
पार्टीला उमानं हॉटेल गावाबाहेरचं निवडलं होतं. मी इथं पहिल्यांदाच येत होतो. दिसतंय टकाटक पॉश पण स्वस्तात मिळालं असावं. मी गाडी ड्राइव्हवेत थांबवताच वॅले पुढे आला. त्यानं दार उघडून चेतनाला उतरायला हात दिला. मी ऑडीच्या किल्ल्या वॅलेच्या ताब्यात दिल्या. तोवर दोन पायऱ्या चढून चेतना मागे वळली होती. डार्क पार्टी गाउनवर गळ्यातला ठसठशीत सॉलिटेअर उठून दिसत होता. आणि इअररिंग्ज. झिरझिरीत रॅपमुळे उघडे खांदे झाकले जाण्याऐवजी लक्ष वेधून घेत होते. बांधा सडसडीत, वर्ण गव्हाळ, त्वचा तजेलदार आणि शार्प फीचर्स - रेडी टू स्ले! पन्नाशीची, दोन मुलांची आई कुठे वाटत होती ती? पार्टीत आज कल्ला होणार हे तिच्या चेहेऱ्यावर लिहिलं होतं.
झटक्यात दोन पायऱ्या चढून मी वर गेलो. तिच्याभोवती उंची परफ्युमचा मंद सुगंध दरवळत होता. तिच्या हातात हात गुंफला. तत्क्षणी तिच्या चेहेऱ्यावर खुललेल्या स्मितानं जणू चांदण्याची पखरण झाली… आजकाल हे हास्य दिसणं मला महाग झालं होतं. अदबीनं दार उघडणाऱ्या दारवानाला स्विमींग पूलची दिशा विचारली. त्यानं निर्देश केलेल्या दिशेला निघालो. टकटक टक टक… तिचे हाय हील्स आणि माझे शूज त्या मार्बलवर वाजून प्रतिध्वनीत होत होते. माना वळवून आजूबाजूची लोकं आमच्याकडे बघत होती. आरशासारख्या चकचकीत लिफ्टच्या दारात मला माझी छबी निसटती दिसली. मॉडर्न डार्क रिम्ड चष्मा, अंगाजोगता काळा, हात दुमडलेला शर्ट, भारी जीन्स, ब्राऊन शूज. मॅच्युरिटी दाखवण्यापुरतेच पांढरे केस. आणि हो, मनगटावरचं रोलेक्स. येस, पुन्हा पुन्हा वळून बघावं अशीच जोडी होती आमची!
आऊटडोअर स्विमिंग पूल होता. मी चेतनासाठी दरवाजा उघडताच गरम हवेच्या झोताबरोबर दणाणतं म्यूझिक कानांवर आदळलं. समोरच पूलच्या दुसऱ्या टोकाला बार काउंटर होतं. आणि शेजारी हर्षद… व्हीलचेअरमध्ये?! चेतनानं तेंव्हाच पाहिलं असणार त्याला कारण, कारण तिच्या हाताची पकड जराशी घट्ट झाली. माझं आश्चर्य दडवून मी त्याला हात केला. त्यानंही… उठण्याचा प्रयत्न केला, पण क्षणातच त्यानं तो पवित्रा सोडून हात हलवला. त्याचा चेहरा मात्र उजळला होता! माझा हात सोडून चेतनानं त्याला हात केला आणि हाक दिली ‘हाय हर्षद!’ तोच दुसऱ्या कोपऱ्यातून उमाची हाक आली - ‘समीर - चेतना!’ कुठल्याशा घोळक्यातून निघून दोन्ही हात हलवत, हर्षवायू झाल्यासम उमा आमच्या दिशेनं धावत येत होती.
शी वॉज अ साईट फॉर सोअर आईज… ऑर ऍट लीस्ट शी ट्राईड टू बी… तिच्या वळणांना कसाबसा कह्यात ठेवणारा काळा सेक्वीनचा शॉर्ट ड्रेस, त्यावर चोकर. डोक्यावर रंगवलेल्या, फिस्कारलेल्या बटा. पायात व्हाईट प्लॅटफॉर्म हील्स, गोरापान वर्ण आणि वय झाकू न शकणाऱ्या मेकअपच्या थरांमधूनही उठून दिसणारे मोठे निळे-घारे डोळे!
तिनं जवळ येताच आमची गळाभेट घेतली, अगदी लगटून. मी डावीकडे, चेतना उजवीकडे. हे चाललं असताना चेतना म्हणाली, “हाईईई यू आर लुकींग सो गॉर्जस, उमे! हेय्य हॅप्पी बड्डे गं…”
उमा म्हणाली, “तू पण इतकी क्यूट दिसते आहेस ना…” मग त्यांनी गालाला गाल लावून अनेक चीत्कार काढले! तोपर्यंत मी जरा विलग होऊन उमाच्या खांद्यावर हात टाकला. तिला कवळून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि तिघांचंही तोंड हर्षदच्या दिशेनं फिरवलं. आम्ही तिघांनीही त्याला हात केला. त्यानंही प्रतिसाद दिला.
