हे स्फुट मी अंदाजे २५ वर्षांपूर्वी लिहिले होते, त्यामुळे यात कॅसेट्स आहेत ज्या आता भूतकाळाच्या गर्भात विलिन झालेल्या परंतु त्या एका काळात मोठे प्रस्थ असणारे अवशेष आहेत!
विस्कटलेल्या घड्या
२७ जानेवारी २०००
काल सकाळी माझ्या गाण्याच्या संग्रहातील भीमसेनजींची कॅसेट शोधत होतो. वर तर आवरण पंडितजींचेच होते पण आत मात्र बीटल्स गात होते. कॅसेटच्या माझ्या शिस्तबध्द ( शिस्तीची माझी कॅसेटपुरती सीमित आवृत्ती; अन्यथा मी अत्यंत बेशिस्त आहे- इति......... कोण हे सूज्ञांस सांगणे न लगे) कपाटात ही महाघोडचूक कशी झाली याचा मी विचार करत होतो. आणखी काही कॅसेट्स पाहिल्यानंतर हे भीमसेनजींपर्यंतच सीमित नसल्याचे लक्षात आले. शास्त्रीय संगीताच्या कप्प्यात केवळ कॅसेट्सच नव्हे तर त्यांच्या आवरणात देखील आधुनिक पॉप, ब्रेथलेस अशी गाणी आणि किशोरीजींच्या घरात एरिक क्लॅप्टन वगैरे मंडळी आरामात बसली होती आणि माझ्या भारतीय कर्णेंद्रियांत कोलाहल करत होती. काही कॅसेट्स बेघर झाल्या होत्या तर काही घरातील मंडळी गायब होती. त्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय, प्रांतीय, भाषानिहाय असा अवांछित घोळ झाला होता. इंग्रजी, मराठी, हिंदी, कानडी ( हो कानडी देखील- ही कानडी आहे), फ्रेंच (थोरली स्टुडंट एचेंज प्रोग्रॅममध्ये नुकतीच फ्रान्सला जाऊन आली होती) व पंजाबी या भाषांतील गायनसंस्कृतीचे ही अनपेक्षित वसाहत होती. थोडक्यात, माझ्या शिस्तीने लावलेल्या संग्रहात आणि त्यांच्या प्रत्येक खणातील –कॉलनीतील म्हणा- मंडळी सैरभैर फिरत होती.
माझ्या पुस्तकांच्या कपाटाकडे आलो तर तीच स्थिती होती. हे कसे झाले याचा मी विचारच करत होतो तेव्हा ही मला बोलावत होती. ती म्हणाली, “अहो, तेजूचा आणि अनुचा (पुण्यात शिकत असलेल्या माझ्या थोरल्या अन धाकट्या कन्येचा) फोन आहे. बोला जरा!” मी फोन घेतला, प्रारंभिक गप्पा झाल्या आणि थोरली मला म्हणाली, “ बाबा, माझी सेलीं दियॉं ची "पूर क तू मेम आँकोर" कॅसेट घरी राहिली आहे, पाठवून देशील का? “. मी उत्तरलो, “काय? पुन्हा सांग.” तिने उत्तर पुन्हा दिले अन शेवटपर्यंत आणि आजपर्यंत मला न आलेला त्या उच्चाराचे एसएमएस – होय एसएमएस मध्ये परिवर्तन झाल्यावर (होय एसएमएस- तोवर स्मार्ट फोनवर व्हॉट्सॅप विश्वविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली नव्हती- किंबहुना स्मार्ट फोन नावाच्या कार्ट्याने टाहो फोडत जन्म घेतला नव्हता) मला कळले की त्याचे स्पेलिंग “"Pour que tu m'aimes encore" असे आहे. मी प्रयत्न करतो असे सांगून मी फोन खाली ठेवला. त्या सावळ्या गोंधळात मला त्या सेलीं दियॉं बाईंची " पूर क तू मेम आँकोर " या अशक्य उच्चाराची कॅसेट मला मिळाली नाही हे वेगळे सांगायची गरज नाही. असो.
आता मला लक्षात येऊ लागले होते. परवा दुपारी दिल्लीहून निझामुद्दिन एक्स्प्रेसने तेजू अन अनु साडेतीन आठवड्यांच्या सुट्टीतील वास्तव्यानंतर पुण्याला परत गेल्या. आता आम्ही घरी दोघेच राहिलो. थोरलीचे फर्ग्युसन मध्ये एम ए चे शेवटचे वर्ष अन धाकटीचे बी ए चे शेवटचे होते त्यांचे! तेव्हा वाटत होतं खूप दिवस आल्या आहेत.
