अकरावी बारावीत असताना कै. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा रंग और नूर की बारात किसे पेश करू ऐकलं तेव्हा मदन मोहन नावाचा एक विलक्षण संगीतकार हिंदी चित्रसृष्टीत होऊन गेला हे प्रथमच कळलं. त्यानंतर एकदा असंच आईच्या तोंडून "माई री sss, मैं कासे कहूं" ऐकलं आणि मग मात्र मदन मोहन या माणसाने पछाडून टाकलं मला. मी लिस्ट बनवली आणि मदनमोहनची गाणी रेकॉर्ड करून आणायला कॅसेटवाल्याकडे गेलो. तेव्हा कोऱ्या कॅसेट्स घेऊन त्यावर आपल्याला हवी ती गाणी रेकॉर्ड करून मिळायची. आता इंटरनेटवर हवे ते सगळे मिळते. तेव्हा मात्र, अरे लष्करमध्ये नको तिकडे नव्या पेठेत तो अमुक कॅसेटवाला आहे ना, तो तुला अगदी हुस्नलाल भगतराम सुद्धा मिळवून देईल, त्याच्याकडे जा. असे संवाद व्हायचे आणि आम्ही वेड्यासारखे सायकलवर टांग टाकून नव्या पेठेत कुठल्यातरी टपरीत दुकान टाकून बसलेल्या त्या कॅसेटवाल्याला शोधत तंगडतोड करत फिरायचो. ते दिवसच काही औरच होते राव. मी मदनमोहन हवाय म्हटल्यावर त्या कॅसेटवाल्याने कौतुकाने माझ्याकडे टाकलेला दृष्टीक्षेप मला अजूनही आठवतोय. तेव्हा त्या क्षणी त्यात काही विशेष वाटलं नव्हतं. ती जाणीव जेव्हा त्या रेकॉर्डेड कॅसेटची पारायणे सुरू झाली तेव्हा व्हायला लागली. हे काहीतरी वेगळं, काहीतरी अफाट आहे हे कळायला लागलं होतं.
मदनमोहनची बहुतेक सगळीच गाणी गाजलीच. पण आजच्या लेखाचा विषय त्याची मला प्रचंड आवडणारी पण त्यातल्या त्यात तुलनेने कमी गाजलेली गाणी असा आहे.
मदन मोहन यांची “कमी गाजलेली” गाणी हा विषय ऐकायला जितका साधा वाटतो, तितका तो प्रत्यक्षात खोल आणि अनेक स्तरांवर विखुरलेला आहे. कारण मदन मोहनचं संगीत लोकप्रियतेच्या निकषांवर मोजण्याऐवजी संवेदनशीलतेच्या, गुणवत्तेच्या, त्यातल्या छोट्या छोट्या जागांच्या निकषांवर ऐकावं, समजून घ्यावं लागतं. त्याच्या रचना पहिल्या वेळी कदाचित लगेच, पटकन पहिल्या वेळी आवडणार नाहीत. त्या हळूहळू पुन्हा पुन्हा ऐकल्या की उलगडत जातात. आणि एकदा उलगडल्या की आयुष्यभर सोबत राहतात.
मदनमोहनच्या संगीताचा केंद्रबिंदू म्हणजे शब्द. गीतकार कोण आहे, तो काय म्हणतोय, आणि त्या शब्दांचा सूर नेमका कसा पकडायचा, कुठे ताणायाचा, कुठे थांबायला हवा, याची विलक्षण जाण मदनमोहनला होती. म्हणूनच त्याची अनेक गाणी ऐकताना असं वाटतं की संगीत मागेच थांबलय कुठेतरी आणि शब्द मात्र प्रखरपणे त्या संगीतावर स्वार होऊन पुढे येताहेत. प्रत्यक्षात त्याचं संगीत इतकं सूक्ष्मपणे काम करत, पाझरत असतं की आपल्याला ते फक्त “ऐकू” येत नाही, तर “जाणवत” राहतं. गात्रागात्रातून झिरपत राहतं.
लताबाईंसोबतचं त्याचं नातं हा स्वतंत्र विषय आहे. १९५५ साली आलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्म मधलं “चांद मद्धम है आसमां चुप है” हे गाणं पहिल्यांदा ऐकताना अजून एक हिंदी गाणं एवढंच वाटतं, फारसा प्रभाव जाणवत नाही. पण आपण जसं जसं पुन्हा पुन्हा ऐकायला लागतो, तसं लक्षात येतं की या गाण्यात कुठेही भावनेचा अतिरेक नाही. साहिर लुधियानवींचे शब्द जणू रात्रीच्या रिकाम्या प्लॅटफॉर्मवर सहज , पण रात्रीशी एकरूप होऊन निवांत फिरावे तसे आपल्या मनात घुमायला लागतात. आणि मदनमोहन आपल्या संगीताने त्या शब्दांना जणू काही श्वास प्रदान करतो. लताबाईंचा स्वर इथे नेहमीप्रमाणे आपल्या तेजाने तळपत नाही, तो निवांतपणे त्या शब्दांना तेज देतो, प्रकाश पसरवतो. मदनमोहनची खरी ओळख अशा गाण्यांतून स्पष्ट होते. रागाधारीत असूनही हे संगीत जड वाटत नाही. स्वर हळूवारपणे उमटत राहतात. जणू रात्रीच्या एकांतात, शांतपणे धुळवाटेवर उमटत जाणारी पावलं. लतादीदी गात नाहीत, त्या ती भावना जगतात आणि त्यांच्याबरोबर आपण सुद्धा...
१९५१ साली आलेल्या अदा या चित्रपटामध्ये लतादिदी आणि मदनमोहनचं एक अप्रतिम गाणं होतं. राजा मेहदी अली खान यांनी लिहिलेलं, "प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते"...!
