१. बॉर्डर-२. कामावरच्या लोकांनी जबरदस्तीनं नेलं म्हणून बघितला. साडेतीन तासांचा पिक्चर. जीव आंबून गेला. कायबी दाखवलंय. बिदागीच्या मानानं सनी देवलला लैच पिदवून घेतलंय ह्यांनी. लैच काम करून घेतलंय. थकलंय ते सनी देवल. चालताना डक माराय लागलंय. आराम करू द्या त्येला आता. कशाला उगाच तेच्या म्हाताऱ्या हाडांना त्रास देता?
२. दोन दिवस कोकण ट्रिप. मुरूड. सुवर्णदुर्ग. आंजर्ले.
मुक्काम एका लॉजमध्ये. गादी पार सपाट झालीय. ह्या गादीवर आजवर किती जणांनी कार्यक्रम केला असेल काय माहित.!
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर बोटीतून. आठदहा पर्यटक एका बोटीत. त्यात एक जर्मन कपल. बोट किल्याच्या धक्क्याला लागल्यावर बोटवाल्यानं इशारावजा घोषणा केली की सगळेजण अर्ध्या तासात किल्ला बघून माघारी या. उशीर झाला तर हितंच सोडून परत जाईन.
जर्मन कपलनं तो इशारा सिरीयसली घेतला असावा. बिचारे खरोखरच अर्ध्या तासात घाईघाईत घाबरत घाबरत किल्ला फिरून माघारी आले की हा भारतीय बोटवाला आपल्याला इथंच ह्या अज्ञात बेटावर सोडून जाईल म्हणून.! असा कसा सोडून जाईल? काय मजाक है का? 'गुमनाम' पिच्चर चाललाय गा इथं?
३. आज बॉस महिनाभराची युएस ट्रिप मारून माघारी आले. येताना चॉकलेट्स घेऊन आलेले.
"घ्या की चॉकलेट" म्हणत प्रवासवर्णनाची पहिली इन्स्टॉलमेंट ऐकावी लागली. आता उर्वरित भाग हफ्त्याहफ्त्यानं प्रसारित होत राहिल. बहुतेक पुढचा महिनाभर.
''तिकडं आपल्यासारखी ट्रॅफिक नसतीय. आपल्याकडं गाडीला गाडी चिकटती. तिकडं शंभर शंभर किलोमीटर रस्ता मोकळा. आणि सिग्नल तोडला की गोळ्याच घालतेत डायरेक्ट.! लगेच पोलिसगाड्या झामझूम करत लायटा चमकवत येतेत. ते बघूनच माणूस निम्मा गार पडतो.''
सायेब काय आता थांबत नाईत. आता एकामागून एक लडी उलगडत जाणार यांच्या. तुमी कायपण करा. जांभया द्या, टाळ्या वाजवा, सगळं पटल्याचं नाटक करून उठायचा प्रयत्न करा. काय करता ते करा. आता काय हे थांबत नाईत.
४. रमण महर्षी आणि निसर्गदत्त महाराजांच्या नॉन-ड्युॲलिटीच्या अचूक शिकवणुकीमुळं तिकडं सगळे फॉरेनर्स पटापट एनलाईटन् व्हायला लागलेत. यूट्यूब वर नुसतं नॉन-ड्युॲलिटी टाकायचा अवकाश, शेकडो एक्स्पर्ट्स हजर.! झाडून सगळे फॉरेनर्स. आपण साला ह्यातपण मागंच !
अर्थात हे स्वाभाविकच आहे म्हणा. इथं लोकांचे अजून पोटाचेच प्रश्न सताड खुले आहेत. त्यामुळं इथं चिठ्ठ्या काढून भुतं पळवणाऱ्या बाबापुढंच गर्दी उसळणार.
