कथा: कोवळ्या सरी- भाग 3 (उन्हाळ्याची सुट्टी, आजी आजोबा, जंगल कॅंप, #School days of 90s)

Submitted by AD75 on 5 April, 2026 - 14:47

आतापर्यंत 'कोवळ्या सरी'मध्ये...
शाळेत मयंकच्या सुंदर हस्ताक्षराने आणि त्याच्या यशाने कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, दुसरीकडे सावनी हळूहळू वर्गातील वातावरणात स्वतःची जागा निर्माण करत होती. सुरुवातीला 'बाहेरची' म्हणून मिळणारी वागणूक आणि मंजूच्या गँगचा विरोध असूनही, केमिस्ट्रीच्या तासाला सावनीने गायलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनाने सगळ्यांची मने जिंकली. याच सुरांमुळे तिची मुग्धाशी गट्टी जमली आणि तिच्याच पुढाकाराने वर्गाने समूहगान स्पर्धेत मानाची ढालही पटकावली.

कथेला एक वेगळंच वळण मिळालं ते 'बर्डी'वरील एका अचानक भेटीने! सौरभ आणि सावनी यांची त्यांच्या आयांसोबत झालेली ही भेट सुरुवातीला थोडी ओशाळवाणी ठरली, पण त्यातूनच त्यांच्या पहिल्या दिवशीच्या 'न झालेल्या अपघाताचा' उलगडा झाला. सावनीच्या आईचा मोकळेपणा आणि सावनीचं ते गोड बोलणं सौरभच्या आईलाही भावलं. या अनपेक्षित भेटीने सौरभच्या मनात एक सुप्त आनंद उमलला, ज्याची एक छोटीशी आणि लाजरी झलक दुसऱ्या दिवशी वर्गात त्या दोघांच्या छुप्या नजरा आणि ओठांवर आलेल्या किंचित हास्यातून पाहायला मिळाली.

