रूटस्

Submitted by शर्मिला. on 17 February, 2026 - 00:51

रूटस्

वर्ध्याहून निघालेली रिक्शा दुपारच्या वेळी हमरस्त्याला लागली तशी मी आजूबाजूच्या खुणा शोधायला लागले. करकरीत डांबरी रस्त्यावर काहीच ओळखीचं वाटत नव्हतं. मुळात हा रस्ता तरी कुठे हमरस्ता होता तेव्हा? आणि रिक्षाही नव्हत्याच की!

पूर्वी होता तो फक्त धूळ.. खड्डे असलेला मातीचा कच्चा रस्ता. तोही वर्ष भर पूर्ण गावापर्यंत तर नाहीच. जरा पाऊस पडला की सगळं बंद. सगळी कडे चिखल, अन् पूल नसलेले नदी नाले! तेव्हा बसने मधणी पर्यंत जाऊन, त्या आंबलेल्या शरीरानेच पुढचा प्रवास बैलगाडीने करायला लागायचा. अर्थात शरीर आंबण.., दमणं.., थकणं.. असं काहीच तेव्हा जाणवायचं नाही. कारण डोळे लागलेले असायचे ते फक्त पुढच्या गावी घालवण्याच्या दिवसांकडे.

‘केवढं बदललंय सगळं!’ मी म्हटलं.
‘हो.. सगळे रस्ते छान मोठे झालेत आता. सरळ.. गावापर्यंत.’ संगीचा नवरा म्हणाला. तो रिक्शा घेऊनच आला होता मला घ्यायला.

पहिल्यांदाच बघत होते, संगीच्या नवऱ्याला. कुठल्या तरी गावात शिक्षक आहे म्हणे! मूळचा सावळाच असावा वर्ण. आता उन्हाने रापून काळा झाला होता अगदी. केसही पांढरे झाले होते.. उन्हाने! तसं त्याचं वय काही फार नव्हतं. संगीच चांगली दहा बारा वर्षांनी लहान होती माझ्यापेक्षा. माझ्या डोळ्यासमोर लहानगी गोरीपान संगी उभी राहिली.

“सेवाग्रामला थांबायचं आहे का?” त्याने विचारलं.

पूर्वी एवढ्यांदा इकडे येऊनही कधी सेवाग्रामच्या आश्रमात गेलेच नव्हते. गच्च भरलेल्या एस.टी. तून उतरून गांधीजींचा आश्रम मुलांना दाखवावा असं कधी कुणाला वाटलंच नसावं. शिवाय तेव्हा एकदा उतरल्यावर पुढे जायला दुसरी बस तरी कुठे मिळणार होती?

“थांबूया की.” मी म्हटलं. खरं तर गावी लवकर जाऊन सगळं नजरेखालून घालायची घाई जास्त होती आणि रात्री लगेच परत निघायचं पण होतं. पण नंतर तरी परत कधी येणं होणार आहे इकडे..? गेल्या कित्येक वर्षात तर आले नव्हतेच, पण इथल्या कुणाची काही खबरबातही घेतली नव्हती. आता सुद्धा वर्ध्याला कामानिमित्त आले म्हणून मग गावी जायचं ठरवलं होतं.

आले होते ते माझ्याकरताच.. जुन्या आठवणींना क्लोझर द्यायला..

ज्या गावात जायला पूर्वी तीन चार तास लागायचे, एस. टी. ची वाट पाहण्याचा वेळ वगळून, तिथे मी तासा-दीड तासातच पोहोचले. दुपार कलायला लागली होती.

आता गावात तरी दिसतंय काही का ओळखीचं..? मी असोशीने पहात होते.
गावात शिरल्याबरोबर, दोन खोल्यांची बैठी शाळा.. , भज्यांची टपरी... अन बहुतेक म्हणूनच तिथे थांबणारी बस..( उलट असावं.) मी शोधत होते.
सगळंच अनोळखी वाटत होतं. आता मोठा एस.टी. स्टँड.. इमारती दिसायला लागल्या होत्या.

