जगणं.. ज्याचं त्याचं..
नेहमीसारखी खाजगी शिकवणी आटोपून ती बसस्टॉप कडे वळली. अजून तीन महीने बाकी होते, ह्या वर्षाची शिकवणी संपायला. मग ह्या मुलांच्या परीक्षा! नंतर मग त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील. शिकवणीतून मिळणारी कमाई थांबेल, मग दोन/तीन महीने.
तशी तिच्या कमाईची घरी खूप गरज होती असंही नाही. पण तिनेच ठरवलं होतं, ‘माझ्या शिक्षणाचा, कॉलेजचा खर्च मी करणार’. तेवढेच चार पैसे मिळत होते, अन् त्या पैशांवर मग तिला तिचे इतर छंदही जोपासता येत होते, घरून पैसे नं मागता. कॉलेजची सकाळची वेळ सांभाळून दुपारची ही दोन तासांची शिकवणी सहज जमत होती तिला.
दरवर्षी मिळतही होत्या तिला अशा एखाद दोन शिकवण्या. परवडत असेल, तर लोकं घरी येऊन शिकवणारे टीचरच पसंत करतात. हा भाग तसा खूपच सुखवस्तू वस्तीचा आहे. गेले दोन वर्ष ह्या भागातच ती रोज येत होती, शिकवणी घ्यायला.
आत्ता आत्तापर्यंत तर सगळंच चांगलं होतं. पण हल्लीच कॉलनी जवळच्या ह्या हमरस्त्यावर कोपऱ्यावरचं हे नवीन दारूचं दुकान सुरू झालं होतं. सिट रिक्शा मिळवण्या करता तिला तिथेच उभं रहायला लागायचं. तिला अगदी नको वाटायचं तिथे थांबायला. तसा त्या दुकानात येणाऱ्या लोकांचा तिला काही त्रास नव्हता. येणारे जाणारे तिथे येऊन आपली खरेदी करून मुकाट्याने निघून जात होते. पेहरावावरून येणाऱ्यांचा असलेला नसलेला ‘क्लास’ कळत होता.
येणारी काही माणसं स्वस्त दारू घेणारी असली, तरी कुणी काही तिथे उभं राहून दारू पीत नव्हतं. माणसं तिथे येऊंन कागदात गुंडाळलेली बंद बाटली घेऊन निघून जात होती. पण तिलाच भीती, किळस अन् घृणाही वाटायची त्यांच्याकडे बघतांना. पैसे वाल्यांच ठीक आहे पण बाकीच्यांच काय? अगदी फाटके दिसतात. आता तो कोपऱ्यातला.. खिशात नसेल पैसा.. असलाच तर घरी कुणाला मारून मुटकून आणला असेल.. पण छंद बघा ह्यांचे.. कसले हे दारुडे लोकं! आजही रिक्षाची वाट बघतांना तिने तुच्छतेने दुकानातल्या गर्दीकडे बघितलं.
*
पाठीवर पडलेली बोचरी नजर त्याला जाणवली. त्याला सवय होती, लोकांनी त्याच्या वाऱ्याला उभं नं राहण्याची.. त्यांच्या तुच्छ नजरांची.. तो जवळपास असला, की नाकाला रुमाल लावण्याची.. किमान तोंडावर हात ठेवण्याची तरी. नेहमीच वास यायचा त्याच्या अंगाला. ‘तुमाला हा वास मिनिटभर चालत नाई.. अन् आमी आठ दहा तास उभं ऱ्हातो त्या वासात..’ त्याच्या मनात आलं. कामच तसं होतं त्याचं.. नाले गटारी साफ करण्याचं. त्याच कामावर तर त्याचं अन् त्याच्या घरच्यांचं पोट भरत होतं.
‘कामावर असतांना दोन घोंट पोटात असले की वास नाई येत कसले.. ठेकेदाराला बी माईती आसतं त्ये.. फार राडा नाई झाला तर, काई बोलत नाई तो बी.. आन् राती ला बी चार घोंट पोटात आसले की मं गुमान झोप लागते.. मेल्यावानी..’
त्याच्या घरी जाण्याच्या वाटेवरचं हे दुकान होतं. आज इथे जरा जास्तच गर्दी होती. उद्याची सुट्टी होती कसली तरी.. भारी माणसं पण दिसत होती आज इथे. पाठीवरची नजर झेलत तो अंग चोरून पुढे सरकला. ‘श्रीमंत करतात ती पार्टी.. गरीब करतात तो दारू पिऊन दंगा.. काई मानसं.. घालतात बी पिऊन गोंधळ.. नाई असं नाई.. पन सगळेच नाई करत तसं..’
