
1973 ची ती संध्याकाळ. ह्यूस्टन अॅस्ट्रोडोमच्या विशाल प्रवेशद्वारापाशी उभे राहून बिली जीनने क्षणभर डोळे मिटले. बाहेर लोकांची गर्दी उसळली होती, कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकत होते, घोषणांचा आवाज गगनभेदी होत होता. पण तिच्या मनात मात्र शांतता नव्हे, तर एक वेगळाच गोंधळ उमटला होता.
इतक्या नजरा आज माझ्याकडे का पाहत आहेत? कारण मी एक खेळाडू आहे म्हणून? की मी एक स्त्री आहे म्हणून?
अंतर्मनातून कुठेतरी एक आवाज सतत निनादत होता.
ही फक्त स्पर्धा नाही, बिली जीन. तुला माहीत आहे ना? तू हरलीस, तर फक्त एक सामना हरणार नाहीस. तुझ्या मागे उभ्या असलेल्या असंख्य स्त्रियांच्या स्वप्नांवर त्या पराजयाचा अतिशय खोल परिणाम होणार आहे. त्यामुळे आज हारणे हा पर्यायच नाहीये तुझ्याकडे. तुला जिंकायलाच हवे.
तिचे पाय पुढे चालत होते, पण मन भूतकाळात फिरू लागले.
कधी कधी तिला आठवत असे, तिला सांगितले गेलेले ते शब्द, “मुलींनी फार मोठी स्वप्ने पाहू नयेत”, “शिस्तीत रहा, नम्र रहा”, “पुरुषांची बरोबरी करणे? अवघड आहे”.
हे शब्द तिने ऐकले होते, सहन केले होते. आणि ते जितके तिला दुखावून गेले, तितकेच त्यांनी तिच्या आतल्या ठिणगीला चेतवत ठेवले होते. त्यात बॉबी रिग्सने तिच्या जिद्दी आणि बंडखोर वृत्तीला सरळ सरळ डिवचले होते, तिच्या स्वाभिमानाला, जणू काही स्त्री म्हणून तिच्या अस्तित्वालाच त्याने आव्हान दिले होते.
ती स्वतःशी हलक्या मनाने पण ठाम स्वरात पुटपुटली,
“मी जर आज हार मानली, तर कित्येक मुलींना पुन्हा वर्षानुवर्षे सांगितले जाईल की स्त्रिया कधीच परिपूर्ण नसतात. मी ते होऊ देऊ शकत नाही. मी ते होऊ देणार नाही.”
बॉबी रिग्जसाठी ती केवळ एक मॅच होती. तो अशा क्षणासाठीच जगत होता. प्रकाशझोत, गाजावाजा, थोडी नाटकीपणाकडे झुकणारी स्पर्धा आणि त्यात एखादी साईड बेट असेल तर सोन्याहून पिवळं . हे सगळं म्हणजे त्याच्यासाठी आनंदाची मेजवानी. लोक काय म्हणतात, चांगले की वाईट, चूक की बरोबर. त्याला काही फरक पडत नसे. त्याच्यासाठी प्रसिद्धी म्हणजे विजय, आणि पैशाचा वर्षाव म्हणजे बोनस होता. आणि महत्वाचे म्हणजे आपण खेळात तिला सहज चिरडून टाकू ही घमेंड होती. चारच महिन्यापूर्वी त्याने मार्गारेट कोर्टला सलग तिन्ही गेम्समध्ये हरवून आपली योग्यता सिद्ध केलेली होती.
पण बिली जीन किंगसाठी ही मॅच खूपच महत्वाची, खूपच वैयक्तिक होती. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ती महिलांच्या टेनिसला समान मान-सन्मान आणि योग्य मोबदला मिळावा म्हणून अविरत झगडत होती. महिलांचे टेनिस खेळाडू पुरुषांपेक्षा क्षमतेत कमीच असतात, अशी रिग्जच्या कुचाळक्या, थट्टा करणाऱ्या वक्तव्ये केवळ तिलाच नाही, तर टेनिसमधल्या, कदाचित सर्वच संपूर्ण स्त्रीवर्गाला टोचत होती. या अपमानासमोर शांत राहणं तिच्या स्वभावात नव्हतं. तिला माहीत होतं. हा फक्त एक सामना नव्हता , तर सन्मान, समानता आणि असंख्य महिलांच्या स्वप्नांसाठीची लढाई होती.