आता पुढे....
उन्हाळ्याची सुट्टी
सौरभ, गौरव आणि अखिल रोजच्या सारखे सारंगच्या घराच्या फाटकाजवळ पोहोचले. सौरभने "रंगा!" अशी जोरात हाक मारली. आतून "आलो!" असा आवाज आला. गौरव त्याच्या स्वभावाप्रमाणे 'चिंता करितो विश्वाची'; त्याला ड्रॉइंगच्या पेपरचंही टेन्शन येत होतं.
अखिल म्हणाला, "काय मग गौरव, झाली का तयारी?"
गौरव काळजीने विचारू लागला, "काय येईल बे आज ड्रॉइंगमध्ये?"
अखिल त्याला धीर देत म्हणाला, "टेन्शन कशाला घेतोस? काहीही काढायचं न बे!"
सौरभने आपली युक्ती सांगितली, "अबे, मी तर गेल्या दोन-तीन परीक्षांपासून एकच चित्र काढतोय, प्रश्न काहीही येऊ दे!"
अखिल हसत म्हणाला, "नापास थोडीच करणार आहेत ड्रॉइंगमध्ये?"
इतक्यात मागाहून सारंग फाटक उघडून बाहेर आला. सायकलवर बसल्या-बसल्या मागे वळत फाटक बंद करत तो म्हणाला, "चला बे!"
अखिलने पुन्हा फिरकी घेतली, "काय मग, नेहमीप्रमाणे गौरव टेन्शनमध्ये?
अबे गौरव, कधी तरी हसत जा रे!"
गौरव म्हणाला, "हा अखिल म्हणजे नारदमुनी आहे!" असं म्हणत त्याने सायकलवरूनच अखिलच्या पाठीवर थाप मारली.
अखिल म्हणाला, "चला गौरव शेठ, सरस्वती विद्या मंदिराचा गौरव आहात तुम्ही!" "लेकांनो!" गौरव पुटपुटला. सगळे हसले आणि शाळेकडे निघाले.
आठवीचा तो शेवटचा चित्रकलेचा पेपर होता. आजचा पेपर संपला की उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार होती. सुट्टीच्या आनंदाने सगळ्यांचे चेहरे फुलले होते. गप्पा मारत सगळे शाळेत पोहोचले. प्रार्थना झाली आणि मुख्याध्यापक पेंडसे सरांनी घोषणा केली, "निकाल ५ मेला सकाळी ११ वाजता मिळेल."
प्रार्थना संपल्यावर सगळे आपापल्या जागी गेले. पेपर झाला की भेटायचे, हे सर्वांचे 'मूक अंडरस्टँडिंग' होतं. शिक्षक वर्गावर आल्यावर सगळ्यांनी निमूटपणे नको असलेले सामान पिशवीत भरून फळ्याच्या बाजूला भिंतीला लावून ठेवले. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळाल्यावर प्रत्येक जण ड्रॉइंगमध्ये बुडून गेला. दीड तास कसा गेला, कळलंच नाही. शेवटी १०-१५ मिनिटं उरली असताना एकमेकांनी काय काढलंय, याची चोरून पाहणी झाली.
शेवटची बेल वाजली आणि शिक्षकांनी पेपर जमा करण्यास सांगितले. मयंक दिवेकरने (ज्याला सगळे 'दिव्या' म्हणायचे) काहीतरी भन्नाट चित्र काढले होते. दिव्या हा 'क' तुकडीचा एक अफलातून कलाकार होता. त्याला सगळे
दिव्या दिव्या चित्रकार
हाती बोरू आणि keyboard छान!
म्हणायचे!
उत्तम चित्र, सुंदर हस्ताक्षर, नकला आणि अफलातून तबला वाजवायचा. मयंक आणि सारंगची चांगली गट्टी होती!
वर्गातून बाहेर पडत "५ मेला भेटू" करत आपापल्या दिशांना सगळे हळूहळू पांगले. सारंग कुठेतरी रेंगाळलेला होता, दिसत नव्हता; सौरभ आणि गौरव त्याला त्याच्या वर्गाकडे बघायला निघाले. गौरवला इतर वर्गातले अनेक मित्र भेटत होते, तो अडथळ्याच्या शर्यतीसारखा अडकत-अडकत प्रत्येकाशी बोलत पुढे जात होता. सौरभ थोडा वैतागला; तो तसा रिझर्व्हड होता, सगळ्यांशी त्याचं नाही जमायचं. सौरभ पुढे आणि गौरव मागे होता. सारंगकडे जाता जाता त्यांना अखिल भेटला.
सौरभ म्हणाला, "अखिल, अबे तू गेला नाहीस का अजून? तू महालात जाणार आहेस ना? आमच्याबरोबर पिक्चर बघायला नक्की येत नाहीस?"