५. पीएमटी ही काय फर्स्ट टायमरसाठी नाही. हे स्टाईलमध्ये, रिलॅक्स पोजिशनमध्ये प्रवास एंजॉय करण्याचं वाहन नाही. उभे असाल तर शोलेमधल्या ठाकूरच्या पोजमध्ये हात दोन्ही बाजूंच्या हॅंडल्सना घट्ट पकडून ठेवा. बसलेले किंवा खरंतर कुठल्याही पोजमध्ये असा, बसचा जो कुठला भाग (खुर्चीची पाठ, दांडा, पत्रा इत्यादी) हाताला लागेल त्याला घट्ट धरून असा. कारण सगळं जग अस्थिर आहे. नश्वर आहे हे सगळं. कधीही काहीही होऊ शकतं. ड्रायव्हर कधीही काचकन् ब्रेक मारू शकतो आणि तुमचे दात पडू शकतात.
बाकी मला एक गोष्ट कळत नाही, महापालिकेनं इथं फक्त वीस रूपयांच्या तिकीटावर पाहिजे तेवढा थरार बिनबोभाट उपलब्ध करून दिलेला असताना, लोकं कशाला येड्यासारखे पैसे खर्चून ॲडव्हेंचरस राईड वगैरे करायला जातात रिसॉर्ट्समध्ये वगैरे?
६. हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. सेव्ह करून ठेवा. त्यात तुमचं काही नुकसान होणार नाही. झाला तर फायदाच होईल. असंय की माझ्या मनात रोज नवनवीन सुविचार उगम पावत असतात. ते सगळे कंपाईल करून मी रोज सकाळी ठीक आठ वाजता माझ्या स्टेटसला ठेवतो. सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठपर्यंत तुम्ही ते बघू शकता. नाही, नाही, फक्त एकदाच बघता येतं असं नाही. चोवीस तास तुम्ही कितीही वेळा आणि कितीही वेळ बघत बसू शकता. त्याला काही लिमिट नाही.
७. कोणे एके काळी एक आटपाट नावाचं नगर होतं. त्या नगरात एक नॉन-बायोलॉजिकल मनुष्य जन्माला आला. तो लहानपणीच घर सोडून पळाला. शिक्षणबिक्षण सगळं सोडून पळाला. नंतर लग्न केलं आणि बायको सोडून पळाला. पुढे राजा झाला आणि पत्रकार परिषदांपासून सुसाट पळाला. पळता पळता अखेरीस कायदेमंडळातूनही पळाला. या महामानवानं फक्त एकच सूत्र आयुष्यभर सचोटीनं पाळलं. क्रेडिट घ्यायला सगळ्यात आधी हजर आणि जबाबदारी घ्यायची वेळ आली की जो तुम उचित समझो वो करो.
८. हे पावलांचं चांगलं सापडलंय. पावलं धरतीवर स्पर्शून ठेवायची. धरतीची स्तब्धता आत झिरपू द्यायची. आणि मग आजूबाजूला न्याहाळत रहायचं की काय काय स्तब्ध आहे आणि काय काय हलतं आहे??
हे ग्राऊंडेड रहाणं. पावलं पृथ्वीशी जोडून आपण झाडासारखं स्तब्ध. पावलांखाली पृथ्वीची ही स्तब्धता आपल्याला पाहिजे तेव्हा उपलब्ध. पृथ्वीपेक्षा जास्त स्तब्ध दुसरं काय असणार आहे? तर पावलं पृथ्वीशी कनेक्ट करून आपण स्वतःला हवं तेव्हा रिचार्ज करू शकतो. चालताना आपलं शरीर दुसऱ्याच कुणाचंतरी असल्यासारखं वाटतं. जणू कुणीतरी खेळण्याला चावी भरलीय आणि शरीरयंत्र चाललंय आपापलं.
बसस्टॉपवर अर्धा पाऊण तास लोकांच्या हालचाली निरखत होतो. कुठं जायचं हे नक्की ठरत नव्हतं. एकापाठोपाठ एक बसेस सोडून फक्त बसून राहिलो. सध्या ही जी लोकं दिसतायत त्यांना हे पावलांना जमिनीशी कनेक्ट करण्याचं टेक्निक माहिती नसावं. लोकं डोक्यात जगतायत. त्यांची तोंडं हलत राहतात फक्त. ही जी सगळी माणसं दिसत आहेत रस्त्यावर ती सगळी दिवसाढवळ्या स्वप्नात हरवल्यासारखी वावरत आहेत.