‘निदान जुनं मारूतीचं मंदिर तरी..?’ मी शोधत होते ते मंदिर दिसलं.. म्हणजे खरं तर मला नाहीच दिसलं, संगीच्या नवरयानं सांगितलं म्हणून कळलं.. हे एवढं लहान कसं झालं..?
एवढ्या वर्षात मी उंच झालेय हे खरंय.... पण म्हणून मंदिर एवढं लहान कसं वाटायला लागेल?

“renovation केलंय का मंदिराचं?”
“नाई .. नाई .. हे असंचे पइले पासून..”
छे! ह्याला कुठे माहिती असणार आहे पहिले काय होतं ते? हा कुठे होता इथे पूर्वीपासून..?

संगीशी लग्न झाल्यावरच तो इकडे राहायला आला होता. बाकी त्याच्याबद्दल मला शून्य माहिती होती.

‘पूर्वी बाहेरचा गोठा होता, तिथे आता छोटंस दोन खोल्यांचं घर बांधलय..’ ही माहिती तिथे जाण्याआधीच मिळाली होती. आजी-आजोबा खूप वर्षांपूर्वी, तर मामाही काही वर्षांपूर्वीच गेला होता. ऐंशीच्या पुढची मामी संगीजवळ (की संगी मामीजवळ?) रहात होती.

बदल बघायची तयारी होती तरी, आठवणीत असलेला तो भला मोठा दिंडी दरवाजापण आता तिथे नव्हता, हे मात्र धक्कादायक होतं, तरीही रिक्षेतुन उतरल्यावर मी त्या दिशेने जायला लागले.

‘नाई.. तिकडुन नाई ..इकडूनच ये ताई..’ रिक्षाचा आवाज ऐकून संगी बाहेरच्या ओट्यावर आली होती.

जरी काठाची साडी, ठसठशीत कुंकू अन् हातात काचेच्या बांगड्या घातलेली हसतमुख संगी अजूनही तेवढीच गोरीपान दिसत होती.
चहापाणी होईपर्यंत मी त्या इवल्याशा घरात नजर फिरवली. ह्याच्या तिप्पट जागेत पूर्वी गुरांचा गोठा होता.
संगी, तिचा नवरा, त्यांची कॉलेजच्या वयाची मुलगा-मुलगी अन मामी दाटी वाटीने ह्या घरात कसे मावत असतील, असे वाटेपर्यंत मागच्या दाराने दोन बकरीची पिल्लं लाड करून घ्यायला आत आली. कोंबड्याची जा-ये तर सतत चालूच होती. पिंजऱ्यातल्या पोपटानेही मध्येच आवाज देऊन हजेरी दिली.

तब्बेतीची चौकशी करत मी मामी जवळ बसले. नवखी मावशी बघून बावरलेली पोरं इथे तिथे करत उभीच होती.

“आज सुट्टी का कॉलेजला?” मी अंदाजांनच मुलांकडे बघत विचारलं.
“नाई.. मी नोकरी सोडली..” मुलाने उत्तर दिलं.
“का रे..? नवीन शोधतोय..?”
“नाई.. तशी काई.. चांगली पन नवती ती..कामई खूप होतं.. बगु आता.. अजून ठरवलं नाई..”
“चांगल्या नौकऱ्या तरी कुठे मिळतात..?” संगीचा नवरा.
“आणि तुझं काय चालू आहे गं ..?” मी मुलीकडे मोर्चा वळवला.
“नाई.. ड्रॉप घेतला होता.. पुना सिईटी देणार यंदा..”
“तब्बेतई तं ठीक नस्ते तिची..” मामी.
“शाळा जवळ आहे का तुमची ?” मी संगीच्या नवऱ्याला विचारलं.
“नाई.. यवतमाळ तालुक्यातेय..”
“बापरे.. इतक्या लांब.. मग कसं जाता रोज..? तिकडेच रहाता?”
“नाई.. रोज जानं येनं करतो मोटरसईकल नं.. काये ते.. जान्या येन्याच तरास फक्त.. बाकी काई काम नाई तिथे.. पोरं येतच नाई शाळेत..”
संगीचा नवरा कुठल्याशा आदिवासी पाड्यावरच्या सरकारी शाळेत नोकरीला होता. नववी-दहावीला शिकवत(?) होता म्हणे.
“मग मुलांना शाळेत आणायला काही करायला नाही लागत?” ‘त्याशिवाय शाळेला सरकारी अनुदान कसं मिळत असणार?’ हा प्रश्न मी मनातच ठेवला.
“हजेरी लावून टाकतो नं पोरांची.. बलावलं तरी त्यांना शिकायचच नसतं.. परीक्षेची वेळी बलवतो त्यांना.. आता काय.. बोर्डावर उत्तर लिहून देतो आमी..” तो बरच काय काय सांगायला लागला शाळेबद्दल.... शाळा तपासनिसांना ‘मॅनेज’ करण्याच्या त्यांच्या हिकमती बद्दल.. बऱ्याच दिवसांनी त्याच्यासमोर ह्या विषयातलं कुणी अज्ञानी सापडलं होतं!

