हृदयविकार-- एक वेगळा विचार
साधारण पणे हृदयाच्या रक्तवाहिनीत कोलेस्टिरॉल/ चरबीचे अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो त्यामुळे हृदयविकार होतो.
पण लठ्ठ नसलेल्या( वजन प्रमाणात असलेल्या) मधुमेह नसलेल्या, तंबाखू सेवन न करणाऱ्या आणि चपळ आणि सक्रिय माणसाला पन्नाशीतच हृदय विकार का होतो
आणि
वजनदार मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या सिगारेट ओढणाऱ्या एखाद्या व्यक्तीला का होत नाही? याचा विचार आता आपण करू.
रक्तात चरबी/ कोलेस्टिरॉलचे प्रमाण वाढले कि या चरबीचे थर रक्तवाहिन्यांत जमा होऊ लागतात. अर्थात हे थर काही फक्त हृदयाच्या रक्तवाहिनीतच होतात असे नाही तर शरीराच्या सर्वच रक्तवाहिन्यांत होतात.
उदा मेंदूच्या रक्तवाहिनीत असा थर जमा झाला तर आपल्याला पक्षाघात(लकवा) हा विकार होतो. पायाच्या रक्तवाहिनीत असे झाले तर गँगरीन होतो( हा बहुधा मधुमेही/ सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला होतो.)
आणि शिश्नाच्या रक्तवाहिनीत झाले कि लिंगशैथिल्य (erectile dysfunction) येते
आपली रक्तवाहिनी हि अतिशय लवचिक आणि एका निमुळत्या होत जाणाऱ्या नळकांड्यासारखी असते. एखादा माणूस जेंव्हा व्यायाम करतो तेंव्हा शरीराच्या स्नायूंना अतिरिक्त रक्तपुरवठा आवश्यक असतो त्यासाठी आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. जसे जसे वय वाढते तसे तसे रक्तवाहिन्या कठीण होत जातात (arterioscelrosis) म्हणजेच त्यांचा लवचिकपणा कमी होतो आणि आपल्या रक्तवाहिन्यांची प्रसरण पावण्याची क्षमता कमी कमी होत जाते.
आपल्या रक्तात जेंव्हा अतिरिक्त चरबी असते तेंव्हा त्याचा आपल्या रक्तवाहिन्यांच्या (यात हृदयाची रक्तवाहिनी --कॉरोनरी पण येते) आतील बाजूस थर जमा होऊ लागतो. हा थर जेंव्हा जास्त जाड होऊ लागतो तेंव्हा अवयवाचा रक्त पुरवठा कायम ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्तपुरवठा सुरळीत ठेवतात .
शेवटी स्थिती अशी होते कि आता रक्तवाहिन्या प्रसारण पावू शकत नाहीत. जेंव्हा हाच माणूस व्यायाम करायला लागल्यावर जो रक्त पुरवठा आवश्यक असतो तो आता कमी पडू लागतो तेंव्हा पूर्वीसारख्या त्या रक्तवाहिन्या प्रसरण पावून रक्तपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतात.
पण वयानुसार हि प्रसरण पावण्याची प्रक्रिया कमी झालेली असते यामुळेच जसे वय वाढत जाते तसतसे हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता वाढत जाते.
तसेच चरबीचा थर जितका जास्त तितका रक्तपुरवठा कमी होत जातो. म्हणूनच रक्तातील चरबी/ कोलेस्टिरॉल चे प्रमाण जास्त तितकि हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता वाढत जाते.
मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांत चरबी/ कोलेस्टिरॉल चे प्रमाण जास्त होते यामुळेच मधुमेही व्यक्तींना हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते.
सिगारेट/ गुटखा किंवा इतर कोणत्याही तर्हेने तंबाखू सेवन केल्यास तुम्हाला जी "किक" मिळते ती रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे मिळते पण हि प्रक्रिया वर आवश्यक असलेल्या प्रक्रियेच्या नेमकी उलट आहे. त्याशिवाय रक्तवाहिन्या कठीण होण्याचे प्रमाणहि निकोटिनने जास्त होते.
