२३जानेवारी निमित्त . . . ‘तिला’ आठवू जरा !

Submitted by हेमंतकुमार on 22 January, 2026 - 08:36

Handwr chi 1.jpeg

तर आजचा विशेष दिन म्हणजे जागतिक हस्ताक्षर दिन. याची सुरुवात 1977मध्ये अमेरिकेत राष्ट्रीय हस्ताक्षर दिन म्हणून झाली. पुढे तो अनेक देशांनीही स्वीकारला. आजच्या घडीला तो भारतासहित युके, स्लोव्हेनिया, स्पेन, इटली आणि नेदरलँड्समध्येही साजरा होतो.
1977मध्ये प्रथम त्याची कल्पना अमेरिकेतील पेन व पेन्सिल उत्पादकांच्या संघटनेने मांडली. 23 जानेवारी हा दिवस निवडायचे कारण म्हणजे ती John Hancock यांची जयंती. आता हे जॉनबुवा कोण? तर ते म्हणजे अमेरिकी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर सर्वात प्रथम सही करणारे गृहस्थ. त्यांची ती सही अतिशय सुंदर, ठळक व लफ्फेदार असल्याने आकर्षक व लक्षवेधी ठरली (चित्र पहा). पुढे अमेरिकी राज्यक्रांती झाल्यानंतर हे गृहस्थ Massachusetts राज्याचे राज्यपाल होते. त्यांच्या स्मरणार्थ या हस्ताक्षर दिनाची संकल्पना अस्तित्वात आली. अमेरिकी इंग्लिश भाषेत तर एखाद्याच्या सहीसाठी ‘John Hancock’ हा अनौपचारिक वाक्प्रचारच रूढ झालेला आहे(“Put your John Hancock at the bottom of the page”).

Handwr chi 2  John_Hancock_signature.jpg

मानवी इतिहासात हस्ताक्षराची कला प्राचीन असून ती सुमारे 5500 वर्षांपूर्वी मेसोपोटेमियात अस्तित्वात आली असावी. सुरुवातीस हिशेब ठेवण्याच्या गरजेतून काही चिन्हांची/चित्रांची हस्तलिपी वापरली जायची. कालौघात जगातल्या अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये विविध प्रकारचे हस्तलेखन सुरू झाले. तेव्हाची ‘लेखणी’ म्हणजे तर एक आश्चर्यकारक प्रकरण होते. रंगीबेरंगी जाड दोऱ्याच्या गाठी बांधून किपू नावाचे साधन तयार केले जाई आणि त्याच्या साहाय्याने तत्कालीन चिन्हलिपी लिहिली जाई. चिन्हलिपी नंतरचा पुढचा टप्पा म्हणजे अक्षरलिपीचा उगम व विकास. त्या पुढील टप्प्यावर माणूस भूर्जपत्रांवर हस्तलेखन करू लागला आणि नंतर कागदाच्या शोधानंतर कागदावर. शब्दलिपीच्या पुरेशा विकासानंतर हस्तलेखनाचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात आला. साधारण 18व्या शतकापासून जगभरातील अनेक शाळांमध्ये हस्तलेखन रीतसर शिकवण्यात आल्याचे दिसते. आधी पाटी-पेन्सिल नंतर कागद-शिसपेन्सिल आणि पुढे पेन, बॉलपेन आणि इतर आधुनिक प्रकारची कलाकारांची खास पेन्स असा लेखणी माध्यमांचा विकास होत गेला.