अखिल म्हणाला, "नाही बे, तुम्ही जा."
सौरभ म्हणाला, "बरं, चल मग भेटू."
इतक्यात ज्या वर्गातून अखिल बाहेर आला होता, त्याच वर्गातून सावनी बाहेर आली. सौरभच्या समोर येताच ती त्याच्याकडे पाहून हसली. सौरभही मंद हसला. सावनीबरोबर आणखी दोन-तीन मैत्रिणी होत्या, त्या शाळेच्या फाटकाकडे गेल्या. अखिलने हे पाहिलं आणि सौरभकडे पाहून भुवया उंचावल्या. सौरभने त्याला खुणेनेच गप्प केलं; पण अखिलला घाई होती, त्यामुळे "देसाई, भेटा घरी, मग बोलू!" असं खिजवत तो तिथून निघाला.
सौरभला तितक्यात सारंग पलीकडल्या वर्गातून बाहेर पडताना दिसला, त्याच्याबरोबर काही 'D' सेक्शनमधले मित्र होते. गौरवसारखाच सारंग जगन्मित्र होता आणि त्याचा हाच स्वभाव नको त्या वेळी उफाळून येतो, असं सौरभला वाटायचं! गप्पा रंगल्या होत्या. सकाळचे साडेअकरा वाजले होते आणि ऊन चांगलंच तापलं होतं; पण त्याचं कोणालाच विशेष काही वाटत नव्हतं. सगळ्यांना उन्हाळ्याची सवय होती आणि मुख्य म्हणजे परीक्षा संपल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
पेपर झाला की सौरभ, गौरव आणि सारंगचा 'अलंकार' ला Clint Eastwood चा 'Fire Fox' नावाचा चित्रपट बघायचा बेत होता. अखिलचं म्हणणं होतं, "अलंकार फार लांब पडतं, इतक्या दूर सायकलने का जायचं?" त्यामुळे तो येणार नव्हता. 'D' मधल्या मित्रांशी बोलायला त्या घोळक्यात सौरभही गेला होता; पण औपचारिकता म्हणून तो तिथून काढता पाय घ्यायला तयार होता. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, "उशीर का करत आहेत?" 'D' मधले काही मित्र पांगले, पण काहींनी सारंगच्या घरापर्यंत सोबत केली. बराच वेळ ते फाटकापाशी रेंगाळले, म्हणून सौरभ थोडा वैतागला होता.
पण थोड्या वेळात ते निघाले. सौरभ म्हणाला, "रंगा, आम्ही येतो थोड्या वेळात." सौरभ आणि गौरव दोघं तिथून निघाले. सौरभ आणि गौरव घरी जाऊन पटकन जेवून पुन्हा सारंगच्या घरी पोहोचले.
सौरभ म्हणाला, "अबे, तू तयार देखील नाहीस?"
सारंग म्हणाला, "जाऊ ना बे, काय घाई आहे?"
अजून सारंगने घरी सांगितलेलं देखील नव्हतं की ते पिक्चर बघायला जात आहेत. सारंग जेवायला बसला; सौरभ मनातल्या मनात शिव्या देत सोफ्यावर बसला. गौरवच्या मनात प्रश्नचिन्ह होतं, दोघं काहीतरी कुजबुजत होते. सारंग आरामात जेवत होता; जणू तो दोघांच्या संयमाची परीक्षाच पाहत होता. मग हळूच सारंगने त्याच्या आईला सांगितलं की ते तिघं पिक्चरला जात आहेत. थोडी प्रश्नोत्तरं झाली, पण परवानगी मिळाली.
सारंग तयार होऊन बाहेर आला, इतक्यात शशांक (दादा) आला.
तो म्हणाला, "अबे, कुलर लावायचा आहे ना बे, कुठे जाऊन राहिले तुम्ही?"
सौरभ मनात म्हणाला, "झालं! आली का पंचाईत!"
पण सारंग म्हणाला, "पिक्चर पाहून येतो, मग लावू."
शशांक म्हणाला, "उद्या जा आता, उशीर झालाय. कुठला?"
सारंग म्हणाला, "फायर फॉक्स."
शशांक म्हणाला, "बाप्पा! तुम्हाला मिळणार आहे का आता?"
