गेल्या महिन्यात विज्ञान प्रदर्शनात प्रिया आणि राहुलच्या टीमला दुसरा क्रमांक मिळाल्यामुळे सगळ्या कॉलेजात त्या दोघांना नवी ओळख मिळाली होती.त्या दोघांचे वैज्ञानिक प्रयोगही इतरांपेक्षा फार वेगळे आणि सर्जनशील होते. तशी आजवर त्यांची असलेली तोंडओळख आता घट्ट मैत्रीच्या धाग्यात गुंफत चालली होती. राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी असेच नवीन प्रयोग सादर करावेत यासाठी कॉलेज प्रशासनातर्फे त्यांना हवे ते साहित्य आणि पाहिजे तेव्हा प्रयोगशाळा उपलब्ध होऊ लागली होती. प्रयोगांच्या निमित्ताने प्रिया आणि राहुल दिवसातला बराच वेळ एकत्र घालवू लागले. पुढे मास्टर्स करून इस्त्रो किंवा डी. आर. डी. ओ. मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करायचे असा त्यांचा विचार होता त्यासाठी असणाऱ्या पूर्वपरीक्षांची तयारीही दोघांनी सुरु केली होती. वैज्ञानिक प्रयोगांचा अभ्यास आणि सराव तसेच इतर अभ्यास एकत्र करता करता त्यांना एकेमेकांबद्दल प्रेम वाटू लागले होते. बोलता बोलता अनेक विषयांबरोबर प्रेम या गोष्टीचीही त्यांच्यात चर्चा व्हायची मात्र स्वत:चे प्रेम व्यक्त करण्याचे धाडस अजूनही त्या दोघांमध्ये आले नव्हते. कायम एकाच गाडीवर फिरणाऱ्या त्या दोघांना बघून कॉलेजचे इतर विद्यार्थी यांना प्रेमी युगुल म्हणूनच बघायचे ती गोष्ट वेगळी.
म्हणता म्हणता कॉलेजची शेवटची दोन महिने राहिली होती. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या विज्ञान प्रदर्शनात एस पी कॉलेजला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले तरी त्यांच्या प्रयोगाचे बऱ्याच शात्रज्ञाकडून तोंडभरुन कौतूक झाले होते. पुण्यातील एका एअरक्राप्ट डिझाईन कंपनीने तर त्यांना टेम्पररी जॉब ऑफर लेटरही दिले होते. त्याबाबत त्यांनी अजून काहीच ठरवले नव्हते. दोन महिन्यावर कॉलेजची शेवटची परीक्षा संपेल आणि आयुष्याची परीक्षा चालू होईल याची जाणीव दोघांनाही होती.असे असले तरीही प्रेमाची कबुली द्यायची ही योग्य वेळ आहे का? हा प्रश्न राहूनराहून दोघांनाही पडत होता. हळूहळू राहुलचे लक्ष पुस्तकातून उडू लागले. आता अजून थांबून चालणार नाही असा त्याने मनोमन विचार केला.दोन दिवसानंतर जाणाऱ्या कॉलेज ट्रीपला प्रियाला मनातले सगळे सांगून टाकावे असा निर्धार करत तो त्या रात्री झोपला.
शनिवारी ठीक सहा वाजता कॉलेज परीसरातून ताम्हीनी घाटातून कोकणात निघालेले ट्रीपमधील चाळीस विद्यार्थी, दोन शिक्षिका, तीन शिक्षक आणि आरामदायी बस आता झाडे मागे टाकत वाऱ्याशी बोलू लागली होती. प्रिया आणि राहूल ठरवून शेजारी बसले असले तरी रोजच्यासारखे ते मनमोकळे बोलत नाहीत हे त्यांच्या मित्रमंडळींना जाणवले होते. राहुलच्या फूटकळ विनोदावर प्रियाचे कॄत्रिम हसणे राहुलला जाणवत होते.
" ऐ राहुल्या, ये मागच्या शीटवर" सुरज्याने मागून हाक दिली होती.
