१. संध्याकाळ:
कामावरून येऊन मुडद्यासारखा पडून राहिलो. झोपलोच. जाग आली अचानक तर खिडकीबाहेर संधिप्रकाश. एका कुशीवर वळत मोबाईल बघितला तर साडेसहा वाजलेले. दचकलो. सकाळ झाली. उठायला उशीर झाला. आलार्म कसा काय वाजला नाही? आता फटाफट आंघोळ करून निघावं लागणार. ब्रेकफास्ट बोंबलला आज. आता सकाळी गेल्या गेल्या औताला जुपून घ्यायचंय आज. मरा आता उपाशी बारा वाजेपर्यंत. असं सगळं डोक्यात घेऊन ताशी एकशे वीसच्या स्पीडनं बेडवरून उडी मारत टूथब्रश शोधायला लागलो तेवढ्यात लक्षात आलं की अरेच्चा ही संध्याकाळ तर नाही ना.? अरे होय की. हे संध्याकाळचे साडेसहा वाजलेत..!
काय साला आयुष्याय ! अजून चारपाच वर्षं आपलं असंच चालू राहिलं तर एखाद्या दिवशी आपली वास्तवावरची पकड पूर्णपणे निसटूनच जाईल बहुधा आणि रस्त्यावर नाचत ओरडत झिंज्या विस्कटून लोकांना दगडं मारत फिरायला लागलेलोही दिसायचो एखादेवेळी. काय सांगता येत नाही.
२. स्वारगेट किंवा कुठल्याही बसस्टॅंडमध्ये प्लॅटफॉर्मवर लागलेल्या दोन बसेसच्या मधून जायची वेळ येते तेव्हा एक हात उंच करून ''थुंकू नका ओss थुंकू नका ओ ss" अशा आरोळ्या ठोकत जाणं मला नेहमीच सेफ वाटतं. मिडलक्लास फिलॉसॉफीनुसार वेळ काय सांगून येत नसते. कुणाच्या तोंडात कधीपासून काय काय साचलेलं असेल हे आपण सांगू शकत नाही. आणि मला ते जाणून घ्यायची इच्छाही नाही. फार पूर्वी असंच एकदा पंढरपूरच्या स्टॅंडवर नशीब बेसावध फळफळलं होतं. तेवढा धसका पुरेसा आहे.
३. सेल्फ-एन्क्वायरी :
''काय झालं आत्ता?''
-- भाती वाटतेय.
''कुणाला भीती वाटतेय?''
-- मला.
''हा मला कोण आहे?''
-- कोण आहे कुणास ठाऊक. पण कुणीतरी आहे नक्की.
''कुणीतरी आहे असं म्हणतोय तो कोण आहे?''
-- माहिती नाही.
''माहिती नाही असं जे म्हणतोय तो कोण म्हणतोय ?''
-- कुणी तसं म्हणतोय असं नाही. आपोआपच तसं उत्तर येतंय.
''आपोआपच तसं उत्तर येतंय असं कोण म्हणतोय?''
-- कोण आहे तो सापडत नाही.
''कुणाला सापडत नाहीये? कोण शोधतो आहे? आत्ता ही जी शोधायची इच्छा व्यक्त करतोय तो कोण आहे.?''
-- ".....”
४. रविवार. दुपार बागेत. बेंचवर.
"काल सर्दी झाली होती, आज बरंय का बघावं म्हणून फोन केला" पहारेकरणीनं कुणालातरी फोन लावला आणि गप्पाटप्पा नंतर सहज तासभर चालू राहिल्या. कौटुंबिक गाऱ्हाणी. फोनच्या पलीकडच्या बाजूला पण बाईच असणार. त्याशिवाय एवढा वेळ, सर्दीबिर्दी विसरून गप्पा रंगू शकत नाहीत. आपलं जीवन कसं चाललंय, जीवनस्थितीचं आपलं आकलन कसं आहे, नुकत्याच घडलेल्या जीवनघटनांबद्दल आपलं विश्लेषण कसं अचूक आहे, या अनुषंगाने ताज्या अपडेट्सची देवाणघेवाण चाललेली.
"तरी मी म्हटलंच होतं..."
“तू काय बी म्हण, स्वामींनीच तारून नेलं बग तुला”
“पन तुला मानलं पायजे हां. असल्या मान्साबरोबर सौंसार करायचा म्हंजे काय जोक न्हाय.”
