दुपारचे १२:३० वाजले होते. सूर्याची किरणं खिडकीतून आत येण्यासाठी धडपडत होती, पण बंड्याच्या खोलीत पसरलेल्या अस्ताव्यस्त सामानामुळे त्यांनीही माघार घेतली होती. बंड्याची खोली म्हणजे एखाद्या युद्धभूमीवर बॉम्ब पडल्यानंतर जशी अवस्था असते, तशी दिसत होती. कोपऱ्यात तीन दिवसांपूर्वीचे पिझ्झाचे बॉक्स एकमेकांवर रचून त्याचा ‘कुतुबमिनार’ झाला होता. बेडच्या खाली सॉक्सचा असा काही विचित्र वास येत होता की, तिथे लपलेली डास आणि झुरळं सुद्धा ऑक्सिजन मास्क लावून फिरत होती.
आणि या साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट—बंड्या—आपल्या गादीवर अशा अवस्थेत पडला होता, जणू काही त्याला फेविक्विक लावून गादीला चिकटवलंय. त्याची झोपण्याची पद्धतही बघा—डोकं उशीच्या खाली, पाय भिंतीवर आणि हात हवेत तरंगत मोबाईल पकडलेले!
बंड्याची प्रतिभा अचाट होती. त्याच्या छातीवर लॅपटॉप उघडा होता ज्यात ‘नेटफ्लिक्स’वर वेबसिरीज चालू होती. उजव्या हातातल्या मोबाईलमध्ये तो एकाच वेळी इन्स्टाग्रामवर रील बघत होता आणि डाव्या हाताने व्हिडिओ गेमच्या जॉयस्टिकवर बोटं नाचवत होता. कानात हेडफोन होते ज्यातून रॅप गाणी वाजत होती. हे सगळं बघून कोणालाही वाटलं असतं की हा मुलगा नासा (NASA) चं मिशन नेपच्यून कंट्रोल करतोय, पण हा पठ्ठ्या कँडी क्रशची शेवटची लेव्हल पार करत होता. मग त्याने पब्जी सुरू केला.
तेवढ्यात खोलीचा दरवाजा धाडकन उघडला. बंड्याची आई हातात झाडू आणि चेहऱ्यावर ‘दुर्गावतारा’चे भाव घेऊन आत आली.
आई: (कर्कश आवाजात) "अरे मेलेल्या, दुपार झाली! कोंबडं आरवून, जेवून, झोपून पुन्हा उठलं, तरी तुझा डोळा उघडत नाही का? अंघोळ करायची का यावर्षी, की थेट पुढच्या दिवाळीत?"
बंड्याने कानातले हेडफोन काढले नाहीत. त्याने आईकडे बघितलं आणि त्याला ती एका ‘युट्युब ॲड’ सारखी वाटली. त्याने हवेत बोट फिरवून चक्क आईच्या तोंडासमोर ‘Skip Ad’ ची ॲक्शन केली.
आई: (संतापून) "काय रे? मी काय जाहिरात दिसते का तुला? उठ थोबडं धु आधी!"
बंड्या: (हेडफोन किंचित बाजूला करत, डोळे अजूनही स्क्रीनवर) "आई, प्लीज बडबड नको करू. माझा ‘पब्जी’मधला स्क्वाड अडचणीत आहे. मला देश वाचवायचा आहे... व्हर्च्युअली."
आई: "अरे तुझी खोली बघ! त्या कोपऱ्यातल्या अंडरवेअरवर बुरशी चढलीय, त्याचा तरी विचार कर!"
बंड्याने दुर्लक्ष करत पुन्हा हेडफोन लावले आणि व्हॉट्सॲप उघडून आईलाच मेसेज केला आणि तो मोठ्याने वाचून दाखवला.
मेसेज: "Mom, plz bring one cup tea. Fast. हा मेसेज मी तुला केलाय. तुझ्या मोबाईलवर वाच आणि त्याप्रमाणे कर!"
आईने कपाळावर हात मारून घेतला आणि "हा मोबाईल नरकात नेणार तुला" असं पुटपुटत निघून गेली.
थोड्या वेळाने बंड्याचे वडील आत आले. बंड्या आता पोटावर झोपून लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. वडिलांना वाटलं पोरगा सुधरला, काहीतरी अभ्यास करत असेल.
बाबा: (कौतुकाने) "काय रे बंडू, काय करतोयस? कॉलेजचा प्रोजेक्ट सबमिट करायचाय का?"
बंड्या: "नाही बाबा, मी चॅट जीपीटी (ChatGPT) शी बोलतोय."
बाबा: "काय? अरे घरात चार माणसं असताना तुला त्या डब्याशी बोलायची काय गरज?"
बंड्या: "तुम्हाला नाही कळणार बाबा. मी त्याला विचारतोय की, 'अभ्यास न करता, अंथरूणातून बाहेर न पडता, आणि कष्ट न करता महिन्याला २ लाख रुपये कसे कमवायचे?'"
बाबांचे डोळे विस्फारले.
