
शापुरशा, रोस्तम, फाली, होमी, सायरस, जहांगीर, केकी, पीलू, नरीमन, होशंग, जमशेद हे मित्र आणि माहरोख, नवाज़, लैला, दीना, शहनाज़, डेल्ना, मेहर ह्या मैत्रिणी ही सगळी पारसी “बावा” मंडळी एकत्र जमून मोठ्ठ्या आवाजात (अर्थातच) बोलत असली तर विषय ज्वलंत,तातडीचा आणि गंभीर असणार.
हळू आवाजात चर्चेची अपेक्षा मात्र करता यायची नाही कारण पारसी मंडळी जमली आहेत आणि कुजबुजत हळू आवाजात बोलत आहेत असे फक्त दोनच प्रसंगात घडते - कुणाचा दाखमा/ अंत्यविधी चालू असेल तर किंवा मग कडाक्याचे भांडण चालू असतांना एकमेकांना “तमे किधो ने भेन्चोद, हमजो ने मारी वात' असे गालीप्रदान करतांना. बाकी वेळी फुल्ल व्हॉल्युम. पारसी बावाजीचे मुख्य लक्षण.
तर, मोठ्या आवाजातल्या पारसी स्नेहमेळाव्यात चर्चेचा विषय खालीलपैकी एक असण्याची दाट शक्यता :
- अमक्या मित्राला- नातेवाईकांना धंद्यात झालेला नफा / मिळालेले घबाड. धनप्राप्ती चांगली झाली असल्यास त्यानिमित्त पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.
- तोटा, नुकसान, व्यावसायिक प्रॉब्लेम झाला असेल तर “ग़म ग़लत करवा माटे” पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.
- येऊ घातलेला नवरोझ सारखा सण किंवा कुणाकुणाच्या मुलांचा 'नवज्योत' समारंभ आणि त्यानिमित्त मेजवानीचे बेत. पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.
- अमक्याचं ठरलेलं/ बिनसलेलं प्रेम, घटस्फोट, प्रेगनेंसी किंवा त्यासाठी चालू असलेले प्रयत्न, अपत्यप्राप्ती आणि त्यानिमित्त पार्टी कधी, कुठे, मेन्यू वगैरे.
तुमच्या लक्षात आलेच असेल, प्रत्येक प्रसंगात गाडी फिरून फिरून एकाच थांब्यावर येतेय - पार्टी, पार्टीचा मेन्यू, भोणू, भोजन, जेवण, पंगत, खाणे, खादाडी.
याचा कळस गाठला जातो कुणाचे लग्न ठरले की. पारसी जोडप्याचा लग्नाचा विचार पक्का झाला आणि "पसंदे कदम" (बोमनजी- धर्मगुरु आणि पालकांसमोर वाग्दत्त वधू-वराने लग्नासाठी पसंतीची तीन दा ग्वाही देणे) ची घोषणा झाली रे झाली की घरी-दारी एकच विषय - लग्नाच्या कार्यक्रमाचे केटरिंग कुणाला द्यायचे ? आपडी शिरीन अने रोस्तम ना लगन थवाना छे. लगनमां केटरिंग नू काम शा ने आपवू ? गझदर नी डीकरी ने ? आपडी तनाझ ? के आपडू टाटा इंस्टीट्यूटनू पिकोलो ? के बीजू कोई ? के नवसारीथी मासा नवरोजभाई मोकलसे ते ? एक ना दोन. मग त्यात मेन्यू काय? पातरा नी मच्छी, धनशाक, पात्रेल / पातरेल, सल्ली मरगी, चिकन फरचा, सास नी मच्छी, सल्ली बोटी, जर्दालू माँ गोश्त, बेरी पुलाव, झिंगा ना कटलेट, सास नूं गोश, दार नी पोरी, मेवा नू अचार, लगननू कस्टर्ड अशा खास ठेवणीतल्या पारसी पदार्थांची चविष्ट चर्चा. तासन् तास, दिवस-दिवस.
“लगन नू भोणू” म्हणजे लग्नाच्या पंगतीतले जेवण हा पारसी समाजाच्या प्रचंड आस्थेचा आणि अभिमानाचा विषय. त्यात काहीही उणे रहायला नको हा समस्त पारसी बांधवांचा एकमताचा ठराव, त्यासाठी गुन्हा करावा लागला, आवडत्या केटररला ओलिस ठेवावे लागले तरी बेहत्तर असे गमतीने म्हणतात. लग्नसोहळा पार पडल्यानंतर सुद्धा अनेक महिने हे “लगन नो भोणू” आणि त्यातले पदार्थ, त्यांच्या चवी, चवीतले बारकावे - सगळेच चर्चेत असते. आपल्या अन्नावर, खाद्यपरंपरांवर अतिशय प्रेम करणारी जमात.
इराणी-पारसी नववर्षाचे निमित्त साधून (२०-२१ मार्च) या आगळ्यावेगळ्या समाजाच्या आगळ्यावेगळ्या खाद्यपरंपरा आणि खाद्यसंस्कृतीशी थोडा परिचय करून घेऊ या.
