मराठी चित्रपट – क्रांतीज्योती विद्यालय

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2026 - 09:54

क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम

ज्यांना पानभर पोस्ट वाचायचा कंटाळा असेल त्यांना सुरुवातीलाच थोडक्यात सांगतो, पिक्चर मस्त टाईमपास आहे. शेवट मनाला भिडणारा आहे. एका प्रश्नाकडे लक्ष वेधणारा आहे.
जर तुम्ही थिएटरची पायरी चढावी की नाही याबाबत साशंक असाल तर बिनधास्त माझ्या गॅरंटीवर बघायला जा. म्हणजे नाहीच आवडला तर खुशाल या पोस्टवर येऊन मला चार शिव्या हासडून हलके व्हा. पण त्याची शक्यता कमीच आहे. कारण आमच्या थिएटरमध्ये सगळी पब्लिक एन्जॉय करत होती. शेवटी चार टाळकी तर "जय महाराष्ट्र" घोषणा देऊनच उठली. या नवी मुंबईची पब्लिक थोडी वेगळीच आहे. पण याचा अर्थ चारच जण चित्रपट बघायला होते असे नाही, तर शो हाऊसफुल होता. यासारखे अजून रिव्ह्यू पडतील तसे अजून काही आठवडे शो असेच हाऊसफुल जातील.

तर आता परीक्षणाकडे वळूया,

मी बोलतो मराठी, मी लिहितो मराठी, मी वाचतो मराठी... मी तर जगतो मराठी!
मी थिएटरमध्ये जाऊन आवर्जून, पिक्चर सुद्धा बघतो मराठी. कारण मराठी भाषेच्या प्रसाराचे एक महत्वाचे माध्यम वाटतात मला मराठी चित्रपट. त्यामुळे "मराठी शाळा वाचवा आणि मराठी भाषा जगवा" असा संदेश घेऊन येणारा "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" चित्रपट मला पहिल्याच आठवड्यात बघायचाच होता.

झिम्मा आणि फस्सक्लास दाभाडे सारखे चित्रपट बनवून हेमंत ढोमेने अपेक्षा वाढवल्या होत्या. तसेच कलाकारांची जवळपास तीच टीम बघून त्या पूर्ण होणार याची खात्री सुद्धा होती. आणि अगदी तसेच झाले.

चित्रपटाची सुरुवात कोकणातला एखादा एरियल ड्रोन शॉट घेऊन करणे हे जणू अनिवार्य आहे हल्ली. तसेच अध्येमध्ये कोकणातले छान छान लोकेशन टिपून दाखवायचे. त्यामुळे थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायला आल्याचा निर्णय योग्य आहे असे इम्प्रेशन तयार होत असावे. अर्थात तक्रार काही नाही. कोकणाचे हे रूप आवडतच आहे Happy

तर आपली मराठी शाळा बंद होतेय म्हणून मुख्याध्यापक सचिन खेडेकर यांच्या विनंतीला मान देऊन शाळेला शेवटचा निरोप द्यायला आणि जुन्या मित्रांसोबत एक गेट टुगेदर करायला शाळेचे माजी विद्यार्थी जमतात. त्यांनी उगाळलेल्या आठवणींमुळे चित्रपट सुरुवातीपासूनच आपल्याला देखील दर दृश्यागणिक नॉस्टेलजिक करत सुटतो. मग आपली शाळा कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातील आहे की मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातील याने काही फरक पडत नाही.

