पहिला भाग: https://www.maayboli.com/node/88038
दुसरा भाग: https://www.maayboli.com/node/88038
आतापर्यंत 'कोवळ्या सरी'मध्ये...
थंडीच्या एका सुखद शनिवारी, शाळेच्या घाईगडबडीत सौरभ आणि एका अनोळखी मुलीची वर्गाच्या दारात टक्कर होता होता वाचली. तिने चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळला होता, त्यामुळे सौरभला तिचा चेहरा नीट दिसला नाही, पण तिच्या शब्दांतलं ते हळवं 'सॉरी' आणि तिच्या परफ्युमचा एक मोहक दरवळ सौरभच्या स्मृतीत कायमचा कोरला गेला. खरी गंमत तर थोड्याच वेळात मैदानावर पीटीच्या तासाला झाली. पीटीची ड्रिल सुरू असताना सौरभ चुकून चुकीच्या बाजूला वळला आणि थेट त्या मुलीच्या समोर येऊन उभा राहिला. त्या एका क्षणाच्या नजरानजरेत दोघांनीही एकमेकांना पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिलं आणि दोघांचंही भान हरपलं.
वडिलांची मोठ्या प्रकल्पांचे अधिकारी म्हणून बदली झाल्यामुळे सावनी नाशिक सोडून नागपूरच्या या नव्या शाळेत आली आहे. तिने वर्गात इंग्रजीतून ओळख करून दिली, ज्यामुळे तिचे आणि देशपांडे मॅडमचे जुने 'नाशिक कनेक्शन' अगदी आपुलकीने जुळले. मात्र, अस्सल मराठी वातावरणाच्या या शाळेत तिच्या इंग्रजी बोलण्यामुळे इतर मुला-मुलींमध्ये एक प्रकारची कुजबुज आणि आकस निर्माण झाला आहे. अशा प्रकारे नव्या शहरात सावनीचा हा पहिला दिवस कुतूहल, थोडा मानसिक त्रास आणि नव्या ओळखींच्या मिश्र अनुभवाने सुरू झाला आहे.
आता प्रकरण १ पुढे.....
सुंदर हस्ताक्षराचा धनी: मयंक
रोजच्या प्रमाणे वर्गशिक्षक गंधे सर वर्गावर आले होते...
"दिवाडकर आला आहे का? मयंक, कुठे आहे?" सरांनी विचारले. त्यांना मयंक दिसला. सर म्हणाले, "हा..." मयंक उठून उभा राहिला.
सर पुढे म्हणाले, "तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने रा. स्व. संघाने घेतलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत मयंक शाळेतून पहिला आला आहे! इतकंच नाही, तर सर्वात लक्षवेधी हस्ताक्षर म्हणून त्यांनी शहरातील १० हस्ताक्षरांची निवड केली, त्यातही मयंकची निवड झाली आहे. त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल 201 रुपये रोख बक्षीस, एक पदक आणि प्रशस्तीपत्र मिळणार आहे. लक्षवेधी हस्ताक्षरासाठी 501 रुपये बक्षीस, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मिळणार आहे. अभिनंदन मयंक!"
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सर म्हणाले, "अरे थांबा, आणखीन एक!"
"त्याच स्पर्धेत मुग्धा शाळेत तिसरी आली आहे. मुग्धा, अभिनंदन! बक्षीस म्हणून 151 रुपये रोख, एक पदक आणि प्रशस्तीपत्र मिळणार आहे. मी वर्गावर येत असताना मुख्याध्यापक पेंडसे सरांनी मला बोलावून सांगितलं. एकाच वर्गातून दोन विजेते असलेला आपलाच वर्ग आहे. Both of them are very well deserving."
वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. दोघांच्या आजूबाजूला बसलेल्या सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अतिउत्साहात वर्गातल्या देशमानेने मयंकच्या बाकावर जाऊन त्याचे अभिनंदन केले.
सर म्हणाले, "अरे देशमाने, तुझं मयंकवर खूप प्रेम आहे, मला माहीत आहे, पण मी अजून वर्गातच आहे. आपल्याला जिथे उत्साह दाखवायला हवा, तिथे आपण कमी पडतो." सरांचा रोख मागच्या आठवड्यात 'बी' सेक्शनबरोबर हरलेल्या क्रिकेट मॅचकडे होता. वर्गात शांतता पसरली.
