हात

Submitted by आर्त on 11 February, 2026 - 09:58

हात

पाककृत्या दिल्या आईने सगळ्या,
मसाले-जिन्नस भरले गाठोड्यात,
देऊ शकेल ते सारे दिले,
पण कसे देणार तिचे अनुभवी हात?

ते हात ज्यांनी लहानपणीच,
शिकली होती चूल,
त्या हातांवर भार होता,
सांभाळायचे होते घरकूल.

हातांनी त्या,
मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी
सगळ्यांना आग्रहाने करून घातले,
हातांनी त्या,
घडवली नाती,
पोसला एक पती,
दोन खादाड मुले.

सकाळी नाश्ता,
दहा वाजता छोटा डबा,
दुपारचे जेवण,
चारला चहा खाऊ हवा,
सात वाजता काही चटर-मटर,
नंतर रात्रीचे जेवण,
रात्री अभ्यास करताना,
भडंग-चकलीची आठवण.

रोज त्या हातांनी निस्तरले,
भीम-बकासुराचे युद्ध,
कधी न सरणाऱ्या भुकेला,
नडली तिच्या हातांची जिद्द.

दिवाळीला फराळ, गुढीपाडव्याला पोळी,
उन्हाळ्यात लोणची आणि पापड,
त्या हातांना ना विश्रांती मिळाली,
ना समजली त्यांना सवड.

सोबतीला इंटरनेट नव्हते,
सहज जाऊन मिळवायला टिपा,
त्या हातांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले,
पुन्हा पुन्हा सुधारल्या चुका.

त्यांना दाद क्वचित मिळाली,
पण खाणाऱ्यांचे चेहरे ते वाचायचे,
कुणाला काय आणि किती आवडले,
रिकाम्या ताटांवरून ओळखायचे.

वक्तशीरपणे सारे जेवायला जमतात,
कारण कुणाचीच भूक वाट बघत नाही,
साऱ्यांचे पोटभर जेऊन होण्याआधी,
मात्र तिचा हात कधी ताट बघत नाही.

पाककृत्या दिल्या आईने सगळ्या,
मसाले-जिन्नस, अगदी सारे काही,
हुबेहूब तसाच स्वयंपाक मी कित्येकदा बनवतो,
आणि प्रत्येक घासत मी शोधत बसतो आई.

Group content visibility: 
Use group defaults

छान