कुसुमाकर वसंत
“नितरां सृजति इति निसर्गः” अशी निसर्गाची व्याख्या आहे. जो सर्वांगांनी सर्जनशील असतो तो निसर्ग. निसर्गाचे आणि ऋतूंचे एक वेगळेच असे नाते आहे. निसर्गातील बदल म्हणजेच ऋतू. १९५६ साली दुर्गाबाई भागवत यांनी ऋतुचक्र लिहिले आणि अशा प्रकारचे ललितगद्य हे इतिहास घडवणारे ठरले. आजूबाजूच्या निसर्गातील होणारे सूक्ष्म बदल त्यांनी अगदी लीलया टिपले आहेत. पण आपण वर्षानुवर्षे शिकत आलेले मराठी महिन्यांचं आणि ऋतूंचे गणित मात्र जुळत नाही. म्हणजे आपले मराठी महिने चांद्र मासांवर बेतले आहेत तर आपले ऋतू हे सौर कालगणनेशी निगडित आहेत. मराठी महिन्यांची नावे ही पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्यानुसार असतात (उदा. चित्रा- चैत्र, विशाखा- वैशाख, श्रवण- श्रावण).
यावर्षीच्या (२०२६) कालनिर्णय प्रमाणे १८ फेब्रुवारीला सौर वसंत ऋतू प्रारंभ झाला आहे आणि २० एप्रिल रोजी सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ. वसंत संपात हा ह्यावर्षी २१ मार्चला आहे. म्हणजे वसंत संपाताच्या एक महिना आधी आणि एक महिना नंतर हा वसंत ऋतूचा काळ धरावा. श्री द महाजन सरांनी ऋतूंच्या कालनिश्चिततेसाठी एक वेळापत्रक सुचवलं आहे. हे अगदी तंतोतंत जुळत नसलं तरी थोड्याफार फरकाने ते अगदी सुसंगत आहे.
१) वसंत - १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल
२) ग्रीष्म - १६ एप्रिल ते १५ जून
३) वर्षा - १६ जून ते १५ ऑगस्ट
४) शरद - १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर
५) हेमंत - १६ ऑक्टोबर ते १५ डिसेम्बर
६) शिशिर - १६ डिसेम्बर ते १५ फेब्रुवारी
हे सौर ऋतूंचे गणित नीट कळायला मुळात भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा सखोल अभ्यास केला पाहिजे.
राष्ट्रीय दिनदर्शिकेत १२ महिन्यांची नावे चैत्र ते फाल्गुन अशाच क्रमाने आहेत. फक्त मार्गशीर्ष महिन्याचे नाव ‘अग्रहायण’ असे बदलले आहे. राष्ट्रीय दिनदर्शिका ही खगोलशास्त्राशी संबंधित असून, तिची ऋतुचक्राशी उत्तम सांगड घातली आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वर्षांचा पहिला दिवस (लीप वर्ष सोडून) २२ मार्च हा असतो. भारतीय चैत्र मासारंभ शके १९४८ (कालनिर्णय पहा). राष्ट्रीय दिनदर्शिकेत वैशाख ते भाद्रपद या सलग पाच महिन्यांचे ३१ दिवस, तर उर्वरित सात महिन्यांचे प्रत्येकी ३० दिवस असतात. सूर्याचा उत्तर गोलार्धातील काळ त्याच्या दक्षिण गोलार्धातील काळापेक्षा थोडा जास्त असल्यामुळे राष्ट्रीय दिनदर्शिकेत वैशाख ते भाद्रपद या कालावधीत येणारे पाच सौर महिने प्रत्येकी ३१ दिवसांचे असून, उरलेल्या ७ महिन्यांचे ३० दिवस असतात. अशा तऱ्हेने ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण होते.जे इंग्रजी वर्ष ‘लीप’ असते, त्या वर्षी सुरू होणारे राष्ट्रीय वर्षही ‘लीप वर्ष’ घेतात. अशा ‘लीप’ वर्षांची सुरुवात २२ मार्चला न होता २१ मार्चला करतात. आणि त्या वर्षी चैत्र महिन्याचे ३१ दिवस घेतात. सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो, त्या दिवशी १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असते. म्हणून त्या दिवशी नवीन वर्षांची सुरुवात केली जाते. साहजिकच ही तारीख १ चैत्र असते (आपल्या कॅलेंडरप्रमाणे ही तारीख २२/२१ मार्च असते)