वर लिहिलेली कॅसेट्स अन पुस्तकांची करामत त्यांचीच होती. त्या ३ आठवड्यात आमचे (मी आणि सौ.) ज्ञानवर्धन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आम्हाला लेटेस्ट रॉक स्टार कोण आहेत, लकी अली कसा ग्रेट आहे, ब्रेथलेसमधील शंकर महादेवन नुकताच उदयाला आला होता इ., विविध इंग्रजी आणि जोडीस सब टायटल असलेल्या फ्रेंच चित्रपटांच्या कॅसेट्समधील सिनेमे (दिल्लीच्या अलायं फ्रांचाय— या भाषेतील तज्ञांनी माझ्या बरोबर/चुकीच्या उच्चाराबद्दल माफ करावे) घरच्या व्हिडियो कॅसेट प्लेयर वर आम्ही पाहिले होते. चित्रपटापेक्षा ते एकत्र पाहण्याचा आनंद मोठा होता. गाणी एकत्र ऐकत होतो आणि ऐकल्यानंतर त्या कॅसेट्स जागच्या जागी न गेल्याने झालेला सावळागोंधळ आता दिसून येत होता. धाकटी कन्या अनुचा उत्साह आणि थोरली तेजूचे यौवन यांचा सुखद संगम पाहून आम्ही दोघेही उत्साहाने सुखावत होतो, आनंदाने तो उपभोगत होतो. लाडाने उत्साहाने आणि हक्काने त्या दोघीही आईकडून हवे ते बनवून घेत आणि खात. या प्रकारात मागच्या दाराने पिझ्झा, बर्गर, चाऊ मीन, दाबेली आणि नूडल्स यांचा प्रवेश झाला आणि आम्ही सुध्दा या पाहुण्यांचे स्वागत केले आणि आता तर ते आमच्या घरीच आनंदाने राहतात आणि आमच्या घरातील इतर खाद्यपदार्थांशी त्यांची छान मैत्री झाली आहे.
या मुली कधी जोरजोरात गायच्या, नाचायच्या, दोन्हीत आम्हाला सामिल करून घ्यायच्या. तेजूचे फ्रेंच गायन आणि धाकटीचे पंजाबी पॉप इतके उत्कट असायचे की दोन्हींच्या संगमाची आगळी प्रचिती आम्हाला व्हायची
या खेपेस एक बदल जाणवला, उच्छृंखलपणाबरोबरच त्यांना आता करियरची चिंता लागली होती दोन तीन आठवडे आपल्या घराची घडी त्यांनी पार विस्कटून टाकली आणि त्या भुर्रकन परत उडून गेल्या.
ही विस्कटलेली घडी आवरताना आम्हाला खूप आनंद होत होता कारण त्यांचे वास्तव्य असलेल्या प्रत्येक जागी, अस्ताव्यस्त पडलेल्या प्रत्येक वस्तून त्यांच्या खूप सुखद स्मृती होत्या आणि ती घडी नक्कीच आवरण्याजोगी होती.
अशी अस्ताव्यस्त घरे, जीवने किती मनमोहक- “लिव्ह्ड इन” असतात नाही का? त्यांत वास्तव्याची वर्दळीची, येणार्या जाणार्यांची न पुसण्यासारखी अदृश्य छाप असते. स्वच्छ परिटघडीचे कपडे त्या गठ्ठ्यात छान दिसत असतील पण ते परिधान केल्यावर, त्यांची घडी विस्कटल्यानंतर आणखी छान दिसतात, खुलतात. घरांचे देखील असेच असते.
दोन्ही मुले आणि आम्ही एकत्र असताना तर ही घडी खूपच छान उस्कटते अन नंतर त्या घडीची आवराआवर करताना जी तारांबळ उडते ती आणखी हवीहवीशी वाटते. हा खेळ नेहमी चालू असला पाहिजे तरच जीवनात गंमत आहे.
पण एक गोष्ट खरी, घडी पुन्हापुन्हा आवराआवर करण्याजोगी, नीट करण्याजोगी हवी नाहीतर अशी नेहमी घडी घातलेली घरे आणि जीवने फार केविलवाणी होतात नाही का?
फार फार सुंदर स्फुट आहे
फार फार सुंदर स्फुट आहे रेव्यु.
ऊच्शृंखल नाही केअर फ्री , मनमौजी, स्वच्छंद असे हवे.
उच्श्रूंखलला नकारात्मक छटा आहे.