‘आता तो पलीकडे उबा असलेला पोरगा.. बारकाच दिसतोय.. तो तर कधी तोंड उघडून बोलत असेल आस पण नाई वाटत.. तो सोता करता उबा हाये.. का कुनी पाटवलं म्हून आलाय..’ हल्लीच अधून मधून दिसायला लागलेल्या त्या नवीन पोराकडे त्याचं लक्ष गेलं.. दिसतो तसा आपल्या पैकीच.. पन अंगावरचा लाल शर्ट झकास हाये.. म्हागाचा दिसतूय शर्ट... मालकानं दिला आसल.. ’ त्याने गळ्यातलं फडकं घामेजल्या चेहऱ्यावर फिरवलं..
*
लाल शर्ट वाल्याने चोरट्या नजरेने आसपास बघितलं. ह्या भागात तसं त्याला कुणी ओळखत नव्हतं. चार महिन्यांपासून यायला लागला होता तो मुकदमा बरोबर इकडे, बांधकामावर मजूर म्हणून. अजून शिकावू कामगार होता, म्हणून मुख्य कारागिराच्या हाताखाली काम करावं लागत होतं त्याला. सुरवातीला काही दिवस तर काम मिळल्याचाच आनंद वाटत होता. दर आठवड्याला मिळणाऱ्या पैशांचा आनंद झाला होता. नंतर मात्र ह्या कामापाई दुखणारं अंग रात्री ठसठसत असायचं. डोक्यावर पाट्या घेऊन दिवसातून कितीदा तरी चार सहा मजले चढायला उतरायला लागायचे. रात्री मान पाठ दुखून यायची. पण सांगणार कोणाला?
बाप तर कधीच गेला होता दारू पिऊन. म्हणूनच आपण कधीच दारूला हात लावायचा नाही असं त्यानं ठरवलं होतं. चारदा दहावीची परीक्षा दिली, पण दरवेळी इंग्रजी अन गणित आडवं आलं. मग सोडला नाद शिक्षणाचा. पूर्वी आई पण बांधकामा वरच काम करायची. मग तिने तिच्या महितीतल्या मुकदमा कडे पाठवलं त्याला अन् लागला तो ह्या कामाला. आता आईला हे काम झेपत नाही म्हणून ती घरकाम करते चार दोन ठिकाणी. अन् तो करतो शिकावू कामगार म्हणून काम.
त्याने अंग ठणकायची ठुसठुस सोबत्याकडे बोलून दाखवली तेव्हा सोबत्यानेच हा उपाय सांगितला. ‘फार वाटलं तर थोडी टाकत जा म्हणे..’ त्याला बापा सारखी सवय लागायची भीती वाटत होती, म्हणून नेहमी नाही पण कधी मधी.. पगाराच्या दिवशी थोडीशी घेऊन ठेवायचा तो जवळ. अधून मधून घ्यायला. त्याने परत चोरट्या नजरेने इकडे तिकडे बघितलं.
त्याचं लक्ष रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या मोठ्ठा गॉगल लावलेल्या बाईकडे गेलं. चेहराभर गॉगल अन् अंगावर वेगळेच कपडे होते तरी त्याने ओळखलं त्यांना. नवीन काम लागलं तेव्हा पंधरा दिवस त्यांच्या घरात काम करायला जात होता तो. जुनं स्वयंपाकघर बदलून नवीन केलं होतं त्यांनी. एवड्या धुळीची सवय नव्हती एकदम.. ठसका लागायचा. तर भरपूर साखर घालून चहा करून द्यायची ती. लई प्रेमळ बाई. रोज खायला प्यायला विचारायची.. काहीतरी हातावर पण ठेवायची.. घरची चौकशी पण करायची बोलता बोलता.. तिनेच हा तिच्या पोराचा टी-शर्ट दिला होता. एवडा छान शर्ट, पण रंग आवडला नाही म्हणून वापरलाच नाही म्हणे पोराने कधी! तिचं बहुतेक त्याच्याकडे लक्ष गेलं. तो जरा आतल्या बाजूला सरकला, तिच्या नजरेआड.