प्रेमाच्या वृथा वल्गना न करता त्याच्या अपूर्णतेची, न मिळालेल्या क्षणांची हळवी जाणीव करून देणारं हे गीत. अतिशय साधे शब्द, त्यांतून व्यक्त होणारी आयुष्यभराची आस. मदनमोहनचे मंद, संयत आणि विरहाच्या छाया शब्दांवर वागवणारे संगीत. अहाहा ! यात सूर शब्दांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते शब्दांना श्वास, प्राण देतात. लतादीदींचा आवाज या संगीताला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवतो. एक विलक्षण खोली देतो. विरहगीत असले तरी दीदींचा स्वर आर्त होत नाही. उलट तो कमालीचा शांत आहे, जणू एकाकी मन स्वतःशीच बोलतय. शब्द, सूर आणि आवाज एकत्र येऊन हे गाणे विरहाच्या तक्रारीपेक्षा स्वीकाराचे, वेदनेपेक्षा आठवणीचे रूप धारण करते आणि म्हणूनच ते ऐकून झाल्यानंतरही मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हळूच नकळत रुतून बसते, रुजून जाते.
१९६० साली आलेल्या बहाना मधलं “जा रे बदरा बैरी जा” या गाण्याचा उल्लेख अनेकदा “पावसाचं गाणं” म्हणून केला जातो, पण प्रत्यक्षात ते विरहाचं गाणं आहे. इथे पाऊस हा फक्त निमित्त आहे. चाल रागदारीच्या जवळ जाणारी, पण तरीही शास्त्रीय संगीताकडे न वळणारी. मदन मोहनची खासियत इथे दिसते. तो राग वापरतो, पण शास्त्रीय संगीत ऐकवण्यासाठी नाही, त्या शब्दांना, त्यातल्या भावनेला अपेक्षित खोली देण्यासाठी तो शास्त्रीय संगीताचा वापर करतो. राजेंद्र कृष्ण यांच्या शब्दाचं गारूड मदनमोहन अजून पक्कं करतो.
१९६५ साली आलेल्या नीला आकाशची गाणी ऐकली आहेत? त्या बोलपटामधलं “ना आसमां ना सितारे फ़रेब देते हैं” ऐकलंय कधी? हे गाणं विशेष आहे. लताबाईंच्या आवाजातली ही रचना ऐकताना असं वाटतं की मदनमोहनला गाण्याच्या लोकप्रियतेविषयी काही देणेघेणेच नसायचे. प्रत्येक वेळी काहीतरी अनवट वाट शोधून काढायचा त्याचा प्रयत्न असायचा. याच चित्रपटातील आशाताईंचे "आपको प्यार छुपाने की बुरी आदत है" हे गाणे देखील याच श्रेणीतले. लताबाईंच्या आवाजातला तटस्थ, तत्त्वचिंतनशील सूर कुठेतरी आतवर मनाला स्पर्शून जातो, तेव्हा त्यात मदनमोहनचा वाटा सिंहाचा असतो.
मला मदनमोहन सगळ्यात जास्त आवडला तो १९७० साली आलेल्या दस्तक मध्ये. मजरूहसाहेबांचे अंतर्बाह्य हलवून टाकणारे शब्द जेव्हा "न तड़पने की इजाजत है, न फ़रियाद की है, घुट के मर जाऊ ये मर्जी मेरे सय्याद की है" म्हणत थेट अंगावर येतात आणि मग जेव्हा लताबाई "माई री, मैं कासे कहूं...." म्हणत एक अस्फुट, मौन टाहो फोडतात तेव्हा हादरून जायला होतं. पण माई री.... ऐकावं ते दस्तुरखुद्द मदनमोहनच्या आवाजातलंव . लताबाई देखील फिक्या पडतात त्यासमोर.
याच चित्रपटातील दीदींचंच “बैयाँ ना धरो” हे गाणं असंच. का कुणास ठाऊक पण मला सतत असं वाटत आलेलं आहे की हे गाणं लोकप्रिय असूनही खरं तर समजून घेण्याच्या पातळीवर कमी ऐकलं गेलेलं आहे. माई री किंवा बैय्या ना धरो यासारखी गाणी ऐकताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे मदन मोहन फक्त गाण्याला संगीत नाही द्यायचा. तो त्या गाण्याला आत्मा द्यायचा, शील द्यायचा , एक चिरंतन अस्तित्व द्यायचा. इथे मदनमोहनची चाल एकदम चिरेबंदी आहे. ठाम, शांत, आणि उत्कट.
अर्थात मदन मोहन म्हणजे फक्त लता मंगेशकर नाही. मदनमोहनचं आणि तलतचं एक वेगळंच, नितांत सुंदर, विलक्षण, रादर जीवघेणं समीकरण आहे. तलत महमूदच्या आवाजात त्याचं संगीत काही वेगळ्याच रंगात दिसतं. १९६४ साली आलेल्या जहाँआरा मधली राजेन्द्रकृष्णजीची नज़्म आठवते?
“फिर वही शाम वही ग़म वही तनहाई है” ही नज़्म ऐकताना असं वाटतं की संध्याकाळ स्वतःच बोलतेय. तलतच्या आवाजात एक अबोल, मौन उदासी आहे, त्याच्या स्वरांमधला हळूवार, मुलायम कंप याचे द्योतक आहे आणि मदन मोहन त्या उदासीला अतिशय संयत, संवेदनक्षम चौकट देतो. कुठेही मोठे आरोह-अवरोह नाहीत, पण प्रत्येक ओळ मनावर एक प्रकारचा ताण उभा करते.
जहाँआरा मधलंच "मैं तेरी नज़र का सुरूर हूँ, तुझे याद हो के ना याद हो" हे असंच अजून एक अप्रतिम गीत. गाजलेलं पण तरीही कमी ऐकलं गेलेलं. मदनमोहनचे संयत, विरहप्रधान संगीत आणि तलतचा तरल, मृदू, किंचित उदास स्वर यांचा अतिशय नाजूक संगम आहे हे गाणं. इथे प्रेमाची मागणी नाहीये, तर फक्त आठवणीत तरी स्थान मिळावे अशी एक आर्त याचना आहे. मदनमोहनची शब्दांना त्यांची स्पेस देणारी, अपूर्णतेची जाणीव करून देणारी चाल तलतच्या आवाजात ती वेदना थेट मनात उतरवते. म्हणूनच ही गाणी निव्वळ विरहगीते म्हणून न राहता प्राक्तनाचा स्वीकार आणि एक हळवी स्मृती बनून श्रोत्याच्या मनात खोलवर रुजून बसतात.
