अजय देवगणने तानाजी आणून दिगपाल यांच्या चित्रपट मालिकेला ब्रेक दिला. सुभेदार पुढे ढकलला गेला. नंतर अमोल कोल्हे यांनी शिवप्रताप गरुडझेप चित्रपट आणून त्यांची आग्रा स्वारी रोखली. मग बराच काळ लोटून शेवटी आता हा चित्रपट आला: रणपती शिवराय: स्वारी आग्रा.
पुण्यातील सिटी प्राईड मंगला या चित्रपटगृहात मी हा चित्रपट आज पाहिला. विशेष म्हणजे चित्रपट ठरलेल्या वेळेस सुरू झाला. इंग्रजीत सब टायटल उपलब्ध आहेत. आवाजाची क्वालिटी चांगली आहे. कथा वेगाने पुढे सरकते. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज अनेक वेळा हिंदी आणि राजपुती भाषा बोलताना दाखवलेले आहेत. चित्रपटातील प्रत्येक संवाद नीट लक्ष देऊन ऐका. इतिहासाची सखोल माहिती मिळेल. काही युट्युब चित्रपट परीक्षक म्हणतात की, चित्रपटातील ॲक्शन चांगली नाही. पण हे मुळीच खरे नाही. या चित्रपटातील ॲक्शन दृश्य चांगली आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक खूप छान आहे. योग्य त्या प्रसंगाला साजेसे. चित्रपटांचे सेट आणि कॉस्चुम (वेशभूषा) खूप चांगले आहेत. जवळपास अर्धा चित्रपट हिंदीत आहे. मृणाल कुलकर्णीचा प्रचंड ताकदीचा अभिनय इथेही पुन्हा दिसतो. विशेषतः भेटी लागे जीवा या गाण्यामध्ये आणि तुळजाभवानी देवी मूर्ती समोरचे डायलॉग. लेखक दिग्दर्शक म्हणून दिगपाल लांजेकरांची कल्पकता ठिकठिकाणी दिसून येते.
शिवराज अष्टक मालिकेतील आधीचे सर्व चित्रपट मी बघितले आहेत. हा सहावा चित्रपट आहे. मला फर्जंद (आदिलशाहीच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला कोंडाजी फर्जंदवर यांनी जिंकण्यावर आधारित), शेर शिवराज (प्रतापगडावरील अफजल खान भेटीवर आधारित) आणि फत्तेशिकस्त (लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्तेखानाची बोटे तोडली) हे तीन चित्रपट सर्वात जास्त आवडले होते. बरे झाले पावनखिंड आधी आला आणि त्यानंतर लांजेकरांचा नसलेला हर हर महादेव आला. नाहीतर दिगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकला लागलेले शुक्लकाष्ट थांबले नसते. पावनखिंड आणि शेर शिवराज अगदी एक दोन महिन्याच्या अंतराने आले. त्यामुळे शेर शिवराज जास्त चालला नाही. पण माझ्या मते पावनखिंडपेक्षाही शेर शिवराज चांगला आहे.
सर्वांना हे माहिती आहेच की, शिवराज अष्टक चित्रपट मालिकेत शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटना या क्रमाने नसून पुढे मागे आहेत. सुभेदार मध्ये तानाजी मरतो तर या चित्रपटात (स्वारी आग्रा) तो अजून जिवंत आहे.
चित्रपट मालिकेत पात्रे आणि कलाकार यांची पण बरेचदा अदलाबदल होते. या सहाव्या चित्रपटात तर शिवाजी महाराजांची भूमिका करणारा कलाकारच बदललेला आहे. अभिजीत श्वेतचंद्र. त्याने भूमिका उत्तम निभावली आहे. मिर्झाराजे यांच्या भूमिकेत पुनीत इस्सारची निवड मला खूपच आवडली. जुन्या नव्या महाभारतातील दुर्योधन आणि परशुराम यासारख्या दमदार भूमिकेतीलच पुनीत इस्सार याही चित्रपटात तसाच दिसतो.
शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंह यांची भेट आणि त्यांच्यातील तहाच्या वेळचा संवाद अतिशय मस्त.
चित्रपटाची सुरुवात आग्रा भेटीपूर्वी घडलेल्या विविध वर्षांपूर्वीच्या तीन वेगवेगळ्या घटनांनी होते.
