
अनेक दिवस झाले,
आता ते कॉल येत नाहीत,
तासनतास बोलणारी माणसे,
आता साधा मेसेजही करत नाहीत.
शेवटचा संवाद होऊन,
अनेक आठवडे लोटले,
मनमुराद गप्पा मारणारे,
सांगा नेमके कुठे हरवले?
एक फोन जरी आला,
तरी गावभर चौकश्या असायच्या,
पण त्या साध्या गप्पा,
कधीच कंटाळवाण्या नसायच्या.
नावे पुन्हा सारी तपासली,
कॉन्टॅक्ट लिस्ट ही चाळली,
माणसांच्या या अफाट गर्दीत,
आपली माणसे कुठे विखुरली?
फोन नसताना कधीतरी,
मायेचे एक पत्र यायचे,
२५ पैशांचे ते टपाल,
अफाट आनंद देऊन जायचे.
एवढ्याशा त्या पत्रात,
सगळ्यांची खुशाली कळायची,
प्रत्यक्ष भेटण्याची मग,
एक वेगळीच ओढ लागायची.
व्हिडिओ कॉलच्या जगात,
सर्व काही हाताशी आहे,
पण डोळ्यांना ओढ लागणारे,
ते दर्शन मात्र दुर्लभ आहे.
सोशल मीडियाच्या काळात,
जग अगदी जवळ आले आहे,
पण मनातले बोलण्याची
इच्छा मात्र कुठेतरी संपत चालली आहे.
आयुष्याच्या या शर्यतीत,
सगळेच वेगाने धावत आहेत,
जिथे स्वतःलाच वेळ नाही,
तिथे अपेक्षा मात्र फोल ठरत आहेत.
कधीतरी मनात विचार येतो,
मनाला वाटेल तसे बोलावे,
आणि आपल्या माणसांसमोर,
सगळे मन रिक्त करावे.
नात्यांमधला तो ओलावा,
पुन्हा एकदा यावा,
आणि मनातला तो कडवटपणा,
फक्त एका कॉलने मिटावा.
आयुष्याच्या या शर्यतीत,
स्वतःसाठी वेळ काढूया,
आणि जी आपली माणसे आहेत,
ती पुन्हा एकदा जोडूया!
© 2026 Arjun (कल्पनेचा कुंचला' ✍️). All Rights Reserved.
छान कविता,
छान कविता, चित्र छान आहे सुरुवातीचं.
आणि मायबोलीवर स्वागत .
सिमरन, धन्यवाद! माझ्या
सिमरन, धन्यवाद! माझ्या कवितेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि दाद दिल्याबद्दल खूप खूप आभार.