त्याच चित्रपटातील “किसी की याद में दुनिया को हैं भुलाए हुए , ज़माना गुज़रा है अपना ख़याल आए हुए ” ही राजेंद्रकृष्णजीची गझलसुद्धा तुलनेने फार कमी ऐकली जाते. इथे स्मृती ही वेदना नाही, ती सवय आहे. राजेंद्र कृष्ण यांच्या शब्दातल्या छोट्या छोट्या जागा, सूक्ष्म छटा मदन मोहन यांच्या संगीताने ठळकपणे उठून आल्या आहेत. रफी साहेबांनी फार सुंदर गायली आहे ही गझल.
रफीसाहेबांसोबत मदन मोहन यांची मैफल अधिक गंभीर, अधिक विस्तारलेली वाटते. १९६४ साली आलेल्या गझल मधलं “रंग और नूर की बारात किसे पेश करूँ” हे गाणं म्हणजे निव्वळ एक गीत नसून एक संगीतमय निवेदन आहे. खरेतर साहिरच्या शब्दांची स्वतःचीच उंची इतकी अफाट आहे की नुसते गद्यात वाचली असती गझल तरी हिट झाली असती, इथे तर मदनमोहनचे संगीत आणि जोडीला रफीसाहेबांचा दैवी आवाज. मदन मोहन कुठेही शब्दांना सुरांनी, संगीताने सजवण्याचा प्रयत्न करत नाही. तो फक्त साथ देतो आणि साहिरचे शब्दच दिग्विजय करतात. रफीसाहेब इथे फक्त गात नाहीत, ते साहिरचा शब्द न शब्द जणुकाही शोषून घेतात, ती गझल जगतात आणि मग जे काही जन्माला येतं ते निखालस सोनं असतं.
मन्ना डे यांच्यासोबत मदन मोहनची शैली अधिक शास्त्रीय बाजूकडे झुकताना दिसते. देख कबीरा रोया (१९५७) मधलं “कौन आया मेरे मन के द्वारे” हे गाणं भक्तिरसाच्या सीमेला जाऊन भिडतं. रचना ऐकताना वाटतं की हे गाणं चित्रपटासाठी नाही, तर एखाद्या शास्त्रीय संगीताच्या बैठकीसाठी, मैफिलीसाठी संगीतबद्ध केले असावे.
आशा भोसले यांच्या आवाजातली मदन मोहन यांची गाणी तुलनेने कमी आहेत, कदाचित म्हणून ती तुलनेने दुर्लक्षित झाली असावीत का? अदालत (१९५८) मधलं मदनमोहनसाठी त्यांनी लतादीदींबरोबर गायलेलं "जा जा रे जा सजना" असो , अथवा गीता दत्तबरोबर आशाताईंनी गायलेलं "दुपट्टा मेरा मलमल का" असो, ही गाणी देखील तितकीच नितांतसुंदर म्हणता येतील अशीच होती. पण लतादीदींनी अदालतमधली "उनको ये शिकायत है, यूं हसरतों के दाग..." आणि "जाना था हमसे दूर.." ही गाणी आपल्या सुरांच्या ताकदीने इतक्या उंचीवर नेऊन ठेवलीत की आशा आणि गीतादेखील निष्प्रभ झाल्यात या चित्रपटात.
पण मदनमोहनने आशाला काही नितांतसुंदर अशी गाणी दिलेली आहेत. १९५६ साली आलेल्या मेमसाहिबमधलं "इश्क एक जहर सही" असो, वा १९५३च्या चाचा चौधरीमधलं "मेरे पिया छेड़े जिया" असो. अठ्ठावन्नच्या आखरी दांव मधलं नुतनवर चित्रित झालेलं "हाय उनकी वो निगाहें, दिल देखे जिनकी राहे" असो, वा १९५९ साली आलेल्या बँक मॅनेजर मधलं "सबा से ये कह दो के कलियाँ बिछाए" असो. मदनमोहनने आशाला देखील अत्यंत देखणी गाणी दिलेली आहेत आणि आशाने देखील तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच तन्मयतेने ती निभावली देखील आहेत. काही म्हणा, लतादीदी मदनमोहनला भाऊ मानायच्या, त्यांचं नातं काही विलक्षणच होतं. "गझलों का बादशाह" म्हणायच्या लतादीदी मदनमोहनला. लताबाईंना जेवढी ग्रेट गाणी दिलीत मदनमोहनने तेवढी इतर कुणालाच नाही दिली. पण आशाची ही गाणी ऐकताना लक्षात येतं की आशाताईंच्या आवाजातली ताकद मदनमोहनने अगदी नेमकेपणाने ओळखली होती आणि तिचा त्याने व्यवस्थित वापरही करून घेतलेला आहे.
गीता दत्त यांचं "भाई भाई (१९५६)" मधलं “ऐ दिल मुझे बता दे” हे गाणं एक अस्वस्थ प्रश्न आहे. उत्तर नाही, फक्त शोध आहे. चाल साधी आहे, पण त्या साधेपणात एक अस्वस्थता आहे. गीता दत्त यांच्या आवाजातला कंप आणि मदन मोहन यांची मितभाषी धून मिळून हे गाणं खोलवर रुततं.
मुकेश यांच्या आवाजातली १९६१ साली आलेल्या संजोग मधली “भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ” ही रचना आज क्वचित ऐकू येते. पण हे गाणं ऐकताना जाणवतं की मदन मोहन यांनी मुकेश यांचा एक साध्या माणसाचा, सच्च्या माणसाचा म्हणून ओळखला जाणारा स्वर किती प्रामाणिकपणे वापरला आहे. इथे दु:ख वरवरचं न राहता ते जगण्याचा एक भाग बनून जातं.
शमशाद बेगम आणि मुकेश यानी गायलेलं , १९५० साली आलेल्या आँखें मधलं “हमसे नैन मिलाना बीए पास करके” हे गाणं मदन मोहन यांच्या वेगळ्या, थोड्या खेळकर बाजूचं उदाहरण आहे. फक्त गंभीर गझलाच नव्हे, तर गरज पडली तर तो लोकप्रिय, हलकंफुलकं संगीतही तेवढ्याच सफाईने देऊ शकत होता हे सिद्ध करणारं हे देखणं गाणं.