अॅस्ट्रोडोममध्ये प्रवेश करताच, तिला जाणवले की हवा वेगळीच आहे. ती जागा, डोळे दिपवणारे ते प्रकाशझोत, आवाजांचे एकोज, तो दणदणाट, हजारो,लाखो अपेक्षांचा भार …, हे सर्व तिच्या छातीवरचे दडपण वाढवत होते. लोक टाळ्या वाजवत होते, पण त्या टाळ्यांत स्वागतापेक्षा उत्सुकता आणि साशंकताच अधिक होती.
ते मला बघत आहेत… पण ते माझ्या कौशल्याकडे पाहत आहेत की माझ्या स्त्री असण्याकडे?
तिने स्वतःला सावरले.
तिच्या मनाला आज जिंकायचे होते फक्त बाहेरील प्रतिस्पर्ध्यावर नव्हे, तर आतल्या भीतीवरही.
रिग्सचे हास्य, त्याची थट्टा, त्याची मिरवणूक ….
ती दूरवरूनच ऐकू येत होती. पण त्या क्षणी बिली जीनच्या मनातला निर्धार अजून ठाम होत होता.
“तो मला चिडवू शकतो. लोक मला कमी लेखू शकतात. परंतु माझ्या माझ्या क्षमतेचे, माझ्या कुवतीचे प्रमाण मी बोलून देणार नाहीये. माझ्या क्षमतेचे प्रमाण माझ्याऐवजी माझा खेळ देईल.”
कोर्टाकडे जाताना तिचे पाऊल जड झाले होते. पण मन थोडे हलके झाले. कारण तिच्या मनाला एक स्पष्ट जाणीव झाली होती.
“आज मी फक्त स्वतःसाठी खेळणार नाहीये . मी त्या सर्व स्त्रियांसाठी खेळणार आहे ज्यांनी आयुष्यात कधी ना कधी माघार घेतलेली आहे, स्वतःला इतरांपेक्षा थोडे मागेच ठेवले आहे. का..? तर फक्त फक्त रूढीवादी, तथाकथित परंपरावादी जगाने, समाजाने तसे सांगितले म्हणून?”
ती रेषा पार करून कोर्टावर उभी राहिली.
त्या पहिल्या श्वासातच तिने स्वतःला शांतपणे सांगितले.
“बिली, आज केवळ तुझे करियरच नव्हे तर खूप काही दावणीवर आहे. पण आज भीती नाही, फक्त सत्य खेळू दे. दाखवून दे त्यांना.”
पहिला सर्व्हिस चालू झाला. प्रकाशझोत तिच्याभोवती अधिक तीव्र झाला. प्रेक्षकांचा आवाज, उद्घोषकाचा झंकारणारा स्वर, कॅमेऱ्यांचे सततचे क्लिक्स हे सर्व एकाचवेळी कानावर पडत होते. तरीही, कोर्टावर उभी राहिल्यानंतर बिली जीनला जाणवले की आता बाहेरची दुनिया हळूहळू धूसर होत चालली आहे.
रिग्सने पहिल्याच काही चेंडूंवर खेळकर शैलीने तिला चकवण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांमध्ये हशा पसरला. त्या हश्यात साशंकता होती, एक कुत्सित विश्वास होता कदाचित. की ती हारु शकते, नव्हे ती हारणारच. कदाचित तो बरोबरच होता… (?)
कारण समोर बॉबी रिग्ससारखा निष्णात आणि अनुभवी चॅम्पियन होता.
क्षणभर तिच्या मनात एक जुनी, अनावश्यक भीती उभी राहिली.