पंधराव्या शतकातील छपाईच्या शोधानंतरही काही शतके समाजातील हस्तलेखन जोमाने होतच होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात टंकलेखन यंत्राचा शोध लागला आणि त्यानंतर हस्ताक्षरातली बरीचशी व्यावसायिक कामे त्या यंत्रावर होऊ लागली. सुमारे एक शतकभर या यंत्राने लेखनविश्वात आपले महत्त्व टिकवले होते. पुढे अर्थातच संगणक अवतरल्यानंतर टंकलेखन यंत्र कालबाह्य झाले. गेल्या २५-३० वर्षात आपण आपली लिहायची बहुतेक कामे संगणकावरच करीत आहोत. गेल्या दशकात तर बोलून टंकनाची बहुभाषिक सोय सुद्धा चांगली विकसित झाल्याने लेखनासाठी आपल्या बोटांचा सर्वंकष वापर अजूनच कमी होत चाललेला आहे. सध्या समाजातील विद्यार्थीवर्ग वगळता फार थोड्या प्रौढ व्यक्ती हौसेने हस्तलेखन करीत असाव्यात. आज आपले अनेक आर्थिक व्यवहार घरबसल्या संगणकावरून होत असल्याने बँकेच्या कामांसाठी पण सही करणे हा प्रकारही खूपच कमी झालेला आहे. भारतात आता सटीसामाशी जेव्हा कोणीतरी धनादेशाचाच आग्रह धरतो तेव्हा त्यावर सही करण्यापूर्वी बोटे जरा अडखळतात आणि आपली सही ही पूर्वीसारखी राहिलेली नाही याची जाणीव आपल्याला होते; ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते.

हां . . . पण एक एक मात्र आहे. भारतात अजूनही काही कायदेशीर कामांसाठी आपल्या कागदावरील हस्त-स्वाक्षरीला पर्याय नाही. मालमत्तेची दस्तनोंदणी करताना तर आपल्याला हाताने सह्यांवर सह्या कराव्या लागतातच, पण त्याचबरोबर आपले निशाणी अंगठे सुद्धा उठवावे लागतात. आपण सुशिक्षित असो वा अशिक्षित, त्या सरकार दरबारात त्या क्षणी आपणा सर्वांनाच अंगठेबहाद्दर व्हावे लागते !
हस्ताक्षर ही तर खरंतर प्रत्येक व्यक्तीची निजखूण आहे. त्यातून स्वतःचे वेगळेपण सिद्ध होते. कागदावर पेनने लिहिताना बोटांची जी हालचाल होते ती ज्ञानवृद्धी, भाषाप्रभुत्व आणि मेंदूतील संदेशवहनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते हे अनेक संशोधनांतून सिद्ध झालेले आहे. म्हणूनच वाढीच्या वयात तरी हस्तलेखन घडले पाहिजे या दृष्टिकोनातून अजूनही भारतासह बऱ्याच देशांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून हस्तलेखन करून घेतले जाते. तसेच कॉलेजच्या पदवीपूर्व लेखी परीक्षा सुद्धा हस्तलिखित स्वरूपात घेतल्या जातात. “लिहा म्हणजे लक्षात ठेवा” हा एक शैक्षणिक मूलमंत्र आहे.

कुठलेही नवे तंत्रज्ञान समाजात अवतरले की ते जुन्या तंत्रज्ञानाला आवश्यकता आणि सोय या मुद्द्यांवरून मोडीत काढते. हातात लेखणी धरून लिहिणे हे जर अगदी प्राथमिक स्वरूपाचे ‘तंत्र’ मानले तर सध्याच्या स्पीच टायपिंगच्या युगात व्यावसायिक व व्यावहारिक कामांसाठी ते जुने लेखनतंत्र हळूहळू अस्तंगत होणे अटळ दिसते. मात्र प्राथमिक शिक्षणात आणि पुढे एक कलाप्रकार म्हणून ते काहीसे टिकून राहील. जगातील प्रगत देशांमध्ये दैनंदिन जीवनात संगणकलेखनाचा प्रवेश अप्रगत देशांच्या तुलनेत बराच लवकर झाला. त्यामुळे त्यांच्याकडे तर हस्तलेखनाला लवकरच ओहोटी लागली. सुलभ यंत्रलेखनामुळे मानवी कष्ट कमी झाल्याने आता सार्वत्रिक हस्तलेखनाची दैनंदिन गरज उरली नाही. जगभरातील शिक्षणतज्ञांनी या मुद्द्यावर बराच विचार केलेला असून हस्तलेखनाची कला पूर्णपणे संपुष्टात येईल की काय याची चिंता त्यांना भेडसावते आहे. त्यांच्या विविध भावनांना व्यक्त करणारे ‘द मिसिंग इंक’ हे विचारप्रवर्तक पुस्तक Philip Hensher या ब्रिटिश प्राध्यापकांनी सन 2012मध्ये लिहिलेले आहे.

