बर्लिनच्या टीगल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमचे विमान उतरलं आणि वीस वर्षांपूर्वीच बर्लिन मधील आमचं वास्तव्य माझ्या डोळ्यावर समोरून झरकन सरकलं. साल 1989 ते 1991 या काळात मला बर्लिन युनिव्हर्सिटीमध्ये जर्मन गव्हर्मेंटची रिसर्च फेलोशिप मिळाली होती. त्या निमित्ताने आमचं दोन वर्ष वास्तव्य येथेच होत. आमचं म्हणजे आम्हा तिघांचं; मी, मंजिरी आणि नीरज यांचं. प्रथमच भारताच्या बाहेर वास्तव्य करणार असल्यामुळे आमच्या करता हा काळ सनसनाटी तर होताच, इतकच काय तर 1989 हे साल जर्मन इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाणार होतं. कारण याच वर्षी जर्मनीचे युनिफिकेशन झालं होतं. डेमोक्रॅटिक आणि कम्युनिस्ट जर्मनी यांचं एकत्रिकरण होऊन दोन भागांना विभाजित करणारी बर्लिनची भिंत जमीनदोस्त झाली होती. आता तब्बल वीस वर्षांनी, म्हणजे २००९ साली, मी बर्लिन मध्ये पुन्हा पाऊल टाकत होतो ते एक आठवड्याच्या बर्लिन युनिव्हर्सिटीच्या अल्यूमनी रिसर्च कॉन्फरन्सच्या निमित्ताने.
मी माझं सामान उचललं, टॅक्सी घेतली आणि हॉटेल कडे रवाना झालो. खरंतर माझं मन भूतकाळातच भिरभिरत होतं. वीस वर्षांपूर्वीची ईस्ट आणि वेस्ट जर्मनीला विभाजित करणारी बर्लिनची महाकाय भिंत, बर्लिनच्या दोन्ही बाजूंना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे चेक पॉइंट चार्ली आणि भूतकाळातील जर्मन साम्राज्याचे प्रतीक मानले जाणार ब्रांडनबर्गद्वार सार पटकन माझ्या डोळ्यासमोरून गेलं. कॉन्फरन्स मध्ये एक दिवसाची बर्लिन टूरसुद्धा अरेंज केली असल्यामुळे मला कदाचित यापैकी काही स्थळांना पुन्हा भेट देण्याची संधी मिळणार होती. मी हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि पहिल्यांदा प्रोफेसर ब्रॉवरना फोन लावला. त्यांनीच मला वीस वर्षांपूर्वी होस्ट केला होता आणि त्यांनीच ही कॉन्फरन्स सुद्धा अरेंज केली होती. उद्याच्या कॉन्फरन्स वेन्यूबद्दल जरुरी माहिती त्यांच्याकडून घेतली आणि त्यानंतर रात्रीचं जेवण घेऊन थोडासा आडवा झालो. पण माझं मन मात्र भूतकाळातून बाहेर येण्यास तयार नव्हतं. ती दोन वर्ष आमचं वास्तव्य IBZ म्हणजे आंतरराष्ट्रीय रिसर्चर्सचे निवासस्थान इथे होतं जे जवळच असणाऱ्या अंडरग्राउंड रेल्वे स्टेशन रुदेश्हायमेर प्लाट्झ् पासून चालत सात-आठ मिनिटांच्या अंतरावर होतं. मी हा वॉक तेथे असताना दररोजच करायचो. संध्याकाळच्या वेळी इथे चालणं मला फार आवडायचं. तिथला तो प्रशस्त रस्ता, रस्त्यावरची तुरळक रहदारी आणि आजूबाजूला असणारी टुमदार आणि कोरीकरकरीत दुकान मला फार आवडायची. त्या रोडवर असणाऱ्या रोलेक्स दुकानपाशी मी नेहमीच एखाद मिनिट का होईना जरूर थांबायचो. IBZ हे साधारण 100 अपार्टमेंट असलेलं आठ इमारतींचं एक प्रशस्त निवासस्थान होतं. एक लोखंडी दार हे इमारतीच प्रवेशद्वार होतं जे नेहमीच लॉक असायचं. घराच्या चावीन ते लॉक उघडता यायचं. मध्यभागी एक छान