सर म्हणाले, "मला आणखीनही काही सांगायचं होतं. Any way, तुम्हा दोघांचे पुन्हा एकदा अभिनंदन! मला मधल्या सुट्टीत येऊन भेटा. काही औपचारिकता (formalities) आहेत."
छोट्या मधल्या सुट्टीत अख्ख्या वर्गाने मयंकला डोक्यावर घेतलं. खिलाडूवृत्ती दाखवत मुग्धानेही मयंकचे अभिनंदन केले. इतरही बऱ्याच जणांनी मयंकचे कौतुक केले.
काना मागून आली आणि….
एक-दोन आठवडे गेले असावेत. सावनी वर्गात रुळली होती, पण अजून तिला सगळ्यांनी स्वीकारले नव्हते. एक प्रकारचा 'रेझिस्टन्स' (resistance) तिला जाणवायचा. अजूनही तिची म्हणावी तशी मैत्रीण झालेली नव्हती आणि एक गोष्ट तिला प्रकर्षाने जाणवायची, ती म्हणजे इथे सहसा मुलं-मुली एकमेकांशी बोलत नव्हती. शाळेत अभ्यासाचं जास्त वातावरण होतं आणि सगळं मराठी! ती ज्या शाळेतून आली होती, तिथे थोडं मोकळं वातावरण होतं.
रोजच्या प्रमाणे शाळा सुरू होती. मधल्या सुट्टीनंतरचा पहिला तास केमिस्ट्रीचा (Chemistry) होता. केमिस्ट्रीचे शेवडे सर वर्गावर होते. मागच्या आठवड्यात सर नव्हते.
वर्गात आल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे विचारले, "वाघोबा (म्हणजे सौरभ देसाई, सौरभने शेवडे सरांच्या पहिल्या तासाला वाघाची गोष्ट सांगितली होती, तेव्हापासून सरांनी त्याचं नाव 'वाघोबा' ठेवलं होतं) कुठे होतो बे आपण लास्ट टाईम?"
सौरभ उत्तरला, "अवजड पाण्यावर सर, म्हणजे heavy water आपण चालू केलं होतं." शेवडे सर सौरभकडे पाहत म्हणाले, "वाघोबा, नाही जाऊ दे लेका, तू खूप पलीकडे आहेस. मला कोणीतरी पुस्तक द्या रे, मी माझं पुस्तक आज विसरलो आहे. देशमाने, आण रे."
सरांनी दोन मिनिटं तो धडा चाळला आणि देशमानेला पुस्तक परत करून त्यांनी शिकवायला सुरुवात केली. शेवडे सर वर्गातल्या दोन्ही ओळींत फिरून शिकवायचे आणि मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे, विनोद करायचे किंवा कुणाची तरी गंमत, टिंगल-टवाळीही करायचे. वर्गात एक खेळीमेळीचं वातावरण तयार होई. पण याचबरोबर ते एक उत्तम शिक्षकही होते. ते शिकवत असताना सगळे खूप लक्ष देऊन ऐकत असत.
सहज शिकवता-शिकवता त्यांचं लक्ष सावनीकडे गेलं. ते थांबले. सावनीजवळ जात त्यांनी विचारलं, "तू नवीन आहेस का? काय नाव तुझं बाळ?" सावनी उठून उभी राहिली. सावनीने पुन्हा इंग्लिशमध्ये तेच introduction दिलं, जे तिने पहिल्या दिवशी दिलं होतं. यावर शेवडे सर सगळ्या वर्गाकडे बघत म्हणाले, "अरे, माझ्याच गोत्राची आहे रे ही! पेंटिंग, ड्रॉइंग आणि गाणं... क्या बात है! लेकांनो, शिका तिच्याकडून. तिनं बघा कसं व्यवस्थित सगळं सांगितलं. नुसतं 'सावनी पिंगळे' सांगून बसली नाही ती. सावनी बाळ, गाणं शिकली आहेस, तर पुढे पण शिक बरं. आपल्या इथे आहेत दोन-चार छान शिकवणारे, मी सांगेन तुला. कसं आहे, गाणं माझा 'वीक पॉईंट' आहे. अरे हो..."