याशिवाय तंबाखूमुळे रक्तात चरबीची पातळी वाढत जाते या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून तंबाखू सेवन करणाऱ्या माणसाला हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता इतर व्यक्तींपेक्षा कितीतरी जास्त होत जाते.
याशिवाय ज्यावेळेस माणसाची तणाव जास्त असतो तेंव्हा आपल्या मेंदूला रक्तपुरवठा जास्त लागतो हा पुरवण्यासाठी हृदय जास्त जोरात धडकू लागते. दुर्दैवाने याच वेळेस माणसाला सिगारेट प्यायची तल्लफ येते. म्हणूनच जेंव्हा मेंदूला आणि हृदयाला रक्तपुरवठा जास्त हवा असतो नेमके तेंव्हाच या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या माणसाला पक्षाघाताचा किंवा हृदयविकाराचा झटका येतो.
स्त्रियांची जोवर रजोनिवृत्ती झालेली नाही तोवर रक्तवाहिन्या जास्त लवचिक राहतात त्यांच्या शरीरात एकंदर चरबी जास्त असूनही रक्तवाहिन्यांत जमा होत नाही.त्यामुळे स्त्रियांना सहसा पन्नाशीपर्यंत हृदयविकार किंवा पक्षाघाताचा धक्का बसत नाही. आतापर्यंत असलेली हि कवच कुंडले रजोनिवृत्ती बरोबर काढून घेतली जातात त्यामुळे पन्नाशीनंतर स्त्रियांना हृदयविकार होण्याचे प्रमाण जवळ जवळ पुरुषांइतकेच होते.
आता वरील प्रश्नाकडे वळू.
लठ्ठ नसलेल्या( वजन प्रमाणात असलेल्या) मधुमेह नसलेल्या, तंबाखू सेवन न करणाऱ्या आणि चपळ आणि सक्रिय माणसाला पन्नाशीतच हृदय विकार का होतो
आणि
वजनदार, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या, सिगारेट ओढणाऱ्या एखाद्या व्यक्तीला का होत नाही?
एक उदाहरण म्हणून देतो आहे.
आपल्या घरात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन अर्ध्या इंचाची आहे. जसा जसा काळ जातो तशी हि पाईपलाईन गंजत जाते आणि आतील व्यास कमी होत जातो. मग शेवटी शेवटी आपल्या घरातील धार फारच कमी होते. मग आपल्याला हि पाईपलाईन बदलावी लागते.
जर आपल्या घराची पाईपलाईन एक इंचाची असेल तर गंजल्यामुळे आतील व्यास कमी होण्यास काळ जास्त लागेल.
आणि जर हि पाईपलाईन दीड इंचाची असेल तर आपल्या आयुष्यभरात आपल्या घराचा पाणीपुरवठा कमी होणार नाही.
हीच स्थिती मानवी शरिराची आहे. दुर्दैवाने भारतीय वंशाच्या लोकांच्या मेंदूच्या किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या पाश्चात्य(कॉकेशियन वंशाच्या) लोकांपेक्षा जास्तच बारीक आहेत. यामुळे पाश्चात्य लोक आपल्या मानाने जास्त वजनदार असुनही त्यांचे हृदय विकाराचे प्रमाण त्याच वजनाच्या भारतीय माणसापेक्षा बरेच कमी आहे.
या कारणामुळे काही लोक जे सडपातळ सक्रिय तम्बाखू न घेणारे मधुमेह नसणारे असूनही त्यांना हृदयविकार होतो आणि दुसऱ्या टोकाला "विन्स्टन चर्चिल" सारखे लोक लठ्ठ असून चिरूट ओढूनहि ९० वर्षापर्यंत जगतात.
