"सखी मंद झाल्या तारका..
आता तरी येशिल काऽऽ.. येशिल का?"
पहाटे पाच वाजता मी बाहेरच्या झोपळ्यावर बसून गात होतो. "येशिऽऽऽल का? येशिऽऽल का?" राहून राहून सूर इथेच अडकत होते. खालच्या सूरांत मनाला समजाऊन पाहिलं. वरच्या सूरांत दरडावणंही झालं पण नाहीच दोनच शब्द पण त्यातली आर्तता असंख्य, अथांग, अगणित, अमर्याद, अस्वस्थ, असह्य.. पुढे गावसं वाटतं होतं पण मन थांबलेलं तिथेच...अजुनही ती वाट पाहतं...डोळ्यांतल्या बाहुल्यांत नकळत व्याकुळता काठोकाठ भरलेली. इतकी की,
ह्या व्याकूळतेत एक अख्खा समुद्र बुडाला असता.
ह्या व्याकूळतेच्या व्याप्तीचा अंदाज लावणं फार फार कठिण. कदाचित माझ्या मनापेक्षा किंबहुना माझ्या अस्तित्वा-पेक्षाही ही व्याकूळता खूप खूप मोठी होती आणि हिला डावलून पुढे जाणं म्हणजे केवळ अशक्यच.
का? कोण जाणे? पण आज सहज म्हणून हे गाणं आठवावं. सूर प्रवाहात न्हाऊन निघण्याआधीच काहीतरी बोचावं आणि ती जाणीव, ती सय नकळत मनात शतःपटीने दाटून यावी आणि कुठेतरी दडवलेलं ते क्रूर, निदर्यी, हलकट, कपटी, निगरगट्ट प्रेम पुन्हा उफाळून वर यावं आणि त्या थोड्या जाणत्या, थोड्या अजाणत्या भावनेतून श्वास कोंडावा, ह्रद्य कोलमंडून जावं इतपत आपण अडकावं आणि सुटकेचा प्रयत्न करताना आणखीनच गुरफटावं अगदी नामंजूर असलं तरीही आणि स्वतःला हरवून समर्पित व्हावं..
समर्पित होण्याशिवाय पर्यायच उरत नाही मग. सगळीच समर्पणे काही उचित नसतात आणि अनुचितही नसतात किंवा समर्पणाला आपण उचित आणि अनुचिताचं मापदंड लावूच शकत नाही. ते मितीप्रमाणेच असतात. असं म्हणतात चौथी मिती म्हणजे वेळ. वेळेच्या पलीकडे जाऊ शकतं नाही आणि अलीकडच्या वेळेत अडकलो तर चालू वेळेत जगू शकतं नाही. स्थूल देहाला काळ, स्थान, वेळेच बंधन असतं पण मनाला नाही..मन मस्त - मौलाप्रमाणे रमेल तिथे भरकटत असतं आणि आज तर मनाला भरकटायाला आयती संधीच मिळाली होती.
"ती"ला पहिल्यांदा पाहिलेलं तेव्हाच ह्या ह्रद्याच्या तार्या झंकाराल्या होत्या. संगीत शिकवणीतल्या त्या हाॅलमध्ये भल्या पहाटे "ती" एकटीच पाय दुमडून बसलेली.
मोकळे सोडलेले केसं, हातात विणा आणि विणेच्या तारांवर झरझर सरकणारी लांबसडकं बोटं. डोळे मिटलेले. चेहर्यावर गाण्यातले भाव पुरेपूर उतरलेले.. मुग्ध होऊन "ती" गात होती..
"मलमली तारूण्यऽऽ माझे..तु पहाटे पांघरावे..
मोकळ्या केसांत माझ्याऽऽ..तु जीवाला गुंतवावे.."
तिच्या सूरांतली "ती" आर्जवं मनोमन मी झेलली होती आणि तिच्या केसांतच काय? तर अख्खा मूर्तिमंत तिच्यात मी गुंतलो होतो. मी ही आता डोळे मिटून तिचे सूर कानात साठवतं होतो. अहाहा! काय आवाज..आवाजात साखरेची माधुरी. अचूक सूर लागलेले आणि मनोमन मीही त्या सूरांत, तिच्यात आकंठ बुडालेलो. तिचं गाणं संपल तरीही मी स्तब्धच. हलकेच तिने डोळे उघडले. ती माझ्याकडेच पाहत होती. थोडसं संकोच- ल्यासारखं झालं मला आणि एकदमच धीर एकवटून मी म्हणालो -
"माफ करा असं चोरून ऐकायचं नव्हतं पण इथे आलो आणि तुमच्या सूरांनी मंत्रमुग्ध झालो.. छान गाता तुम्ही."