या सगळ्या गाण्यांकडे एकत्र पाहिलं, तर लक्षात येतं की मदन मोहन यांची कमी गाजलेली किंवा फारतर कमी ऐकली गेलेली गाणी हा त्यांच्या संगीताचा खरा गाभा आहे. मदनमोहन प्रसिद्धी, यश, झगमगाट यापेक्षा, नेहमीच गुणवत्तेला, अंतर्मुख करणाऱ्या संगीताला प्राधान्य देत आलेला आहे. म्हणूनच ही गाणी आजही शांतपणे ऐकली जातात. ती कदाचित प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे लक्ष वेधून घेत नसतील, पण एकदा ऐकली की कायमची मनात ठाण मांडून बसतात. मदन मोहन यांचं संगीत म्हणजे शांत एकांतात, आवाज कमी करून निवांतपणे, वेळ देऊन ऐकायचं संगीत आहे. आणि कदाचित म्हणूनच, ते आजही तितकंच जिवंत आहे, तितकंच हवंहवंसं आहे.
©विशाल कुलकर्णी
अतिशय सुंदर, समृद्ध आणि मनाला
अतिशय सुंदर, समृद्ध आणि मनाला भिडणारा लेख. लेख वाचताना जी शांत, खोल, हळवी अनुभूती आली त्याला "प्रतिसाद " देते म्हणणे अगदीच मिळमिळीत .
मदनमोहन "ऐकतोय ' असं वाटलं, वाचतोय असं वाटलंच नाही .
कॅसेटवाल्याच्या दुकानापासून सुरू होणारा प्रवास केवळ नॉस्टॅल्जिया नाही; त्या रसिकतेपोटी आपण घेतलेले कष्ट अफाट होते .
मदनमोहन यांची कमी गाजलेली गाणी जी पहिल्याच वेळी झडप घालून मन जिंकत नाहीत, पण हळूहळू उलगडतात हे फार नेमकं लिहिलं आहेस. तेच त्यांचं खरं संगीत आहे. आवाज करणारं संगीत आवाज करून निघून जातं, शांतपणे आत शिरू पाहणारं आणि खरोखरी आत शिरणारं संगीत म्हणजे ममो .
लता आणि ममो यांच्या नात्याचं वर्णन सूक्ष्म आणि प्रगल्भ वाटलं. तुला ते इतकं खोल जाणवू शकतं तर ते प्रत्यक्षात किती खोल असेल याचा तर मी विचारच करत राहिले . लतादीदी गात नाहीत, त्या भावना जगतात हे वाक्य त्या दोघांच्या नात्याचा परिपाक आहे .
तू जे म्हटलंयस कि माई री हे ममो यांच्या आवाजातलं ऐकलं कि लता फिकी वाटते , हे गाणं तर आहेच , पण त्यांच्या आवाजातलं नैना बरसे ऐकलं कि सुद्धा मला सेम वाटतं . कि अरे चित्रपटात सुद्धा साधना पडद्यावर दिसूदे , पण गाणं त्यांच्याच आवाजातलं घ्यायला हवं होतं , इतकं प्रभावी आहे ते .
आपण जसे आपल्या मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक आणि ऑफिसची मंडळी यांच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने खुलतो , तसेच तलत महमूद, रफी, मन्ना डे, आशा भोसले, गीता दत्त, मुकेश प्रत्येक गायकासोबत मदनमोहन वेगळे भासत पण एक मूळ जो प्रामाणिकपणा आहे तो अबाधित .
शेवटाला तू मूळ मुद्द्याला जो हात घातला आहेस कि कमी गाजलेली गाणी म्हणजेच मदनमोहनच्या संगीताचा खरा गाभा. हे विधान एकदम खोल आहे , कारण ते प्रसिद्धीलोलुप किंवा झगमगाटात आनंद मानणारे संगीतकार नव्हते, मद्य हि काही घटाघट पिण्याची गोष्ट नाही , तसंच यांचं संगीत आणि तुझा हा लेख सुद्धा . त्यांच्या संगीताप्रमाणे तुझा लेख जितका पुन्हा पुन्हा वाचला जाईल तितके मदनमोहन उलगडत जातील असं मला वाटतं .
तू जे लिहिलं आहेस तो फक्त लेख नाही , तुझा त्यांच्याबद्दलचा अभ्यास आहे . त्या निमित्ताने कमी गाजलेली गाणी आत खोलवर पुन्हा जिवंत होतात .
विकु तुमचे अलिकडचे लेख वाचले.
विकु तुमचे अलिकडचे लेख वाचले.
आपल्या आवडी खूप जुळतात. मदनमोहनची अनवट चालींची अजरामर गाणी हा माझाही जिव्हाळ्याचा विषय आहे. विशेषतः लता आणि रफीला घेऊन केलेली. लता तर त्याची मानलेली बहीणच. सध्या इथे रुमाल टाकून ठेवते.
पण माई री.... ऐकावं ते
पण माई री.... ऐकावं ते दस्तुरखुद्द मदनमोहनच्या आवाजातलंव . लताबाई देखील फिक्या पडतात त्यासमोर.......... आहा, मलाही सेम वाटते.
दक्षिणा, नैना बरसेबद्दल धन्यवाद ! ते गाणे ममो यांच्या आवाजातले ऐकले नव्हते.
ममो च्या गाण्यात सतारीचा जास्त वापर असायचा.
अगदी अगदी दक्षे _/|\_
अगदी अगदी दक्षे _/|\_
रानभुली, देवकी ..... मनःपूर्वक आभार !
अत्यंत आवडत्या संगीतकाराबद्दल
अत्यंत आवडत्या संगीतकाराबद्दल लेख. आणि तोही त्याच ताकदीचा - शांतपणे आत झिरपत जाणारा.
‘माई री’आवडतंच. ते मदनमोहनच्या आवाजात जास्त आवडतं यालाही अनुमोदन. त्याच पिक्चरमधलं ‘हम हैं मता ए कूचा बाज़ार की तरह’ही आवडतं. ‘माई री’ मधली तगमग, स्वतःशीच चाललेली झुंज आता संपली आहे. आता आपला आत्मा, आपलं गाणं जोपासायचं तेच बाजारात याचा स्वीकार करणारं गाणं. मध्येच 'बाज़ार की' मधल्या 'की' वरची हेलावून टाकणारी आर्तता एखाद्या सारंगीच्या सुरासारखी वाटते.