" मी आलोच" असं प्रियाला सांगून मागच्या सीटवर आला आणि इतर मित्रांबरोबर गप्पा मारु लागला तेवढ्यात प्रियाची खास मैत्रीण गार्गी तिच्या शेजारी येऊन बसली. तिथे राहुल परत येऊन बसावा असे प्रियाला वाटत असले तरी गार्गीला तसे सांगणे तिला योग्य वाटले नाही. तसेही गार्गीच्या दॄष्टीने अजूनही प्रिया आणि राहुल यांच्यामध्ये फक्त मैत्रीचे नाते होते आणि तिचा दृष्टीकोन तसाच राहण्यासाठी तिला काहीही न बोलणे बरे होते.
राहुलने हा सर्व प्रकार दुरून हेरला आणि तो जरा उदास झाला. सकाळपासूनच प्रियाला काय सांगायचे, कुठून सुरुवात करायची, कुठे थांबायचे याचा अनेकदा विचार त्याने केला होता, त्यासाठी त्याला प्रियाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता. नेहमी मस्ती करणाऱ्या राहुलची प्रश्नार्थक नजर आज काहीतरी गंभीर वळणावर मुक्कामाला जाणार आहे याची कल्पना प्रियालाही आली होती. कॉलेजनंतरचे करीअर, घरातील जबाबदारी आणि राहुलवर जडलेले प्रेम, त्यात जातीपातीची तथागद दरी या साऱ्या विचारात प्रिया पुरती गोंधळून गेली होती. आता जे समोर येईल ते बघू असेच काहीतरी तिच्या डोक्यात राहिले होते. दापोलीपर्यंत प्रवासात कार्ल्याची लेणी आणि स्तूप बघत बराच वेळ निघून गेला.दुपारचे जेवण बऱ्यापैकी उशीराने झाल्याने रात्री कुणाला फारशी भूक लागणार नव्हती. दिवभराच्या प्रवासात प्रियाबरोबर एकांतात बोलण्याची संधी न मिळाल्याने रात्री दापोलीला पोहचल्यावर राहुल थेट॑ प्रियाजवळ गेला.
"मला महत्त्वाचे बोलायचे आहे, तू बनकर मॅडमची परवानगी घेऊन ये आपण शेजारच्या तळ्यावर जाऊ"
" हं" यापलिकडे तिला काहीच बोलायचे सुचले नाही तसे गार्गीने डोळे मोठे केले.
"हं काय हं, जरा बाहेर बघ, अंधार पडला आहे.आता अजिबात कुठे जाऊ नकोस"
"आणि तुला काय हीच वेळ मिळाली का रे, उद्या बोल काय ते, नाहीतर बोल की इथेच लगेच...
तळ्यावर कुठले वैज्ञानिक प्रयोग करायचे आहेत का?'
राहुलला गार्गीचा जरा राग आला होता.
"तू तुझ बघ, चोंबडेपणा करु नको,
प्रिया मी ठीक साडे नऊ वाजता लॉबीमध्ये वाट पाहत असेल, प्लीज ये"
राहुल क्षणभरही तिथे थांबला नाही, तो मुलांची व्यवस्था असलेल्या निवासी खोल्यांकडे गेला.
गार्गीने राहिलेले बोल प्रियाला लावले "प्रिया, मला त्याची लक्षणे ठीक दिसत नाहीत, तू काय त्याच्या प्रेमाबिमात तर पडली नाही ना?... जाणार आहेस का त्याच्याबरोबर तळ्यावर?"
प्रियाने काही न बोलता आपल्या दोन्ही ओठांना दाबत आणि डोळ्यांची बुबुळे कपाळाच्या दिशेने उंचावत होकारार्थी मान डोलावली
"म्हणजे कॉलेजच्या मुली म्हणत होत्या ते खरे आहे तर, कर तुला काय करायचे ते, मला तर बाई पटत नाही तू जे काही करते आहेस ते."
प्रिया मागे फिरायला तयार नव्हती. राहुल बनकर बाईंना आधीच भेटला होता. प्रियाला परवानगी द्या, फार लांब जाणार नाही, अकराच्या आत आणून सोडतो असे अश्वासनही दिले होते.राहुलला चांगले ओळखत असल्याने बनकर बाईंनी प्रियाला बाहेर जाण्याची परवानगी दिली. साधारण पावने दहाच्या सुमारास प्रिया आणि राहुल शेजारच्या तळ्यावर चालत पोहचले.