कारण शाळेतल्या मित्रांचा ग्रुप, त्यांच्यासोबत केलेले कांड आणि किडे, त्यात एखादी आवडणारी मैत्रीण आणि तिच्या नावावरून चिडवणे.. आवडते शिक्षक, आवडत्या बाई, त्यातही कोणी चांगले शिकवते म्हणून आवडीचे, तर कोणी छान दिसते म्हणून आवडीचे.. शाळेत केलेल्या कविता आणि बोर्डावर लिहिलेले सुविचार, कुठेतरी आपणच पेन वापरून रंगवलेल्या भिंती आणि कर्कटक वापरून कोरलेले लाकडी बाक.. शाळेतले लक्षात राहिलेले शिपाईमामा, शाळेबाहेरच्या चिंचबोराच्या टपऱ्या आणि वडापावच्या गाड्या, शाळेचाच गणवेश शिवणारा टेलर.. मधल्या सुट्टीत एकत्र शेअर करून खाल्लेले डबे, शाळा सुटल्यावर मित्रांसोबत पडून राहायचे अड्डे, मित्रांसोबतच्या वार्षिक सहली.. हुशार मुलांचे वेगळे ग्रुप तर बॅकबेंचर मुलांचे वेगळे आणि त्यांची एकमेकांबद्दलची मते, मित्रांमध्ये एकमेकांना अगदी त्यांच्या तीर्थरूपांच्या नावाचाही उद्धार करत चिडवणे आणि ज्याचा कोणालाही राग न येणे, तर दुसरीकडे एखाद्याला त्याच्या परिस्थितीवरून किंवा व्यंगावरून त्या न कळत्या वयात अजाणतेपणी चिडवून दुखावणे.. मित्रांशी भांडणे आणि पुन्हा एकत्र येणे.. मित्रांसोबत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईच्या हातचे आवडीने खाणे आणि ती चव देखील कित्येक वर्षांनी लक्षात असणे.. सगळे काही फार खुसखुशीत आणि विनोदी पद्धतीने दाखवले आहे. सारेच काही रिलेट होते.

पूर्ण चित्रपटभर लोकं हसायचे थांबत नव्हते. आणि यापैकी सत्तर टक्के हश्या एकटा अमेय वाघ वसूल करत होता. तो आणि त्याच्या मुलाचा ट्रॅक फारच मस्त जमला आहे. एखाद्या बोलीभाषेची बेअरिंग अचूक पकडणे हे त्याने आधीही केले आहे आणि हे तो नेहमीच कमाल करतो. या चित्रपटात त्याने आगरी भाषेत धमाल केली आहे.

तर अशा सगळ्या जुन्या आठवणी उगाळत शाळामित्रांच्या सहवासात असताना अचानक त्यांना जाणीव होते की ज्या शाळेने आपल्याला या आठवणी दिल्या, आपल्याला घडवले, आजची आपली ओळख जिने बनवली तिचीच ओळख आज कायमची मिटली जाणार आहे. आणि मग ते तसे होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न करणे अगदी आतून येते.

– शाळा बंद पडू नये यासाठी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा अजून संघर्षपूर्ण दाखवता आला असता – असे मी चित्रपट बघण्याआधी काही रिव्ह्यूमध्ये ऐकले होते. मलाही चित्रपट शेवटाकडे सरकताना थोडेफार तसेच वाटले होते... पण, नंतर जाणवले की मुळात हा लढा कुठल्या प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध किंवा शिक्षण माफिया विरुद्ध नसून त्या आधी तो आपल्याच विचारांशी होता. मराठी माणसांनी ठरवले तरच मराठी शाळा वाचू शकतात. त्यामुळे आधी मराठी शाळा वाचवण्याची गरज आहे का? तर हो, आहे आणि ती का आहे हे आपल्यालाच समजून घ्यायला हवे. आणि हेच सचिन खेडेकर योग्य प्रकारे समजावत शेवटाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.
अन्यथा एक शाळा हिरोगिरी करून वाचली इतकाच चित्रपटाचा शेवट घेऊन आपण थिएटरबाहेर पडलो असतो!
आणि मग कुठलेच प्रश्न पडले नसते..

IMG-20260104-WA0032.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुक माय शो मधे हे नाव वाचून शाळेचा इव्हेंट आहे असं वाटत होतं. कसलीच मेहनत घेत नाहीत मराठीवाले.

नाव का नाही आवडले समजले नाही. चांगले टिपिकल मराठी शाळेचे नाव आहे की !
बाकी सिनेमा आवडला. चांगला फील गुड सिनेमा आहे, आणि काही भाग मनापासून आवडले. एके ठिकाणी अमेय वाघ आंग्री भाषेबद्दल जे बोलतो आणि त्यानंतर पत्रकार ताई अहिराणीत थेट बहिणाबाईंची ओवी बोलतात तेव्हा अगदी वाहवा निघाली तोंडातून.

बाकी सिनेमा प्रिची होणार हे माहित होते आणि थोडाफार झालाही पण तेव्हढे चालायचे. सुरुवातीला एक डॉक्टर माजी विद्यार्थी होता त्याला ठेवायला हवा होता एक दुसरी बाजू मांडायला. नाहीतर सिनेमा जसा आहे तसा सगळा एकतर्फी मोनोलॉग आहे की बुवा मराठी लोकांना मराठीची कदर नाही वैगेरे.

