
आपणा सर्वांना २०२६ प्रारंभानिमित्ताने उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
गेली 18 वर्षे व 4 महिने मी आपल्यापुढे कुमार१ या नावाने लेखन केले. आजपासून हेमंतकुमार या नामांतरासह येत आहे. लोभ असू द्यावा ही विनंती.
आता हा धागा काढण्याचा उद्देश सांगतो.
जगभरातील नागरिकांना मिळणारी आरोग्य सेवा सुधारावी यासाठी अनेक देशांमध्ये नियमित प्रयत्न सातत्याने होत असतात. वैद्यकशास्त्रातील नवनव्या संशोधनाचा लाभ प्रत्यक्ष रुग्णांना मिळणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक देशाचे एक आरोग्यविषयक धोरण आखलेले असते. त्यात वेळोवेळी तज्ञांच्या सूचनांनुसार सुधारणाही केल्या जातात. भारतासारख्या देशांमध्ये सरकारी दवाखाने आणि रुग्णालयावर अवलंबून असलेल्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. म्हणून तिथे मिळणारी आरोग्यसेवा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रोगनिदानाच्या व उपचारांच्या अत्याधुनिक पद्धती अनेकदा महाग असतात. त्या सर्वांना परवडणाऱ्या नसतात. त्या सर्व सेवा सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होण्यास देशानुसार फरक पडतो. अशावेळी अनेक सामाजिक संस्थांकडून विविध आरोग्य उपक्रम आणि केंद्रे देखील राबवली जातात. त्यामध्ये अशा सेवांच्या खाजगी क्षेत्रातील शुल्कापेक्षा बऱ्यापैकी कमी शुल्कात त्या उपलब्ध करून दिल्या जातात. अशी स्वयंसेवी सेवाकेंद्रे देखील आरोग्य सेवेला बळकट करीत राहतात.
आरोग्यसेवेसंबंधी देश-विदेशांमध्ये होणाऱ्या घडामोडी आणि विविध सुधारणांची संकीर्ण माहिती इथे इच्छुकांनी लिहावी अशी संकल्पना आहे. देश आणि राज्य पातळीवरील धोरणात्मक बदल हे वृत्तमाध्यमांमधून सर्वांना माहीत होतात. परंतु जिल्हा, शहर आणि गाव पातळीवर जर काही विशेष आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात असतील तर त्यांची माहिती सामान्य नागरिकांकडून देखील इतरांना समजू शकते. आपल्या ऐकण्यात आलेली या प्रकारची कोणतीही उपयुक्त माहिती इथे आपण लिहूयात. रोगप्रतिबंध, रोगनिदान आणि उपचार या तिन्ही दृष्टिकोनातून उपलब्ध होणारी माहिती इथे जरूर नोंदवावी. आपल्या परिसरातील व्यायामशाळा, विशेष दिनानिमित्त योजलेली आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहीम, इ. माहिती देखील जरूर लिहावी. सवलतीत मिळणारी आरोग्यसेवा आणि विशेष आरोग्य विम्यासंबंधी सुद्धा लिहीता येईल.
अजून एक मुद्दा.
काही महत्त्वाच्या प्रबळ आजारांवर आपल्या इथे स्वतंत्र धागे आहेत पण अन्य अनेक आजारांसाठी स्वतंत्र धागे निघालेले नाहीत आणि काढणेही अशक्य आहे. अशा आजारांमध्ये नेहमीच्या हायपरऍसिडिटी पासून गंभीर पार्किंसनपर्यंत अनेकांचा समावेश आहे. म्हणून आपल्या माहितीतील कोणत्याही आजारासंबंधी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळाल्यास ती देखील इथे लिहिता येईल. दुर्मिळ आजारांबाबतही लिहायला हरकत नाही. याचबरोबर संबंधित व्यक्तिगत अनुभवांचेही स्वागत असेल.
सारांश : ‘आरोग्याविषयी काहीही’ असे प्रस्तुत धाग्याचे स्वरूप राहील.
नमुन्यादाखल गेल्या काही महिन्यात माझ्या वाचनात आलेल्या देश-विदेशातील काही घडामोडी / योजना खाली लिहून श्रीगणेशा करतो.
धन्यवाद !
. .
१.