यावरून राष्ट्रीय दिनदर्शिकेची वैशिष्टय़े आणि त्याची शास्त्रीय बैठक लक्षात येईल. चैत्र, आषाढ, आश्विन आणि पौष या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या स्थानांशी निगडित आहे. चैत्र आणि आश्विन महिन्याच्या सुरुवातीला (अनुक्रमे २२ मार्च आणि २३ सप्टेंबर) सूर्य वैषुविक वृत्तावर असतो. यावेळी दिवस आणि रात्र समान असतात. आषाढ महिन्याच्या १ दिनांकापासून (२२ जून) दक्षिणायन सुरू होते, तर पौष महिन्याची म्हणजे उत्तरायणाची सुरुवात असते. (२२ डिसेंबर)
आपल्या इंग्रजी महिन्याची सुरुवात सूर्याच्या अशा विशिष्ट स्थानांशी निगडित नाही. स्वातंत्र्यानंतर ही दिनदर्शिका राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून स्वीकारली गेली.
आपला भारत हा खंडप्राय देश असल्यामुळे इथे भौगोलिक बदल आढळतात. प्राचीन संस्कृत साहित्यातील वर्णने ही प्रामुख्याने उत्तरेकडील असल्यामुळे तिथली भौगोलिक परिस्थिती ही दक्षिणेपेक्षा भिन्न आहे. त्यामुळे उत्तरेकडील वृक्ष आपल्यापेक्षा उशीराने बहरतात.
गीतेत श्रीकृष्णांनी "मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकर:" असे वसंत ऋतूसाठी म्हटले आहे. वसंत ऋतूत निसर्गात जशी रंगांची उधळण झालेली असते तशीच रंगांची उधळण करणारे सण देखील याच महिन्यात येतात. आपण भारतीय उत्सवप्रेमी. "उत्सवप्रिया खलु मनुष्या:" असे शाकुंतल नाटकातील एक वचन प्रसिद्ध आहे. वसंत ऋतूत होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया असे सण येतात.
मात्र वसंत पंचमी हा सण येतो तो माघ शुद्ध पंचमीला, शिशिर ऋतूत. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिन म्हणून साजरा करतात. अनेक प्रांतात सरस्वती पूजन केले जाते. तिला पिवळी वस्त्रे नेसवून तिच्या पायाशी पुस्तके, पेन, लेखण्या ठेऊन पूजा करतात. तसेच काही ठिकाणी पहिल्यांदा पाटीपूजन करून लहान मुलांना शिक्षणाचा श्रीगणेशा करायला लावतात. पंजाबात पतंग उडवून व पूजा करून हा सण साजरा करतात. पेशवेकाळात देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केली जात असे. लोक धान्याची कणसे एकमेकांना भेट देत. धान्याचे तुरे पागोट्यात/ फेट्यात खोचत असे काही संदर्भ आहेत. पिवळी वस्त्रे नेसून हा उत्सव साजरा केला जातो. पिवळा रंग हा सृजनाचा रंग मानला जातो. कलकत्त्यात सरस्वती देवीच्या मूर्ती पूजतात. शोलावूड पासून देवीचे दागिने अलंकार बनवतात. पण मग माघ शुद्ध पंचमीला आणि शिशिर ऋतूत येणाऱ्या या सणाला 'वसंत' पंचमी हे नाव कसे पडले असावे? तर सरस्वती जन्माच्या वेळी राग 'वसंत' गायला होता आणि त्याचमुळे याला वसंत पंचमी असे नाव पडले असावे. कारण वसंत ऋतूच्या कालनिश्चिततेचे विवेचन तर वर दिलेच आहे.