भारतातल्या अति-अल्पसंख्यक, तरी गर्भश्रीमंत असलेल्या पारसी समाजाची कहाणी सर्वांना माहितीच असेल. इराणचा शेवटचा सासानिद वंशीय शासक “यज्देगर्द”चे राज्य अरब मुस्लिमांच्या आक्रमणाला थोपवू न शकल्याने संपुष्टात आले (641 ईसवी) आणि अग्नीपूजक झोराष्ट्रियन पारसी आपला देश (फ़ारस, आजचा इराण) सोडून परागंदा झाले. आधी खोरासान पर्वतरांगा, मग हारमुज बंदर आणि मग समुद्रमार्गे वाट फुटेल तिकडे असे पलायन केलेल्यांपैकी काहींची जहाजे भारतात गुजरातच्या किनाऱ्याला लागली. दीव, संजान, नवसारी आणि उदवाडा या गावांमधे “आम्ही दुधात साखरेसारखे राहू” अशा आश्वासनावर आश्रय मिळवून राहिले आणि पुढे आपल्या कौशल्याने अपार धनोत्कर्ष साधते झाले. इराणमधून येतांना “ईरानशा” (पवित्र अग्नी) सोबत आणला होताच. त्याची पूजाअर्चा करण्यासाठी या गावांतून आतिश बेहराम आणि अग्यारी नामक प्रार्थनास्थळे स्थापण्यात आली. इराणमधून पुढे अनेक दशके झोराष्ट्रियन पारसीजन येतच गेले आणि हे इराणी- पारसी गुजरात, मुंबई आणि पुढे देशात अन्य ठिकाणी वसले. (संदर्भ = “दस्तूर बहमन कैकोबाद” कृत 'किस्सा-ए-संजान, 1599-1600 ईसवी)
मोठ्या शहरातून आपल्या मूळ गावी गेलेले लोक परततांना सोबत काय आणतात ? अमुक मसाले, तमुक वाळवण, ही-ती चटणी, ग्रामीण मेवा, वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक फळे, भाज्या, खाद्यपदार्थ. हे पदार्थ काही दिवसांत संपले की त्यांच्या आठवणी जागवतात. आपल्या सामान्यजनांची ही कथा, पारसी लोक तर शेकडो वर्षांपूर्वी घर-दार- देश सोडून आलेले. त्यांच्या अन्नस्मृती, त्यांचा food nostalgia तितकाच खोल, तीव्र असणे स्वाभाविकच. अनेकानेक वर्षे गुजरात राज्यात वास्तव्य असल्याने त्यांच्या मूळ इराणी खाण्यापिण्यावर स्थानिकांचा प्रभाव पडणे हे सुद्धा सहाजिकच. असे असूनही आपली एक ठळक वेगळी-निराळी खाद्यसंस्कृती जपण्यात पारसी समुदाय यशस्वी ठरलाय हे निर्विवाद.

ऐकून माहिती असलेले, क्वचित कधी चाखलेले, काही मोजक्या इराणी-पारसी रेस्तरांमधून मिळणारे धनशाक + ब्राउन राइस, अकुरी, पातरा नी मच्छी, रुस्तमजी ब्रँडचे सोडावॉटर आणि गोडात कस्टर्ड यापलिकडे पारसी फूडबद्दल फारसे कुणाला माहिती नसते. ग्राहकांच्या तुटवड्यामुळे, त्यांच्या बदलत्या food choices मुळे, अन्य कारणांमुळे हे रेस्तरां फार टिकाव धरू शकतील अशी स्थिती नाही. Such Parsi food places have already become relics of bygone times and they may soon become fossils.
एकतर समाजाची संख्या खूप म्हणजे खूपच कमी. भारतात आजमितिला जेमतेम लाखभर पारसी असावेत. हासुद्धा कमाल आकडा. त्यात आपण बरे आपले काम बरे अशी बहुसंख्य पारश्यांची प्रवृत्ती. एकलकोंडे, पटकन न खुलणारे, लाजाळू स्वभावाचे लोकच जास्त. आपले अन्नपदार्थ, आपली ख़ासियत टिकावी यासाठी यासाठी धडपड करणारे काही आहेत हीच काय ती जमेची बाजू.
दुसरे म्हणजे पारसी फूड म्हणजे फक्त सामिष - नॉनव्हेजच असते हा ठाम समज. समाज मुख्यत्वे सर्वभक्षी आहे हे खरे आहे. पण शाकाहारी लोकांना खाऊ घालायला काहीच नाही असे कोणत्याही पारसी बावाच्या किचनमधे होत नाही. (उदाहरणार्थ, header picture म्हणून दिसणारी भरगच्च थाळी फक्त शाकाहारी पदार्थांनी नटलेली आहे)
हळद - मिरची पूड यांचा अत्यल्प वापर आणि त्यामुळे पदार्थांचे फिके रंग; मासे-नॉनव्हेज रांधण्याच्या त्यांच्या विशिष्ट पद्धती ( यथा fruits+ meat, किंवा honey+ dryfruits + meat); पारसी पदार्थांच्या नाजूक चवी आणि आपल्याकडच्या झणझणीत, मसालेदार चिकन-मटन-मासे खायला सरावलेल्या जिव्हांचा मेळ नीट बसत नाही हा मुद्दाही आहे. म्हणूनच की काय आपल्याकडे पारसी फूड फार लोकप्रिय होऊ शकलेले नाही.
तर काय असते पारश्यांच्या ताटात ? रोजचे जेवण काय, उपास, श्राद्ध, सणावाराला काय ? पार्टीत, नवज्योतच्या, नववर्षाच्या जेवणाला, लग्नाच्या पंगतीत काय काय ?
ठेवणीतले, करायला किचकट असे पदार्थ सणाला आणि सोपे- practical पदार्थ रोजच्या जेवणाला असे सर्वसाधारण धोरण. पारश्यांच्या ग्रोसरी शॉपिंगच्या थैलीत सर्वात जास्त कुठला आयटम येत असेल तर एन्डू. Egg / अंड्याला “एन्डू / एन्डा” म्हणणे ही पारसी लकब, खास पारसी लक्षण. एन्डाशिवाय पारसी किचन म्हणजे रामाशिवायची अयोध्या, विष्णुविनाचा वैकुंठ. सकाळच्या न्याहारीत, दुपारच्या जेवणात, मधल्यावेळच्या खाण्यात, केक-पेस्ट्री-कस्टर्ड - कुकीज़- भजी- भाजी- कटलेट सर्वत्र एन्डूचे साम्राज्य.
पारसी न्याहरीचा सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे “अकूरी” या अकूरी आणि अंडा भुर्जीत फरक काय ? सेमच ना ? तर तसे नाही. मुख्य फरक टेक्स्चरचा. लाल रंगाच्या सुती कपड्याला लालच रंगाच्या रेशमी कपड्याचा फ़ील येतो का? काहीसे तसेच.
चीज़ ऑमलेट, पारसी बेकरीतले ताजे पाव, ब्रून, बन, बटर खारी, निरनिराळ्या कुकीज़ आणि सोबतीला चहा हे न्याहरीचे अन्य लोकप्रिय पदार्थ. पारसी घरातला चहा मात्र इराणी रेस्तरांच्या चहापेक्षा वेगळा. त्यात उन्हात वाळवलेली पुदिन्याची पाने चुरडून वापरलेली असतात.