आग्रा भेटीच्या "वीस वर्षांपूर्वी" आपल्या मुराद नावाच्या भावाला औरंगजेब (धर्माधिकारी) मारतो, तेव्हा मिर्झाराजे जयसिंग (पुनीत एस्सार) तिथे उपस्थित असतो, या प्रसंगापासून पासून चित्रपटाची सुरुवात होते. त्यानंतर ट्रेलरमध्ये दिसणारा उलट्या काळजावाला डायलॉग येतो.
मग मुधोळ कोकणातील आग्रा भेटीच्या "दहा वर्षापूर्वीची" खवास खान याची घटना दाखवली जाते. त्या घटनेत कोकण स्वतंत्र करण्यासाठी चित्रपटात शिवाजी महाराजांचा प्रथम प्रवेश होतो. एकदम धडाकेबाज एन्ट्री.
नंतर आग्रा भेटीच्या "दीड वर्षापूर्वीची" मुरारबाजी देशपांडे (पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार) ची कथा दिसते. एक थरारक युद्ध दिसते. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पुरंदर किल्ल्यावर आक्रमण करतात ती ही घटना.
"प्रतापगड किल्ल्यातील नरसिंह आग्र्यात प्रकटला तर?"
हा शिवाजी महाराजांचा सूचक डायलॉग धडाकेबाज आहे.
त्यानुसार ते प्लॅन करतातही, पण वेळेवर...
"सह्याद्रीमध्ये हुतूतू खेळलो, आता उत्तरेत आट्यापाट्या खेळाची वेळ आली आहे" हाही एक उल्लेखनीय डायलॉग!
गुप्तहेर बहिर्जी नाईक आणि औरंगजेबाची मुलगी (ती कलाकार खूपच सुंदर आहे, कोण आहे बरे ही?) यांची भेट, सिद्धगडावरची सत्वपरीक्षा, शिवाजी राजे सिसोदिया वंशाचे आहेत आणि कवींद्र परमानंद हे सोबत राहून महाराजांचा इतिहास कवीतेच्या स्वरूपात लिहितात (शिव भारत) या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत. अशा इतिहासातील अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला यात माहिती पडतात. खूप आहेत. बारकाईने चित्रपट पहा.
आग्र्याच्या दरबारातील शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या भेटीचा (समोरासमोर येण्याचा) आपण वाट बघत असलेला प्रसंग बरोबर मध्यंतरानंतर येतो. तो प्रसंग खूपच खूपच छान झाला आहे. त्यानंतर पूर्ण चित्रपट म्हणजे थरारक प्रसंगांची मालिका आहे. मध्यंतराआधी खाली पडद्यावर जे लिहून येते ते जरूर वाचा. त्यातून दिग्दर्शकाचा सखोल अभ्यास दिसून येतो.
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना रदंदाज खान सोबत काबुल मोहीमवर पाठवण्याचा प्लॅन आणि यासंदर्भात औरंगजेबाच्या मुलीने आणलेली ट्विस्ट हा भाग छान आहे. मग फिदायी हुसेन हवेली वगैरे.
आग्रा येथून सुटकेचा पुढचा भागही खूप छान पद्धतीने दाखवला गेला आहे. मिठाईच्या पेटार्यांची आयडिया कशी सुचते? हे पडद्यावर बघायला मजा येते. आपल्याला कथा बऱ्यापैकी माहीत असूनही ट्विस्ट येत राहतात आणि ते आपल्याला आवडतात सुद्धा.
पेटार्यातून सुटका ज्या पद्धतीने दाखवली आहे त्यासाठी हॅट्स ऑफ...!!
कारण लॉजिकली तेच शक्य आहे. अन्यथा तुम्ही चित्रपटात दाखवलेल्यापेक्षा वेगळा विचार करून बघा. कुठे ना कुठे तुमचा तो सुटकेचा प्लान वर्क होणार नाही. स्वयं विचार कीजिए.
या चित्रपटाच्या शेवटी पुढच्या चित्रपटाची घोषणा केली गेली आहे. त्याचे नाव मुद्दामून सांगत नाही. चित्रपट नक्की फक्त थिएटरमध्ये जाऊन बघा. आपल्या मुला बाळांना इतिहासाची ओळख होण्यासाठी घेऊन जा. अमोल कोल्हे यांच्या याच विषयावर आधारित चित्रपटापेक्षा सुद्धा हा चांगला आहे.
मी या चित्रपटाला पाच पैकी साडेचार स्टार देतो.
लेखक: निमिष सोनार, पुणे