स्कँडिनॅविय देशांमध्ये शालेय पातळीवरील ‘संपूर्ण संगणकीय’ धोरणाचा केलेला फेरविचार पाहण्यासारखा आहे. स्वीडन व डेन्मार्कमध्ये गेल्या दशकात शालेय शिक्षणात अगदी बालवाडीपासूनच हस्तलेखनाऐवजी संगणकलेखनाचा समावेश केलेला होता. परंतु कालांतराने त्यांना त्याचे तोटे दिसून आल्याने गेल्या वर्षीपासून त्यांनी या धोरणाचा फेरविचार करून पुन्हा एकदा प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हस्तलेखन आणि छापील पुस्तकांचा वापर अनिवार्य केलेला आहे. तंत्रज्ञानाचा मेरुमणी असलेल्या जपानमध्ये सुद्धा शालेय शिक्षणात हस्तलेखन ठेवलेले असून अक्षर सुलेखन हा देखील त्यांच्या अभ्यासक्रमातला महत्त्वाचा विषय असून त्याकडे मुलांचा कलाकौशल्य विकास या दृष्टीने पाहिले जाते.

मानवी इतिहासात अनेक कलाप्रकारांमध्ये देखील मोठी उत्क्रांती झालेली आहे. तरीही काही जुने कलाप्रकार काही अंशी तरी टिकून राहावेत असे आपल्याला वाटतेच ना? करमणूकीसाठी आज इलेक्ट्रॉनिक-दृश्यमाध्यमांचा जरी सुळसुळाट झालेला असला तरीसुद्धा आपल्या मनातील एक कोपरा कधीतरी जिवंत नाटक बघण्यासाठी आसुसलेला असतो. तद्वत, संगणकलेखनाचे आपल्या जीवनातले महत्त्व मान्य करतानाच हस्तलेखन ही एक कला म्हणून काही प्रमाणात तरी जतन व्हावी असे काही समाजधुरिणांना वाटते. त्याच अनुषंगाने आजचा हस्ताक्षर दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने विद्यार्थी आणि प्रौढांसाठी सुद्धा विविध हस्ताक्षर उपक्रम व स्पर्धा घेतल्या जातात.

आपले संस्थळ हे सुद्धा या दृष्टिकोनाला अपवाद नाही. मूलतः आपला दैनंदिन कारभार संगणकलेखनावरच चालतो. तरीसुद्धा कुठेतरी आपल्या मनात हस्तलेखनाबद्दल काहीशी आपुलकी आहे. म्हणूनच काही उत्सवांच्या निमित्ताने आपण इथे हस्तलेखनाचे उपक्रम राबवित असतो आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही सभासदांकडून मिळतो ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. याचबरोबर सुंदर कलात्मक हस्तलेखन करणारे काही कलाकारही आपल्याकडे आहेत. त्यांनी अक्षर सुलेखनाचे एकदोन धागे चालू केलेले आहेत. असे धागे हे सुद्धा आपल्या संस्थळाचे एक भूषण आहे. अक्षरसुलेखनाची ही कला अशीच बहरत राहो ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. मुळात परदेशातून आलेल्या सुलेखनाच्या कलेचा भारतात बऱ्यापैकी प्रसार झालेला असून अच्युत पालव यांच्यासारखे पद्मश्री सन्मानित कलाकार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले आहेत. पालव यांचे गुरु असलेले र कृ जोशी हे मागच्या पिढीत ‘अक्षर-जोशी’ म्हणूनच ओळखले जात.