*
ती रस्त्याच्या पलीकडे मैत्रिणीच्या गाडीची वाट पहात उभी होती. एरवी खरं तर ती स्वत:चीच गाडी काढायची बाहेर जायला पण आज सगळ्या मैत्रिणींचं मिळून शहराबाहेरच्या लांबवरच्या फार्महाऊस वर जायचं ठरलं होतं, जरा मस्ती मजा करायला. परत यायला बरीच रात्र होणार होती, मग चार-चार मैत्रिणी एकेका गाडीत असं ठरलं होतं. मग तीच म्हणाली होती, ‘गाडी आत कॉलनीत आणण्यात वेळ नका घालवू. मी येईन कोपऱ्यापर्यंत चालत. तिथे यायच्या फक्त दहा मिनिटं आधी सांगा मला.’ तसा फोन आल्यावर ती घरून निघाली, अन् इथे रस्त्याच्या पलीकडे, फार्महाऊस कडे जाण्याच्या दिशेने उभी राहिली.
असं इथे येऊंन उभं रहाण्याची वेळ कधीच येत नाही. ती आपली इकडे तिकडे बघत होती. हे समोरचं दुकान नवीन झालेलं दिसतय.. तिचं आत्ता तिकडे लक्ष गेलं. एरवी फुर्रकन गाडीतून जातांना ह्या गोष्टी लक्षातच येत नाही. ती निवांतपणे तिकडे बघत होती. अचानक तिला ओळखीचं काही तरी दिसल्या सारखं वाटलं. ती आणखीनच निरखून बघायला लागली. हो. तोच तो लाल शर्ट.. आत्ता जरा आडोश्याला गेलाय.. पण तिने ओळखला तो शर्ट. वर्ष सहा महीने नुसताच कपाटात पडून होता. शेवटी मुलगा हॉस्टेलला गेला, आणी आता तो नाहीच वापरणार ह्याची खात्री पटल्यावरच तिने तो कुणाला द्यायला म्हणून काढला होता. तिला आठवला त्या मुलाचा चेहरा.
किचनचं काम सुरू झालं तेव्हा कसली धूळ माती झाली होती घरात! ती तर दिवसभर आतल्या बेडरूम मध्ये दार लावून बसलेली असायची. तेव्हा हा मुलगा अन् त्याच्या बरोबर एक मिस्त्री असे दोघेच घरात काम करत असायचे दिवसभर. हा मुलगा त्याचा सोबती सांगेल ते काम करत असायचा. त्याला हाताशी लागेल ते सामान देणं तो सांगेल तिथे हातोडा मारत रहाणं.. मग पाट्या भरून काढलेल्या सगळ्या विटा न् माती खाली नेऊन टाकणं...
मध्येच ती बाहेर यायची काम बघायला, अन् काही चहा पाणी विचारायला. तेव्हा थोडं बोलणं व्हायचं त्या दोघांशी. तेव्हा गोड मीट्ट चहा दिला की कसला चेहरा उजळायचा त्याचा. तसा लहानच होता हा मुलगा. तिच्या केयूरपेक्षा एक दोन वर्षांनी तरी लहानच असेल. सावळा रंग अन् मोठे डोळे. केवढ्या लहान वयात एवढं मेहनतीचं काम दिवसभर करतोय..! तिला कणव यायची. अंगावरचा शर्ट अगदीच विटला होता त्याच्या. मग तिनेच दिला होता त्याला तो शर्ट.
तो मुलगा दारूच्या दुकानासमोर? वडिलांच्या दारूने त्यांना मारलं म्हणणारा? तो आता गर्दीत आडोश्याला होता. तिने किंचित ओणवून आणखींन निरखून पहायचा प्रयत्न केला. तो तोच असणार हे नक्की. तिथे जाऊन आवाज द्यावा का त्याला? बोलावं जरा त्याच्याशी? की त्याला लाज वाटेल आता बोलायला? ती जरा थबकली.
*
एका हातात कागदात गुंडाळलेली बाटली अन् दुसऱ्या हाताने परत परत घामेजला चेहरा पुसत हातात धरलेलं फडक घेऊन तो बाहेर आला.
रिक्षाची वाट पाहणारी नजर अंगावर शहारे आणत अधून मधून इकडेच वळत होती. काय नव्हतं त्या नजरेत..? किळसवाणापण.. .. स्वत: खूप उंचीवर असल्याचा भाव.. गाडीवाल्या श्रीमंत माणसांकडे बघेल का ही अशी? त्याच्या मस्तकात सणक गेली.. इथेच उभं राहून एक घोंट घ्यावासा वाटला.. त्या मुलीकडे नजर लावत तो तिथेच थांबला..