अष्टमीचा चंद्र आकाशात डोकावून बराच वेळ झाला असावा. पुण्या मुंबईसारखे प्रदुषण नसल्याने आकाशात पसरलेले पीठूर चांदणे उघड्या डोळ्यांना स्पष्ट दिसत होते. लपलेल्या निरागस अल्लड मुलीप्रमाणे काही तारका मध्येच डोकं वर काढून लुकलुकत होत्या. 'इथे बसुया' असे राहुलने हाताच्या इशाऱ्याने प्रियाला सांगितले होते. काही काळ गंभीर शांतता पसरली होती.
"प्रिया तुला इथे का बोलाविले ते कदाचित तुला कळाले असेल ना"
"हो, कळाले आहे, पण मी तुला ऐकायला इथे आले आहे"
"आपल्या प्रयोगांच्या सरावात मला तू आवडू लागली होती,त्यानंतर अनेक कार्यक्रमात आपण एकत्र सहभागी होतो त्यातून तर तुझ्याबरोबर प्रेमाचा नाजुक धागा बांधल्यासारखे वाटत आहे. तुझ्या मनातील खूप गोष्टी मला समजतात पण मला तुझ्याकडून स्पष्ट होकार हवा आहे"
राहुलने एक दीर्घ श्वास घेतला एव्हाना त्याचा घसा कोरडा पडला होता.
प्रियाने आकाशात नजर टाकली लुकलुकणाऱ्या चांदण्या आता तिला दिसत नसल्या तरी आकाशगंगेचा एक कोपरा तिच्याकडे पाहून हसल्यासारखा तिला वाटत होता.अचानक तिचा ऊर भरुन आला, पाणावलेल्या डोळ्यांनी समोरच्या तळ्यावर तिची नजर पडली. नभावर स्पष्ट दिसणारे चांदणे पाण्यावर मात्र तुकड्यात विखरत होते. तिला तो तरंगात हरवलेला चांदणचुरा तिच्यासारखाच धीरगंभीर वाटत होता. तिच्या तोंडातून अजूनही शब्द फूटत नव्हता.हलकेच तिने राहुलच्या खांद्यावर डोके ठेवले आणि जोरदार उसासा घेऊन तिने राहुलला घट्ट मिठी मारली.
"प्रेम तर आहेच रे वेड्या, पण पुढे काय ?' तिच्या प्रश्नाने राहुल गडबडला
"म्हणजे"
"अरे...म्हणजे आपली स्वप्ने.. करीअर.... पुढे जाऊन आपण एकत्र येण्याला होणारा विरोध..."
"ते मला माहीत नाही. समोरचा चांदणचुडा कितीही विखुरलेला दिसत असला तरी ते प्रतिबिंब आहे, खरे चांदणे बघ ते तिथे आकाशात आपल्यासरखेच ताऱ्यांना घट्ट बिलगले आहे....आणि प्रेम करुन करिअर होत नसते का? सगळे काही शक्य असते. नसले तरी आपण ते शक्य करु. तुझा विश्वास तर आहे ना माझ्यावर"
प्रिया राहुलच्या कानाजवळ जाऊन हळू हळू बोलू लागली
" विश्वास ........आता माझ्यावरही नाही इतका तुझ्यावर आहे ..... "
"जणू मी या चांदणचुऱ्याप्रमाणे तुकड्यात विखरुन पडली आहे.....
हे अनोळखी तरंग शांत होऊन पाणी संथ होण्याच्या दीर्घ प्रतीक्षेत...."
"पुन्हा एकदा तू दिलेल्या खऱ्याखुऱ्या चांदव्याला घट्ट बिलगण्यासाठीच"
अकरा वाजत आले तसे राहुलने प्रियाला ती जागेपणी पाहत असलेल्या स्वप्नातून जागे केले. दोघेही त्याच्या त्या दिवशीच्या निवासस्थानी पोहचले आणि रात्रभर भविष्याची स्वप्ने रंगवू लागले. राहुलला साऱ्या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी त्या इतक्या सहज शक्य होणाऱ्या नाहीत याची प्रियाला जाणीव होती.