लोकांचं आपापलं गाणं चाललेलं असतं. छान गेली दुपार.
५. ऑस्पेन्स्कीचं गुर्जिएफ वरचं 'इन सर्च ऑफ मिरॅक्युलस' वाचतोय काल आज सलग झपाटून. सगळं उलटं पालटं करून टाकलं या पुस्तकानं. आपण फ्री विल असलेले ह्युमन बिईंग आहोत हा सगळ्यात मोठ्ठा गैरसमज आहे आणि तो लवकरात लवकर काढून टाकला पाहिजे, असं म्हणतो गुर्जिएफ.
मॅन-मशिन असा शब्द वापरतो. ऑटोमॅटिकली रिॲक्ट होत राहणं हीच मनुष्याची नैसर्गिक अवस्था आहे, म्हणतो.
रात्री जेवून चालायला गेलतो बजाज पार्क जवळ. नंतर बसून राहिलो हायवे बघत. तिथं फूटपाथकडेला महामंडळाची मुक्कामी बस पार्क करून ड्रायव्हर-कंडक्टर जेवायला येऊन बसले हवेशीर पेपर अंथरून. घरून निघताना बांधून आणलं असेल.
डोक्यात तेच चाललेलं की आपल्यासकट सगळेच जण यांत्रिक पद्धतीने वावरतायत. हालचालींत काहीही अनपेक्षित नाही. सगळं ऑटोमॅटिक. तेवढ्यात त्या दोघांपैकी एकानं मला 'ओ दादा, या जेवायला' म्हणून हाक दिली.
आता हे काही अगदीच यांत्रिक दिसत नाही. सेल्फ च्या बाहेर येऊन केलेली ही शाब्दिक कृती, जोडून घेण्याची भावना अगदीच यांत्रिक कशी काय असू शकेल?
६. शिवाजीनगर बसस्टॅंडच्या बाहेरचा पीएमटी बसस्टॉप. एक फॅमिली. दोन बहिणी आई मुलगा आज्जी. सोबत बऱ्यापैकी सामान. बस येते. पोरगा विशितला मॉड, चश्मिष, टीशर्ट, पाठीशी सॅक, पळत जाईपर्यंत बस निघून जाते. बाकीचे उठून सामान उचलेपर्यंत बस निघून गेलेली असते. ड्रायव्हर वेळेनं बांधला गेलेला असल्याने जास्त वाट बघू शकत नाही.
कुटुंबातील स्त्रीवर्ग, तसेच माझ्यासारखे इतरही बघे आपल्या फजितीचे साक्षीदार झाल्याचे लक्षात आल्यामुळे मुलगा कॉन्शस होतो. नंतर जागेवर परत येऊन हाताची घडी घालून अकडून उभा राहतो. चिडचिड, त्राग्याचे भाव स्पष्ट. कोवळाय अजून. फजिती सहन करण्याचं पुरेसं प्रशिक्षण मिळालेलं दिसत नाहीये. अशा अनेक चिल्लर डिसअपॉइंटमेंट्स दररोज सोसायची सवय झाल्यानंतर कधीतरी बऱ्याच वर्षांनी तो माझ्या लेव्हलला येईल. माझ्या शुभेच्छांचं काय? त्या तर आहेतच. असतातच. सर्वकाळ.
७. जंगली महाराज मंदिरात आज लाईटींग कसली दिसतेय म्हणून आत गेलो तर डॉ. सदानंद मोरेंचं व्याख्यान चाललेलं. रोषणाई डोळ्यांना टोचत नाही. साजरी वाटते.
मोरे सर लिबरल आणि संघदक्ष अशा दोन्हीकडच्या प्लॅटफॉर्म्सवर कंफर्टेबली वावरू शकतात. दुर्मिळ स्किल. श्रोत्यांना रूचेल पचेल अशा भाषेत डिप्लोमॅटिक गोष्टीवेल्हाळ किस्सेवेल्हाळ बोलणं. तुकारामांचा मराठी समाजावरचा प्रभाव या अनुषंगाने निरूपण. वयाच्या मानाने स्मरणशक्ती तल्लख. संदर्भ चटकन आठवतात. तर दोन गोष्टी नवीन कळल्या. आंबेडकरांनी 'मूकनायक'च्या पहिल्या अंकावर छापलेला तुकाराम महाराजांचा अभंग.
