महानतेपलीकडे – महाराष्ट्रातील सामाजिक व वैचारिक योगदानाचे बहुआयामी मूल्यमापन (गौरवशाली/प्रभावशाली व्यक्तींची सूची – एक सामूहिक प्रयत्न)
मूळ प्रकाशन: आजचा सुधारक, एप्रिल २०२६
https://www.sudharak.in/2026/04/14929/
प्रत्येक समाजामधून संत, समाजसुधारक, राजकीय नेते, लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, विवेकवादी, व्यावसायिक, कार्यकर्ते, खेळाडू, उद्योजक अश्या व्यक्ती वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रकारे समाजाला आकार, दिशा देत असतात. ह्यांपैकी काहींनी कायदे घडवले आहेत, काहींनी समाजोपयोगी संस्था उभारल्या-वाढवल्या, काहींनी साहित्याद्वारे समाजातील प्रश्न चव्हाट्यावर आणले, काहींनी अन्यायाला थेट आव्हान दिले, काही केवळ स्वप्नरंजनात डुंबले. काहींनी प्रस्थापित समजुती तेवढ्या अधिक घट्ट केल्या; तर काहींनी अहितकारक, घातक समजुतींच्या विरोधात आंदोलनाचा/क्रांतीचा मार्ग स्वीकारला.
आपण ह्या सगळ्याकडे कशा नजरेने पाहतो? अश्या व्यक्तींना संबोधतांना आपण सहजपणे ‘महान’ हा शद्ब वापरतो. पण ह्यांची ‘महानता’ नेमकी कशात असते? निव्वळ त्यांच्या लोकप्रियतेत, की संस्थाबांधणीत, ज्ञानपरिवर्तनात, सामाजिक कार्यात, सामाजिक न्यायात, त्यांच्या आंदोलक कृत्यात, अथवा तात्काळ समाजोपयोगात? की कधी कधी केवळ काही इष्ट-अनिष्ट मार्गाने मिळालेल्या/मिळवलेल्या त्यांच्या सन्मानात, पुरस्कारात?
इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी १९१३ मध्ये “महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान आणि कर्त्या लोकांची मोजदाद” करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा निकष स्पष्ट होता : ‘थेट सामाजिक उपयुक्तता’. अर्थात्, समाजाच्या उपयोगी न पडलेले योगदान गणनेत धरता येणार नाही. पुढे अनेकांनी याद्या केल्या. अलीकडेच, म्हणजे २०१७ मध्ये राजन मांडवगणे ह्यांनी नवी यादीदेखील सुचवली.
अशा प्रयत्नांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की अशा प्रकारचे परीक्षण सातत्याने होत राहिले तर आधीच्या सूचीतील प्रभृतींच्या आठवणींना, त्यांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळेल, तसेच अनेक नव्या लोकांचा, त्यांच्या कार्याचा परिचय लोकांना, समाजाला होत राहील. राजवाडे, मांडवगणे ह्यांनी महाराष्ट्रापुरती ही सूची मर्यादित ठेवली असण्यामागे अनेक कारणे असू शकतात. समाजोपयोगी न पडलेले योगदान सूचीत घेऊ नये असेही त्यांनी इंगित केले होते. योगदान तोलण्याचे त्यांचे मापदंडही खूप स्पष्ट नाहीत/नव्हते. पण तरीही त्यांचे हे प्रयत्न अनेक दृष्टींनी मोलाचे ठरतात. हेच प्रयत्न पुढे न्यायचे तर काही मर्यादा आपण ओलांडू शकतो का? आणि त्याअनुषंगाने एक नवी सूची तयार करू शकतो का? ह्या विचारातून पुढे आलेले हे आवाहन आहे.
हे आवाहन वेगळे कसे?