काहीतरी आठवल्यासारखे करून शेवडे सर दोन मिनिटे थांबले आणि म्हणाले, "मग तुझं नाव नाही दिसलं मला तुमच्या वर्गाच्या टीममध्ये? आता मागच्या आठवड्यात तर सगळं फायनल झालं. काय गं ए मंजे, सिंधू... तुम्ही सांगितलं नाही तिला?" ओशाळत मंजू आणि सिंधूने मानेनेच नकार दिला. मंजू म्हणाली, "सॉरी सर, आम्ही विसरलो."
शेवडे सर म्हणाले, "वा! काय पण... आम्ही विसरलो! Treat her well, हं ! उद्या तुम्ही नवीन ठिकाणी गेलात आणि तुम्हाला असं वागवलं तर चालेल का?" मंजू आणि सिंधूने पुन्हा मानेने नकार दिला. सिंधू म्हणाली, "खरंच सॉरी सर."
शेवडे सर म्हणाले, "सावनी, स्वामी विवेकानंद जयंती निमित्त जानेवारीत आपल्या शाळेत एक समूहगान स्पर्धा असते, त्यात सगळे वर्ग भाग घेतात. यांनी सांगितलं नाही तुला, ठीक आहे, हरकत नाही. मी पाहतो काय ते. बाळ, एक काम करू, मी शेवटची पाच मिनिटं ठेवतो, गाणं म्हणणार का एक?"
सावनी म्हणाली, "सर गाणं? नको ना..."
शेवडे सर म्हणाले, "अरे, मला कळू तर दे, गाणं शिकली आहेस ना?"
सावनीने होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाली, "ओके सर, मी प्रयत्न करते."
सरांनी शिकवायला सुरुवात केली आणि तास संपायच्या बरोबर पाच मिनिटं आधी ते आपल्या खुर्चीत जाऊन बसले
आणि म्हणाले, "सावनी, बाळ म्हणतेस ना गाणं?"
सावनी उभी राहिली आणि तिने विचारले, "सर, मी भजन म्हटलं तर चालेल?"
सर म्हणाले, "धावेल!"
सावनी थोडी हसली, तिने घसा स्वच्छ केला आणि ती गाऊ लागली...
"म्हारो प्रणाम बांके बिहारी…."
सगळ्या वर्गात शांतता पसरली होती. सगळे जण तल्लीन होऊन ऐकत होते. मुळात सावनीचा आवाज ती बोलायची तेव्हाही गोड वाटायचा आणि गाताना तर अधिकच गोड वाटत होता. वर्गातील प्रस्थापित गायिका थोड्या अस्वस्थ झाल्या; नवीन स्पर्धक! पण काहींच्या चेहऱ्यावर आनंदही होता.
शेवटच्या कडव्याच्या वेळी, पुढच्या संस्कृतच्या तासाच्या लाखे मॅडम वर्गाच्या दाराशी येऊन उभ्या राहिल्या. सरांनी त्यांना हाताने खूण करत आत बोलावलं. लाखे मॅडम अतिशय हळू, आवाज न करता वर्गात येऊन उभ्या राहिल्या. सगळे भजनात तल्लीन होते. पुढच्या बाकावरच्या काहींना सोडलं, तर इतरांना कळलंदेखील नाही की लाखे मॅडम कधी वर्गात आल्या. सावनीही एकाग्र चित्ताने शून्यात नजर लावून गात होती. सौरभही तल्लीन होऊन ऐकत होता.
भजन संपलं, तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. शेवडे सर उठून उभे राहिले आणि म्हणाले, "खूप छान सावनी! मॅडम, सॉरी, थोडा उशीर झाला." लाखे मॅडम म्हणाल्या, "ठीक आहे सर, काही हरकत नाही. शेवटची ओळ का होईना, मला इतकं छान भजन ऐकायला मिळालं. सावनी, खूप छान!"
