नववर्षाच्या स्वागताला पुणे मुंबई एक्स्प्रेस वर ४५ किमीची कोंडी

Submitted by राज अज्ञानी on 7 January, 2026 - 09:31

एक दूरचे ओळखीचे गृहस्थ सांगत होते कि ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी मुंबई पुणे एक्स्रेस वे जाम झाला होता. गुगल मधे मुंबई पुणे ट्रेफिक जाम / वाहतूक कोंडी असे की वर्डस सर्च म्हणून दिले कि दिसते कि पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. पण नववर्षाच्या स्वागताला एव्हढा मोठा प्रकार झालाय यावर विश्वास बसला नाही. कारण कुठेही यासंबंधाने ( मला तरी) ऐकू आले नाही कि वाचनात असे काही आले नाही. कुणाचाच विश्वास बसला नाही. कारण जर कुठे बातमी नाही तर यांना ४५ किमी जाम आहे हे गाडीत बसून कसे समजले हा प्रश्न होता. पण ते म्हणाले कि गुगल मॅप वर रांगा दिसत होत्या आणि त्यांनी एका पोलिसाला पण विचारले होते.

ओळखीच्या लोकांना फोन वर विचारले तर कुणालाच काही माहीती नाही. उत्सुकतेने सर्च दिला तर २०२५ च्या ऑगस्ट पासूनच्या मागे खूप बातम्या आहेत. एक गोष्ट लक्षात आली जेव्हां जेव्हां लाँग वीकेण्ड येतो तेव्हां जाम होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. पण कॅलेंडर घेऊन बघा. अधून मधून सुद्धा जाम असतोच. इतकेच कि खूप वेळ नाही. खूप वेळ म्हणजे सहा तास वगैरे. एका युट्यूब पोर्टलने ही बातमी सविस्तर दिली आहे. म्हणजे एका ओळखीच्या गृहस्थाने सांगितले आणि त्याला दुजोरा देणारे एक युट्यूब पोर्टल. फारसा विश्वासार्ह मामला वाटणार नाही. ही घटना खरी / खोटी हे बाजूला ठेवूयात. कारण अगदीच अशक्य गोष्ट नाही ही. त्या पोर्टलची लिंक. त्यातली काही माहीती इथे घेतली आहे. टिपून घेतली नाही. त्यामुळे थोड्या चुका असतील.

हा इश्यू खरं तर करंट अफेअर्सचा आहे. पण विचार केला तर महत्वाचा पण आहे. जुना पुणे मुंबई महामार्ग ४८ तास जाम झाला होता तेव्हां या महामार्गाची घोषणा झाली होती. आता हा ही जाम होत असेल तर मग काय करणार ? आता तिसर्‍या महामार्गाची घोषणा झाली आहे. मिसिंग लिंकची घोषणा झाली आहे. पण हे किती काळ पुरे पडणार हा प्रश्न आहे.

पुण्यात दुचाकींनी २०२५ या सालातही विक्रम मोडला आहे. पुन्हा एकदा देशात दुचाकींच्या सर्वाधिक खपाचे हे शहर झाले आहे. एकूण २२ लाख दुचाकी खपल्या आहेत (चु भू दे घे). जीएसटी सवलतीनंतर चार चाकीही तुफान खपल्या आहेत. संपूर्ण देशातच तडाखेबंद विक्री झालेली आहे. पुण्यात खप होण्याचे कारण म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव. लोकांना रोजच्या जाण्यायेण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून राहता येत नाही. हा शहरांतर्गत प्रॉब्लेम आहे. मेट्रो आहे पण ती बहुसंख्य लोकांना गैरसोयीची आहे. पूर्ण नेटवर्क व्हायला दहा वर्षे लागतील पण त्याआधीच पुण्याची बेफाट वाढ सुसाट सुटली आहे. ती थांबवण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. सर्वत्र बेकायदेशीर गुंठे पाडून विक्रीचे लोण आले आहे. नवीन रिंग रोडचे काम सुरू व्हायच्या आधीच त्याच्या आजूबाजूला बेकायदेशीर स्कीम्स, प्लॉट्स पाडणे झाले आहे.

इथे रहायला आलेले लोकसंख्येत आणखी भर घालणार आहेत. त्यामुळे मेट्रो तुडूंब वाहणार. तिची पीएमटी होणार आहे. मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

ही वाढलेली लोकसंख्या वीकेण्डला किंवा एरव्हीही फिरायला जाणारच. कारण आता गाडी प्रत्येकाकडे अनिवार्य आहे. मग पुन्हा हायवे ब्लॉक होत राहणार.