काही चूक झाली तर? जर माझे हात थरथरले तर? जर मी या क्षणाचा भार पेलू शकले नाही तर?
पण तिने डोळे मिटले आणि स्वतःला एक साधी आठवण करून दिली.
“हा सामना माझ्या भीतीशी आहे, रिग्सशी नाही. हा सामना या खेळातल्या कित्येक महिला खेळाडूंच्या अस्तित्वासाठी आहे, फक्त माझे जिंकणे - हारणे एवढ्याच गोष्टीशी मर्यादीत नाहीये हा सामना.”
तिने पुढील पॉइंट जिंकला.
It was just a point, पण तिच्या मनाला त्या छोट्याशा यशाने एक नवी उभारी दिली.
“मी करू शकते. मी हे करू शकते…!”
खेळ पुढे सरकत राहिला. सुरुवातीचे काही पॉइंट रिग्सकडे गेले, आणि प्रेक्षकांमध्ये हास्याची लहर पुन्हा उठली. पण या वेळी बिली जीनच्या मनातील प्रतिक्रिया वेगळी होती.
“लोक हसले तर काय झाले? त्यांनी मला कमी लेखले तर काय झाले? मला स्वतःला कमी लेखण्याची गरज नाही. I am going to win this match for all the women. I am going to defeat him.”
तिने रॅकेटवरची पकड घट्ट केली.
मान शांत. मन एकाग्र.
तिच्या प्रत्येक फटक्यात आता एक नवी गुणवत्ता दिसू लागली. नवीन आत्मविश्वास दिसावयाला लागला. त्या कुठल्याच फटक्यात राग नव्हता, सूड नव्हता. Just a complete focus, केवळ स्पष्टता. खेळातील शिस्त. आणि होते तिच्या अस्तित्वाचे प्रतिज्ञाबद्ध प्रकटीकरण.
आणि मग अचानक एक बदल जाणवला.
आतापर्यंत प्रेक्षक फक्त पाहत होते, आता ते ऐकू लागले. प्रत्येक फटक्यामागील अदृश्य कहाणी. संशय हळूहळू आदरात बदलायला लागला. साशंकतेचे रूपांतर हळूहळू मनातली अढी दूर होण्यात व्हायला लागले. इतका वेळ रिग्सला पाठिंबा देणारे आवाज आता बिली जीनच्या फटक्यांवर जल्लोष करू लागले.
तिच्या मनातला विचार बदलला.
माझ्या जिंकण्यापेक्षा मोठे, असे काहीतरी घडते आहे. प्रत्येक स्त्री जी आज पडद्यामागे श्वास रोखून पाहत आहे… मी तिच्यासाठी उभी आहे.
तिचे खेळत राहणे आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी नव्हते.
ते इतरांना स्वतःला सिद्ध करण्याची हिंमत देण्यासाठी होते.
मध्यंतरात बसून पाणी पीत असताना तिने स्वतःलाच ठामपणे, शांतपणे सांगितले .....
“बिली… तू आता फक्त एक खेळाडू नाहीस. तू आज एक दरवाजा उघडते आहेस. जरी आज, आत्ता तुझ्या हातांना थकवा वाटत असेल, तुझे पाय कापत असतील तरी त्या दरवाजातून अगणित स्त्रिया पुढे जाणार आहेत.”
ही जाणीव तिच्या अंगात सामर्थ्याप्रमाणे उतरली.
नर्व्हसनेस वितळू लागला. भीती मागे सरकली.
तू फक्त हा सामना जिंकणार नाहीस. तर तू हा क्षण बदलणार आहेस. तू स्त्री खेळाडूंचे भविष्य बदलणार आहेस.
आणि अचानक तिला जाणवले….
बाहेरचा कोलाहल तिच्यावर परिणाम करत नाही. आता खेळ तिच्या नियंत्रणात आहे. तिचे मन शांत होते. आणि मनातली हि शांतता हेच तिचे सामर्थ्य बनले.