दुर्दैवाने आपल्या घराची पाईपलाईन अर्ध्या इंचाची आहे कि एक इंचाची कि दीड इंचाची आहे आहे हे प्रत्यक्ष अँजियोग्राफी केल्याशिवाय सांगणे अशक्य आहे. शिवाय वयानुसार आपल्या रक्त वाहिन्या किती कठीण होतील हे सांगणे आजमितीला शक्य नाही.
त्यामुळे आपली पाईपलाईन दीड इंचाची असली तरी आपल्याला हृदयविकार येणारच नाही हे छातीठोकपणे सांगणे आजमितीला शक्य नाही.
माझ्याकडे येणाऱ्या सुदृढ व्यक्तींना माझे ससंदर्भ स्पष्टीकरण असे असते.
एक पन्नास वर्षाच्या ५'१०" उंचीच्या पुरुषाचे आपले आदर्श वजन जर ६८ किलो असावे. यात जर जाड बांध्याच्या माणसासाठी १० % सूट धरली तरी ७५ किलो असावे. जर आले वजन १०१ किलो असेल तर हे वजन ३५ % जास्त आहे.
आपला ट्रक १० टन क्षमतेचा असेल आणि आपण त्यात नियमितपणे साडेतीन टन वजन जास्त भरत गेलात तर काय होईल?
आपल्या इंजिनवर ३५ % अतिरिक्त भार येईल, आपले सस्पेन्शन आणि टायरचे आयुष्य ३५ टक्क्याने कमी होईल (सस्पेन्शन लवकर खराब होईल आणि आपले टायर लवकर झिजतील) हीच स्थिती आपल्या शरीराची असेल.
आपण झोपले असताना हि हृदयाला ३५ % अतिरिक्त वजनासाठी ३५ % अधिक काम करावे लागेल. आपला पाठीचा कणा लवकर झिजेल(स्पॉंडायलॉसिस) आणि आपले गुडघे लवकर खराब होतील.
एक वेगळा विचार -- १९७० सालच्या अगोदर भारत देशात अन्नधान्य मुबलक प्रमाणावर कधीच नव्हते त्यामुळे आपल्याकडे पाहुणे आले तर आपण त्यांना सुग्रास भोजन कसे देता येईल; हा विचार करत आहोत परंतु गेल्या ५५ वर्षात स्थितीमध्ये जमीन अस्मानाचा बदल झाला आहे आणि त्यामुळे आता आपल्याकडे भुकबळी पेक्षा अतिरिक्त वजनाच्या दुष्परिणामांनि होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
आपल्या शतकानुशतके असणाऱ्या अपुऱ्या अन्नपुरवठ्याचा आपल्या संस्कृती आणि परंपरेवर इतका परिणाम झाला आहे कि आपण पंचेंद्रियांपैकी केवळ "जिभेचे चोचले" पुरवण्याकडे लक्ष देतो.
आपल्याकडे पाहुणे आले तर केवळ त्यांना सुग्रास अन्न देणे हा एकच पाहुणचाराचा मार्ग आहे असे नव्हे तर
त्यांच्या आवडीचे संगीत लावणे,
त्यांच्या आवडीचे सुगंध हवेत पसरणे,
वातानुकूलित हवेत पाहुण्यांना आवडेल अशा तर्हेची प्रकाश व्यवस्था करून बसणे,
ऐसपैस गप्पा मारणे अशा अनेक मार्गानी त्यांच्या जीभ सोडून इतर चारही इंद्रियांचा (नाक, कान, डोळे आणि त्वचा) पाहुणचार करता येईल.
पहा विचार करून.
छान लिहिताय
छान लिहिताय
एकदम।सोप्प्या भाषेत सांगितलं आहे इथे.
काहीजण
तो अमका धमका सगळं योग, व्यायाम करूनही त्याला अटॅक आला, काही होत नाही सगळं झूठ आहे असे वडापाव हाणत बोलायला मोकळे होतात मग.
मुळात त्यांना बंधनं नको असतात, व्यायाम नको असतो.
आवडला हाही भाग. वजन
आवडला हाही भाग. वजन व्यवस्थापन किती महत्वाचे आहे हे पटले.