*
तिच्या अंगावर शहारे आले. नजर परत रस्त्याकडे वळली रिक्षेकरता... चार पावलं टाकली तिने जाण्याच्या दिशेने.. इतक्यात मागून एक जवळपास भरलेली रिक्शा तिच्याजवळ येत थांबली. ती चटकन आत शिरली, सगळंच नजरे आड करण्याकरिता.. अन् इथून निसटण्या करिता..
*
“कुठे लक्ष आहे मॅडम? आम्ही इकडून आलो..” पुढ्यात उभ्या ठाकलेल्या गाडीतून मैत्रिणींच्या खिदळण्याचा आवाज आला. गाडीचं दार तिच्याकरता उघडलं गेलं होतं. तिचं जग वेगळं होतं.. ती मुकाट्याने गाडीत बसली.
*
गर्दीत लपलेल्या त्याचं लक्ष तिच्याकडेच होतं. समोरून ती दिसेनाशी होताच तो आडोसा सोडून बाहेर आला. गाडी गेली त्या दिशेने तो बघत राहिला. त्याला त्या बाईचं बोलणं.. तिची प्रेमळ नजर आठवली.. ‘बापाचं झालं ते जाऊ दे.. पण तू नको त्या नादाला लागूस..’ त्याच्या कानात तो आवाज घुमला. ‘तसच तर पूर्वी ठरवलं होतं नं आपण..? कधीच नाही प्यायची असं..? सुरवातीला बाप तरी कुठे नाद लागेल म्हणून प्याला आसंल..? पण आपण लागलो सोबत्याच्या नादी.. आता नको पण.. काम सवईचं झालं का थांबल ही ठसठस..’
दुकानाकडे पाठ करून दुखऱ्या शरीराने, पण शांत मनाने तो त्याच्या सायकल कडे वळला, घरी जाऊन निवांत झोपण्यासाठी..
******************** .
चांगली मांडली आहे कथा..
चांगली मांडली आहे कथा..
आधी अगदीच दुखरी कथा असेल असं
आधी अगदीच दुखरी कथा असेल असं वाटलं. पण आवडली. साखळी चांगली जमली आहे.
चांगली जमली आहे कथा.
चांगली जमली आहे कथा.
मस्त जमली आहे कथा! किती
मस्त जमली आहे कथा! किती आयुष्य एकमेकांना कळत नकळत स्पर्श करत असतात!
छान लिहिलेय… दोन्ही कथा
छान लिहिलेय… दोन्ही कथा आवडल्या.
त्या लाल शर्टवाल्याची कथा वाचताना जुना एक प्रसंग आठवला. फॅक्टरीत एकतिस मार्चच्या स्टॉक टेकिंगला मी कंपनीची माणुस म्हणुन आणि एक ऑडिटर मुलगी अशा दोघी होतो. प्रत्येक मटेरियलचे एक कार्टन उघडुन चेक करुन बाकीच्या कार्टनची लिस्ट करुन त्यावरुन त्या मटेरियलचा पुर्ण स्टॉक काढायचा वगैरे कामे होती. एक कामगार आमच्यासोबत होता. तो कार्टन वरुन उतरवा, उघडा, परत ठेवा वगैरे करत होता, आम्ही दोघी मोजत होतो. दिवस संपला तेव्हा आम्ही दोघी दमुन खुर्च्यांवर पडलो. तो बिचारा जमिनीवर जवळपास कोसळुन पडला. बराच वेळ आम्ही तिघेही काही न बोलता तसेच बसुन होतो. नंतर आम्ही दोघी उठुन वरच्या मजल्यावर ऑफिसात परतलो आणि चहा घेतला. मी ऑडिटरला म्हणाले की सगळी अंगमेहनत त्याची, आपण नुसते मोजत फिरलो. तरी आपण इतके दमलो. तो बिचारा आपल्यापेक्षा दमला..त्याने घरी जाताना दोन पेग मारले तर त्याचा दोष आहे असे म्हणता येणार नाही
धन्यवाद धनवन्ती , भरत, वावे,
धन्यवाद धनवन्ती , भरत, वावे, सुगंधी,साधना.
आवडले लिखाण स्लाईस ऑफ लाईफ
आवडले लिखाण
स्लाईस ऑफ लाईफ
कथा आवडली!
कथा आवडली!
छान झाली आहे कथा
छान झाली आहे कथा
खुप आवडली कथा. तुमची लेखनशैली
खुप आवडली कथा. तुमची लेखनशैली तर नेहमीच आवडते.
धन्यवाद हार्पेन , स्वाती,
धन्यवाद हार्पेन , स्वाती, निर्मल, पर्णिका.
छान जमलीय कथा. @साधना +१.
छान जमलीय कथा.
@साधना +१.