‘रस्म ए उल्फ़त को निभाए तो निभाए कैसे’ हे अजून एक आवडीचं गाणं. तबला आणि सितार ठळक तर अगदी स्ट्रिंग्स हलकी ऐकू येतील न येतील अशी. आणि लताच्या आवाजाला प्राधान्य देत गाण्यातले भाव ठळक करणारी समजूत.
‘मेरी आवाज़ सुनो’ ऑटाफे. अजूनही 'मैंने एक फूल जो सीने पे लगा रख्खा था, उसके परदे में तुम्हें दिल से लगा रख्खा था' ओळी ऐकल्या की अंगावर शहारा येतो.
शंकर जयकिशनच्या व्हायोलिन्सची नेहमी तारीफ होते. पण मदनमोहनने स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स तेवढ्याच ताकदीने वापरली आहेत. उदा. अख्खं ‘मेरा साया’ व्हायोलिन्स आणि तबल्यावर , ‘वो देखो जला घर किसी का’ तबल्याच्या ठेक्यावर आणि स्ट्रिंग्सवर तोलून घेतलं आहे. ‘हो के मजबूर’, ‘आप क्यों रोए’, ‘रुके रुके से कदम’ मधले इंटरल्यूड्स, ‘वो भूली दास्ताँ’चे प्रील्यूड, इंटरल्यूड्स ऐका.
अजून एक गम्मत म्हणजे त्याच्या गाण्यात सगळीच इंस्ट्रुमेंट्स वापरायचा अट्टाहास नसतो. तर गाण्याला अनुसरून एक किंवा दोन इंस्ट्रुमेंट्स ठळक असतात. तिसरं असलं तर अगदी बॅकग्राऊंडला. ‘हम हैं मता ए कूचा’मध्ये तंबोरा, तबला आणि सतार. 'नैनो में बदरा छाए'ला सतारीचा प्रील्यूड, तबल्याचा ठेका, मग रिमझिम पावसाची आठवण करून देणारं जलतरंग आणि कोसळता पाऊस, वारा आणि वीज यासाठी व्हायोलिन्स.
अजून एक गम्मत म्हणजे त्याच्या
अजून एक गम्मत म्हणजे त्याच्या गाण्यात सगळीच इंस्ट्रुमेंट्स वापरायचा अट्टाहास नसतो. तर गाण्याला अनुसरून एक किंवा दोन इंस्ट्रुमेंट्स ठळक असतात. तिसरं असलं तर अगदी बॅकग्राऊंडला. ‘हम हैं मता ए कूचा’मध्ये तंबोरा, तबला आणि सतार. 'नैनो में बदरा छाए'ला सतारीचा प्रील्यूड, तबल्याचा ठेका, मग रिमझिम पावसाची आठवण करून देणारं जलतरंग आणि कोसळता पाऊस वारा आणि वीज यासाठी व्हायोलिन्स.>>>>
अगदीच. म्हणुनच मी लेखामध्ये म्हणलं आहे की "त्याची अनेक गाणी ऐकताना असं वाटतं की संगीत मागेच थांबलय कुठेतरी आणि शब्द मात्र प्रखरपणे त्या संगीतावर स्वार होऊन पुढे येताहेत. प्रत्यक्षात त्याचं संगीत इतकं सूक्ष्मपणे काम करत, पाझरत असतं की आपल्याला ते फक्त “ऐकू” येत नाही, तर “जाणवत” राहतं. गात्रागात्रातून झिरपत राहतं."
मनःपूर्वक आभार, @माझेमन !
व्वा! सुंदर लेख!
व्वा! सुंदर लेख!
आपला काळ वेगळा, त्यामुळे मी मदन मोहन नाव पहिल्यांदा ऐकले ते वीर झारा चित्रपटाची गाणी त्यांचे जुने बहुधा अप्रकाशित संगीत आणि चाली वापरून बनवले आहे या संदर्भात. ती गाणी तेव्हाही आवडली होती आणि आजही तितक्याच आवडीने ऐकतो. मग जुनी गाणी काय कमाल असतील हा विचार यायचाच. पण जुनी गाणी कोणाची कुठली हे मुद्दाम शोधून काढणे हा माझा पिंड नाही. पण आता एवढा सुंदर लेख आला आहेच तर चेकतो. वर लेखात प्रतिसादात आलेली काही गाणी ओळखीची आहेतच..
हाही लेख सुंदर! यातली बरीचशी
हाही लेख सुंदर! यातली बरीचशी गाणी ऐकलेली नाहीत मात्र. 'माई री..'साठी +१ मदनमोहन यांच्या आवाजातल्या या गाण्याची बातच और आहे. 'नैना बरसे' मात्र त्यांच्या आवाजात नाही ऐकलेलं.
ऋन्मेऽऽष लिंक्स अपडेट केल्यात
ऋन्मेऽऽष लिंक्स अपडेट केल्यात माझ्या आवडीच्या गाण्यांच्या.
वावे मदनमोहनच्या आवाजात नैना बरसे..
माझेमन हम है मता ए कुचा काय
माझेमन हम है मता ए कुचा काय आठवा काढलीस मुली .
माझेमन, अत्यंत उत्स्फूर्त आणि
माझेमन, अत्यंत उत्स्फूर्त आणि ताकदीच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माझेमन link सुद्धा दिल्या हे
माझेमन link सुद्धा दिल्या हे भारी काम केले.. धन्यवाद
मगाशी लेख वाचल्यापासून नैना बरसे डोक्यात वाजत होते. ते आधी ऐकून घेतले. बाकीची रात्री.. पण सुरुवात इथूनच. अगदी त्या गाण्याच्या गूढतेला साजेसा आवाज आहे. त्या गाण्यांखाली आताच्या जनरेशनच्या प्रतिक्रिया वाचायला सुद्धा मला मजा येते.
छान लेख विशाल! मदनमोहन माझा
छान लेख विशाल! मदनमोहन माझा पण आवडता संगीतकार आहे.
>> पण माई री.... ऐकावं ते दस्तुरखुद्द मदनमोहनच्या आवाजातलंव
हे गाणं मदनमोहननी का गायलं याच एक वेगळंच कारण मला नुकतंच समजलं. बीबीसी एशियन नेटवर्क वरती रविवारी सकाळी हिंदी गाणी लागतात. कधी कधी तिथे एखाद्याची मुलाखत घेता घेता गाणी लावतात. तेव्हा एकदा मदनमोहनच्या नातवाची मुलाखत ऐकायला मिळाली. त्यात असं समजलं की चित्रपटातलं त्या गाण्याचं चित्रीकरण करण्याची वेळ आली पण गाणं लताच्या आवाजात रेकॉर्ड करायला लताला वेळ नव्हता. म्हणून, मदनमोहननी ते गाऊन त्यावर चित्रीकरण केलं नंतर लताच्या आवाजातलं गाणं तिथे घातलं गेलं.
