चैतन्याचा प्रश्न
(हा लेख Jan 2026च्या आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
https://www.sudharak.in/2026/01/14715/ )
चैतन्याचा प्रश्न
Culver City मधील This Is Not a Café.
संध्याकाळची वेळ. मोठ्या काचांपलीकडे रस्त्यावर रहदारी संथपणे सरकताना.
आत कॉफी मशीनची घरघर, आणि तीन जण एका कोपऱ्यातल्या टेबलवर.
सोमणे – समोर गरम मद्रास फिल्टर कॉफी.
कासवे – डबल एस्प्रेसो.
खेकडे – ओट मिल्क कॅपुचिनोवरच्या फेसात बोटे फिरवत.
सोमणे (फिल्टर कॉफीचा सुगंध नाकात शिरू देत, मग खिडकीकडे पाहत, नंतर कासवेकडे वळून) : कासवे, एक गोष्ट मी खूप दिवसांपासून पाहतोय. तुमच्या त्या तर्कवादी चर्चा, पेपर्स, मॉडेल्स, छान आहेत, पण त्यातचैतन्याला कुठे जागा आहे? चैतन्य म्हणजे काही धुरकट अलौकिक प्रकार नाही. ज्ञानेश्वरांना जी “आतील ज्योत” वाटली, तुकारामांना “जगण्यातली ओढ” वाटली, त्या अनुभूतीबद्दल बोलतोय मी. (कॉफीचा घोट घेत) माणूस एखाद्या क्षणी स्वतःच्या भौतिक मर्यादांपलीकडे जाताना जाणवतो. अगदी तसे, जसे एखाद्या रागात अचानक सूर “लागतो.” हे काय केवळ न्यूरॉन्सचं एकमेकांना सुलगावणं आहे? मला वाटतं तुमच्या तर्कांच्या नकाशात काही प्रदेश कोरेच आहेत.
कासवे (एस्प्रेसोचा कप टेबलावर टेकवत, तीक्ष्ण नजर सोमणेकडे) : कोरे? अनन्वेषित म्हण एकवेळ. तुझ्या त्या चैतन्याची अनुभूती मी नाकारत नाही. पण अनुभवाचा अर्थ ठरवताना एकदम “भौतिकतेच्या पलीकडे” म्हणायची काय गरज? अनुभवाच्या व्याख्या अनेक असू शकतात. ह्या एस्प्रेसोकडे पहा – यात कडूपणा आहे, वाफाळती उब आहे, जागं ठेवण्याचा गुणधर्म आहे – पण चवीत कुठली ‘दिव्यता’ वगैरे मिसळलेली नाही.
खेकडे (कपच्या किनारीवर बोटाने हलका ठेका धरत) : मला तुमच्या दोघांची ही जुगलबंदी आवडते. दोन वेगळे सूर, पण कुठेतरी एकमेकांना प्रतिसाद देणारे.
सोमणे जे चैतन्य म्हणतो, ते मला एखाद्या रागाच्या मनोधर्मासारखं वाटतं. आरोह-अवरोह संपले की कलाकार जिथे स्वतःचे स्वर शोधतो, तिथला धूसर अज्ञात प्रदेश.
आणि कासवे म्हणतोय की त्या मनोधर्माला अलौकिकतेचं लेबल चिकटवणं गरजेचं नाही. तो प्रवास कलाकाराच्या श्वासातून, त्याच्या शिस्तीतून, त्याच्या रचनेतून उगम पावतो.
सोमणे (खेकडेकडे पाहून हलके स्मित) : रागाचा मनोधर्म कलाकाराला निवडतो. तो आपणहून येतो, कलाकाराला ओढून घेतो. ते चैतन्य आहे. कलाकाराला स्वतःपलीकडे नेणारं काहीतरी. (कासवेकडे वळत) मला तुझ्या तर्कांमधली रचना आवडते – स्वच्छ, सुसंगत – पण मला वाटतं ह्या ‘ओढीला’ फुलायला तुम्ही खऱ्या अर्थानं जागा देत नाही. तिला तर्काच्या चौकटीत घट्ट बसवायचा प्रयत्न करता. केवळ सवयीची गोष्ट असती, तर सगळ्या कलाकारांना तो अनुभव सारखाच आला असता. तसं होत नाही – म्हणूनच तर ती ‘ओढ’.