सामना आपल्या निर्णायक टप्प्याकडे पोहोचत होता. प्रत्येक पॉइंटसोबत तणाव वाढत होता, पण बिली जीनच्या मनात मात्र आश्चर्यकारक स्थिरता निर्माण झाली होती. काही काळापूर्वी भीतीने व्यापलेले मन आता शांत होते, जसे वादळानंतरचे समुद्र शांत असतात.
हा क्षण माझा नाही. हा त्यांचा आहे, तिच्या मनात विचार उमटला.
ज्यांना वर्षानुवर्षे सांगितले गेले की “नको पुढे जाऊस, हे तुझ्यासाठी नाही.” आज मी त्यांच्यासाठी उभी आहे.
रिग्सच्या काही चुकलेल्या फटक्यांवर प्रेक्षकांमध्ये आश्चर्याचे दीर्घ नि:श्वास उमटत होते. त्या आवाजांत आता हशा नव्हता, उपहास नव्हता. एक नव्याने निर्माण होणारी जाणीव होती. लोक इतिहास पाहत होते, आणि इतिहास स्वतःला पुन्हा घडवताना कसा दिसतो याचे पहिले साक्षीदार बनत होते.
शेवटचा पॉइंट सुरु होण्यापूर्वी बिली जीनने रॅकेट हातात घेतले तो क्षण तिच्या मनात जणू स्थिर झाला.
जर मी हा पॉइंट जिंकले तर? काय बदलणार? खरोखर काही बदलणार का?
पण यावेळी तिच्या अंतर्मनात एक सौम्य पण अतिशय स्पष्ट आवाज आला...
"बदल आज सुरू होईल… पण आज संपणार नाही. तू फक्त पहिली ठिणगी आहेस."
शेवटचा फटका.
चेंडू नेटच्या वरून वेगाने गेला. रिग्सने वेगाने हालचाल करत चेंडूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण , पण चेंडू दूर निसटून गेला. क्षणभर कोर्ट, प्रेक्षक, प्रकाश सगळे स्थिर झाले.
आणि मग जग हलले.
टाळ्यांचा आवाज प्रचंड गर्जनेप्रमाणे उसळला. प्रेक्षक उभे राहिले. काही स्त्रिया हातांनी चेहरा झाकून रडत होत्या. काहींच्या चेहऱ्यावर असा भाव होता जणू त्यांनी स्वतःचा पराभव नव्हे तर स्वतःवरील बंध मोडताना पाहिले.
बिली जीन उभी होती, पण तिच्या अंतर्मनात मात्र एक वेगळाच प्रवाह वाहत होता.
आनंद? हो, होता.
गर्व? थोडासा होता.
पण त्यापेक्षा एक ऊब होती, एक जाणिव… दडपणापासून मुक्तता.
मी जिंकले.
पण त्या वाक्याच्या पलीकडे एक दुसरे वाक्य उभे राहिले.
"आम्ही जिंकलो, आपण जिंकलो."
रिग्स तिच्याकडे आला. बिली जीनने त्याचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यांत ना सूड होता ना विजयी अभिमान. त्या क्षणी तिच्या मनात फक्त एक गोष्ट स्पष्ट होती. तिने त्या कल्पनेचा अंत केला होता जी स्त्रीच्या क्षमतेला पुरुषाच्या क्षमतेपेक्षा कमी मानत होती, कमजोर मानत होती. स्त्रीला कायम दुय्यम मानत आलेली होती.
ती हळूच म्हणाली, “धन्यवाद.”
हा शब्द शरणागतीचा तर नव्हताच, पण निव्वळ औपचारिक सौजन्यही नव्हते.
हा “धन्यवाद” त्या प्रसंगाला होता. त्या संघर्षाला होता. त्या विरोधाला होता ज्याने तिच्या जिद्दीला, तिच्या क्षमतेला एक वेगळीच धार दिली होती.
"धन्यवाद, कारण तुझ्या अहंकाराशिवाय, मला माझ्या शक्तीचे इतके सार्थ आणि स्पष्ट आकलन झालेच नसते. माझ्या मनातल्या जिंकण्याच्या इच्छेला इतकी तीव्रता लाभलीच नसती."