काही व्यसनांचा व तद्भव आजारांचा सर्वांच्याच बाबतीत काही संबंध असतोच असे नाही याची माझ्या माहितीत काही उदाहरणे आहेत.
आमचे एक नातेवाईक पूर्णतः निर्व्यसनी, अक्षरशः सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही असे होते. ते साठी पूर्ण व्हायच्या आतच पोटाच्या कसल्याशा आजाराने चार-सहा महिन्यांत निवर्तले. त्याउलट त्यांचेच एक काका अत्यंत व्यसनी; रोजचा किमान आठ-दहा कप चहा, महिन्याभरात किमान दीड-दोन किलो छालीया सुपारी, एक दीड-पुडा तंबाखू खाणारे असे होते. ते अत्यंत देखणे, उंचेपुरे होते. मधुमेह-रक्तदाब वगैरे त्यांना शिवलाही नाही. वयाच्या पंधरा वर्षांपासून ते पंच्याण्णव वर्षांपर्यंत चहा-सुपारी-तंबाखूचे सतत व्यसन करूनही त्यांचे दात मजबूत होते. शेवटी किरकोळ आजाराचे निमित्त होऊन ते निवर्तले.
माझ्या एका तेलगू मित्राचे नातेवाईक परवाच वयाच्या शहाण्णवव्या वर्षी झोपेतच निवर्तले. शेवटपर्यंत ते दररोज (वर्षातील ३६५ दिवस) १८० मिली मद्यपान करायचे. त्याहून जास्त नाही, कमीही नाही. अर्थात आमच्या गावात अतीतंबाखू खाऊन अति मद्यपान करून अकाली मरण पावलेल्या तरुणांनीही काही उदाहरणे आहेत. कर्करोगाच्या शस्त्रक्रिया होऊन जिवंत राहिलेल्यांचीही उदाहरणे आहेत.
"Choose your parents wisely," हे रसेलचे विधान आठवले.
अनेक रुग्ण असा प्रतिवाद
अनेक रुग्ण असा प्रतिवाद करतात कि गेली इतकी वर्षे मी तंबाखू खात आलोय अजून तरी काही झालेले नाही.
मी त्यांना एवढेच म्हणतो कि आपला दावा असा आहे कि इतकी वर्षे मी रेल्वे लाईन ओलांडतो आहे कुठे काय झालं अजून पर्यंत?
याचा अर्थ रेल्वे लाईन ओलांडणे सुरक्षित आहे असे म्हणता येईल का?
काही वर्षांपूर्वी एक स्थूल गृहस्थ माझ्या कडे आले होते ज्यांचा मधुमेह अनियंत्रित होता ज्यामुळे त्यांची मूत्रपिंडे खराब होत होती (DIABETIC NEPHROPATHY) . मी त्यांना विचारले कि आपलय रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे .
त्यावर ते मला झटकून टाकत म्हणाले हॅ हॅ , डॉक्टर, मी काय आठ दहा महिने साखरेची चाचणीच केलेली नाही. मी त्यांच्या हेल्मेट कडे पहिले आणि त्यांना विचारले, "साहेब, तुम्ही आपली मोटार सायकल हवा न भरता सहा महिने चालवता का? वाईट काय होईल टायर पंक्चर होईल. त्याहून वाईट काय होईल? ट्यूब बदलायला लागेल. "
इथे तुमची मूत्रपिंडे खराब व्हायला लागली आहेत.
आता पासून काळजी घेतली नाही तर ती खराब नक्की होतील.
आज "अनियंत्रित मधुमेह" हे मूत्रपिंडे खराब होण्याचे सर्वात प्रथम आणि महत्त्वाचे कारण आहे
मूत्रपिंड रोपण ( ट्रान्सप्लांट) हि आपल्याला वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. एक तर दाता मिळेपर्यंत आठवड्यात दोन ते तीन वेळेस डायलिसिस करून घ्यावे लागेल. लाखानी रुपये खर्च येईल आणि आयुष्यभर प्रतिकार शक्ती कमी करणारी औषधे घ्यावी लागतील.
