हॉरर म्हणजे काय ?
हा मला पडलेला प्रश्न. या प्रश्नाचा वेध घेता घेता मनाचे खेळ सुरू झाले. मनाच्या या खेळाचं निरीक्षण करायला मजा येते, नाहीतर भयंकर अस्वस्थ वाटतं कधी कधी. मनाचे खेळ कधी कसे चालतील सांगता येत नाही.
हेच तर आहे ना हॉरर ?
हॉरर या शब्दाचा मला कधी डिक्शनरीतला अर्थ माहीतच नव्हता. गंमत म्हणजे तो पहावा अशी कधी गरजच भासली नाही. भीतीदायक चित्रपट म्हणजे हॉरर असा समज मनात तयार झाला. याला रामसे बंधू जेव्हढे जबाबदार आहेत, त्यांचा झी हॉरर शो जबाबदार आहे तेव्हढेच एक्झॉरसिस्ट सारखे परदेशी सिनेमे पण. हॉररची व्याख्या काय ? ही उत्सुकता कधी निर्माण झालीच नाही. आता प्रश्न पडल्यावर धुंडाळले तेव्हां अशी व्याख्या मिळाली.
हॉररची व्याख्या
मूळ लॅटिन शब्द "horrere" म्हणजे अंगावर काटा येणे, शहारणे.
हॉरर ची आजची व्याख्या ( गाभा) - जे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, समजत नाही, आणि टाळता येत नाही , त्याची भीती.
भीती आणि Horror यात फरक आहे
भीती - तात्कालिक. समोर धोका आहे, दचकतो, निघून गेला की संपते.
Horror - दीर्घकालीन. धोका संपला तरी अस्वस्थता राहते. झोपेत येते, विसरता येत नाही.
म्हणजे भीती वाटली नाही तरी हॉरर असू शकतो.
हॉररचे तीन स्तर असतात असे Film theorist Noël Carroll म्हणतो. ( कोण बुवा हा नोएल कॅरल ? माहिती नाही खरंच. पण याचे म्हणणे आवडले, पटले. )
Art-Horror तीन गोष्टी एकत्र यायला हव्यात ( कॅरलच्या मते).
१. Threat काहीतरी धोकादायक आहे
२. Impurity - "ते" नसावे असे आहे , नैसर्गिक नियमाबाहेरचे.
३. Unknown - ते पूर्णपणे समजत नाही.
तिन्ही असतील तरच Horror , नाहीतर फक्त Thriller किंवा Suspense
आता आलेल्या मनपिशाच चे उदाहरण घेऊ. हा हॉरर आहे का ?
Threat - घुमट, गावातील विचित्र घटना , हो.
Impurity - मनपिशाच्च — नैसर्गिक नाही . हो
Unknown - नक्की काय आहे ते स्पष्ट नाही . हो
Carroll च्या व्याख्येनुसार , हो, Horror आहे.
आता कॅरलला बाजूला ठेवूयात. मूक संमतीने आपण ज्याला हॉरर म्हणतो किंवा जे चलनात आहे , रूढ आहे त्याप्रमाणे पाहूयात.
मनपिशाच हा विशिष्ट प्रकारचा हॉरर आहे.
Horror चे प्रकार आहेत
Jump Scare Horror — अचानक काहीतरी येते, दचकतो. बॉलीवूडी हॉरर. रामसेपट.
Gore Horror — रक्त, शरीर, हिंसा. Visceral भीती.
Psychological Horror — भीती बाहेर नाही, आत आहे. मनातून येते.
Folk Horror — स्थानिक लोककथा, परंपरा, अंधश्रद्धा यातून येणारी भीती. ( हा माझा आवडता प्रकार आहे).
हे फार अॅकेडेमिक होतंय, पण नाईलाजाने शाळा शिकावी लागते तसं आधी हे बघू तर खरं.
मनपिशाच कुठे बसतो?
शीर्षकच सांगतंय ना ? "मनपिशाच्च" - मनातील पिशाच्च. इथे माझ्याकडून च्च लिहीलं जातंय. हिंदी त फक्त च आहे. तेव्हां ही माझी मराठीपणाची चूक आहे असे समजून जा.
हा Psychological + Folk Horror च्या बिंदूवर आहे.
हडमगाव, घुमट, मान्सून, एकाकी अधिकारी , हे Folk Horror चे लक्षण आहे. तुंबाड याच वर्गात आहे.