काय करू आता धरुनिया भीड,
निःशंक हे तोंड वाजविले II
आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ॲलेक्झांडर ग्रांट. इंग्रज सरकारनं छापलेल्या गाथेच्या पहिल्या आवृत्तीला ग्रांटची प्रस्तावना. त्यात मिशनरी लोकांना उद्देशून ग्रांटसाहेब म्हणतो, "ज्या समाजातील लोकांच्या तोंडी तुकारामाचे अभंग आहेत, त्यांना ख्रिस्ती करणं अवघड आहे."
बाकी, यूट्यूब वर ऐकण्यात आणि समोरासमोर प्रत्यक्ष ऐकण्यात फरक पडतो. इथं आपल्या शेजारी लोक पण असतात सदेह. वयोवृद्ध स्त्री-पुरुष. त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावभंगिमा वगैरे.
प्रसादाचा शिरा पण चांगला होता, बाई द वे.
८. संध्याकाळी बसमध्ये एक मध्यमवयीन सद्गृहस्थ शेजारी. "तिकिटासाठी आधार कार्ड कशाला लागतंय? ही काय भानगड आहे?" असं त्यानं विचारलं. मी शांतपणे आधार कार्डचं सगळं गणित माझ्या स्वभावजन्य कुजकट शेरेबाजीसह उलगडून सांगितलं. त्याला ते पटलेलं दिसलं.
बोलण्यातून बोलणं निघालं. सद्गृहस्थ कानिफनाथांच्या जत्रेला नगरला निघालेला. मग नाथ संप्रदायाचा विषय. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ वगैरे. पण 'तुम एक गोरखधंदा हो' वाल्या नुसरत फतेह अली खानचा संदर्भ त्यास लागला नाही. ते ठीकच म्हणायचं.
"तुमी नवनाथांचा चौदावा अध्याय वाचा. पाच गुरूवार धरायचे आणि नेमानं वाचत बसायचं. तुमच्या सगळ्या अडीअडचनी दूर होतेल लगीच."-- सद्गृहस्थ.
मी विचारलं, काय आहे त्यात? काही चरित्र वगैरे आहे का ते ?
तर त्यालापण माहिती नव्हतं. त्यामुळे नंतर नुसतंच 'वाचा वाचा' म्हणत राहिला. यावर मग बोलण्यासारखं काही उरलं नाही.
९. 'Words Out of Silence' हे Bok नावाच्या लेखकाचं पुस्तक चांगलं आहे.
हा माणूस साठ दिवस डोंगरात एकांतात जाऊन राहिला. खिडकीतून बाहेर बघत. दिवसचे दिवस रात्रीच्या रात्री सहज प्रवाही जीवन. तरल लिखाण आहे. फारच कमी शब्दातलं, पण जे आहे ते एकदम परफेक्ट.
'छलांग' घडण्याच्या पूर्वीचं, त्या सीमारेषेवरचं, लिखाण. वाचताना ती स्थिती ॲज इट इज आपल्या आत उतरवतो. हे या लिखाणाचं चेटूक. चांगला लेखक असणं म्हणजे दुसरं काय असतं?
१०. एक घरगुती खानावळ. सगळ्यांना सिलींडरचा प्रॉब्लेम सांगून सांगून मालक इरिटेट. पार्सल न्यायला आलेल्या एकाला एकदा सांगितलेलं समजत नव्हतं. ''पोळ्या नाहीत का? भात नाही का? ह्याला काय अर्थाय?'' वगैरे कुरबुर राहून राहून चाललेली.
शेवटी मालकाचा टेंपर सुटला. जवळ बोलावून कानात ओरडून विचारले, काय हो तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही का ? वाचता ना? तिकडे आखातात युद्ध सुरू आहे. गॅस आखातातून येतो. आणि तो किमान महिनाभर तरी येणार नाहीये. तोवर हाच मेन्यू आहे. अठराशेचं कमर्शियल सिलिंडर सहा हजार रूपयांना काळ्या बाजारात विकताहेत. कसं परवडणार मला? झालं माझं बोलून. मला एवढंच बोलायचं होतं. आता याउपर तुम्हाला जे काही भांडायचे आहे ते शेठला जाऊन भांडा.
पिरीयड.