वर म्हटल्याप्रमाणे आपले हस्ताक्षर ही आपली ओळख असते. आपण प्रत्यक्ष न पाहिलेल्या एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर हे त्याच्या व्यक्तिमत्वात डोकावून पाहण्याचे एक छोटेसे दालन देखील ठरते. सुरेख हस्ताक्षर असलेल्या कितीतरी लोकांची स्वाक्षरी सुद्धा अगदी डोळ्यात भरणारी, मोहक आणि तडफदार असते. अशा काही वलयांकित व्यक्तींच्या सह्या आपल्या संग्रही मिळवण्यासाठी कित्येक शौकीन उत्सुक असतात. कधीतरी जर ध्यानीमनी नसतानाही आपल्याला एखाद्या नामांकिताच्या सहीसकट एखादी भेटवस्तू घरबसल्या अचानक मिळाली तर ? असा प्रसंग आपल्यासाठी कल्पनातीत आनंददायी ठरतो आणि तो हस्ताक्षरयुक्त सुरेख ठेवा आपण आयुष्यभर जपतो हे काय सांगायला पाहिजे? माझ्या संग्रहातील अशाच एका सुंदर व वळणदार सहीचा हा नमुना :
Hand chi 3 vp_0.jpeg

(व पु काळे यांनी त्यांच्या ‘चिअर्स’ या पुस्तकावर स्वतःची सही करून त्यांच्या मित्रामार्फत मला ते घरपोच भेट कसे व का पाठवले याचा किस्सा पूर्वी इथे लिहिलेला आहे).
असो.

आजच्या या विशेष दिनानिमित्ताने हस्तलेखन या कलेची आठवण काढताना काही विचार आपल्यापुढे व्यक्त केले आणि तुमच्यापुढे हस्तलेखनाचा किंचितसा प्रयत्नही करून ठेवला. एव्हाना या लेखाच्या शीर्षकातील ‘ती’ कोण हे आता सर्वांना उकलले असेलच ! ज्या वाचकांकडे पुरेसा वेळ आणि इच्छा असेल त्यांनी प्रतिसादातून थोडेफार तरी हस्तलेखनातून (किंवा सुलेखनातून) व्यक्त व्हावे अशी विनंती. तसेच, असा काही उपद्वयाप करायचा नसल्यास नेहमीप्रमाणेच टंकून केलेल्या आपल्या प्रतिसादांचेही स्वागत आहेच आहे ! Happy
Handwr chi 4.jpeg
*********************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता जगातील पूर्वेकडील देशांमध्ये 23 जानेवारी चालू झालेला असल्याने हा लेख भारतातून थोडा लवकर प्रकाशित करतो आहे.
Happy
🙏

लेखनासाठी बोटांचा वापर खूप कमी + १

पेन हस्ताक्षरापुरते हाती घेतो आपण आता.

२३ जानेवारी “हस्ताक्षर दिवस” असतो ही नवी माहिती. नेताजी आणि सिनियर ठाकरेंचा वाढदिवस + घरात तीन जणांचा वाढदिवस म्हणून माहिती होता.

चांगली माहिती.
माझं हस्ताक्षर खूपच वाईट आहे. त्यामुळे दोन ओळीचे मेसेज पण मी टाईप करून print काढायचे (mail नसतांना)

सही तर कधीच कुठे जुळत नाही.

<भारतात आता सटीसामाशी जेव्हा कोणीतरी धनादेशाचाच आग्रह धरतो तेव्हा त्यावर सही करण्यापूर्वी बोटे जरा अडखळतात आणि आपली सही ही पूर्वीसारखी राहिलेली नाही याची जाणीव आपल्याला होते; > हे अगदी असंच आताच झालं माझ्याबाबत. गेल्या महिन्यात कॅश काढायला गेलो (शंभर ,५० , २०० च्या नोटा आणि २० ची नाणी लागतात थोडीफार. सहा महिन्यांतून एकदा काढतो) टेलरने तुमची सही मॅच होत नाही असं म्हटलं. त्या ब्रँचचा अगदी सुरुवातीचा अकाउंट होल्डर आणि इतक्या वर्षांची ओळख म्हणून त्यांनी त्यांच्या रेकॉर्डमधली माझी सही दाखवली. पण आपली सही मॅच होत नाही याचाच विचित्र तणाव आला आणि तशी करायला जमेचना. चेकवर मागे पुढे मिळून पाच सहा सह्या झाल्या. टेलर पण तणावात . त्याला ऑडिटर दिसत असेल समोर. मी म्हणालो मी उद्या नवीन चेक घेऊन येतो. पण त्याने दिले.

काल दुसर्‍या बँकेत मात्र काही इश्यु आला नाही. सही मॅच झाली का असं मुद्दाम विचारलं. दोन्हीकडे तशीच सही होती.