इराणी मूळ असलेल्या समाजांचे बेकिंग स्किल्स वादातीत आहेतच, त्यात प्रचंड वैविध्यही आहे, त्याबद्दल पुढे. शहाण्या माणसाने प्रत्यय घेण्याचा चांस सोडू नये, हे निश्चित.
घरगुती लंच- डिनर ला दार-चावर-एन्डू (साध्या वरण भातावर फ्राय एग / उकडलेले अंडे) दररोज खाल्ले तरी कोणताही पारसी बावा “ह्या मेन्यूचा कंटाळा आलाय” असे म्हणायचा नाही.

तुरिया पर एन्डू, वेगना पर एन्डू, सल्ली पर एन्डू, पटेटा पर एन्डू, भींडापर एन्डू अशा अंडीयुक्त भाज्या आणि भात किंवा चपाती (दोन्ही एकत्र सहसा नाही) असे रोजचे जेवण, सोबत एखादे लोणचे आणि गुजराती स्टाइल कचुंबर सलाड.

दररोज सकाळ - दुपार- संध्याकाळच्या खाण्यात एग प्रोटीनचे असे भक्त-भोक्ते अन्यत्र सापडायचे नाहीत. एक मात्र आहे, पसंती मरगीनू एन्डूलाच. कोंबडीचेच अंडे. बदक, शहामृग यांची अंडी पारसी स्वयंपाकघरात यायची नाहीत.
पारसी सामिष भोजन हे महाकाव्य मानले तर त्यात धनशाक, जर्दालू मा गोश्त, पातरा नी मच्छी, चिकन फरचा, सास नी मच्छी, सल्ली मरगी, कोलमी ना कबाब, चिकन कटलेट, सास नूं गोश्त हे प्रमुख अध्याय. वेगना मा गोश्त (भरताची वांगी + मटन), तुरिया ना झिंगा (घोसाळी + कोलंबी), सल्ली बोटी, पटेटा झिंगा ना कटलेट (बटाटा + कोलंबी) अशी उप-कथानके साथीला.
पैकी चिकन फरचा म्हणजे American southern fried chiken चा भारतीय+ पारसी मसाल्यातला भाऊबंद. मसाले थोडे वेगळे. पातरा नी मच्छी म्हणजे केळीच्या पानात (पात्रा) गुंडाळून वाफेवर शिजवलेले ताज्या हिरव्या वाटणातले पापलेट मासे (promfrets). लग्नाच्या मेजवानीत पातरा नी मच्छी मस्ट. नॉन निगोशियेबल.
जर्दालू मा गोश्त / जर्दालू मा मच्छी / जर्दालू मा मरगी या सर्वात fruit + meat ही खास इराणी जोडी आहे. हे पदार्थ शेकडो वर्षांपूर्वी इराणमधे असतांना जसे केले जात अगदी तसेच्या तसेच आजही पारसी बावा लोकांच्या किचनमधे होतात. कुठलाच स्थानिक- गुजराती - भारतीय प्रभाव न पडलेल्या पाककृती. चिकन किंवा मटनात सौम्य मसाल्याच्या ग्रेवीत गोडसर जर्दाळू हे कॉम्बो भारतीय जिभेला फार आवडण्यासारखे नाही. बावा लोक मात्र खास जातीवंत जर्दाळू (Hunza apricots) आयात करून मागवतात, जीव टाकतात त्या विशिष्ट चवीसाठी. बेरी पुलाव असाच एक fruit + meat असलेला मुंबईल्या काही रेस्तरांमधून मिळणारा प्रकार. फ्रूटी - आंबट- गोडसर चवीचा.
वर अनेकदा आलेल्या “सल्ली” शब्दावर अडखळलात ? सल्ली म्हणजे बटाट्याची शेव, आलू भुजिया आणि फ्रेंच फ़्राइज़ चा पारसी चुलतभाऊ. पदार्थांना कुरकुरीतपणा - क्रंच - टेक्स्चर प्रदान करणारा कलाकार. नुसतेच हाय प्रोटीन पौष्टिक हेल्दी खाणे होऊ नये म्हणून या तळलेल्या बटाटा आयटमची योजना असावी. What’s the point in missing all the fun of eating some fried, starchy junk food? पुलाव, चिकन, मटन, एन्डू, ऑमलेट, कटलेट, मासे अशा सर्व ग्रेवीयुक्त किंवा कोरड्या पदार्थांवर ह्या बटाट्याच्या कुरकुरीत सळ्या टाकून त्यांचे “सल्ली” वर्जन तयार करण्यात येते.
“धनशाक” मात्र पारसी भोजनाच्या ह्रदयस्थानी आहे. म्हटले तर एकप्रकारे मिक्स दाल, भाज्या / मटन घातलेले स्ट्यूच. पण एखाद्या पारश्यासमोर हे म्हणून दाखवा, बावा तुमचे दात घश्याखाली घालायला कमी करणार नाही. Bawas may get violent
धनशाक आणि ब्राउन राइस/ caramelised onion rice हे निवांतपणे रांधा-वाढायचे पदार्थ. Slow cooking चा वस्तुपाठच. करतांना घाई चालत नसल्याने धनशाक हमखास रविवारचा लंच मेन्यू आणि एका घरात केला तर कुटुंबकबिला, शेजारीपाजारी सर्वांनी भरपेट खाऊन वर संध्याकाळी खायला उरेल इतक्या प्रमाणात करायचा असा नियमच आहे. त्यात प्रत्येक घराची पद्धत, वापरायच्या डाळी, वापरायचे अन्य जिन्नस, त्यांचे प्रमाण, मसाले वगैरे वेगवेगळे. त्यामुळे एकाच चवीचे धनशाक दोनदा खायला मिळणे फक्त रेस्तरां मधे किंवा त्याच बावाच्या घरी घडेल याची खातरी. धनशाक शाकाहारी आणि मांसयुक्त असे दोन्ही प्रकारे करतात. मटन खिमा वजा केला तर शाकाहारी, आणि टाकला तर बावा खुष. सांबर किंवा सिंधी कढीत असतात तश्या भरपूर भाज्या धनशाकमधेही असतात पण डोळ्यांना एकही तुकडा दिसेल तर शपथ. घोटून घोटून एकजीव केलेल्या भाज्या / मीट असल्याने आणि मंद आचेवर भरपूर वेळ घेऊन शिजवल्याने धनशाक दाटसर, स्मूद असते. त्याचे लग्न ब्राउन राइसशी आधीच लाऊन देण्यात आले आहे. Caramel water मधे हा भात शिजवतात त्यामुळे त्याला एक विशेष रंग, गंध आणि चव प्राप्त होते. शिजवायलाही भरपूर वेळ लागतो आणि भात शिजत असतांना त्यातले अधिकचे पाणी धनशाकमधे घालणे हे मस्ट (प्रेशर कुकर वापरणे अब्रह्मण्यम़्). वरून खरपूस तळलेले कांद्याचे काप पखरून त्याची चव खुलवणे हे बावा बल्लवांचे आवडते काम.