लेख खूप आवडला… एकच कणसूर
लेख खूप आवडला… एकच कणसूर म्हणजे यातील सगळीच गाणी कमी लोकप्रिय किंवा कमी गाजलेली नाहीत. सुरुवातीची गाणी वगळली तर इतर सर्व गाणी खूप लोकप्रिय आहेत असे वाटते. अर्थात हा लोकप्रियतेचा निकष जर ज्या वेळी ही गाणी किंवा हे चित्रपट प्रकाशित झाले त्यावेळच्या प्रतिसादा/ लोकप्रियतेच्या संदर्भात असेल तर अलहिदा..
लेख अलवार आहे खूप आवडला हे पुनःश्च नमूद करतो
धन्यवाद मोद. हि गाणी आजघडीला
धन्यवाद मोद. हि गाणी आजघडीला खुप लोकप्रिय आहेत. कारण आज इंटरनेट दिमतीला हजर आहे. पुन्हा पुन्हा ऐकता येतात. सहज उपलब्ध होतात. तेव्हा हि गाणी ऐकण्याचा एकमेव सोर्स म्हणजे रेडिओ किंवा ध्वनि फिती, किंवा मग टॉकीजला जाऊन चित्रपट पाहणे. टेप रेकॉर्डर हि देखिल लग्झरी होती. त्यामुळे तेव्हा हि गाणी एवढी गाजली नसतील कदाचित.
छान लेख.मी फार इतकी जुनी गाणी
छान लेख.मी फार इतकी जुनी गाणी ऐकली नाहीतकाही ऐकली आहेत रेडिओवर पणजास्त त्याबद्दल ऐकलंय वडिलांच्या तोंडून.
म्हणून माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना हा लेख फार आवडेल इतके ते मदनमोहन मन्ना डेआणि लता दिदींचे फॅन आहेत त्यांना नक्की वाचून दाखवते .
माझेमन तुझा प्रतिसाद लेखाच्या
माझेमन तुझा प्रतिसाद लेखाच्या तोडीस तोड आहे , पुन्हा पुन्हा वाचावा असा .
विकु, दाद द्यायला पाहिजे अशा
विकु, दाद द्यायला पाहिजे अशा रसिकतेला! तुम्ही जुजांपैकी दिसता आहात. त्यामानानं आम्ही अगदीच नवखे माबोवर. या आणि अशा लेखांतून जुन्या, ऐन बहरातल्या माबोची चुणूक दिसते. आणि आपण काय मिसलं ते जाणवतं.. पण, हेही नसे थोडके!
मदनमोहनचा उल्लेख आला की स्स.. हाय! काळजालाच हात घातला हो तुम्ही! त्यात अनोळखी गाणी म्हणालात आणि मला एक गाणं आठवलं. पिक्चर होतं पूजा के फूल, हिरॉईन माला सिन्हा... (विषयांतर: माला सिन्हा ही नट्यांमध्ये भारतभूषण होती का? किती चांगली गाणी तिच्या वाट्याला आली आहेत! भाभूसारखी डोळ्यांना शिक्षाही नाही!) आणि गाणं 'मेरी आंखोसे कोई नींद लिये जाता है!'
उन्हाळ्याची रात्र, समोर एखादं सबमिशन असायचं. उघड्या खिडकीतून वाऱ्याची झुळूक यायची, लक्ष विचलित करायला. पण त्या तगमगीत थंडावा यायचा तो छायागीत ते बेला के फूलमधे चालणाऱ्या मैफिलीतून. एखादं गहिरं गाणं लागायचं, आणि समोरच्या सबमिशनमधलं लक्ष उडून डोळ्यासमोर वेगळीच चित्रं दिसायची, उमलायची, फुलायची ती कानात रुंजी घालणाऱ्या स्वरांच्या तालावर! ते वयच होतं प्रेमबिम, हुरहूर, त्यातल्या वेदना वगैरे समजू लागायचं!
मदनमोहनची पहिली ओळख झाली ती या अशा माहौलमध्ये.
मनात घर करून जाणारं पहिलं गाणं - यूं हसरतोंके दाग मुहोब्बत में धो दिए... मदनमोहनच साहेबांचं निघावं हे माझं भाग्य! अनेकवेळा रेडिओवर लागणारं गाणं, पण मनावर पडलेली ती त्याची मोहिनी कधीही कमी झाली नाही, आजही.
तर सांगत होतो 'मेरी आंखोसे...'. मला आठवतंय असंच कधी तरी ऐकलं, आणि काही तरी भन्नाट ऐकल्याची जाणीव झाली. वहीच्या शेवटच्या पानावर नोंद झाली. असे अनेक लक्षणीय मुखडे तिथे लिहिले जायचे, की याची नंतर वास्तपुस्त केली जावी. पुढच्या वेळी ऐकलं तेव्हा इतके दिवस झाले होते की वही बदलली होती! पण ती सतार! ती कशी विसरली जाणार? ती दैवी सतार... हिंदी सिनेसृष्टीत अनेक, अनेक गाण्यांना सतारीची साथ आहे. पण या गाण्यात सतारीचं राज्य आहे हेमावैम! विकु, तुम्ही म्हणालात तसं वाद्यमेळाचा बडिवार नव्हे, एकच वाद्य! पण इतकं नेमकं की लताबाईंच्या मदहोश करणाऱ्या स्वरांचा अवकाश भरून काढणारं!
पुढे अनेक वर्षांनी गाणं यूट्यूबवर बघितलं. पूजा के फूल?! कधी न ऐकलेला पिक्चर. माला सिन्हा आहे हे तेव्हा कळलं. आणि गाणं निव्वळ सुश्राव्यच नसून नयनमनोहरही आहे हे कळलं! माला सिन्हाच्या वळणावळणांवरून ठिबकणाऱ्या मादकतेचे प्रतिध्वनीच जणू त्या तारांतून उमटतात! समसमा संयोग जाहला... असो.