उमा माझ्याकडे पहात म्हणाली, “आहे बुव्वा समीर! आज अगदी ड्रेस-टू-किल का?!”
“मग माझ्या बायकोचा नवरा शोभायला नको का? तुझी बड्डे पार्टी आहे तर ती बघ कशी सजलीए!”
मान वेळावत चेतना म्हणाली, “मग तिनं सांगितलंच होतं की पार्टीची शान व्हायला पाहिजे! पण पार्टीची जान मात्र उमा तूच आहेस हं! चमचम करता है ये नशीला बदन…”
उमा चक्क लाजलीच, “एवढं काही नाही बर का…”
“बट यू आर लुकींग रॅव्हिशिंग टुडे! तुम्हारी त्वचासे उम्र का पताही नही चलता!”, मी म्हणालो.
सगळे हसले. “उगाचंच तू सगळ्यांना फिफ्टीएथ वगैरे सांगितलएस…”
“ए बास रे! खूप झाली लटकी कौतुकं!”
“लटकी कशाला, मनापासून म्हणतोय मी. तू सोडलीस तर बाकी आपल्या कॉलेज ग्रुपमध्ये सगळ्या आंट्या दिसायला लागल्यात”. चेतनाचा रोख माझ्याकडे वळतच होता, तोच उमा तिचा गालगुच्चा घेत म्हणाली, “ए, ही पण नाही दिसत हं”
“नाहीच दिसणार, बायको कुणाचीए?!”
“पण आहेत कुठे बाकी सगळे?” चेतना चिवचिवली.
“यायचेत. ए, तुम्ही चला नं, ड्रिंक्स घ्या. हर्षद तिथेच बसलाय खातिरदारी करायला”
माझा आवाज जरा बदलला, “बराय नं तो?” तिनं माझ्या डोळ्यांत पाहिलं.
“नाही म्हणजे, मी त्याला व्हीलचेअरमधे पहिल्यांदाच बघतोय…”
तिच्या चेहेऱ्यावरचा भाव बदलला. “होतात कुठे तुम्ही त्याला बघायला?”
पण निमिषमात्रात परत ती पार्टी मोड मध्ये गेली. “त्याला काय धाड भरलीये. तो रॉकिंग आहे! अं, जरा थकलाय एवढंच…”
तेवढ्यात कुणी नवे गेस्ट प्रकटले. उमाचं लक्ष तिकडे गेलं. त्यांना हात करता करता, तिनं चेतनाचा हात पकडून तिला ओढलं, आणि मला म्हणाली, “जा, जा वाट पहातोय तो. चेतना, तू चल गं माझ्या बरोबर…”
मधे मधे येणाऱ्या फिंगर फूड आणि मॉकटेल्सवाल्या वेटरांना नकार देत, कुणा ओळखीच्याशी एखादं वाक्य बोलत वाट काढत मी हर्षदच्या दिशेने निघालो. तोच त्याची व्हीलचेअर ढकलत कुणी तरी त्याला बहुतेक वॉशरूमकडे न्यायला लागलं. मी बारपाशीच थांबलो. सवयीनं बारकडे नजर टाकली. सिंगल माल्ट नव्हती. बाकीही जरा कच्चे लिंबू ऑप्शन होते. गरमीचा मौसम बघता मी बीयर उचलली. म्युझिक ठणकतच होतं. पूलच्या परिघापलीकडे दरी होती. त्यातनं झाडं डोकावत होती. दूर शहराचे दिवे दिसत होते. बीयरचा घोट घेऊन तिला कठड्यावर ठेवले. कठड्याला पाठ देऊन मी पार्टीचा नूर न्याहाळू लागलो. अजून पार्टीला रंग चढायचा होता. मंडळी हळू हळू उगवत होती. आमचा कॉलेजचा ग्रूपच अजून आला नव्हता तर काय. बाकी मंडळी उमेच्या उद्योगांमधली दिसत होती. हर्षदच्या नसावीत. पण आता तो काय करतो माहित नव्हते. कॅन्सर व्हायच्या अगोदर त्याचं हाय-एन्ड सेकंडहॅन्ड कार खरेदी-विक्रीचं काम होतं. काय काय उद्योग केलेत त्यानं तरी…
हर्षद माझा कॉलेजमधला दोस्त. आणि प्रतिस्पर्धी. पण ते नंतर. आधीची आमची दोस्ती. आमचं कॉलेज कॅम्पातलं. आता तिथे मी कसा पोहोचलो ही वेगळीच कथा. हर्षद दिल्लीहून आला होता. त्याचे वडील आयएएस. कमिश्नर वगैरे. त्याचे माझे बाबा एका वाड्यातले, लंगोटीयार. म्हणून तो शिकायला इथे येणार म्हटल्यावर काकांनी माझं कॉलेज कोणचं हे विचारून त्याची ऍडमिशन तिथेच करून दिली. मी मध्यमवर्गी पुणेरी, आणि हा गब्रू दिल्लीकर. दिसायला हिरो. अमीर खान झक मारेल असा चिकना. तर मी चस्मिष्ट घासू. म्हणून, माझं आपलं मराठी मराठी गावातली ठराविक लोकं जमवून घाटी मंडळ, तर हा सगळ्या कॅम्पवाल्यांना पुरून उरणारा. पण दिलदार इसम. खिसा कायम गरम, त्यामुळे आजूबाजूला मुंगळे जमायला काय लागतंय? त्यात त्या कॅम्पातल्या मुली, त्यांच्याशी तर याची खास दोस्ती. याचं शेपूट मी. म्हणजे या सगळ्या कॉस्मो ग्रुपांमध्ये मला खेचत घेऊन जायचा. हं, फायदा झाला म्हणा त्याचा. नाही तर पार गावठी राहिलो असतो.