कासवे (नजरेत खेळकर गंभीरता) : मानवामध्ये अनंताची इच्छा नक्कीच असते – खोल काहीतरी शोधण्याची. माझा प्रश्न इतकाच की, त्या अनुभूतीला “देहबाह्य” म्हणणं आवश्यक आहे का? असं नाही का की मन, आठवणी, भावना, संस्कृती ह्या सगळ्यांच्या जुगलबंदीमधून ती उमलते?
खेकडे (पुन्हा ताल धरत) : अहो, जुगलबंदी म्हणजे हेच ना – दोन वादक वेगळे असतात, त्यांचा स्वभाव वेगळा, तरीही त्यांच्यातून एक तिसरीच रचना जन्म घेते.
सोमणेचा स्वर—चैतन्याचा.
कासवेचा—तर्काचा.
आणि मी म्हणतो: ते दोन वेगळे प्रवाह असले तरी एकाच रागाचे भाग आहेत.
सोमणे (हळू आवाजात, जणू स्वतःशीच) : आपण चैतन्य, अर्थ, transcendence ह्याबद्दल बोलतो, पण हीच अस्वस्थता छोट्या-मोठ्या, अगदी परिचित प्रसंगांतही दिसते. जिथे नियंत्रण दिसत नाही, तिथे आपल्याला काहीतरी “असावं” असं वाटतं.
(बाहेर पाहत, एक Waymo गाडी सरकताना दिसते; चालकाच्या जागी कोणीच नाही)
हं. पण तरी एक प्रश्न उरतोच – चैतन्य जर आंतरिक प्रकाश असेल, तर तो केवळ सिग्नल्सच्या देवाणघेवाणींनी कसा उलगडणार? तर्क, पॅटर्न्स, कारण (reason) – ह्या सगळ्यात ‘तो’ प्रकाश कुठे? माणूस केवळ एखाद्या प्रणालीप्रमाणे फुलत नाही. त्यात काहीतरी अधिक असतं.
रिकामी सीट आणि भीती
Waymo गाडी वळते. ड्रायव्हरची रिकामी सीट पुन्हा तिघांच्या नजरेत येते. सोमणेच्या भुवया उंचावतात.
सोमणे (अस्वस्थपणे, खिडकीबाहेरच्या Waymo कडे पाहत) : कासवे, सांगेन तर गंमत वाटेल, पण ही रिकामी सीट मला फारच घाबरवते. गाडी चालते आहे – छान, शिस्तीत – पण ड्रायव्हर नाही. मानसिकतेला ते पचत नाही. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, “काहीतरी हलत असेल, होत असेल, तर त्यामागे कोणीतरी असतं.” इथे कोणीच नाही.
आणि ही भावना – ही पोकळी – देवाशिवाय विश्व रिकामं वाटण्यासारखीच. जीवनाचा दिशादर्शक नसणं काय आणि कारचा नसणं काय— दोन्ही अस्वस्थ करतात.
कासवे : ह्या रिकाम्या सीटची भीती कशी अनाठायी आहे हे मी सांगू शकतो. त्यासाठी गाडी कशी चालते हे आधी समजावून घ्यायला हवं. त्यामागे भुताटकी नसून ह्या गाडीरूपी यंत्राचं सखोल प्रशिक्षण आहे, मशीन-लर्नींग आहे.
सोमणे : ठीक आहे – पण साध्या भाषेत सांग. मी मशीन-लर्निंगचा तज्ज्ञ नाही.
कासवे (हसत) : नक्की. गाडीच्या डोळ्यांपासून सुरुवात करूया. गाडीत असलेले Lidar, radar, आणि कॅमेरे म्हणजे तिचे डोळे. आपल्या मेंदूला मिळतात तसेच सिग्नल्स गाडीच्या संगणकाला त्यांच्याद्वारे मिळतात.
खेकडे : त्यामुळे आजूबाजूचे सायकल, कुत्रा, पादचारी, इतर गाड्या त्यांना दिसतात – तेवढं मला माहीत आहे.
कासवे : आपण बाजूने येणारा मुलगा पाहून “हा रस्ता ओलांडणार” असं भाकीत करतो. गाडीही तसंच करते, पण गाडी चक्क ३६० अंशात पाहू शकते, त्यामुळे ब्लाईंड स्पॉट्स नसतात.
सोमणे : पण गाडीचे अंदाज किती अचूक असतात?
