
१. श्रीगणेशा..
कालच हेमंत आजोबा दोन नातवाबरोबर खेळण्यासाठी सुमारे दोन महिन्याकरता ऑकलंडला सुखरूप पोहचला. यावेळी या सुंदर देशाच्या ट्रिपचे शब्दांकन करण्याचा विचार आहे.
खरंतर आता पर्यत कधीही रोजनिशी मी लिहिली नाही. या वेळी मात्र लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे...डायरीत जे काही त्या दिवशी घडते ते लिहिले जाते पण माझी डायरी ही पु. लं. नी वर्णन केलेल्या पानवाला या कथेतील पानवाल्याच्या दुकानातील देखाव्याप्रमाणे असणार आहे अगदी,
"भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाचे वर्णन करणारी, कोणतेही बंधन नसणारी अगदी निर्बंध अशी.."
पूर्वी COEP त शिकत असताना झालेला खर्च पूर्ण लिहून ठेवण्याची सवय असल्याने त्या चार वर्षाची हिशोबाची डायरी लिहिली होती त्यावेळी कॉलेज फी २३२ रुपये आणि हॉस्टेल फी फक्त्त ७२ रुपये होती संपूर्ण चार वर्षाच्या शिक्षणासाठी फक्त्त सुमारे अठरा हजार पर्यंत खर्च आला होता त्यात सुमारे २५० पिक्चर्स वा नाटक बघण्याचाही खर्च होता.आतापर्यत ती डायरी जपून ठेवली होती वाचताना तेव्हाचे खर्चाचे आकडे पाहून गंम्मत वाटते. मंगला, राहुलला फक्त्त दोन ते अडीच रुपयात जुने पिक्चर्स पाहण्यासाठी सर्वं हॉस्टेल रविवारी आवर्जून हजर असायचे. मेस मध्ये सुद्धा per meal charges फक्त्त दोन रुपये असायचेत पंचवीस पैशातील बोटक्लबचा चहा आणि रुपयातील बटाटेवडा याची डायरीत नोंद बघून हसू येते.
खूपजणांना डायरी लिहिण्याची सवय असतें ती चांगली की वाईट हे तुम्ही त्यात काय लिहिता यावर अवलंबून असतें. दुसऱ्या बद्दल चांगले लिहिणार असाल निश्चित चांगली... पण वाईट लिहिणार असाल तर तुम्हास ती गोत्यात आणू शकते.
तस म्हणलं तर,
"आनंदाची बाग निरंतर फुलावण्यासाठी वाईट गोष्टी या विसरण्यासाठीच असतात ..त्या मुळे डायरीत सुद्धा लिहू नये."
काही जणांना बंद कोशात राहणे पसंत करतात, शक्यतो काहीही शेअर करण्यास ही मंडळी तयार नसतात..
किंवा
शेअर केल्याने आपण नकळत आत्मप्रौढीतर मिरवत नाही ना ? हा ही प्रश्न मनात असतो.
पण आलेल्या अनुभवाचे डायरीत जतन करणे ते सांगणे आत्मप्रौढी ठरत नाही. लिहिताना आपले पाय आणि मन जमिनीवर वर असले की आपोआप साधेपणा आणि निर्मळता जाणवते.
आपली डायरी जर सुंदर प्रसंग, माहितीपूर्ण, मनोरंजक आणि कोणास दुखवेल अशी टिका करणारी नसेल आणि स्वतः पेक्षा अनुभवावर केंद्रित करणारी असेल तर शेअर करण्यास काहीच हरकत नाही.
असो आज इथेच थांबतो.
माझ्या न्यूझीलंड डायरीच्या पानात तेथील संस्कृती सुंदर निसर्ग आदी बद्दल लिहिण्याचा मानस आहे
दीड वर्षापूर्वी लिहिलेल्या या डायरीची पान मायबोलीवर शेअर करतो आहे.
रोजनिशीस इंग्रजीत
म्हणतात डायरी
काहींमंडळी लिहितात
त्यात सुंदर शायरी..
अनुभवाचा खजिना
लिहितात डायरीत..
दडला खूप आहे तो
अनेकांच्या कपाटात..
बघितलेल अनुभवलेलं
किवी प्रवास वर्णन..
लिहिणार मी बिनधास्त
प्रकाशणार नित्य मायबोलीवर..
✍️हेमंत नाईक.
२६.०३.२४
क्रमश :
उत्तम आरंभ. पुलेशु.
उत्तम आरंभ. पुलेशु.