पण हर्षदचं शेपूट ही माझी ओळख फार टिकली नाही. हा चश्मिष्ट घासू एक ब्रिलियंट रॅन्कर आहे हे पहिल्या दोन वर्षांतच सगळ्यांच्या लक्षात आलं. मग कॉलेजमधली उरलेली दोन वर्षं माझी होती! तसाच बदल उमामध्ये झाला होता. लक्षणीय, आकर्षक, आश्चर्यकारक! हो, उमा आमच्याच कॉलेजला होती, आमच्या बरोबरच. कॉलेज सुरू होतानाची दोन वेण्यावाली काकूबाई फायनल ईयर चालू झालं तोपर्यंत फ्रेनी डिसूझाच्या अल्ट्रामॉडर्न ग्रुपमध्ये बेमालूम मिसळून गेली होती! त्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून रोझ डे क्वीन झाली होती. नऊवार ते स्लॅक्स व्हाया स्लॅन्ग असा फिशपॉन्ड पडला होता तिला. मग हर्षद तिच्यावर भाळला यात नवल काय? त्या वर्षी हर्षद जी. एस. होता! नवल यात होतं, की मी तिच्यामागे वेडा झालो होतो!! होय ती पण पहिल्यांदा माझ्यावर भाळली होती…
—
काजव्या आला. त्याच्या एंट्रीलाच टाळ्या पडल्या. तरूण तुर्क म्हातारे अर्क मधले प्रो बारटक्के आठवताहेत का? तोच पेहेराव. डोक्यावर एक स्टायलिश हॅट, थोड्या आखूड पॅन्टमधे खोचलेला शर्ट, आणि सस्पेंडर्स. आणि कमी पडायला नको म्हणून हातात गुलाबाचं फूल… अवतार होता. पण आमच्या ग्रूपमधला एकुलता एक बॅचलर म्हणून त्याला सगळा आचरटपणा माफ होता! त्यात उमा त्याची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. आणि लांबची बहिण. त्याची आणि उमाची भरतभेट घडली. त्यानं तिला गुलाबपुष्प देताना काय बडबड केली कोण जाणे, पण तिनं त्याच्या टाळक्यावरची हॅट काढून त्यालाच मारायला सुरवात केली. अर्थात हे सगळं खेळीमेळीत चाललं होतं. तो धावत पुढे आणि ती मागे. बाकी पब्लिक टाळ्या ठोकतंय… मग तो उमाच्या आईच्या आश्रयाला गेला, तेव्हा उमानं त्याला सोडलं! कितीही मोठे झालो तरी हा बालिशपणा कुठे तरी त्या नात्यांमधले तरूणाईतले बंध दाखवतो. निजशैशवाला जागं करतो…
काजव्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्यानं उमेच्या आईची कास सोडून माझी वाट पकडली. पण मी काकूंना भेटलोच नव्हतो, म्हणून काजव्याला हात करत मीच तिकडे निघालो. अर्थात, बीअर मागे सोडून! त्यांच्यासमोर दारू घेऊन जाण्याइतकी लाज सोडली नव्हती अजून… काकूंना आज किती वर्षांनी बघत होतो. त्यांनीही चटकन ओळखलं. ख्यालीखुषाली झाली. काजव्या मधेमधे उगा फुसकुल्या सोडत होता. मग काकूंनीच त्याला जामला, “सुहास रे, किती अगोचरपणा करशील? मोठा हो की जरा आता…” आता काकू उपदेशपांडे मोडमध्ये जाणार या शंकेनं मी घाईघाईनं त्यांना म्हटलं, “काकू, या वात्रट कार्ट्याला तहान लागली असणारै. मी त्याला रंगीत सरबत पाजतो नाही तर हा असाच त्रास देत राहील…” त्याचाही चेहेरा उजळला. लगबगीनं बार कौंटरकडे जाताना तो माझ्या पाठीत गुद्दा घालत म्हणाला, “वाचवलंस सम्या मला आत्ता. नाही तर मामीचं लेक्चर ऐकावं लागलं असतं”
मी गडगडाटी हसलो. “तुला नाही तिथे तोंड घालायची हौसै…”
“तू कधी आलास? आणि चेतना कुठाय?”