वसंत ऋतूत, शिशिरातील पानगळती थांबलेली असते, चैत्रात- वसंतात वृक्षांना नवीन पालवी फुटते. पुढे येणाऱ्या ग्रीष्मात सावली मिळावी म्हणून निसर्गाने केलेली ही तयारी म्हणावी का? या चैत्रात येणाऱ्या नवपल्लवीसाठी "किसलय" हा एक खूप सुंदर शब्द आहे.
तर याच वसंत ऋतूत एक उत्सव, महोत्सव प्राचीन काळी साजरा केला जात असे. त्याचे नाव मदनमहोत्सव, अनंगमहोत्सव. हा उत्सव अनंग त्रयोदशी ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जात असे. तारकासूर राक्षस, त्याला मिळालेले वरदान, शिव पार्वती विवाह आणि नंतर होणारा कार्तिकेयाचा जन्म आणि तारकासुराचा वध या गोष्टी सर्वांना माहीत आहेतच. कालिदासाच्या कुमारसंभव महाकाव्यात याचे फार सुंदर वर्णन केले आहे. त्यात कामदेव दहन हा भाग येतो. कामदेव म्हणजेच मदन. त्याच्याकडे एक धनुष्य आहे ते आहे इक्षुदंडाचे म्हणजेच उसाचे. त्याचे नाव कुसुमचाप, पुष्पधन्वा आणि त्याची प्रत्यंचा बनली आहे भुंग्यांच्या ओळीने. या धनुष्याबरोबर आहेत पाच सुवासिक फुलांचे बाण.
अरविंदं अशोकं च चूतं च नवमल्लिका ।
नीलोत्पलं तथा हि एते पंचबाणस्य सायकाः।।
लाल कमळ, सीताअशोक, आम्रमंजिरी, मदनबाण आणि नीलोत्पल. ही सगळी फुले फुलतात वसंत ऋतूत आणि जो आहे मदनाचा प्रिय सखा.
शिवाने आपला तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्मसात केल्यावर, त्याच्या पत्नीच्या-रतीच्या विनंतीवरून मदनाला, अनंग (अंगरहित) रूपात 'मन' ह्या सहाव्या इंद्रियात जिवंत ठेवले. यावरूनच त्याला मनसिज, चित्तजन्मा अशी नावे मिळाली. तर या मदनाचा अंमल ज्या तरुण 'मनांवर' चालतो ते या मदनाची पूजा करतात. अनंग त्रयोदशी (३० मार्च) ते पौर्णिमेपर्यंत कामदेवयातनात, मदनमंदिरात असे मदनमहोत्सव किंवा वसंत महोत्सव साजरे केले जातात. तरुण तरुणी सजून धजून एकत्र येतात. संगीत, नृत्य, रंगोत्सवात हा मदनोत्सव उत्साहात साजरा केला जातो. अशा या मदनमहोत्सवाची खूप शृगांरिक आणि रसभरीत वर्णने संस्कृत काव्यात आढळतात. विस्तारभयामुळे ते इथे देणे टाळतो.
तर अश्या या कुसुमाकर वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला नवीन आम्रकुसुमाचे भक्षण केले जाते आणि वसंतोत्सव साजरा केला जातो.
निसर्गातील अनेक वृक्ष सुद्धा या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बहरतात. त्यातील काही प्रमुख म्हणजे आंबा, पळस, काटेसावर, बकुळ, पांगारा, कडुनिंब, कांचन, बहावा इत्यादी..