महाराष्ट्राभरातून अश्या व्यक्तींची एक प्रातिनिधिक सूची तयार करायची, तर त्यासाठी सामूहिक सहयोगाची जोड हवी. संतांपासून विवेकवाद्यांपर्यंत, कलाकारांपासून प्रशासकांपर्यंत, उद्योजकांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अशी ही समावेशक सूची असावी. ही सूची अंतिम नसून अश्या प्रकारच्या प्रयोगाचा आरंभमात्र ठरावी, एवढेच. ह्या टप्प्यात महाराष्ट्राचे सध्याचे भौगोलिक क्षेत्र विचारांत घ्यावे, तसेच महाराष्ट्रीय मनांवर प्रभाव पाडणारे (महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील असले तरी, उदाहरणार्थ, कुमार गंधर्व, जी.ए.कुळकर्णी इत्यादि).
ह्या सूचीसाठी आम्ही साधारण १३ निकष ठरवले आहेत. कुणाला ह्यापेक्षा अधिक काही सुचू शकतील, त्याचेही स्वागत असेल. “कोण महान” ह्यापेक्षा “कशामुळे महत्त्वाचा वा विवाद्य” हे स्पष्ट करू पाहणारी ही चौकट आहे.
आम्हाला सुचलेले १३ निकष
१. प्रभावी संवाद आणि सांस्कृतिक जाळे – आपले विचार किंवा कला लोकांपर्यंत पोहोचवल्या का? अधिकाधिक लोकांशी नाते जोडले का?
२. संस्था/व्यवस्था उभारणे, टिकवणे किंवा वृद्धिंगत करणे – शाळा, दवाखाने, वाचनालय, प्रयोगशाळा, कायदे, धोरणे, संस्था अशा शाश्वत, टिकाऊ व्यवस्था/रचना उभ्या केल्या का?
३. विषमतेविरोधात थेट भूमिका – जात, लिंग, वर्ग, धर्माधारित असमानता आणि तज्जन्य अन्याय कमी करण्यात त्यांची प्रत्यक्ष भूमिका होती/आहे का?
४. राजकीय/नागरी हस्तक्षेप – राजकारण, प्रशासन, किंवा सार्वजनिक चळवळींत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला का?
५. शाश्वतता – त्यांनी सुरू केलेल्या संस्था/उपक्रम त्यांच्यानंतरही चालू आहेत का?
६. नैतिकता – जनमानसावर प्रभाव असूनही त्यांनी स्वतः नैतिक मर्यादा पाळल्या का? जसे, सत्ता/लोकप्रियतेचा गैरवापर टाळला का?
७. चिकित्सक विवेक/विवेचक बुद्धी – प्रस्थापित मान्यतांना प्रश्न विचारण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची, अंधश्रद्धेला आव्हान देण्याची भूमिका त्यांनी घेतली का? त्यासाठी सत्तेला, सत्ताधाऱ्यांना किंवा धोरणकर्त्यांना आव्हान दिले का?
८. परिणामांचा आवाका/विस्तार – परिणामांचा विचार करता त्यांचे काम किती मोठ्या समाजघटकांपर्यंत/प्रदेशांपर्यंत पोहोचले?
९. उचललेली जोखीम – आपल्या भूमिकेसाठी त्यांनी विरोध, संकट, नुकसान, अशी किंमत मोजली का?
१०. ज्ञानविस्तार व नवी दृष्टी – सामाजिक, राजकीय किंवा वैज्ञानिक संशोधनक्षेत्रात काही भरीव कामगिरी केली आहे का? ज्ञान मिळवण्याचे नवे मार्ग उपलब्ध केले का? त्यामुळे समाजाची विचार करण्याची/समजून घेण्याची चौकट अधिक विस्तृत झाली का?
११. आमूलाग्र बदल – लोकांच्या रोजच्या भाषेत, वर्तनात, सवयींमध्ये त्यांचे विचार रूजले आहेत का? त्यामुळे विचारप्रक्रियेत दृश्य फरक पडला का?
१२. थेट सामाजिक उपयुक्तता – त्यांच्या आयुष्यातच समाजाला त्यांच्या कार्याचा, विचारांचा, धडपडीचा थेट फायदा झाला का?
१३. ऐतिहासिक प्रभाव – ते नसते तर इतिहासाची दिशा लक्षणीय प्रकारे वेगळी झाली असती का?
ह्या निकषांमधून सक्रिय योगदान, तटस्थ योगदान ह्यासोबतच संभाव्य नकारात्मक परिणामांचाही विचार करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत.
