
कारच्या खिडकीतून वेगानं मागे जाणारे दिवे दिसत होते. मी मागच्या सिटावर मान टाकून पडले होते. शेजारीच हर्षद होता. तोही शांत, क्लांत, विक्लांत. काजव्या गाडी चालवत होता, आणि हर्षदसाठीचा मामा पुढे. हा मामा होता, म्हणून काजव्या शांत होता, नाही तर त्याच्या टकळीला खंड नसता. कदाचित हा पार्टीचाही प्रभाव असावा. चांगली झाली नै पार्टी? बहुतेक सगळे बोलावलेले आले. खर्च झाला, पण पन्नाशी काय पुन्हा पुन्हा येणारे?
(भाग ३ - https://www.maayboli.com/node/87634)
अचानक काजव्यानं अर्जंट ब्रेक लावले. त्याच्या तोंडून एक शिवी गेली. "च्यायची कुत्री! रात्री अंगात येतं यांच्या...”
हर्षदला झोप लागली असावी. पण बरं झालं, की बसतानाच त्याला सीटबेल्ट लावला होता. हे ब्यूरोचा मामा बरे आहेत. त्यांचं या बाबतीत ट्रेनिंग चांगलं असतं. त्यामुळे हर्षदला फक्त गचका बसून जाग आली. तरी सावरायला त्यानं माझा हात शोधला. मी मात्र चांगलीच हबकले. माझ्या सीटवरून घसरून पुढे काजव्याच्या सीटच्या मागे धडकले. लागलं वगैरे नाही. मागे वळून हर्षद ठीक आहे की नाही हे बघताना मामाची नजर ड्रेस वरती सरकल्यानं उघड्या पडलेल्या माझ्या मांड्यांकडे गेली. तो चपापला. पटकन त्यानं तोंड फिरवलं. मीही सावरून बसले, पण नजरेच्या कोपऱ्यातून तो चोरून बघतोय हे मी जोखलं. गोऱ्यापान गरगरीत मांड्या! कितीही झालं तरी शेवटी पुरूषच! मला आता सवय झाली होती. खरं तर सलॉन चालवायचं तर पुरूषांना येडं बनवून गिऱ्हाईक करणं, हेच मर्म आहे ना! सिनिकल झालेय आता, कोल्ड कॅल्क्युलेशन्स...
सावकाशपणे मी ड्रेस नीट केला. त्यासाठी मला हर्षदनं पकडलेला हात हलकेच सोडवून घ्यावा लागला. त्यानं हात पकडल्याची खरं तर मला जाणीव झाली नव्हती. मी त्याच्याकडे नजर टाकली. तो परत गुंगला होता. त्याची तब्येत आजचे कष्ट झेलण्यासारखी नव्हतीच. पण पन्नाशी काय पुन्हा पुन्हा येणारे? त्याची येतेय तेव्हा तो...
त्या अर्धवट अंधारात त्याच्या आक्रसलेल्या आकृतीची जाणीव झाली. हा रोग माणसाला खात जातो म्हणतात ते खोटं नाही. केमो थांबल्यानंतर उगवलेल्या खुरट्या केसांनी त्याचा चेहेरा विद्रूप दिसत होता. पण आता सवय झाली होती म्हणा… हाच चेहेरा माझ्या आठवणीत रहाणार आहे का?
डोक्यात चित्रविचारांचा एक विचित्र कोलाज गर्दी करून गेला. एक खंत मनात उतरली.
निव्वळ वाट पहाणं, नै.. ऑल दॅट हॅज कम डाउन टू धिस… अंधाररस्त्यावरून परक्याच्या आधारानं दिगंताची मार्गक्रमणा… संपत आलीये ती आता. शिट्...
परत एक नजर टाकली हर्षदकडे. प्रेम, राग, द्वेष, घृणा, करुणा… या इसमाविषयी सगळं सगळं वाटून झालंय. काय राहिलंय आता?
तेवढ्यात काजव्यानं "बरं आहे नं गं?” असं रिअर व्ह्यू मिररमध्ये बघत विचारलं. मी त्याच्याकडे बघत मान डोलावली. मामानं मागे बघण्याचा नाद सोडला होता हे माझ्या लक्षात आलं. मी डोळे मिटून मान मागे टाकली. घर यायला अजून दहा-पंधरा मिंटं तरी होती.