शेवडे सर बाहेर पडता पडता म्हणाले, "सावनी, तुमचा हा संस्कृतचा तास झाला की, पीटीच्या तासाला जे गाण्यात आहेत, ते सगळे 305 मध्ये येणार आहेत. तुझं नाव नसलं तरीही ये. मी पाहतो काय करायचं ते."
सावनी म्हणाली, "ओके सर."
संस्कृतचा तास संपला. आधी सगळी मुलं वर्गाबाहेर पडली आणि शाळेबाहेरच्या पटांगणावर गेली. काही जण ऑफिसकडे फुटबॉल घ्यायला गेले. फक्त मयंक आणि संजय 305 कडे निघाले होते.
संस्कृतचा तास संपल्यावर मुलींमध्ये मुग्धा सावनीजवळ गेली आणि म्हणाली, "सावनी, खूपच सही झालं हं गाणं! एकदम माहोल!"
सावनीने विचारले, "Thank you! पण 'माहोल'?"
मुग्धा म्हणाली, "अरे, ही आमच्या नागपूरची भाषा आहे! तू शिकशील हळूहळू, माझ्या संगतीत राहत जा."
सावनी हसत म्हणाली, "हं, sure!"
आणखीन काही मुलींनी सुद्धा तिचे गाण्याबद्दल कौतुक केले होते. सारंग, सौरभ आणि गौरवनेही सावनीजवळ जाऊन गाणं खूप छान झाल्याचे सांगितले. सौरभला सावनीजवळ गेल्यावर त्या परफ्युम किंवा पावडरीचा सुगंध त्याला जाणवला होता, त्यामुळे सौरभला त्या दिवशी सकाळी घडलेला प्रसंग पुन्हा आठवला.
मुग्धा सावनीला बरोबर घेत 305 कडे निघाली, इतक्यात "ए थांबा गं, मी पण येते आहे" म्हणत सिंधूही त्यांच्याबरोबर निघाली. वर्गातून एकूण ६ मुली आणि २ मुलं गाण्यात होती, ती सर्व 305 मध्ये गेली.
यानंतर मुग्धा आणि सावनीची चांगलीच गट्टी जमली. त्यात एक-दोन मुली आणखीन येऊन मिळाल्या होत्या.
काही मुली वर्गातच थांबल्या होत्या, त्यात मंजू आणि तिची गँग होती. मंजूने तिच्या गँगमध्ये बोलून दाखवलं, "सावनीच्या वडिलांना गंधे सर ओळखतात, त्यांच्या लहान भावाचे चांगले मित्र आहेत ते. देशपांडे मॅडमच्याही गावची ही आणि आता शेवडे सरांनाही हिने इम्प्रेस केलं आहे. कानामागून आली आणि तिखट झाली, हूं!" तिची नक्कल करत ती म्हणाली, "My name is Savni Pingle..." बाकी सगळ्या हसायला लागल्या.
गौरव, सारंग आणि सौरभ बाहेरच्या पटांगणाकडे निघाले होते.
गौरव म्हणाला, "अबे सौरभ, तू नाही गेला 305 मध्ये?"
सौरभ म्हणाला, "नाही बे, गाण्याची स्पर्धा आहे."
गौरव म्हणाला, "म्हणून तर विचारतोय. तुला तर बासरी पण छान वाजवता येते, तू गाणंही म्हणतोस, मग जात का नाहीस?"
सौरभ म्हणाला, "नाही ना बे."
काही दिवसांनी सावनीला बहुतेक मुलींनी बऱ्यापैकी सामावून घेतले होते. पण मंजू आणि गँगचा विरोध अजूनही कायम होता. मुलांचा तर प्रश्नच नव्हता, ते मुलींशी फारसे बोलत नसत.
जानेवारीच्या मध्यात पुन्हा एका शनिवारी वर्गशिक्षक गंधे सर वर्गावर आले आणि सांगितले, "स्वामी विवेकानंद जयंती निमित्त घेतलेल्या समूहगान स्पर्धेत 8C चा प्रथम क्रमांक आला आहे. ज्यांनी ज्यांनी यात भाग घेतला, मेहनत केली, त्यांचं अभिनंदन! बक्षीस स्वरूपात ढाल मिळाली आहे. आजच्या दिवशी ती ढाल वर्गात आणून ठेवायलाही हरकत नाही." मुली हर्षोल्हासाने ओरडल्या आणि सगळा वर्ग टाळ्या वाजवू लागला.