“चल संगे.. मागच्या बाजूला फिरून येऊ.” हात पुसत संगी बाहेर आली तसं जागचं उठत मी म्हटलं.

त्या छोट्या घराच्या मागच्या अंगणात येतानाच, इतका वेळ जे बघायला मी आले होते, ते जुनं घर संधिप्रकाशात समोर दिसलं.

सुरकुत्या पडलेल्या जख्ख वृद्ध आजीसारखं पार वाकलेलं झालं होतं ते. एकेकाळी एका वेळी वीस-पंचवीस माणसं सहज सामावून घेणाऱ्या त्या घराची केवढीशी कुडी झाली होती! की मोठं घर माझ्या लहानपणच्या कल्पनेतच होतं? पण आम्ही खरंच तेवढी माणसं राहायचो तेव्हा इथे ....

“कुणी रहात नाही इथे आता?”
“नाई गं ताई.. बघ नं कसं मोडकळीला आलं.. दुरूस्तीचा खर्चच नुसता..”

बोलता बोलता आम्ही त्या घराच्या मागच्या बाजूला गेलो. जुन्या धान्याच्या कणग्या.. त्या लगतची बकऱ्यांची शेड.. मागच्या बाजूची बिनकाठाची विहीर.. सगळंच मोडकळीला आलं होतं. संध्याकाळच्या वेळेला भोवती पसरलेल्या त्या पांढऱ्या मातीच्या धुळीत सगळं आहे त्या पेक्षा जास्तच राखवट दिसत होतं.

मागच्या दारातून,.. दारातून कसलं.. तिथे असलेल्या खाचेतून आम्ही आत शिरलो. दारं तर केव्हाच मोडून पडली असणार! आत जेमतेमच बाहेरून झिरपणारा उजेड होता. आजीच्या काळी रोज स्वच्छ सारवण लेवणारं, रोजच्या दोन-तीन पंगती उठवणारं ते स्वयंपाकघर आता जरा जर्जर अवस्थेत अखेरच्या घटका मोजत होतं.

तिथूनच अंधाऱ्या माजघरातून आम्ही बाहेरच्या ओसरीवर आलो. तिथलीही अवस्था काही वेगळी नव्हती. तिथूनच माझी नजर समोर गेली.
शमीचं झाड मात्र अजूनही पूर्वीसारखंच ताठ उभं होतं.
ह्या झाडाखालीच तर कितीदा तरी आम्ही मुली ‘गुलाबने यावे../ चमेलीने यावे.. टिकली मारुनी जावे..‘ खेळायचो. कोणताही खेळ खेळतांना डाव आला, की ह्या झाडापासूनच राज्य सुरू व्हायचं..

“शमीची पानं पाईजेत का ताई तुला?” मी झाडाकडेच बघतेय असं बघून संगीनं विचारलं.
“कशाला..? चटणी करतात त्याची?” माझ्या लक्षात येईना.
“गणपतीला व्हातात ताई शमीची पानं....” संगी हसायलाच लागली.

शमीच्या पानांबद्दल होती ही माहिती मला पूर्वी! इथून कितीतरी दूर गेल्याची जाणीव झाली.
मी तशीच शमीच्या बुंध्याला टेकून बसले.