यातील बरेच वृक्ष हे 'दोहद वृक्ष' म्हणून ओळखले जातात. म्हणजे सुंदर स्त्रियांनी यांचे दोहद (डोहाळे) पुरवल्यास ते फुलतात अशी कवीकल्पना आहे.
स्त्रीणां स्पर्शात् प्रियङ्गुः विकसति बकुलः सीधुगण्डूषसेकात्
पादाघातात् अशोकः तिलककुरबकौ वीक्षणालिङ्गनाभ्याम्
मन्दारो नर्मवाक्यात् पटुमृदुहसनात् चम्पको वक्त्रवातात्-
चूतो गीतात् नमेरुः विकसति च पुरो नर्तनात् कर्णिकारः

सुंदर स्त्रीच्या स्पर्शाने प्रियंगु, तिच्या मद्याच्या चूळीने बकुळ, लत्ताप्रहराने सीताअशोक, नेत्रकटाक्षाने तिलक, आलिंगनाने कोरांटी, नर्मवाक्याने मंदार, स्मितहास्याने चंपक, हळुवार फुंकरीने आंबा, गीताने नमेरू आणि समोर नृत्य करण्याने कर्णिकार हे वृक्ष बहरतात.
संदर्भ:
श्री द महाजन सर यांचे लेख.
कल्पसुमांची माला - नीला कोर्डे
लोकसत्तातील काही लेख
लेखातील काही छायाचित्रे आंतरजालावरून साभार.
सर्वांगसुंदर लेख !
सर्वांगसुंदर लेख !
वसंतोत्सवाचे वर्णन बहारदार आहे, बैजवार बयान्वार 👌
कामदेवाचे एक नाव फार आवडते - चित्तज. मनात, चित्तात जन्मणारा.
आजच तो लत्ताप्रहराने फुलणारा अशोकही आठवला होता.
सुरेख लेख झालाय.
सुरेख लेख झालाय.
आत्ता अधाशासारखा वाचला. जरावेळाने परत शांतपणे समजुन, गूगल सर्च करत वाचेन. तारकासुर कार्तिकेय गोष्ट मला ठाऊक नाही, ती काय त्याची आधी उत्सुकता आहे.
धन्यवाद अनिंद्य आणि अमितव
धन्यवाद अनिंद्य आणि अमितव
तारकासुरला त्याचा वध शिवपुत्राच्या हातून होईल असा वर मिळाला होता. त्या अनुषंगाने शिव पार्वती विवाह, कुमार कार्तिकेय जन्म आणि तारकासुर वध असे "कुमारसंभव" मधे लिहिले आहे.
सुरेख झालाय लेख, माहितीपूर्ण.
सुरेख झालाय लेख, माहितीपूर्ण.
सौर दिनदर्शिकेपर्यंत वाचलं.
सौर दिनदर्शिकेपर्यंत वाचलं. थोडंफार माहीत होतं. आता आणखी माहिती मिळाली.
आकाशवाणीच्या रोजच्या प्रक्षेपणाची सुरुवात भारतीय सौर दिनांक सांगून करतात. शासकीय कागदपत्रांतही तिची नोंद असते.
पुढचं सावकाश चवीचवीने वाचेन.
सुंदर लेख.
सुंदर लेख.
अप्रतिम लेख!
अप्रतिम लेख!
तरुणीच्या लत्ताप्रहाराने बहरणारा अशोक वृक्ष ऐकून माहिती होता, बाकी नव्याने समजलं.
सौर दिनांक आत्ता थोडे समजले, आधी नुसतंच वाचलं होतं कालनिर्णय मधे पण काहीच समजलं नव्हतं.
एकदा पटकन वाचून रुमाल टाकून
एकदा पटकन वाचून रुमाल टाकून ठेवतेय. भारतिय सौर दिनांक वगैरे नीट वाचायचं आहे.
प्रियंगु म्हणजे नेमकं कोणतं झाड? नवग्रहस्तोत्रात
प्रियंगुकलिकाश्यामम् असा उल्लेख आहे बुधासाठी.