"कोण आणेल? सिंधू आणि सावनी, आणणार का ती ढाल? अभय आणि प्रदीप, हे टेबल जरा फळ्याच्या बाजूला भिंतीला खेटून ठेवा, म्हणजे ती ढाल त्याच्यावर ठेवता येईल." सिंधू आणि सावनी उठल्या आणि ऑफिसकडे निघाल्या होत्या. सरांनी त्यांना थांबवून सांगितले, "आज चौथा पिरेड झाल्यावर, शाळा सुटली की आठवणीने ढाल पुन्हा ऑफिसमध्ये परत नेऊन द्या. येताना एक फडकं घेऊन या, हे टेबल पुसून मग त्यावर ढाल ठेवा. चला, मला आनंद आहे की मस्ती-गोंधळ करण्यात नंबर १ असलेला 'C', बाकी गोष्टींतही तितकाच पुढे आहे. काय, बरोबर ना गभणे?"
सगळे हसले आणि ओरडले C No 1!
अचानक भेट
दोन-तीन महिने झाले असावेत. एक दिवस सावनी आणि तिची आई बर्डीवर एका दुकानातून बाहेर पडत होत्या आणि सौरभ आणि त्याची आई त्याच दुकानात शिरत होते. सौरभचं लक्ष नव्हतं, पण सावनीचं होतं. सौरभला पाहताच ती आईला म्हणाली, "आई, अगं he is Saurabh, आमच्या वर्गात आहे." इतकं म्हणून तिने "सौरभ!" करत त्याला आवाज दिला.
सौरभने समोर पाहिलं. त्याला सावनी दिसली आणि तो एकदम चमकला. एकतर अशी वर्गातली कोणी मुलगी बर्डीवर भेटेल असं त्याला कधी वाटलंही नव्हतं; शिवाय सावनीने त्याला मोठ्याने आवाज दिला होता. सौरभच्या आईने त्याला विचारलं, "सौरभ, तुला आवाज देतेय ती मुलगी तुझ्या वर्गात आहे का?" सौरभ म्हणाला, "हो आई."
इतक्यात सावनी समोरच येऊन उभी राहिली.
ती म्हणाली, "अरे सौरभ!..."
सौरभसाठी हा खूप 'ऑकवर्ड' (awkward) क्षण होता. त्याचा स्वभाव थोडा लाजरा आणि ठराविक मित्रांमध्येच रमणारा होता. सौरभच्या आईला हे माहीत होतं, तेव्हा त्या सावनीच्या आईकडे पाहत हसून म्हणाल्या, "नमस्कार, मी नलिनी देसाई."
सावनीच्या आईने सुद्धा हसून नमस्कार केला, "मी अनिता पिंगळे."
सावनी म्हणाली, "आई, हा सौरभ. He is in our... म्हणजे आमच्या वर्गात आहे."
सावनीने इंग्लिशवरून पटकन मराठीवर येत स्वतःला दुरुस्त केलं. गेल्या काही महिन्यांत तिच्या हे लक्षात आलं होतं की, आपण नाशिकहून नागपुरात आलो आहोत; English मिडियम शाळेतून अगदी मराठी मिडियम नसल तरी मराठी शाळेत आलो आहोत, त्यामुळे, ‘so when in Rome, do as the Romans do!’
सावनी म्हणाली, "आई, मी नाही का तुला सांगितलं होतं... पहिला दिवस..."
सावनीची आई म्हणाली, "अच्छा, हो का?" सौरभने थोडी अप्रसन्नता दाखवत मान हलवून "काय सावनी?" असं केलं.
सावनी म्हणाली, "काय काय? It was my first day... अरे, तो माझा पहिला दिवस होता. मी इतकी टेन्शनमध्ये होते की माझं अजिबात लक्ष नव्हतं. मी आईला म्हटलं होतं की मी सोमवारपासून शाळेत जाते. बाबाही तेच म्हणत होते, पण आई म्हणाली नाही, आजपासूनच जायचं. बरं झालं तुझं लक्ष होतं आणि आपली टक्कर होता होता वाचली!"