११. सकाळी दहा ला एका ध्यान केंद्रात जाऊन बसलेलो. ध्यान प्लस डुलक्या प्लस भ्रम यांच्या सीमारेषेवर रेंगाळत. मध्येच कधीतरी मांडी घालून बसलेल्या अवस्थेत उजव्या हाताची तर्जनी उंचावून एक पोळी हवी असल्याचा वेटरला इशारा करत होतो. स्वप्न कम् डुलकी कम् अर्धजागृत अवस्थेत वाटत होतं की आपण जेवायला बसलेलोय. उजवा हात उंचावता उंचावताच भानावर आलो की आपण तर इथं मेडिटेशन कुशनवर बसलोय. आणि इथं पोळी वगैरे काही देत नाहीत. तत्क्षणी श्रीकृष्णाच्या पोजमध्ये आकाशाच्या दिशेने उंचावलेली तर्जनी एका झटक्यात खाली आली. एकूण इथंही आपली लक्षणं काही खऱ्याची नाहीत.
१२. दुपारी तीन वाजेपर्यंत पेकाळून गेलेलो. या टाईमला मूड पार ॲबसर्ड झालेला असतो. हा पण आता पॅटर्नच होऊन गेला आहे. त्यात आज ऊन डेंजर. झळा गरम. ऊर्जा पूर्ण खपाटीला. काही बोलण्याची किंवा चालण्याचीपण ऊर्जा नाही. जाऊन मलूल पडून रहावं बास्स.
अशात रिटर्न येताना रिक्षात, "हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे" गाणं वाजत राहिलं. दुपारचा वैराण मूड चेंज करून टाकला मंगेशकर बाईनं. रिक्षावाल्याला थॅंक यू म्हणायचं राहून गेलं.
१३. एक कलीग. मधुमेहावर जगभरात जेवढ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी स्वतःसाठी एक रामबाण उपचारपद्धती डिझाइन केलेली आहे. आणि त्यामुळे आता त्यांचा मधुमेह नियंत्रणात आलेला आहे, गोळीपण बंद झालेली आहे. हे उज्ज्वल यश त्यांनी आज माझ्याबरोबर शेअर केलं.
हे यश म्हणजे गुलाबजाम खायचं नाही. श्रीखंड नाही बासुंदी नाही रबडी नाही रसमलाई नाही जिलेबी नाही हलवा नाही शिरा नाही खीर नाही आईस्क्रीम नाही लस्सी नाही. काssही नाही. चहा गेल्या आठवड्यात पिला होता तर आता या आठवड्यात प्यायचा नाहीय, आता डायरेक्ट पुढच्या आठवड्यातच प्यायचा, हे सतत लक्षात ठेवायचं. आयुष्यभर फक्त मटकी, मूग आणि फुटाणे खा. असं तुम्ही दोनशे वर्षे जगला तरी काय होय?
१४. सिग्नलला रहदारी बराच वेळ रोखून धरलेली. ड्युटीवर हवालदार अगदीच कोवळा तरूण. ताटकळलेली ट्रॅफिक कधीही बेकाबू होण्याची शक्यता. तसं घडल्यास शो कॉज नोटीस येण्याची श्री. हवालदार तरूण यांना भीती. वरवर सिंघमचा आवेश आणला तरी आवाजातली पाकपुक लपत नाही. हुकुम पाळला जाईलच, याची खात्री वाटत नाहीये. शेवटी शेवटी ''अरे जरा थांबा ना भावांनोss" अशा याचनेच्या पातळीवर परिस्थिती आलेली आहे.
फॉर्च्युनर गाड्यांचा एक भलाथोरला ताफा सायरन वाजवत सणसणत येतो. खाली सरकलेल्या काळ्या काचांमधून आत बसलेल्या ईश्वराचं ओझरतं दर्शन होतं. ईश्वर प्रजेकडे पाहत अज्ञात दिशेने हात हलवत पुढील प्रवासाला निघून जातो. कोंडलेली प्रजा मुक्त होते.
आझादीच्या अमृतमहोत्सवात पोहचेपर्यंत आपली नागरिक-चेतना अशा प्रकारे लिबलिबीत होऊन गेली आहे. इंग्रजांच्या काळात आपली चेतना अशी नव्हती, ही मोठीच भाग्याची गोष्ट म्हटली पाहिजे. अन्यथा आपण त्यांनाही हातापाया पडून थांबवून ठेवले असते.