मिटल्या पापण्यांवर रस्त्यावरच्या अंधारप्रकाशाची नक्षी नाचत होती. मात्र पापण्यांमागे पार्टीची चित्रं भिरभिरत होती. बारशेजारी बसलेला हर्षद दिसला. अनोळखी भासला. ओढलेला चेहेरा, कृश शरीरयष्टी, असा कधीच नव्हता तो...
ममता - हो ममता राहिली. त्याच्याविषयी ममत्त्व वाटलं नाही कधी. का वाटेल? असेल स्त्रीसुलभ भावना. पण नशिबात नसेलच तर येणार कुठून. कुठल्याच लहान मुलासाठी माझा पान्हा झरलाच नाही...
विचारानं अस्वस्थ झाले. चुळबुळत उठले. नजर बाहेर लावली. पण डोळ्यांसमोर मनातलीच चित्र फिरत होती.
बरं आहे. आईचे हाल बघितलेत मी. आई थकलीये आता, पण ठेवणीतल्या पैठणीत काय सुंदर, सात्विक, सोशिक दिसत होती! खूप सोसलय तिनं. बाबा गेल्यापासून एकटीच रहातेय. किती वर्षं झाली? अनेकदा मनात येतं, की आता माझ्याबरोबर रहायला ये म्हणावं.. पणं कसं म्हणू? तिची वृत्ती आणि आमच्या घराचे रागरंग कसे जमणार? ती प्रयत्न करेलही. पण बिचारीची कुतरओढ होईल. का त्रास द्यायचा त्या.. त्या निर्मल जीवाला? गेली तीस वर्षं ती समजावून घ्यायचा प्रयत्न करतेय, पण माझ्या अंतरंगाचा ठाव तिला काही उमगला नाहीये. तिलाच का, मलाच कुठे कळतंय काय चाललंय…
अस्वस्थ होऊन मान झटकली तर पर्वतीची टेकडी समोर दिसत होती. रात्रीच्या अंधारात तिथले दिवे झळकत होते. क्षणार्धांत उंच इमारतींमागे दडली खरी, पण स्मृतीकोष हिंदोळून गेली. दर वर्षी श्रावणात एका तरी सोमवारी दर्शनाला केलेल्या पर्वतीच्या वाऱ्या आठवल्या. माझ्या आजारपणात केलेला नवस फेडायला म्हणून आई-बाबांनी दोघांनीही केलेले सोळा सोमवार आठवतायत? काय साधीभोळी लोकं होती.. हं.. बिचारीनं किती काकुळतीनं मला सुचवलं होतं सोळा सोमवार करायला, हर्षदचा आजार कळल्यावर! खरंच भोळी… तिला कधी तिच्या देवाआड दडलेल्या नियतीचे खेळ कळलेच नाहीत. जे होणार ते होणार, ही काळी रेघ, दगडावरची. तिनं केलेल्या उपासतापास अन् अनुष्ठानांनी बाबा वाचले का? असं त्यांनी काय पाप केलं होतं की त्यांना इतकं भीषण मरण यावं? तिळातिळानी झिजत, कणाकणानी विरत, कण्हत, कुथत.. एका अर्थी बरच झालं नाही का ते लवकर गेले? माझे तरी डोळे उघडले. हो, बरं झालं वेळेत उघडले. आणि मी डोळे उघडल्यावर जे काही करत होते, ते पाहून कदाचित त्यांना डोळे मिटावे असंच वाटलं असतं, नै?! हा, हा, हा... त्या आईला मात्र काय काय बघावं लागलं… छोड…
बंडखोरी… हो, ही बंडखोरी कुठून शिकले मी? स्वतःवरचे संस्कार, नव्हे बंधनं, ती मध्यमवर्गीय वृत्ती झुगारण्याची, तोडण्याची, फोडण्याची शक्ती, मती आली कुठून? बाबा गेल्यावर शिकले. सरकारी ऑफिसांतल्या अधिकाऱ्यांकडून शिकले. गल्लीतल्या लिंगपिसाट दांडगटांकडून शिकले. लोचट नातेवाईकांकडून शिकले. एखाद्या सुसंस्कारित मुलीच्या रोलमध्ये आईची ढाल बनले अन् जगरहाटीचे फटके खाल्ले ना तेंव्हा जाण आली. गरिबी! मग ती पैशाची असो वा वृत्तीची, कशी घातक, मारक ठरते ते कळलं मला तेंव्हा. जगात गरिबीसारखा अन्याय कुठला नाही.
