“चांगुलपणाच्या आड…”
"काहीही असू दे हं, पण तो माणूस/बाई म्हणून खूप चांगला/ली आहे."
निव्वळ या एका वाक्याखाली अनेक लोकांचे दुर्गुण, त्यांचे उपद्रवमूल्य आणि जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्याची वृत्ती बेमालूमपणे झाकली जाते.
त्या चांगुलपणाचं नेमकं काय करायचं? लोणचं घालायचं का?
नवरा लाख मनाने चांगला असेल, पण लग्न म्हणजे काय, नातं म्हणजे काय, जोडीदाराला सपोर्ट म्हणजे काय, आणि पोरांच्या संगोपनात बापाची भूमिका काय हेच त्याला कळत नसेल, तर त्या तथाकथित चांगुलपणाच्या आड हे सगळे दोष झाकून टाकायचे का?
हीच गोष्ट बाईचीही. ती मनाने चांगली असेल, पण आयुष्यातील जबाबदाऱ्या, नात्यांतील समतोल, कुटुंबातील कर्तव्य यांचा गंधच नसेल, तर फक्त “चांगली आहे” या शिक्क्याने सगळं माफ करून टाकायचं का?
आपल्या समाजाला एक वाईट सवय लागली आहे व्यक्तीच्या वर्तनाचा, जबाबदाऱ्यांचा आणि परिणामांचा विचार न करता फक्त “तो/ती माणूस म्हणून खूप चांगला/ली आहे” या लेबलखाली सर्वकाही झाकून टाकायचं. आणि मग अशा अनेक पुरुष-बायका अगदी मजेत जगून जातात; त्यांना स्वतःमध्ये बदल घडवण्याची, जबाबदारी उचलण्याची किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरजच वाटत नाही.
पण खरं चांगुलपण हे फक्त स्वभावात नसतं ते कृतीत, जबाबदारीत आणि नात्यांमध्ये दिसायला हवं.
नुसतं “चांगलं मन” पुरेसं नसतं; त्या मनाला योग्य वर्तनाची साथ नसेल, तर त्याचा उपयोगच काय?
*******************************************************************************************************
मनातलं बोलतात.
मनातलं बोलतात.
एकंदरीतच केवळ हेतु चांगला असुन उपयोगी नाही. तो आहेच असे गृहीत धरलेले असते. तो सफल होण्याच्या दृष्टीने केलेल्या विचारपूर्वक कृतीची - वर्तनाची साथ नसेल तर काय उपयोग त्या हेतुचा.
नुसतं “चांगलं मन” पुरेसं नसतं
नुसतं “चांगलं मन” पुरेसं नसतं; त्या मनाला योग्य वर्तनाची साथ नसेल, तर त्याचा उपयोगच काय?>>>>>>> दुर्वतनाचा वेध हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक जरुर वाचा. आदर्शवादाच्या जोखडातुन मुक्तता होण्यास मदत करते
चांगला विषय आहे. उक्ती
चांगला विषय आहे. उक्ती पेक्षा कृती श्रेष्ठ !
कोणतंही नातं असो.