बाकी नॉस्टॅल्जिया म्हणून रंगवलेली शाळा जरा जास्तच सोज्वळ वैगेरे आहे. आमची शाळा "शाळा" ह्या सिनेमात दाखवली आहे त्याच्याशी जास्त जुळणारी होती.

पिक्चरचे नाव क्रांतीज्योती आहे कि स्वा. सावरकर कि पपू हेडगेवार कि झाशीची राणी हा आवडण्या नावडण्याचा विषय कसा काय होईल ?
असे नाव दिले तर तो पिक्चर आहे आणि करमणूकप्रधान आहे हे पोहोचवण्याची जबाबदारी पिक्चर काढणार्‍यावर असते.

भाऊ भारीच.
मराठी माणसांचे संकल्प याच्या पलिकडे जात नाहीत.

संकल्प कसे पाहीजेत ?
टर्नओव्हर पाच लाख कोटींवरून पंचवीस लाख कोटींवर नेणार.
पीएमला फोन करून डिफेन्सची कॉण्ट्रॅक्ट्स मिळवणार.
टेलिफोन, वीज, पाणी या सर्वांवर वर्चस्व मिळवणार.

जून जुलै महिन्यात आला असता तर गणपती उत्सवात डेकोरेशनचा विषय झाला असता.
( मी शिवाजीराजे भोसले ..... याचं डेकोरेशन गाजलं होतं त्या वेळी.)

नाव अतिशय लांबलचक, क्लिष्ट >>> हो, तसे आहे खरे. पण हे चित्रपट बघायला न जाण्याचे कारण असू शकत नाही असे सर्वांना म्हणायचे आहे.
बहुधा तुम्हाला तसे म्हणायचे नसावे पण तुम्ही एकाच वाक्यात दोन्ही स्टेटमेंट लिहिल्याने आणि चित्रपट बघायला का जाणार नाही याचे दुसरे कुठले कारण न लिहिल्याने तसे वाटले असावे.

सुरुवातीला एक डॉक्टर माजी विद्यार्थी होता >>> हो, तो लगेचच गायबला. मला वाटलेले नंतर येईल मतपरिवर्तन होत. पण मग अश्या गोष्टींना नंतर टिपिकल म्हणत आपणच नावे ठेवतो.

बहुतेक आलेले सगळेच लगेच एकाच मताचे झाले असे न दाखवायला आणि सुरुवातीला विषय काय आहे याची एक चर्चा घडवायला त्याची भूमिका होती.

नाव वाचून हा चित्रपट कधीच बघितला नसता. नाव का नाही आवडले ह्याची चर्चा पण नको वाटते.

पण परीक्षण आवडले. त्यामुळे हा चित्रपट बघायचे ठरवले आहे.

बुक माय शो मधे हे नाव वाचून शाळेचा इव्हेंट आहे असं वाटत होतं. कसलीच मेहनत घेत नाहीत मराठीवाले.. >>>> आपण सुद्धा मराठीवालेच आहोत. आपण करूया आपल्या परीने. त्यांचा बजेटचा प्रॉब्लेम होत असेल. कुठलीही जाहिरात करायला पैसा लागतोच.

छान परीक्षण लिहिले आहे. चित्रपट चांगला चालावा व अश्या विषयांवरचे अजून चित्रपट बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे .
नुकतेच बंद होणाऱ्या मराठी शाळा या विषयावरचा चिन्मयी सुमित यांचा पॉडकास्ट मित्र म्हणे च्या चॅनेल वर पहिला. छान होता.
ऋन्मेष यांच्या प्रयत्नांचे व कष्टाचे कौतुक. ते मायबोलीवर परीक्षण व लेख लिहून कायमच मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देतात.

तिता धन्यवाद आणि हो, नावाचा मुद्दा योग्यच आहे. चित्रपट बघायचा निर्णय आपण ट्रेलर किंवा रिव्ह्यू वाचून घेतो पण ते सुद्धा बघायचे/वाचायचे की नाही हा निर्णय नाव बघून घेतो. ते फर्स्ट इम्प्रेशन असते. स्पेशली मराठी चित्रपटाबाबत जो मुळातच फार कमी लोकांपर्यंत पोहोचला असतो. आत्मपामफलेट बाबत सुद्धा हेच झाले होते. एकमेकांना सुचवायला सुद्धा नाव चटकन तोंडावर यायला हवे. नाहीतर माऊथ पब्लिसिटीला सुद्धा याचा फटका बसतो.