आणि अजून मी ऑफिशियली सिनियर सिटिझन नाही. बाबांची सही त्यांच्या नव्वदीतही तशीच होती. तीही लफ्फेदार. मलाच शंका म्हणून साध्या कागदांवर सराव करून घेतला.

मला कामाच्या ठिकाणी दिवसाला शंभर शंभर सह्या करायला लागत. चेक्स, रजिस्टर्स, सर्टिफिकेट्स आणि पत्र.

हस्ताक्षर दिन म्हणजे आमचाच धागा Happy
छान लेख छान माहिती..

सही तर कधीच कुठे जुळत नाही. >> सेम पिंच.. मी नेहमी दोन करतो. जुळेल ती घ्या

सही व्यतिरिक्त शेवटचे कुठे काय लिहिले हे आता आठवत नाही. काही लिहायची फॉर्म भरायची गरज पडली तर मी सरळ बायकोकडे सरकवतो. जिथे ती गरज पडते तिथे मी तिला सोबतच घेऊन जातो. तिला आधी हे तू तिथे मी टाइप्स प्रेम वगैरे वाटायचे Happy आता तिला समजू लागले आहे की ती माझी पर्सनल असिस्टंट होती.. आहे.

सर्वांचे प्रतिसाद आवडले. धन्यवाद !

  • आज घरात तीन जणांचा वाढदिवस >>> अरे वा ! सर्वांना शुभेच्छा
  • ऋतुराज अक्षर सुंदर व ठसठशीत !
  • आपल्या सहीबद्दलच्या सर्वांच्या प्रतिक्रिया ‘सही सही’ आहेत !
  • बाबांची सही त्यांच्या नव्वदीतही तशीच होती.>>> वा, उत्तम.
  • ती माझी पर्सनल असिस्टंट होती.. आहे>>> हे बरंय राव Happy

शुभेच्छांबद्दल आभार.

मराठी नीट वाचता येणाऱ्या - समजणाऱ्या तीनपैकी दोघांना तुमचा हा लेख पाठवला सकाळीच.

एक शंका - 23 जानेवारी हा हस्ताक्षर म्हणजे handwriting दिन आहे की signature ( स्वाक्षरी ) दिन आहे ?
( मी शोधण्याचा प्रयत्न केला पण उत्तर मिळवू शकलो नाही )

छान लेख आणि हस्ताक्षर.
आज हस्ताक्षर दिन आहे हे माहीत नव्हते. मलाही टाईप करण्यापेक्षा पेनाने लिहायला आवडतं. अक्षर पूर्वीपेक्षा खराब झालंय ते वेगळं पण पटकन लिहायचं असेल तर पेनानेच लिहिते मग तो हिशोब का होईना. सगळी सुंदर हस्ताक्षर पाहून लिखाणाचा फोटो टाकायचा मोह आवरते.खरच खूप सुंदर आणि वळणदार हस्ताक्षरं आहेत हेमंत सर भाऊ आणि ऋतुराज तुमची ,लिहीत राहा (पेनाने :स्मित:)

कोणत्यातरी माबो गणेशोत्सवात हा हस्ताक्षर वाला स्पर्धा उपक्रम झाला होता बोकलत पाहिले आले होते .इथेही त्यांचे अप्रतिम हस्ताक्षर यायला हवं. Happy

छान लेख आणि हस्ताक्षर.
आज हस्ताक्षर दिन आहे हे माहीत नव्हते. मलाही टाईप करण्यापेक्षा पेनाने लिहायला आवडतं. अक्षर पूर्वीपेक्षा खराब झालंय ते वेगळं पण पटकन लिहायचं असेल तर पेनानेच लिहिते मग तो हिशोब का होईना. इथली सगळी सुंदर हस्ताक्षर पाहून लिखाणाचा फोटो टाकायचा मोह आवरते.खरच खूप सुंदर आणि वळणदार हस्ताक्षरं आहेत हेमंत सर, भाऊ आणि ऋतुराज तुमची ,लिहीत राहा (पेनाने :स्मित:)

