
मुग्धा हसून म्हणाली, "काय म्हणालीस? माहोल? बघ, झालीस तू आता नागपूरकर!"
सावनी म्हणाली, "मग काय, नागपूरची संत्री गोड आहेत!"
मुग्धाने फिरकी घेतली, "अच्छा, इतकं आवडलं नागपूर? गोड कोण आहे गं? सिंथ की बासरी?" सावनी लाजत म्हणाली, "चल बे!"
मुग्धा म्हणाली, "आता तर तू पूर्णपणे नागपूरकर झालीस!" आणि दोघीजणी हसल्या.
कार्यक्रम संपल्याची घोषणा झाली, पण मुलं अजून काही वेळ शेकोटीजवळ बसण्याचा आग्रह करू लागली. सरांनी आणखी ३० मिनिटं दिली. तितक्यात कोणीतरी गिटार वाजवली आणि त्या ठेक्यावर D सेक्शनचा एक जण गाऊ लागला—
"नीले-नीले अंबर पे..."
हळूहळू सगळे पांगले. मोजकीच मंडळी उरली होती. त्यात मुग्धा, सावनी, गौरव, सारंग, अखिल आणि सौरभ होते. मुग्धा गाणं म्हणायला गेली. सौरभच्या समोर सावनी उभी होती, दोघंही एकमेकांकडे पाहत होते. पण सौरभला थोडं लागलं होतं, त्याला खरचटल्यामुळे दुखत होतं. तो आत जायला निघाला, त्याच्याबरोबर मयंकही होता. सावनीही त्याच्या पाठोपाठ निघाली. तो आत शिरायच्या आधीच ती तिथे पोहोचली.
सावनी म्हणाली, "सौरभ, काय अप्रतिम बासरी वाजवतोस रे तू! आणि मयंक तू सुद्धा. मी तर कल्पनाच करू शकत नाही. तुमच्यातल coordination सुद्धा अप्रतिम आहे" सौरभ थोडा ओशाळत म्हणाला, "Thank you! पण सगळी कल्पकता इकडे आहे" असं म्हणत त्याने मयंककडे बोट दाखवलं. मयंक म्हणाला, "Thank you!! आम्ही दोघांनी मिळून केलं. काही चुकाही झाल्या, पण ठीक आहे, जो हो गया सो हो गया. प्रतिसादावरून वाटतंय की सगळ्यांना खूप आवडलं."
सावनी म्हणाली, "आवडलं काय, अप्रतिम होतं! I can't express it in words."
मयंक म्हणाला, "तुझं आणि मुग्धाचं पण गाणं मस्त झालं हं."
सौरभ म्हणाला, "अरे हो! सावनी, तुझं पण गाणं मस्त झालं. मी विसरलोच होतो सांगायचं."
"मी विसरलोच" म्हणताना सौरभ ओशाळला आणि किंचित हसला. बासरी वाजवतांना सौरभ डोळे मिटून एका वेगळ्याच विश्वात जातो असं वाटायचं, त्याची बासरी वाजवतांनाची मुद्रा, त्याच हे स्वत:त हरवणं किवा absent mindedness, तो हसला की त्याच्या गालावर खळी पडायची, सावनीला हे खूप आवडायचं! तितक्यात मयंकला कोणीतरी बोलावलं आणि तो थोडा बाजूला गेला.
सावनी म्हणाली, "सौरभ, तू बासरी वाजवतोस हे माझ्यासाठी सरप्राईज होतं हं. कुठे शिकलास तू बासरी?" सौरभ म्हणाला, "बाबांकडे."
सावनी म्हणाली, "तुमची फॅमिली ग्रेटच आहे रे! त्यांना केवढं नॉलेज आहे. मी पेंचला ऐकलं ना त्यांना." सौरभने आश्चर्याने विचारलं, "पेंच? तू कधी गेली होतीस पेंचला त्यांना ऐकायला?" सावनीचा गोड आवाज त्याचं लक्ष वेधून घेत होता. तिचं तिच्या style ने “सौरभ…” आवाज देण त्याला खूप आवडायच!
सावनी म्हणाली, "अरे, उन्हाळ्यात तुम्ही आला होतात तेव्हा आम्ही त्या रात्री त्याच गेस्ट हाऊसमध्ये होतो. बाबांना काहीतरी काम होतं." सौरभ म्हणाला, "ओ अच्छा! सावनी, तुझं ते ऑइंटमेंट..." असं म्हणत तो औषध काढायला लागला. सावनी म्हणाली, "अरे, राहू दे ते तुझ्याकडेच. आता पण लावून घे. नंतर दे किंवा नाही दिलं तरी चालेल."
अखेर सर्वांना झोपायला जाण्याचा आदेश मिळाला. दोघंही निरोप घेऊन जड अंतःकरणाने झोपायला गेले. झोपताना मयंक आणि सौरभ एकमेकांच्या शेजारीच होते. खोली लहान असल्याने तिथे फक्त सौरभ, मयंक, सारंग आणि गौरव होते. सौरभला आलेलं पाहून मयंक गमतीने म्हणाला, "आज मॅच वाचवली असेल, पण 'C' सेक्शनची एक विकेट मात्र कायमची उडाली आहे!" सारंग ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपला होता; त्याने ब्लँकेट बाजूला केलं आणि मयंकला 'हाय-फाय' देत म्हणाला, "एकदम बरोबर! फीव्हर 104, अब आगे आगे देखो होता है क्या!"
गौरवला काही कळेना, तो म्हणाला, "विकेट, फीव्हर... काय बोलताय तुम्ही?"
सारंग म्हणाला, "गौऱ्या जाऊ दे, तू झोप." सौरभ औषध लावण्याच्या बहाण्याने तिथून सटकला. सरांची खोली बाजूलाच होती, दारावर टकटक झाली आणि आवाज आला, "झोपा रे आता, 11:30 होऊन गेलेत!"
इकडे दुसऱ्या खोलीत मुग्धा सावनीला म्हणाली, "बासरी की सिंथ?"
सावनी म्हणाली, "मुग्धे, मार खाशील आता!"
मुग्धा म्हणाली, "नाही, माहोल कुणाचा होता असं विचारतेय मी, बासरीचा की सिंथचा?"
सावनीने मुग्धाला हलकी उशी फेकून मारली.
मुग्धा म्हणाली, "हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये."
सावनी म्हणाली, "I will kill you Mugdhe!"
मुग्धाने पांघरूण बाजूला करत सावनीकडे पाहत भुवया उंचावून खोचक प्रश्न विचारला.
“मघाशी सौरभ ला तू ointment दिलं ना?”
मुग्धाचं तोंड दाबत सावनी म्हणाली, “चूप बस ना, का छळतेस मला?"
मुग्धा “कितना भी छुपाओ, ऐसी बाते छूपती नही”
तितक्यात कोणीतरी "झोपा रे" म्हणालं आणि लाईट बंद झाले.
दुसऱ्या दिवशी ताडोबाचं मगर संवर्धन केंद्र (crocodile conservation) पाहून सहल नागपूरकडे परतली, सर्वांसाठी जन्मभराच्या आठवणी घेऊन!