कासवे : एखाद्या चांगल्या ड्रायव्हरइतकेच. प्रत्येक वस्तूचं स्थान, वेग, दिशा, गती, सगळ्याचं गणित गाडी करते. मग ती भाकितांची प्रारुपे वापरते. “हा पादचारी पुढच्या दोन सेकंदात डावीकडे जाईल की उजवीकडे?” वगैरे अंदाज ती बांधते.
खेकडे : पण अशा शेकडो शक्यता असतील.
कासवे : हजारो असतात. आपण माणूस म्हणून मोजक्याच पर्यायांचा विचार करतो – थांबायचं, वळायचं, पुढे जायचं, इत्यादी. गाडी मात्र हजारो शक्यता पटापट लक्षात घेते आणि सर्वांत सुरक्षित, नियमसंगत निर्णय घेते.
सोमणे : आणि गाडी वळवणं, वेग कमी-जास्त करणं, ब्रेक दाबणं? हे सगळं कसं केलं जातं?
कासवे : कंट्रोल सिस्टीमद्वारे – नियंत्रणप्रणाली. निर्णय एकदा झाला की गाडी वळवणं, ब्रेक दाबणं, गती वाढवणं किंवा कमी करणं. क्षणागणिक शेकडो बारके बदल होत असतात.
सोमणे (कसेनुसे हसतो) : म्हणजे गाडी ‘विचार’ करत नाही, फटाफट पण काळजीपूर्वक निर्णय घेत असते.
कासवे : नेमकं बोललास. निर्णय म्हणजे ‘विचार’ नाही – पण वर्तनाचा गाभा असतो, आधार असतो. सीट जरी रिकामी दिसली – तरी त्यामागे एक अख्खं विश्व आहे. सगळं चलनवलन आतल्या गणनेमुळे व त्यावर आधारित प्रारूपांमुळे होत असतं. ‘कर्ता’ सीटवर नसून गाडीच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहेत. त्या मिळून योग्य ‘कर्म’ घडवत असतात. बाह्य पर्यवेक्षक नसतानाही व्यवस्था एकसंध असू शकते, ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे.
सोमणे (हळू, प्रांजळ) : हे मी ऐकलं होतं, पण इतकं स्पष्ट आणि सोप्या भाषेत नाही. पण तरी… त्यामागे जिवंत, बुद्धिमंत कर्ता नसल्याची कल्पना अस्वस्थ करतेच. जग तर कितीतरी पटींनी जास्त गुंतागुंतीचं आहे.
खेकडे : सोमणे, तुला वाटतंय ते अगदी नैसर्गिक आहे. मी स्वतः पहिल्यांदा Waymo पाहिली तेव्हा माझीही मान पटकन सीटच्या मागे कोणी लपलं आहे का ते पाहायला वळली. माणसाला नियंत्रणविरहीत भासणाऱ्या प्रणाली स्वीकारायला वेळ लागणारच. पण कासवे जे सांगतोय ते महत्त्वाचं आहे. गाडी चालते आहे कारण तिच्यात कर्ता आहे, कर्तृत्व आहे – फक्त ते बाहेर दिसत नाही.
सोमणे (थोडा पुढे वाकून, आता त्याचा आवाज अधिक धारदार) : ठीक आहे – गाडीचं कामकाज जबरी आहे. ते मी नाकारत नाही. पण माझा मुद्दा हा की तुम्ही निरिश्वरवादी किंवा तर्कवादी लोक सगळं ह्याच पद्धतीनं बघता.
सिस्टम. नियम. सेन्सिंग. निर्णय. आउटपुट.
माणूस फक्त ह्या चौकटीत बसू शकत नाही. भीती, करुणा, अपराधाची भावना, चुकल्यावर पश्चाताप – ह्या भावना algorithms पेक्षा मोठ्या आहेत, त्यापलिकडच्या आहेत. माणसाच्या अंतर्मनात एक साक्षी असतो – जो फक्त नियम पाळण्यावर समाधानी राहत नाही. “का केलं? काय हवंय? मी करतो ते योग्य आहे का?” असे प्रश्न विचारतो. स्वयंचलित गाडी असे करते का? ती स्वतःच्या निर्णयावर कधी विचार करते का? कधी स्वतःवर रागावते का? कधी असे विचार येऊन अडखळते का की मी चुकीच्या लेनमध्ये तर नाही ना?
तुम्ही म्हणता “जगाला चालवणाऱ्या प्रेरणा ह्या भौतिक घटकांमध्ये/लौकिकातच असतात. जग कुठल्या पारलौकिक शक्तीने चालत नाही.” – पण मग आत्मचिंतन, अर्थनिर्मिती, प्रार्थनेतला रोमांच— ह्या सगळ्याचं काय?
