काटा वजनाचा --४

Submitted by सुबोध खरे on 23 January, 2026 - 01:51

आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली.

काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन.

काही वैद्यकीय शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला कि जसे आपल्या मेंदूत एक थर्मो स्टेट(THERMOSTAT) असतो जो शरीराचे तापमान स्थिर ठेवतो तसाच एक एडीपोस्टेट (ADIPOSTAT) असतो. याचे प्रत्यक्ष अस्तित्व अजून मिळालेले नाही. परंतु हा सिद्धांत असे सांगतो कि आपल्या मेंदूच्या तळाशी असलेल्या HYPOTHALAMUS या मेंदूच्या भागात याचे अस्तित्व असते आणी हा एकदा एका वजनाला स्थिर(SET) झाला कि तो विशिष्ट मर्यादेत आपल्या शरीराचे वजन वाढू अथवा कमी होऊ देत नाही.

जर आपले वजन ६० किलो असेल आणी आपण त्याला आवश्यक अशा २१०० कॅलरी इतके अन्न खात असू तर आपले वजन स्थिर राहील परंतु आपण जर २४०० कॅलरी इतके अन्न खालले तर हा एडीपोस्टेट आपल्या वरच्या ३०० कॅलरी वेगवेगळ्या स्वरुपात खर्च करून वजन स्थिर ठेवतो. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली तपकिरी चरबी ( BROWN FAT) येथे मेंदू संकेत पाठवितो ज्यामुळे हि बरीचशी खाल्लेली अतिरिक्त चरबी (उर्जा) अक्षरशः जाळून टाकली जाते. याशिवाय आपली आतडी अतिरिक्त अन्न शोषण करण्या ऐवजी पुढे ढकलून देतात त्यामुळे माणसे बरेच अन्न दुसर्या दिवशी अक्षरशः वाया घालवतात. यांच्या आतड्यातील जीवाणू पण याला जबाबदार आहेत असा एक सिद्धांत(THEORY) आहे.

आपले शरीर साधारणपणे ५० % उर्जा कार्यक्षमतेचे (EFFICIENCY) असते
साधारण पणे आपले शरीर जेंव्हा एक ग्राम चरबी जाळते तेंव्हा साडेचार कॅलरी उर्जा या ए टी पी(ATP) मध्ये साठवून ठेवली जाते जी तुमच्या चयापचयासाठी(METABOLISM) साठी वापरली जाते आणी उरलेल्या साडेचार कॅलरी उष्णतेच्या रुपात बाहेर पडतात.जेंव्हा आपली तपकिरी चरबी ( BROWN FAT) काम करू लागते तेंव्हा एक ग्राम चरबीतील बहुतांश उर्जा हि उष्णतेच्या स्वरुपात बाहेर पडते आणी फारच थोडी उर्जा साठविली जाते. थोडक्यात तेच काम करायला आपले शरीर जास्त उर्जा खर्च करते.

आपण पाहिले असेल कि स्थूल माणसाना सदासर्वदा घाम येतो याचे एक कारण म्हणजे त्यांच्या शरीरावरील अतिरिक्त चरबीचा थर उष्णतारोधक असल्याने उर्जा बाहेर टाकत नाही आणी दुसरे कारण हि तपकिरी चरबी ( BROWN FAT) त्यांनी खाल्लेले "अतिरिक्त" अन्न जाळून वजन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते.

महत्त्वाचा मुद्दा -- आपले वजन जास्त असेल आणी आपलयाला थंड बसलेले असताना सुद्धा सतत घाम येत असेल तर त्याचा साधारण अर्थ असा आहे कि आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न खात आहात.