आता खरंच फक्त 35-40 मिनिटं उरली होती. पण तिघंही बाहेर पडले. सायकली हाणत, रणरणत्या उन्हात कसेबसे ते 'अलंकार' ला पोहोचले. तिकीट काढून पिक्चर पाहिला. पिक्चर भन्नाट होता; एक अमेरिकन फायटर पायलट रशियात जाऊन विमान पळवून आणतो, अशी ती गोष्ट होती. इंटरव्हलमध्ये त्यांनी समोशांवर ताव मारला. पिक्चर पाहून सगळे बाहेर पडले, मग थोडा वेळ पिक्चरवर चर्चा झाली. सर्वांनाच तो खूप आवडला होता.
सारंग म्हणाला, "रामदासपेठेत (लेंढरा पार्क) माझ्या आजीकडे जायचं का थोडा वेळ?"
सौरभ म्हणाला, "हो, ठीक आहे."
गौरव म्हणाला, "अबे तुम्ही जा, मला घरी जावं लागेल. आईने लगेच घरी यायला सांगितलं आहे, माझी आत्या येणार आहे आज."
सारंगने विचारलं, "गौऱ्या, अबे आम्ही जाऊ का? नक्की?"
गौरव थोडा विचार करत म्हणाला, "अं... हं, मला फक्त एकटं घरी जावं लागेल, ठीक आहे. अबे, उद्यापासून अंबाझरीला पोहायला जायचं का? सकाळी ६:०० ला भेटू पॉवर हाऊस चौकात."
सौरभ आणि सारंग म्हणाले, "हो, नक्की!" इतकं बोलून गौरव घराकडे निघाला आणि सारंग व सौरभने लेंढरा पार्कचा रस्ता धरला.
सौरभ आणि सारंग बालकमंदिरापासूनचे मित्र, मजबूत जोडी! दोघंही एकमेकांच्या बहुतेक नातेवाईकांना ओळखत होते. लेंढरा पार्कला पोहोचले; तिथे सारंगचे आजी-आजोबा आणि काका-काकू राहायचे. त्यांनी दारावरची बेल वाजवली. आजोबांनी दार उघडलं.
आजोबा म्हणाले, "अरे, कसं काय बुवा आज इकडे? बघितलं का कोण आलं आहे?" आजोबांनी आजीकडे बघत पूर्ण दार उघडलं.
आजी म्हणाली, "अरे रंगा! किती दिवसांनी आलास रे?" त्या दोघांनाही खूप आनंद झाला होता. आजोबा म्हणाले, "दोन मिनिटं इथे थांबा वऱ्हांड्यात. बाहेरून आलात ना, बाहेर खूप गरम आहे आणि आत कुलर चालू आहे, थंड आहे. एकदम उन्हातून थंडीत नको." दोन मिनिटांनी आजोबांनी त्यांना आत यायला आणि बसायला सांगितलं. आजोबा आता थकले होते, त्यांचा सारंग खूप लाडका होता. आजोबा म्हणाले, "रंगा, अरे तो कुलर बंद कर बघू, मला तुम्ही बोललेलं ऐकू नाही यायचं."
सारंगने कुलर बंद केला आणि सगळीकडे शांतता पसरली. सौरभला आजोबा ओळखत होते, पण खात्री करण्यासाठी त्यांनी विचारलं, "तू देसाई ना रे?" सौरभ म्हणाला, "हो." इतक्यात टिप्या आला. सारंग त्याचे खूप लाड करायचा. सारंगला पाहून टिप्याला खूप आनंद झाला होता; शेपटी हलवत तो आपल्या भावना व्यक्त करत होता. तो त्याला चाटत होता; टिप्याला काय करू आणि काय नको असं झालं होतं. दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडले; दोघांचा एकमेकांवर प्रचंड जीव होता. इतक्यात आजी पण बाहेर आली.
आजी म्हणाली, "अरे टिप्या, काय रे! आता काय खाशील का त्याला?" सौरभलाही टिप्या नवीन नव्हता. सारंग खुर्चीत बसला. टिप्याने सौरभकडे जाऊन फक्त वास घेतला आणि पुन्हा सारंगकडे येत त्याच्या पायाशी बसला. आजी दोघांसाठी काहीतरी खायला घेऊन आली. सौरभच्या पुढ्यात ताटली आली, तेव्हा तो संकोचाने नको म्हणाला.
पण आजी आणि आजोबा दोघंही आग्रह करू लागले, "अरे घे रे, परीक्षा संपली ना आज तुमची, म्हणून खाऊ आहे." सारंगची काकूही आली आणि थोडा वेळ बसली. आजी आणि काकू दोघींनी सारंगला विचारलं, "रंगा, आता परीक्षा संपली आहे, राहायला कधी येणार आहेस?" आजी म्हणाली, "तुम्ही इथे बालमंदिरमध्ये होतात ना, तेव्हा रंगाचे मित्र यायचे; हा पण यायचा - देसाई, बाजूचा जोशी, तो पलिकडला रत्नपारखी आणखी ४-५ जण होती. तू एकदा राहायला पण आला होतास, गच्चीवर काकांनी टेंट लावून दिला होता तुम्हाला." सौरभ म्हणाला, "हो आजी, आठवतं मला." आजी म्हणाली, "तू पण ये रंगाबरोबर." सौरभ हसला आणि हो म्हणाला.