"हरकत नाही. आपणही शिष्य आहात का?"
विणा व्यवस्थित ठेवत तिने प्रश्न केला.
"हो.. रोज पहाटे गुरूजी यायच्याआधी येतो. आदल्या दिवशीचा थोडा सराव करतो मग गुरूजी आले की, नवीन शिकायला बरं पडतं"
मी सावरत सांगितलं.
"अच्छा! तुमचंही गाणं होऊ द्या मग.. ऐकू द्या मलाही तुमचे सूर"
गोड आवाजात तिने विनंती केली.
खरंतरं मित्रमंडळीत किंवा एखाद्या जमलेल्या मैफलीत खूप फर्माईशी यायच्या पण ही फर्माईश निव्वळ खासचं आणि ती नाकारणं केवळ अशक्यच. मी होकारार्थी मान हलवत विणाच्या तारा लावल्या. सरस्वती आणि विणेला वंदन करत मनातल्या मनात थोडीशी तयारी करत सूर लावला.
"गुंतता ह्रद्य हे कमलदलाच्या पाशी,
हा प्रणयगंध परीमळे तुझ्या अंगाशी"
गाणं संपल्यावर तिने दोन तिनदा वाहवा करत मनापासून दाद दिली. आयुष्यात कित्येक कौतुके झेलली, कित्येक स्तुतीसुमने माझ्यावर उधळली गेली आणि काही ऐकणार्यांनी तर अगदी खिशातून पैसे देऊन वेगळी दादही दिली पण ह्या दादेला ते मोल नाही कारण ही दाद अनमोल आहे निदान माझ्यासाठी तरी आणि सदैव अनमोलच राहील.
...........................................................................
त्या दिवसापासून आम्ही रोजच भेटत असू. आता सारखे योग जुळून येत नसतात म्हणून तर मी योग जुळवून आणत होतो. वेळेची सांगड घालत तिला पाहत होतो, भेटत होतो. तिच्या सूरांत, तिच्यात नक्कीच काहीतरी जादू होती आणि मी तिच्यात वाहवत जात होतो. त्या दिवशी सहज म्हणून तिने गायलेलं -
"काय बाई सांगू? कसं ग सांगू?
मलाच माझी वाटतेय लाज...
काहीतरी होऊन गेलयं आज.."
हे गाणं ऐकल्यानंतर ती ही माझ्यात वाहवत जात होती हे माझ्या मनाला कळलं होतं. किती सूचकपणे तिने प्रेमात पडल्याची ग्वाही दिली होती तेव्हा आणि मी मात्र मठ्ठ तो मठ्ठच राहीलो. मनात असूनही भावना जाणूनही त्या न स्विकारता तटस्थ राहीलो. अनामिक भीती वाटत होती. केवळ तिच्या गाण्याला हसून दाद देऊन मी तेव्हा निरोप घेतला होता. खरंतरं ती पहाट माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर पहाट होती. स्वप्नपंखाना वर हवेत लहरण्यासाठी वारा योग्य दिशेने मिळत होता, शब्दांना सूर जुळत होते, फुलांतला प्रेमगंध चहूकडे पसरू पाहत होता आणि माझ्या मनात साठलेलं ते प्रेम फक्त एकतर्फी नव्हतचं. तिचंही तितकंचं प्रेम बसलं होतं. त्याच्या दुसर्या दिवशी आगाऊपणा करत मी ही -
"नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी...
मनी नवीन भावना, नवेच स्वप्ने लोचनी..."