बाबा: "मग? काय म्हणालं ते AI?"
बंड्या: "ते म्हणालं, 'स्वप्नात कमवू शकतोस, म्हणून पुन्हा झोपून जा.' बघितलं बाबा? टेक्नॉलॉजी किती स्मार्ट आहे! जे तुम्हाला २० वर्षांत समजलं नाही, ते याने २ सेकंदात सांगितलं."
बाबांनी चहाचे वाळलेले डाग पडलेला कप उचलून बंड्याला मारून फेकला, पण बंड्याने तो अचूकपणे चुकवला.
दुपारचे दोन वाजले. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. पण स्वयंपाकघरात जाऊन ताट वाढून घेणं म्हणजे बंड्यासाठी एव्हरेस्ट चढण्यासारखं होतं.
त्याने AI बॉट उघडला.
बंड्या (टाईप करत): "Hey AI, मला भूक लागली आहे, पण आईने कारल्याची भाजी केली आहे. मला इमोशनल ब्लॅकमेल करून पिझ्झा कसा मागवता येईल? यासाठी एक स्क्रिप्ट लिहून दे."
AI ने सेकंदात उत्तर दिलं. बंड्याने ते पाठ करून आईला हाक मारली.
बंड्या: "आई! माझ्या मेंदूला ग्लुकोजची आणि आत्म्याला चीझची गरज आहे. कारल्यामुळे माझी 'क्रिएटिव्हिटी' ब्लॉक होईल. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने मला लार्ज पिझ्झा मागवणं गरजेचं आहे."
हे बोलत असतानाच त्याने दुसऱ्या ॲपवर 'ऑर्डर' प्लेस केली सुद्धा. तो आता एकाच वेळी—लॅपटॉपवर चित्रपट, टॅबवर क्रिकेटची मॅच, फोनवर चॅटिंग आणि दुसऱ्या फोनवर फूड ट्रॅकिंग—असं सगळं करत होता.
अचानक एक अनपेक्षित गोष्ट घडली. त्याचा मेंदू 'हँग' झाला, खोलीतलं तापमान वाढायला लागलं. वाय-फाय राउटर लाल भडक झालं. बंड्याच्या हाताचा वेग इतका वाढला की बोटांतून धूर यायला लागला.
आणि मग... अचानक त्याच्या हातातला फोन भयानक गरम झाला. जणू काही फोनला १०४ डिग्री ताप आलाय.
बंड्या: "अरे! हे काय? फोन एवढा गरम का होतोय? मी तर अजून 4K व्हिडिओ पण चालू केला नाहीये!"
त्या गरम झालेल्या फोनमधून आणि लॅपटॉपच्या स्क्रीनमधून काळा धूर बाहेर यायला लागला. खोलीत अंधार पसरला... आणि मग तो धुडूम! आवाज झाला...
बंड्या घाबरून कोपऱ्यात सरकला. त्या धुरांतून चार विचित्र आकृत्या बाहेर आल्या.
१. इन्स्टाग्रामी: एक नखरेल मुलगी, जिच्या तोंडावर प्रचंड मेकअप होता आणि हातात एक मोठी 'रिंग लाईट' होती.
२. गेमिंग सोल्जर: डोक्यावर हेल्मेट, हातात कढई आणि पाठीला बंदूक लटकवलेली.
३. फूडी: प्रचंड लठ्ठ मुलगी, जिच्या अंगावरून सतत पिझ्झा सॉस गळत होता.
४. AI बॉट: एक रोबोटिक माणूस, ज्याने चष्मा घातला होता आणि चेहऱ्यावर शून्य हावभाव होते.
बंड्या: "अ.. अ.. तुम्ही कोण?"
इन्स्टाग्रामी: (तोंडाचा चंबू करत) "हॅलो गाईज! हा बघा बंड्या. ज्याचे फोटोज एडिट करून करून माझे फिल्टर्स सुद्धा आता रडायला लागलेत. ए बंड्या, आरशात तोंड बघितलय का कधी? #NoFilter #NoHope."
गेमिंग सोल्जर: (बंड्याच्या डोक्यात कढई मारत - टणणण!) "ए नूब (Noob)! मला दिवसभर पळवायला लावतो. स्वतः मात्र गादीवरून हलताना तुझ्या जीवाची लाही लाही होते. तिथे मला 'रिवायव्' (Revive) करायला सांगतो आणि स्वतः मात्र जिवंत प्रेतासारखा पडलेला असतो!"
बंड्या: (डोके चोळत) "आई गं! हे काय चाललंय?"
AI बॉट: (यांत्रिक आवाजात) "बंड्या, तू मला दिवसातून ४०० प्रश्न विचारतोस. 'आज जेवायला काय मागवू?', 'मी अभ्यास कसा करू?', 'मुलींशी कसं बोलू?'. अरे, स्वतःचं डोकं काय ओएलएक्स (OLX) वर विकलस का? 'As an AI Language Model', मला तुला लाथ मारायची परवानगी नाहीये, पण माझी तशी खूप इच्छा होतोय!"