To be continued
=============================
माझा मायबोलीवर डकवलेला इतक्यातला एक अन्य लेख: सूर्यमालेपलीकडून आलेला अलीकडचा पाहुणा: 3I/ATLAS
https://www.maayboli.com/node/87595
माझ्या इतर लेखनासाठी पहा: https://ashishmahabal.github.io/writings/index.html
रोचक, वाचतोय.
रोचक, वाचतोय.
रोचक. पुढील लेखांची वाट बघतोय
रोचक. पुढील लेखांची वाट बघतोय.
ईंटरेस्तींग्....
ईंटरेस्तींग्....
पुढचा भाग येणारे म्हणजे त्यात माझ्या शंकेला उत्तर मिळणार आहेच, पण तरीही माझी शंका इथे नोंदवुन ठेवते.
काही गाडया, ज्यांना अमुक प्रकारे विचार करायचे संस्कार मिळाले त्यांनी लवकरच स्वत:च्या जगातले सिस्टम. नियम. सेन्सिंग. निर्णय. आउटपुट. शोधुन काढले आणि हे सगळे जसे आहे त्याप्रमाणे आपण युगानयुगे जगतोय, हे शुद्ध विज्ञान आहे, यात कसलीही जादू नाही हे दाखवुन दिले. काही गाड्यां, ज्यांना तमुक प्रकारे विचार करायचे संस्कार मिळाले ते स्वत:च्या जगाकडे विस्मयाने पाहु लागले आणि आपल्या बुद्धीच्या पुढचे जे काही आहे त्यातले सिस्टम. नियम. सेन्सिंग. निर्णय. आउटपुट कोणीतरी निर्माण करणारा असणार असे मानले. निर्माण करणार्याला या गाड्या देव संबोधू लागल्या व त्याची पुजा करु लागल्या.
यात कोण चूक कोण बरोबर? गाडी निर्माण करणारा माणुस आहे हे माणसाला माहित आहे पण गाड्यांना माहित नाही.
प्रश्न चांगला आहे. असे प्रश्न
प्रश्न चांगला आहे. असे प्रश्न विचारण्यासाठी विचार करावा लागतो.
प्रश्नाच्या उत्तरावर विचार केला का? तेही करणं महत्वाचं
केवळ प्रश्न विचारून सगळे देवावर सोडून भागत नाही. सगळ्यांनी विचार करण्याचीच आज गरज आहे.
पुढचे वाचण्याआधी कृपया उत्तराचा विचार करा. खालील सगळे लेखांमध्ये येणार नाही.
.
.
.
.
.
.
क्षणभर समजूया की वेमोला चैतन्य प्राप्त होऊन तिचा कर्ता मानव आहे हे कळले आहे. किंवा, बेटर स्टील, असे म्हणूया की तिला मानव तिचा कर्ता असावा असं वाटू लागला आहे.
गाडी निर्माण करणारा माणूस आहे म्हणजे नेमकं काय?
कोणता माणूस?
कोणत्या माणसाला गाडीचे सगळे भाग कसे बनतात हे माहिती आहे?
किंवा सगळे कार्य कसे चालते?
समजा वेमोचं प्रोडक्शन बंद झालं, त्यानंतर एखादं बाळ जन्माला आलं, आणि मोठं होऊन प्रौढ झालं,
तर त्या माणसाने गाडी बनवली आहे असं वेमो (किंवा आपण) म्हणू शकू का?
वेमोप्रमाणेच टेस्ला पण बनतात. त्यांचे अल्गोरिदम्स वेगळे असतात.
म्हणजे त्या वेगळ्या जाती किंवा धर्माच्या का?
मस्क आणि वेमो-कर्ता हे वेगवेगळे देव का?
वेमोला मस्क आपला देव आहे असे वाटू शकेल का?
केवळ इंजिन बदलल्यास धर्मांतर म्हणता येईल का?
घरवापसीसाठी काय करावे लागेल?
एखादी टेस्ला समजा सान फ्रान्सिसकोच्या ओकवाडीतून जाते आहे आणि अचानक टेस्लाला रस्त्यात मस्क दिसला तर साक्षात्कार झाल्याप्रमाणे तिने थांबून मस्कगान (मद्यपान सारखे वाटते ना?) करावे का? ज्याप्रमाणे रस्त्याने जाताना मंदिर दिसले की चप्पल काढून (काही) लोक रस्त्यावरूनच नमस्कार करतात?