आता एखाद्या ६० किलो वजनाच्या व्यक्तीने आपल्या गरजेच्या पेक्षा बरेच जास्त अन्न बरेच दिवस (८०-१०० दिवस) खाल्ले तर काय होते आपला एडीपोस्टेट (ADIPOSTAT ) वरच्या बिंदूवर स्थिर होतो. म्हणजे ६० ऐवजी ६३ किलो वर स्थिर होतो. आता या व्यक्तीला रोजचे कामकाज चालविण्यासाठी २१०० ऐवजी २३०० कॅलरी चे अन्न लागते. असे बरेच जास्त अन्न बरेच दिवस खाणे चालू राहिले तर त्या व्यक्तीचे वजन वाढतच जाते. म्हणून वर्षभरात लोकांचे १०-१२ किलोने वजन सहज वाढते.

केसरी ट्राव्हल्स सारख्या संस्थेत १५ दिवसांच्या सहलीला जाऊन आलेली माणसे ३-४ किलोने वजन वाढवून येतात कारण तेथे दिवसात ५ वेळेस मिळणारे सुग्रास जेवण आणि न्याहारी, नाश्ते. ते जवळजवळ ४५०० कॅलरी इतके असतात. आणि एकदा पैसे भरले आहेत तर का सोडा? खाउन घ्या अशी आपली वृत्ती.

जेंव्हा हि व्यक्ती वजन कमी करायचा प्रयत्न करते तेंव्हा हाच एडीपोस्टेट (ADIPOSTAT) आपले वजन कमी होऊ देत नाही. आपण कमी कॅलरी चा आहार घेतो तेंव्हा आपले शरीर जास्त कार्यक्षम होते आणी एक गरम चरबी जाळल्यावर सहा ते सात कॅलरी ए टी पी मध्ये साठवते. थोडक्यात तेवढेच काम करण्यासाठी आपल्या शरीराला कमी उर्जा खर्च करायला लागते. यामुळे मिताहार सुरु केला तरी वजन सहज सहजी कमी होत नाही याउलट त्याच व्यक्तीला थंडी वाजू लागते. थंडी वाजली किती व्यक्ती अंगावर अधिक कपडे चढवून घेते आणी उर्जेचा अपव्यय कमी होतो. थोडक्यात आपले वजन कमी होत नाही.
शिवाय आपली आतडी सुद्धा जास्त कार्यक्षम होतात आणी जास्त अन्न शोषून घेतात. म्हणजे जर पूर्वी ४०० ग्राम अन्नापैकी २०० ग्राम शोषले जात असे तर आता २४० ग्राम अन्न शोषले जाते. त्यामुळे आहार तुम्ही ४० ग्राम नि कमी केलात(१०%) तरी प्रत्यक्षात शोषलेले अन्न तेवढेच राहते (२०० ग्राम).
या यंत्रणेत वजन कमी होत आहे असे कळले तर वजन कायम टिकवण्यासाठी सर्व शरीरातील इतर प्रणाल्या सुद्धा कामाला लावल्या जातात. म्हणजे आतड्यात अन्न जास्त शोषले जाते आपले इंजिन जास्त कार्यक्षम होते (५० टक्क्याऐवजी ७० % पर्यंत), आपल्याला थंडी वाजू लागते कारण शरीरात कॅलरी जाळून जी उर्जा तयार होते ती कमी केली जाते. भूक लवकर आणि जास्त लागते. हि यंत्रणा आदिमानवाच्या काळापासून कार्यरत आहे जेंव्हा अन्नधान्य मुबलक नव्हतंच. तेंव्हा पुढचे अन्न मिळेपर्यंत असलेले अन्न जास्त योग्य प्रमाणात वापरले जावे हा त्यातील मूळ हेतू.

गेल्या ५०५५५ वर्षात अन्नाचा पुरवठा मुबलक असला तरीही तुमच्या गुणसूत्रात किंवा जीन मध्ये बदल घडवून यायला हा कालावधी सूक्ष्म आहे.
यामुळे अन्न भरपूर मिळते आहे तोवर वजन वाढत जाते. आणि आपणही दाबून खातोच आहोत.

मग वाढलेले वजन कमी करायचा प्रसंग येतो तेंव्हा आपण मिताहार घेतो आणि पाचव्या दिवशी पार्टी करतो. मग चार दिवस शरीर या (conserve) अक्षय प्रणालीत गेलेले असते ते एकदम मिळालेले अन्न जास्तीत जास्त शोषून घेण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या मिताहाराचा फज्जा उडतो.