पण मला जाग आणली ती त्या कॉलेजच्या नाटकानं! आमच्या मराठी ग्रुपनं चॅलेंज घेऊन ऑथेल्लो केलं होतं. बाकी सगळे ग्रुप फंकी टाऊनवर नाचत असताना आम्ही वेगळी वाट शोधली होती. मी डेस्डेमोना झाले होते. साहजिकचै नै?! मला एवढी चपखल भूमिका दुसरी कुठली होती तेंव्हा? दुशिंग सरांनी बसवलं होतं. समीर ऑथेल्लो झाला होता. समीरनं किती मनधरणी केली होती माझी त्या भूमिकेसाठी, बापरे! आईला येऊन भेटला, तिला पटवलं तेंव्हा तिनं होकार दिला होता स्टेजवर उभं रहायला. दुशिंग सरांनी जीव ओतून बसवलं होतं. प्रत्येक भूमिकेचे पदर किती कौशल्यानं उलगडून दाखवले होते. विलक्षण दिवस होते ते!
इकडे जगरहाटीत होणारी ससेहोलपट आणि तिकडे सिद्धहस्त नाटककारानं मांडलेलं रमल. जगाकडून रोजचा थपडा, उपेक्षा, अपमान यांचा खुराक आणि तिकडे प्रेम, द्वेष, असूया, ईर्ष्या याची वीण. जसं जसं नाटक बसत गेलं, तशी तशी नियतीच्या हातातलं खेळणं बनून मूर्ख ठरणारी डेस्डेमोना माझ्या डोक्यात गेली. मला ते भेकड हौतात्म्य नको होतं. माझ्या रोजच्या जीवनात त्या भेकडपणाचा पदोपदी प्रत्यय घेऊन उबग आला होता. मला सशक्त जगणं हवं होतं. सक्सेस हवा होता, विजय हवा होता. मध्यमवर्गीय कुढत, पिचत जगण्याच्य विचारानंच मळमळू लागलं होतं.
आणखी एक झालं. नाटकासाठी पहिल्यांदाच मी मेकअप केला! केशरचना केली, आकर्षक, झुळझुळीत कपडे घातले. आरशातल्या माझी मलाच ओळख पटली नाही! कॉलेजनं तर मला डोक्यावर घेतलं. बास… जणू ट्रान्सफर सीन झाला. वेश बदलला, आवेश बदलला! माझ्या सौंदर्याची पहिल्यांदा जाणीव झाली. त्याचं सामर्थ्य अनुभवलं मी! मुलींच्या घोळक्यात मुलं मला शोधू लागली. कॉलेजमधे नाव झालं, ओळख मिळाली. नुसत्या नजरेसाठी मुजरे घडू लागले. आता राहिला होता पैसा... अं… मला समीरमधला ऑथेल्लो दिसू लागला, हं… अन् मी हर्षद निवडला. जाणीवपूर्वक. समीरची उमा हर्षदची सिमरन झाली. सर्वार्थानं.
बरं झालं, नवी मी सम्याला झेपले नसते, अन् मला सम्या. पण चेतनेनं फारच छान डेव्हलप केलं सम्याला. ते ही एका अर्थी बरंच झालं नाही का? कुठे तो घासू सम्या आणि कुठे आजचा टॉप कॉरपोरेट एक्झिक्युटिव्ह समीर… तरी कदाचित तिचं समाधान झालं नाहीचै अजून. तिच्या धाकट्या मुलाचं धड असतं ना.. पण जगी सर्व सुखी असा कोण आहे?
स्पीडब्रेकरवरून गाडी उडली आणि गेट मधून आत वळली. माझी तंद्री तुटली. काजव्या गाडीतून उतरलेल्या मामाशी बोलला. त्यानं मलाही काही तरी विचारलं. मी न ऐकता, न विचार करता मान डोलावली. मामानं मागनं हर्षदची व्हीलचेअर काढली. मी उतरणार तर लक्षात आलं की माझा हात परत एकदा हर्षदच्या हातात आहे. मान वळवून बघितलं तर हर्षद माझ्याकडेच बघत होता. हलकेच त्याला स्माईल देत मी हात काढून घेतला. कपडे नीट करत मी गाडीतून उतरले. मामा गाडी पार्क करायला घेऊन गेला. काजव्या हर्षदला ढकलत माझ्याबरोबर निघाला.