फूडी: (जोरजोरात ढेकर देत) "आणि मी? अरे, तुझ्या त्या सततच्या ऑनलाईन ऑर्डरमुळे माझी सर्व्हर रूमसुद्धा तेलकट झालीय. घरची डाळ-पोळी खायला काय जीवावर येतं का रे, तुझ्या x@#$? तुझ्या पोटात आता आतड्यांऐवजी नुसते नूडल्स उरलेत!"
बंड्या कष्टाने बेडवरून उठून दरवाजाकडे पळायला लागला, पण गेमिंग सोल्जरने त्याला पकडले आणि फूडी ने एकदा कढईने डोक्यावर टणणण दणका दिला.
गेमिंग सोल्जर: "कुठे पळतोय? झोन (Zone) छोटा होतोय! आता तुला खऱ्या जगातले टास्क पूर्ण करावे लागतील."
इन्स्टाग्रामी: "येस! आता आपण रील बनवूया. पण गाण्यावर डान्स नाही, तर झाडू मारतानाचा डान्स! चल, ती झाडू घे हातात."
बंड्याच्या हातात त्यांनी बळजबरीने झाडू दिला. त्याने झाडायला मना केल्यावर तिघांनी त्याला धू धू धुतले.
AI बॉट: "कमांड प्रोसेस होत आहे: १. खोली आवरणे. २. आंघोळ करणे. ३. आईशी बोलणे (चॅटबॉट शिवाय)."
बंड्या रडकुंडीला आला. "अरे, सोडा मला! माझे फॉलोअर्स वाट बघत असतील."
इन्स्टाग्रमी: "तुझे फॉलोअर्स? अरे त्यातले अर्धे फेक आहेत! तुझे खरे फॉलोअर्स फक्त तुझे आई-बाबा आहेत, जे तुला 'अनफॉलो' करत नाहीत कारण त्यांना पर्याय नाहीये!"
तेवढ्यात फूड ॲपने बंड्याच्या तोंडात जबरदस्तीने कारल्याची भाजी कोंबली.
फूड ॲप: "खा हे! हे आहे 'रिअल' फूड. याला 'डाऊनलोड' करायची गरज नसते."
बंड्याला कारल्याची चव लागताच त्याचे डोळे कारल्याप्रमाणे हिरवे जर्द झाले. तो ओरडला, "पाणी! कोक नाही, साधं पाणी द्या!"
गेमिंग सोल्जर: "पाणी पाहिजे? तर मग किचनमध्ये जा आणि माठातून घे. तिथे 'क्लिक' करून पाणी येत नाही! पण आधी खोली आवर. मगच मी दार उघडून तुला जाऊ देईल!"
बंड्या लडखडत खोली आवरायला लागला. दरम्यान गेमिंग सोल्जरने डिजिटल इन्फ्रारेड वापरून त्याच्या मेंदूला आतून धुतले आणि स्वच्छ फडक्याने फॉरमॅट केले.
हे दृश्य बघून AI बॉट म्हणाला, "सीस्टीम अपडेट सक्सेसफुल. इंटेलिजन्स लेव्हल थोडीशी वाढली आहे."
अचानक बंड्याच्या आईने दरवाजा उघडला.
आई: "अरे बंड्या, कोणाशी बडबड करतोयस? आणि... अरे देवा! तू झाडू मारतोयस? सूर्य पश्चिमेला उगवला की काय?"
बंड्याने मागे वळून बघितले तर तिथे कोणीच नव्हते. ॲप्स गायब झाले होते. फक्त त्याचा फोन जमिनीवर पडला होता आणि स्क्रीनवर मेसेज होता: "बॅटरी लो. रिचार्ज युवर लाईफ फर्स्ट!"
बंड्या धावत गेला आणि त्याने आईला मिठी मारली.
बंड्या: "आई, आज जेवायला मेथीची भाजी आणि वरण-भातच दे! आणि बाबा कुठे आहेत? मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. आणि मला पाणी दे प्लिज आधी"
आईने बंड्याच्या कपाळाला हात लावून बघितला.
आई: "ताप तर नाही ना रे? का तुझा मोबाईल डोक्यावर पडला?"
बंड्या: "नाही आई, मोबाईल नाही... मोबाईलमधले 'जग' डोक्यावर पडलं आणि अक्कल ठिकाणावर आली!"
बंड्याने आपला फोन उचलला आणि कोपऱ्यातल्या कपाटात (सायलेंट मोडवर) ठेवून दिला.
तो बाहेर गेला, मित्रांना भेटायला...
पण यावेळी खिशात हात घालून नाही, तर डोळ्यात डोळे घालून बोलायला!
तंत्रज्ञान हे खिशातल्या मोबाईलपुरतं मर्यादित असावं, ते डोक्यात शिरलं की 'व्हायरस' होतो!
लेखक: निमिष सोनार, पुणे
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
होय, परवाच वाचलं होतं पण
होय, परवाच वाचलं होतं पण लिहायच राहून गेलं, मस्त लिहिलंय.