पण इतकेच नाही
हे मूल्यमापन करताना अनेक प्रश्न विचारण्याचे धाडसही करायला हवे. कोणत्याही व्यक्तीचे मूल्यमापन करताना, तिने समाजाला पुढे नेले की मागे रोखले — हा प्रश्न टाळता येत नाही. जसे,
त्यांनी उभारलेल्या संस्था टिकल्या का? — त्या सर्वसमावेशक होत्या का?
त्यांनी लोकांना अज्ञानातून ज्ञानाकडे नेले का? — की समाजाच्या अंधश्रद्धा बळकट केल्या?
त्यांनी धर्म, जात, लिंग, वर्गभेद कमी केले का? — की ते अधिक घट्ट केले?
त्यांनी प्रश्न विचारायला शिकवले का? — की न विचारताच मान्य करायला?
त्यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला का? — की नियंत्रणाचा?
हे प्रश्न अस्वस्थ करणारे असू शकतात. पण अस्वस्थता टाळण्यासाठी प्रश्न टाळणे, हा उपाय नाही. आपले मत, आपले अभिप्राय मांडायचे, तर आत्मपरीक्षण करता आले पाहिजे आणि ते करायचे तर वरील प्रश्न पुनःपुन्हा विचारत राहण्याचे धाडसही करावेच लागते.
बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तत्काळ मिळत नाहीत. बऱ्याच कार्यांचे परिणाम अनेक दशकांनंतर दिसू लागतात. अल्पकालीन फायदे कधी कधी दीर्घकालीन तोटे ठरू शकतात, अल्पकालीन तोटे कधी कधी दीर्घकालीन फायदे ठरू शकतात. म्हणूनच क्षणिक लोकप्रियता किंवा तत्काळ यश ह्यांवर आधारलेले मूल्यमापन धोकादायक ठरू शकते. अनेकदा, व्यक्तीच्या निधनानंतर तिच्याबद्दलची चर्चा बदलते. काही वेळा टीका मवाळ होते, तर काही वेळा बदलत्या सामाजिक, राजकीय परिस्थितीमुळे मूल्यांकन टोकाचे होते.
आणि म्हणूनच अश्या प्रकारच्या मूल्यमापनात, दीर्घकालीन परिणाम, सामाजिक दिशा आणि ऐतिहासिक संदर्भ ह्या तिन्हींचा विचार आवश्यक ठरतो. निव्वळ ‘थेट सामाजिक उपयुक्तता’ ही कसोटी अपुरी ठरू शकते. एखाद्या व्यक्तीचे काम तिच्या आयुष्यातच समाजाला तात्काळ उपयोगी पडले का, हा प्रश्न महत्त्वाचा असला तरी तो अंतिम निकष ठरू शकत नाही. कारण काही विचार आणि शोधांचे परिणाम अनेक दशकांनंतर समाजावर उमटतात.
जसे, न्यूटन किंवा आइनस्टाइन ह्यांच्या कार्यामुळे तत्कालीन समाजात काही तत्काळ बदल झाले नव्हते. राजवाड्यांच्या निकषावर त्याकाळात न्यूटन वा आइनस्टाइन अपयशीच गणले गेले असते. परंतु आजच्या आपल्या अवकाशमोहिमा, उपग्रह, इंटरनेट, आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगती — ह्या सर्वांचा पाया त्यांच्या संशोधनात आहे. दीर्घकालीन सामाजिक समृद्धीत त्यांच्या योगदानाइतके मोलाचे योगदान फार थोड्यांचे आहे. म्हणूनच एका निकषावरून संपूर्ण निर्णय देणे म्हणजे आपल्याच मूल्यमापनाला अपुऱ्या चौकटीत बंदिस्त करण्यासारखे ठरेल. म्हणूनच ‘थेट सामाजिक उपयुक्तता’ हा एक महत्त्वाचा निकष असला, तरी तो सर्व प्रकारच्या योगदानांचे मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा नाही. तत्काळ समाजोपयोग आणि दीर्घकालीन ज्ञानविस्तार ह्यांच्यातील फरक आपण ओळखला पाहिजे.