९. एक बऱ्यापैकी मोठी बाग. तिथं एक कौटुंबिक बैठक. जावई बायको सासू सासरे व्याही मेहुणी मध्यस्थ वगैरे गोतावळा.
"तू जर अरेरावीची भाषा वापरणार असचील तर मीपण वापरणार" -- मेहुणी.
"सासरकडची इज्जत देत नाहीत. आणि ही सारखी रहायला माहेरी पळते."- जावई.
"तुम्ही जर पोरीला लग्न करून आणलंय तर तिचे नातेवाईक येणारच ना तुमच्या घरी."- व्याही.
"प्रॉब्लेम कायाय की हे दोघंबी अजून मॅच्युअर न्हाईत. आमच्या लग्नाला पंचवीस वर्षं झाली. आमची आजूनबी किरकोळ भांडणं होतच राहतेत. पण आमाला आता मॅच्युरिटी आलीय."-- मध्यस्थ.
"सोन्यासारखी पोरगी हाय आमची"-- मुलीची आई.
"दोन दिवस बायको नसली म्हणून काय झालं? बाहेर खाता येत नाय का?"-- मेहुणी.
"ते मला नका शिकवू. मला पायजे तेव्हा बाहेर खाईन.
आणि हिला सांगा चिडाचीडी करायची नाय. माझ्याशी नीट बोलाय सांगा. सारखी रूसून बसती. रूसून बसली की जेवणपण करत नाय."-- जावई.
अशात कधीतरी ह्या सगळ्या गोतावळ्याचा आवाज चढतो. बागेची पहारेकरीण शिट्टी वाजवत येते. म्हणते, 'ओ हितं भांडाभांडी करू नगा. तुमच्या आवाजाकडं लक्ष जातंय सगळ्यांचं. तुमचा जो काय फॅमिली प्रॉब्लेम आहे तो बाहेर जाऊन मिटवा.'
मग ते सगळे उठून गेले. पुढं काय झालं असेल, विषय मिटला किंवा कसं? हे जाणून घेण्याबद्दल तुमच्यामध्ये आता जसं कुतूहल निर्माण झालं आहे तसं माझ्यामध्येपण झालेलं. पण त्यासाठी मला त्यांच्या मागे मागे जावं लागलं असतं. आणि ते काही बरोबर दिसलं नसतं. आय होप, या मुद्द्यावर तुम्ही माझ्याशी सहमत असाल.
१०. शेवटास एक अगदीच बिनकामाचा संवाद.
"मला हे काम आवडत नाही."
-- तसलं काय नसतंय येड्या भोकाच्या. आवडीसाठी कोण काम करत असतं?
वाह..!!
वाह..!!
मस्तच, नेहमीप्रमाणेच!!
मस्तच, नेहमीप्रमाणेच!!
मस्त आहेत नोंदी.
मस्त आहेत नोंदी.
अतिशय म्हणजे अतिशय आवडल्या या
अतिशय म्हणजे अतिशय आवडल्या या बिनकामाच्या नोंदी .
अतिशय आतून आलेलं मनस्वी . ..
आवडल्या नोंदी. तुम्ही अश्या
आवडल्या नोंदी. तुम्ही अश्या बिनकामाच्या नोंदी लिहीत चला.
पण ते तुम्ही बागेतून उठून त्यांच्या मागेमागे गेला नाहीत हे काय बरोबर नाही. मराठी सीरिअलचे एपिसोडदेखील एवढ्या उत्कंठावर्धक पॉइंटला येऊन थांबत नाहीत.
बिहारमध्ये 'शादी हेतु देखादेखी कार्यक्रम भवन' असतात असा फोटो कालच पाहिला. तश्या 'संसार भानगडी मिटवामिटवी बागा' का निर्माण करू नयेत? समस्त लाडक्या बहिणींच्या वतीने मी ही मागणी सरकारकडे करायला तयार आहे. हवं तर तिकीट लावून नंतर त्याचा आहेर कन्सर्ड जोडप्याला करता येईल.
आवडल्या नोंदी.
आवडल्या नोंदी.
आवडल्या ह्या नोंदी!
