भोंदू बाबा लोकांच्या निमित्ते ..…
सगळ्यांचे दुःख निवारण करण्याच्या निमित्ताने आपल्या समाजात सतत नवनवीन “बाबा” जन्माला येत असतात. लग्न होत नाही, मुलगा नीट वागत नाही, जमिनीचा वाद मिटत नाही… अशी अनेक कारणं असतात. लोक इतके हतबल होतात की, स्वतःला जन्मापासून ओळखत असूनही स्वतःची बुद्धी आणि आयुष्य एखाद्या व्यक्तीच्या हाती सोपवतात या आशेने की तो त्यांच्या दुःखाचं निवारण करेल.
एरवी लोक (जाती निहाय गोष्टींबाबत) संविधानाच्या गोष्टी करतात; पण संविधान आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि ज्ञानाच्या शोधाची व सुधारण्याची वृत्ती विकसित करायला सांगतं, हे सोयीस्करपणे विसरलं जातं. त्याला “श्रद्धा” असं गोंडस नाव दिलं जातं. प्रश्न विचारणं, तर्क लावणं, पुराव्यावर विश्वास ठेवणं या मूलभूत गोष्टी आपण टाळतो. हीच समाजाची खरी हार आहे. अशा मानसिकतेतून आपला देश “विकसनशील” या लेबलपलीकडे जाऊन “विकसित” होईल, ही अपेक्षाच अवास्तव वाटते.
इतकी हतबलता आणि दुःख येतं कुठून, की कोट्यवधींची संपत्ती “उपचार” या नावाखाली एखाद्या बाबा-बाईच्या चरणी अर्पण केली जाते? आणि फसवणूक झाल्यावरच डोळे उघडतात? जर हे बाबा इतकेच समर्थ असतील, तर मेडिकल सायन्सची गरज काय? त्यांनीच रोग बरे करावेत ना!
माझा एक सहकारी आणि त्याचं कुटुंब अशाच एका बाबाच्या प्रभावाखाली आहे. त्या बाबाला वाढदिवशी दुधाने अंघोळ घालतात आणि भक्तगण ते अभिमानाने सांगतात. खरा गुरु कधीच अशी अपेक्षा ठेवत नाही; उलट “मी गुरु आहे” ही संज्ञाच तो नाकारतो. कारण खरी शक्ती समानतेत असते, दैवत्वाच्या दिखाव्यात नाही. पण इथे लोक रांगा लावतात, आपले प्रश्न सांगतात, रडतात आणि नकळत त्या “पॉवर”ला खतपाणी घालतात.
भक्तगण इतके आंधळे असतात की, चांगलं काही झालं तर “बाबामुळे”, आणि वाईट झालं तर “आपलं नशीब” असं सोयीस्कर गणित लावलं जातं. ही कंडिशनिंग येते कुठून? आणि त्यालाच आपण श्रद्धा म्हणतो हा या शब्दाचा सर्वात मोठा अपमान आहे.
माझ्या सहकाऱ्याला “तुझ्या बहिणीचं सगळं ठीक करतो” या आशेवर त्या बाबाने सात वर्षे झुलवत ठेवलंय. कोविड काळात “इथे येणाऱ्यांना काही होणार नाही” असं सांगूनही त्याचं संपूर्ण कुटुंब बाधित झालं; आई तर थोडक्यात वाचली. तरीही निष्कर्ष “बाबा महान”! कारण चूक आपली, पाप आपलं! अशा विचारसरणीसमोर वास्तवही हरतं.
हे तथाकथित चमत्कार नेहमी बंद दरवाज्याआडच का घडतात? पुरावा मागितला की अध्यात्माच्या नावाखाली प्रश्न चुकवले जातात. आणि मग ही परंपरा पुढे चालत राहते उद्या कोणीही “वारस” घोषित झाला, तरी लोक त्याला न तपासता स्वीकारायला तयार असतात.
विज्ञान सांगतं की निर्णयक्षमता आणि तर्कशक्ती विकसित करणारा मेंदूचा भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स वयाबरोबर परिपक्व होतो. पण जेव्हा अंधश्रद्धा डोक्यावर बसते, तेव्हा नेमकं हेच कार्य थांबतं विचार करणं, योग्य-अयोग्य ठरवणं. मग प्रश्न पडतो, अंधश्रद्धेमुळे विचार थांबतो की विचार न केल्यामुळे अंधश्रद्धा वाढते?
या सगळ्या दुष्टचक्रात पुढच्या पिढीला ढकलण्याची जबाबदारी अनेकदा आपल्याच वडीलधाऱ्यांवर येते. जेव्हा पालकत्वात प्रश्न विचारण्याची, समजावून सांगण्याची सवय नसते, तेव्हा “बाबा” हा सोपा शॉर्टकट वाटू लागतो आणि हे दुष्टचक्र सुरूच राहतं.