उचशॄंखल शब्द कसा लिहायचा?
लेख फार फार मस्त जमलाय.
लेख फार फार मस्त जमलाय.
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
आवडला लेख.
आवडला लेख.
२००० साली म्हणजे भारतात मोबाईल आल्या आल्याच मोबाईल घेतला तुम्ही.
उच्छृंखल . लेखात बरोबर लिहिला आहे. मला अर्थाच्या दृष्टीनेही खटकला नाही.
सुंदर लिहिलयं!
सुंदर लिहिलयं!
छान. या विचाराशी अगदी सहमत!
छान. या विचाराशी अगदी सहमत!
हा लेख पूर्वी तुम्ही दिलेला का? मला उगाच वाचल्या सारखं वाटत होतं.
हे पूर्वी ही कुठे लिहिलेलं आहे, पण विषय निघाला आणि तेच आठवलं आणि ते सतत माझ्याच आठवणीत रहावं, उजळणी व्हावी म्हणून परत लिहितो.
माझ्या मुलाला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, तर एकदा मी आणलेलं एक नवं कोरं पुस्तकं तो फारशी काळजी न घेता वाचत होता. मला राग आला आणि मी त्याला मला जे सांगायचं आहे ते नीट शब्दबद्ध न करता व्यक्त झालो. तैलाद रक्षेत, जलाद रक्षेत असं मी शिकलेला. अर्थात चिडून काहीबाही बोललो. नंतर मला जाणवलं की त्या प्रसंगा नंतर तो ते पुस्तक वाचत नाहीये का? काही बोलला नाही पण त्याच्या मनात अढी बसली आहे का काय मला शंका येऊ लागली. मला मेल्याहुन मेल्या सारखं झालं. नंतर त्याला समजावून सॉरी म्हटलं, पण त्याच्या मनावर ती आठवण कोरली गेली असेल का? तसं झालं नको असू दे असं मला मनोमन वाटतं.
पुस्तक ही वाचण्यासाठीच आहेत. ती युटिलिटी आहे, ती छान कोरी ठेवण्यात काहीही हशिल नाही. भरपूर वाचली जावी, वाचताना खराब झाली, पानं जरा हिरमुसली तरी काही हरकत नाही. याचा अर्थ बेपर्वा निष्काळजी रहा असा नाही, पण ते सेकंडरी आहे. पुस्तके नवी घेणे फार कठिण नाही. ती शोभेच्या वस्तू सारखी जपणे हे फार सोपे आणि अर्थहीन आहे.
खूप सुंदर लिहिलयं!
खूप सुंदर लिहिलयं!
@अमितव तुमच्या पुस्तकांबद्द्लच्या मताशी सहमत.
>> २००० साली म्हणजे भारतात
>> २००० साली म्हणजे भारतात मोबाईल आल्या आल्याच मोबाईल घेतला तुम्ही.>>>. भारतात मोबाईल १९९६ च्या सुमारास आला होता १९९९ मध्ये मला कंपनीने फोन दिला होता आणि मी मुलीला फोन २००० मध्ये घेऊन दिला.
आवडलं.
आवडलं.
लेख फार आवडला.
लेख फार आवडला.
जणू माझेच विचार असा वाटला.
अर्थात घडी न विस्कटता जगणारे चुकतात किंवा जगण्यातली मजा गमावतात असेही नाही. ज्याची त्याची आयुष्य जगायची स्टाईल.
पण ज्यांना घडी विस्कटण्यातली गंमत गवसते त्यांनी इतर कशाचा विचार करून ती गमावू नये..
बाय द वे.... मुलीला त्या
बाय द वे.... मुलीला त्या काळात मोबाईल द्यायची देखील एक चित्तरकथा आहे..... त्या दोघी फर्ग्युसन कॉलेजच्या जवळ असलेल्या लिमये वसतीगृहात रहायच्या. फोन एकच आणि तोही फक्त बुधवारी संध्याकाळी ८ ते ९ पर्यंत उपलब्ध असायचा- इन कमिंग साठी- ट्रंक कॉल महाग आणि या मुलींची नेहमीच कडकी.... मग आम्ही सुचवले कॉ बाहेरच्या दुकानाचा नंबर दिला तर केव्हाही तिथे आम्ही पालक फोन करू... हे थोडे दिवस निवडक मुलींसाठी चालले ... मग सगळ्या मुलींनी हे करायला सुरू केल्यावर त्या पठ्ठ्याने ३ मिनिटाला १० रुपये इनकमिंगला लावायला सुरुवात केली....अन मग शेवटी तो नोकियाचा जाडजूड अॅन्टेनाची दांडीवाला एक फोन मुलींना दिला. तोवर इन्कमिंग जवळ जवळ फुकट झाला होता
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
छान लिहीले आहे!
