
सम्या आणि चेतना येताना दिसले! काय दिसत होते दोघेही, ओ गॉड!! मी अभावितपणे उठून…नाही, हातांवर भार दिला मात्र, आणि माझ्या कंडिशनची जाणीव झाली, दाहक जाणीव. त्राणच नव्हते. नशीब इतक्या दुरून त्यांना माझा चेहेरा दिसला नसणार. त्यांच्या चेहेऱ्यावर कुठे पन्नाशीच्या खुणा नव्हत्याचमुळी, पण श्रीमंती झळकत होती. काय एलेगंट दिसत होती जोडी.
(भाग १ - https://www.maayboli.com/node/87629)
ही चेतना आमच्यापेक्षा एक वर्ष तर मागे होती. म्हणजे तीही पन्नाशीच्या उंबरठ्यावरए. पण दिसतेय काय चिकणी… माझी नजर सिमरनकडे गेली. दोघी हातात हात घेऊन उभ्या होत्या. सिमरन… पन्नाशी तिच्यावर उतरली होती. सटवाईनं नशिबात लिहून ठेवलेलं चुकणारए कधी? नशिबाचे इतके घाव सोसले आहेत… पण तरीही तिनं अट्टहासानं तिचं रूप जपलंय. आता तेवढंच राहिलंय तिच्यापाशी, नाही का? पुंजी नव्हतीच फारशी कधी. पण होतं नव्हतं तेही या दुखण्यापायी…
तिघंही हसत होते. सम्यानं सिमरनला मिठीत घेतलं, आणि कशी एक कळ मनात उठली. जुन्या आठवणींच्या खपल्या निघाल्या अन… गर्कन वळून मी मामाला सांगितलं, तिकडे घेऊन चल, लगेच… त्याला वाटलं रेस्ट रूमला जायचं. रेस्ट रूम्सच्या पलिकडे पॅटिओ होता, अन मग डायनिंग एरिया. त्याही पलिकडे लहानसं गार्डन म्हणजेच स्मोकिंग एरिया. कुणीच नव्हतं तिथे आत्ता. तिकडे बोट केलं. त्यानं व्हीलचेअर उभी केली.
“इथे कशाला?”, त्यानं विचारलं
“जा, एक छोटी गोल्ड फ्लेक घेऊन ये”
“साहेब…”
“जा रे, सांगतोय ना?”
“पण सर, मॅडम काय म्हणतील?”
“आज काही म्हणणार नाहीत. तू आण एक…”
“पण साहेब डॉक्टर…?”
“शटअप, नो आर्ग्युमेंट्स. जस्ट गेट वन!”, मी जवळजवळ ओरडलोच.
त्यानं न बोलता व्हीलचेअर लॉक केली आणि गेला. खाली नदी होती. हं… आज हे हॉटेल आहे इथे, पण वीस वर्षांपूर्वी काही नव्हतं. नुस्ता उजाड डोंगर आणि ते एक झाड. वन ट्री पॉइंट. खाली रस्त्यावर बाबूरावाच्या टपरीजवळ बाईक लावायची, चहा मारायचा आणि डोंगर चढून झाडाखाली येऊन बसायचं. आमची किती तरी भांडणं इथे येऊन संपली आहेत. व्हॉट ऍन आयरनी, की आज सिमरननं ही पार्टी इथे ठेवावी… मे बी नॉट, दॅट कुड बी हर प्लॅन..
बाबूराव इतिहासजमा झाला. आता काही दिवसांनी मी पण…
मामा आला. त्यानं सिग्रेट दिली. माचिसही.
“जा, तू पण एक बिडी मारून ये. मला दहा-पंधरा मिनिटं दे.” तो गेला.