मी बदलायला माझ्या रूममध्ये गेले. पण डोक्यात विचारचक्रं चालूच होती.
जे झालं, ते होणार होतंच. हो ना? नशीबात लिहिलेली एक, एकही रेघ बदलत नाही ना? मग त्या परिघात गवसलेलं सगळं स्वातंत्र्य उपभोगलंय मी. पूर्ण उपभोगलंय. जे केलंय त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन. बेगुमान, बेफिकीर, बेलगाम. कुणी काही म्हणो. बरोबर वा चूक, कोणाला पर्वा आहे? जे त्याक्षणी बरोबर वाटलं, नव्हे करावंस वाटलं, ते केलं. परिणामांची पर्वा न करता. पण परिणामांना तोंड द्यायची तयारी ठेवून. वेळप्रसंगी स्वत्व गहाण ठेवलंय नशिबाचे भोग भोगताना, पण मागे फिरले नाहीये. माझ्या लहरींच्या थपडा हर्षदला खाव्या लागल्या, पण तो काय कमी मनस्वी आहे का? होता का, असं म्हटलं पाहिजे ना आता? या विचाराला धडकून मी भानावर आले.
आटपून मी बाहेर आले तोवर काजव्यानं आणि मामानं हर्षदला आडवं केलं होतं. तो अर्धोन्मिलित नेत्रांनी माझ्याकडे पहात होता. न बोलता मी त्याच्या बेडवर टेकले. त्याचा हात थोपटला. काय बोलणार या वेळी? काही तरी बोलायचं होतं त्याला असं वाटलं खरं, पण अतिश्रमानं ग्लानी येऊन असावी पण त्यानं डोळे मिटून घेतले. मिनिटभरानं मी उठणार एवढ्यात त्यानं मान वळवली. माझा हात दाबला. शेजारी उभ्या काजव्याला म्हणाला, “काजव्या, अर्धं अंतर चालून आली आहे ती, काळजी घे उमेची!” उमा हे नाव त्याच्या तोंडून ऐकून आम्ही दोघेही चमकलो. मी काही बोलणार तोच तो जोरात हसला. इतका की त्याला ठसका लागला, मोठी उबळ आली. मग काजव्यानं त्याला हात देऊन बसवला, मामानं पाणी दिलं. सगळं परत स्थिरस्थावर व्हायला मिनिटभर लागलं असेल. मी त्याचं पांघरूण नीट केलं, म्हणाले “सुहास कसली बोडख्याची काळजी घेणारेय माझी? त्याची काळजी करण्यात माझं आयुष्य सरलंय” काजव्याही कसनुसं हसला. “गुड नाईट सिमरन मी थकलोय आता, झोपतो. वन्स अगेन मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ…” हर्षदचे शेवटचे शब्द घरंगळले…
काजव्या हॉलमध्ये जरा घुटमळला. मी त्याला नेहमीच्या सवयीनं विचारलं, “सुहास, वन फॉर द रोड?” तो चटकन नको म्हणाला. पण मला जाणवलं त्याचा पाय निघत नाहीये. मग मी म्हटलं, "पटकन कॉफी करते”. त्याचा चेहेरा खुलला. उत्साहानं येस म्हणाला. मी किचनमध्ये वळले तशी त्याची टकळी सुरू झाली. पार्टी, मित्रांविषयी बोलत होता. इन्स्टंट कॉफी घोटता घोटता मी विचार करत होते. काजव्या माझा लांबचा आत्तेभाऊ. बालपणीचा खेळगडी. खरा हुशार. पण मला या लांबच्या कॉलेजात ऍडमिशन मिळते आहे, मी एकटं पडू नये म्हणून तिकडे आला. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या चढउतारांचा साक्षीदार. हर्षदच्या सगळ्या धंद्यातला सोबती, आणि माझ्याही. त्या कॉलेजच्या नाटकात तो आयागो झाला होता! दुशिंगसरांचं कास्टिंग भारी होतं, वा! खऱ्या आयुष्यात त्याच्याइतका निष्कपट, निष्कलंक इसम शोधून सापडायचा नाही. पण आमच्या फरपटीत तोही होरपळला. वेल, फरपट त्याची झाली होती, नै का? आम्ही तर आमच्या तकदीरचे राजे होतो! नियतीचं कास्टिंग मात्र कधी चुकत नाही...