या गाण्यात रईसखांची सतार अशी काही झंकारली आहे, बस!
विकु, तुमच्या म्हणण्याचं एक प्रमाण इथे आहे. या गाण्याविषयीची एक खास गोष्ट संजीव कोहली, म्हणजे मदनमोहन साहेबांच्या मुलानं सांगितलेली आहे. ती वाचनीय आहे!
या गाण्यात संतूर होती! पं. शिवकुमार शर्मांनी वाजवलेली! ते व्हर्जनही तिथे ऐकायला मिळेल. पण ही संगीतकाराच्या कौशल्याची खूण आहे की त्याला काय कमी करावं हे चोख कळलं, आणि एक अविस्मरणीय गाणं घडलं!
छान - मस्त मस्त गाण्यांच्या
छान - मस्त मस्त गाण्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.
>>> आशा भोसले यांच्या आवाजातली मदन मोहन यांची गाणी
अरे, 'झुमका गिरा रे', 'शोख़ नज़र की बिजलियाँ', 'सबा से ये कह दो' विसरलास का?
स्वातीताई, यादी लिहायला घेतली
स्वातीताई, यादी लिहायला घेतली तर काय लिहू आणि काय नको असे होईल ना...
धन्यवाद.
काय सुंदर प्रतिसाद, अबूवा.
काय सुंदर प्रतिसाद, अबूवा. जियो...
माझी सगळी मेहनत सार्थकी लागली . खूप खूप आभार.
Abuva यस्स संतूर
Abuva यस्स संतूर
वर मी नैना बरसेमधे पावसासाठी जलतरंग म्हटलं होतं पण ते संतूर आहे ॲक्चुअली.
या गाण्यात रईसखांची सतार अशी काही झंकारली आहे
>>>
मदनमोहन यांच्या बऱ्याच गाण्यांसाठी रईस खां यांनीच सतार वाजवली आहे.
दक्षिणा, देवकी थॅंक यू.
सुंदर लेख, विशाल!
सुंदर लेख, विशाल!
आशाबद्दलच्या पॅराला मात्र आक्षेप आहे. मलाही वाटायचे मदनमोहनकडे आशा तुलनेने कमी गायली. पण आमच्या एका संगीतविषयक ग्रूपमध्ये एकदा मदनमोहनची गाणी सादर केली होती. जेवढी त्याने लताला गाणी दिली जवळपास तेवढीच आशाला दिली असावीत, असे वाटले तेंव्हा. पण बहुतेक सगळ्याच संगीतकारांसारख्या सुंदर चाली लताला दिल्या गेल्या. आशाला जी गाणी मिळाली त्यात तिचा कस लागलाय असे मला तरी वाटत नाही.
माई री - बहुतेक तूच यावर एक लेख लिहीला होतास. मदनमोहनचं गाणं आणि लताचं गाणं दोन्ही सारखीच आवडतात. पण माझ्याकडे कॅसेटवर एक गाणं होतं ज्यात मदनमोहनचं गाणं संपता संपता लता सुरू करते. त्या दोघांच्या आवाजातली तफावत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवायची त्या गाण्याला. आता ते मिळतंय का ते बघायला हवं. पण हल्ली लताचं गाणं जास्त पटतं मला. मदनमोहनच्या गाण्यात सल एक स्वर चढा लागलाय. पण लताच्या आवाज मात्र "कुणाला सांगू मी?" हे solitude अगदी सहीसही दाखवते. स्वरांची धार तिने अंमळ बोथट केली आहे या गाण्यात. शब्दानुरूप कसे गावे हे तिच्याकडूनच शिकावे. नाही तर आवाजाची धार काय असते हे तिने मदनमोहनकडेच गायलेल्या "हम है मता-ए-कुचा" मध्ये चांगलेच समजते.
माझ्याकरता गझल म्हणजे मदनमोहन. आधीच मला कविता कमी कळते. त्यात गझलेमधले ते कठीण शब्द. पण गझल नावडती झाली ती दूरदर्शनच्या काळातल्या आरोही आणि शाम-ए-गझल या दोन कार्यक्रमांमुळे. त्यातल्या चाली इतक्या एकसुर्या आणि कंटाळवाण्या असायच्या की त्याच्याहून मराठीच्या तोंडी परीक्षेत आम्ही कविता बर्या म्हणत असू असे वाटायचे. पण मग मदनमोहनच्या चालींनी गझलेबद्दलचा तिटकारा दूर केला.
मदनमोहन म्हणजे धीरगंभीर चाली असे बहुतेकांना वाटते पण त्याने उडत्या चालीची खूप सुंदर गाणीही दिली आहेत. आखों आखों मे उनसे (अदा), अदाए जब हो लटकेदार (खोटा पैसा), बच गए (चाचा झिंदाबाद) - ही काही ठळक उदाहरणे.
आज तो नाही, लताही नाही पण त्या दोघांचे बागी सिनेमातले "हमारे बाद अब महफिल मे" आजही खूप आवडतं आहे - हो आणि थोडं कमी प्रसिद्धही.
सुरेख आणि समृद्ध करणारं लेखन.
माझेमन आणि माधव, छान लिहिलंय.
परत एक अप्रतिम तरल लेख.
परत एक अप्रतिम तरल लेख. दंडवत बाबारे तुला.
कॅसेट भरून घ्यायचे दिवस आठवले अगदीच.
“फिर वही शाम वही ग़म वही तनहाई है” ही नज़्म ऐकताना असं वाटतं की संध्याकाळ स्वतःच बोलतेय. तलतच्या आवाजात एक अबोल, मौन उदासी आहे, त्याच्या स्वरांमधला हळूवार, मुलायम कंप याचे द्योतक आहे आणि मदन मोहन त्या उदासीला अतिशय संयत, संवेदनक्षम चौकट देतो. कुठेही मोठे आरोह-अवरोह नाहीत, पण प्रत्येक ओळ मनावर एक प्रकारचा ताण उभा करते. >>> ओहह, माझ्या अतिशय आवडत्या गाण्याबद्दल काय लिहिलं आहेस.