“शेती कोण बघतं गं आता?” माझ्या डोळ्यासमोर अजूनही पूर्वीची शेतभर पसरलेली गव्हाच्या पात्यांची हिरवाई.. तरारलेली तूर.. थंडीतली हुरडा पार्टी होती. अजूनही काहीतरी पकडू बघत होते मी.
“नाई.. कुणीच नाई बघत आता.... वेळई नसतो कोणाला.. माकडंई खूप झालीत.. हाकलता हाकलत नाई.. सगळं धान्य वाया जातं मं .. परवडतई तं नाई आता... ”

लककन काहीतरी सापडल्यासारखं वाटलं.

“तुझ्यात खूप निगेटिव्हिटी आहे.. यू हॅव टु वर्क ऑन इट . ” काही महिन्यांपूर्वीचे माझ्या बॉसचे appraisal च्या वेळचे शब्द आठवले.

इथे आल्यापासून सगळी वाक्य ‘नाही’ ह्या शब्दानेच चालू झालेली ऐकत होते.

कित्येक सुट्ट्या मी इथे काढल्या होत्या..

आजी कितीदा तरी दातवण घेऊन इथे बसली असेल.. माझ्या आईचं-मावश्यांच लहानपणही ह्याच झाडाखाली खेळण्यात गेलं होतं...

आताही माझ्या आठवणींची मुळं शोधत मी येथे आले होते..

निरभ्र आकाशात चांदण्या चमकायला लागल्या होत्या..

आठवणींची मूळं सापडली होती....

हिरव्यागार पानांशी नव्याने नातं जोडायचं होतं..

काही पानं संगीच्याही ओंजळीत घालूया.. विचार करतच मी परतीच्या प्रवासाला लागले.
*******************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहे. तो शेवटचा शोधही लक्षात आला. पण एकदम अचानक संपल्यासारखी वाटली कथा. वर्णन मात्र खूप ओघवते आहे. वाचायला उघडला धागा आणि पूर्ण वाचूनच थांबलो.

छान आहे गोष्ट - relate करता आली. असं होतं कधी कधी. आपल्या मनात असलेलं जुनं वातावरण आणि नव्या गोष्टींचा मेळ लागत नाही - किंवा मेळ लागला तर वाटतं - जुन्या आठवणी होत्या तशाच ठेवाव्या.. that is the time to make new memories!

शर्मिला किती सहज लिहीतेस बाई. माझंपण फारेंड सारखं चं झालं. काय आहे म्हणून वाचायला गेले, पूर्ण करूनच थांबले. आणि तू मराठी त आयडी घेतलायस का आधी इंग्रजी मधे शर्मिला होतं असं वाटतंय. अवांतरासाठी सॉरी हो.

छान आहे. आवडली.
या खेपेला ५-६ वर्षांनी गावी गेल्यावर माझाही अनुभव असाच काहीसा होता म्हणू जास्त भावलं.

छान आहे! आवडली.

परवाच गावी गेलो तेंव्हा वाड्यात गेलो. वाड्याची झालेली पडझड आणि जुन्या आठवणींची दाटून आलेली गर्दी. अगदी हे वाचताना तशीच डोळ्यासमोर आली.

धन्यवाद फारएन्ड , सुगंधी, धनुडी, मीस्वच्छंदी , कृष्णा.

@फारएन्ड,
लहानसा बदल केलाय.

@सुगंधी,
बरोबर आहे. नवीन आठवणी तयार होतच असतात. पण एकदा जुन्या आठवणींना क्लोजर मिळालं की बरं वाटतं. शिवाय आपलाच आपल्याला नव्याने शोध लागतो ह्या प्रवासात.

@धनुडी,
मराठी त आयडी घेतलायस का ?>> हो.

@कृष्णा,
पूर्वीसारखं असणार नाही हे माहित असलं तरी घर मात्र तसच हवं असं वाटत असतं.

.

सुरेख! वाचताना मनात माझी स्वतःची अशीच एक गोष्ट समांतरपणे कधी सुरू झाली ते कळलंच नाही!

आवडली
त्या गावाचं नाव सोडलं तर बाकी सगळं relate होण्यासारखे एकदम.
विशेषतः लहानपणी मोठ्ठ वाटणारे मंदिर, घर अरे हे इतके छोटे होते का? असे वाटणे तर अगदीच सेम.