वेमोमध्ये बसायला कोणी आला की तो पण मानव असल्यामुळे वेमोने त्याला म्हणावे का, की बाबा रे, तुला घाई आहे पण तू माझा कर्ता. त्यामुळे मी आधी तुझं भजन म्हणणार मग तुला तूच घालून दिलेल्या स्पीड लिमिटमध्ये राहून पटकन तुझ्या गंतव्य स्थानि घेऊन जाणार. तुला वाहून नेल्यामुळे तू मला पैसे देणार आणि ते पैसे आपोआप दुसऱ्या कर्त्याकडे पोचते होणार.
वेमो तयार करणारा मानव आहे हे
वेमो तयार करणारा मानव आहे हे तर सत्यच आहे. तो मानव कुणी एक नाही/नसणार. गोल आकार असेल तर ती वस्तु जमिनीवरुन घरंगळत जाताना वेगात जाते हे मानवाच्या लक्षात आल्यापासुन ते २०२५ सालापर्यंतच्या एकत्रित बुद्धीचा/प्रगतीचा वेमो हा दृष्य आविष्कार आहे. मानवाच्या बुद्धी जितकी प्रगत होत गेली तशी ही प्रगती घडली. ( गेल्या ५० वर्षात प्रगतीचा वेग वाढला म्हणतात म्हणजे बौद्धिक क्षमता आधीपेक्षा जास्त वाढली असेच असावे ना). वेमो अस्तित्वात येणे हा मला इन्जिनीअरिंगचा चमत्कार वाटतो, तिच्यावर मस्क किण्वा अजुन कोणाचा स्टॅम्प असला तरी तुम्ही तिचे जे फंक्शनिंग लिहिले आहे त्यात फारसा फरक पडणार नाही. म्हणजे मानव बाहेरुन हिंदु किंवा मुस्लिम असला तरी आत फिजिकली हृदय्,डोळे, कान, फुफ्फुसे सारखेच काम करतात तसे.
वेमो जिवंत झाली किंवा तिला विचार व भावना मिळाल्या तर तिला स्वतःबद्दल काय वाटेल? तिच्यातल्या अतीप्रगत इन्जीनिअरिंगचे श्रेय ती ‘आमचे पुर्वज चाक होते, आम्ही प्रगत होत आज ह्या जागी पोचलो‘ असे म्हणत असेल तर ते पाहणारा मानव तिला हसणार नाही का? की बाळा, जे आपोआप झाले किंवा तु उत्क्रांत झालीस असे तुला वाटतेय ते सगळे माझे कष्ट आहेत असे तो म्हणणार नाही का?
मेबी वेमोला मानव समोर दिसतोय आणि मला माझा निर्माता समोर दिसत नाहीय. मला मानवाने निर्माण केलेल्या धर्म देव रुढी परंपरा यात रस नाही पण सजीव शरीर अमिबासारख्या एकपेशिय समुहापासुन उत्क्रांत होत आजच्या स्थितीला पोचले हे पटत नाही. तसे असेल तर आज अमिबा शिल्लकच राहायला नको. ह्या सजीव सृष्टीच्या इन्जिनीअरिंगमागे कोणाचे डोके आहे मला माहित नाही. माझ्या मर्यादित बुद्धीने त्याला देव हे नाव दिलेय. पण म्हणुन त्याची रोज पुजा करुन त्याला खुष ठेवणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही कारण त्याला मी काय करतेय यात काडीचा रस नाही असे मला वाटते. माझ्या आयुष्यात जे घडतेय यात त्याचा हात नसावा असे मला वाटते.
हा विचार चुक आहे आणि वेमो आपोआप तयार झाली हेच सत्य असेल तर माझ्या विचारात नेमका कुठे फॉल्ट आहे, कुठला मुद्दा मी चुकतेय हे मला समजुन घ्यायचेय.
ऍनालॉजीमध्ये अडकु नये. ती
मध्येच उडी घेतली असे वाटु नये म्हणुन प्रकाटाआ.
>>>>>>मध्येच उडी घेतली असे
>>>>>>मध्येच उडी घेतली असे वाटु नये म्हणुन प्रकाटाआ.
आता आम्ही चालत्या बसमध्ये कशी घ्यायची उडी?
मानव असे हाय स्टँडर्डस सेट करण्याचा निषेध