सौरभची आई म्हणाली, "अरे, तू तर मला काहीच बोलला नाहीस! बघा हा, काही बोलतच नाही. कधी काही सांगत नाही."
सौरभ वैतागून म्हणाला, "अगं आई, त्यात काय सांगण्यासारखं आहे?"
सावनीची आई म्हणाली, "पण सावनीला खूप त्रास झाला हं, इथे adjust व्हायला."
सावनी म्हणाली, "आई, it’s fine, माझी काहीच तक्रार नाहीये."
सावनीची आई म्हणाली, "फाईन काय? एक-दोनदा डिसेंबरमध्ये ती जाऊ शकली नव्हती, तेव्हा कोणी होमवर्क द्यायला पण तयार नव्हतं. शेवटी मुग्धाने दिला वाटतं. ती बरी आहे जरा. सगळ्यात ती मंजू फारच..."
सावनी आईचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच म्हणाली, "आई, जाऊ दे ना, आता सगळं ठीक आहे." सावनीची आई म्हणाली, "I hope so."
सावनीची आई सगळ्यांकडे पाहत म्हणाली, "सावनी, तू थांबतेस का इथेच? तुम्ही बोला, मी आमच्या ड्रायव्हरला काहीतरी आणायला पाठवलं आहे. त्याने फारच उशीर लावला, बाजूच्याच दुकानात आहे तो. मी त्याला बोलावून आणते, आम्हालाही निघायलाच पाहिजे. सॉरी हं, तुम्हालाही उशीर होतो आहे."
सौरभची आई म्हणाली, "हो, हो, काहीच हरकत नाही."
सौरभची आई पुढे म्हणाली, "सावनी, तू नवीन आली आहेस का शाळेत?"
सावनी म्हणाली, "हो काकू, आम्ही नाशिकहून आलो आहोत. दिवाळीनंतर मी शाळेत आले." सौरभची आई म्हणाली, "अच्छा, मला काहीच कल्पना नाही. सौरभ जास्त काही सांगत नाही." सावनी हसत म्हणाली, "काकू, आता रुळले आहे मी. आता जवळपास ३ महिने होऊन गेले." सौरभची आई म्हणाली, "अच्छा, बराच बदल आहे तुझ्यासाठी. कुठे राहता तुम्ही? तुझे वडील काय करतात?"
या सगळ्यात सौरभला खूप ऑकवर्ड वाटत होतं. सावनीची आई कधी येतेय, याचीच तो वाट पाहत होता.
सावनी म्हणाली, "काकू, आम्ही जयप्रकाश नगरमध्ये राहतो. माझे बाबा 'चीफ इंजिनिअर' आहेत इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. गोसीखुर्दचं काम चालू झालं आहे ना, त्यासाठीच बाबांची बदली झाली आहे." सौरभची आई म्हणाली, "अच्छा, हो का!"
इतक्यात सावनीची आई आली. ती म्हणाली, "सॉरी हं, माझ्यामुळे उशीर झाला तुम्हाला. तुम्ही लोक कुठे राहता?"
सौरभची आई म्हणाली, "आम्ही रवींद्र नगरमध्ये."
सावनीची आई म्हणाली, "मला कल्पना आहे. आम्ही अजूनही नागपुरात ॲडजस्ट होतो आहोत. छान वाटलं तुमच्याशी बोलून. सौरभ, अरे कधी घरी ये, आईला पण घेऊन ये. सावनीला मोठा भाऊ पण आहे, संकेत, पण तो पुण्याला इंजिनिअरिंगला असतो. चला भेटूया, छान वाटलं नवीन ओळख झाली."
सौरभची आई म्हणाली, "हो, नक्की भेटूया!"
सावनी आणि तिची आई निघून गेल्या. हा संवाद संपला याचा सगळ्यात जास्त आनंद सौरभला झाला. त्या गेल्यावर सौरभ आईला म्हणाला, "अच्छा भेटूया काय? काही भेटू-बिटू नाही!" सौरभची आई म्हणाली, "तुझं आपलं काहीतरीच! अरे, तिचे बाबा किती मोठ्या पोस्टवर आहेत माहीत आहे का? चीफ इंजिनिअर म्हणजे त्या प्रोजेक्टचे सर्वेसर्वा आहेत ते. पण किती साधी वाटली तिची आई! आणि सावनी सुद्धा किती गोड आहे, तिचा आवाज किती छान आहे!"