न्यायवैद्यकीय प्रकरणांमध्ये मृत्यूनंतर शवविच्छेदनाची अनेकदा गरज पडते. सध्याच्या पद्धतीत प्रेताची प्रत्यक्ष छेद घेऊन चिरफाड व तपासणी होते आणि या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. त्या दृष्टिकोनातून आता CT तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल शवपरीक्षण करता येते (विच्छेदन नव्हे !). या पद्धतीत मृताच्या शरीरावर प्रत्यक्ष छेद न घेतल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनाही हायसे वाटेल.

( चित्रसौजन्य : Frontiers)
या परीक्षणातून शरीराच्या अंतर्गत झालेले बदल समजून येतात तसेच या अहवालाचे कायमस्वरूपी डिजिटल जतन देखील करता येते. महाराष्ट्रात हा उपक्रम सुरू करण्यासाठी मुंबईतील केईएम तसेच जे जे रुग्णालयांची निवड करण्यात आलेली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात शासन 25 कोटींचा खर्च करणार आहे.
. .
२.
भारतातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गेले काही महिने सर्वोच्च न्यायालयात पोचलाय. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्या कुत्र्यांसाठी देशभर निवारागृहे उभारायची ठरलेली आहेत. त्या दृष्टिकोनातून काही कार्यवाही चालू असावी. निदान माझ्या भागापुरते मी सांगू शकतो. पूर्वी आमच्या इथे दररोज रात्री दहा वाजता दहा बारा कुत्री एकत्र जमून जोरदार (कोल्हेकुई) कुत्रेकुई करीत असत. गेल्या महिन्यापासून ती ऐकू आलेली नाही तसेच येताजाता भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी कमी झाल्याचे जाणवते.
रेबीज या प्राणघातक आजार प्रतिबंधासंबंधीच्या या गंभीर विषयाबाबत देशभरातून लवकरात लवकर ही कार्यवाही व्हावी ही अपेक्षा.
. .
३.
गेल्या दहा वर्षांत भारतात क्षयरोग व मलेरिया यांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेले आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी एका आरोग्य परिसंवादात सांगितले. तसेच बाळंतपणादरम्यानच्या माता व बालक मृत्यूच्या प्रमाणातही बरीच घट झालेली आहे. सार्वजनिक आरोग्यसेवेच्या बळकटीमुळे हे सर्व शक्य झालेले आहे असेही ते म्हणाले.
https://timesofindia.indiatimes.com/india/result-of-institutional-streng...
. .
४.
कृत्रिम गर्भधारणेच्या प्रांतातील ही युरोपमध्ये घडलेली दुर्घटना. या प्रक्रियेसाठी निरोगी पुरुषांकडून त्यांचे वीर्य स्वीकारून त्यातील शुक्राणू बँकेत ठेवण्याची पद्धत आहे. बँकेकडे आलेल्या अशा वीर्यावर विविध जनुकीय व अन्य चाचण्या करून संबंधित शुक्राणूंमध्ये काही दोष नाही ना हे पाहिले जाते. परंतु अशा चाचण्यांना काही अंगभूत मर्यादा आहेत. काही वेळेस निरोगी दात्यामध्ये सुद्धा काही स्वरूपाचे जनुकीय बिघाड अस्तित्वात असतात आणि चाळणी चाचण्यांनी ते लक्षात येत नाहीत.
डेन्मार्कमधील एका वीर्यबँकेने एका तरुण विद्यार्थ्याकडून वीर्य स्वीकारले होते आणि त्यावरील नेहमीच्या चाचण्यातून त्यात काहीही अपायकारक आढळले नव्हते. पुढे या वीर्यातले शुक्राणू युरोपातील पाच देशांमधील अनेक स्त्रियांसाठी वापरले गेले. कालांतराने असे लक्षात आले की त्या गर्भधारणेतून सुमारे 200 मुले जन्मली आहेत. त्यातील 23 मुलांमध्ये विशिष्ट जनुकबिघाड (TP53 gene mutation) दिसून आला आणि त्यापैकी दहा जणांना लहान वयातच कर्करोग झालेला आहे. दुर्दैवाने त्यापैकी काहींचा मृत्यू देखील झाला आहे. असा बिघाड शरीरात असलेल्या बालकाच्या बाबतीत भविष्यात कर्करोग होण्याची शक्यता 90% असते.