थोडा वेळ बसून सारंग आणि सौरभ निघाले. आजी म्हणाली, "ये रे लवकर परत आणि शशांकलाही सांग यायला. पोरं मोठी झालीत तुम्ही आता, येत नाही पूर्वीसारखे."
सारंग म्हणाला, "आजी, नक्की येतो."
आजोबा आणि आजी त्यांना फाटकापर्यंत सोडायला आले. सारंगनी "येतो" म्हणत निरोप घेतला. थोडा समोर गेल्यावर पुन्हा मागे वळून तो आजी-आजोबांना हात दाखवला. सारंग दिसेनासा होईपर्यंत आजी-आजोबा फाटकातच थांबून पाहत होते.
सारंग आणि सौरभ रामदासपेठ, काचीपुरा, अभ्यंकर नगर चौक, श्रद्धानंद पेठ, माधव नगर आणि प्रताप नगर मार्गे घरी पोहोचले. रस्त्यात उद्या अंबाझरीला पोहायला जायचा विषय निघाला. सारंग म्हणाला, "सकाळी ६:०० ला भेटू पॉवर हाऊस चौकात." प्रतापनगर चौकानंतर ते रवींद्र नगरकडे वळले. सारंगचं घर आधी आलं. निरोप घेताना सारंग म्हणाला, "चल बे, उद्या सकाळी ६ ला भेटू."
5 मेला रिझल्ट लागला आणि सगळे उत्तम मार्कांनी पास झाले. रिझल्टनंतर दुपारी मयंककडे पत्ते खेळायचा बेत ठरला. वर्गातली 7-8 मुलं तिथे जमली होती. मयंकचे वडील आर्टिस्ट होते; मुख्यत्वे पेंटिंग आणि छायाचित्रणाचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांनी काढलेली पेंटिंग्ज सारंग आणि सौरभ भान हरपून बघत होते. मयंकनेही स्वतः काढलेली काही चित्रं दाखवली; ते सगळं पाहून सगळेच थक्क झाले. मयंककडे काही खास पेनं होती, ज्यांची निब विशिष्ट कोनात कापलेली होती. मयंकने सगळ्यांना त्या निबने लिहून दाखवलं. मग सगळेच "मी-मी" करत लिहून बघू लागले. इतक्यात मयंकचे वडील तिथे आले आणि म्हणाले, "गडबड करू नका, मी दाखवतो याने कसं लिहितात."
मयंकच्या वडिलांचं ते सुंदर, रेखीव अक्षर पाहून सारेच थक्क झाले. यानंतर पत्त्यांचा डाव रंगला; पण सारंग आणि सौरभला मात्र त्या पेनचा नाद लागला. बराच वेळ ते पत्ते सोडून त्या पेनने लिहीत बसले.
ऊन उतरल्यावर सगळं टोळकं बाहेर पडलं; जवळच्या पटांगणावर क्रिकेट खेळायचं ठरलं. दोन टीम झाल्या. सौरभच्या टीमची पहिली बॉलिंग आली. त्यांना 10 ओव्हरमध्ये 47 रन्सचं टार्गेट मिळालं. आधी काहींची बॅटिंग झाली आणि 3-4 जण आऊट झाले. आता सौरभवर बॅटिंग आली. त्यांना अजून 18 रनांची आवश्यकता होती आणि ही शेवटची जोडी होती. सौरभ आणि त्याच्या पार्टनरने 10 रन जोडले. पटांगणाच्या दुसऱ्या बाजूने 3-4 मुली चालल्या होत्या, त्यात एक सावनी होती. सौरभ स्ट्रायकर एंडला होता, त्याचं लक्ष विचलित झालं; समोरून जोरात बॉल आला आणि सौरभच्या दांड्या गुल झाल्या! सौरभची टीम त्याच्यावर भडकली, "काय बे देसाया, इतका सिम्पल बॉल होता! फक्त 8 रन हवे होते." सौरभ सगळ्यांची नजर चुकवून पुन्हा पटांगणाच्या शेवटाकडे पाहू लागला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती सावनी नव्हती! त्याला बाद झाल्याचं दुःख झालं, पण त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लकेर उमटली. तो डोकं खाजवत सगळ्यांना "सॉरी" म्हणाला.