पण लक्षात कोण घेतो. हि गोष्ट बहुसंख्य आहार तज्ञ लक्षात घेत नाहीत किंवा लक्षात घेतले तरीही आपल्या ग्राहकाला नाराज का करा? त्यामुळे लोक वजन कमी करण्याच्या VLCC, तळवलकर, गोल्ड जिम आणी विविध आहार तज्ञ, मेदारी, आयुरस्लिम, न्युट्रलाईट(एमवे) आणी तत्सम आयुर्वेदिक गोळ्या कॅपसुल, पंचकर्म, वमन विरेचन, डी टोक्स ई. च्या वार्या करीत असतात
AND THEN THEY LIVED HAPPILY EVER AFTER WITH THEIR WEIGHT असे चालू राहते.

आता आपण वजन कमी करायला सुरुवात केल्यावर काय होते ते पाहू.
चरबी बरोबर शरीरात बरेच पाणीसुद्धा साठवलेले असते. त्यामुळे जेंव्हा एखादी व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण आणी व्यायाम केले असता सर्वात पहिल्यांदा हे पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे आपले वजन ५ ते ८ % कमी होते हि स्थिती पहिल्या ३-४ आठवड्यात होते. म्हणजेच एखादी व्यक्ती ८० किलोची असेल तर तिचे वजन ७२ ते ७५ किलो पहिल्या एक महिन्यात सहज होते. पण दुर्दैवाने हा वजन कमी होण्याचा दर लगेचच मंदावतो आणी पुढचे ५ टक्के कमी करण्यासाठी तुम्हाला भगीरथ प्रयत्न करायला लागतो.

बहुसंख्य लोक जे VLCC, तळवलकर सारख्या केंद्रात जातात तेथे पहिल्या एक महिन्यात दैदिप्यमान असा फरक वजनाच्या काट्यावर दिसतो. या नन्तर त्यांच्या व्यायामात खंड पडला कि हे ५-८% पाणी परत शोषले जाते आणी पुढच्या २-३ आठवड्यात वजन पुन्हा जैसे थे होते.

दुर्दैवाने या कमी झालेल्या वजनाच्या उत्साहात लोक हे सर्वाना सांगत सुटतात कि वजन काय आरामात कमी होईल. मी गेल्या महिन्यात ८ किलो कमी केले होते . आणी याची पुनरावृत्ती मग परत २ -३वर्षांनी होते. बर्याच लोकांनी असे पाच आकड्यात पैसे तीन चार वेळेस खर्च केलेले असतात आणी त्यानंतर ते वजन कधी कमी होत नाही. and then they lived happily ever after with their original weight.

हि गोष्ट VLCC किंवा तळवलकर मध्ये कोणीही तुम्हाला सांगत नाही. हेच तर त्यांच्या यशाचे गमक आहे.

असे एकदम वजन कमी न करता सरळ वर्ष भर आणि त्यानंतर "कायम" आपले आहारावर "नियंत्रण" ठेवणे आवश्यक आहे.

मी असे म्हटले कि लोक लगेच नकारात्मक भूमिकेत जातात आणि म्हणतात कि म्हणजे आम्ही आता काही खायचेच नाही का?

मी स्वतः सगळ्या चरबीयुक्त गोष्टी खातो परंतु एका बैठकीत नाही.

किंवा जर लग्नाला गेलो तर मी तेथे असलेल्या सर्व भाज्या किंवा भजी, कोथिम्बिर वडी, पापड इ सर्व गोष्टी खातो परंतु रोटी, चपाती साधा भात मसाले भात इ काहीच खात नाही. तुम्ही भाज्या चिकन मटण पनीर हे नुसते खाऊ शकता पण रोटी पोळी भात हे नुसते खात नाही कारण त्याला तेवढी "चव" नसते. हे टाळले तर ज्याला empty calories म्हणतात ते खाणे आपोआप कमी होते.
आणि शेवटी रसमलाई, आईस्क्रीम इ गोष्टी आवर्जून खातो.

