काटा वजनाचा --६

Submitted by सुबोध खरे on 4 February, 2026 - 09:22

अति खाण्याचे सामाजिक मानसशास्त्र-- आता हे आणिक काय ?

अशी कल्पना करून पहा आपण आपले वजन कमी करण्याचा सु(दृढ) निश्चय केलेला आहे आणि नेमका त्यात आपल्या मित्रांबरोबर मेजवानीचा बेत ठरला आहे.

आपण निश्चय केला आहे आहे कि उगाच तेथे अरबट चरबट खायचे नाही. चखणा खाताना अवास्तव कॅलरी पोटात जातील म्हणून तुम्ही निघतानाच एक सॅलड म्हणून काकडी टोमॅटो असे खाऊन निघता.

"पण" मेजवानी संपेस्तोवर आपण वाजवीपेक्षा "किती तरी जास्त" खाल्ले आहे हे आपल्या लक्षात आल्यामुळे आपण स्वतःवर फारच चिडलेले असता.

हि अशी परिस्थिती आपल्यापैकी ९० % लोकांनी अनुभवलेली असेल. पण यात केवळ आपलाच दोष आहे का? कि त्या वातावरणाचा? कि ती वेळच "तशी" होती.

समाजशास्त्रज्ञ आणि मानस शास्त्रज्ञ सभोवतालच्या वातावरणाचा आपल्यावर किती परिणाम होतो याचे संशोधन करीत असताना त्यांना समोर आलेल्या निष्कर्षांचा सारांश येथे मी देत आहे.

आपण जरुरीपेक्षा जास्त केवळ भुकेसाठी खात नाही तर त्याला अनेक पैलू आहेत ज्यात चव आणि स्वाद हा एक महत्त्वाचा घटक आहेच परंतु सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे असे लक्षात आले आहे.

आपल्या बरोबर असणारी मित्र मंडळी, आपली मानसिक स्थिती, सभोवतालचे धुंद वातावरण, आपण पीत असलेले मद्य असे अनेक घटक आपल्या गरजेपेक्षा जास्त खाण्याला कारणीभूत आहेत.
( पहा मी म्हणत नव्हतो मी काही दारुडा नाही. पण मित्रांनी जबरदस्तीने पाजली असेच काहीसे वाटले कि नाही?....
मुझे दुनिया वालो शराबी न समझो ..... )

परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर का आणि कशी जाते?

१) केवळ बाहेर / हॉटेलात जेवल्यामुळे असत खाल्ले जाते असे नव्हे तर आपण मित्र मंडळींबरोबर असला कि आपले जेवण जास्त वेळ रमत गमत चालते. म्हणजेच जितका जास्त वेळ आपण जेवाल तितके जास्त अन्न खाल्ले जाते. आपण दुसऱ्या व्यक्ती बरोबर असता तेंव्हा आपण २८ % जास्त जेवता आणि तेच एका ५-६ जणांच्या गटात असलात तर हेच ७५ % पर्यंत अधिक खाल्ले जाते.

लोकांचे असे म्हणणे असते कि आम्ही संगतीत जेवताना सावकाश / कमी वेगाने चवीचवीने जेवतो. त्यामुळे अन्नाची मात्रा / प्रमाण कमी असते. पण वस्तुस्थिती अशी नाही. एकटे जेवण्यापेक्षा मित्रांच्या संगतीत आपण जेवणाला दीड पट वेळ घेता. पण आपल्या अन्न सेवन करण्याचा वेग मात्र तेवढाच असतो. म्हणजेच सरासरी मित्रांच्या संगतीत आपण दीड पट जेवता.

२) अनियंत्रण गृहीतक --म्हणजेच आपण इतरांच्या उपस्थितीत आपण किती खातो आहे यावर आपले बारकाईने लक्ष राहत नाही. आपले मन सारखे गप्पा आणि हास्य कल्लोळ सारख्या गोष्टीने विचलित होत असल्यामुळे प्रत्यक्ष आपण किती खातो आहोत याच्या कडे आपले लक्ष राहत नाही.
यात दुहेरी फास असा असतो कि आपले मित्र चांगले चाटून पुसून जेवतात आणि वर शेवटी काहीतरी स्वीट डिश/डेझर्ट मागवतात आणि आपण गतानुगतिक म्हणून त्यांच्यात सामील होतो.

अर्थात काही वेळेस याच्या उलट आढळते. म्हणजे आपण आपल्या वरिष्ठाच्या बरोबर जेवायला गेलो असता किंवा बायका लग्नाच्या अगोदर "डेट"वर गेल्या असता आपले वर्तन प्रसंगाला "साजेसे' असावे म्हणून कमी खातील.