छान लिहीले आहे!
गोड लिहिलं आहे. ही बाजू
गोड लिहिलं आहे. ही बाजू लक्षात आली नव्हती. मी घडी विस्कटणाऱ्या गटात होते त्याला काही वर्षं उलटली आणि पलीकडच्या गटात जायला अजून काही वर्षे आहेत.
हल्ली इन्स्टाग्रामवर दोन तीन पोस्ट्स बघितल्या अशा अर्थाच्या की एखादी कृती आपण कधीतरी शेवटची केलेली असते, पण ती करताना आपल्याला हे माहिती नसतं की आपण परत ही कृती करणार नाही. उदाहरणं (पोस्ट्समधली) म्हणजे मित्र/मैत्रिणींबरोबर खेळणं. कधीतरी एक संध्याकाळ अशी होती की त्यानंतर तुम्ही परत कधीच त्यांच्याबरोबर खेळायला गेला नाहीत (मोठे होण्याचा एक टप्पा). दुसरं म्हणजे आपल्या मुलांना उचलून घेणं. कधीतरी आपण हे थांबवलं, पण नेमकं कधी ते लक्षात नाही. तसं काहीसं हे 'घडी विस्कटणं' आहे.
होस्टेल, इनकमिंग लँडलाईन वगैरे गोष्टी मीही भरपूर अनुभवल्या आहेत.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
विस्कटलेल्या घड्या - एक
विस्कटलेल्या घड्या - एक शब्दचित्र. भारीच रंगलंय. तैलचित्र नाही, जलरंगातले तरल.
सुरेख लिहिलंय!
सुरेख लिहिलंय!
आम्हीपण तिघी एकत्र आलो की पसारे घालायचो, परत हॉस्टेल ला गेलो की आई आवरत बसायची.
एखादी कृती आपण कधीतरी शेवटची केलेली असते, पण ती करताना आपल्याला हे माहिती नसतं की आपण परत ही कृती करणार नाही. >> असा विचार कधीच नव्हता केला.
म्हणजे आपल्या मुलांना उचलून घेणं. कधीतरी आपण हे थांबवलं, पण नेमकं कधी ते लक्षात नाही. >> हे वाचून खरंच आवंढा आला.
क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोनि....
सुरेख लिहिलं आहे.
सुरेख लिहिलं आहे. हा पसारा आणि मागची आवराआवर सुद्धा एक सोहळाच असतो. तेव्हा लक्षात येत नाही.
वावेची पोस्ट पण विचार करायला लावतेय. मला वाटतं आधी त्या कृतींमधली फ्रिक्वेन्सी/ अनियमितता वाढत- वाढत जाऊन एकेदिवशी ती पूर्ण बंद पडते म्हणून नेमकं कधी ते आठवत नसेल. तरीही शेवटचं कधीतरी केलं असतंच.
>> त्या घडीची आवराआवर करताना
>> त्या घडीची आवराआवर करताना जी तारांबळ उडते ती आणखी हवीहवीशी वाटते. हा खेळ नेहमी चालू असला पाहिजे तरच जीवनात गंमत आहे.
सुंदर! लेख फार आवडला.
- (घडीची आवराआवर आवडणारा) सोकाजी
-
तुम्हा सर्वांचे विचारपूर्ण
तुम्हा सर्वांचे विचारपूर्ण आणि कौतुकाचे प्रतिसाद वाचून छान वाटले. आभारी आहे...... मुली आपापल्या घरी गेल्या आहेत अन नातवंडे पसारा करायला कधी येतील याची वाट पाहणे आणि आल्यानंतर त्यांना करू देणे, नंतर आवरणे याची फ्रिक्वेन्सी कमी होत चाललीये पण आतुरता नाही!!!
तुम्हा सर्वांचे विचारपूर्ण
तुम्हा सर्वांचे विचारपूर्ण आणि कौतुकाचे प्रतिसाद वाचून छान वाटले. आभारी आहे......
मुली आपापल्या घरी गेल्या आहेत अन नातवंडे पसारा करायला कधी येतील याची वाट पाहणे आणि आल्यानंतर त्यांना करू देणे, नंतर आवरणे याची फ्रिक्वेन्सी कमी होत चाललीये पण आतुरता कमी झाली नाही!!!