उन्हाळ्याची सुट्टी: Jungle Camp

सारंग, सौरभ आणि गौरवला ओढ होती ती उन्हाळ्यातल्या 'जंगल कॅम्प' ची. सारंग, सौरभ, गौरव आणि अखिल हे राणे सरांकडे गणित आणि सायन्सच्या क्लासला जायचे. राणे सर स्वतः 'वाइल्डलाइफ ॲक्टिव्हिस्ट' (wildlife activist) होते. ते सुट्टीत मुलांसाठी निसर्गाशी संबंधित उपक्रम राबवायचे. सौरभचे वडील मनोहर देसाई हे सुद्धा एक उत्तम वन्यजीव तज्ज्ञ होते. सापांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. विदर्भाच्या जंगलांवर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांवर त्यांची ३-४ पुस्तकं प्रकाशित झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ आणि राणे सरांचे इतर काही विद्यार्थी Snake Handling शिकत होते. सौरभ तर जवळजवळ शिकलाच होता, पण त्याच्या वडिलांनी त्याला अजून एकट्याने साप हाताळण्याची परवानगी दिली नव्हती.
सारंग हिम्मतवाला होता, पण सापांच्या बाबतीत त्याला भीती वाटायची; तर अखिल या कशातच नसायचा. सौरभच्या आईला हे अजिबात आवडायचं नाही. सौरभला सापांमध्ये खूप रस होता; तो न डगमगता साप पकडायचा, कधी कधी त्यात थोडी बेफिकिरीही असायची. पण नेमकी याच बेफिकिरीची काळजी त्याच्या वडिलांना वाटायची. कारण साप विषारी आहे की बिनविषारी, हे अनुभवातूनच शिकावं लागतं. चित्रातले साप आणि प्रत्यक्ष साप यात जमीन-आसमानाचा फरक असतो.

नागपूर जवळच अनेक जंगलं आणि अभयारण्य आहेत, आरक्षित वनक्षेत्र आहेत. जस ताडोबा आणि मेळघाट तर Project Tiger आहेत. नागझिरा अभयारण्य आहे. पेंच (पेंच तर आज Tiger Reserve आहे. तेव्हा नव्हत), तोतलाडोह ह्या धरणाच्या क्षेत्रातही मोठा जंगल परिसर आहे. नवेगाव बांध यासारख पक्षी अभयारण्य आहे, पक्षीमित्रांसाठी नंदवन! मारुती चितमपल्लींचं ‘नवेगावबांधचे दिवस’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे!

यातल्या पेंच धरणाच्या परिसरात राणे सर विद्यार्थ्यांना घेऊन गेले होते. एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी नागपूरला परत अस स्वरूप होत. सारंग, गौरव आणि सौरभ होतेच या सहलीत, नुसता सौरभ नाही तर सौरभचे वडील देखील होते पण ते त्यांचा बँकेच्या मुंबईहून आलेल्या आणि नागपूरच्या ऑफिसर मंडळींना घेऊन रामटेक-खिंडसी करून, शनिवारी रात्री खिंडसीला राहून रविवारी सकाळी येणार होते.