निकष आणि मूल्यदृष्टी
वरील निकषांकडे पाहण्याची ‘लेन्स’ (मूल्यदृष्टी) बदलली, तर निष्कर्षही बदलतील. सामाजिक न्यायाला अग्रक्रम दिल्यास एक चित्र उभे राहील. ज्ञानवर्धनाला दिल्यास दुसरे. राजवाड्यांच्या थेट समाजोपयोग निकषाला दिल्यास तिसरेच. मतभेद अपरिहार्य आहेत — आणि तेच अपेक्षित आहेत. वाद व्यक्तींबाबत नसून मूल्यांबाबत व्हावेत, आणि ती मूल्ये उघडपणे मांडली जावीत, हीच इच्छा आहे.
हा प्रयत्न काय नाही
ही क्रमवारी नाही.
ही अंतिम यादी नाही.
हा शिक्कामोर्तब नाही.
हा प्रयत्न काय आहे
हा प्रयत्न म्हणजे चर्चा सुरू करण्याची निव्वळ एक चौकट आहे. आणि ती खुली आहे — बदलण्यासाठी, आव्हान देण्या/स्वीकारण्यासाठी आणि पुनर्विचारासाठी.
महाराष्ट्राची वैचारिक परंपरा केवळ स्मरणाची नाही; ती परीक्षणाची आहे. राजवाड्यांनी, राजन मांडवगणेंनी (कुणी आणखीही कुणी) वेगवेगळ्या काळात ही गणना केली. आज ती पुन्हा, पण थोडी अधिक व्यापक करावी, असे वाटते. केवळ प्रसिद्ध नावेच नव्हे, तर स्थानिक पातळीवर दीर्घकाळ काम केलेल्या व्यक्तींची नावेही आम्हांला महत्त्वाची वाटतात, महानतेच्या पलीकडे जाऊन, महत्त्वाच्या मितींचा विचार करत.
म्हणून आपणास आवाहन
आपल्याकडून अशी नावे येणे अपेक्षित आहे. आपण ज्या व्यक्तींना ‘महान’ म्हणतो, त्या आपल्या समाजाला खरोखर पुढे घेऊन गेल्या की आपण त्यांच्यामागे विचार न करताच चालत राहिलो – हा प्रश्न आपण स्वतःला, आणि इतरांनाही अधूनमधून विचारत राहणे आवश्यक आहे.
* ह्या यादीत टाकता येतील अशी नावे सुचवा.
* आमच्या निकषांवर टीका करा, बदल सुचवा, नवे निकष सुचवा.
* तुम्ही सुचवणाऱ्या व्यक्तीचे वरील १३ पैकी शक्य तितक्या अधिक निकषांनुसार विश्लेषण पाठवा.
* स्वत:ची एखादी मूल्यदृष्टी टाकून विश्लेषण करा.
ही यादी आपण सुधारकच्या ईमेल आयडीवर (aajacha.sudharak@gmail.com) वर पाठवावी. आपल्या मनात काही प्रश्न किंवा शंका असल्यास ह्याच ईमेल आयडीवर लिहून पाठवाव्या. आम्ही त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू.
खुप चांगला उपक्रम. निकषही
खुप चांगला उपक्रम. निकषही योग्य वाटताहेत.
पाहताच पाया पडावेसे वाटेल अशी व्यक्तिमत्वे आज समाजात राहिली नाहीत असे हल्ली बोलले जाते. ह्या पार्श्वभुमीवर समाजातील प्रभावी व्यक्तींबद्दल इथे गोळा झालेली माहिती नक्कीच वाचायला आवडेल.
उत्तम उपक्रम. निकषांचा रोख
उत्तम उपक्रम. निकषांचा रोख रोचक आहे.
मला डॉ नरेंद्र दाभोलकर हे एक नाव सुचलं. पण ११,१२,१३ या प्रश्नांच्या उत्तरात अपयशी ठरले असं लिहावं लागेल की काय , असं वाटतं. यात त्यांना विरोध करणार्या प्रवाहांचा प्रभाव अधिक होता असे म्हणता येईल. महाराष्ट्राच्या सद्य स्थितीचे चित्र म्हणता येईल.