परंतु "जरा" जरी पोट जास्त भरेल असे वाटले तेंव्हा थांबतो. सांगण्याचा उद्देश हा कि आपल्या कॅलरी मोजून मापून खाणे आवश्यक आहे.

माझ्याकडे पाहणारे लोक मला सांगतात कि तुम्ही तर सर्व गोष्टी खाता आहात. मी त्यांना एकच सांगतो तुम्ही ५-६ पुर्या/ ३ रोट्या खाऊन वर साधा भात, जीरा राइस कशासाठी खाता? या वर त्यांचे उत्तर नसते.

काही लोक पार्टीत मिळतात म्हणून चिकन मटण सारखे जड पदार्थ स्टार्टर म्हणून दाबून खातात मग "व्यवस्थित" जेवण वर शेवटी मिठाई आणि आईस्क्रीम.

मला यांना सांगावेसे वाटते कि फुकट मिळतात म्हणून तुम्ही इतके खाता आणि शेवटी VLCC किंवा तळवलकर मध्ये ३०-३५ हजार रुपये मोजून वजन कमी करायचा प्रयत्न करता या ऐवजी पार्टीत अर्ध पोट भरेल एवढेच खा आणि याच पैशाचे हेच पदार्थ इतर वेळेस बाहेर मुद्दाम विकत आणून जेवण ऐवजी खा.

हीच परिस्थिती सगळ्या जणांची आहे. पोट "व्यवस्थित" भरल्या शिवाय "समाधानच" होत नाही या वृत्तीतून बाहेर आल्याशिवाय आपले वजन कमी होणार नाही.

कोणताही शॉर्ट कट काम करीत नाही.

महत्त्वाचा मुद्दा -- एक महिन्यात ७-८ किलो वजन कमी करणे हा हेतू न ठेवता दर महिन्याला एक ते दीड किलो वजन कमी होईल या उद्देशाने आपण जायला हवे.म्हणजे वर्षभरात आपण १२-१५ किलो वजन कमी करू शकू.

वजन जर एकदम कमी केले तर हवा गेलेल्या फुग्यासारख्या आपल्या चेहर्याला किंवा शरीराला सुरकुत्या पडतात. (गरोदर स्त्रियाना प्रसुतीनंतर पोटाच्या त्वचेवर अशाच सुरकुत्या पडतात). यास्तव वजन हळू हळूच कमी करावे म्हणजे आपल्या त्वचेला पूर्व आकार मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

लक्षात ठेवा. एक ग्राम चरबी म्हणजे ९ कॅलरी ( KILOCALORIES) म्हणजे जर रोज आपण ५० ग्राम चरबी कमी करायची असेल तर आपल्याला ४५० कॅलरी व्यायामात किंवा आहारात कमी करून खर्च करायला पाहिजेत.

असेच दुसर्या टोकाला असलेले बारीक लोक -- बारा महिने बत्तीस काळ हे लोक वाटेल ते खात असतात पण त्यातील बराच भाग शरीर शोषुनच घेत नाही त्यामुळे कितीही खाल्ले तरी "अंगी" लागत नाही. यांच्या आतड्यातील जीवाणू पण याला जबाबदार आहेत असा एक सिद्धांत(THEORY) आहे. शिवाय जे अन्न खातात त्यातील बरेचसे अन्न तपकिरी चरबी ( BROWN FAT) जाळण्यास मदत करते यामुळे हे लोक काही अंगी लावून घेत नाहीत आणी बर्याच वजनदार लोकांच्या हेव्याचे मानकरी होतात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आज सगळे लेख एकत्र वाचले. 👍

Quantity वाढवली/ कमी केली की शरीराला सवय होते हे अगदी खरे आहे. पूर्वीपेक्षा अर्धे जेवूनही तेव्हढेच उर्जावान वाटते आता.