हे गाणं सूचकपणे गायलं होतं. गात असताना तिच्या गालांवर आलेली लाजेची हलकी लाली खुप काही सांगून गेली आणि तिथेच त्याक्षणी आमच्या प्रेमाची मूकसंमती आम्ही एकमेकांना दिली आणि एकमेकांना स्विकारलं देखिल. सरावाने आणि तिच्या सोबतीने गळा विविध सूरांनी बहरत होता आणि बहरलेल्या तिच्या माझ्या गळ्यातले सूर आणखीनच सदाबहार होत होते. कधी चोरून तर कधी बिनधास्त आम्ही एकमेकांना भेटत होतो. नव्या प्रेमाची ती धुंदी आणि नव्या नात्याचा गंध आमच्या अंतरंगाला सुवासिक करत होता. नवे करकरीत प्रेम आमचे दिवसागणिक वाढत होते. भेटीतून आणि स्पर्शातून कित्येक शहारे तेव्हा मी झेलले होते. संसाराची कित्येक सुखद स्वप्ने उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहीली होती आणि त्या स्वप्नहिदोळ्यांवर एकमेकांना घट्ट धरत कित्येक हेलकावे हिंदकळत आम्ही खाल्ले होते.
एकेदिवशी भेटायच्या वेळी त्या नेहमीच्या जागी "ती" आलीच नाही. सहा तास तिथेच बसून तिची वाट पाहीली. तिच्या काळजीने, हूरहुरीने डोळे पाणावले होते तेव्हा आणि तेव्हाच पहिल्यांदा उमगल तिच्याशिवाय जिण म्हणजे केवळ तडफडण आणि चरफडण. त्या दिवसापासून अजूनही मी चरफडतोय.
ती अचानक आली नि गेलीसुद्धा. कुठुनतरी मंद सुवास यावा आणि त्या सुवासाने धुंद होत असताना तो सुवास हळूहळू विरत नामशेष व्हावा अगदी तसचं "ती" माझ्या आयुष्यात आली. प्रितीच्या दोन कळ्या उमलण्याआधीच "ती" गेली. कुठून आलेली, कुठे गेली काहीच माहीत नाही.
त्यानंतर तीन वर्षानंतर असेच एकदा कोल्हापूरला मैफलीसाठी गेलो होतो. व्यासपीठावर स्वतःला सावरत रसिकप्रेक्षकांना अभिवादन करून अलगद डोळे मिटून मी सूर लावला -
"सखी मंद झाल्या तारका..
आता तरी येशिल काऽऽ.. येशिल का?"
येशिल काऽऽ वर डोळे उघडले आणि सहजच पहिल्या रांगेत माझं लक्ष गेलं. डावीकडच्या खुर्चीत "ती" बसलेली. अगदी समाधी लागावी तशाच तंद्रीत "ती" एकटक माझ्याचकडे पाहतं होती. मोरपिशी शालूत तिचं उजळलेलं रूप पाहून माझ्या मनात आनंदाचे कारंजे उडणार इतक्यातच तिच्या गळ्यात असलेल्या चकाकत्या सोनेरी मंगळसूत्राकडे माझं लक्ष गेलं आणि हात थरथर कापू लागले आणि ओठांवर कंप सुटला, सूर विस्कटले
आणि मी -
'येशिल काऽऽ येशिल काऽऽऽ' वरच अडकून पडलो आणि मेंदूपर्यंत काही जाणिवा, काही संवेदना पोहचण्या आधीच त्या तिथेच व्यासपीठावर कोसळून मी गारद झालो. तो कायमचाच!!
आजही ह्या मृत्यूनंतरच्या जगात माझा आत्मा त्या स्वप्नघरांतल्या झोपळ्यावर बसून त्याच आशेने आणि त्याच अनामिक वेड्या ओढीने तेच सूर तेच गाणं कित्येक युगे झाली तरी आळवत असतो कारण जन्म संपला तरी ओढ तीच आहे, प्रेमही तेच आहे आणि सूरही तेच आहेत. कदाचित कधीतरी त्या सूरांनी मंत्रमुग्ध होऊन कधीतरी ती येईलच ना आणि कधीतरी ह्या अस्तित्व नसलेल्या जगात सारं काही विसरून ती माझे सूर ऐकलेच ना आणि कधितरी सूरांतली माझी ओढ तिला दिसलेच ना आणि पुन्हा त्याच पहिल्या ओढीने ती माझ्याबरोबर येईलच ना.
-समाप्त
मस्त.
मस्त.
शेवट जबरदस्त.
सगळी गाणी आवडीची
वाह्ह.. मस्त लिहिलंयस अजय..
वाह्ह.. मस्त लिहिलंयस अजय..
मस्त अजय सर.
मस्त अजय सर.
मस्तच लिहिलंय!
मस्तच लिहिलंय!
छान लिहिलंय. शेवट जबरदस्त.+1
छान लिहिलंय.
शेवट जबरदस्त.+1