(चित्रसौजन्य : BBC)
या प्रकरणात अद्यापही संपूर्ण विदा उपलब्ध झालेला नाही. या दुर्घटना घडल्यानंतर संबंधित वीर्याची अनेकदा अधिक बारकाईने तपासणी केली तेव्हा त्या पुरुषाच्या एक पंचमाश शुक्राणूंमध्ये तो जनुकीय बिघाड सापडला. या प्रकरणात त्या दात्याच्या शरीरातील अन्य कोणत्याही पेशींमध्ये हा बिघाड सापडलेला नव्हता. ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून त्या दात्याला जरी कुठलाही आजार झालेला नसला तरी त्याच्या बिघडलेल्या शुक्राणूपासून जन्मलेल्या मुलांच्या प्रत्येक पेशींमध्ये तो बिघाड गेलेला आहे.
एका वीर्यदात्याचे वीर्य किती स्त्रियांसाठी वापरले जावे या संबंधात अद्यापही समान असा आंतरराष्ट्रीय कायदा नाही. काही देशांनी आपापली मर्यादा ठरवून घेतली आहे. परंतु त्याचे पालन होते का नाही याबाबत साशंकता आहे. म्हणून या संदर्भात तातडीने एका आंतरराष्ट्रीय नियमन कायद्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
https://www.bbc.com/news/articles/ckgmy90z991o
. .
५.
ताप, रक्तदाब आणि अन्य काही दैनंदिन तपासण्यांसाठी कित्येक वर्षांपासून पारायुक्त ( mercury) उपकरणांचा वापर होत आहे. परंतु अशी उपकरणे तुटल्यास त्यातून बाहेर पडलेला पारा जर आपल्या संपर्कात आला तर ते तब्येतीला घातक असते. तसेच पारा हा पर्यावरणासाठी देखील हानिकारक आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रकारची पारामुक्त उपकरणे देखील बाजारात आलेली आहेत.
नुकताच महाराष्ट्र शासनाने या संदर्भात एक आदेश काढलेला आहे. इथून पुढे सर्व सरकारी रुग्णालयांना पारामुक्त वैद्यकीय उपकरणे वापरण्याच्या आणि जुन्या पारायुक्त उपकरणांची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.
*******************************************************************************************************
अरे वा! कुमार सर!
अरे वा! कुमार सर!
आरोग्य सदनातील तुमची ही भटकंती, प्रख्यात गायक हेमंतकुमार यांच्या सुश्राव्य गीतांप्रमाणेच सुखद, संस्मरणीय ठरू दे.
छान धागा. नव्या नावासहित
छान धागा. नव्या नावासहित नव्या वर्षात स्वागत आहे डॉक्टर. तुमचे धागे नेहमीच नवीन माहिती देणारे असतात.
एका वीर्यदात्याचे वीर्य किती स्त्रियांसाठी वापरले जावे >>> यातून एक शंका उदभवली. जर ते जास्त स्त्रियांसाठी वापरले आणि त्यातून जन्माला आलेली मुले मोठेपणी अजाणतेपणे एकत्र आली, तर त्यांच्या होणाऱ्या मुलांसाठी ते घातक असावे. कारण आई - वडील एकमेकांचे सावत्र बहीणभाऊ ठरतील. शक्यता कमी असली तरी आहेच ना. हे टाळण्यासाठी काय केले जाते?
छान कल्पना आहे धाग्याची.
छान कल्पना आहे धाग्याची. डिजिटल शवचिकित्सा चांगली व महत्वाची सुधारणा वाटतेय.
@ हेमंतकुमार, नवीन रूपात
@ हेमंतकुमार, नवीन रूपात स्वागत.
देश-विदेशातील काही घडामोडी / योजना दखलपात्र आहेत.
भटक्या कुत्र्यांची समस्या खरंच गंभीर आहे. माझ्या एका तरुण मित्राचे भटका कुत्रा चावल्याने व वेळीच उपचार न केल्याने चार-पाच वर्षानंतर अचानक अतिशय वाईट रीतीने निधन झाले. दुर्दैवी योगायोग म्हणजे त्या मित्राचे वडील हे स्वतः व्यावसायिक डॉक्टर होते.
बाप रे वामनराव!
बाप रे वामनराव!
आपणा सर्वांना मनापासून
आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद !
* प्रख्यात गायक हेमंतकुमार यांच्या सुश्राव्य >>>> माझे नावबंधू असलेले हे गायक अर्थातच माझे अतिशय आवडते गायक आहेत हेवेसानल
. . .
* अचानक अतिशय वाईट रीतीने निधन झाले. >>>> अरेरे ! वाईट वाटले.
* आई - वडील एकमेकांचे सावत्र
* आई - वडील एकमेकांचे सावत्र बहीणभाऊ ठरतील. >>>> +१
चांगला प्रश्न !
भविष्यात अशा सावत्र भावंडांचे लग्न होऊ नये ( म्हणजे ही शक्यता कमीत कमी राहावी म्हणून) या दृष्टीने काही उपाय असे करता येतील :
१. एका माणसाच्या वीर्यापासून किती स्त्रिया गर्भवती केल्या जातील यावर कठोर नियंत्रण हवे. मुळात हीच संख्या कमीत कमी ठेवली तर भविष्यात पुढच्या संभाव्य घटना होण्याची शक्यता कमीत कमी राहील.
२. अशा प्रकारच्या कृत्रिम गर्भधारणांची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद पाहिजे ( Donor Sibling Registry (DSR). आणि अशा गर्भधारणा केंद्रांमध्ये सुसूत्रता आली पाहिजे.
३. कृत्रिम पद्धतीने जन्मलेली मुले जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांनी स्वतःच्या लग्नापूर्वी त्यांच्या जन्मदात्या बापाची केंद्राकडे चौकशी केली पाहिजे आणि त्यांना ती माहिती मिळण्याची कायदेशीर तरतूद हवी.
४. समजा, वरीलप्रमाणे माहिती मिळू शकली नाही तरी विवाह करू इच्छिणाऱ्या प्रत्येक जोडप्याने संबंधित वंशात असलेल्या जनुकीय आजारांच्या चाळणी चाचण्या जाणीवपूर्वक करून घ्याव्यात. >>> निदान रोगवाहक अवस्था तरी समजू शकेल.
सारांश : या संदर्भात संबंधित माहिती देण्याचे कायदे व्हायला हवेत आणि नोंदणी केंद्रांमध्ये पारदर्शकता हवी.
नव्या वर्षात नवीन नावा सकट
नव्या वर्षात नवीन नावा सकट नवीन माहितीचा धागा !
छान अपडेट्स डॉक्टर.
छान धागा.
छान धागा.
ताजी घडामोडNimesulide या
ताजी घडामोड
Nimesulide या वेदना व तापशामक औषधाच्या 100 mg हून अधिक डोस असलेल्या प्रौढांसाठीच्या सर्व प्रकारांवर भारत सरकारने बंदी घातलेली आहे. यकृतबिघाड हा या औषधाचा महत्वाचा दुष्परिणाम आहे.
( बारा वर्षाखालील मुलांसाठी हे औषध वापरण्यावर यापूर्वीच बंदी आहे) :
whttps://indianexpress.com/article/health-wellness/health-ministry-bans-n...
छान सुंदर धागा, कुमार सर.
छान सुंदर धागा, कुमार सर.
हेमंतकुमार, नवीन नाव आवडले.
वा वा!! मस्त नाव घेतले आहे
वा वा!! मस्त नाव घेतले आहे कुमार सर.
बातम्या फारच उद्बोधक आहेत.
वामन राव यांनी सांगीतलेली घटना ऐकून फार वाईट वाटले.
इंदूर : दूषित पिण्याच्या
इंदूर : दूषित पिण्याच्या पाण्याचे १० बळी
इंदूर येथील एका भागात जमिनीखालील मलनिस्सारण वाहिनीतून गळती झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीत अनेक जंतूंयुक्त असे दूषित पाणी आले आणि त्यातून 10 मृत्यू झालेत. याखेरीज अनेक जुलाब व उलट्यांचे रुग्ण रुग्णालयात दाखल केलेले आहेत.
पिण्याच्या पाण्याचे विश्लेषण केले असता त्यात कॉलरा आणि अन्य जंतू देखील आढळलेत.
https://www.news18.com/cities/bacteria-generally-found-in-sewer-water-be...
<<< छान कल्पना आहे धाग्याची
<<< छान कल्पना आहे धाग्याची. डिजिटल शवचिकित्सा चांगली व महत्वाची सुधारणा वाटतेय. >>> +१
पण एक शंका आहे. एखाद्याचा मृत्यू विष देऊन झाला असेल तर ते डिजिटल पद्धतीत नीट समजते का?