सविस्तर लिहिता येतंय का पाहतो.
तुम्ही सुचवणाऱ्या व्यक्तीचे वरील १३ - इथे तुम्ही सुचविलेल्या व्यक्तीचे असं हवं ना?
क्र. २ चा निकष अपूर्ण वाटतो.
क्र. २ चा निकष अपूर्ण वाटतो.
एखाद्या संस्थेकडे भरपूर पैसा आहे, त्यांची उद्दीष्टे समाजविघातक आहेत आणि त्यांनी जर शाळा, दवाखाने इत्यादी उभारले आहे.
दहशतवाद्यांच्या संस्थेने मदरसे चालवणे, हॉस्पिटल्स चालवणे.
गुटख्याच्या मालकाने कॅन्सरचे हॉस्पिटल चालवणे.
अफाट पैसा असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीने समाजोपयोगी संस्था चालवणे पण देशाच्या मालमत्तेवर डल्ला मारणे.
सहकारात प्रचंड घोटाळा करून खासगी शाळा, दवाखाने उभारणे
हे एकीकडे आणि दुसरीकडे रयतसारख्या संस्था पोटाला चिमटा घेऊन उभ्या करणे. त्यांच्या पश्चात व्यापारी वृत्तीच्या राजकारण्यांनी त्याचा ताबा घेणे. म्हणून मग रयतकर्ते महान ठरणार नाहीत का?
नेल्सन मंडेला यांच्या पश्चात कोणतीही संस्था नाही. त्यांचे अनुयायी गरीबच होते. पण त्यांना लायक बनवले. आता कदाचित ते संस्था उभारू शकतील. त्यामुळे मंडेला यांचे कार्य महान ठरणार नाही का?
महात्मा फुलेंच्या संस्था नाहीत. त्यांची सत्यशोधक चळवळ नंतर बंद पडली. महात्मा फुले महान नाहीत का?
तुम्ही सुचवणाऱ्या व्यक्तीचे
तुम्ही सुचवणाऱ्या व्यक्तीचे वरील १३ पैकी शक्य तितक्या अधिक निकषांनुसार विश्लेषण पाठवा.
* स्वत:ची एखादी मूल्यदृष्टी टाकून विश्लेषण करा.
ही यादी आपण सुधारकच्या ईमेल आयडीवर (aajacha.sudharak@gmail.com) वर पाठवावी. >>>>>
१३ च्या १३ निकष लागू पडायला पाहिजेत असे नाही. यातले शक्य तितके निकष लागू पडायला हवेत.
केवळ एकही निकष लागू पडत असेल
केवळ एकही निकष लागू पडत असेल तरी हरकत नाही.
या मिती शक्य तेवढ्या orthogonal ठेवायचा प्रयत्न केला आहे.
नावे गोळा झाली की त्या लोकांवर इतरही लोक मते (hopefully तत्थ्याधारीत) देतील
क्र. २ च्या मुद्द्याच्या
क्र. २ च्या मुद्द्याच्या आधारे महानता ठरवली जाणार असेल तर तो मुद्दा निर्दोष आहे का?
एखाद्याने समाजोपयोगी काम केलेले आहे, पण त्यासाठी आलेला पैसा कसा आलेला आहे हे जनतेला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे पण ते सिद्ध होऊ शकत नाही. पुढे साम्राज्य टिकवताना पब्लीक इमेज साठी उपयोगी पडणार्या या संस्था टिकवल्या तर क्र २ च्या आधारे महान व्यक्तीमधे समावेश होणार का? ते लोकांना पटेल का?
समजा दाऊद इब्राहीमने शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल हे सर्व सुरू केले, मोफत केले. त्यासाठी येणारा पैसा कुठून आला हे सर्वांना माहीत आहे. त्र दाऊद इब्राहीम महान होईल का?
एकूणच हा खटाटोप का हे समजले नाही. आजवर जे लोक महान ठरले त्यात काही चुका राहिल्या आहेत का?
हा उपद्व्याप केल्याने चुका होणार नाहीत का?