पारसी समाजात धनशाकचे फार कौतुक असले तरी नवरोज़चा सण असेल किंवा नवीन जावई जेवायला येणार असेल तर अशा मंगलप्रसंगी मात्र धनशाक रांधू नये असा संकेत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात काही भागात जावई-सोयरे आले असता पिठलं करत-वाढत नाहीत तसेच. पारसी घरात कुणी मयत झाल्यावर तीन दिवस चूल पेटवू नये, शेजारघरातून आलेली खिचडी खावी आणि चौथ्या दिवशी शुद्धीकरणाचा - शोक समाप्तीचा संकेत म्हणून घरात धनशाक + भात रांधून सर्वांनी खावा अशी जुनी प्रथा.

स्थानिकांच्या खाद्यसंस्कृतीचा मोठा प्रभाव पडलेले प्रमुख पदार्थ म्हणजे लोणची, पापड आणि चटण्या. पारसी भोजनात यांची रेलचेल असते पण चव मात्र गुजराती / अन्य भारतीय चवीपेक्षा वेगळी. अर्थात कृती आणि घटक वेगळे असल्याने तशी चव गाठता येते. वरण-भात किंवा खिचडीसोबत पापड आणि लोणच्याच्या फोडी हे बावा घरातले आवडीचे खाणे गुजराती घरांपेक्षा वेगळे नाही. पण पारसी लोणच्यांचे वैशिष्ट्य म्हणजे व्हिनेगरचा वापर. त्याने एक शार्प- जिभेला चरचरणारी चव येते. कैरी, लिंबू, भोकरं यांची व्हिनेगरमधली लोणची तर करतातच पण मेवा नू अचार (सुक्या मेव्याचे / Dry Fruit Pickle), आलूबुखारा नू अचार, मरगी (boneless chicken) नू अचार, सुक्का बोंबलाना पाटीया (बोंबील मासे वापरून), कोलमी नू अचार (कोलंबीचे लोणचे) आंबाकलियो (shredded mango), अख्ख्या कांद्याचे, मनुका+गाजराचे, कार्नबेरी + सफरचंदाचे, कोहळ्याचे तिखट लोणचे आणि गोड मुरांबा, जर्दाळूचे लोणचे हे खासे पारसी चवीचे मानदंड.
पारसी तीर्थस्थळे असलेल्या उदवाडा-नवसारी भागातले बल्लव कमलकाकडी (Lotus stem)चे, लसूणपातीचे तसेच गोड्या पाण्यातल्या झिंग्यांचे “सून्ध” (हे फिकट निळ्या रंगाचे झिंगे तिथली खासियत) वगैरे लोणची बनवणारे एक्सपर्ट समजले जातात आणि त्यांना वर्षभर मागणी असते.
खूप पातळ लाटलेले राइस पापड, उडदाचे मिरेयुक्त पापड, मिरगुंडासारखेच पण फिके आणि लांब कापडी चिंध्यांसारखे दिसणारे पापड, लाल गहू- हातसडीचे तांदूळ एकत्र वापरून केलेले पापड, खीचा पापड असे अनेक प्रकार पारसी घरात आलटून पालटून असतात. पापड मात्र तळूनच खावे, भाजून नाही हा दंडक. लग्नाच्या भोणूसाठी ३-४ प्रकारचे पापड असतातच.
दुपारच्या चहाची वेळ म्हणजे पारसी बेकरी पदार्थांचा पर्वणीचा समय. मावा नू केक, केशर, बदाम आणि घट्ट दही वापरून केलेला 'कुमास', दार नी पोरी सारखी गोड पेस्ट्री, साधना (वाफेवरचा राईस केक सदृश्य पदार्थ) केरकरिया (kind of deep fried Biscuits), पोपलीजी (soft bun केक्स), घारी (अतिशय गरिष्ठ तूप-मेव्याची मिठाई), चिकन किंवा बटाटा भरलेले पॅटिस/ बेक्ड समोसा, मलाई ना खाजा (cream-filled phyllo), खारी, बटर बतासा, नानाविध प्रकारचे केक, रोटला नो मलीदो, कोपरा ना पॅनकेक, अनेक प्रकारचे सॅन्डविच असा साग्रसंगीत हाय टी प्रकार. नुसत्या चहाला बोलावले तर बावा घरात वरीलपैकी किमान पाच -सहा पदार्थ टेबलावर सुंदर क्रोकरीत मांडलेले असणार.

इराणी पारसी नववर्ष (जमशेद नवरोज़ - Spring Equinox) २१ मार्चला सुरु होते. थंडीचे दिवस संपून नवीन धान्य, फळे-फुले, भाज्या मिळायला सुरूवात होण्याचा, सृष्टीच्या नवसृजनाचा सोहळा. यादिवशीच्या मेजवानीला गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेले रोज मिल्क / फालूदा प्रमुख पाहुण्याच्या भूमिकेत दिसतो.

नवरोजसाठी सजवलेल्या टेबलावर अनेक प्रकारचा सुकामेवा आणि “स” / “श” अक्षराने सुरुवात होणाऱ्या शुभ वस्तूंची दाटी असते. शरबत, शकर (साखर), शीर (दूध), शेम (मेणबत्ती), शराब (मद्य), सिरका (व्हिनेगर), सिक्का (नाणे) सीब (सफरचंद) सुझान (सुईदोरा), सौजी (हिरवी पालेभाजी), सोपरा (table cloth) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शीशा (आरसा). आरश्यात स्वत:ला बघून आणि सीख कबाब + नान खाऊन, आणि पसंतीप्रमाणे शीर (रोज़ मिल्क) किंवा शराब चा घोट पिऊन नववर्षाची सुरुवात करणे असा मुख्य कार्यक्रम. (काही पारसी पंचांगांप्रमाणे नवरोज ऑगस्ट महिन्यात येतो. महिना वेगळा, बाकी सर्व सोहळा सेम टू सेम.)