आपल्याच पैशांचा डोळ्यांदेखत चाललेला हा चुराडा आदरपूर्वक पाहत बसायचा आणि वर उत्साहाने हातही हलवायचा, म्हणजे कमाल झाली. भूतलावरच्या ह्या फॉर्च्युनरस्वार बोगस ईश्वरांना स्पेस शटलमध्ये कोंबून खऱ्या ईश्वराप्रमाणे वरच्यावर अंतराळातच परिक्रमा करीत बसण्यास पाठवले गेले पाहिजे, असे आपल्या मनात कधीही येत नाही. आणि समजा आले तरी आपल्या गांडू स्वभावानुसार....
असो.
असोच.
१५. स्वप्न. माझे काही मित्र ड्रग्ज विक्रीमध्ये गुंतलेले आहेत. पोलिस धरपकड करतायत. शहरभर पोलिस गाड्या. बरेच मित्र पकडले गेलेत. एक-दोघे अजून बाहेरच लपतछपत फिरतायत.
त्यांना वेश पालटून ट्रकमध्ये बसवून शहरातून सुरक्षित बाहेर काढण्याच्या कामी माझं नियोजन केलं गेलं आहे. मी त्यांना मार्गदर्शन करणार असतो. त्या कठीण काळात त्यांना माझं महत्त्व पटलेलं असतं.!
एका साथीदाराला मी एका पानटपरीवर बोलावतो. कसल्यातरी सांकेतिक खुणा हातवारे करून इशारे करत असतो. तेवढ्यात पोलिस सायरन वाजतो. आणि मी त्याला त्याच्या हालावर सोडून चाललेलो आठवतं. याचा अर्थ स्पष्ट आहे. मी कधीच स्वतःला गोत्यात आणत नाही.
पोलिस नंतर त्या पानटपरीवाल्याकडून कसलंतरी ॲफिडेविट लिहून घेतायत. मी ते एका डांबाआड लपून बघतो आहे.
नंतर एक गाव. तिथं काळपट धूसर शेतघर. त्या गावातून निसटून जाण्याचे आमचे सगळे प्रयत्न फेल झालेले आहेत. आमच्या अपेक्षेपेक्षा जलद हालचाली करत पोलिस तिथं पोचले आहेत. मोठा फौजफाटा आहे. आता आम्ही पोलिसवेश धारण करून निसटण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी गावातील पोलिस चौकीवरची एक पोलीस व्हॅन आम्ही जप्त केलेली आहे.
शेतघरापुढील रानातून दोन स्त्रिया गवताचे भारे तोलत चालत निघाल्या आहेत. त्यापैकी एक स्त्री आमच्यातील एकाकडे बघून चमकते. तिचं आमच्यातील एकासोबत प्रकरण. ही घडामोड माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे. परंतु फार आश्चर्य करत बसायला सवड नाही. प्रसंग बाका आहे.
सरतेशेवटी मी एकटाच एका तळघरात झोपलेलो आहे. बेल वाजतेय दारावर. आले वाटतं पोलीस मला धरायला. छातीत धडधड धडधड. मी दार उघडत नाही. आता बेल लैच जोरजोरात वाजायला लागली आहे.
एक मिनिट. इथं काहीतरी गडबड आहे. हा आवाज ओळखीचा आहे.
हॅट साला.! आलार्म वाजतोय मोबाईलचा.
पूर्ण जाग. स्वप्न एकदम अदृश्य. पोलिस बिलीस सगळे गायब.
नेहमीप्रमाणे आलार्म पोस्टपोन करून पुन्हा एकदा झोपेत घुसण्याची माझी अजिबात इच्छा नाही. असल्या भीतीदायक स्वप्नात कोण पुन्हा घुसणार?
बाकी, 'स्वप्नात तुमचा पाठलाग होत असेल तर तुम्ही जागेपणीही जीवनापासून पळत असणार', असं एक निरीक्षण कार्ल गुस्ताव जुंगचं आहे. आणि तो म्हणतोय म्हणजे खरंच असेल.
ह्या नोंदी आवडल्या. मस्त.
ह्या नोंदी आवडल्या. मस्त.
भावभंगिमा >>>>> शब्द आवडला.
आवडलं!
आवडलं!
दोन बसेसच्या मधून जाताना मलापण जाम भीती वाटते
एकांचं भाग्य फळफळल्याची स्टोरी लहानपणीच ऐकल्यामुळे!
छान नोंदी यावेळी पण!
छान नोंदी यावेळी पण!
आवडल्या.
तुमच लेखन वाचताना का कुणास ठाऊक आतून काहीतरी तुटतं असल्यासारखं वाटतं!