पुढचे दोन महिने म्हणता म्हणता निघून गेले. एव्हाना त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा जोरात चालू झाली होती.राहुलने प्रियाला दोन तीन वेळा तिच्या बंगल्यावर सोडले तेव्हा तिला घरुन राहुलबद्दल विचारणा झाली होती. मित्र आहे म्हणून तिने तात्पुरती वेळ मारुन नेली खरी पण लवकरच तिच्या पालकांच्या कानावर अनेक गोष्टी पोहचल्या होत्या. ऐन परीक्षेच्या काळात हे सारे घडल्याने घरातील वातावरण गंभीर झाले होते. पेशाने प्राध्यापक असणारे प्रियाचे वडील केवळ परीक्षेमुळे शांत होते. शेवटचा पेपर झाला तसा प्रियाची खरी प्रेमपरीक्षा सुरु झाली.
" भावी शास्त्रज्ञ असणाऱ्या आपल्या लेकीबद्दल लोकांकडून बरे वाईट ऐकणारे आपण दुर्दैवी पालक आहोत"
प्रियाच्या वडीलांनी प्रियाच्या आईला बोललेले हे वाक्य प्रियाच्या जिव्हारी लागले होते.
" राहुल चांगला मुलगा आहे पप्पा, तुम्ही एकदा त्याला भेटून तर बघा ना"
"अगं पण सगळ्या कॉलेजमध्ये तुला तोच सापडला का, किमान बघावे तरी त्याचे खानदान कुठले, कुठे राहतो, त्याचे आई वडील..."
प्रियाने आईला मध्येच थांबविले "अगं आई माणूस महत्वाचा की त्याचे खानदान, आई वडील काहीही काय .. आणि असे ठरवून प्रेम होत असते का?"
प्रियाची आई मात्र संतापली
" चांगले मागच्या वर्षी मी इंजिनिअर पोराचे स्थळ आणले होते तर हिला अजून खूप शिकायचे होते आता लगेच संसाराची स्वप्ने पडायला लागली कशी. ते काही नाही मला हे मान्य नाही तुझे लग्न आपल्या कुवतीच्या घरातच होईल. कुणीही ऐरागैरा मला चालणार नाही... तुम्ही ताकीद द्या हो हीला" तिने प्रियाच्या पप्पांवर फर्मान सोडले होते.
एरवी तसेही घरात काही न चालणाऱ्या प्राध्यापकांना तसा दूसरा पर्याय नव्हाता. प्राध्यापक असूनही समता वगैरे हे पुस्तकात ठीक आहे. आंतरजातीय लग्न हवे कशाला असाच विचार त्यांनी केला होता. आठवडाभर प्रियाने घरात आदळाआपट करत धरलेला हट्ट तसा काही कामाला आला नव्हता. राहुल प्राध्यापकांना भेटला खरा पण त्याच्या पदरी निराशाच पडली होती. प्रियाचे पुढील मास्टरकीचे शिक्षणही थांबते का काय अशी शंका त्याला येऊ लागली होती. एक भयंकर काळरात्र समोर उभी ठाकली होती. दोन्ही बाजू किमान समंजसपणे एक्मेकांचे ऐकूनतरी घेत होते हीच काय ती जमेची बाजू होती. अजूनही त्यांचे मोबाईलवर बोलणे चालू होते.
राहुल आता खचू लागला होता. घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लघ्न करण्याचा विचारही प्रियाला खटकत होता. ती त्यासाठी तयार नव्हती. त्यात दोघांपैकी कोणीही कमवते नव्हते. नोकरी शोधून जम बसवताना वेळही जाणार होता आणि पुढील शिक्षणाचा विचार पुढे ढकलावा लागणार होता. दोघांनीही यावर सारासार विचार करुन इतक्यात तरी लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाकला होता.
मधल्या काळात प्रियाच्या वडीलांनी त्यांच्या मूळ गावी नागपूरला बदली करुन घेतली होती. प्रियाचे पुढचे शिक्षण तिकडेच होणार हे ओघाने ठरले गेले. शेवटी जे नको होते ते झाले. दोन जीवांची तूटातूट झाली. हळूहळू त्यांच्यातील बोलणेही कमी होत गेले.