सिगरेट शिलगावून एक जबरदस्त कश मारला, छातीभरून! छातीभर जळजळ झाली. किती महिने झाले असतील शेवटची सिग्रेट पिऊन? नाका तोंडातून धूर सोडला… सम्याला पाहिल्यानंतर झालेल्या जळजळीचा धूर? हा, हा…
खरं तर त्याला आणि सिमरनला एकत्र बघून… त्रास झाला. खोटं का बोलू? सिमरनच्या दुर्दैवाचं… हो मीच कारणीभूत आहे त्याला. हे दुखणं जडल्यापासून विचार करतोय. काय मिळवलं मी? आणि काय मिळवलं सिमरननं माझ्याशी लग्न करून? जितका विचार करीन तितका अधिकच त्रास होतोय. माझं आयुष्य गेलं उकिरडे फुंकण्यात. पण उमेची फरपट झाली.
उमेची? किती वर्षांनी हे नाव माझ्या मनात आलं. आज क्यूं?
ती माझी सिमरन आहे, सिमरन. त्या बेफिकीर तरुण वयातल्या बेलगाम स्वप्नांची हिरॉईन! मला हवी तश्शी, मेरी सिमरन!
पण मग मी का तिची अशी अवस्था केली? आता विचार करून तरी काय हशील आहे?
आणि आपण ठरवलंय नं की मी मुद्दामहून नाही केलं हे सगळं. कुणाला ठावूक होतं की आयुष्याचे फासे उलटे पडतील म्हणून? कोणाला वाटलं असतं की माझ्यासारखा मी अपयशी होईन?
बड्या घरचा, प्लेबॉय, सदैव हसमुख, गोडबोल्या मी. समोरच्याला पहिल्या भेटीत खिशात टाकणारा मी. आयुष्याची पहिली पंचवीस वर्षं अपयश म्हणजे काय माहित नव्हतं! आणि नंतरची पंचवीस? यशाला, कशाला आयुष्यालाच ग्रहण लागलं…
धुराची वलयं आणि विचारांचे भोवरे…
मी स्वतःचीच कीव करतोय का?
नाही, मी माझ्या धुंंदीत, माझ्या मस्तीत आयुष्य काढलंय, एन्जॉय केलंय. हां, नसेल मिळाला पैसा, इज्जत शोहरत. नसेल मिळालं लौकिकार्थानं यश का सन्मान अन् ओळख. पण ऐश केली की नाय? कायम आनंदी नसू, पण वाकड्या तोंडानं जगलो नाय. इक्लेक्टिक टेस्ट होती भौ आपली, जमानेसे अलग थी.
पण आज विचार करतो तेंव्हा वाटतं की माझ्याबरोबरच्यांची फरपट झाली. झालीच. सिमरन तर मी जिंकून आणली होती. तिचं मन जिंकलं होतं मी. सम्याला हरवून! आय डोंट नो, पण तिथूनच फासे उलटे पडायला सुरुवात झाली, नाही?
नाही, खरा सेटबॅक बसला, तो दुबईतून परत आलो तेंव्हा! कशाला इंजिनिरींग सोडून टूरिझम मध्ये आलो? साला काय जॉब होता यार! आज पंचविस वर्षं झाली. चेज मॅनहॅटन ब्रॅन्डनेम होतं त्या काळी.. आपल्याबरोबरचे लोकं कधीच पार्टनर अन् डायरेक्टर झालेत.
सिमरनचा हट्ट का हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचं ग्लॅमर? हे एक पण - ती कधी देशाबाहेर रमली नाही. का? तिला कधी यूएसला रहायची स्वप्नं पडली नाहीत. खरं तर.. काय माहिती.
पण बॉस, लोकांना काय टूर्स दिल्यात आपण! स्लोवेनिया तर आपण ओपन केलाय इंडियन्सना, बॉस! तेव्हढं एक लफडं झालं नसतं तर.. तर आज कुठच्या कुठे असतो भई! कसा पाय घसरला.. पण तसा माझा मनावर ताबा कमीच होता. एवढं सगळं समोर होतं, तो मौसम, ती गुलाबी थंडी, ती… जाऊ दे, आठवणी नकोत त्याच्या.. धंदा बुडला. नाव खराब झालं, ते वेगळंच.