त्यांना ते काही फारसे पटलेले दिसले नाही.
म्हणून गीतेत लिहिल्याप्रमाणे आपण आपले कर्म करावे,( लोकांना योग्य सल्ला देण्याचे) फळाची अपेक्षा धरू नये हे उत्तम
जेव्हा नविन व्हॅक्सिन येते
जेव्हा नविन व्हॅक्सिन येते चाचण्या होतात आणि वापर सुरू होतो.
त्यात जर आढळुन आले की फक्त ०.५% (हे खरं तर फार जास्त प्रमाण आहे, फक्त उदाहरण म्हणुन घेऊ.) लोकानां विपरीत परिणाम होऊन ते दगावतात आणि फक्त ०.५% लोकांना कायम स्वरूपी गंभीर दुखणे होते.
तेव्हा ते बघा त्या ९९% लोकांना तर काहीच होत नाही म्हणत लोक व्हॅक्सिन घेण्यास पुढे येत नाहीत. त्या १% लोकांचे उदाहरण घेऊन हे व्हॅक्सिन घेणार नाही म्हणणार. (जे योग्य आहे.)
पण निकोटिन, अथवा आहाराबाबतीत ज्यांना जे वर्ज्य वगैरे तेव्हा उलट होते. काही मोजके लोक ज्यांना वयाच्या नव्वदी पर्यंत सगळं नियमित सेवन करूनही काही झालं नाही त्यांचं उदाहरण घेणार, त्यांना काही झालं नाही तर आपल्यालाही व्हायला नको.
लेखकाला काय म्हणायचे आहे ते
लेखकाला काय म्हणायचे आहे ते समजले व पटले आहे.
पण
१९७० सालच्या अगोदर भारत देशात अन्नधान्य मुबलक प्रमाणावर कधीच नव्हते त्यामुळे आपल्याकडे पाहुणे आले तर आपण त्यांना सुग्रास भोजन कसे देता येईल; हा विचार करत आहोत परंतु गेल्या ५५ वर्षात स्थितीमध्ये जमीन अस्मानाचा बदल झाला आहे आणि त्यामुळे आता आपल्याकडे भुकबळी पेक्षा अतिरिक्त वजनाच्या दुष्परिणामांनि होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
आपल्या शतकानुशतके असणाऱ्या अपुऱ्या अन्नपुरवठ्याचा आपल्या संस्कृती आणि परंपरेवर इतका परिणाम झाला आहे कि आपण पंचेंद्रियांपैकी केवळ "जिभेचे चोचले" पुरवण्याकडे लक्ष देतो.
आपल्याकडे पाहुणे आले तर केवळ त्यांना सुग्रास अन्न देणे हा एकच पाहुणचाराचा मार्ग आहे असे नव्हे तर
त्यांच्या आवडीचे संगीत लावणे,
त्यांच्या आवडीचे सुगंध हवेत पसरणे,
वातानुकूलित हवेत पाहुण्यांना आवडेल अशा तर्हेची प्रकाश व्यवस्था करून बसणे,
ऐसपैस गप्पा मारणे अशा अनेक मार्गानी त्यांच्या जीभ सोडून इतर चारही इंद्रियांचा (नाक, कान, डोळे आणि त्वचा) पाहुणचार करता येईल.
>>>
या भागातील संदर्भ पटले नाहीत. "आपल्याकडे" किंवा "आपल्या संस्कृतीत" म्हणजे कुठे? हिंदू संस्कृतीत की भारतीय संस्कृतीत की मराठी संस्कृतीत? आलेल्या पाहुण्यांना काही खायला-प्यायला देऊन त्यांचा पाहुणचार करणे हे जगभरात सगळ्याच संस्कृतीत व सर्वत्रच असते, नाही का? त्यात "आपल्या संस्कृती"ला single out करणे आवडले नाही.