एकदा पटकन वाचून रुमाल टाकून
डपो
मस्त झाला आहे लेख !!
मस्त झाला आहे लेख !!
नेहेमीप्रमाणेच उत्तम लिखाण.
नेहेमीप्रमाणेच उत्तम लिखाण. अधाशासारखा लेख वाचून काढला . नंतर पुन्हा नीट रेफेरेंन्सस बघून आरामात वाचणार आहे.
भारतिय सौर दिनांक परत वाचणार आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण लेख ऋतुराज.
अतिशय अभ्यासपूर्ण लेख ऋतुराज. तुमच्या आयडीला साजेसा विषय
माझ्या माहितीनुसार वसंतसंपातानंतरचा दिवस, हा भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला पहिला दिवस असतो. सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करतो, तो काळाचा एक विशिष्ट बिंदू असतो, तो त्या त्या वर्षी सकाळी-दुपारी-संध्याकाळी-रात्री कधीही असू शकतो. तो बिंदू ओलांडला की दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात.
अतिशय सुरेख आणि माहितीपूर्ण
अतिशय सुरेख आणि माहितीपूर्ण लेख . काही गोष्टींची नव्याने ओळख झाली.
सुंदर लेख.
सुंदर लेख.
सुंदर लेख
सुंदर लेख
छान लेख आणि माहिती
छान लेख आणि माहिती
मस्त झालाय लेख.
मस्त झालाय लेख.
सुरेख झालाय वासंतिक लेख,
सुरेख झालाय वासंतिक लेख, माहितीपूर्ण.
अतिशय सुरेख व माहितीपूर्ण लेख
अतिशय सुरेख व माहितीपूर्ण लेख. साहित्यिक संदर्भांनी वसंताचाच बहर आहे लेखाला.
प्रियंगु म्हणजे नेमकं कोणतं
प्रियंगु म्हणजे नेमकं कोणतं झाड?>>>>> एसर, Callicarpa tomentosa
माझ्या माहितीनुसार वसंतसंपातानंतरचा दिवस, हा भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला पहिला दिवस असतो.>>>>> वावे, तुमचा यात खूप अभ्यास आहे. पुन्हा एकदा संदर्भ वाचतो
ऋतुराजा, बहारदार झाला आहे
ऋतुराजा, बहारदार झाला आहे लेख..! अभ्यासपूर्ण ! तुमच्यासाठी सहजसोपे असलेले आमच्यासाठी सहज करून दिलेत..!
खूप छान...सुरेख लिहलयं..
खूप छान...सुरेख लिहलयं..
अप्रतिम लेख
अप्रतिम लेख
समयोचित
उत्तम माहिती
शब्दशः बहारदार लेख! सहज उघडला
शब्दशः बहारदार लेख! सहज उघडला आणि खिळवून ठेवले एकेक वाक्याने. फारच सुंदर! आयडीशी समर्पक लेख
ते वेगवेगळ्या वृक्षांबद्दल तिकडे चर्चा सुरू झाली त्याचे मूळ इथे होते असे दिसते
नीलोत्पल हे वरच्या फोटोतल्या निळ्या कमळाचे नाव आहे का? रामरक्षेत "ध्यात्वा नीलोत्पलं श्यामं रामं राजीवलोचनं" आहे ते आठवले. त्याचा अर्थ या कमळाप्रमाणे निळा किंवा सावळा राम आहे असा काहीतरी असेल मग. मला नीट माहीत नाही.
अप्रतिम झाला आहे लेख.
अप्रतिम झाला आहे लेख. वाचायला घेतला तर संपला कधी कळलं ही नाही एवढी गुंग झाले वाचताना.