नोंदी पटल्या.
नोंदी पटल्या.
आता जळफळाट संवत्सर सुरूच आहे. थांबायचं नाही.
# बागेतला शीन पेशवे पार्क ( २००४) .शेम. नवरा बायको साधारण पंचेचाळीस आणि एक आठवीतली मुलगी. ती बाई मुलीला झाड झाड झाडतीय, नवरा गप्प ठोंब्या. एकूण बोलण्यावरून समजलं की मुलगी नवऱ्याच्या पहिल्या बायकोची आहे. लगेच उठून बागेबाहेर आलो आइस्क्रीम खायला. वेळ साडे पाचची. आइस्क्रीमवाला ट्रे धुण्यासाठी एका माणसाला देत होता तो गटारात उभा होता. आइस्क्रीम कॅन्सल. खारे शेंगदाणे घेऊन कटलो.
# पीएमटी मात्र आम्हाला लाभते. काही त्रास होत नाही. श्टॉपवर आलो की लगेचच हवी असलेली नंबरची बस रिकामी येते जेव्हा जेव्हा पुण्यात जातो १९९७ पासून. बंद पडली तर दुसऱ्या बसमध्ये बसतो तेच तिकिट घेउन, नवं तिकीट काढता नाही.
#नॉन-ड्युॲलिटी- माहीत नाही.
# आमचा बॉस जपानला जाऊन आला सप्लायरच्या इन्विटेशनवर वर्क ट्रेनिंगला. येताना प्रत्येकासाठी बॉलपेन आणलं. चॉपस्टिकने खाणं कसं जमलं नाही तो किस्सा ऐकला.
@ नोंदी चालू ठेवा दर तीन महिन्यांनी.
लई भारी !
लई भारी !
संप्रती,
संप्रती,
बिनकामाच्या नोंदी- ३,
बिनकामाच्या नोंदी- ३, बिनकामाच्या नोंदी- २ आवडल्या. यापुढच्या नोंदी ही आवडतील.
पण बिनकामाच्या नोंदी- १ कुठे दिसल्या नाहीत.
भारी नोंदी. आवडल्या
भारी नोंदी. आवडल्या
>> जर्मन कपलनं तो इशारा
>> जर्मन कपलनं तो इशारा सिरीयसली घेतला असावा. बिचारे खरोखरच अर्ध्या तासात घाईघाईत घाबरत घाबरत किल्ला फिरून माघारी आले की हा भारतीय बोटवाला आपल्याला इथंच ह्या अज्ञात बेटावर सोडून जाईल म्हणून <<
हा हा. मला ३ मिनिटे उशीर झाल्यावर पुन्हा या म्हणून सांगितले होते जर्मन दवाखान्यात.
प्रतिसादांबद्दल आभार या
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार या ठिकाणी.
@Srd, नॉन-ड्युॲलिटी= अद्वैत.
नॉन-ड्युॲलिटीच्या प्रॅक्टिसबद्दल रमण महर्षींचं 'बी ॲज यू आर' आणि निसर्गदत्त महाराजांचं 'आय ॲम दॅट', ही विलक्षण सुंदर पुस्तकं आहेत. या दोन्हींचे ढिगानं अनुवाद झाले आहेत. फारच मोठ्या प्रमाणात वाचली गेलेली पुस्तकं आहेत. वर्षभरापासून माझं वाचन याच विषयाच्या भोवती घुटमळतं आहे. या विषयावर अलीकडच्या काळात जगभरातला जो कुणी लिहितोय/ बोलतोय, त्यात या पुस्तकांचा उल्लेख हमखास येतोच येतो, असं दिसून आलं.