परंतु त्याच एकदा लग्न झाल्यावर मनावरील प्रतिबंध दूर झाल्याने "व्यवस्थित" जेवताना आढळतात.

कोणत्याही तर्हेची गोष्ट जर आपले लक्ष विचलित करणारी असेल तर त्याने आपले मनाचे पोट भरण्याच्या संवेदनेकडे दुर्लक्ष होते आणि आपण अनवधानाने जास्त खातो. यात टीव्ही पाहणे जेवताना मोबाईल वर व्हॉट्स अँप, चेपू वर गप्पा मारणे, पुस्तक वाचन या गोष्टी आपल्याला गरजेपेक्षा जास्त खाण्यास कारणीभूत होतात हे आढळून आलेले आहे.

वाईट गोष्ट म्हणजे अर्धे जेवण झाल्यावर या गोष्टी बाजूला ठेवल्या तरीही माणसे परत जास्त खाताना आढळतात कारण आपण किती जेवलो आहोत याची त्यांच्या मनाने नोंदच घेतलेली नसते.
या नकळत होणाऱ्या गोष्टींमुळे माणसाना असहाय्य असल्यासारखे वाटते.

याला सोपा उपाय म्हणजे काय.

१) बाहेर/ मित्र मंडळींबरोबर जेवताना आपण किती खात आहोत याचे भान असावे.

लोक हे म्हणतील कि अहो डॉक्टर मित्रांबरोबर गप्पा मारताना असे भान कसे ठेवणार?

याला उत्तर एकच.

घोळक्यात गप्पा मारताना सुद्धा बायकांना आपल्या पदराचे भान असतेच ना? तसे तुम्ही ठेवा. यात अवघड काहीच नाही.

२) जेवताना जेवणाकडेच लक्ष द्या आणि प्रत्येक घास चवी चवीने तोंडात घोळवून खा.

आयुर्वेदात सांगितलेले आहे ना एक घास ३२ वेळेस चावून खावा. याचा अर्थच तो आहे.

स्विगी ची एक जाहिरात आहे त्यात एक सुखवस्तू माणूस स्विगी वरून एक गुलाबजाम मागवतो. आणि दारातच तो गुलाबजाम अख्खा गट्ट करतो. आता यात आपल्याला त्याची चव किती काळ मिळेल १५ ते २० सेकंद.

या ऐवजी हाच गुलाबजाम आपण चार भाग करून एक एक भाग हळू हळू चावून खाल्ला तर आपल्या मुखात चौपट वेळ याचा स्वाद राहील.

याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण गोड खात असताना आपले जिभेवरील संवेदक लवकरच संतृप्त होतात. मग आपण मध्येच एखादा तिखट किंवा आंबट किंवा दुसऱ्या चवीचा पदार्थ खाल्ला तर हेच संवेदक परत सक्रिय होतात आणि आपल्याला परत चांगला स्वाद मिळू शकतो.

आईस्क्रीम खाताना यायचा अनुभव आपल्याला लगेच येतो पहिल्या दोन घासात लागणारी चव नंतर परत लागत नाही. कारण एक तर गोड आणि वर अति थंड असल्याने आपले जिभेवरील संवेदक जास्त लवकर संतृप्त होतात. मग उरलेले आईस्क्रीम आपण सवयीने संपवतो.

पुढच्या वेळेस लग्नाला गेलात तर आईस्क्रीमची मजा अधिक हवी असेल तर हा उपाय करून पहा. दर दोन घास आईस्क्रीम नंतर एक पापडाचा तुकडा खाऊन पहा. आपल्याला तेवढेच आईस्क्रीम तिप्पट चांगला स्वाद देईल.

३) मित्रांबरोबर बसलेले असताना चमचमीत गोष्टी येतात उदा चिकन/ पनीर टिक्का हे खाताना भान ठेवा आणि याच्या बरोबर येणारे सॅलड पण चवीने आणि सावकाश खा.

या गोष्टींचे भान ठेवून सर्व तर्हेचे उत्तम खाद्य पदार्थ प्रमाणात खाऊनही आपला मिताहार चालू ठेवा आणि जेवणानंतर आपले मन आपल्याला खात राहिल (guilt) असे खाऊ नका.

शेवटी "पदर ढळला तर त्याची किंमत आपल्यालाच" चुकवावी लागते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जेवताना जेवणाकडेच लक्ष द्या आणि प्रत्येक घास चवी चवीने तोंडात घोळवून खा. >>>> +10000000
यालाच माईंड फुल इटिंग म्हणतात ना ! याचा अनुभव आहे याने फार फरक पडतो .एकूणच वजन आणि आरोग्यावर.

हा भागही छान.