पतेती म्हणजे सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. त्यादिवशी वर्षभरात झालेल्या चुकांची कबुली, क्षमाप्रार्थना आणि क्षमादान असा काहीसा reflective, sombre माहौल असतो. खाणेपिणे साधे. पतेतीच्या आधी तीन दिवस “खिचडी डिटॉक्स” ची गमतीशीर परंपरा काही कुटुंबात पाळतात. तीन दिवस मद्य, मीठ, साखर, मांसाहारापासून दूर राहून सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त सरबरीत खिचडी खाऊन पोटाला आराम देणे, स्वच्छता- system cleaning करणे हा वार्षिक कार्यक्रम. घरात मृत्यू झाला तर असेच त्रिदिवसीय खिचडी डिटॉक्स करतात.
नवसारी, संजान, उदवाडा ही गुजरातमधील गावे झोराष्ट्रियन पारसी समाजाची पुरातन काळापासूनची तीर्थस्थळे आहेत. मुंबईतल्या / भारतातल्या एकूण एक पारसी माणसाचा एकतरी नातेवाईक मूळचा इथला असतोच. शिवाय नवसारी “धरम नी टेकडी” तर उदवाडा- संजान “इरानशाही आतष” म्हणजे इराणहून आणलेल्या मूळ पवित्र अग्नीचे स्थान म्हणून परमपवित्र स्थळे मानली जातात. आयुष्यात एकदातरी या स्थानांना भेट देण्याची परंपरा आहे. या गावातून अजून काही जुने पारसी सण - परंपरा जिवंत आहेत. त्यात “ आवा महीनो / आवा रोज” ( birthday/ month of Water) अदर महीनो / अदर रोज ( birthday/ month of holy Fire) असे सण साजरे करतात, त्यासाठी विशिष्ट खाद्यपदार्थ तयार करणे आणि सर्वांनी एकत्र येऊन ते खाणे हा समान धागा. पैकी “बामन महीनो” किंवा “बामन रोज” साठी खिचडी महोत्सव होतो. लहान पारसी मुले दारोदारी जाऊन भिक्षा म्हणून खिचडीसाठी लागणारे जिन्नस गोळा करतात. त्यांच्या झोळीत ते देण्याआधी पाण्याच्या घाघरी मुलांवर ओतून त्यांना ओलेचिंब केले तर त्यावर्षी भरपूर पाऊस पडतो अशी श्रद्धा आहे. सर्वांकडून मिळालेला शिधा एकत्र करून खिचडी तयार करून भरपूर तूप टाकून खाणे हा सामुदायिक खिचडी महोत्सवाचा शेवट.
नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि गोडधोड नाही असे होऊच शकत नाही. मलीदो, बदाम पाक, अघारनी ना लाडवा, रावो, पर्शियन टूट, मावा केक, जर्दाळू+ बदाम केक, मकरून्स, कोपरापाक, लगन नू कस्टर्ड, मलाई ना पफ, दूध पफ, खजूर+ अक्रोड केक, दार नी पोरी, मदैरा, क्रीम शेरी, सुत्तरफेणी अशी अनेक पक्वान्ने हजर असतात.
मासळी झोराष्ट्रीयन पारसी परंपरेत शुभलक्षण आहे. पण मत्स्याहारावरचे प्रेम दर्शवण्यासाठी अट्टल मासेखाऊ पारसी बावा लोक नववर्षाच्या मेजवानीत शुद्ध शाकाहारी मासोळी खातात, खिलवतात !!!

बदाम नी बोई - माश्यांचा आकार दिलेली बदाम + दुधाची मिठाई.

बदाम नी बोई किंवा तिचे अन्य रूप मंगल प्रसंगाच्या पंक्तीला दिसतेच.
वरील वर्णन वाचून पारसी फूड खावेसे वाटले तर :
पारसी भोणू साठी मुंबईत सर्वांत जास्त पर्याय आहेत. इराणी-पारसी मालकीच्या शंभर वर्षापेक्षाही जुन्या बेकरीज आणि रेस्तराँ अजून मुंबईत आहेत. फोर्ट भागातली याझदानी, कॅफे मिलिटरी, ब्रिटानिया, कॅफे एक्ससेल्सिअर, जिमी बॉय ही काही जुनी नावे. कयानी एन्ड कंपनी (मरिन लाईन्स), Sassanian Cafe (मरिन लाईन्स), दादरचे कॅफे कॉलनी हे आहेतच. जालावर यांच्याबद्दल चांगले-वाईट रिव्ह्यूज आणि रील्स आहेत. सावधगिरीचा इशारा म्हणजे ही सर्व इराणी-पारसी रेस्तराँ चालक -मालक मंडळी सध्या ग्राहक, दर्जा आणि आपला पारसी ठसा टिकवण्यासाठी धडपडत आहेत. मुंबईतले एकापाठोपाठ एक इराणी-पारसी रेस्तराँ बंद पडत आहेत किंवा त्यांचे वेगाने उडपीकरण-पंजाबी ढाबाकरण होत आहे.
धनिक पारसीजनांचा आर्थिक आधार लाभलेले RTI चे पारसी किचन ( Hughes Road ) आणि दादरच्या पारसी कॉलनीतले पारसी कँटीन मात्र अजूनही चांगल्या प्रतीचे आणि authentic पारसी फूड ग्राहकांना देत आहेत, त्यांच्याकडे बघायला हरकत नाही. दर्जा, सेवा, चव, उत्तम अनुभवासाठी महालक्ष्मी रेसकोर्सचे Gallops पर्सनल फेवरेट, दर चढे. प्रसिद्ध पारसी डेअरीची मरीन लाइन्स आणि मुंबईत अन्यत्र असलेली outlets “छोटी भूक” भागवण्यासाठी + मिठायांसाठी योग्य. याव्यतिरिक्त पारसी नवरोज वगैरे प्रसंगी झोराष्ट्रियन मंडळांतर्फे आयोजित केलेले फूड फेस्टिवल एक चांगला पर्याय आहे. सी फूड वगळता अन्य प्रसिद्ध पारसी पदार्थांचे शाकाहारी व्हर्जन उपलब्ध असते. अंडेसुद्धा चालत नसले तर अजून कमी पर्याय असतात, पण असतात.

