तुमच्या शाळेचे नाव सांगा आणि थोडी माहिती पण. चला जुन्या आठवणींना उजाळा देऊया.

Submitted by सुमित बागडी on 5 February, 2026 - 10:44

आपल्या शाळेचे नाव, गाव, तिथले शिक्षक आता जरी आपल्यापासून दूर असले तरी कधी कधी आपल्या सर्वाना त्याची आठवण येतेच. आठवण अली कि आपल्या लक्षात येते कि आपल्या आयुष्यातले किती सुंदर दिवस होते ते. इथे आपण सर्व एकतर येऊन आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देऊया. आपल्या सर्व गमती जमती आणि आठवणी आपण इथे व्यक्त करू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या दादर येथील प्रमुख शाखेत शिकलो.
राजा शिवाजी विद्यालय मराठी माध्यम (आधीचे किंग जॉर्ज)

Indian Education Society

१९१२ साली, शिक्षणामुळे माणसाची विचारांची कक्षा विस्तारते या विचाराने, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही समर्पित व सुशिक्षित तरुणांनी दादर (पू.), मुंबई येथे किंग जॉर्ज स्कूलची स्थापना केली.

१७ नोव्हेंबर १९१७ रोजी भारतीय शिक्षण संस्था अस्तित्वात आली. दादर परिसरात एक आदर्श शैक्षणिक धर्मादाय संस्था स्थापन करण्याचे स्वप्न त्यामागे होते.

आज मुलींच्या शिक्षणाबद्दल व महिला सक्षमीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. मात्र IES ने १९१८ मध्येच दादर (प.) येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली, महाराष्ट्र राज्यातील मुलींमध्ये साक्षरतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने. यामुळे पुढे आणखी एका मुलींच्या शाळेची तसेच दादर येथेच एका मुलांच्या शाळेची पायाभरणी झाली.

भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार इंग्रजी माध्यमातून करण्याच्या उद्देशाने १९६८ मध्ये दादर (पू.) कॅम्पसमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली.

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विविध सांस्कृतिक उपक्रम आणि जिव्हाळ्याचे वातावरण यांमुळे विविध ठिकाणी नवीन शाळांची मागणी वाढत गेली आणि त्यामुळे IES च्या शाळांची एक साखळी निर्माण झाली.

१९८९ पासून संपूर्ण दादर (पू.) कॅम्पसला “राजा शिवाजी विद्यासंकुल” असे नाव देण्यात आले.

सुमारे २५ वर्षांपूर्वी, बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार बांद्रा (प.) येथे IES कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तसेच मॅनेजमेंट कॉलेज आणि रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली.

… आणि आज, ११३ वर्षांहून अधिक काळापासून IES सातत्याने प्रगती करत उज्ज्वल वाटचाल करत आहे. सध्या भारतीय शिक्षण संस्था आपल्या १८ कॅम्पसांमध्ये विभागलेल्या ६० शाळा, ३ महाविद्यालये आणि कौशल्य विकास संस्था यांच्या माध्यमातून सुमारे २३,००० विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित शिक्षण देत आहे.

मी शाळेत जास्त गेलो नाही फक्त सहलीचा अपवाद. सहल असली की सगळ्यात पहिला मी हजर असायचो. संध्याकाळी कधी एकदाची शाळा सुटते आणि मी थ्री स्टूजेस बघतोय असं व्हायचं. कितीतरी वेळा मी खिडकीतून दप्तर टाकून पळालोय. शाळेत मी शक्यतो पाण्याचा ग्लास घेऊन जात असे त्याकाळी वॉटर बोटल वैगरे प्रकार जास्त फेमस नव्हते. मधल्या सुट्टीत होली है करत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायचो. पावसाळी दिवसात शिकण्यासाठी कमी आणि खेकडे पकडण्यासाठी जास्त जायचो. असं असूनही माझ्या शाळेने मला घडवलं आणि आज मी एक देशातला प्रसिद्ध मोठा माणूस आहे.

खुल्या शाळेत गेलेल्यांनी काय नाव लिहायचं ? आमच्या गावाला मुलं बकर्‍या चरायला घेऊन जात. तिथेच निसर्गातून जे शिकता येईल ते शिकत. पावसाळ्यात धबधब्यातून पडणारं पाणी, त्याचा वेग, विसर्ग यातून ते गणित शिकले. रात्री अंगणात पडल्या पडल्या चांदण्या मोजून सायन्स शिकले. अल्बर्ट आईनस्टाईन भारतात आला होता तो आमच्या गावाला भेट द्यायलाच. लोकांनी फक्त तो गांधीजींना भेटला एव्हढेच लक्षात ठेवले. आमच्या गावाने त्याला न्यूटनची थिअरी कशी फोल आहे हे सांगितले होते. न्यूटनचे नियम हे त्याचेच आहेत हे गावातल्या मुलांना माहीत नव्हते. त्यांना झाडाचं फळ खाली पडतं हे माहीत होतं. एखाद्याला चापट मारली तर तो ही चापट मारतो हा नियमही माहीत होता.