<<< छान कल्पना आहे धाग्याची
.
asp, विचार, वाटप, नी३,
.
हेमंतकुमार - नवीन
हेमंतकुमार - नवीन नामकरणाबद्दल अभिनंदन. आता नवीन नावाने नवीन वर्षात नवनवीन विषयांवरचे तुमचे लेखन वाचण्यास उत्सुक.
येथे स्वतःचे आंतर जालीय नाव स्वतःच ठरवता येते हि चांगली गोष्ट आहे कारण स्वतःचे व्यावहारिक नाव ठेवताना आपल्याला कोणीही विचारात नाही. जे नाव घेऊन आपण आयुष्यभर वावरणार ते ठरवताना आपली पसंती, आवड-निवड ह्या बाबत आपल्याला कोणताही मताधिकार नसतो. जे नाव आपल्यावर थोपवण्यात येते ते पुढे आयुष्यभर स्वीकारणे भाग पडते. नाही म्हणायला काहींना पुढे नाव बदलण्याची संधी असते / मिळते तर काही कायदेशीर रित्या आपले नाव बदलून घेतात परंतु अशी उदाहरणे विरळच.
त्यामुळे आपले पुनःश्च अभिनंदन.
काही वर्षांपूर्वी (१५ ते २०) भारतात क्षय रोग पसरतो आहे आणि तो शरीरांच्या वेगवेगळ्या अवयवांना होतो आहे (म्हणजे काय ते कळले नव्हते) अशी बातमी वाचल्याचे आठवते. आता त्यावर नियंत्रण मिळाले असेल तर चांगली गोष्ट आहे.
पारामुक्त उपकरणे हि कशा प्रकारची आहेत? त्यांची क्षमता पूर्वीच्या उपकरणांपेक्षा चांगली आहे का?
धन्यवाद !
धन्यवाद !
चांगले प्रश्न आहेत.
१. मृत्यू विष देऊन झाला असेल तर
>>>
विषबाधेमुळे मृत्यूच्या प्रकरणांमध्ये या नव्या पद्धतीला तशा मर्यादा आहेत. पारंपरिक पद्धतीत शरीराचे विच्छेदन केल्यानंतर काही विषाचा विशिष्ट वास येऊ शकतो. तसेच रक्त, लघवी यांचे नमुने काढून घेता येतात आणि त्याद्वारे केलेली प्रयोगशाळा चिकित्सा अंतिम पुरावा ठरतो.
विषबाधा प्रकरणांमध्ये डिजिटलच्या जोडीला पारंपरिक पद्धतीची मदत घ्यावी लागेल असे सध्या तरी चित्र आहे.
. .
२. क्षयरोग शरीरांच्या वेगवेगळ्या अवयवांना
>>>>>> याला Miliary TB असे शास्त्रीय नाव आहे. त्यामध्ये अनेक अवयवांमध्ये मिलेटच्या आकाराच्या इजा झालेल्या असतात. हा गंभीर असून अन्य काही आजारांमुळे जर प्रतिकारशक्ती दुबळी झाली असता तो होतो.
३. पारामुक्त उपकरणे
३. पारामुक्त उपकरणे
>> यामध्ये Digital and infrared thermometer, Aneroid BP apparatus, digital BP monitor अशा अनेक उपकरणांचा समावेश आहे. पूर्वीची पारायुक्त उपकरणे जर प्रमाणसंदर्भ मानली तर या नव्या उपकरणांची अचूकता काही प्रमाणात कमी असते परंतु संख्याशास्त्रीय दृष्ट्या त्याला तितकेसे महत्त्व नाही.
अचूकता विविध उपकरणांनुसार भिन्न राहते. उदा. थर्मामीटरमध्ये इन्फ्रारेडपेक्षा डिजिटलमध्ये चांगली.
रक्तदाब मोजायला डिजिटलपेक्षा Aneroid हे अधिक चांगलं.
अर्थात निर्मात्याने वापरलेल्या तंत्रज्ञानाच्या दर्जानुसार अचूकता भिन्न राहील.
हेमंतकुमार - नवीन
हेमंतकुमार - नवीन नामकरणाबद्दल अभिनंदन. आता नवीन नावाने नवीन वर्षात नवनवीन विषयांवरचे तुमचे लेखन वाचण्यास उत्सुक.