प्रशस्त बाग होती. इथे मध्यवर्ती असणाऱ्या बाकावर बसलं की दुसऱ्या मजल्यावरील आमचा समोरचा फ्लॅट अगदी व्यवस्थित दिसायचा. संध्याकाळच्या वेळी सारे निवासी आपल्या मुलांना येथे खेळायला घेऊन यायचे. इथल्या लहान मुलांची खासियत अशी होती की इथली बहुतेक मुले रोलर ब्लेड चालवण्यात एक्सपर्ट होती. नीरज पण रोलर ब्लेड चालवण्यास इथेच शिकला. वीस वर्षांपूर्वीची रोलर ब्लेड चालवणारी नीरजची छबी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि मला कधी झोप लागली ते कळलंच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन केल्यावर माझं कीनोट प्रेझेंटेशन पहिल्याच सेशनमध्ये होतं. मग पुढील चार दिवस जुन्या मित्रांना भेटणे, त्यांची प्रेझेंटेशन्स आणि त्यांची करिअरमधील प्रगती अशा गप्पाटप्पांमध्ये कसे गेले ते कळलेच नाही. पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बर्लिनची टूर कॉन्फरन्सतर्फे अरेंज केली होती. बर्लिनची भिंत, चेक पॉइंट चार्ली, ब्रॅंडनबर्ग द्वार आणि रायशेस टाग वगैरे लँडमार्क्सना वीस वर्षांनी पुन्हा भेट देताना खूप अप्रूप वाटले. दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला दिलेली भेट मात्र खूप क्लेशकारक होती. उद्या माझा बर्लिनमधील वास्तव्याचा शेवटचा दिवस होता. उद्या रात्री साडेबारा वाजता माझी परतीची फ्लाईट होती. त्याआधी संध्याकाळी प्रोफेसर ब्रॉवर यांनी मला डिनरला बोलावलं होतं; त्यामुळे सबंध दिवस मला मोकळाच होता. रात्री जेवणानंतर थोडा आडवा झालो; पण मनात काही कमतरता भासत होती. थोडं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं, पण मनातल्या रूखरखीचं कारण मात्र लक्षात येत नव्हतं. तेवढ्यात माझ्या मनात एक विचार आला; "उद्या तर कॉन्फरन्स नसल्यामुळे सारा दिवस मोकळाच आहे. मग वीस वर्षांपूर्वी आपण जिथे राहत होतो त्या IBZ ला का बरं भेट देऊ नये? होय, निश्चितच. तसाच करावं." मी इरादा पक्का केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता घेतल्यावर मी रिसेप्शनला गेलो आणि IBZ ला जाण्याचा रस्ता शोधून काढला. झटपट कपडे बदलले आणि उतावळ्या मनानं निघालो IBZ ला जायला. जवळच अंडर ग्राउंड मेट्रो स्टेशन होतं मला झूलोगिस गार्डनला मेट्रो बदलली मग त्यानंतर पाच स्टेशननंतर आले रुदेश हायमर प्लाट्झ्. मी झटकन स्टेशनच्या बाहेर आलो आणि IBZ च्या दिशेने चालू लागलो. रस्ता ओळखीचाच होता. मी भरभर पावलं उचलली. सात-आठ मिनिटांचं वॉक. क्षणभर माझं लक्ष आजूबाजूच्या दुकानांकडे गेलं. तशीच स्वच्छ आणि नीटनेटकी दुकान. पुढे रोलेक्स दुकानापाशी मी नकळत क्षणभर उभा राहिलो; वीस वर्षापूर्वी उभा राहायचं तसाच. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, IBZ चं पुढचं द्वार तर नेहमीच बंद असतं - आणि ते फक्त फ्लॅटच्या चाविनच उघडता येतं. आणि माझ्याकडे तर चावी असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मला आत प्रवेश करताच येणार नव्हता. माझे सारे प्रयास वाया गेले होते; मी खट्टू मनानं तसाच परतलो मेट्रोपाशी आल्यावर माझ्या मनात नकळत एक विचार आला - इथपर्यंत आलोच आहोत तर IBZ पर्यंत जायला काय हरकत आहे? कदाचित कोणी महाभाग आपल्याला IBZ चं प्रवेशद्वार उघडून आतपर्यंत घेऊन जाईल ! मला हे विधान पटलं. मी परत तसाच मागे फिरलो आणि IBZ च्या दिशेने पुन्हा चालू लागलो. आता माझ लक्ष आजूबाजूच्या दुकानांकडे बिलकुल नव्हतं; डोळ्यासमोर होतं ते फक्त IBZ आणि त्याचे प्रवेशद्वार. आठ मिनिटांचा तो वॉक मी अधीर मनाने निम्म्या वेळातच खतम केला. IBZ कॉम्प्लेक्स मला दुरून दिसू लागला होता. वीस वर्षांपूर्वीच आपलं तिथलं वास्तव्य क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोरून सरकल. वीझबाडेनर स्ट्रीट वरील ते अपार्टमेंट कॉम्प्लेक्स पूर्वीसारखंच वाटत होतं. तिथलं प्रवेशद्वार हे बंदच असणार याची मला पूर्ण कल्पना होती; तरीसुद्धा मी भरभर पावलं उचलली आणि within no time मी IBZ च्या समोर पोहोचलो. आणि पाहतो तर काय - तिथलं प्रवेशद्वार सताड उघड होतं; जणू मला आत येण्यास खुणवत होतं. मला फारच आश्चर्य वाटलं, हे कसं शक्य आहे? पण जास्त विचार न करता मी पटकन आत शिरलो. मग पुढील तब्बल दहा मिनिटं मी पूर्ण कॉम्प्लेक्सची फेरफटका केली. वीस वर्षांपूर्वी IBZ जसं होतं तसं होतं - त्यामध्ये काहीच फरक जाणवला नाही. प्रवेशद्वारा जवळ असणार ऑफिस, समोरील कम्युनिटी हॉल आणि मध्यभागी असणारी बाग - सारं जसच्या तसंच होतं. मी बागेत जाऊन बसलो त्याच बाकावर, जिथे वीस वर्षांपूर्वी मी नेहमीच बसायचो. समोरच असणार आमचं पूर्वीच अपार्टमेंट मला अगदी स्पष्ट दिसत होतं. इथेच आमचा संसार सुरू झाला आणि इथेच नीरज लहानाचा मोठा झाला. रोलर ब्लेड्स चालवणारी नीरजची छबी क्षणभर माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली, मी खिशातून रुमाल काढून पाणावलेले माझे डोळे पुसले आणि पाहतो तर काय, एक लहान मुलगा रोलर ब्लेड्स चालवत माझ्यासमोरून गेला. मला त्यात नवीन असं काहीच वाटलं नाही - असेल कोणी ! पण, का कुणास ठाऊक, नीरज सारखीच छबी असणारा तीन-चार वर्षाचा तो मुलगा माझ्या आजूबाजूला सारखाच घोटाळू लागला. त्याच नीरजमधील साम्य पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. मग मात्र मी त्याच्याशी संवाद साधला.
"तुझं नाव काय बेटा?" मी त्याला विचारलं
"माझं नाव? माझं नाव आहे सर्वज्ञ !" त्याने उत्तर दिल आणि तो तिथून सटकला. सर्वज्ञ..! वेगळेच नाव आहे. माझ्या मनात विचार आला. आणि मनातील कुतूहल जाग झालं. बागेला फेरी मारून तो मुलगा पुन्हा माझ्यासमोर आला. आता मात्र मी त्याला थांबवलंच.
"कुठला रे तू?" मी विचारलं. "इथलाच, मी इथेच राहतो" पोरगं उत्तरलं.
"असं? कुठल्या देशातून आलास तू?" मी प्रश्न केला. "मी नेपाळचा, असं माझ्या आई-बाबांनीच मला सांगितलं."
त्या चिमुरड्याशी बोलताना माझ्या मनातील उत्सुकता अजूनच वाढली.
