सत्तेचा सारीपाट

Submitted by 'कल्पनेचा कुंचला' ✍️ on 25 January, 2026 - 07:05

निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले,
नेत्यांना आता लोकशाहीचे वेध लागले.
हौशी आणि नवखे सर्वच आता जागे झाले,
दिवसरात्र लोकांमध्ये घिरट्या घालू लागले.

तिकीट मिळवण्यासाठी रान पेटून उठले,
चौकाचौकांत मोठे-मोठे बॅनर लागले.
अण्णा, अप्पा, दादा आणि ताई,
सारेच आपापल्या कामांचे गुणगान गाऊ लागले.

तिकीट मिळवण्याच्या आशेने,
रस्त्यावर शक्ती प्रदर्शन होऊ लागले.
आपापले धागेदोरे नीट वापरून,
तिकीट मिळवण्यासाठी सर्व रांगेत लागले.

तिकिटांचे सर्व वाटप मात्र,
आपल्याच सगेसोयऱ्यांना होऊ लागले.
आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नशिबी पुन्हा,
सतरंजी उचलणे एवढेच उरले.

सहलींच्या नावाखाली माणसे जमू लागली,
हॉटेल आणि ढाब्यांवर मोठी रांग लागली.
मतदाराला कधी नव्हे ते सुगीचे दिवस आले,
निवडणुकीच्या निमित्ताने त्याची आठवण काढू लागले.

प्रचारामध्ये गरिबांच्या घरी,
नेते आवर्जून जेवायला आले.
विकतच्या पाण्याच्या बाटलीसोबत,
दोन-चार फोटोही काढून गेले.

आपापल्या प्रभागात लोकांना,
साड्या, भांडी आणि कपडे वाटू लागले.
आणि कधी नव्हे ते श्रीमंत नेते,
सामान्य लोकांच्या पाया पडू लागले.

लोकांच्या अनेक प्रश्नांची,
आता मोठी यादी तयार झाली.
लवकरच निराकरण करतो प्रश्नांचे,
अशी पुन्हा एकदा ग्वाही मिळाली.

जातींची आणि धर्मांची,
नवीन समीकरणे जुळू लागली.
धर्माच्या नावाखाली पुन्हा एकदा,
लोकांची माथी मात्र भडकली.

शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि आरोग्य,
यांची चर्चा कुठेच जास्त होईना.
निवडणूक ज्या मुद्द्यावर व्हायला हवी,
नेमके तेच मात्र कुठे घडेना.

निवडणूक जिंकण्यासाठी येथे,
सर्व नियमांची पायमल्ली झाली.
'राजकारणात सर्वकाही माफ आहे',
अशी नवी प्रथा जन्माला आली.

कोणता पक्ष आणि कोणती विचारधारा—
सत्तेसाठी सगळे 'साठे-लोटे' झाले.
विकासाच्या केवळ नावाखाली,
आरोप-प्रत्यारोप विसरून एकत्र आले.

शिक्षण घेऊनही हाताला नोकरी काही मिळेना,
दिवसभर वाट पाहून नळाला पाणी काही येईना;
टेंडर निघूनही रस्त्यातले खड्डे काही भरेना,
अन 'विकास' ज्याला म्हणतात, तोच कुठे दिसेना!

मोठ्या-मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा तर खूप झाल्या,
पण कितीतरी सरकारी योजना फक्त कागदावरच राहिल्या;
अशा खोट्या आश्वासनांच्या ओझ्याखाली मात्र,
कितीतरी सामान्यांच्या आशा पुन्हा एकदा मेल्या

सत्तेच्या या सारीपाटात,
सामान्य माणूस पुन्हा हरला.
विकासाचा तो कागदी घोडा,
फाईलीतच अडकून पडला.

मतदाराच्या वाट्याला पुन्हा,
तीच जुनी भाषणे आली.
ज्याच्यासाठी निवडणूक लढवली,
ती 'लोकशाही' कागदावरच राहिली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users