खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती.
ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे.
इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता.
वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती.
लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे. हौदात आज पाणी असेल की नाही, हा प्रश्न नव्हता; तो अंदाज होता—आणि बहुतेक वेळा तो चुकीचाच ठरायचा.
हौद कोरडा असला की तिला कुठल्यातरी शेतमालकाच्या बोअरवेलकडे जावं लागायचं. तिथेही ती आधी आवाज द्यायची नाही. गप्प उभी राहायची. कुणी पाहिलं, तरच पाणी. ते मिळालं, तर हंडा भरून; नाही तर रिकाम्या हाताने परतताना तिची नजर गावाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीकडे जायची. तिच्या दगडी कडा, खोल तळ, कायम थंडगार पाणी. त्या विहिरीत पाणी होतं; पण लक्ष्मीकरता ती विहीर पाण्याची नव्हती. ती एका अदृश्य कुंपणाची मर्यादा होती—आपण कुठपर्यंत, ते कुठपर्यंत.
राजू मस्के रोज मालकाकडे पडेल ते काम करायचा—कधी खड्डे खोदायचा, कधी जनावरांचे शेण काढायचा, कधी दुसरं काही. अंगमेहनत चुकत नसे. घाम गळायचा. दुपारी तहान लागली की तो शेतावरच्या हंड्याजवळ जाई. मालक म्हणायचा, “तुझ्यासाठी वेगळा आहे.” पाणी तेच असायचं, पण फुटक्या पेल्यातून पिताना कधी कधी राजूला ते घशात अडकल्यासारखं वाटायचं.
संध्याकाळी राजू परत आला तेव्हा सावित्री वहीत काहीतरी लिहीत होती. ती नेहमी लिहायची—कधी अर्ज, कधी नोंद, कधी फक्त तारीख.
“काय लिहितेस?” राजूने विचारलं.
“आज कुठे पाणी मिळालं, कुठे नाही,” ती म्हणाली.
“कशासाठी?”
ती थांबली. शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली, “आठवण राहते.”
सावित्री शिकलेली होती. गावात याचा अर्थ होता—जास्त प्रश्न. लोक तिला घाबरत नव्हते, पण टाळत नक्कीच होते.
ग्रामपंचायतीची निवडणूक लागली तेव्हा महामानवाच्या भीम प्रयत्नांमुळे मिळालेल्या आरक्षणामुळे दलित वॉर्ड तयार झाला. “नावापुरतं,” लोकं म्हणाली.
सावित्री उभी राहिली. तिने कुणाच्याही दारात जाऊन मत मागितलं नाही. ती फक्त विचारायची—“तुला रोज काय लागतं?”
“पाणी,” लक्ष्मी म्हणाली.
“इज्जत,” राजू म्हणाला.
शांता आजी म्हणाली, “मरायच्या आधी काहीतरी बदल पाहायचं आहे.”
सावित्री निवडून आली.
ग्रामसभेत तिला बसायची जागा न दाखवून सभेतील तिची जागा दाखवली गेली. कधीतरी तीच्या तीच कोपऱ्यातली एक खुर्ची ओढून त्यावर बसली. रस्ता, दिवे, सण, सत्कार —सगळे मुद्दे झाले. पाणी नाही. तो त्यांच्या लेखी मुद्दाच नव्हता.
तिने तो ठरावाच्या स्वरूपात मांडला तेव्हा हसू आलं सर्वाना.
“परंपरा आहे.”
“तेढ निर्माण करू नका.”
ती शांतपणे म्हणाली, “तेढ आधीच आहे. फक्त ती आमच्या सोशिकपणाने दिसून येत नाही. रोजच्या भाकरीच्या प्रश्नाने ती बाजूला पडते.”
ठराव बहुमताने फेटाळला गेला.
त्या रात्री वस्तीत लोक जमले. कुणी घोषणा दिली नाही.
राजू म्हणाला, “आपण विहिरीवर गेलो तर?”
हा प्रश्न नवीन नव्हता. पण आज तो भीतीचा वाटला नाही.
वस्ती पहाटेच विहिरीकडे निघाली.
पहिला हंडा खाली गेला. दोरीचा आवाज झाला. पाणी वर येताना ठक् असा आवाज आला—विहिरीतला नव्हे; आत कुठेतरी तुटलेला.
लक्ष्मीने पाणी हातात घेतलं. ते थंड होतं. पण तिच्या हाताला कंप आला. तिला कळलं—हे पाणी नाही, हा निर्णय आहे.
वाद झाले. आवाज वाढले.
पोलीस आले. त्यांनी थेट सावित्रीला पकडलं.
“तुमच्यामुळे?”
“नाही, गावातल्या परंपरेमुळे” ती म्हणाली.
तिला अटक झाली.
दुपारीच चावडीवर नोटीस लागली. गावाच्या शांतता आणि सौहार्दतेसाठी विहीर वस्तीसाठी बंद. सायंकाळी जाळी आली. कुलूप लागलं.
त्या रात्री वस्तीवर कुणीच झोपलं नाही.
पहाटे लोखंड तुटण्याचा आवाज झाला. कोण पुढे, कोण मागे—कुणालाच माहीत नव्हतं. कुलूप फुटलं.