शेवटी प्रश्न बाबांचा नाही, तो आपल्या विचारांचा आहे.
जोपर्यंत आपण स्वतः विचार करणं सोडून “कोणीतरी सांगेल” याची वाट बघत राहू, तोपर्यंत भोंदू बाबा जन्माला येत राहतील… आणि त्यांना जन्म देणारा समाजही.
*******************************************************************
१. सध्या चालू असलेल्या
१. सध्या चालू असलेल्या प्रकरणात फुटकळ आणि प्रतिष्ठीत वर्तमानपत्रांच्या सोशल मीडीया पेजेस खाली बाबाला दोष द्यायच्या ऐवजी स्त्रियांनाच दोष दिला जातोय हे चिंताजनक आहे. हल्ली महिलांच्या विरोधात असे प्रतिसाद येतात आणि त्या वर्तमानपत्राचे सोशल मीडीया करस्पॉन्डन्ट अजिबात लक्ष देत नाहीत. कि त्यांनीच अशा कमेण्ट्स साठी लोक नियुक्त केलेत ?
२. अंधध्रद्धांच्या बाबतीत अशी प्रकरणे उजेडात आल्यावरच चर्चा होते. आता अनेकांना अब्रू गेलीय असे वाटल्याने पश्चात्ताप होत असावा. बाबा भोंदूच असतात असे कुणी म्हटले कि धर्मावर हल्ला झाला असे समजून "बंदोबस्त " करणारे लोक एरव्ही मोकाट असतात.
३. मूल न होणे याबाबतीत अजून किती तरी लोकशिक्षण व्हायचंय. लाईफस्टाईल चेंज फक्त शहरातच नाही तर गावोगावी आहे. खेड्यात कधी न ऐकलेले डायबेटीस, हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर हे शब्द आता सर्रास ऐकू येऊ लागलेत. लाईफस्टाइल चेंज आणि वंध्यत्व हे जसं नातं आहे तसंच पुरूषात मुळातच असलेला दोष मुकाट स्त्री ने स्विकारायचा. तक्रार करायची नाही. मग समाजाकडून प्रेशर आलं कि असे बाबा गाठले जातात. कधी कधी शंका येते कि त्या दांपत्याला खरंच मूल कसं होतं याची माहिती नसेल का ? पण हा सगळा गुपचूप कारभार सर्वांच्या सोयीचा असेल. त्या दांपत्याची टोमण्यांपासून सुटका होत असेल.
४. जिथे हा ही उपाय नाही तिथे बाईने आयुष्यभर अपराधी बनून जगत रहायचं. हे बदलण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. काडीमोड या कारणास्तव लगेच मिळायला हवा. समाजाने या गोष्टी स्विकारायला हव्यात. लग्न जमवताना मेडी़कली फिट एव्हढंच नाही, तर सक्षम आहे का हे पण बघायला पाहीजे. पण या फक्त सोशल मीडीयावरच्या वाफा ठरतात.
असे कधीच होत नाही. इथे कळफलक बडवून काही होत नाही.
बाबांचा भोंदूपणा उघड झाल्यावर
बाबांचा भोंदूपणा उघड झाल्यावर शहाणपण सुचते. आधी सुचणे अवघड असते. कारण त्याआधी ते आपल्यासाठी अध्यात्मिक गुरु, देवाचा अवतार, देव आणि आपल्यातील मध्यस्थ, कुठल्या मंदिरातले पुजारी, पोथी वाचणारे, प्रवचनकार, संत, साधू वगैरे वगैरे कुठल्याही रूपात असू शकतात ज्यांना आपण आपले गुरु आणि देवासमान मानून निसंकोच त्यांच्या पायावर डोके ठेवत असतो.
आता वर उल्लेखलेली लोक ही सगळी ढोंगी माणसे असतात असे म्हणायचे नाही. तर जे ढोंगी बाबा असतात ते यातीलच एखाद्याचे रूप घेऊन वावरत असतात. त्यातील जे बाबा पकडले गेले नाहीत त्यांच्या पायावर डोके ठेवणारे भक्त आज इतर पकडले गेलेल्या बाबांच्या भक्तांना हसत असतील. आणि जेव्हा यांचे बाबा पकडले जातील तेव्हा हे देखील या अंधश्रद्धेतून बाहेर न येता आपली बाबा निवड चुकली म्हणत दुसरे बाबा शोधतील.
आपली ती श्रद्धा दुसऱ्याची ती अंधश्रद्धा म्हटले तर इतके सोपे आहे हे. त्यामुळे यात जे फसले आहेत त्यांना कोणी हसू नये किंवा दूषणे देऊ नये तर जे फसवतात त्यांच्यावर मात्र त्यांनी लोकांच्या अंधविश्वासाचा फायदा उचलत जे गुन्हे केले असतील त्यानुसार कारवाई व्हायला हवी.