नाव का आवडले नाही हे कळलं नाही. लालबाग परळ एव्हढेच आहे. क्रातिज्योती हे फुले दांपत्याच्या स्मरणार्थ आहे. महिलांच्या सार्वजनिक शिक्षणाचा श्रीगणेशा केला म्हणून हे नाव किमान महिलांना प्रिय हवे.

पण असा पिक्चर आला आहे हेच आता समजतंय. त्यांची चूक नाही. कपिल शर्मा चा एक आणि अजून दोन तीन हिंदी पिक्चर पण आले होते हे समजलं नाही.

धुरंधर आणि अवतारची हवा आणि त्यांनी अडवून ठेवलेले स्क्रीन्स यामुळे बाकिचे चेपले गेले.

मराठी पिक्चर साठी अवतारचे शो कमी केले असत तर चालले असते. एखादा शो बास. ना कसला सामाजिक संदेश, ना विचार, ना समस्याप्रधान. नुसती निळी माणसं गावभर बोंबलत फिरतात. काय बचायचं त्यात? असले पिक्चर तंबूत जाऊन पण बघू नयेत. त्यातून हे हिंदी,बरोबर तेलगू, तमिळ डबडे पिक्चर महाराष्ट्रात रिलीज करतात. राजसाहेबांनी लक्ष घातले पाहिजे.

हो क्रांतीज्योती हे नाव फुले दाम्पत्यासाठी ओळखलं जातं dd वर क्रांतीज्योती सावित्रीबाई नावाची सिरियलही लागायची काही वर्षांपूर्वी. उलट प्रोमो बघून शाळेचं नाव समर्पक वाटतं विचार करून ठेवल्यासारखं कारण शाळा नावाचा ऑलरेडी सिनेमा आहे . मलातरी नाव आवडलं.
छान लिहिलंय रिव्ह्यू .एकदम रिलेट होईल असाच चित्रपट वाटतोय कारण आमचीही शाळा पाडून इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल झालीय, फक्त फरक इतकाच की मराठी मिडीयम ही त्याच्यबरोबरबर नवीन तिथेच बांधली . पिच्चरमध्ये काय शेवट आहे ते पाहायचं आहे ,नक्की बघणार. तुमचं मात्र कौतुक रुन्मेष मराठी चित्रपट पाहावेत म्हणून खूप प्रमोट करता.

सिमरन धन्यवाद Happy

@ नामकरण चर्चा,
नाव समर्पक असणे आणि तोंडावर चटकन येणारे, रुळणारे, यूजर फ्रेंडली असणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मला पर्सनली दुसऱ्या निकषात ते फिट बसणारे वाटत नाही. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे याचेही पुढे जाऊन डीडीएलजे झाले.

असो, नावावर अति चर्चा होणे काही वाईट नाही. त्याने हळूहळू ते सोपे आणि सवयीचे वाटू लागेल.

बघितला.

क्रांतीज्योती विद्यालय या मराठी शाळेला ‘धोकादायक इमारत’ या कारणास्तव शाळा बंद करण्याचे आदेश येतात. शाळेचे मुख्याध्यापक शिर्के सर म्हणजे सचिन खेडेकर शाळा वाचवण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यासाठी ते शाळेच्या काही यशस्वी माजी विद्यार्थ्यांना पाचारण करतात. देशाविदेशात वास्तव्य करत असलेले विद्यार्थी सरांच्या प्रेमाखातर शाळेसाठी एकत्र जमतात. साम दंड भेद वापरून एकजुटीने त्या बलाढ्य शत्रुशी झुंज देतात. असे साधारण कथानक आहे.

बंद पडत चाललेल्या मराठी शाळा, शाळेच्या वर्ग पटावरील घटणारी विद्यार्थी संख्या, शाळेच्या जागेवर होणारे अतिक्रमण, त्या भोवती फिरणारे राजकारण आणि त्यानंतर शाळांचे झालेले बाजारीकरण असे अनेक सद्यस्थितीवर आधारित उपविषय चित्रपटात हाताळले आहेत.