(उपलब्ध जिन्नस वापरून आज घरी केलेले poor man’s व्हेज धनशाक + पुलाव)
नवसारी, संजान, उदवाडा वगैरेला कुणी मुद्दाम भेट देण्याची शक्यता फारच कमी, म्हणून तिथल्या Eateries बद्दल लिहिले नाही.
लेखासाठी वापरलेले संदर्भ :
1} माझा बावा मित्र होमी, त्याची शेफ बहीण लैला, त्यांची आई, मावशी शिरीन भगवागर आणि तिची 'गर्ल गॅंग' (म्हाताऱ्या कोण म्हणतंय रे तिकडं?) यांच्याशी वेळोवेळी झालेल्या दीर्घ गप्पा
2} मुंबईतल्या आणि गुजरातमधील उदवाडा, संजान, नवसारी, खरच आणि भरूच या शहरातल्या ओळखीच्या / अनोळखी-अनाम पारसी स्त्रीपुरुषांनी वेळोवेळी भरभरून दिलेली माहिती
3} रतन टाटा इन्स्टिट्यूट (RTI) मुंबई, लेडी नवाजबाई टाटा ट्रस्ट, स्त्री झरतुष्टी मंडळ द्वारा संचालित किचनचा स्टाफ आणि शेफ, मुंबईत अजून तग धरून असलेल्या काही इराणी रेस्तराँचे मितभाषी/ खडूस मालक आणि त्यांचा बोलका स्टाफ यांच्याशी वेळोवेळी झालेल्या खाद्यचर्चा
4} बाई मेहेरबाई जमशेदजी वाडिया लिखित पारसी पाककृतींचे पुस्तक 'विविध वाणी' आणि त्यावर आधारित पाककृतींचे रीटाबेन चे पुस्तक + अन्यजणांचे लेख.
5} An Invitation to Feast: A Deep Dive into India’s Culinary Treasures’ हे सोना बहादूर यांचे पुस्तक.
6} स्वतःचे आणि मित्र-कुटुंब गोतावळ्याचे प्रत्यक्ष खाद्यानुभव + गिचिडमिचिड हस्ताक्षरात लिहिलेल्या स्वतःच्या नोट्स. Actually, पदार्थांची करेक्ट नावे / उच्चार चुकल्यास दोष देण्यासाठी तयार ठेवलेली दूरदर्शी व्यवस्था)
* * *
काही महत्वाचे :
हा लेख फक्त 'मायबोली' संस्थळासाठी लिहिला आहे, अन्यत्र कुठेही पूर्वप्रसिद्ध केलेला नाही. लेख किंवा लेखातील कोणताही भाग अन्यत्र वापरण्यास मनाई. लेखातली माहिती- उतारे जालावर, छापिल पानावर अन्यत्र दिसले तर कन्टेन्ट ढापनेवाले का मूं काला.
लेखातली काही चित्रे माझी तर काही जालावरून साभार.
मानव पृथ्वीकर आणि सिमरन या मायबोलीकरांनी दिलेले प्रोत्साहन खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेला हा लेख पूर्ण करण्यासाठी कारण ठरले, त्याबद्दल दोघांचे आभार. सुमारे ३००० शब्दांचा लेख बोअर झाल्यास ते न्यून मात्र माझे समजावे.
सुंदर आहे लेख नेहमीसारखा.
सुंदर आहे लेख नेहमीसारखा. तुमच्या लेखांमधून खूप माहिती मिळते.
वा! वा! पारसी फुड ही मुंबईची
वा! वा! पारसी फुड ही मुंबईची खास नजाकत आहे. त्याचा मस्त गोषवारा मांडलात तुम्ही.
जिमी बॉय तात्पुरतं बंद झाल्यामुळे पारसी जेवणाची भुक तुमच्या लेखावर भागवते. दादरच्या पारसी कॅंटीनला भेट द्यावी लागणार आता.
बाकी तुम्ही हुंझाच्या जर्दाळूंबाबत लिहिलं आहे. तेवढ्याच महत्वाचं म्हणजे इराणच्या झरेश्क बेरीज (बर्बेरीज्) . डाळिंबाच्या दाण्यापेक्षाही लहान या बेरीज् आणि लिमु उमानी किंवा ड्राय लिंबू ज्याची पावडर बेरी पुलावची जान आहेत.

मस्त झालाय लेख . तुमच्याकडे
मस्त झालाय लेख . तुमच्याकडे माहितीचं भांडार आहे.त्यातून माहिती मिळावी म्हणून हा अट्टाहास .
पारसी खाद्यसंस्कृती आणि त्यातील पदार्थांची नावे वर्णन याबद्दल परिपूर्ण नाही(कारण अजून माहिती येईलच)पण सर्वसमावेशक लेख झालाय.
लेख मोठा झाला तरी बोरिंग झाला नाहीये उलट भराभर वाचला आता परत एकदा पदार्थाची नावं नीट लिहून घेऊन परत एकदा शांतपणे वाचणार आहे.लेखातले फोटो तोंपासू आहेत.
फारच मस्त झाला आहे हा लेख.
फारच मस्त झाला आहे हा लेख. अतोनात माहीतीपूर्ण तसेच रोचक. वाचताना, अजिबात बोअर होत नाही. इन फॅक्ट रसाळ आणि सुरेख लिहीला आहे.
.... जस्ट किडिंग.
अनिंद्य माबोचा बार इतका वरती सेट केलात तर, इतरांनी काय लिहायचं
सुरेख जमलाय लेख !! नवीन खाद्य
सुरेख जमलाय लेख !! नवीन खाद्य पदार्थ आणि संस्कृती ची माहिती झाली.
खूप खूप आवडला लेख.
खूप खूप आवडला लेख.
एकदा माझ्याकडे पारशी ही थीम ठेवली होती मी मैत्रिणींना बोलावून. तेव्हा काही vej nonvej पारशी पदार्थ शोधून शोधून केले होते.