ध्यात्वा नीलोत्पलं श्यामं
ध्यात्वा नीलोत्पलं श्यामं रामं राजीवलोचनं"
>>> तू लिहिलेले योग्य आहे. संपूर्ण अर्थ - नीलकमलाप्रमाणे (नीलोत्पल) सावळ्या वर्णाच्या, राजीव ( धारदार, विशाल कमळाच्या पाकळ्यांसारखे) नेत्र असणाऱ्या सीता व लक्ष्मण यांसह राहणाऱ्या, जटारूपी मुकुटाने शोभणाऱ्या, तलवारीसह भाता, धनुष्यबाण हातांत धारण करणाऱ्या , (नक्तचर - निशाचर ) राक्षसांचा नाश करणाऱ्या, जगाचे रक्षण करणाऱ्या जन्मरहित रामचंद्राचे ध्यान करू!
कमळ सगळ्यात पवित्र व आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानतात. सहस्रार चक्र ( मस्तकातले अमूर्त - non physical) ते सुद्धा सहस्र पाकळ्यांचे कमळच आहे. आणखी - वामाङ्कारूढसीतामुखकमलमिल्ललोचनं नीरदाभं, पद्माक्षं पीतवाससम्, कमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् - असेही कमळाचे उल्लेख/ उपमा रामरक्षेत आहेत.
मस्त माहिती. लेख आवडला.
मस्त माहिती. लेख आवडला.
सौर पंचांग माहित नव्हते पण रोज सकाळी कानी पडायचे. नंतर थोडी शोधाशोध केली होती. वरच्या लेखामुळे अजुन माहिती मिळाली.
वसंत पंचमी जानेवारीत कशी हा प्रश्न नेहमी पडायचा
यावर्षी फेब १८ ला सौर वसंत ऋतु सुरु झाला असे कालनिर्णय म्हणतिय.
. अशा या मदनमहोत्सवाची खूप शृगांरिक आणि रसभरीत वर्णने संस्कृत काव्यात आढळतात. विस्तारभयामुळे ते इथे देणे टाळतो.>>
आपल्याकडे जागा भरपुर आहे … होऊद्या खर्च..

इतकी वसंताची होळीची चर्चा आणि
इतकी वसंताची होळीची चर्चा आणि त्यात गाण्याचा उल्लेख लिंका काही नाही हे फारच खटकत होतं.
'बसंत' हा आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक प्राचिन आणि मोहक राग आहे. स्वर बघितलेत तर पूर्वी थाटातील 'रे' आणि 'ध' कोमल म्हणजे अर्थात संधीप्रकाशातील स्वर, आणि 'म' तीव्र त्यामुळे संध्याकाळच्या, सूर्य अस्ताला जाण्याच्या संधीप्रकाशातील सगळे स्वर आहेत. पूरीया धनाश्री, पूर्वी, श्री, परज आणि बसंत सगळ्या रागांतील स्वर जवळपास सारखेच. पूरीया धनाश्री संधीप्रकाशात गातात, बसंत मात्र रात्रीच्या पहिल्या प्रहरात. कारण त्यात एक पूर्ण उदय नसला तरी राजबिंडा नवोन्मेश जाणवतो.
मारवा ही तसा संध्याकाळचाच राग, पण मारव्यात जे एक दु:ख, वेदना जाणवते त्यात क्वचित पण धीरगंभीर लागणार्या षड्जामुळे परीपूर्ती येते. त्यापेक्षा पूरीया धनाश्रीत ध कोमल असल्याने आणि प असल्याने ही वेदना पार कारुण्याकडे, लीनतेकडे कूच करते. या लीनतेतून ती वर येईल, कधी काही प्रकाश दिसेल याची सुतराम शक्यता पूरीया धनाश्रीत मला तरी दिसत नाही. 'मुशकील करो आसान, ख्वाजा मोरे' (यात ही ही पोस्ट लिहिताना एक गंमत सापडली. लहानपणी पूरीया धनाश्री मधील ही बंदीश 'मुशकील करोगे आसान 'आज' मोरे', अशी शिकवली होती. आता 'ख्वाजा मोरे' चे 'आज मोरे' आणि पुढील ख्वाजाचे सगळे संदर्भ 'राग-बोध' मध्ये देवधरांनी बदलले का आमच्या गायन मास्तरांनी त्याचे हिंदू-करण केले कोण जाणे. पण काल अश्विनी भिड्यांच्या आवाजात ख्वाजा मोरे ऐकलं आणि गंमत वाटली) ही बंदीश कदाचित ऐकली असेल. पण हेच स्वर बसंतात लागले की एक त्यात एक राजस, नवोन्मेश होईल अशी आस हुरहुर लावतात.