चित्रपट बघताना आपापली शाळा, शाळेबाहेरील चन्यामन्या, ओली बडीशेप किंवा आवळे विकणारी/ रे काकी/ काका, शाळेतील शिपाई काका, शिस्तप्रिय कडक मास्तर,एखादे सगळ्यांचे लाडके सर किंवा एखाद्या नार्वेकर बाई नक्कीच डोळ्यासमोर उभ्या राहतील. कानात शाळेची प्रार्थना घुमत राहील. मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं म्हणून कधीतरी लावलेला तक्रारीचा सूरही आठवेल. डोक्यात शाळेतून कमावलेल्या पुंजीचे जमाखर्च सुरू होतील.
ही एक मराठी शाळा वाचली म्हणून हायसं वाटून, टाळ्या वाजवत असतानाच, आत कुठेतरी आपल्या मुलांना आंगलाळलेल्या तारांकित/ महागड्या इंग्रजी शाळेत पाठवत असल्याचा सलही टोचत राहील - खूप जास्त नाही पण त्या सात मऊ गाद्यांवर झोपलेल्या राजकन्येला टाचणी टोचते तसा.
चित्रपटगृहातून बाहेर पडताना आतापर्यंत काही केलं नसेल तरी यापुढे एक मराठी माणूस म्हणून मराठीसाठी काहीतरी करावे ही इच्छा बळावल्याशिवाय राहत नाही.
अर्थात वाटणे आणि कृती करणे यात फरक असतोच आणि तोच फरक बहुदा परस्थिती जैसे थे ठेवतो.

चित्रपट आवडला.
कथा क्वचीत कुठे लांबण लावल्यासारखी किंवा मूळ कथनकापासून दूर गेल्यासारखी वाटते पण ते तेवढेच.
अभिनय संवाद दृश्य निसर्ग गाणी सगळं छान!
ढोमे वेगवेगळे विषय चांगल्या प्रकारे हाताळून प्रेक्षकांपुढे आणत आहे टन असे वाटले.

चर्चेतील मुद्दा समजून घेतला आहे. चित्रपटाच्या मांडणीपेक्षा त्यातून पुढे येणाऱ्या व्यापक शैक्षणिक प्रश्नांकडे लक्ष देणे अधिक उपयुक्त ठरेल.

मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्यामागे केवळ सांस्कृतिक उदासीनता किंवा राजकारण नसून, शिक्षणधोरण, अर्थकारण आणि रोजगार यांचा परस्पर संबंध आहे. या प्रश्नाकडे धोरण म्हणून पाहणे आवश्यक आहे.

एके काळी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी व हिंदी भाषिक क्षमतेवर सार्वजनिक टीका झाली. या टीकेमुळे भाषिक न्यूनगंड निर्माण झाला आणि इंग्रजी भाषेला सामाजिक / आर्थिक प्रगतीचे प्रमुख साधन मानले जाऊ लागले. पुढे पहिलीपासून इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यावर विरोध झाला असला, तरी कालांतराने विद्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती कमी झाल्याचे काही सकारात्मक परिणाम दिसून आले. ( त्या काळाच्या साक्षीदारांना हा प्रवास ठाऊक आहेच.)

या कालखंडात आर्थिक उदारीकरण आणि खासगीकरणामुळे शिक्षणक्षेत्राचे बाजारीकरण झाले. शाळा आणि महाविद्यालयांचे ब्रँडिंग, बोर्ड, अभ्यासक्रम आणि प्लेसमेंट-क्षमतेला धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले. परिणामी, सीबीएसई आणि आयसीएसई शाळांना संस्थात्मक लाभ मिळत गेला, तर मराठी माध्यमाच्या शाळा तुलनेने मागे पडत गेल्या. स्पर्धा परीक्षांची रचना आणि रोजगारबाजाराच्या अपेक्षा यामुळे हा कल अधिक दृढ झाला.

धोरणात्मक पातळीवर पाहता, मराठी माध्यमाच्या शाळांचे संरचनात्मक आधुनिकीकरण म्हणजे ..
अभ्यासक्रम सुधारणा, शिक्षक प्रशिक्षण आणि रोजगाराशी संलग्न कौशल्यविकास या बाबींवर अपेक्षित गुंतवणूक झाली नाही. शिक्षणक्षेत्रात वाढलेल्या खासगी सहभागामुळे * सरकारी व मराठी माध्यमाच्या शाळांचे सामाजिक स्थान आणि पालकांचा विश्वास दोन्ही कमी होत गेले. काही ठिकाणी या शाळा बंद पडल्या, तर काही ठिकाणी धोरणात्मक दुर्लक्षामुळे त्यांची गुणवत्ता खालावली.