जेव्हा तिने प्रेक्षागृहाकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यांत धूसरपणा आला. काही मुली आपल्या आईंच्या मांडीवर बसून ती दृश्यं पाहत होत्या, आणि त्यांच्या चेहऱ्यावर आजपर्यंत अशक्य भासत आलेली पण आज शक्यतेचे कवच लाभलेली एक नवीन कल्पना जन्माला येत होती.
“Yes, I can do, मी देखील हे करु शकते. मी देखील जिंकू शकते.
त्या रात्री बिली जीनने एक सामना जिंकला. पण त्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण म्हणजे, तिने एखाद्या स्त्रीने आधी स्वतःची कुवत, स्वतःचे स्थान सिद्ध करायला हवे या जुनाट समजुतीला हरवले होते.
तिच्या मनात शेवटी एक शांत विचार उमटला असेल तेव्हा ...
"आज मी इतिहास घडवला नसेल कदाचित, पण मी इतिहासाला दिशा बदलायला मदत नक्कीच केलीय."
1973 च्या त्या विजयाने फक्त एक सामना जिंकला नाही. त्याने टेनिसमधील स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीची दिशा बदलली. पुढील काही दिवस, आठवडे आणि वर्षांत याचे पाच ठोस आणि मोजता येणारे परिणाम दिसले.
1. महिला खेळाडूंसाठी समान वेतनाची लढाई सुरू झाली
बिली जीनच्या विजयापूर्वी, बहुतेक स्पर्धांमध्ये महिला विजेते पुरुषांपेक्षा 5–10 पट कमी पैसे मिळवत.
या सामन्यानंतरच्या एका वर्षात बिली जीनने दबाव वाढवला, आणि युएस ओपन हे equal prize money देणारे पहिले ग्रँड स्लॅम ठरले.
आज चारही ग्रँड स्लॅम्स समान पारितोषिक देतात. या मागची पहिली प्रेरणा, पहिली ठिणगी ह्याच सामन्याने दिली होती.
2. महिला क्रीडा हा “गंभीर” विषय म्हणून स्वीकारला गेला
त्या आधी महिला खेळांना “Secondary”, “lighter entertainment” असे मानले जात होते. 90 दशलक्ष लोकांनी हा सामना पाहिल्यानंतर जगाला समजले.
“महिला क्रीडा हा फक्त खेळ नाही. तो प्रेक्षकांना आकर्षित करू शकणारा, गंभीर, आणि व्यावसायिक मंच आहे.”
यामुळे महिला क्रीडा लीग्स, स्पॉन्सरशिप्स आणि प्रसारमाध्यमांमध्ये गुंतवणूक वाढू लागली.
3. पुढील पिढीच्या मुलींना आत्मविश्वासाचा नवा आरसा मिळाला
त्या रात्री लाखो मुलींनी टीव्हीवर पाहिले की एक महिला विरोध, उपहास, कमी लेखणे यावर मात करून जिंकू शकते. पुढील काळात शेकडो महिला खेळाडू मुलाखतीत सांगू लागल्या.
“मी टेनिस खेळायला सुरुवात केली कारण मी Billie Jean King ला पाहिलं होतं.”
यात सेरेना विलियम्स, विदाल्या, नाओमी ओसाका, आणि अनेक non-tennis महिला खेळाडूही आहेत.
4. महिला हक्क चळवळीला नवे इंधन मिळाले
हा सामना खेळापलीकडे गेला. तो समाजातील लैंगिक विषमतेच्या भिंतीला दिलेला पहिला सार्वजनिक धक्का होता. महिला समानतेच्या चळवळीला व्यापक लोकमान्यता मिळाली. कॉर्पोरेट जगतातही “Women deserve equal opportunity” या विचाराला पाठिंबा मिळू लागला.