“फुकट” आणि “अनलिमिटेड” अन्नाचे का कोण जाणे भयंकर attraction आहे आपल्याकडे.

पार्टी- सोहळे -अनलिमिटेड थाली-all you can eat टाइपचे रेस्तरां इथे mindless eating competition चाललेली असते. जेवण टुकार असले तरी, पैसे “वसूल” करण्यासाठी.

हे शेवटचेच जेवण, आता पुन्हा कधीच खायला मिळणार नाही असे लोक खात असतात, मौज वाटते बघून.

डॉक्टर, तुमच्यासारखेच selective eating चवीने करतो मेजवानी असेल तर. मूळ प्रवृत्ती खादाड असूनही मोजके २-३ पदार्थच, कमी प्रमाणात. Restricted indulgence. पुरी-चपाती-भात-मैद्याचे केक-लार्डयुक्त पेस्ट्रीज् कडे ढुंकूनही बघत नाही. 😇

अरे वाह छान इंटरेस्टिंग आणि काहीशी नवी माहिती मिळाली ज्याने दृष्टिकोन बदलला. शरीराची आहाराची गरज बघून आता त्याला सवय लावायला बघतो.

@ फुकट जेवण, मी सुद्धा लहानपणी दाबून खायचो. पोट टम्म फुगले की मला पैसे वसूल वाटायचे.

नंतर स्टाईल बदलली. आता फक्त सूप आणि विविध प्रकारचे स्टार्टर हाडदतो. प्रामुख्याने अर्थातच नॉनव्हेज. कुठलेही ड्रिंक्स घेत नाही, गोड आवडत नसल्याने डेझर्ट चवीपुरते खातो. महत्वाचे म्हणजे रोटी भात ग्रेव्ही असा मेन कोर्स चव सुद्धा बघत नाही. त्यामुळे आपसूक कमी खाल्ले जात कधीही जेवण अंगावर येत नाही. आणि कमी quantity खाऊनही जास्त पैसे वसूल केल्याचे मिडलक्लास मेंटॅलिटी समाधान सुद्धा मिळते Happy

चारही भाग सलग वाचले.
हा भाग विशेष झालाय. >>> +१
पोट "व्यवस्थित" भरल्या शिवाय "समाधानच" होत नाही. >>> खरे आहे. बऱ्याच जणांना भात खाल्ल्याशिवाय जेवण झाले असे वाटत नाही तसे मला पोळ्या पोटभर खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही. भात आवडत नाही म्हणून खात नाही. नुसत्या भाज्या, सूप ,घट्ट वरण जास्त आणि एखादी पोळी खाऊन बरेचदा प्रयत्न केला पण गळून गेल्यासारखे होते. तरी पोळी मोठी असते. सतत पोटात खड्डा पडलाय असे होत राहते. डोके दुखते बारीक. कामे रेंगाळत राहतात. त्यापेक्षा व्यवस्थित तीन साडे तीन पोळ्या खाल्ल्या की फ्रेश वाटते. मानसिक आहे हे कदाचित. कळते पण वळत नाही असे होते.

कृपया मार्गदर्शन करा की वजन कसे वाढवायचे... कारण जास्त खाल्लं की शरीर ते स्वीकारत नाही, आणि हळूहळू सवयही लागत नाहीये. वजन ६० किलोवरच अडकलं आहे. ७० किलो वजन वाढवण्यासाठी मी काय करावं?

कमी quantity खाऊनही जास्त पैसे वसूल केल्याचे मिडलक्लास मेंटॅलिटी समाधान सुद्धा मिळते.

मी आणि पत्नी चर्चगेट येथे सम्राट रेस्टोरंट येथे कधीमधी गुजराती थाळी खायला जातो. काही वर्षांपूर्वी तेथे गेलो होतो तेंव्हा थाळीची किंमत रुपये ३५० होती. (आता ५०० आहे बहुधा) . पत्नी म्हणाली आपण ३५० रुपयांचे खाऊच शकत नाही. तेंव्हा पैसे वसूल होणे शक्य नाही.