नंतर ते, ते रेझॉर्ट चांगलं चालायला लागलं तर इतकी कॉम्पिटिशन उभी राहिली की… कॉर्पोरेट फंडींगशी कॉम्पीट करना आसान नाही रे…
रिअल ईस्टेट झाली, फायनान्स झालं. शेअर ट्रेडिंग आहेच. हाय एन्ड कार्स विकल्या… धंदा म्हणून करायचा बाकी ठेवला नाही… पैसे मिळवले अन् गमावले. भिश्या काढल्या, फेडल्या. पण हातात काही राहिलं नाही, फार…
चलो ठीक है! असंही कोणाला घबाड ठेऊन जायचंय… जर पोरं बाळं झाली असती तर… आयुष्य बदललं असतं हे नक्की. पण मी घेतलेले डिसीजन्स बदलले असते? कौन जाने…
पण आपलं नशिब इतकं गांडू कसं की सालं एक पोर होऊ नये…
तिथे सिमरन खचली. तिला आपण हात देऊ शकलो नाय. खचली नाही, बदलली. एकदा पोर होत नाही हे नक्की झाल्यावर तिचा नूरच पालटला. छोड…
आम्ही बेस्ट फ्रेन्ड्स होतो, आणि तितकेच शत्रूही. फ्रेनेमी. उत्साहात, उमेदीनं काही तरी नवं सुरू करायचं. मग छोट्यामोठ्या गोष्टींवरून भांडायचं, कचाकचा… मग तोडायचं… आणि परत गळ्यात पडून रडायचं, आधाराला उभं रहायचं. काय रूटीन होतं यार, हेल…
तिचं जर सम्याशी जुळलं असतं तर? आज चेतनापेक्षा सुरेख दिसली असती, नाही? नक्कीच! सम्यानं सिमरनचा नाद सोडला. आणि मग चेतना त्याच्या गळ्यात पडली. साले हे गुज्जु लोकं चलाख असतात. काय पाहिलं असेल तिनं सम्यात? त्या वेळी काय होतं सम्याकडे? एक हुशार मुलगा, एवढंच. पण तरी त्याच्यावर दोनतीन जणी तरी फिदा होत्या, नाही का? सिमरननं त्याला झटकल्यावर चेतनानं बरोब्बर गटवला सम्याला. तिनं सम्यात स्पार्क बघितला, आणि लावली बोली. एक बिझनेस डील तिच्यासाठी, पण भलतंच प्रॉफिटेबल ठरलंय. अनलाईक सिमरन… घाटी सिमरनच्या नशिबी घाटा… फ*, डोन्ट गो देअर अगेन…
ती काय सज्जन, सात्विक, भोळी, पतिव्रता आहे काय? पतिव्रता सोड, तो विषय नाही. मी बोलायचा तर अजिबात नाही. पण सात्विक आणि भोळी तर नाहीच. होती एके काळी. काय पण ट्रान्स्फॉर्मेशन आहे, नाही? तोंडाला पावडर फासणे ही जिच्या लेखी मेकअपची परिसीमा होती, ती आज हजारो रुपये ब्रायडल मेकअपसाठी घेते?! अशी चार सलूनं चालवतेय! दररोज सारसबागेत दर्शनाला जाणारी, अन् संकष्टी-शनिवार उपास करणारी उमा, आता सिमरन बनून तंगड्या तोडते अन् नळ्या ओरपते. मीच कारणीभूत आहे ना या बदलाला?
सिगारेट संपलीए. डीजेचा आवाज वाढलाय… जायला पाहिजे.
मामा आलाच. आता हेच परावलंबी जिणं…
जबरदस्त उभे करता. वातावरण,
जबरदस्त उभे करता. वातावरण, व्यक्तिरेखा, मनोव्यापार सगळंच.
वाचतोय
पुढच्या भागांची लिंक देत चला
पुढच्या भागांची लिंक देत चला हो प्रतिसादात....
(No subject)
https://www.maayboli.com/node/87634