राणे सरांनी विचारलं, "सगळे आले?"
सगळे म्हणाले, "हो!"
राणे सर म्हणाले, "आता इथून साधारण ३ किमीवर आपल्याला गाड्या सोडतील, तिथून आपण जंगलात जाऊ. पायवाट आहे, पण जमिनीवर लक्ष असू द्या. सरपटणारे प्राणी आहेत, आपण त्यांच्याच घरात जातोय. घाबरायचं कारण नाही, सर्वांच्या पायात जोडे आहेत. प्रत्येकाने एक काठी सोबत घ्यायची आहे. जंगलात गेल्यावर शक्यतो बोलू नका; मी वेळोवेळी माहिती देईन. गाडीतून उतरल्यावर चहा-बिस्किटांची सोय आहे, लवकर आटपायचं. आपण दोन ग्रुप करणार आहोत - माझ्या गाडीतले माझ्यासोबत आणि दुसऱ्या गाडीतले नंदूसोबत. दोन्ही ग्रुप पुढे मागे असतील. कुठे रेंगाळावस वाटल, निरीक्षण करावस वाटल तर जरूर करा, पण खूप मागे पडू नका. नंदू लक्ष असू दे. आपल्याजवळ दोन दुर्बिणी आहेत, सगळ्यांना अळीपाळीने बघायला मिळेल. पण त्याच्यासाठी भांडू नका, आणि आवाज करू नका. ठीक? कोणाला काही प्रश्न?”
सवयीप्रमाणे नीरज “सर कुठले प्राणी आणि पक्षी दिसू शकतात? आणि वाघ दिसेल का”
सर “ह वाघ नीरजला hello म्हणायला येणार आहे”
सगळे हसतात.
नीरज “सर प्लीज सांगा न?”
सर माहिती देऊ लागले “Indian Roller, निळकंठ, Hawk-Eagle (व्याध - Vyadh), पाण्याजवळ जाऊ तसे White-throated Kingfisher म्हणजे खंड्या. Greater Racket-tailed Drongo म्हणजे पिंगळा, सुतार, जंगलात खूप आवाज येतील त्यापैकी असा मशीनसारखा टर-टर आवाज सूताराचा”
नीरज “सर बस बस, इतक नाही लक्षात राहणार. वाघाच काय?”
सर “नीरज वाघ आत जंगलात असतो असा बाहेच्या बाजूला सहजा सहजी येत नाही, पण तुला फारच इच्छा असेल तर येईल भेटायला, पण शक्यता 1%. तुला वाघ बघायचाच असेल तर माझ्याबरोबर नागझिऱ्याला किवा मेळघाटला चल, tiger census करतात तेव्हा.”
नीरज “आणि सर…”
सर त्याच पूर्ण व्हायच्या आधीच “नान्या, आता चलायच का हाणू बे? नुसता गोष्टींचा किस काढायचा. लेका तू सुधरायचा नाहीस. बसा आपापल्या गाडीत”
सगळी मुल बसली. सरांनी सगळे बसले का विचारलं, मोठ्यांनी “हो” आल. गाड्या निघाल्या. एका ठिकाणी चहा उरकून सगळे पायवाटेन जंगलात शिरले आणि दिसेनासे झाले. एक वाटाड्या घेतला होता बरोबर.

साधारण ९ च्या सुमारास राणे सर आणि त्यांच टोळक पेंच धरणाच्या शेजारी असलेल्या विश्रामगृहाच्या बाजुनी खाली उतरत जंगलातून बाहेर पडल. मुलं फारच खुश होती, आज सगळ्यांनी एक नवल पाहिल होत एक म्हणजे काडी किडा अर्थात walking stick आणि दुसर गरुड!