> आजवर जे लोक महान ठरले त्यात
> आजवर जे लोक महान ठरले त्यात काही चुका राहिल्या आहेत का?
कोण ठरले आहेत महान याचीच विचारणा इथे होते आहे (व कोणत्या अनुषंगाने)
हेतू ध्यानात आला. असे निकष
हेतू ध्यानात आला. असे निकष लावले कि अनेक फेक लोक महान बनवता येऊ शकतात. निकषात बसतात या अटीवर.
निकष न लावताही आजवर कोण लोक महान ठरले त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरूवात केल्यास..
पंडीत नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, जगदीशचंद्र बोस, सी व्ही रमण, अब्दुल कलाम, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, र धों कर्वे . पंडीत भीमसेन जोशी, लता मंगेशकर, मोहम्मद रफी , रँग्लर परांजपे, आगरकर इ इ असंख्य लोक अशा कोणत्याही निकषांशिवाय महान बनले. यांच्या महान असण्याबद्दल शंका असेल तर शुभेच्छा या उपक्रमाला.
याशिवाय अन्य गटाला जे लोक महान वाटू शकतात त्यांच्याबद्दलही आक्षेप नसावा. स्वा सावरकर, बाजीराव पेशवे इत्यादी.
लोकांची मान्यता आहे. यातून कुणीतरी मध्यवर्ती अधिकार हातात घेऊन हेच लोक महान असे करण्याची गरज काय? नावांवर सहमती होणे कधीही शक्य नाही.
गाडगेबाबांचे नाव पुसण्यासाठी एक नवीन नाव पुढे आणले गेले. त्यांना महान बनवून आता त्यांच्या नावाने स्वच्छता मोहीमा चालवल्या जातात. त्यांचे हेतू काय आहेत? निकष लावायचे तर त्यांना महानच म्हणावे लागणार आहे.
आजच्या माध्यमांच्या युगात बाबा रामदेव, अण्णा हजारे, प पू श्री श्री श्री........... , आसाराम बापू , राम रहीम हे महान बनलेले आहेत. या सर्वांनी समाजोपयोगी कामे केली आहेत तेव्हढाच तडाखाही दिलेला आहे.
महान बनवण्याचे काम कोणत्याही एखाद्या व्यक्ती, संस्थेकडे नको हे माझे मत आहे. सक्ती नाही. शेवटी जे व्हायचं तेच होणार. अण्णां फेक आहेत हे माहीत असून रोखता आले नाही. क्षीण विरोध नोंदवत आहे.
> पंडीत नेहरू, महात्मा गांधी,
> पंडीत नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, जगदीशचंद्र बोस, सी व्ही रमण, अब्दुल कलाम
आवाहनात दिल्यानुसार या लोकांना ते गैरलागू आहे. "ह्या टप्प्यात महाराष्ट्राचे सध्याचे भौगोलिक क्षेत्र विचारांत घ्यावे, तसेच महाराष्ट्रीय मनांवर प्रभाव पाडणारे (महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील असले तरी, उदाहरणार्थ, कुमार गंधर्व, जी.ए.कुळकर्णी इत्यादि)."
> यातून कुणीतरी मध्यवर्ती अधिकार हातात घेऊन हेच लोक महान असे करण्याची गरज काय? नावांवर सहमती होणे कधीही शक्य नाही.
"हा प्रयत्न काय नाही
ही क्रमवारी नाही.
ही अंतिम यादी नाही.
हा शिक्कामोर्तब नाही.
हा प्रयत्न काय आहे
हा प्रयत्न म्हणजे चर्चा सुरू करण्याची निव्वळ एक चौकट आहे. आणि ती खुली आहे — बदलण्यासाठी, आव्हान देण्या/स्वीकारण्यासाठी आणि पुनर्विचारासाठी."
नावे नाही सुचवली तरी कॉमेंट्स करत रहा. तेही हवेच आहे.
एकूणच हा खटाटोप का हे समजले
एकूणच हा खटाटोप का हे समजले नाही. >> +१
अशी यादी केल्याने हाणामारी व्हायची शक्यताच जास्त.