पण "मन" हा शब्द सांगतो की भीती बाहेरून येत नाही, ती आतून उगवते. अर्थात चित्रपट बघताना ते कळतंय कि.
थोडक्यात , मनपिशाच्च हा "haunting" horror आहे. दचकवणारा नाही, आत घर करणारा.
अजून थोडं अॅकेडेमिक विश्लेषण करून पीडून घेतो. स्किप करू नका.
काही काही सिनेमे बघताना दचकायला होत नाही पण ताण दाटून राहतो. उदाहरणार्थ ओमेन हा सिनेमा. माझ्या मते हा हॉरर मधला सर्वात श्रेष्ठ सिनेमा आहे. किळसवाणी दृश्ये नाहीत, बीभत्स रस नाही, जंप स्केरी दृश्ये नाहीत. चित्रपटभर मनावर एक ताण राहतो. आधी पाहिलेल्या व्याख्यांनुसार याला हॉरर म्हणता येतं.
खूप हॉरर पाहिलेल्या माणसाला भीती वाटेनाशी होते , पण सिनेमातल्या पात्रांची भीती खरी वाटते. त्यांचं भय जाणवतं. पण स्वतः घाबरत नाही, दचकत नाही. म्हणजे त्याने भयाचा स्विकार केलेला असतो. भय आहे हे मान्य आहे पण भीती वाटत नाही.
पण कथेत भय आहे. ते अज्ञाताचे आहे. भयकथा म्हणजे भूतकथा नाही असं वाटू लागतं. भूत म्हणजेच हॉरर नाही हे समजलंय आता.
भयकथा / भूतकथा
भूतकथा - भूत आहे, ते दिसते, घाबरवते, संपते. यात स्पष्टीकरण असते.
भयकथा - काहीतरी आहे, ते काय आहे ते कळत नाही, संपतही नाही. यात अज्ञात असते.
भूतकथेत भय बाहेर असते.
भयकथेत भय आत असते किंवा सर्वत्र असते.
H.P. Lovecraft - Horror साहित्याचा मोठा लेखक, याने एक महत्त्वाचे विधान केले होते
मानवजातीची सर्वात जुनी आणि सर्वात तीव्र भावना म्हणजे भय आणि सर्वात तीव्र भय म्हणजे अज्ञाताचे भय.
भूत दिसले की ओळखीचे होते , मग भय कमी होते. जे कधीच दिसत नाही, समजत नाही ते जास्त भयावह असते.
म्हणजे H.P. Lovecraft च्या कथा वाचून पंडीत झालोय असा होरा बांधला असेल तर ,
आपल्याकडे गुगल नावाचं टूल जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण आईनस्टाईनला सुद्धा वादविवादात हरवू शकतो. फटाफट धर कि शोध आणि फेक एव्हढेच जमायला पाहीजे. मग धडाधड ते संदर्भ तोंडावर फेकले कि समोरचा गारच होतो. अरारारा .
मला मराठी सोडून इतर काही वाचायला जमत नाही. आणि कुणी दांडगे वाचणारे असेल कि त्याला लोळवण्यासाठी मराठी लेखक म्हणजे सुमार आयक्यू एव्हढे फेकले कि गार करता येते. समजा अडचणीत आलाच तर "मराठी लेखक सुमार आयक्यू" एव्हढे गुगल मधे टाईप केले कि एखादी लिंक मिळतेच. नाही तर फेसबुकच्या पण लिंका मिळतात. मग वाचायचं, अर्क काढायचा आपले दोन आणे जोडायचे आणि हाण कि बडीव.
हिंदी आणि इंग्रजी वाचायची सवयच नाही. तर कोण कशाला स्टीफन किंग वाचेन ? स्टिफन किंगच्या अनुवादीत कथा असत्या तर मराठीत वाचून इंग्रजी वाचलेय असा आव आणला असता. इंग्रजी सवयीचं नाहीच तर वाचायचा प्रयत्न केला तर जांभया यायला लागतात. कारण मराठीत आहेत ना पर्याय ? ते सवयीचे आहेत. जेम्स हेडले चेस वाचून होतं. कारण डोकं नाही लावायचं. आणि पोटापाण्याचं तर न वाचावंच लागतं. न वाचून कुणाला सांगणार.
पण हिंदी ? ज्याचं नाव ते. एक तर मराठी आणि हिंदी शब्द सारखे त्यात त्यांचे अर्थ वेगळे. उसने चेष्टा की या वाक्याने भंबेरीच उडते.