सौरभ म्हणाला, "आई, आता आत जायचं?" सौरभची आई म्हणाली, "हो, चल."
रात्री घरी आल्यावर सौरभला सावनी बर्डीवर भेटल्याचं आठवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं.
सौरभ, सारंग आणि अखिल नेहमी सोबत शाळेत जायचे. गौरवचं नक्की नसायचं, तो कधी यायचा तर कधी नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना सौरभ आणि सारंगची भेट झाली. अखिल काही कारणाने उशिरा येणार होता. सौरभने सारंगला सावनी काल संध्याकाळी बर्डीवर भेटल्याचं सांगितलं. सारंगने सौरभची थोडी खेचली, "काय मग, सावनी... हं!" तो फक्त गंमत करत होता.
"ऐक ना रंगा, अरे या मुली काहीही सांगतात यार घरी!"
सौरभने सारंगला सावनीच्या पहिल्या दिवशी वर्गात घडलेला तो प्रसंग सांगितला. सारंग पुन्हा गंमत करत म्हणाला, "अच्छा, तर तीन महिने झाले... छुपे रुस्तम आणि सर आज बोलून राहिले आहेत!"
सौरभ म्हणाला, "जा लेका, उगाच सांगितलं तुला!" सारंग खूप समजूतदार (mature) होता. तो म्हणाला, "गंमत करतोय बे! अबे, आता घरी कोणी काय सांगावं, हे आपण कसं ठरवणार? त्यात त्या मुली!"
इतक्यात अखिल आला. सारंग सौरभला म्हणाला, "सांगू का?"
सौरभ दमात म्हणाला, "नको बे, रंगा मार खाशील!"
अखिल म्हणाला, "काय बे काय? सारंग साल्या, तू अजून तयार पण नाहीस?"
सारंग म्हणाला, "अबे, दोन मिनिटांत आलो!"
तिघेही शाळेकडे निघाले. वाटेत गौरव भेटला. तिघेही शाळेत पोहोचून वर्गात गेले. मागाहून सावनी आत आली. आपल्या बेंचवर पोहोचल्यावर तिने सौरभकडे पाहिलं. ती थोडी हसली आणि सौरभही तिच्याकडे पाहत किंचित हसला. हे सारंगने पाहिलं होतं!
क्रमश:
-अमोल दांडेकर
छान चाललीये कथा.
छान चाललीये कथा.
मस्तच!
मस्तच!
सह्ही!!!
सह्ही!!!
कथेचे नाव 'कोवळ्या सरी' हेही चपखल.
आता निबर झाल्यावर ते दिवस आठवतात खरच किती कोवळे असतो आपण. बटरफ्लाइज इन स्टमक वाले दिवस. बुजरे आणि अगदी अभ्यासू पण आपली सर्वांवर छाप पडावी असे वाट्णारे. मग एक वर्गात एक पॉप्युलर शिष्ठ ग्रुप असतोच. आपण त्यात नसतो. उगाचच एक लाँगिंग की त्या गृपमध्ये सामावुन घ्यावं.
आपल्यालाही जीवलग मैत्रिणी असतात आणि त्या तासन तास - तासन तास गप्पा. गप्पांना खळ नाही. सर्व आठवले की गार वार्याची झुळूक स्पर्शुन गेल्यासारखे वाटते.
दांडेकर, तुम्ही छान कॅप्चर (वातावरण निर्मिती) करताय ते वातावरण
तुमच्या साहित्याच्या रुपाने, माबोला , मिल्स & बुन्स रोमान्स लाभावा ही इच्छा.
Thank you every one, Nitnave,
Thank you every one, Nitnave, Aba, Dhanashri and everyone.
असे सुंदर आणि लोभसवाणे शाळेचे
असे सुंदर आणि लोभसवाणे शाळेचे दिवस आठवले …. खूपच मस्त लिहलंय ….