कोणत्यातरी माबो गणेशोत्सवात हा हस्ताक्षर वाला स्पर्धा उपक्रम झाला होता बोकलत पाहिले आले होते .इथेही त्यांचे अप्रतिम हस्ताक्षर यायला हवं. Happy

छान लेख आणि हस्ताक्षर.
आज हस्ताक्षर दिन आहे हे माहीत नव्हते. मलाही टाईप करण्यापेक्षा पेनाने लिहायला आवडतं. अक्षर पूर्वीपेक्षा खराब झालंय ते वेगळं पण पटकन लिहायचं असेल तर पेनानेच लिहिते मग तो हिशोब का होईना. इथली सगळी सुंदर हस्ताक्षर पाहून लिखाणाचा फोटो टाकायचा मोह आवरते.खरच खूप सुंदर आणि वळणदार हस्ताक्षरं आहेत हेमंत सर, भाऊ आणि ऋतुराज तुमची ,लिहीत राहा (पेनाने :स्मित:)

कोणत्यातरी माबो गणेशोत्सवात हा हस्ताक्षर वाला स्पर्धा उपक्रम झाला होता बोकलत पाहिले आले होते .इथेही त्यांचे अप्रतिम हस्ताक्षर यायला हवं. Happy

* फोटो टाकायचा मोह आवरते >>>> नका आवरू ! उलट येऊद्यात.
माझ्यापेक्षा तुमचे हस्ताक्षर नक्कीच चांगले असणार आहे Happy
. .
मराठीच्या तुलनेत माझे इंग्लिश हस्ताक्षर अधिक बरे आहे. मराठी अक्षरांच्या गोलाईमुळे कष्टही जास्त घ्यावे लागतात.

अश्विनी११
वा ! सुंदर अक्षर.
. .
* फाऊंटन पेन
>>>> लेखनाची खरी मजा आणि आनंद फाउंटन पेनने लिहिण्यातच आहे. माझ्या शालेय जीवनात काही गुरुजींचा असा सक्त दंडक होता की विद्यार्थ्यांनी बॉलपेननी लिहायचे नाही कारण त्यामुळे अक्षर बिघडते. अशा काही गुरुजींनी विद्यार्थ्यांना बॉलपेन वापरल्याबद्दल छडया मारलेल्या आठवतात.

*हस्ताक्षर म्हणजे handwriting दिन आहे. सही हा हस्ताक्षराचा एक भाग* - धन्यवाद. (इथे सहीवरच भर अधिक दिसला म्हणून शंका आली होती ).

चांगला आणि समयोचित धागा कुमार१ सर.

शाळेतल्या हस्ताक्षर स्पर्धा, त्या नेहमी जिंकणारी मुले (आम्ही असूयेने बघायचो), सुंदर आणि वळणदार
अक्षर हा चांगल्या मनाचा आरसा असतो वगैरे, वगैरे सुभाषिते लिहिलेला फळा हे सर्व आठवले.

वरती लिहिल्या प्रमाणे फाउंटन पेनाने अक्षर चांगले येते म्हणे परंतु A bad workman quarrels with his tools ह्या उक्तीप्रमाणे अस्मादिकांचे अक्षर कधी "सुधारले" नाही.

आणि फा. पे. गळका असेल तर बोटांना शाई लागून डाग पडायचे त्याचा भयानक तिटकारा (अवांतर - त्यामुळेच टॅटू प्रकार अजिबातच नो नो). पुढे बॉल पॉईंट पेन हाती (किंवा बोटी) लागल्यावर परत फा. पे. कडे वळलो नाही.

सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या मंडळींचे मात्र (आता) कौतूक वाटते.

ह्या निमित्ताने माझ्या हस्ताक्षराचा ऱ्हास - एक Pen-demic https://www.maayboli.com/node/86226 धाग्याची रिक्षा.

IMG-20260123-WA0008.jpgface-palm_1f926.png

मला खूप काही लिहायचे होते पण यातच दमले. Lol फाऊंटन पेन विनाटोपणाचे ठेवल्याने सुकून गेले होते. जो चालणारा बॉलपेन एकदाचा सापडला, त्यातच उजेड पाडलाय.
ऋतुराज, भाऊ, अश्विनी मस्त लिहिलंय. Happy

सुंदर !
* चामुंडराय >>> A bad workman +१ . अगदी.
* अस्मिता.>>> तुमच्या 'माती'ने प्रतिसादाची चौकट छान सजली आहे ! सुरेख चित्रमय प्रतिसाद.