बाकी, तुमचं धंदा पाणी काय म्हणतंय ? आले का त्या धाग्यावर प्रतिसाद ? पुढचा धागा कुठला ?

मी खूप शाळेत गेलोय. वडीलांच्या विमानदलातील नोकरीमुळे.. केन्द्रीय विद्यालयाच्या शाखा असायच्या. आता आठवून मजा वाटते.
. (कलाईकुंडा),खरकपूर (कोलकता) जवळ एक विमानदलाची छावणी (कँप) होती तिथल्या बालवाडीत.
. (आमला) बैतूल (इटारसी) जवळ एक विमानदलाची छावणी (कँप) होती तिथल्या केन्द्रीय विद्यालयात.
. (हिंड्न) गाजियाबाद(दिल्ली) जवळ एक विमानदलाची छावणी (कँप) होती तिथल्या केन्द्रीय विद्यालयात.
.(हलवारा)मुलनापूर(लुधियाना) जवळ एक विमानदलाची छावणी (कँप) होती तिथल्या केन्द्रीय विद्यालयात.

त्यानंतर वडील निवृत्त झाले आणि माझ्या आजोबांच्या गावात (परूळे) पूर्ण प्राथमिक शाळा परूळे नंबर ३.
. कुडाळ हायस्कूल कुडाळ ही माझी शेवटची शाळा (बारावी पर्यंत).. तिथे मी अजूनही जातो (भेटायला, चर्चा करायला, शिकवायला...)

मी सातवी पर्यंत ज्ञानगंगा विद्यालय जोगेश्वरी, मुंबई येथे होतो. घर बदलले आणि विद्यावर्धिनी संस्था संचालित विद्यामंदिर, गोरेगाव पश्चिम येथे दाखल झालो. दोन्ही शाळा मस्त होत्या पण जोगेश्वरीतील शाळेची अजून आठवण येते. मागच्या वर्षी त्या शाळेचा स्नेहमेळावा झाला तेव्हा २० वर्षानंतर बरेच मित्र मैत्रिणी भेटले. जुन्या आठवणी झाल्या. दुर्दैवाने दोन्ही शाळा आता बंद झाल्या आहेत. पण तिथल्या आठवणी कालपर्वाच्याच आहेत असे वाटते

<< दुर्दैवाने दोन्ही शाळा आता बंद झाल्या आहेत. >>
------ Sad
शाळा मुंबईत होती काही अगदी शहरापासून लांब ( रिमोट ) भागांत नव्हती मग बंद होण्याचे कारण काय आहे/ होते?

मुंबईतील मराठी शाळा बंद झाली यात आश्चर्य काय?
मुंबईत मराठी माणसांचा टक्का कमी होत आहे आणि आहे त्यातही मुलाना मराठी शाळेत घालणाऱ्यांचा टक्का अजून कमी होत आहे.

माझी शाळा बोरिवली , वझिरा -

माझी शाळा बोरिवली , वझिरा - परांजपे नगर इथली सुविद्यालय. मी या शाळेत १९७४ साली दुसर्‍या इयत्तेत प्रवेश घेतला. (पहिली पर्यंत घाटकोपरला राहत होतो, जिनियस बिनियस म्हणून डायरेक्ट दुसरीत घेतलं नाही ;). माझी शाळा माझ्याएवढीच लहान होती. वाढती होती. आमच्या वर आणखी तीनच इयत्ता होत्या. १९८० साली शाळेची दहावीची पहिली बॅच होती. १९८० आणि १९८१ साली दहावीची एकेकच तुकडी होती. त्यानंतर दोन दोन तुकड्या. आता किती आहेत माहीत नाही. पुढे शाळेच्या संस्थेने बोरिवलीतच आणखी तीन शाळा काढल्या. त्यातली एक बंद पडली.
शाळेला मैदान नव्हतं. आमचा शारीरिक शिक्षणाचा वर्ग आणि कबड्डी, खो खो , लंगडी, डॉज बॉल हे खेळ गच्चीवर होत. गच्चीतून समोरची डॉन बॉस्को आणि त्यांचं मैदान दिसे. शाळेतल्या खेळांच्या स्पर्धा आणि स्नेहसंमेलन शेजारच्या योगानंद सोसायटीच्या मैदानावर होत.
शाळा इमारतीला फंड म्हणून दर महिन्याला दहा रुपये इतकी देणगी फीबरोबर देत असू. तसंच इमारत निधीसाठी व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत. मी प्राथमिक शाळेत असताना त्याची तिकीटं विकायला आमच्या वर्गशिक्षिका पाटणकर बाई आमच्या घरी आल्या होत्या हे लक्षात आहे. अखेरचा सवाल आणि एक नवाक्षरी नाटक पाहिल्याचं ही आठवतंय.
पाटणकर बाई आमच्याबरोबरच पहिलीतून चौथीत गेल्या. चौथीच्या वर्षाच्या शेवटी त्यांनी अख्ख्या वर्गासाठी भेळ करून आणली होती. तेव्हाचा ग्रुप फोटो अजून माझ्याकडे आहे. आमच्या सेंड ऑफला त्या आल्या होत्या. बोर्डाच्या परीक्षेआधी जवळ राहणार्‍या मुलांना त्यांनी घरी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. मला त्याचं पोस्टकार्ड आलं होतं.
पाचवी ते सातवीचे वर्ग एका सत्रात आणि आठवी ते दहावीचे दुसर्‍या सत्रात भरत. वर्ग इतके मोजके होते की आम्ही सातवीत असताना एक तुकडी सकाळी आणि दुसरी दुपारी भरे.
शाळेतले अधिकतर विद्यार्थी आणि शिक्षक परांजपे कॉलनी किंवा फार तर बाभई , एम एच बी कॉलनीतून येत. बसने प्रवास करणारी मोजकीच मुलं होतो. पुढे काही लांबून म्हणजे अंधेरी, गोरेगाव इथून येणारे काही शिक्षक आले. आमचे मुखाध्यापक शं ना दीक्षित माहीमला राहत. यांना नंतर कधीतरी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्यांचा विषय संस्कृत , तसंच इतर भाषा.
या कुंदें तु ... ही शाळेची प्रार्थना. आधी वर्गावर्गात होई. आम्ही आठवी नववीत गेल्यापासून मोजकी ५-६ मुलं शाळेच्या ऑफिसात जाऊन प्रार्थना आणि शाळा सुटताना वंदे मातरम म्हणत. ती स्पीकरवरून सगळ्या वर्गांत पोचे.