अवांतरासाठी क्षमस्व. पण जास्त गंभीर व्हायला लागलं कि थोड्या कुचाळक्या कराव्यात. एका भयकथेत नाही का वरातीच्या घोड्याचा विनोद टाकलाय. पण ताण कसा कमी होतो त्याने.
आपल्याला हॉरर हा प्रकार धारप, मतकरी आणि रामसेंमुळे माहिती झाला. त्यात गुगळच्या कृपेने धारपांनी किंगच्या कथा ढापल्या असा प्रचार सुरू झाला. मग काय ? सुतावरून स्वर्गाला जाणार्यांसाठी गुगलला चरकात पिळवटून हवी तीच माहिती काढणे अशक्य आहे का ?
गंमत अशी आहे कि नारायण धारप हे स्टीफन किंगच्या आधीपासून भयकथा लिहीतात. पण त्यांनी आपल्या मुलाखतीत प्रांजळपणे सांगितले आहे कि माझ्या काही कथांवर पाश्चात्य कथांचा प्रभाव आहे.
म्हणजे धारपांनी हॉररचा सिलॅबस समजून घेतलाय त्याला किंगच्या आधी २२ वर्षे झाली.
अचूक सांगायचे तर,
गृहलक्ष्मीच्या संदर्भानुसार धारपांनी १९५१ मधे लिखाण सुरू केले. ( ते कोणत्या प्रकारचे हे सांगता येत नाही).
स्टीफन किंग यांनी १९७४ साली लिखाण सुरू केले. म्हणजे २३ वर्षे नंतर. अजून एक वर्ष वाढलं.
किंग हे ८०० ते १२०० पानांच्या कथा लिहीत तर धारप हे दीर्घकथा किंवा लघु काधंबरी लिहीत.
त्यांचा बेस अमेरिकन ग्रामीण होता. धारपांचा कोकणी किंवा महाराष्ट्रातला ग्रामीण. पण अस्सल.
दोघांच्या कथांची जातकुळी बघितली तर किंग कॉस्मिक + मानसशास्त्रीय लिहीत तर धारप लोककथा + अमानवीय असे मिश्रण करत.
आता पुन्हा अॅकेडेमिक कडे वळू. मागच्या परिच्छेदात कॉस्मिक किंवा अन्य असे शब्द आले ते जातकुळी सांगणारे.
Cosmic Horror - Lovecraft चा प्रकार. विश्व आपल्याला समजत नाही, आपण किरकोळ आहोत, या जाणिवेतून येणारे भय.
Dread - भीती नाही, पण एक जड, ऑप्रेसिव्ह अस्वस्थता. येणारे संकट दिसत नाही पण जाणवते. ( ओमेन).
Existential Horror - माझे अस्तित्व, माझी ओळख, माझे मन यावरच प्रश्नचिन्ह येते तेव्हा.
मनपिशाच्च या तिसऱ्या प्रकाराकडे झुकतो. मनातील पिशाच्च म्हणजे स्वतःच्या मनाची भीती.
या Lovecraft च्या नावात लव्ह आहे आणि गडी हॉरर लिहीतो, त्यामुळं त्याचं देवनागरीत नाव लिहीणं पण कठीण आहे.
मराठी साहित्यात नारायण धारप भूतकथा लिहित, पण त्यातही अज्ञाताचे भय होते. त्यांच्या कथांमध्ये भूत दिसते, पण का आले, कुठून आले हे कधीच पूर्ण कळत नाही. ती अपूर्णता जास्त भयावह असतो. म्हणून धारप, मतकरी इतरांपेक्षा वेगळे ठरतात. खरेतर धारपांच्या अनेक कथात "भूत आले" असं कधीही वाचनात आलेलं नाही.
"त्या अवकाशात काही तरी आले होते. खोलीतल्या त्या अवकाशातले कण जड भाराने भारलेले होते. कदाचित एखादे अस्तित्व तिथे आले असावे."
हे असे लिहीलेले असायचे. याची भीती प्रचंड वाटायची. मग हे सुद्धा ओळखीचं झालं आणि त्याची भीती वाटेनाशी झाली.
धारप आवडणारे जे कुणी असतील त्यांनी भीतीचं एव्हरेस्ट आधीच गाठलेलं आहे, ते कशाला घाबरणार ? त्यांची भीती संपलेली आहे. त्यांना घाबरवणारा आता कुणीही माई का लाल नाही.