नोंदी छान, नेहमीप्रमाणे.
नोंदी छान, नेहमीप्रमाणे.
… लेखन वाचताना का कुणास ठाऊक आतून काहीतरी तुटत असल्यासारखं वाटतं ! ….
कधी Why so glum ? असं विचारावसं वाटतं पण भोचकपणा होईल असंही वाटतं. काही वाक्यांवर तर Brotherly Hug द्यावासा वाटतो.
नोंदी आवडल्या ह्या देखील
नोंदी आवडल्या ह्या देखील
वेगळा दृष्टीकोन असतो बऱ्याच वेळा
आवडल्या नोंदी.
आवडल्या नोंदी.
ह्यातल्या कित्येक नोंदी तर प्रत्यक्ष अनुभवल्या.
एकटेपणा असला/वाटला की gluminess आपोआपच येतो.
या ही बिनकामाच्या नोंदी खूप
या ही बिनकामाच्या नोंदी खूप आवडल्या . खास करून ८ आणि १ ३ नंबरची .
बाय द वे डांब हा शब्द आलाय तुमच्या लेखनात . तुम्ही नेमके कुठले ?
तुम्ही कुठे सापडू शकाल
तुम्ही कुठे सापडू शकाल, त्याच्या खुणा सोडताय का?
नोंदी आवडल्या. पुन्हा वाचेन.
नेहमीप्रमाणे सुरेख.८ आणि १२
नेहमीप्रमाणे सुरेख.८ आणि १२ आवडल्या.
असल्या भीतीदायक स्वप्नात कोण पुन्हा घुसणार?>>>>>> कधीतरी असा अनुभव येतोच.
लेखन वाचताना का कुणास ठाऊक
लेखन वाचताना का कुणास ठाऊक आतून काहीतरी तुटत असल्यासारखं वाटतं ! ….
कधी Why so glum ?
मला ह्या कारणाकरता नाही आवडत बिकानों
पण व्हाईल ऑन द स्ब्जेक्ट, संप्रति तुमच्या पासून हाकेच्या अंतरावर आहे मी कधीही हाक मारा. मी उपलब्ध असेन. हवे असल्यास भेटूया आपण.
(काही) पुस्तकांवर बोलू शकेन मी! गरजेनुसार ऐकूही शकतो.
मस्तच लिहिलंय.
मस्तच लिहिलंय.
हे नैराश्य नाही, आत्मशोध आहे. समोरचे सगळे खोटे वाटत असताना तुकड्या तुकड्यात खरं शोधणं. दुःख नसून हरवलेपण आहे. आपण या ग्रहावर काय करत आहोत असं वाटत राहतं, विचित्र uncanny होमसिकनेस असतो. पण "होम" कुठे आहे हेही माहीत नसतं. तो कुठेही कधीही बाहेर पडत राहतो, तो पिंडाचा भाग आहे. जात नाही कुठेही! हा मला लागलेला अर्थ.
कार्ल यंग आहे उच्चार बहुतेक, बऱ्याचशा भाषांमधे ज चा उच्चार य असा होतो. जसं जोशुआ- येशुआ आणि जुगल - युगल. तर ते युंग किंवा यंग असावं. मीही बरेचदा "जंग" म्हणून झाले आहे, नंतर कुठेतरी ऐकून सुधारले.
छान लिहिलंय, एकदम सहज.
छान लिहिलंय, एकदम सहज.
आता मला पॅटर्न दिसू लागला आहे
आता मला पॅटर्न दिसू लागला आहे.
त्यामुळे जरा मजा नाही आली. पुढील नोंदीसाठी शुभेच्छा असे म्हणणार नाही.
स्वतःत साचलेल्या गोष्टींना एवढ्याच लिमिटेड फॉर्म मध्ये आउटलेट द्यायचा असेल तर हा तुमचा चॉईस म्हणून गप्प बसतो.
कारण आता अजून लिहा मोठं लिहा असला आग्रह करण्यात अर्थ नाही हे कळून चुकले आहे.
त्यामुळं मी जरा तुमच्यावर नाराज आहे.
कारण आता अजून लिहा मोठं लिहा
कारण आता अजून लिहा मोठं लिहा असला आग्रह करण्यात अर्थ नाही हे कळून चुकले आहे. >> उकरलं की अजुन निघणार. त्याने आत्मशोधाचा प्रवास अजुन किचकट होईल असं तुम्हाला वाटत नाही का रॉय?