एका संस्थेद्वारे गीतेचे अध्याय पाठ म्हणण्यासाठी सर्टिफिकेट मिळे. पाठांतर आणि उच्चारांनुसार गुण मिळत. आमच्या नववीत आणि दहावीत सहलीऐवजी वनवासी कल्याण आश्रमाच्या साथीने श्रमसंस्कार शिबिर घेतले गेले. त्यातले एक सध्या प्रसिद्ध असलेल्या उत्तन इथे झाले.

प्राथमिक शाळेत असताना एक सहल टिटवाळ्याला गेली होती. तिथून आणलेली गणपतीची मूर्ती अजून आहे. वरच्या वर्गात असताना एका सहलीत शिरढोण ( वासुदेव बळवंत फडक्यांचं घर), कर्नाळा अभयारण्य आणि जैत रे जैत हे पाहिलं. इतर वर्षी मी सहलींना गेलो नसावा.
आमचे बहुतेक शिक्षिकही तरुणच होते. १९८२ साली मुंबईत पोलिसांचं बंड झालं तेव्हा गोरेगावला राहणार्‍या एक शिक्षिका आता घरी कसं जायचं म्हणून धास्तावल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. इतके त्या काळी परीघ लहान होते.

परीक्षेत नंबर मिळवण्याबाबत मुलगे वि, मुली अशी चुरस असे. मुलीच बाजी मारत. माझ्या बॅच मध्ये दहा वर्षांत एकच मुलगा पहिला आला होता, आणि तो मी होतो. इतर वर्गांतही हीच स्थिती होती. आमची दहावी झाली त्या वर्षी खालच्या वर्गात आणखी एक मुलगा पहिला आलेला आठवतो.
आमचं दहावी झाल्यानंतर काही वर्षांनी पहिल्यांदाच शाळेचा एक विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये आला. आमच्या बॅचच्या टॉपर मुलीची मेरिट लिस्ट एका गुणाने हुकली होती.

शिक्षक दिनी दहावीचे विद्यार्थी शाळा चालवत. मी दहावीत असताना आठवीच्या वर्गांना संस्कृतचा पाठ शिकवला होता.

२०१५ साली आमच्या बॅचचं शाळेतच रियुनियन झालं. रियुनियनचं सगळं प्लानिंग पाटणकर बाईंच्या घरी झालं आमच्या वेळच्या बर्‍याच शिक्षकांना बोलवलं होतं. शाळेचा एक वर्ग स्मार्ट करण्यासाठी लागणारी उपकरणे आम्ही शाळेला भेट म्हणून दिली.

वरच्या काही पोस्ट मध्ये लोकांनी शाळेच्या रीयुनियनचा विषय काढल्याने आठवले की आमच्या शाळा मित्रांची दरवर्षी दोन दिवस एक रात्र पिकनिक जाते. मी दरवर्षी न चुकता जातो इतकी धमाल असते.

पहिल्या पिकनिकचा धागा इथे वाचू शकता.

एका माणूसघाण्याची पिकनिक - विडिओ आणि केकसह
https://www.maayboli.com/node/79682

गेल्यावर्षी तर वेगळाच उपक्रम केला. त्यावर वेगळा लेख लिहायला हवा होता...