मी बाहेर आले, तोवर त्यानं सगळे मिळालेले बुके, माझ्या नेहमीच्या आरामखुर्चीभोवती आरास केल्यासारखे मांडून ठेवले होते! “काय हे सगळं, सुहास”, म्हणत त्याच्या हातात कॉफीचा मग दिला. त्यानं अगदी इतो इतो भवान् करत मला जणु त्या सिंहासनावर बसवलं. मीही विसावले. तेंव्हा त्याची गाडी बाकी मित्र संपवून त्याच्या फेवरिट सम्या-चेतनेवर आली होती. मनात एक बारीक कळ उमटली. उगाच सोडला का मी समीरला?
हा प्रश्न मनात उमटायला आणि काजव्याचा प्रश्न यायला एकच गाठ पडली, “तुला आत्ता हर्षद उमा का म्हणाला?”
आणि काही तरी चुकीचं बोललो असं वाटून तो गप्प झाला.
रात्र दाटून आली होती. बुकेतल्या रातराणीचा मंद सुवास कॉफीच्या वाफांत मिसळत होता. हवेतल्या सम्या-चेतनेच्या गप्पा विरल्या नव्हत्या. आत हर्षद श्रांत पडला होता. जवळ पन्नास वर्षांचा जिवलग मित्र निशब्द बसला होता. कोपऱ्यातल्या टेबल लॅम्पचा पिवळा प्रकाश सावल्या गडद करत होता. खिडकीच्या तावदानाला घासणारी आंब्याची एक चुकार डहाळी आतनं येणाऱ्या प्रकाशात डहुळत होती. मधोमध एक अनुत्तरित प्रश्न अधांतरी लोंबकळत होता.
(समाप्त)
Vantage point बघत असल्यासारखे
Vantage point बघत असल्यासारखे वाटले... आवडले.
छान लिहीलेय कथा एकदम
छान लिहीलेय कथा ,एकदम चित्रदर्शी.
बाकी कथेतली नावं भारी घेतलीत
छान कथा. आवडली पण पुर्ण कळली
छान कथा. आवडली पण पुर्ण कळली असे म्हणता येणार नाही.
आवडली पण पुर्ण कळली असे
आवडली पण पुर्ण कळली असे म्हणता येणार नाही.>>>>++११११
फार भारी लिहिलं आहे
फार भारी लिहिलं आहे
हे असे दोलायमान होणे ही अवस्था का असेल असेही वाटून गेलं
मलाही शेवट नीट्सा कळला नाहीये
मलाही शेवट नीट्सा कळला नाहीये असं वाटतंय. म्हणजे जे लिहिलंय तेवढंच आहे की रीड बिटविन द लाइन आहे ते कळत नाहीये.
सायो +१ मस्त आहे पण
सायो +१
मस्त आहे पण
खूपच छान लेखन. सायो +१
खूपच छान लेखन.
सायो +१
अरेच्या! सुरुवात इन्टरेस्टिंग
अरेच्या! सुरुवात इन्टरेस्टिंग होती, मला वाटले आत्ता तर गोष्ट सुरु होते आहे, कॅरेक्टर्स मधे पोटेन्शियलही बरेच आहे, पण संपलीच की
मस्त लिहिले आहे. प्रसंग समोर
मस्त लिहिले आहे. प्रसंग समोर उभे राहतात एकदम.
टायटल वाचून त्या ओळीच्या प्रयोजनामागचा अर्थ कळला असे वाटले तेंव्हा एकदम लक्षात आले कि ट्रिगर पॉईंट वेगळाच होता. - "समीरनं किती मनधरणी केली होती माझी त्या भूमिकेसाठी," हे जर हर्शदने केले असे असते तर आम्ही पण आंब्याच्या चुकार डहाळीसारखे दोलायमान झालो नसतो
काही कहाण्या साठा उत्तरी सुफळ
काही कहाण्या साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होतं नाहीत.
तरीही काही तरी कमी, अपूर्ण, अर्धवट वाटतंय कथेत? तर मग लेखक म्हणून ती माझी मर्यादा आहे.
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!