5. हा सामना “Symbolic Blueprint” बनला
हा सामना पुढील अनेक लढायांचा referential proof बनला. या सामन्याने राजकारण, कला, विज्ञान, कॉर्पोरेट जग, शिक्षण सगळीकडे एक संदेश पसरवला ....
“जर खेळात हे शक्य आहे, तर बाकी क्षेत्रांतही सभ्यतेने आणि धैर्याने बदल घडवून आणणे सहज शक्य आहे.”
बिली जीन किंगने त्या रात्री फक्त एक खेळ, टेनिसचा एक सामना जिंकला नाही.
तिने “स्त्रीला स्वतःचे मूल्य सिद्ध करावे लागते (A woman needs to prove her worth.)” हा पायंडाच मोडून काढला. हा सामना टेनिसच्या इतिहासात “Battle of the Sexes “ म्हणून ओळखला जातो.
— विशाल कुलकर्णी
सुंदर आहे लेख. फार सुंदर!
सुंदर आहे लेख. फार सुंदर!
छान लिहिलंय
छान लिहिलंय
खूपच प्रेरणादायी आहे बिली जीन ची गोष्ट. तिची एक ठिणगी आज असंख्य ठिणग्यामध्ये परावर्तित झाल्या आहेत.
वाह
वाह
कमाल आहे गोष्ट
प्रेरणा देणारी
जबरदस्त लिहिले आहेस विशाल...
जबरदस्त लिहिले आहेस विशाल...
तू परत इथे लिहिते झालास याचा खूप खूप आनंद आहे.
हा लेख परत एकदा निवांत वाचेन.
निवडक दहा मधे..
छानच अधोरेखित केलंय ऐतिहासिक
ओघवत्या शैलीत छानच अधोरेखित केलंय ऐतिहासिक महत्त्व त्या सामन्याचं !
प्रत्येक खेळात ( इतर क्षेत्रांप्रमाणेच ) महिलांना दुय्यम व कांहिशी कुत्सित वागणूक मिळत होती, हे कटू सत्य आहे. तरी पण जिद्दीने खेळत राहणाऱ्या अनेक महिलांना खरंच मानाचा मुजरा ! भारतीय महिला क्रिकेटमध्ये डायना एडलजी यांचं नांव पटकन समोर येतं !!
ओघवत्या शैलीत छानच अधोरेखित
ओघवत्या शैलीत छानच अधोरेखित केलंय ऐतिहासिक महत्त्व त्या सामन्याचं !>> +१
आणि छान शब्दबद्ध केल्या आहेत तिच्या भावना.
व्वा
व्वा
वाह कडक लिहिले आहे..
वाह कडक लिहिले आहे..
त्या सामन्याचे वर्णन भारीच
या घटनेची कल्पना नव्हती
त्या सामन्याचे वर्णन भारीच
त्या सामन्याचे वर्णन भारीच
या घटनेची कल्पना नव्हती
>>> १०००++
छानच लिहिलं आहे! मलाही कल्पना
छानच लिहिलं आहे! मलाही कल्पना नव्हती या सामन्याबद्दल.
करियरच नव्हे तर खूप काही दावणीवर यात 'दावणीवर' हा शब्द खटकला. At stake, दाँव पर या अर्थाने वापरायचा झाला तर 'पणाला लावणे' हा शब्दप्रयोग बरोबर आहे.
वाह! खुप छान लेख.
वाह! खुप छान लेख.
ह्या सामन्याबद्दल काही माहीत
ह्या सामन्याबद्दल काही माहीत नव्हते. जबरदस्त लिहिले आहे . वाचताना आपणच तिथे आहोत आणि अनुभव घेतो आहोत असा फील आला.
(पांशा मोड ऑन : आता सुरुवात झाली आहेच तर कर्कटाक फिरवून वर्तुळ पूर्ण करून टाक : पांशा मोड ऑफ)
छान लिहिलंस
छान लिहिलंस
दावणीवर वाचताना खटकलं होतं
पणाला हवे का असेच मलाही वाटले
जाई +११११
सुंदर लेख
आणि
जाई +११११