भूतकथा दचकवते. भयकथा त्रासवते ,आतून, हळूहळू.
मग धारपांनी प्रेरणा घेतली हे कुठून आले ? कुठूनच नाही. वर लिहीलेय ते नेटवर दावे आहेत. तो उल्लेख मुद्दाम केला.
किंग आणि धारप - प्रेरणा होती का? थेट पुरावा नाही. धारपांनी किंगकडून कडून प्रेरणा घेतली असे लिखित विधान मला माहीत नाही. पण ,
दोघे समकालीन आहेत किंग चे पहिले पुस्तक १९७४, धारपांचे लेखन त्याच काळात झाले.
दोघांच्या लेखनात Cosmic Horror + Folk Horror ( लोक -भय - कथा ) चे मिश्रण आहे
दोघांमध्ये सामान्य माणूस असामान्य परिस्थितीत हा समान धागा आहे
धारपांनी पाश्चात्य भयकथा वाचल्या होत्या हे त्यांच्या मुलाखतींमध्ये आहे
किंग चा थेट प्रभाव होता की नाही हे निश्चित सांगणे कठीण आहे.
माय महानगरने असा दावा केला आहे कि धारपांनी असे सांगितलेय कि त्यांच्या काही कथांची बीजे ही परकीय कथांत आहेत. बीज असणे आणि कथा उचलणे यात फरक आहे. प्रेरणा घेतली म्हणणे आणखी निराळे.
किंगच्या कथा अमूक तमूक, त्याच्या कथांचे संदर्भ देणारे सांगतात कि हॉरर मधे अमूक तमूक इलेमेण्ट्स यायला हवेत.
तर मग किंगची एखादी सहज वाचून होणारी छोटी कथा बघू. इथे एव्हढीच देईन कि मायबोलीला कॉपीराईटचा त्रास होणार नाही. कथासार देणे हे कायद्यात बसणारे आहे हे मी चेक केले आहे.
किंगची एक कथा आहे "The Man in the Black Suit" ( १९९४ )
आधी हीच का निवडली हे सांगतो. एक तर अशा प्रकारांमधल्या दीर्घ कथा मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषेतून वाचणे माझ्यासाठी कष्टाचे आहे. त्यातून त्यांची उपलब्धता. छोट्या कथा कधी कधी मिळून जातात ( कुठे ते नाही सांगता येणार).
ही किंग ची "ओ हेन्री" पुरस्कार विजेती कथा आहे . ( किंग च्या मते स्वतःच्या सर्वोत्तम कथांपैकी एक. )
का निवडली ?
छोटी आहे / भूत नाही, पण भय आहे / अज्ञाताचे भय आहे /शेवट अपूर्ण आहे जे जास्त भयावह आहे आणि सर्वात महत्वाचं.
धारपांच्या शैलीशी जवळची आहे .
काळ्या सुटातला माणूस
The Man in the Black Suit : Stephen King, 1994
गॅरी आता म्हातारा झाला आहे. नव्वदीच्या जवळ. रोज डायरी लिहितो . कारण विसरण्याची भीती आहे. पण एक गोष्ट तो कधीच विसरला नाही. ती त्याने आजपर्यंत कुणाला सांगितली नाही. आता सांगतो, कारण मरण जवळ आले की सत्य बाहेर यायला लागते.
गॅरी तेव्हा नऊ वर्षांचा होता.
त्याचा मोठा भाऊ नुकताच मधमाशीच्या डंखाने ( दंशाने ) मेला होता. घरात दुःख होते, श्वास घुसमटत होता. एके दिवशी गॅरी एकटाच जंगलातल्या ओढ्यावर मासेमारीसाठी गेला.
ओढा शांत होता. पक्ष्यांचे आवाज होते. सगळे ठीक होते.
मग "तो" आला.
काळ्या सुटातला माणूस.
जंगलात. उन्हाळ्यात. काळा सूट. (उन्हात कोण घालतं काळा सूट , ते ही जंगलात ?)
कुठून आला ? कळले नाही. अचानकच होता.
उंच होता. असामान्य उंच. चेहरा फिकट, जवळजवळ पांढरा.
आणि डोळे ? ते केशरी होते. माशासारखे. आतून जळत असल्यासारखे.
हसला. दात दिसले.
गॅरीला पळायचे होते. पाय हलले नाहीत.
तो माणूस बोलला. आवाज सामान्य होता. हेच जास्त भयावह होते.