राहुल मात्र निश्चयाने पेटला होता त्याने मास्टर करतानाच इस्त्रोची परीक्षा उत्तीर्ण केली होती. भौतिक विभागात सहायक शास्त्रज्ञ म्हणून ऑफर लेटर त्याच्या हातात आले होते. राहुलने पुन्हा एकदा कंबर कसली. आता प्रियाचे पालक आपल्याला नाही म्हणू शकणारच नाही अशी त्याची खात्री त्याला झाली होती. त्याच्या प्रगतीच्या बातम्या प्रियापर्यंत मित्रांच्या माध्यमातून पोहचत होत्या. प्रियाकडून झालेले अभिनंदनही मित्रांतर्फे त्याच्या कानावर येत होते. प्रियानेही तिच्या घरच्यांना या साऱ्या गोष्टींची कल्पना दिली होती.
एक दिवस प्रियाच्या वाढदिवसाचे निमित्त साधून प्रियाला सरप्राईज देण्याच्या उद्देशाने राहूल थेट नागपूरात गार्गीकडून त्याला मिळालेल्या पत्त्यावर पोहचला. मात्र तिथे प्रिया किंवा तिचे आई वडील कोणीच भेटले नाहीत. शेजारी चौकशी केल्यावर सारी मंडळी जवळच असलेल्या इंद्रप्रस्थ हॉलला लग्नासाठी गेल्याचे समजले. राहुल तडक इंद्रप्रस्थ हॉलला रवाना झाला.
हॉल ऐसपैस असला तरी लग्न सोहळा अगदी जेमतेम लोकांमध्ये भरल्याचे त्याच्या लक्षात आले होते.गर्दी कमी असल्याने प्रियाला शोधणे तसे सोपे जाईल या आनंदी विचाराने तो हॉलमध्ये शिरला.
कुणीतरी कानाजवळच दिवाळीचा सुतळी बॉम्ब फोडावा आणि पुढचे काही क्षण पीं ...ssss........... असा गंभीर नाद कानात घुमावा असे राहुलला समोरचे दृश्य पाहून झाले. समोर वधुच्या वेषात उभी असलेली प्रिया त्याचे काळीज चराचरा चिरत गेली. थाटात उभे असलेले तिचे आई वडील आता त्याला असुरासारखे क्रूर वाटू लागले. अमेरिकेत स्थायिक असलेल्या कोण्या सुधीरशी लग्न करायला प्रिया तयार झाली होती एवढेच काय त्याला कळाले होते. प्रियाच्या डोळ्यातील अश्रू काही वेगळेच सांगत असले तरी आता फार उशीर झाला होता.चांदणचुरा पाहताना बिलगलेली प्रिया हीच का ही शंका त्याच्या जखमेवरची खपली काढत होती. अस्तित्वाची लढाई संपल्यानंतरही आपले अस्तित्व कुठेही नाही ही खंत त्याच्या पौरुष्याला उध्वस्त करून गेली होती. मृगजळ म्हणजे काय असते ते कदाचित त्याला कळून चुकले होते.
राहुल इस्त्रो मध्ये रुजू झाला त्याला तिथे जे निवासस्थान दिले होते त्यासमोरच एक सुंदर तळे होते. अंधारात बाहेर चांदणं पडलं की आवर्जून तो चांदणचुरा पहायला तळ्यावर जायचा आणि स्वगत करत रहायचा.
' दुरुन दिसतो तसा हा चांदणचुरा मुळीच नाही, तरंगाशिवाय तो दिसतही नाही म्हणून तरंग शांत व्हायची वाट पाहण्यात अर्थ नाही. नभाकडे हात पसरवून घेता आला पाहिजे चांदवा कवेत आणि............ आणि करता आला पाहिजे चांदणचुरा अगदी ओंजळीतील पाण्याच्या सहाय्याने.......... नि देता आला पाहिजे आपल्या आवडत्या व्यकीच्या झोळीत कोणतीही अपेक्षा न बाळगता ...कायमचा.'
राहुल आता मोठ्याने तळ्याशी बोलू लागला
"चांदवा पाहिजे की चांदणचुरा.. कदाचित या गोंधळातच मनुष्य जगतो किंवा मरतो"
- किरण कुमार
छान लिहिलंय… जुने दिवस आठवले.
छान लिहिलंय… जुने दिवस आठवले. सुदैवाने, माझ्या प्रेमकथेचा शेवट सुखांतच झाला.