>>>>तेव्हा काही vej nonvej
>>>>तेव्हा काही vej nonvej पारशी पदार्थ शोधून शोधून केले होते.
कौतुकास्पद आहे.
खूपच छान झालाय लेख
खूपच छान झालाय लेख
नविन आणि रोचक माहिती
पुण्यात कुठे शोधू आता पारसी veg हॉटेल?
दोराबजी आठवले फक्त
वाडिया आणि टाटा -> आयुष्यातली महत्वपूर्ण पारसी नावं
बहिणीचा जन्म पतेतीचा.
पण पतेती म्हणजे काय आजच कळलं
तोंपासु लेख झाला आहे.
तोंपासु लेख झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी ठाण्यात इराणी कॅंटिन मध्ये समोसा, खिमा, चिकन कटलेट, कस्टर्ड असे काही पदार्थ चाखले होते. पण अस्सल/ ताजे असावेत असे नाही वाटले.... चवीला चांगले होते पण समाधान नाही वाटले. आणि नंतर पोटाला त्रासही झाला.
आता हा लेख वाचून rti मधे जाऊन खाल्ले पाहिजे असे वाटते.
धन्यवाद अनिंद्य.
फारच सुंदर, रोचक झाला आहे लेख
फारच सुंदर, रोचक झाला आहे लेख. केवढे तपशीलवार लिहिले आहेत तुम्ही. पारसी पदार्थ फार कधी खाण्यात आले नाहीयेत. लेख वाचून मात्र लगेच खावेसे वाटतं आहेत.
लेख वाचायच्या आधीच एक दाद
लेख वाचायच्या आधीच एक दाद द्यायची आहे. खादाडी आणि संस्कृती यांचा सुंदर मेळ घालणारा एक चिनूक्सच आहे मायबोलीवर असे वाटायचे. पण आता तुमची पण गणना त्यात करेन मी. आधी बंगभोज आणि आता पारसी खाना!
लेख सावकाशीने वाचेन.
वाह कमाल लेख झाला आहे.
वाह कमाल लेख झाला आहे.
पारशी खाद्यसंस्कृतीबाबत त्यांचे बेकरी आणि हॉटेल वगळता एवढी डिटेल माहिती नव्हती. पण माझ्या लहानपणी वडील नेहमी म्हणायचे की बेकरी पारशी बावाची असेल तर विश्वासाने काहीही घेऊ शकतो. मुंबईत तरी त्यांनी ते कमावले होते.
अनिंद्य नेहमीप्रमाणेच
अनिंद्य नेहमीप्रमाणेच संदर्भसंपृप्त रसाळ लेख. पारसी खाण्याबद्दल धनसाक या पदार्था व्यतिरिक्त कसलीही दुसरी माहिती नसल्यामुळे हा लेख म्हणजे खजानाच आहे.
तुमच्या लेखांचे लवकरच एक सुंदर पुस्तक येवो ही कामना
संपृक्त*
संपृक्त*
Happy Navroz عيد نوروز مبارك
Happy Navroz عيد نوروز مبارك (Eid-e-Navroz Mubarak)!
Happy New Year سال نو مبارک (Sal-e-No Mubarak)!
Jamshedi Navroz Mubarak!
अनिंद्यदा अतिशय सुरेख लेख.
पारशी समाज, त्यांचे रीतिरिवाज आणि भोजन पद्धती ह्या बद्दल नेहेमीच आकर्षण आणि उत्सुकता वाटत आली आहे. त्यांचे आधुनिक भारताच्या प्रगती मध्ये मोठे योगदान आहे ह्यात शंकाच नाही.
तुमचे खादाडीचे लेख आवडतात त्यामुळे और आंदो।
<<< तुमच्या लेखांचे लवकरच एक सुंदर पुस्तक येवो ही कामना >>> +१ असेच म्हणतो.
Happy Navroz عيد نوروز مبارك
संप्तृप्त*
भन्नाट लेख, नेहेमीप्रमाणे
भन्नाट लेख, नेहेमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि फोटोही सुरेख. अंडही न खाणाऱ्या माझ्यासारख्या शाकाहारीसाठी काही फार नाहीये मात्र. एकदा व्हेज धनशाक खायची इच्छा आहे.
अतिशय सुंदर, माहितीपूर्ण आणि
अतिशय सुंदर, माहितीपूर्ण आणि रोचक लेख.. पारसी बोलीत गुजराती का ह्याचा उलगडा आता झाला. आपला बंगाली संस्कृती आणि खाद्यपदार्थाचा लेख ही खूप आवडला होता. असेच अजून लेख वाचायला आवडतील..
सुरेख लेख.
सुरेख लेख.
तुमच्या लिखाणात एक मार्दव आहे.
दोन परिच्छेद वाचून झालेत आणि
दोन परिच्छेद वाचून झालेत आणि प्रतिक्रिया देणे मस्ट आहे असे वाटले.
अतिशय ओघवती भाषा, पुल यांच्या माझे खाद्यजीवन ची आठवण करून दिलीत. खूप नवीन गोष्टी कळल्या.
एखाद्या वृत्तपत्रात रविवार special पुरवणीत छापून यावा असा लेख आहे.
अर्धा वाचला. बाकी निवांत
अर्धा वाचला. बाकी निवांत वाचतो. खूप अभ्यासाअंती आलेले लेख अप्रतिम होतात त्याचा हा लेख एक वस्तूपाठ. वेगवेगळ्या माणसांत तुम्हीही साखरे सारखे मिसळता आणि त्यांचे रितीरिवाज आमच्या पर्यंत पोहोचवता. हे सर्वांना शक्य नाही होत. मुंबईत फोर्ट मध्ये जे. एन पीटीट लायब्ररी आहे ती पारशी लोक चालवतात. तिनशे पासष्ट दिवस उघडी.अगदी पतेतीलाही बंद नसते. मी तिचा काही वर्षं सदस्य होतो पण तिथं जाऊन फक्त पुस्तकं वाचली. जीवंत माणसं तशीच राहिली. विद्यापीठ लायब्ररीत एक पारशी मित्र होता मिनू पण तो जास्त बोलत नसे.