"असं? काय करतात तुझे बाबा?" मी विचारलं.
"ते बर्लिन यूनिवर्सिटी मध्ये रिसर्च करतात - जर्मन गव्हर्नमेंटची त्यांना फेलोशिप मिळाली आहे." आता मात्र माझ कुतूहल शिगेला पोहोचल.
"तू आणि तुझे आई-बाबा राहतात तरी कुठे?" मी विचारलं. "इथेच, IBZ मध्ये. ते दिसतंय ना, त्याच घरात." तो उत्तरला.
त्याचं उत्तर ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटाच उभा राहिला कारण तो आम्ही वीस ज्या वर्षांपूर्वी अपार्टमेंट मध्ये राहत होतो त्याकडेच तो बोट दाखवत होता. मी अवाक होऊन आमच्या जुन्या घराकडे टक लावून पहात उभा राहिलो. तो मुलगा तेथून कधी निघून गेला मला समजलंही नाही. माझ्या मनात विचार आला - "वीस वर्षांमध्ये बाहेरच्या जगात जमीन-आसमानाचा बदल झालाय; पण इथे IBZ मध्ये सार जसेच्या तसच आहे. फक्त व्यक्ती बदलल्या आहेत." मी भिरभिरत्या मनाने सगळीकडे त्या मुलाचाशोध घेतला, पण तो कुठेच नव्हता. मी तिथून तसाच उठलो आणि या साऱ्या प्रसंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत हॉटेलचा रस्ता पकडला. माझ्यावर कोणी अदृश्य आणि अनामिक शक्ती पाळत ठेवून आहे असं मला उगाच वाटलं.
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मी चटकन चेकआउट केलं; कारण आज रात्रीची माझी परतीची फ्लाईट होती. त्यामुळे प्रोफेसर ब्रॉवर बरोबरच्या रात्रीच्या डिनरनंतर मी डायरेक्ट एअरपोर्टला जायचं ठरवलं. संध्याकाळी डिनरमध्ये प्रोफेसर ब्रॉवरबरोबर आमच्या रिसर्च फिल्डबद्दल भरपूर गप्पा झाल्या. पण दुपारचा प्रसंग माझ्या मनातून काही केल्या जात नव्हता. आता आमचं डिनर जवळजवळ संपत आलं होतं. आणि शेवटचं Dessert खाता खाता प्रोफेसर ब्रॉवरने मला एक अजब प्रश्न विचारला:
"तुला असा कधी अनुभव आला आहे का?"
"कुठला अनुभव?" मी चमकून विचारलं
"असा अनुभव की ज्यायोगे आपल्या मनात अशी शंका येते की आपल्या जीवनात घडणारे सारे प्रसंग हे एक दूरवर निवास करणारी Super Intelligent शक्ती monitor करते आहे आणि घडवून आणत आहे?" प्रोफेसर ब्रॉवरनी आपला प्रश्न पूर्ण केला.
आता मात्र मी पुरा हादरलो.
जणू काही आज दुपारचा IBZ चा पहिला चेक कमी पडला की काय, म्हणून आता हा दुसरा चेक.
"आज पर्यंत माझ्या कधी हे लक्षात नाही आलं - पण आज दुपारी मात्र आलं" मी उत्तरलो आणि dessert कसंबस संपवता संपवता आजचा दुपारचा अनुभव मी प्रोफेसर ब्रॉवरना कथन केला.
त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं आणि ते उद्गारले "तुला त्याच शक्तीने आज असा आरसा दाखवला की जो काळ आणि वेळेचे बंधन पाळत नाही. त्या आरशात वर्तमानातील भौतिक वस्तू तर दिसतातच; इतकंच काय तर भूतकाळत घडलेले प्रसंग आणि घडामोडींचंसुद्धा दर्शन होते." जीवनाच्या शेवटच्या टप्यावर उभे असलेले प्रोफेसर ब्रॉवर मला काय सांगू इच्छित होते?
त्यांनी केलेल्या या डबल चेकने मी पुरा चेकमेट झालो होतो.
इंटरेस्टिंग!
इंटरेस्टिंग!
शैली आवडली लिखाणाची.