@वामन राव, पहिला भाग इथे दिसेल:
https://www.maayboli.com/node/86225
@ माझेमन,
त्यांचं मिटलं असेल असं वाटतं. साचलेली भडास, किंतु-परंतु वगैरेंचा बऱ्यापैकी उपसा करून झाल्यानंतर, त्यामाध्यमातून मनास जो एकप्रकारचा इमोशनल स्पाईक आलेला असतो तो हळूहळू उतरणीला लागतो आणि मनास आपसूकच पिसासारखी हलकीफुलकी अवस्था प्राप्त होते. त्यानंतर मग सर्व संबंधितांना आत्मपरीक्षण, आत्मसुधार, सामोपचार, मनमिलाफ, नातेसंबंधांचं सौंदर्य वगैरे विधायक गोष्टींचं महत्त्व पटायला लागतं. आणि चर्चा साधारण अशा खेळीमेळीच्या वळणाला लागल्यावर सगळ्यांना आपल्यातील सद्प्रवृत्तींचं प्रकटीकरण खुल्लमखुल्ला करण्याच्या दिशेनं हालचाली करण्याची निकड भासू लागते. टप्प्याटप्प्यानं अशाच साधारण वाटेनं हे सगळं चाललेलं आहे याचा सुगावा लागला होता पण त्याच सुमारास दुर्दैवानं सौ. पहारेकरीण मॅडम यांनी घोळ मारला. तापलेल्या तव्यावर अशा प्रकारे अचानक थंड पाणी ओतण्याची कृती नैसर्गिक पीसमेकींग प्रोसेससाठी किती बाधक ठरू शकते, याबद्दल सौ. मॅडम अनभिज्ञ असाव्यात. (अर्थात, 'युअर सिक्स कॅन बी माय नाईन' वाल्या गलगोटीयन मॅडमच्या तुलनेत ही अनभिज्ञता अगदीच क्षम्य.)
असो. विषय मिटला असेल असं अनुमान काढायला हरकत नाही. याचं साधं कारण, एकतर मध्यस्थ इसम हा माझ्यासारखाच चांगला समजूतदार संतुलित निस्पृह दार्शनिक मर्मग्राही किंवा तत्सम चॅप्टर मनोवृत्तीचा धनी असल्याचं मी हेरलं होतं. अशा प्रकारच्या बिकट भूमिकेत सापडलेल्या मनुष्याकडे जी एक इच्छाधारी पद्धतीनं स्वतःचे कान आतल्याआत चालू-बंद करण्याची सिद्धी तसेच मध्येमध्ये मौका साधून एखादा असंबद्ध डायलॉग फुसकुलीसारखा सोडून देण्याचं जे कौशल्य असावं लागतं, ते त्याच्याकडे असल्याची झलकही दिसलेली होती. बाकी शेवटी असंय की संध्याकाळची वेळ असते. यातल्या प्रत्येकाला आपापल्या घरला पण जायचं असणार ट्रॅफिकमधनं धक्के खात. बाहेर रस्त्यावर उभं राहून कुणीही झालं तरी किती वेळ भांडत बसणार ना?
हे आवडलं आहे. लिहित राहा.
हे आवडलं आहे. लिहित राहा.
तुम्ही आणखी आतलं लिहिलं तर मला आल्टर इगो- सापडेल का, अशी भिती वाटतेय. तर मग लिहू नका असं म्हणावं वाटतंय.
भारी
भारी
मस्त.
मस्त.
भन्नाट आहे हा प्रकार, मस्त
भन्नाट आहे हा प्रकार, मस्त मस्त!!
- (बीनकामाचा) सोकाजी
मध्यस्थ इसम हा माझ्यासारखाच
मध्यस्थ इसम हा माझ्यासारखाच चांगला समजूतदार संतुलित निस्पृह दार्शनिक मर्मग्राही किंवा तत्सम चॅप्टर मनोवृत्तीचा धनी >>>
मस्त आहे हा ही भाग!
मस्त आहे हा ही भाग!
संसार भानगडी मिटवामिटवी बागा >>>

सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्।
सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्।
प्रवाचक : बलदेवानंद सागर :
प्रवाचक : बलदेवानंद सागर :

.. प्रवाचक : बलदेवानंद सागर :
.. प्रवाचक : बलदेवानंद सागर : … 👍
आणि प्रवाचिका विजय श्री !
@ संप्रति,
लिहित चला अशा नोंदी. They offer an occasional glimpse of your sharp eye and witty mind.
नोंदी आवडल्या ::हाहा::
नोंदी आवडल्या
मस्त
मस्त