येथे स्वतःचे आंतर जालीय नाव स्वतःच ठरवता येते हि चांगली गोष्ट आहे कारण स्वतःचे व्यावहारिक नाव ठेवताना आपल्याला कोणीही विचारात नाही.....>>>>+10000000
नवीन नाव छान आहे.
लेख माहितीपूर्ण.डिजिटल शवपरीक्षण हा चांगला उपक्रम आहे. नाही म्हटलं तरी ,गेलेल्या माणसाची शवविच्छेदनाची अनेकदा गरज असते पण मागे राहिलेल्याणाच्या भावनांच्या दृष्टीने ते त्रासदायकच असते. आता मृतांच्या नातलगांना हायसं वाटेल.
छान लेख..
छान लेख..
नुकताच कॅनडात एक भारतीय उपचारा अभावी तळमळत मेला.
अमेरिकेत एक रुग्ण किडनी स्टोन मुळे एका रूग्णालयात pl. help me अशी प्रवेश द्वारी विनवणी करताना पाहिला.
तिकडे काही दिवस, महिने रुग्णांना दवाखान्यात दाखल करून घेत नाहीत.
महागडी वैद्यकीय व्यवस्था.
हे सगळं पाहिलं की आपण खूप बरे आहोत असं वाटतं. कोविड एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाने किती प्रभावी हाताळला. इतरांना लस पुरवली.
व्यवस्थेत काही दोष आहेत. तरी मला इथली व्यवस्था भारी वाटते. बहुदा इथे माणुसकी जीवंत आहे म्हणून.
बरेच परदेशी रुग्ण आपल्याकडे येतात.
* तिकडे काही दिवस, महिने
* तिकडे काही दिवस, महिने रुग्णांना दवाखान्यात दाखल करून घेत नाहीत. >>> असे काही अनुभव ऐकले आहेत. तसेच एका ठिकाणी सरकारी रुग्णालयात तर चष्म्याचा नंबर काढण्यासाठी एक वर्षानंतरची वेळ मिळत होती असे पाहिले आहे !
. . .
* अमेरिकेतील काही राज्यांमध्ये तर धार्मिक आणि नैतिकतेवरून सुद्धा वैद्यकीय उपचार नाकारल्याच्या घटना होत असतात. काही महिन्यांपूर्वी घडलेली टेनेसी राज्यातील ही घटना :
एक स्त्री अविवाहित असून ती तिच्या जोडीदाराबरोबर पंधरा वर्षे राहत होती व त्याच्यापासून ती गरोदर राहिली. ती तिथल्या प्रसूती डॉक्टरकडे गेली तेव्हा त्यांनी सांगितले की अविवाहित मातृत्व हे ख्रिश्चन मूल्यांच्या विरुद्ध असल्याने मी तुला तपासणार नाही. यासाठी त्यांनी तिकडच्या एका राज्य-कायद्याचा हवाला दिला (Medical Ethics Defense Act) .
अखेर संबंधित स्त्रीने शेजारच्या व्हरजिनिया राज्यात जाऊन तिची योग्य ती तपासणी करून घेतली
https://www.tennessean.com/story/news/health/2025/07/23/tennessee-medica...
वरील कायद्यानुसार डॉक्टर फक्त
वरील कायद्यानुसार डॉक्टर फक्त तातडीची वैद्यकीय सेवा नाकारू शकत नाहीत असे दिसते. त्यामुळे गरोदरपणातील रुटीन तपासणी त्यांनी नाकारली.
या घटनेवर स्थानिक वैद्यकीय विश्वात नाराजीचे सूर उमटलेले दिसतात.
छान धागा आहे. ते virtual
छान धागा आहे. ते virtual autopsy वाचून बरं वाटतं (डॉ साळुंखे आणि ACP प्रद्युम्न आठवले. )
विद्यार्थ्यांना autopsies मधून जे शिकायला मिळते ते कमी होईल किंवा त्याउलट clinico-pathological correlation सारखं AUTOPSY -VIRTOPSY correlation ही शिकायला मिळेल असा वाटत. शिवाय कायद्याच्या दृष्टिकोनातून VIRTOPSY कसा काय स्वीकारतील ( विशेषतः न्यायवैद्यकीय शास्त्र मध्ये) तेही तितकाच महत्त्वाचं असेल.