पालकांच्या दृष्टीने विचार करता, मुख्य प्रश्न हा रोजगार मिळण्याचा आहे. मातृभाषेतील शिक्षण, सांस्कृतिक ओळख आणि मूल्यसंस्कार यांचे महत्त्व निर्विवाद असले, तरी आजच्या स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत केवळ या आधारावर निर्णय घेणे अनेक कुटुंबांना शक्य होत नाही. विशेषतः ज्या पालकांकडे शाळेबाहेरील भाषा-प्रशिक्षणासाठी संसाधने नाहीत, त्यांच्यासाठी माध्यमाची निवड ही जोखमीची ठरते.

या पार्श्वभूमीवर, धोरणात्मक चर्चा करताना व्यक्तीस्वातंत्र्य आणि निवडीचा अधिकार केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करण्याची मागणी जितकी अव्यवहार्य ठरेल, तितकाच सर्व पालकांनी मराठी माध्यम निवडावे, असा आग्रहही समस्येचे उत्तर देऊ शकत नाही.

धोरणात्मक उपाय म्हणून, मराठी माध्यमाच्या शाळांना केवळ ‘भाषा संवर्धनाचे साधन’ म्हणून न पाहता त्यांना गुणवत्तापूर्ण, रोजगारक्षम आणि स्पर्धात्मक शिक्षण देणाऱ्या संस्था म्हणून पुनर्स्थापित करण्याची गरज आहे. त्याचबरोबर, भाषासंवर्धनाची जबाबदारी संपूर्णपणे शाळांवर न टाकता ती सांस्कृतिक, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातही वाटून घेणे आवश्यक आहे.

इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन मराठीसाठी प्रभावी योगदान देता येते, हे वास्तव स्वीकारल्यास शिक्षणमाध्यम आणि भाषिक अस्मिता यांच्यातील संघर्ष टाळता येऊ शकतो. त्यामुळे धोरणनिर्मितीत संघर्ष टाळून समन्वयाची भूमिका घेणे अधिक उपयुक्त ठरेल.

* हे विस्ताराने सांगता येईल पण ते आरोप होतील म्हणून टा़ळले आहे.

<<< इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन मराठीसाठी प्रभावी योगदान देता येते, हे वास्तव स्वीकारल्यास.. >>>>

हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे.
कसे ते आणखी सविस्तर मांडाल का?

चांगला आहे असे इतरत्रही ऐकले. नावावरून आणि आत्ता रिलीज होण्यावरून मला सावित्रीबाई फुल्यांशी संबंधित आहे असे वाटले होते. पण तसे काही दिसत नाही.

नावात न आवडण्यासारखे काय आहे समजले नाही. काहीतरी संदर्भ मिस करतोय असे दिसते.

झिम्मा काही खास नव्हता पण फस्स्क्लास दाभाडे आवडला होता.

शाळा बंद पडू नये यासाठी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा अजून संघर्षपूर्ण दाखवता आला असता >>> एडी मर्फीचा एक मस्त (बाल)चित्रपट आहे यावर.

क्रांतीज्योती नावाबद्दल बद्दल का आक्षेप आहे हे मला जेन्यूईनली समजत नाहीये. ज्या पिढीची शाळा दाखवत आहेत त्या पिढीला अनुसरून खरं तर सावित्रीबाई फुले विद्यालय जास्त योग्य वाटलं असत. पण पुणे विद्यापीठाचे नाव आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे तर क्रांतीज्योती हे विशेषण आता सवयीचं झालं असावं असा माझा समज होता.
आत्मपॅम्पलेट किंवा गोंद्या मारतंय तंगडं असलं अतर्क्य नाव तर नाहीये.

असो. परीक्षण चांगले वाटले त्यामुळे पिक्चर बघण्याची शक्यता आहे.

हो, तो लगेचच गायबला. मला वाटलेले नंतर येईल मतपरिवर्तन होत. पण मग अश्या गोष्टींना नंतर टिपिकल म्हणत आपणच नावे ठेवतो.

>>> तुमचा पॉईंट बरोबर आहे. पण त्या डॉक्टर पोराचे मतपरिवर्तन झाले असेच दाखवायला लागेल असे नाही. एकूण त्याला शाळा अद्ययावत होणे आणि इंग्रजी शाळेतून मुलांना शिकवणे ही धोरण पटत असले तरी तो म्हात्रे सरांबद्दल आदर व आपुलकी असल्याने थांबतो आणि शाळा वाचवण्यास मदत करतो असेही काहीसे दाखवता आले असते. मध्ये सर्वांची साधक बाधक चर्चा दाखवता आली असती.

असो हे आपले फुकटचे आर्मचेअर क्रिटिसिझम आहे शिरेषली घेऊ नये.

Pages