क्रमशः
अमोल दांडेकर

पुढच्या भागात: क्रिकेटच्या क्षितजावर क्षितिजावर नवीन तारा, दाहकतेची चाहूल आणि बर्फातून आलेले रक्ताचे अश्रू

Part 5: https://www.maayboli.com/node/88113

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरु आहे कथा! खूप काळानंतर मराठीत छानशी टिनएज फिक्शन वाचतेय.
इंद्रगोप, किती छान नाव - आम्ही त्याला मृगाचे किडे म्हणायचो. जवळ जवळ ४५+ वर्षांनी पुन्हा एकदा मी मनानेच ती लाल मखमल अनुभवली! थँक्स!

सौरभ आणि सावनी- मी तर प्रेमातच पडले दोघांच्या - किती गॉड पात्र आहेत... @अमोल - होती का कोणी सावनी??
"श्रावणात घननिळा बरसला..." - वाह वाह

कथा खूप छान मन रमावणारी आहे, वाचण्यात गुंगून जायला होत आहे ...

पण

इतकी सौम्य , संवेदनशील , गुडी गुडी , शहाणी मुलं कशी काय असू शकतात बुवा या वयात !

कथा खूप छान मन रमावणारी आहे, वाचण्यात गुंगून जायला होत आहे >> धन्यवाद पशुपत!

इतकी सौम्य , संवेदनशील , गुडी गुडी , शहाणी मुलं कशी काय असू शकतात बुवा या वयात !>> असतात की, आणि गोष्ट आहे ती!
माझ्या आजूबाजूचे आणि आमचं मित्रांच टोळक असच होतं, सरळ मार्गी!