पॅटर्न दिसू लागला आहे.
पॅटर्न दिसू लागला आहे.
त्यामुळे जरा मजा नाही आली. >>>> सहमत
ठराविक साचेबद्ध लिखाण होत चाललेल आहे. तुमच्याकडून अधिक अपेक्षा आहेत.
>>उकरलं की अजुन निघणार.
>>उकरलं की अजुन निघणार. त्याने आत्मशोधाचा प्रवास अजुन किचकट होईल असं तुम्हाला वाटत नाही का रॉय? <<
त्याला आत्मशोध करायचा असता तर तो मायबोलीवर (तेही एका आभासी आयडेन्टिटी खाली ) नोंदी खरडत बसला नसता.
शिवाय त्याला आत्मशोधातून काय गवसणार आहे हे पक्के ठाऊक आहे.
किंबहुना आत्मशोध घेणे वगैरे या भाषेने कॉम्प्लेक्स केलेल्या गोष्टी आहेत हेही त्याला पक्के ठाऊक आहे.
हिमनगाचे टोक म्हणून बघा हो .
हिमनगाचे टोक म्हणून बघा हो . तो त्यांचा सेपरेट प्रवास सुरूच असेल अशी मला खातरी आहे . (आपल्या सगळ्यांचाच तो प्रवासा खाजगीत अजून वेगाने सुरु असतोच ) माणूस कधी कधी दोन ओळीतून मन मोकळं करण्याचा प्रयत्न करतो , भावनेला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करतो इतकंच म्हणायचं आहे मला .
- काय साला आयुष्याय ! अजून
- काय साला आयुष्याय ! अजून चारपाच वर्षं आपलं असंच चालू राहिलं तर एखाद्या दिवशी आपली वास्तवावरची पकड पूर्णपणे निसटूनच जाईल बहुधा
- सेल्फ च्या बाहेर येऊन केलेली ही शाब्दिक कृती, जोडून घेण्याची भावना अगदीच यांत्रिक कशी काय असू शकेल?
- नंतर कधीतरी बऱ्याच वर्षांनी तो माझ्या लेव्हलला येईल.
- प्रसादाचा शिरा पण चांगला होता, बाई द वे.
- श्रीकृष्णाच्या पोजमध्ये आकाशाच्या दिशेने उंचावलेली तर्जनी एका झटक्यात खाली आली. एकूण इथंही आपली लक्षणं काही खऱ्याची नाहीत.
-
असल्या भीतीदायक स्वप्नात कोण पुन्हा घुसणार?>>>>तुमच्या डोक्यातील विचारचक्र वेगळ्या ट्रॅकवर निसटू लागली असा वाटत असताना प्रत्येक वेळी आपल्याच ट्रॅक वर चाके आली असे वाटले, फक्त शेवटच्या मुद्द्यावर फारकत झाली....
आवर्जून वाचावी अशा श्रेणीत मोडते ही मालीका........पुलेशु... नो नीड टू ऑप्ट रिफाईण्ड अँप्रोच फॉर सेक ऑफ एनिथिंग...
>> माणूस कधी कधी दोन ओळीतून
>> माणूस कधी कधी दोन ओळीतून मन मोकळं करण्याचा प्रयत्न करतो , भावनेला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करतो इतकंच म्हणायचं आहे मला .<<
आमचा आक्षेप "फक्त" दोन ओळीना आहे दक्षिणाजी. मोठ्या दमसासाच्या माणसाने नुसतं फावडे धरून घाम पुसल्यासारखं आहे हे.
आता काय दम द्यायचा काय आम्ही यांना? बरं हे असे सहज घावत नाहीत नाहीतर गनपॉईंटवरच धरले असते.
दम द्यू नका , वरडा त्यासनी
दम द्यू नका , वरडा त्यासनी जोरात
या लेखकाची अजून एक शैली
या लेखकाची अजून एक शैली म्हणजे तो परत स्वतःच्या कुठल्याही धाग्यावर प्रतिसाद किंवा स्पष्टीकरण देत बसत नाही..
>>>>>>दम द्यू नका , वरडा
>>>>>>दम द्यू नका , वरडा त्यासनी जोरात
दक्षिणा मस्त लेहजा उचललास.
>>>>>Words Out of Silence
>>>>>Words Out of Silence
मिळाल्यास वाचते. (फ्री)