एकदम अंतर्मुख केलं ह्या लेखाने. खूप छान लिहिलं आहे.
बदल होणारच पण इतके ही बदल पचविण्याची ताकद नसते आपल्यात.
आमची मुलं ,नातवंड किती भाग्यवान आहेत हे ही प्रकर्षाने जाणवलं हे वाचताना. त्यांच्या खापर पणजोबा नी बांधलेल्या घरात (काळानुरूप बदल झाले असले तरी मूळ बांधणी तीच आहे अजून )ते आज जाऊन राहत आहेत. त्यांना ही त्या घराची प्रचंड ओढ आहे. त्यांनी लावलेल्या झाडांचे आंबे अजून पुढच्या पिढ्यांना मिळतायत वगैरे वगैरे... असो. आज आम्ही सुपात आहोत उद्या जात्यात जाऊच शकतो.

सुरेख आणि एकदम टोकदार लिहिलंय. कुठेही पसरट, वाचकाला समजावुन वगैरे सांगत बसण्यात वाक्ये दवडलेली नाहीत हे फार आवडले.
गतकालविव्हलता, बदल इ. गोष्टी भिडल्याच, वाडा चिरेबंदी आठवलं पण शेवटी त्या निगेटिव्हिटीचे वर्तुळ पूर्ण झाल्याने एक झगझगीत छकडाच लावलाय तुम्ही! मजा आली!
तुम्ही कथेच्या ओघात 'आठवणींची मुळे' वगैरे लिहुनही शीर्षक मात्र 'रुटस' दिलंय तो ही डोळस आणि स्मार्ट निर्णय वाटला.
पुलेशु!
धन्यवाद!

कुठेही पसरट, वाचकाला समजावुन वगैरे सांगत बसण्यात वाक्ये दवडलेली नाहीत हे फार आवडले. >> +१ एकदमच रेलिटेबेल आहे.

appraisal पासूनची पुढची वाक्ये पूर्ण कथेला वेगळाच आयाम देतात.

छान लिहिले आहे शर्मिला . वाचता वाचता डोळ्यासमोर मोडकळीस आलेले घर, गुरांचा वाडा , शमीचे झाड सगळेच उभे राहिले अगदी संगी आणि तिच्या नवऱ्या सकट. शमीचे झाड ....सगळं ढासळलेलं असताना देखील आठवणींची मुळं तिथेच घट्ट उभी आहेत याची खात्री देणारे एक महत्वाचे character आहे या कथेतले.

धन्यवाद जिज्ञासा, झकासराव, ममो , अमितव ऋन्मेष, असामी, स्पार्कल, झेलम, सामी.

आमची मुलं ,नातवंड किती भाग्यवान आहेत हे ही प्रकर्षाने जाणवलं हे वाचताना. त्यांच्या खापर पणजोबा नी बांधलेल्या घरात (काळानुरूप बदल झाले असले तरी मूळ बांधणी तीच आहे अजून )ते आज जाऊन राहत आहेत.>> खरं आहे. हल्ली २०/२६ वर्षे झाली की redevolpment होते.

निगेटिव्हिटीचे वर्तुळ पूर्ण झाल्याने एक झगझगीत छकडाच लावलाय तुम्ही>> एकदा हे लक्षात आल्यावर हळू हळू का होईना, स्वतः त बदल करणं सोपं जातं.

appraisal पासूनची पुढची वाक्ये पूर्ण कथेला वेगळाच आयाम देतात.>> दुसऱ्यांनी आपल्यातलं काही वाईट सांगितलं की ते लगेच पटतं असं नाही. पण शमीच्या झाडाखाली उभी असताना ते लक्षात आलं.

खूप सुंदर कथा! तसे बघितले असा अनुभव बर्‍याच जणांनी घेतलेला मात्र यातले शमीचे झाड-अप्रेझल -सकारात्मक वळण फार आवडले!

खूप छान लिहिले आहे. मी आता सुद्धा 1952 पासून जेथे घर होते तिथेच पण नवीन घर बांधून राहतोय.
सुदैवाने जुन्या घराचे विडीओ शूटिंग करून ठेवले आहे.