याच वेळी सौरभचे वडील त्यांच्या बँकेतल्या काही अधिकारी मंडळींना घेऊन तिथे पोचले होते. विश्रामगृहात त्यांनी आधीच तिथल्या Engineer भिंगारेना निरोप पाठवला होता की मुंबई हून आलेल्या बँकेच्या ऑफिसर्सना घेऊन थोड्यावेळ येतील. काही गाड्या थांबल्या. सौरभचे वडील बाहेर उतरताच राणे सरांना सौरभचे वडील दिसले. पुढे जात त्यांनी अभिवादन केल.
सौरभच्या वडिलांनी सरांना विचारलं, “कशी झाली सहल?”
सर म्हणाले, “विचारा सौरभला”
सौरभही वडिलांजवळ आला आणि उत्साहात म्हणाला, “आम्ही बरेच पक्षी पहिले आणि मुख्य म्हणजे walking stick आणि गरुड”

इतक्यात भिंगारे साहेब तिथे आले. ते राणे सरांना आणि सौरभच्या वडिलांनाही चांगले ओळखत असत. त्यांनी आग्रहाने आत बोलावले. विश्रामगृहाच्या मागच्या आवारात वृक्षांची दाट झाडी होती तिथे सगळ्यांची चहा आणि अल्पोपहारची सोय केली होती.
सौरभच्या वडिलांनी राणे सरांशी ओळख करून दिली. अळीपाळी ने राणे सर आणि सौरभचे वडील या सगळ्या भागाची आणि इथल्या जैव विविधतेची माहिती सांगत होते. सगळेच लक्ष देऊन ऐकत होते.

इतक्यात भिंगारे साहेबांना काहीतरी निरोप येतो. ते उठून आत गेले, काहीच वेळात पुन्हा बाहेर आले ते त्यांच्या बरोबर आणखीन एक व्यक्ती बाहेर आली. भिंगारे सरांनी त्यांची ओळख करून दिली “हे आमचे सर, अनंत पिंगळे, Chief Engineer. आणि सर मी सांगितल होतं ना, माझा मुलगा आणि मुलगी दोघही ज्या राणे सारांकडे क्लास ला जायचे ते हे राणे सर आणि हे मनोहर देसाई. निसर्ग तज्ञ आहेत, दोघही.”
पिंगळे साहेब म्हणाले, “अरे व्वा, मी तुम्हा दोघांबद्दलही खूप ऐकल आहे.”
सौरभच्या वडिलांनी बँकेच्या officers ची ओळख करून दिली. पैकी एक त्यांच्या ओळखीतले निघाले.
पुन्हा जगलांची आणि पशू पक्ष्यांची माहिती कडे विषय वळला.

ह्या सगळ्या गप्पा वरुन एक व्यक्ती ऐकत होती, ती म्हणजे सावनी! कारण अनंत पिंगळे म्हणजे तिचे वडील. ते सर्व कुटुंबाला घेऊन उन्हाळाची सुट्टी म्हणून याच विश्राम गृहात मुक्कामाला होते! आता सावनीला कळल की मनोहर देसाई म्हणजे तिच्या वर्गातल्या सौरभ देसाईचे वडील. She was quite impressed with the knowledge and all the information he was telling. तिच्यापासून सौरभ तिथे असल्याची जाणीव लपली नव्हती. अच्छा, म्हणून हा Bio मधे इतका interest घेतो. Natural inheritance! पण सावनी तिथे आहे हे कुणालाही माहीत नव्हत!

क्रमश:

अमोल दांडेकर

पुढच्या भागात मृदगंध, शाळेची सहल आणि कब्बडीचा तो रंगलेला सामना

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखमाला आवडली. पस्तीस वर्षे लक्ष्मीनगर नागपुरात होतो त्यामुळे सगळ्या गोष्टींशी रिलेट झाले. उन्हाळ्यात आजीने आणलेला खाऊ कच्चा चिवडा असेल असं वाटलं होतं… पुभाप्र!