आपली गोष्ट - पोहे

Submitted by sugandhi on 16 February, 2026 - 20:43
आपली गोष्ट

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

अद्वयला Chess च्या क्लब ला सोडून मी शेजारच्या indian grocery store मध्ये आले होते. निवांतपणे काय काय नवीन मसाले आलेत, काय खाऊ घेता येईल ते बघत दुकानात  फिरत होते. 

मला स्वैपाक करायला फार आवडतं. आपल्या मनात असलेली चव जमली की दर वेळी कस झकास वाटत! त्यामुळे थाळीपीठ म्हटलं की केप्रचच, बिर्याणी शान शिवाय बनत नाही, सांबर मसाला MTR चाच हवा..  माझे आवडते मसाले मी स्टॉक करून ठेवते.
दुकानात एखादंच शेवटच उरलेलं मसाल्याचं पाकीट उचललं तर मग मला एकदम - आपण कसे 'जस्ट इन टाईम' आलो असं वाटत!

आज पण तेच झालं - शेवटची दोन मालवण मसाल्याची पाकीट उचलल्या च्या आनंदात मी होते, तोच मागून आवाज आला - "oh no! तुम्हाला एक पाकीट चालेल का? मी पण या रविवारी वालाची उसळ करायला हाच मसाला शोधत होते!"

मी मागे वळून पाहिलं आणि पाहतच राहीले - समोर निळ्या जीन्स आणि पिवळ्या कुर्ती मध्ये,मोठ्या मोठ्या डोळ्यांत काजळ घातलेली, एक वेणी घातलेली पस्तीशीतली हसरी मुलगी उभी होती. "अरे ही तर सुनेत्रा की सुनयना.. " माझ्या ओठात तीच नाव यायच्या आधी, गालावरच्या खळी सकट हसत ती चित्कारली - "मानसी mam? हो ना? ओळखल का मला? मी सुनेत्रा!"

नावाच्या आधीच मला सुनेत्राची ओळख पटली होती. पंधरा एक वर्षापूर्वी भेटली होती मला! म्हैसूर मध्ये - इन्फोसिस च्या ट्रेनिंग सेंटर मध्ये. पहिला जॉब होता तिचा. पहिल्यांदाच महाराष्ट्र बाहेर राहीली होती. मराठीच यायचं तोंडांत मग. माझाही तो पहिलाच जॉब होता. ४-५ वर्ष झाली होती जॉब सुरू करून. दोन assignment च्या  दरम्यान मी तिथे communication and English training देण्यासाठी आठवडा भर गेले होते. इंग्लिश बोलण्याची  practice करण्याकडे भर होता. शेवटच्या दिवशी प्रत्येकाने २ मिनिटं उत्स्फूर्त भाषण करायचं होतं. एका भांड्यात विषयाच्या चिठ्ठ्या होत्या. आपापल्या turn ला प्रत्येकाने एक चिठ्ठी उचलायची आणि ३ मिनिटं तयारी करून २ मिनिटं बोलायचं होतं.

एक एक जण येत होता, कुणी अस्खलित बोले, तर कुणी अडखळत.  कुणी आपल्या कॉलेज फेअरवेल पार्टीची गोष्ट सांगितली, तर कुणी  आपल्या प्रसिद्ध लोकांची चित्रं काढून त्यावर त्याच्या सह्या घेण्याच्या छंदाविषयी बोलल! सगळे मजेत ऐकत होते.

मग सुनेत्राची टर्न आली. ती शांतपणे समोर आली, तिने चिठ्ठी काढली, विषय वाचला - "तुमची आवडती रेसिपी". तिने माझ्याकडे बघितलं - मला त्या क्षणी समजलं - ती पोह्यांची रेसिपी सांगेल - कालच नाश्त्याच्या वेळी पोहे खाताना आमच्या गप्पा झाल्या होत्या. तिची आई एकदम सुगरण होती आणि तिला तिच्या आई सारखा स्वैपाक करायला फार आवडायचं. काल तिला तिच्या आईच्या पोह्यांची फार आठवण येत होती..

ती छान हसली आणि म्हणाली रेडी आहे मी!
मी तिची special पोहे रेसिपी ऐकायला सरसावून बसले.

साध्या सोप्या शब्दात तिने सुरुवात केली - म्हणाली, "मी विषय वाचला ना, तेव्हा मला माझ्या आईची पोह्यांची रेसिपी आठवली - काय सुरेख पोहे करते माझी आई! पण सांगू का, काल मी इथे कॅन्टीन मध्ये पोहे खाल्ले. नुसते चवीला म्हणाल ना, तर नव्हतेच ते माझ्या आई सारखे, पण तरीही - खूप आवडले मला!"
मला आता समजेना, मुद्दा काय आहे?
पण ती पुढे म्हणाली - " रेसिपीच सांगायची ना - तर मी त्या कॅन्टीन च्या पोह्यांची सांगते. फार मोठी आहे ती रेसिपी - ते पोहे मला आवडले, कारण ते मी कमावले होते! मी, माझ्या घरातली पहिली इंजिनीयर आहे. पहिलीच घराबाहेर राहून कमावणारी मुलगी! काय काय कष्ट गेलेत हो त्या कॅन्टीनच्या पोह्यामध्ये! माझेच नाही, माझ्या आईचे पण - तिची चहा पोह्यांची गाडी आहे. इतके वर्ष तिने बनवलेल्या पोह्याचे कष्ट या कॅन्टीनच्या पोह्यांत आहेत.. म्हणून ते special आहेत.."
ती पुढे मुद्देसुद बोलली, सपोर्ट सिस्टीम आणि कष्ट हीच महत्वाची रेसिपी आहे म्हणाली. मी बघतच राहीले तिच्याकडे. किती सहजतेने पण तरीही आत्मविश्वासाने बोलली ही! आपण काही तरी मोठं, वेगळं केल्याचा आविर्भाव नाही की, "आपण इथे मिसळू शकू का?" असा कॉम्प्लेक्स सुद्धा नाही. तिच्या बोलण्यातला सच्चेपणा आणि सहजपणा सगळ्यांनाच जाणवला. तिने संपूर्ण वर्गातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह करून टाकलं! मी तिला म्हणाले ,"बयो, अशीच रहा, साधी सरळ पण कणखर!"

आज इतक्या वर्षांनी तीच सुनेत्रा तेवढ्याच उत्साहात माझ्यासमोर उभी होती. बाहेर कार मध्ये बसलेल्या तिच्या आईसाठी तिला या रविवारी वालाची उसळ करायची आहे या आनंदात होती. एकमेकींचा फोन नंबर घेतला. रविवारी निवांत गप्पा मारत वालाची उसळ आणि भात जेवायला यायचं आमंत्रण देऊनच ती लगबगिने बाहेर पडली.

काही माणसं उत्साहाचा, आनंदाचा झराच असतात. त्यांच्या नुसत्या पाच मिनिटं सहवासानेही मनात प्राजक्ताच्या फुलासारखा मंद सुगंध दरवळत राहतो. सुनेत्राच्या पाठोपाठ प्रसन्न वृत्तीने मग मीही मसाल्याचं एकच पाकीट घेऊन अद्वयला आणायला बाहेर पडले!

Group content visibility: 
Use group defaults

Thank you धनवन्ती, वावे, ऋन्मेऽऽष, शर्मिला, मनीमोहोर आणि सिमरन! तुम्ही नेहेमी आवर्जून वाचता आणि कॉमेंट करता, त्यामुळे पुढचे किस्से लिहायला हुरूप येतो!