मी तिला शांतपणे म्हणालो कि दोन फरसाण पदार्थ ( उदा. ढोकळा, मटार पॅटिस, कोथिंबीर वडी इ). चार भाज्या, दही, ताक रोटी, भाकरी, पुरणपोळी, दाल जिरा राईस पुलाव कढी आणि खिचडी आणि वर दोन स्वीट दिशेस इतके पदार्थ घरी करण्यासाठी किती उस्तवार करायला लागेल.

एवढी विविधतेची चव चाखण्याचे हे पैसे आहेत.

तेंव्हा पैसे वसूल करण्याचा विचार डोक्यातून काढून टाकायचा आणि इतकी "व्हरायटी एन्जॉय" करायची.

एकदा तुम्ही हि वस्तुस्थिती स्वीकारली कि लग्नाला गेल्यावर केवळ जे पदार्थ तुम्ही रोज खात नाहीत तेवढेच खाऊन तुमच्या जिभेचे चोचले पुरवता येतात.

उगाच दाल तडका, जिरा राईस, बटर रोटी, बटर नान खाऊन नको इतक्या कॅलरी कशाला पोटात ढकलायच्या?

लोक प्लेट मध्ये एवढा मोठा अन्नाचा ढीग घेऊन सर्व एकत्र होत असताना खात बसलेले पाहून आताशा त्यांची केवळ कीव करावीशी वाटते.

वजन ६० किलोवरच अडकलं आहे. ७० किलो वजन वाढवण्यासाठी मी काय करावं?

खा प्या आणि एन्जॉय करा.

साठ किलो वजन आणि निरोगी असलात तर कशाला वजन वाढवायचंय?

मी ए एफ एम सी मध्ये प्रवेश घेतला तेंव्हा वजन ४५ किलो होतं. ( वय १८ ). उंची ५ फूट १० इंच.

एम बी बी एस पास झालो तेंव्हा वजन होतं ५४ किलो. (वय २३).

विक्रांत वर मेडिकल ऑफिसर म्हणून गेलो तेंव्हा वजन होतं ५६ किलो (वय २५)

पुढच्या ९ महिन्यात वजन झालं ६५ किलो. तेंव्हा ठरवलं आता थांबायचं.

लग्नाचे वेळेस वजन होते ६७ किलो. वय २७

आता वजन आहे ७२ किलो. वय ६०.

अजून माझ्या लग्नातील सूट मला येतो.

तेंव्हा वयाप्रमाणे तुमचं वजन वाढेल आणि एकदा वाढायला लागलं कि उगाच नियंत्रण करायला लागेल.

तोवर काळजी करू नका. एन्जॉय करा

हा भाग विशेष झालाय. >> +१

तुम्ही ५-६ पुर्या/ ३ रोट्या खाऊन वर साधा भात, जीरा राइस कशासाठी खाता? >> भात खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही, हे बरेचदा ऐकले आहे. Lol

>>४५० कॅलरी व्यायामात किंवा आहारात कमी करून खर्च करायला पाहिजेत.>> माझा प्रश्न - याचे काही प्रमाण असावे का म्हणजे आहारातून इतकी तूट आणि व्यायामातून इतकी तूट असे केल्यास योग्य राहील?