यावर पर्मनंट सोल्युशन काय ?
निवडून दिलेल्ञा राज्यकर्त्यांची बुद्धी पुरेशी नाही किंवा इच्छाशक्तीच नाही. ते विपदा मे संपदा बघत असतात. जेव्हढा जाम लागेल तेव्हढा महागडा प्रोजेक्ट आणायचा.

याने समस्या सुटतील असे वाटते का ?
कदाचित बिनखर्चाचे / कमी खर्चाचे सोल्युशन असू शकते. पण त्यासाठी राज्यकर्त्यांमधे इच्छा असायला हवी.

इथे कुणाला सुचतेय का असे सोल्युशन ?

संदर्भ :
१. https://www.youtube.com/watch?v=x3wkC60JpuE

२. https://www.loksatta.com/pune/mumbai-pune-expressway-traffic-jam-lonaval...

३. https://dainikmaval.com/traffic-jam-on-mumbai-pune-route-due-to-tourists...

४. https://news18marathi.com/photogallery/pune/mumbai-pune-expressway-traff...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे व मुंबईत नवीन बांधकाम व नवीन उद्योग यासाठी परवानगी देणे बंद करणे व सध्या आहे त्यांना विस्तार करण्यासाठी परवानगी न देणे. असा एक उपाय असू शकतो. अर्थात राजकारणी याला मान्यता देणार नाहीत ही गोष्ट वेगळी.

वाहतूक पोलीस या पूर्वी लॉन्ग वीकएंडला अवजड वाहतूक बंद करत असत आणि रात्री सोडत असत. पण यावेळी असे अजिबात केले नाही. ४-५ किमी रंग होत्या, ४५ किमी अतिशयोक्ती आहे. मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गच ९४ किमीचा आहे. दोन्हीबाजूने वाहतूक कोंडी धरली तरी २२-२३ किमी होतात, ते पण खूप जास्त आहे.
अवजड वाहने घाटातील रस्त्यावर सगळ्या लेन अडवून चालतात आणि त्यामुळे सगळेच अडकतात. त्यांच्यावर अंकुश आणणे गरजेचे आहे. मिसिंग लिंक चालू झाल्यावर घाटात तर जात येईल का हा प्रश्न अवजड वाहतूक करणाऱ्या गाड्या उभा करणार आहेत. आणि हे सगळे होत असताना वाहतूक नियंत्रण करायला खूप पोलीस दिसले नाही. या मार्गावरून प्रत्येक आठवड्याला प्रवास होत आहे, पण प्रत्येक वेळी घाटात ट्रॅफिक असते, तुम्ही कुठल्याही दिशेने आणि कुठल्याही वेळी. मंगळवार, डिसेंबर ६ ला रात्री १ वाजता पण घाट जाम होता आणि जुन्या रस्त्यावरून गाड्या जाण्याकरता पोलिसांना पैसे देऊन उलट दिशेने जात होते.
लोक गाड्या घेऊन बाहेर पडणार, पण वाहतूक पोलिसांनी जर अवजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवले तर काही प्रमाणात सगळ्यांना (कार आणि अवजड वाहन चालक) त्रास कमी होईल.

फिरायला जायचे फॅड आहे लोकांमध्ये.
जो फिरतो तोच खरे आयुष्य जगतो असा काहीसा समज झाला आहे आजकाल लोकांमध्ये.
स्वतंत्र लेखाचा विषय आहे. घेतो कधीतरी...

ज्या सुट्यांना जास्तीत जास्त लोक स्वतःच्या गाड्या काढून बाहेर पडतात त्या दिवशी हायवेवर पोलीस उभे करून जबरी दंड ठोका.
एव्हढी वसुली करा कि कार सोडून देऊन घरी जावंसं वाटेल. पन्नास हजारच्या खाली पावतीच फाडू नये.

>> मिसिंग लिंक चालू झाल्यावर घाटात तर जात येईल का हा प्रश्न अवजड वाहतूक करणाऱ्या गाड्या उभा करणार आहेत.
एका कॅब चालकाच्या माहितीनुसार मिसिंग लिंक वर फक्त लहान गाड्यांनाच परवानगी असेल. अवजड वाहतूक करणाऱ्या गाड्या जुन्या म्हन्जे सध्याच्या घाटातूनच जातील

रस्ते रुंद केले की गर्दी कमी होते, हे खरंच आहे की आपला भ्रम?
नवीन रस्ते योजनांमुळे तुमचा प्रवास सुखाचा होतो आहे का?
Flyover बांधल्याने traffic कमी झाले आहे का?
हा खरंच विकास आहे का फक्त कंत्राटदारांच भलं करणारी सिस्टीम?

https://www.youtube.com/watch?v=3xDqYLeE1c0