विवेक कुलकर्णी हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून निवृत्त झालेले फाउंटन पेनप्रेमी गृहस्थ आहेत. त्यांनी निवृत्तीनंतर एक मस्त उद्योग चालू केलेला आहे तो म्हणजे आकर्षक व कलात्मक फौंटन पेन्सची निर्मिती. त्यात पेन सजवण्यासाठी ते Urushi या प्राचीन जपानी कलेचा वापर करतात.
त्याची कहाणी इथे :
https://indianexpress.com/article/cities/pune/retired-engineer-mastered-...

आजच्या लोकसत्तेतील बातमी.
प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कलाकृती दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील ‘ग्रंथ कुटीर’ दालनात झळकल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या दालनात, त्यांनी भारतीय संविधानाची प्रस्ताविका, ‘आम्ही भारताचे लोक’ हा मजकूर ११ अभिजात भारतीय भाषांमध्ये, सुलेखनातून साकारला आहे. याशिवाय सरस्वती वंदनेचेही सुलेखन तिथे करण्यात आले आहे.

* ‘ग्रंथ कुटीर’>>>
क्या बात है ! आताच दहा मिनिटांपूर्वी ही बातमी मी मटामध्ये वाचली होती Happy
पालव यांचे अभिनंदन !!
सीबीएसईच्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात अच्युत पालव यांच्यावर स्वतंत्र धडा समाविष्ट केलेला आहे.
. .
आजच्या मटामध्येच लिहावे नेटके हा लेख असून त्यात समर्थ रामदासस्वामींनी हस्ताक्षरांबंधी केलेल्या विवेचनाचा आढावा आहे.

पुण्यात गेल्या एक दोन महिन्यात फाऊंटन पेन निर्मिती करणाऱ्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांच्या उत्पादनाचं प्रदर्शन होतं व त्याला खूप चांगला प्रतिसाद होता.
अच्युत पालव यांचं अभिनंदन !
( रच्याकने, अच्युत पालवांचं सुलेखन जितकं भुरळ घालणारं आहे, तितकंच त्यांचं निर्मळ, गोड व निगर्वी
व्यक्तिमत्त्वही ! )

मी एका हॉलिडे मार्केट मध्ये फाऊंटन पेन पाहीलेले. पण तो मनुष्य $१५० ला विकत होता. म्हटलं अ‍ॅमॅझॉन वरुन घेउ.

* त्यांचं निर्मळ, गोड व निगर्वी >>>=+११
त्यांची ही मुलाखत फार छान आहे :
https://www.youtube.com/watch?v=dvP0656MbVE
. .
* फाऊंटन पेन $१५० ला >>>> पूर्वी माझ्याकडे पार्करचे एक भारी पेन होते. आता किंमत नाही आठवत.
ध,
तुम्ही ॲमेझॉनवरून नवे पेन घ्या आणि नंतर आम्हाला हस्ताक्षराचा नमुना पेश करा Happy

@ फाउंटन पेन चर्चा + …बोटांना शाई लागून डाग+ … पूर्वी माझ्याकडे पार्करचे एक भारी पेन होते.…

Parker चे पेन आणि Chelpark ची शाई असा लक्ष्मी-नारायणाचा जोडा होता तो, inseparable.

पिताश्रींकडे, मोठ्या काकांकडे (त्यांचे जन्मसाल १९४०, त्याच साली Chelpark Ink ची स्थापना झाली होती) दोन्हींचा वापर आणि साठा घरात अगदी १५ वर्षापूर्वीपर्यंत होता. Treasured like family jewels.

IMG_1018.jpeg

Maroon+ Gold रंगाचे, ग्राइप वॉटरच्या झाकणासारखे टेक्निक असलेले बाटलीतून शाई शोषून घेणारे पार्कर पेन मीसुद्धा वापरलेय काही दिवस.

काय काय आठवले वरील चर्चेमुळे 🙈

Pages