आधीच भारतात व्यक्तिपूजा फार होते. उदा. हवे असेल तर केवळ भारतीय पोस्टाचे उदाहरण घ्या. Personality या विषयावर (theme) त्यांनी किती पोस्टेज स्टँप काढले आहेत, ते बघा.
आवाहनात दिल्यानुसार या
आवाहनात दिल्यानुसार या लोकांना ते गैरलागू आहे. "ह्या टप्प्यात महाराष्ट्राचे सध्याचे भौगोलिक क्षेत्र विचारांत घ्यावे, तसेच महाराष्ट्रीय मनांवर प्रभाव पाडणारे (महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील असले तरी, उदाहरणार्थ, कुमार गंधर्व, जी.ए.कुळकर्णी इत्यादि)." >> म्हणजे मराठीभाषक हवेत का? (हवेत म्हणजे पाहिजेत. हवा नावाच्या पदार्थात नाही.)
नाही. पण महाराष्ट्राशी थेट
नाही. पण महाराष्ट्राशी थेट संबंध असलेले हवे. वरीलपैकी गांधी चालतील कारण ते सेवाग्रामला होते.
यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण
धनंजयराव गाडगीळ ज्यांनी
धनंजयराव गाडगीळ ज्यांनी महाराष्ट्राला सहकाराचा मंत्र दिला,
जयंत नारळीकर.
नेहरू पुण्यात अटकेत होते.
नेहरू पुण्यात अटकेत होते. त्याच काळात काही महिन्यांकरिता इंदिरा गांधी हुजूरपागेत शिकल्या.
mandard, केशवकूल असे एखादेही
mandard, केशवकूल असे एखादेही नाव चालेल, पण शेवटी आवाहनात शेवटी लिहिल्याप्रमाणे ते सुधारकला पाठवावे, शक्य तेव्हा १३ पैकी कोणते आयाम लागू होतात ते सांगून. स्थानीक, जास्त माहीत नसलेली नावे पुढे आली तर खूपच छान.
म्हणून आपणास आवाहन
म्हणून आपणास आवाहन
आपल्याकडून अशी नावे येणे अपेक्षित आहे. आपण ज्या व्यक्तींना ‘महान’ म्हणतो, त्या आपल्या समाजाला खरोखर पुढे घेऊन गेल्या की आपण त्यांच्यामागे विचार न करताच चालत राहिलो – हा प्रश्न आपण स्वतःला, आणि इतरांनाही अधूनमधून विचारत राहणे आवश्यक आहे.
* ह्या यादीत टाकता येतील अशी नावे सुचवा.
* आमच्या निकषांवर टीका करा, बदल सुचवा, नवे निकष सुचवा.
* तुम्ही सुचवणाऱ्या व्यक्तीचे वरील १३ पैकी शक्य तितक्या अधिक निकषांनुसार विश्लेषण पाठवा.
* स्वत:ची एखादी मूल्यदृष्टी टाकून विश्लेषण करा.
ही यादी आपण सुधारकच्या ईमेल आयडीवर (aajacha.sudharak@gmail.com) वर पाठवावी. आपल्या मनात काही प्रश्न किंवा शंका असल्यास ह्याच ईमेल आयडीवर लिहून पाठवाव्या. आम्ही त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू.
या यादीला काळाची मर्यादा
या यादीला काळाची मर्यादा घालावी. जसे गेल्या १०० वर्षांतील - १९२५ पासून पुढे काम केलेले ही मर्यादा योग्य ठरेल.
नं ७ आणि १० हे निकष सोडले तर केशव बळिराम हेडगेवार व माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्यापेक्षा अधिक यशस्वी इतर कोणीही म्हणता येणार नाही.
सगळे निकष लावायचे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वरती असेल.
सत्यपाल महाराज यांचा हा ABP
सत्यपाल महाराज यांचा हा ABP माझा वरचा कार्यक्रम बघितला आणि पहिल्यांदाच त्यांचे नाव कळले. छान काम करत आहेत. वरच्या निकषांमध्ये बसतात का ते बघायला हवे.
https://youtu.be/iZ-QyLxsZXU?si=R_jBTW8xi1MR37f6