मंत्रतंत्र बाबा बुवांच्या
मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशीर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच. डॉ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच."
https://www.maayboli.com/node/48337
औषधं उतारे आणि आशीर्वाद:
प्रकाटाआ.
औषधं उतारे आणि आशीर्वाद:
औषधं उतारे आणि आशीर्वाद:
एखाद्या मार्गाने कुणाला ट्रान्समध्ये नेता येते आणि सुप्त मनाला सूचना देता येते, हे त्याला कळले असते, त्याचे कसलेही शास्त्रीय कारण त्याला माहित नसते. . तो बायकोला मारझोड करतो पण बायको त्याला सोडत नाही. कारण तिला गरज असेलल्या शरीरसुखाने नवरा तिला समाधानी ठेवतो. संसार करण्यात शारीरिक सुख टिकवणे महत्वाचे असे बाबा तिला सांगतो.
त्या पुस्तकातील अशा प्रकारचे विश्लेषण वेगळे. पण त्यातून लोकांना काहीतरी मिळतच म्हणुन त्याचे एक प्रकारचे समर्थन करणे वेगळे.
लोकांना गांजा, अफूतूनही काहीतरी मिळत असतं.
मुळात एवढी असुरक्षितता अथवा एवढी ईर्षा, लोभ तयार होण्याचे कारण काय की पूर्ण विवेक, तर्कशक्ती पूर्णतःच गुंडाळून ठेवावी लागते, ती ही काही वेळा पुरती नव्हे तर जवळपास कायमच? (वर्षानुवर्षे अशा बाबांच्या नादी लागलेले असतात.) मूल होत नाही म्हणुन स्त्रिया जातात. काहीतरी मिळते म्हणजे काय मिळते? मूल होण्यावरचा उपाय? समुपदेशन? नाही. उलट अगतिकता वाढवून ठेवणे, फसवणूक होते, किंवा कुटुंबा कडुन गुन्हे सुद्धा घडवण्यात येतात. तरी लोक हा बाबा पडकला गेला तर दुसऱ्याकडे का जातात? श्रद्धेतून-अंधश्रद्धचेची सुरू असलेली जपणूक, ती सोडली तर लगेच असुरक्षित वाटणे.
व्यक्तिपूजा एकंदर घातकच!
व्यक्तिपूजा एकंदर घातकच! सश्रद्ध व्यक्तीला श्रद्धा ठेवायला सगुण, निर्गुण, रूपकात्मक, मूर्त, अमूर्त अशी अनंत स्थाने असतांना व्यक्तिपूजा करायला व्यक्ती शोधत का फिरतात लोक!!
लोकोत्तर पुरूष, स्त्रिया
लोकोत्तर पुरूष, स्त्रिया यांच्याकडून आदर्श घ्यावा. त्यातून प्रेरणा मिळते.
ज्याला आपण पाहिलेले नाही, ज्याच्या अस्तित्वाचा काहीही पुरावा नाही, जो आपल्याशी बोलू शकत नाही अशा अस्तित्वावरची श्रद्धा अंधश्रद्धांना जन्म घालते आणि मग अशा अज्ञातांचे आम्हीच अवतार असे बाबा, महाराज पैदा होत राहतात.
function at() { [native code] }उल कुलकर्णीने एक पोस्ट केली आहे. त्याने म्हटलेय कि पकडले गेल्यावरच महाराज भोंदू होतात का ?
जेव्हां आपण देव, अज्ञात शक्ती यांना मानतो तेव्हां त्यांनी जे काही केले ते दैवी असल्याने आपल्याला शक्य नाही असे वाटते. आपण फक्त दिव्यत्वाची प्रचिती म्हणत हात जोडतो. या हात जोडण्यामागे "तू होता म्हणून जमलं, आम्हाला काय जमणार ?" हा भाव असतो. म्हणून हात जोडले जातात.
या ऐवजी जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे निर्विवाद ऐतिहासिक व्यक्तिमत्व असेल तर त्यांना हात जोडताना "तुम्ही जे केलं त्याचा एक टक्का भाग का होईना मी करू शकतो ही प्रेरणा मिळते" म्हणून हात जोडले जातात.
आपल्या श्रद्धा कुठे आहेत ते तपासण्याची गरज आहे. जिथे श्रद्धा ठेवायची ते ठिकाण तपासून घेतले पाहीजे.
बाबा, महाराज , भोंदू यांच्या चमत्कारावर का विश्वास बसतो ? कारण मुळात अशा चमत्कारांवर आपला विश्वास असतो. त्या चमत्कारांवर आपली श्रद्धा असते. आपल्या श्रद्धास्थानांना चमत्कार, दैवी अवतार यांची ठिगळे लागली कि प्रेरणा समाप्त होते. विचार समाप्त होतात. आणि निव्वळ अंधश्रद्धा उरते. मग त्याचा गैरफायदा उचलला गेला नाही तरच नवल.