लाठीचार्ज झाला. राजू पडला. लक्ष्मीचा हंडा फुटला. शांता आजी ढकलली गेली.
पाणी सांडलं. माती ओली झाली.
लोक त्या ओल्या मातीत उभे राहिले—पहिल्यांदाच न घाबरता.
नंतर गाव शांत झालं. विहीर वस्तीसाठी उघडली गेली नाहीच. परंपरेने माणुसकी पाळायची परंपरा कधीच नव्हती.
पण राजूने दुसऱ्या दिवशी “वेगळा हंडा” नाकारला. त्याला काम मिळालं नाही. तो संध्याकाळी वस्तीत परत आला, रिकाम्या हाताने. पण ताठ मानेने.
लक्ष्मीला आता पाणी मागावेसे वाटेना.
शांता आजी कुलूपाकडे पाहून म्हणाली, “विसरणार नाही.”
सावित्री जामिनावर परत आली. त्या दिवशी कुणी बोअरवेलकडे गेला नाही.
वस्तीच्या दुसऱ्या टोकाला शांता आजी थांबली. तिथेच सगळे कचरा टाकायचे.
“इथेच.” ती म्हणाली.
टिकाव आणि फावड्याचा पहिला घाव पडला. माती कडक होती. हात दुखले. पण त्या हातांना मेहनतीची सवय होती. ना थांबणारी, ना मागे हटणारी.
काम करताना लक्ष्मी म्हणाली, “आपल्या वस्तीत येणारा रस्ता किती अरुंद आहे.”
राजू म्हणाला, “आता तो तसा दिसतोय.”
पाणी लागलं. गढूळ. पण स्वतःचं. वस्तीत बोर्ड लावला गेला:
“पाणी ही देवाची देण आहे.
हत्यार नाही.”
कोणीतरी त्या खाली कुंपण काढून त्यावर फुली मारली.
गावाच्या मध्यातली विहीर अजूनही कुलूपबंद होती. लोकांची ये-जा वाढली. गाव अस्वस्थ झालं. वस्तीचा सवर्ण सेव्हिएर कॉम्प्लेक्स उद्वस्थ होताना पाहणं काहींच्या उरात धडकी भरवत होतं. त्यांची प्लांनिंग सुरु झाली होती.
सावित्रीने वही उघडली. जुन्याच पानावर लिहिलं: “आज जिथे विहीर आहे, तिथे नकाशात काहीच नाही.”
मोजणी होणार होती. नोटीसा येणार होत्या.
“घरं मोजणार म्हणे,” कुणीतरी सांगितलं.
शांता आजी हसली. “घरं नाही मोजता येत. ती उभी राहतात.”
सायंकाळी लोक नवीन विहिरीजवळ बसले.
त्यांचं पाण्याचं कुंपण तुटलं होतं. पुढचं कुठलं, हे माहीत होतं. चर्चा त्यावरच होणार होती.
मस्त लिहिली आहे. आवडली.तेढ
मस्त लिहिली आहे. आवडली.
तेढ आधीच आहे. फक्त ती आमच्या सोशिकपणाने दिसून येत नाही. परफेक्ट!
कथा आवडली.
कथा आवडली.
>>तेढ आधीच आहे. फक्त ती आमच्या सोशिकपणाने दिसून येत नाही. >> अगदी अगदी!
खूप छान लिहिलं आहे. लेखनात लय
खूप छान लिहिलं आहे. लेखनात लय आणि एकप्रकारचा नाद जाणवला आणि त्यातून गरिबीतली खडतर जीवनशैली आणि वेदना व्यक्त होते आहे.
>>>>>तेढ आधीच आहे. फक्त ती
>>>>>तेढ आधीच आहे. फक्त ती आमच्या सोशिकपणाने दिसून येत नाही. रोजच्या भाकरीच्या प्रश्नाने ती बाजूला पडते.

कथा वाचून वाईट वाटते.
फार छान. खूप दिवसांनी काही
फार छान. खूप दिवसांनी काही सकस वाचायला मिळाले.
खुप दिवसांनी मायबोलीवर आले
खुप दिवसांनी मायबोलीवर आले आनि हे वाचायल मिळाल. आवडल.
सुंदर कथा.
सुंदर कथा.

यावर एक छान एकांकिका लिहिता येईल. कॉलेजच्या स्पर्धेत बसवायला योग्य अशी!
वावे, स्वाती२, सानी, धनश्री-,
वावे, स्वाती२, सानी, धनश्री-, मनिम्याऊ, अंकु आणि स्वानंदी१ आपल्या प्रतिसादासाठी अनेक आभार !
खूप छान
खूप छान
लेखनात लय आणि एकप्रकारचा नाद
लेखनात लय आणि एकप्रकारचा नाद जाणवला >>> १००% सहमत... १००% सहमत, छान लिहिलेय.
आवडली कथा.
आवडली कथा.
आवडली कथा!
आवडली कथा!
शेवट जरा समजला नाही...
दगडी चिऱ्यासारखी आकबंद
दगडी चिऱ्यासारखी आकबंद शब्दांची ठोक भाषा ... थेट घाव घातल्यासारखी !!
शेवट मात्र अधांतरीच ठेवल्यासारखा वाटतोय .......
खुपच छान मनाला भिडणारी !
खुपच छान
मनाला भिडणारी !