भीमसेन जोश्यांची फगवा ब्रिज देखन को चलोरी इथे 'आणखी एक' आहे, ऐकली नसेल तर जरुन ऐका. फगवा म्हणजे अर्थात फाल्गुन.
व्यंकटेश कुमारांची इथे आहे.
बेगम परवीन सुलतानांनी मीरेचे 'फागुन के दिन चार, सब फुलन फूलि बहार' ही दिलशात खान यांनी रचलेली बसंत मधली रचना छान आहे. परवीनजींचा आवाज तडतडत्या विद्युल्लखेसारखा ग्लाईड होतो. नदीच्या या तटावरुन त्या तटावर कोणी पाण्यावरुन चालत जाऊ लागला तर त्याला ज्या वेगाने जावं लागेल, तशी त्या दृत ताना नुसत्या खालील स्वराची जागा दाखवत आपल्याला काही समजाच्या आत सहा स्वरपुढे गेलेल्या असतात. त्या ताना मेंदुत तयार होऊन कंठातून क्रिस्पली बाहेर येताना त्यांच्या एकुण मेंदुची काय अवस्था असेल? कदाचित हे सगळं मेकॅनिकल ही झालं असेल, पण हे सगळं होतय ते किती सहज आहे ते चेहर्यावरील मार्दव आणि मंद स्मित दाखवतं. अंगावर रोमांच येतात त्या ताना ऐकताना.
फार वहावत गेलोय, त्यामुळे आणखी जास्त लिंका देऊन धागा हायजॅक करत नाही, पण राशीद खान आणि अश्विनी भिडे देशपांड्यांचे अनेक बसंत ही युट्युब वर आहेत. रस असेल तर जरुन ऐका.
हे झालं थोडं बसंत रागाबद्दल, होरी गीते हा वेगळाच विषय. फॉलोड बाय कजरी आणि चैती!
मी गेले चार दिवस फक्त सायंकालीन राग ऐकतोय.
. अशा या मदनमहोत्सवाची खूप
. अशा या मदनमहोत्सवाची खूप शृगांरिक आणि रसभरीत वर्णने इथे देणे टाळतो.>>
आपल्याकडे जागा भरपूर आहे …
साधना यांना अनुमोदन.
अमितव, सुंदर सुरेल पोस्ट. संगीताबद्दल काही आले नाही हे खटकत होते, वो कमी आप ने पूरी कर दी. ❤
आता चैत्र आलाच आहे दाराशी, चैती ऐकवा कुणी.
सुरेख आणि पॅशनेटली लिहिलेयस
सुरेख आणि पॅशनेटली लिहिलेयस अमित.
मला फक्त वसंतावरचे "सकल बन" आठवले हिरामंडीतले. आमिर खानच्या "अर्थ" मधले ऋत आगयी रे , ऋत छा गयी रे - हे एक. हिंदी सिनेमात भरपूर आहेत.
अनिंद्य, तुम्ही येऊ द्या लेख कामसूत्रावर आणि ऋतुराज, शृंगारिक वर्णनं येऊ द्या. बिघडवा बरं माबो! पॅशन हवी लेखनात, विषयात. नुसती थंड पडते माबो बरेचदा.
Pages