नवरोजसाठी सजवलेल्या टेबलावर
नवरोजसाठी सजवलेल्या टेबलावर अनेक प्रकारचा सुकामेवा आणि “स” / “श” अक्षराने सुरुवात होणाऱ्या शुभ वस्तूंची दाटी असते. शरबत, शकर (साखर), शीर (दूध), शेम (मेणबत्ती), शराब (मद्य), सिरका (व्हिनेगर), सिक्का (नाणे) सीब (सफरचंद) सुझान (सुईदोरा), सौजी (हिरवी पालेभाजी), सोपरा (table cloth) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शीशा (आरसा). आरश्यात स्वत:ला बघून आणि सीख कबाब + नान खाऊन, आणि पसंतीप्रमाणे शीर (रोज़ मिल्क) किंवा शराब चा घोट पिऊन नववर्षाची सुरुवात करणे असा मुख्य कार्यक्रम. >> Interesting!!!
पाहुणे म्हणून " श' ह्या अक्षराने नाव असणाऱ्या व्यक्तींना बोलावलं तर कधीतरी "सं"धी मिळण्याची " श"क्यता आहे.
अप्रतिम लेखन! फारच आवडला लेख.
अप्रतिम लेखन! फारच आवडला लेख. फोटोंनी सुद्धा बहार आणली आहे. साग्रसंगीत आणि सुग्रास जेवण आहे. तुमची शैली फारच प्रसन्न आणि मैत्रीपूर्ण आहे अनिंद्य.
जमशेद नवरोज़- Spring equinox च्या निमित्ताने एकदम समयोचित आणि सोहळ्याचा भाग होण्याची अनुभूती दिली लेखाने. तुमच्या पारशी आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा.
संदर्भ सुद्धा गमतीदार आणि अभ्यासपूर्ण आहेत. एंडू क्यूट वाटले. पतेती कालनिर्णय मधे अनेक वेळा वाचले होते, आता नेमकं कळालं काय असतं. पारशी खाद्यसंस्कृती रहावी, टिकावी हीच इच्छा आहे. अकूरी करून बघणार आहे आता.
प्रतिसादही छान येत आहेत.
मस्त माहितीपूर्ण झाला आहे लेख
मस्त माहितीपूर्ण झाला आहे लेख आणि फोटोंनी बहार आणली आहे.
… पाहुणे म्हणून " श' ह्या
… पाहुणे म्हणून " श' ह्या अक्षराने नाव असणाऱ्या व्यक्तींना….
हो हो, तुमचे नाव “शर्मिला” आहे ते लक्षात आले. 😀 तुम्हाला पारसी डेरी ची सुत्तरफेणी लागू !
BTW,
S (श / स) अक्षराने नाव सुरु होणारी माणसं एकजात
सरळ, सुंदर, सालस, समंजस, सद्गुणी, सदाचारी, सद्विचारी, सात्त्विक, सद्वर्तनी, सच्छील, सोज्वळ, सत्वशील,सत्यप्रिय, स्वयंभू, साहू, सजग, सभ्य, संभावित, सज्जन असतात असे ठाम मत आहे (नसून चालणार नाही, घरात श/स वाल्यांचे बहुमताचे सरकार आहे 😀 )
इथे छान प्रतिसाद आले, (लेखात
इथे छान प्रतिसाद आले, (लेखात दूध न वापरताही) चीज झाले. सर्वांचे आभार.
छान, रसाळ माहिती.
छान, रसाळ माहिती.
खूपच रंजक, माहितीपूर्ण आणि
खूपच रंजक, माहितीपूर्ण आणि जिवंत लेखन! वाचताना माझ्या तोंडाला पाणी सुटले. पारसी समाजाविषयी आपण सहसा ऐकतो ते म्हणजे त्यांची उद्योगशीलता, शिस्त, आणि मुंबईच्या घडणीतला वाटा. पण त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा इतका सखोल, रसाळ आणि तपशीलवार परिचय क्वचितच मिळतो. तुमच्या लेखातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की पारसी समुदायासाठी “अन्न” हे केवळ उदरभरण नाही, तर ओळख, आठवणी, आणि सामाजिक बंध यांचं केंद्र आहे.
“food nostalgia” हा मुद्दा खूप भावला. स्थलांतरित समाज आपली चव, परंपरा आणि स्मृती कशा जपतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
“धनशाक” किंवा “लगन नू भोणू” हे फक्त dishes नाहीत, तर सांस्कृतिक विधीच आहेत, हे तुम्ही अत्यंत प्रभावीपणे मांडलं आहे.
पारसी खाद्यसंस्कृतीसमोर उभे असलेले आव्हान म्हणजे कमी होत चाललेली लोकसंख्या, बदलणाऱ्या खाण्याच्या सवयी आणि बंद पडणारी जुनी रेस्टॉरंट्स हा मुद्दा विचार करायला लावणारा आहे. अशा लेखांमुळेच या परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचू शकतात, ही जाणीवही होते.
एकंदर, हा लेख केवळ खाद्यपरंपरेचा आढावा नाही, तर एका समृद्ध, वैशिष्ट्यपूर्ण समुदायाचा सांस्कृतिक दस्तऐवजच आहे.
लेख अतिशय आवडला. आणि मध्ये मध्ये दिलेले फोटो पाहून तोंपासु.
पारशी बेकरितल्या पदार्थाइतका
पारशी बेकरितल्या पदार्थाइतका खुसखुशित, लज्जतदार लेख झालाय..
आता शोधुन पारशी पदार्थ चाखायला हवेत..
रंजक झाला आहे लेख. पारशी सण,
रंजक झाला आहे लेख. पारशी सण, परंपरा आणि खाद्यपदार्थांची तपशीलवार वर्णनं फार आवडली.
@किल्ली,
पुण्यात विमाननगर भागात आणि कोरेगाव पार्क, कॅम्प वगैरे बाजूला काही पारशी रेस्टॉरंट आहेत. व्हेज पर्यायही आहेत त्यांच्या मेनुमध्ये.
बरेच पदार्थ रेसिप्या शोधून घरी करून पाहिले आहेत. रावो, मावा केक, धनशाक वगैरे.
घरी केलेलं व्हेज धनशाक + ब्राऊन राईस. यासाठी कुणीतरी मंगल ब्रँडचा धनशाक मसाला रेकमेंड केला होता. तोही 'दोराबजी'मधून आणला होता.
Pages