वजन ६० किलोवरच अडकलं आहे. ७० किलो वजन वाढवण्यासाठी मी काय करावं?
>>>
मी वजन कसे कमी केले हे मागच्या धाग्यातील प्रतिसादात लिहिले आहे, आता माझ वय ३२ आहे वजन ८८, मागच्या ६ महिन्यात ९८ वरून ८८ वर आलो आहे, डॉक साहेब बरोवर सांगताहेत ९८ चे ९०
सहज झाले पण ९० चे ८५ होतच नाहीये.
तर सांगायचे हे होते की आजच्या ७ वर्षाआधी जेव्हा मी २५ वर्षांचा होतो माझे वजन ६५ ला अडकले होते, काही केल्या वाढत नव्हते! मी रोज एक डझन केळी खायचो वजन वाढवण्यासाठी पण नाही तर नाहीच वाढले, २८ आल्यावर अचानक वजन सुसाट सुटले ६५ वरून वाढत जाऊन हायेस्ट १०८ जाऊन आले.
पहिली गोष्ट म्हणजे वजन वाढवायचा आजिबात प्रयत्न करू नका वाढवायचं असेल तर मिळेल ते खा! वजन वाढवणे सोपे आहे, कमी करणे महाभयंकर काम आहे. मी गेले ६ महिने साखर, मैदा, गहू नि तांदूळ ह्याना हात लावनार नाजी हे ठरवले आहे, पन तांदूळ माथी पडतोच. मैदा नी साखर स्ट्रिक्टली बंद आहे, आपल्या इथे लोकाना साखरेचे प्रचंड वेड आहे, बिनसाखरेची मागितली तरीही थोडी साखर टाकून देतात हॉटेल वाले, का? तर म्हणे बिनसाखरेची कशी पिणार? जाताना हॉटेल च्या काउंटरला ठेवलेल्या बडीशेपेतही प्रचंड साखर ओतून ठेवलेली असते. ब्रेड बिस्कीट ह्यामध्येही बदबद साखर नि मैदा ओतलेला असतो. , समोसा, कचोरी काही म्हणता काही मैदा विरहित नसते. Sad

डॉ. खरे, तुम्ही थंडीचा उल्लेख केला आहे म्हणून एक प्रश्न.
काही लोकांना खूप जास्त थंडी वाजते का? हिवाळा सुरू झाला की आमच्या घरात मला खूप जास्त थंडी वाजते. बाकीचे लोक साध्या कपड्यांमध्ये असतात तेव्हा मी स्वेटर, मोजे वगैरे जामानिमा करून असते. हात आणि पाय पण थंडगार होतात.
काय करता येते याच्यासाठी?

याचे काही प्रमाण असावे का म्हणजे आहारातून इतकी तूट आणि व्यायामातून इतकी तूट असे केल्यास योग्य राहील?

दोन्ही सम प्रमाणात करावे.

केवळ आहारावर लक्ष केंद्रित केल्यास वजन कमी होते पण ताणलेली त्वचा परत आपल्या स्थितीस येत नाही आणि मग त्वचा सुरकुतलेली दिसून वय वाढलेलं दिसू लागतं.

केवळ व्यायामावर लक्ष दिल्यास व्यायाम सोडल्यावर वजन पटकन परत येते.

यासाठी दोन्ही गोष्टी एकत्रित करणे फायदेशीर ठरतं.

काही लोकांना खूप जास्त थंडी वाजते का? हिवाळा सुरू झाला की आमच्या घरात मला खूप जास्त थंडी वाजते. बाकीचे लोक साध्या कपड्यांमध्ये असतात तेव्हा मी स्वेटर, मोजे वगैरे जामानिमा करून असते. हात आणि पाय पण थंडगार होतात.
काय करता येते याच्यासाठी?

आपल्या थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम करत आहेत का हे तपासून पहा.

त्या (थायरॉईड ग्रंथी) जर व्यवस्थित असतील आणि आपले वजन जास्त असेल तर आपण लायपो स्टॅट च्या खालच्या मर्यादेत आहात.

म्हणजेच आपले शरीर वजन कमी करू इच्छित नाही. म्हणून असलेली ऊर्जा कायम ठेवण्याच्या प्रक्रियेत शरीर खाल्लेले सर्व अन्न वापरून वजन कायम ठेवत आहे

पण शरीरात पुरेशी उष्णता निर्माण न झाल्याने आपल्याला थंडी वाजत आहे

त्या (थायरॉईड ग्रंथी) जर व्यवस्थित असतील आणि आपले वजन कमी असेल तर आपल्याला अधिक खाणे आवश्यक आहे.

हो, त्या थायरॉईड ग्रंथी जर व्यवस्थित आहेत आणि वजन जास्त आहे.
म्हणजे वजन कमी केले तर हा त्रास कमी होईल का?