आवडली गोष्ट. गाव आणि माणसे डोळ्यापुढे आली अगदी. शेवटचा तो निगेटिविटी बद्दल चा उलगडा जरा तपशिलात आला असता तर अजून आवडले असते. लहान गावातल्या शाळा, शिक्षकांचा जुगाड इ. बद्दल थोडे फार माहित असल्यामुळे संगीच्या नवर्‍याचे बोलणे अगदी रीलेट झाले.

आवडली गोष्ट. मैत्रेयीला +१ निगेटिव्हिटीचा उलगडा जरा अजून हवा होता असं वाटलं मलाही. आपल्यात निगेटिव्हिटी आहे, हे जाणवलं. पण त्या निगेटिव्हिटीचं नातं या घराशी आणि इथल्या माणसांशी आहे, असं आहे का? पण तसं नसावं. कारण इथल्या लहानपणाच्या आठवणी आनंददायकच आहेत.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्वाती, शरदजी , मैत्रेयी, प्रज्ञा, वावे.
@मैत्रेयी, @वावे,

तुमच्या मताचा आदर आहे.
संगीच्या घरात आल्यापासून ऐकलेलं सगळं निगेटिव बोलणं आणि स्वतः बद्दल दुसऱ्यांनी स्पष्ट पणे सांगितलेलं मत ह्याची सांगड मनातल्या मनात घातली मी.

तिथे उभं राहिल्यावर आजी, आई आणि मावश्यांचं बालपण आठवलं , तेव्हा त्यांचे काही संवाद आणि त्यांचा पडलेला प्रभाव यायला हवा होता हे लक्षात आलं आता.

आपल्या आजच्या शहरी आयुष्यात असलेली आणि इतरांना जाणवणारी पण आपण स्वतः कदाचित अनभिज्ञ असलेली निगेटिव्हिटी... आणि इथल्या नायिकेला, नाळ जुळलेल्या व्यक्तीत, तिच्या परिवारात, कदाचित वास्तूतही अनेक वर्षांनी भेटून जाणवणारी कोरडी निगेटिव्हिटी यांचे काही नाते आहे का? का त्या तरजुच्या दोन पारड्यातील पण एकसमान गोष्टी आहेत? एक आपल्या डोळ्यातलं मुसळ आणि दुसरे संगीच्या नवऱ्या मुलांच्या नजरेतील कुसळ असं तर काही नाही?
असं काही मला वाटलं.

आपल्या आजच्या शहरी आयुष्यात असलेली आणि इतरांना जाणवणारी पण आपण स्वतः कदाचित अनभिज्ञ असलेली निगेटिव्हिटी... आणि इथल्या नायिकेला, नाळ जुळलेल्या व्यक्तीत, तिच्या परिवारात, कदाचित वास्तूतही अनेक वर्षांनी भेटून जाणवणारी कोरडी निगेटिव्हिटी यांचे काही नाते आहे का?>> त्यांच्यात नक्कीच नाते आहे.
ती जेव्हा सतत निगेटिव वाक्य ऐकते तेव्हा नायिका दुसऱ्या बाजूने ऐकते आहे आणि त्या वाक्यांचा परिणाम तिला जाणवतो आहे.
तिला तिच्या बद्दल बॉस ने सांगितलं तेव्हा ते मान्य नं करण्याची तिची प्रतिक्रिया असू शकते. कदाचित ती थोड्या विस्ताराने यायला हवी होती. तिला त्याच वातावरणात राहिलेल्या तिच्या आई आजीचं बोलणं वागणं आठवतं तेव्हा ती बदलायला तयार होते.

छान वर्णन, आवडली. अर्धवट वाटली जरा. निगेटिव्हिटी ला पार करून आशेकडे केलेली वाटचाल दाखवायला हवी होती..

अजून वाचावंसं वाटत असताना संपली ,पण छान लिहिलेय.कथा वाटतच नाही मलाही माझ्या गावाशी कुठेतरी रिलेट होतेय असं वाटतं.सगळ्यांची मुळं अशीच असतील जवळपास.