त्याने सांगितले "तुझी आई मेली. घरी जा. "
गॅरी ओरडला "खोटे आहे."
माणूस परत हसला. म्हणाला , " मधमाशी चावली तिला . तुझ्या भावाला चावली ना तशीच. "
मग जवळ आला. गॅरीच्या चेहऱ्याजवळ वाकला. श्वास घेतला. माणसाचा वास घेतल्यासारखा.
म्हणाला , "तू एकटा आहेस. नेहमीच राहशील. "
मग एक गोष्ट झाली.
ओढ्याकाठी एक मासा होता. गॅरीने आधी पकडलेला, गवतात ठेवलेला. माणूस खाली वाकला . तो मासा कच्चाच खाल्ला. संपूर्ण. हाडांसकट.
आणि हसला.
गॅरी पळाला. जमेल तेवढ्या वेगाने. एकदाही मागे वळला नाही.
घरी पोहोचला.
आई जिवंत होती.
पण.
त्या रात्री गॅरीने विचारले नाही. तो माणूस कोण होता. विचारले नाही . तो खोटे का बोलला. कारण एक प्रश्न जास्त भयावह होता .
तो माणूस तिथे का होता?
जंगलात. ओढ्याकाठी. नऊ वर्षांच्या एकट्या मुलाजवळ.
त्याला काय हवे होते?
गॅरी आता म्हातारा आहे. रात्री नीट झोपत नाही. खिडकीबाहेर बघतो.
जंगल दिसते.
अंधारात कधीकधी काळा रंग हलतो.
डोळे केशरी असतात का हे तपासायला तो खिडकीजवळ जात नाही.
डायरी इथेच संपते.
तो माणूस काय होता हे किंग कधीच सांगत नाही. सैतान होता का ? मृत्यू होता का ? भास होता का ? उत्तर नाही.
अज्ञात तसेच राहते. हेच या कथेचे हृदय आहे आणि हेच धारपांच्या सर्वोत्तम कथांमध्येही आहे.
अजून शोधा शोध केली.
व्याख्या बदलायला लागल्या. त्यांचा कंटाळा येऊ लागला.
थोडक्यात काय ? प्रत्येक जण हॉररची आपली एक व्याख्या करू बघतो. पण या सर्वांची दखल घ्यायची गरज आहे का ?
आपला भीतीचा पिंड हा गावच्या कथांवर पोसला गेलाय.
आमच्या गावातल्या घरातून एक वडाचं झाड दिसायचं. त्याला भरपूर पारंब्या होत्या. तिथे वडाची कॉलनीच झाली होती. त्यातला सर्वात अलिकडचा वड आमच्या घराकडे झुकला होता. घरापासून पन्नास पावलावर होता.
त्या वडावर बसून खाली पाय सोडलेली बाई आजीला दिसली.
तिने मग पडवीला भिंत बांधून घेतली. तेव्हांपासून ते झाड मागच्या पडवीतून दिसेनासे झाले.
पुढच्या अंगणात बसून मग भूताचा विषय निघाला कि रात्र कधी सरायची समजायचं नाही. या लोककथा किंवा फोक अजरामर आहेत. ही आपली पहिली ओळख,,
आता किती अॅकेडेमिक होत गेलंय.
साधं घाबरायचं काम होतं पण ना !
लोक छडी घेऊन शिकवायलाच लागतात आणि हेच ऐका नाहीतर तुम्ही नापास विद्यार्थी म्हणतात. काय करायचं.
गुगलचा जमाना आहे. त्याचंच हॉरर आहे.
अजून ए आय आहेच !
छान विश्लेषण, छान मांडणी.
छान विश्लेषण, छान मांडणी.
पण माझ्यासाठी हॉरर म्हणजे अजूनही ‘दूरूनच नमस्कार’ करायचा प्रकार .
हॉररची ‘अज्ञात + नियंत्रणाबाहेर + न सुटणारी अस्वस्थता’ ही व्याख्या पटली. विशेषतः भीती आणि horror मधला फरक छान स्पष्ट केलात.
पण वैयक्तिक पातळीवर मला असं वाटतं की हा ‘psychological’ भागच जास्त प्रभावी कारण तो बाहेरच्या घटनेपेक्षा आपल्या मनाच्या प्रतिसादात असतो. त्यामुळे horror हा प्रकार माध्यमापुरता मर्यादित राहत नाही, तो अनुभव बनतो.