“रंग और नूर की बारात किसे पेश करूँ” हे गाणं म्हणजे निव्वळ एक गीत नसून एक संगीतमय निवेदन आहे. खरेतर साहिरच्या शब्दांची स्वतःचीच उंची इतकी अफाट आहे की नुसते गद्यात वाचली असती गझल तरी हिट झाली असती, इथे तर मदनमोहनचे संगीत आणि जोडीला रफीसाहेबांचा दैवी आवाज. >>> सहीच.
गीता दत्त यांचं "भाई भाई (१९५६)" मधलं “ऐ दिल मुझे बता दे” हे गाणं एक अस्वस्थ प्रश्न आहे. उत्तर नाही, फक्त शोध आहे. चाल साधी आहे, पण त्या साधेपणात एक अस्वस्थता आहे. गीता दत्त यांच्या आवाजातला कंप आणि मदन मोहन यांची मितभाषी धून मिळून हे गाणं खोलवर रुततं. >>> अगदीच.
“कौन आया मेरे मन के द्वारे” हे गाणं भक्तिरसाच्या सीमेला जाऊन भिडतं. >>> खरं आहे.
प्रतिसाद वाचते निवांतपणे.
Wow!!! माबोकरांच्या मदनमोहन
Wow!!! माबोकरांच्या मदनमोहन आणि संगीताच्या प्रभुत्वाने थक्क झालो. मी रोमात आहे पण भरपूर आनंद लुटतो आहे. माझेमन आणि स्वातीने गाण्यांच्या लिंक्स देऊन माझ्यासारख्यांसाठी गाणे ऐकणे फारच सोपे केले. (अशी लिंक कशी द्यायची?)
माधव छान लिहिलंय.
माधव छान लिहिलंय.
मी वर ‘माई री’ गाण्याची लिंक दिलीय. तुम्ही म्हणता तसंच मदनमोहनचे स्वर संपता संपता लताचे सुरू होतात.
त्याने उडत्या चालीची खूप सुंदर गाणीही दिली आहेत.
>>> अगदी अगदी. ऐ दिल मुझे बता दे काय किंवा जरूरत हैं जरूरत हैं काय.
माधव आणि अन्जुताई, मनःपूर्वक
माधव आणि अन्जुताई, मनःपूर्वक आभार !
माबोवर लिहीणे बंद केल्यापासून हेच मिस करत होतो. इथे जसे रसिक भरभरून व्यक्त होतात तसे इतरत्र कुठेच अनुभवाला येत नाही. मेहनत सार्थकी लागते.
धन्यवाद मंडळी !
@तिता धन्यवाद. कॉमेन्ट
@तिता धन्यवाद. कॉमेन्ट बॉक्सच्य वर दिलेल्या सिम्बॉल्सपैकी सातवा सिम्बॉल ! त्यावर टिचकी मारून तिथून तूम्ही लिन्क देवू शकता.
wow! काय मस्त खजिना आहे हा
wow! काय मस्त खजिना आहे हा लेख! यातली काही गाणी मी कधी लक्ष देउन ऐकलेली नाहीत आणि कधी कानावर पडलेली असतील तर लक्षात नाही. आता एकेक शोधतो. या गाण्यांबद्दल खूप उत्सुकता आहे - त्याचे कारण मदनमोहनच्या संगीतातील जादूचा मला गेल्या काही वर्षांत लागलेला शोध. ही गाणी आजूबाजूला बरीच वर्षे होती पण पोहोचली नव्हती. काही वर्षांपूर्वी अचानक डोक्यातील कोणता स्विच ऑन झाला माहीत नाही आणि त्यानंतर एक मोठा गाण्यांचा लॉट मला प्रचंड आवडू लागला. नैना बरसे, नैनों मे बदरा छाये, मिलो न तुम तो वगैरे. कट्टर-मदनमोहन-फॅन-स्कूल मधे ही कदाचित पहिल्या दुसर्या इयत्तेतील गाणी असतील याची कल्पना आहे.
संगीत व लताचा आवाज यातून एक काहीतरी जादुई तयार होते हे कदाचित आधीही जाणवले असेल पण ही गाणी ऐकताना जितक्या प्रकर्षाने जाणवले तितके आधी जाणवल्याचे लक्षात नाही. मधे ऑफिसला जाताना पॅण्डोरा अॅप मधे नैना बरसे अनेकदा लागायचे. या गाण्याची मी आधी कधी दखल घेतली नव्हती. पण २-३ वेळा कार मधे पूर्ण फोकसने ऐकताना "आँखों मे है बरसोंकी प्यास" हे असे काही पोहोचले की त्यानंतर मी किती वेळा ते गाणे ऐकले असेल गणतीच नाही. तसेच नैनों मे बदरा छाये मधे पहिल्या कडव्याच्या शेवटी "...शरमाके देगी तोहे मदिरा के प्याले" ची चाल, संगीत, लताचा आवाज यातून काय अवर्णनीय मॅजिक निर्माण झाले आहे माहीत नाही. पण हीच जागा पुन्हा ऐकायला मी असंख्य वेळा हे गाणे ऐकले (याच्या सुरूवातीच्या संगीताबद्दल माझेमन यांचे वर्णनही सुंदर आहे). तीच गोष्ट मिलो न तुम तो ची. ओ भोले साथिया/ओ सोहणे जोगिया च्या वेळची जागा.
त्यामुळे "...हळुहळू उलगडातात आणि मग आयुष्यभर राहतात" हे पूर्ण पटले. लेखातील अनेक वर्णने चपखल आहेत. गीतकारांचे ठिकठिकाणी केलेले उल्लेख आवडले. साहिर बद्दल इथे लिहीले तर लेखापेक्षा प्रतिक्रिया मोठी होईल. पण "मैने जजबात निभाये है उसूलोंकी जगह" ला जसा पॉज येतो त्यावरून मदनमोहनचे "शब्दांना स्पेस देणे" चा उल्लेख एकदम चपखल आहे.
मदनमोहन ज्यांना कॉलेजात असतानाच "पोहोचला" त्यांची - पुलंच्या भाषेत बोलायचे तर- "सांगितिक वाढ उफाड्याची" असेल असे म्हणावे लागेल
बहुतेकांना बराच नंतर क्लिक होतो. कॅसेट्स भरून आणण्याचा उद्योग केलेला आहे खूप, त्यामुळे ते ही रिलेट झाले.
आता पोतडी उघडलीच आहे तर येऊ द्या अजून! आणि वेलकम बॅक!
Pages