“ती काय उमाबरोबरच आहे की. तुला उमेच्या हातचा मार खायची हौस आली होती… तू ग्लास भर मग जाऊ तिला भेटायला.”
“तू काय घेतो आहेस?”
“बीअर”. त्याच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे बघून मी म्हणालो, “गर्मी कितीए साल्या…”
“मग मी पण बीअर घेतो”, म्हणून तो बारमनशी बोलायला लागला…
मी माझी बीअर उचलायला कठड्याकडे गेलो. काजव्या - दिवसभर झोपणं आणि रात्री आमच्या झोपा खराब करत हिंडणं, या त्याच्या कॉलेजमधल्या स्वभावानं त्याचं नामकरण झालं होतं काजव्या. आमच्या काजव्याची बुद्धी आणि खऱ्या काजव्याचा प्रकाश - हिशोब तोच! पण आत्यंतिक उचापती माणूस. त्यामुळे कॉलेजमधे हर्षदचा उजवा हात. आयुष्य दोघांनी उचापतींमधेच घालवलं. बॅचलर होता. खरं तर घटस्फोटित. पण… जाऊ द्या. ती वेगळी कथा.
“हा हर्षद कुठे आहे? दिसत नाहीये…” येता येताच त्यानं विचारलं.
“होता इथे. पण वॉश रूमला गेला असावा. माझी पण भेट झाली नाही अजून”
विषय हर्षदकडे वळल्यानं मी त्याला विचारलं. “कसा आहे रे तो?”
काजव्यानं उत्तर दिलं नाही.
“व्हीलचेअरवर दिसला. मला माहित नव्हतं रे”
काजव्या माझ्याकडे बघत म्हणाला, “मित्राची खबरबात ठेऊ नका. मैत्रीची चाड नाही तुला!”
मामला सिरियस होत होता. “काजव्या, उगाच फालतू टॉन्ट नकोत. सांगायचं असेल तर नीट सांग नाही तर गेलास भोकात…”
तो तडक लायनीवर आला. “डॉक्टरांनी सहा महिने सांगितले आहेत. त्यानंतरचा प्रत्येक दिवस बोनस. मॅक्स दोन वर्षं.” त्यानं तोंड फिरवलं.
मामला गंभीर होताच. “त्याला कल्पना आहे?”
“आम्ही सांगितलं नाहीये पण…” एका पॉझ नंतर तो म्हणाला, “त्याला कल्पना असणारए”.
दोन मिनिटं कोणीच बोललं नाही. डीजे, लोकांची उच्चैरवात चाललेली संभाषणं, शेजारी कौंटरवर बाटल्यांचे आणि ग्लासांचे आवाज यापलिकडे एक निर्मम शांतता दाटली होती.
“अरे, ती बघ चेतना! कसली क्यूट दिसतेय… लकी आहेस साल्या. चल जाऊ तिकडे”, काजव्यानं शांततेचा भंग केला. ती, उमा आणि इतर काही जणी आता डिजेवर घुमायला लागल्या होत्या.
त्या गोंधळात स्विमिंग पूल पार करताना डोक्यात एकच विचार होता. मृत्युदंड ठोठावलेल्या कैद्याला या उरुसाचं काय वाटत असेल? कुठे गेलाय हा हर्षद?
अरे व्वा, नवीन कथा सुरू.
अरे व्वा, नवीन कथा सुरू.
चित्रदर्शी लिहिता तुम्ही.
मस्त सुरुवात.
मस्त सुरुवात.
उच्चभ्रू वातावरण मस्त रंगवलय.
उच्चभ्रू वातावरण मस्त रंगवलय. ग्लॅमरस. आता हे ग्लॅमर म्हणजे फसवी चकाकी ठरते की खरे सोने ते कळेलच.
पण कथा वाचताना मला अस्वस्थ वाटते का माहीत नाही.
छान सुरुवात!
छान सुरुवात!
छान सुरुवात..
छान सुरुवात..
आणि चपखल वातावरण निर्मिती..
चित्रदर्शी लिहिता तुम्ही.
चित्रदर्शी लिहिता तुम्ही.+११११
(No subject)
भाग २