छान कल्पना आहे धाग्याची. >>
छान कल्पना आहे धाग्याची. >> +१
पित्ताशयाचा त्रास झालेल्या (sludge seen in gall bladder neck in USG ) व खूप पूर्वी पासून मधुमेहाचा त्रास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी जेवताना काय काळजी घ्यावी ?
चांगले मुद्दे/ प्रश्न :
चांगले मुद्दे/ प्रश्न :
१. कायद्याच्या दृष्टिकोनातून VIRTOPSY कसा काय स्वीकारतील ?
>> हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. कालांतराने न्यायालयांचे दृष्टिकोन समजून येतील .
सध्या गुन्हेगारी प्रकरणात जिवंत व्यक्तीच्या ओळख पटवण्याबाबत सुद्धा डीएनए पुरावा हा अंतिम मानायचा का नाही याबाबतीत जगातील न्यायालयांमध्ये मतभेद आहेत.
२. पित्ताशयाचा त्रास :
२. पित्ताशयाचा त्रास : जेवताना काय काळजी घ्यावी ?
>>>>
मनःपूर्वक धन्यवाद हेमंतकुमार
मनःपूर्वक धन्यवाद हेमंतकुमार सर
भटक्या कुत्र्यांच्या
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालय जातीने दखल घेत आहे हे खूप चांगले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीय संस्थांना अजून काही सूचना दिल्यात.
रुग्णालय परिसर भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते कुंपण, भिंत अथवा दाराची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. तसेच परिसरातील स्वच्छता आणि भटक्या प्राण्यांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक संस्थेने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करायची आहे. याचबरोबर रुग्णालयातील रेबीज प्रतिबंधात्मक लस आणि इम्युनोग्लोब्युलिन कधीही संपणार नाही हे पाहण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर टाकण्यात आलेली आहे.
१.फक्त उत्तम गोष्टीच ( आपण
१.फक्त उत्तम गोष्टीच ( आपण आता ज्यांना तशा समजत आहोत) वापरणे याचा अतिरेक होत आहे. निकृष्ट चवीचे आणि पोषणमुल्ये असलेले अन्नपदार्थ टाळणे ही प्रवृत्ती वाढत आहे.
कृत्रीम संतती होण्यासाठी उत्तम प्राण्याचे (मनुष्य, गाय, म्हैस, घोडा, डुक्कर, धान्ये, झाडे हे सर्व सजीव आले यात )वीर्य वापरणे हेसुद्धा त्यात आले.
२. आधुनिक वैद्यक विज्ञानाची वाटचाल मोनोपोली'कडे ( एकमेव आणि एकाधिकार असण्याकडे) होत आहे. इतर उपचार पद्धती बाजूला पडत आहेत. तर या विज्ञानाचे तोटे काय असं संशोधन करणारी प्रथाही येत्या पंचवीस वर्षांत सुरू होईल.
३. अमेरिका सध्या सर्व ठिकाणी दादागिरी करत आहे हे व्हेनेझुएलाचे ताजे उदाहरण. वर्गीज कुरियन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की अमेरिकन उच्च महाविद्यालये आणि तेथील शिक्षण घेतलेले तज्न्य हे अमेरिका देशाचे भले होईल हेच संदेश आणि सल्ले देतात, तसेच संशोधन प्रसिद्ध करतात, पाठराखण करतात. त्यांची उदाहरणे दिलेली आहेत. त्यांकडे दुर्लक्ष करून त्यांनी दुग्ध व्यवसायात घट्ट पाय रोवले. आपल्या वेगळ्या पद्धती पुढे आणल्या.
४. क्रमांक तीनचाच एक भाग म्हणजे "आधुनिक विज्ञानाने अमुक तमुक सिद्ध केले आहे की.... यावर शंभर टक्के भरोसा न ठेवणे आणि आपले इतर उपचार रोगांसाठी करून पाहाणे. आपल्या जीवनपद्धती लगेच न बदलणे.
५. या विरोधी प्रचाराला प्रचंड विरोध होईल हे समजून आहे परंतू सर्वच जण एकदम दबून जाणार नाहीत हे महत्त्वाचे.
६. लेखात " आरोग्याविषयी काही लिहा" म्हटले म्हणून हे मुद्दे लिहिले.
Pages