कदाचित म्हणूनच हा genre काही जणांना खूप आकर्षित करतो आणि काही जण जाणीवपूर्वक टाळतात. (माझ्यासारखे)
*...बाहेरच्या घटनेपेक्षा
छान विश्लेषण !
*...बाहेरच्या घटनेपेक्षा आपल्या मनाच्या प्रतिसादात असतो. * +१ व म्हणूनच तो व्यक्तिनिष्ठही ( subjective) असावा. उदा. पाण्याची भीती असलेल्या व्यक्तीला भर समुद्रात जहाजावर चित्रीत केलेला 'सस्पेन्स थ्रिलर ' सुद्धा ' हॉरर ' वाटू शकतो .
विश्लेषण आवडले.
विश्लेषण आवडले.
स्टीफन किंगची १९२२ ही माझी सर्वात आवडती हॉरर स्टोरी आहे. दरवर्षी एकदा तरी वाचणे होतेच आणि प्रत्येक वेळेस भीती, दुःख सगळेच होते.
क्लाइव्ह बार्करची बुक्स ऑफ ब्लड कथामलिका सुद्धा छान आहे. त्यात गोअर, रक्तपात जरा जास्तच आहे पण गोष्टी भीतीदायक आहेत.
बोअरिंग लेख आहे त्यामुळे
बोअरिंग लेख आहे त्यामुळे वाचला नाही. न वाचताच बोअर करणारे लेख रेअर असतात. कशाची कशाला संगती नाही. Prompt डदेता येतो म्हणून लेख पाडत बसायचे.
दक्षिणा >>> माझ्यासाठी हॉरर
दक्षिणा >>> माझ्यासाठी हॉरर म्हणजे अजूनही ‘दूरूनच नमस्कार’ करायचा प्रकार
अशांना घाबरवायला जास्त मजा येते. धन्यवाद वाचल्यासाठी आणि आवर्जून प्रतिसादासाठी.
पाण्याची भीती असलेल्या व्यक्तीला भर समुद्रात जहाजावर चित्रीत केलेला 'सस्पेन्स थ्रिलर ' सुद्धा ' हॉरर ' वाटू शकतो >>> अगदी अगदी.
कॉमी , तुमच्या छोटेखानी प्रतिक्रिया या भल्या मोठ्या विश्लेषणापेक्षा तिखट असतात. विशेषतः पुस्तके आणि चित्रपटांबद्दल. दर्दी , जाणकार आहात हे समजते. धन्यवाद.
एक बुडाला आग लागलेलं मिसाईल इकडे का भिरभिरतंय
ही कथा कधीच वाचली गेली नसती.
ही कथा कधीच वाचली गेली नसती. इथे दिल्याबद्दल आभार. लेख आवडला. सुरुवात व शेवट.
हॉरर चा मला नीट अनुभव आहे.
.
अगदी लहानपणी (७ वी त), आम्हाला शाळेत, साबण करण्याची प्रयोगशाळा होती. तेव्हा बाईंनी साहित्य आणायला आम्हाला तीघींना पिटाळले. पैकी त्या आयुर्वेदिक दुकानातील दुकानदार विकृत होता व मला ते लक्षात आलेले होते. अंतर ठेवण्याव्यतिरिक्त करण्यासारखे काय असते ते माहीत नव्हते. आम्ही तिघी सुखरुप, खरेदी करुन बाहेर पडलो परंतु ..... ते हॉरर होते.
.
आजारपणात स्वप्नात एक भिकारी व अवलक्षणी बाई येई व माझ्याकरता थांबुन राही. मुख्य म्हणजे तिच्यात व माझ्यात दिसण्यात, साम्य होते. तिला मी म्हणे कधीतरी वचन दिलेले भेटायचे व तिच्याबरोबर जायचे. ही अवदसा , अशुभ बाई कोण व का येई आजतागायत कळलेले नाही. मनाचे खेळ असतीलही परंतु त्या काळात, नक्की गंडांतर होते. मरण्याची दाट शक्यता होती.
मात्र त्यातुन मी देवाचे खूप करु लागले.
लेख खूपच रटाळ झाला आहे...
लेख खूपच रटाळ झाला आहे...
स्पार्क, साधा माणुस, रॉय,
स्पार्क, साधा माणुस, रॉय, च्रप्स, भास्कराचार्य आणि धनी यांनी एकच प्रतिक्रिया वेगवेगळ्या वेळी दिल्या तरी स्वागतच
धनी तर शिव्या दिल्यात असेही म्हणू शकेल.