हिशोब

Submitted by ध्येयवेडा on 14 December, 2025 - 15:20

ट्रिपल सीट बसून आम्ही वेगात निघालो होतो. मी मध्ये बसलो होतो. वाटेत पर्सिस्टंटची काचेची बिल्डिंग दिसली.
"ग्रॅज्युएशन नंतर इथेच यायचं बरं का" माझं मन माझ्याशीच पुटपुटलं.

दुर्गा आलं.
"दोन कोल्ड, एक हॉट" ठरलेली ऑर्डर.
टेबल-खुर्च्यांवर न बसता रस्त्याच्या कडेला उभं रहायची आमची नेहमीची सवय.
तितक्यात एक बाईक सुसाट आमच्या समोरून निघून गेली.
मागे बसलेल्याच्या खिशातून चार-पाच कागद उडून रस्त्यावर पडलेले दिसले.
मी धावलो.
शंभरच्या चार आणि पन्नासची एक नोट, एकूण साडेचारशे.
त्या गोळा करून मी कडेला येऊन थांबलो.
"वाट पाहूया थोड्या वेळ, कदाचित त्याला समजल्यावर येईल तो घ्यायला."

तास झाला. कोणीच आलं नाही.

कोणी यावं असं माझ्या मनाला वाटतही नव्हतं. मन एका गणितात रमलं होतं.
तीनचे पोहे, दोनचा चहा. पाच नव्वे पंचेचाळीस. जवळपास तीन महिन्याची कॉलेजमधल्या नाश्त्याची सोय झाली.

"वाटत नाही कोणी येईल. काय करूया?" - पहिला.
"समर्पणात देऊ, किंवा गंगाजळी" - दुसरा.
"छे, मला सापडल्या, मी ठेवणार" - मी
"अरे पण?"
"चर्चा नकोय, निघूया?"
त्या दोघांनी एकमेकांशी क्षणभर नजर मिळवली. घरी जाताना तिघांमध्ये एका शब्दाचाही संवाद झाला नाही.

टक टक…
"कम इन."
"सर, गुड न्यूज. आपल्या प्रेडिक्शनप्रमाणे ह्या वर्षी आपला बिझनेस ४५० मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलेला आहे. टार्गेट अगदी थोडक्यात मिस झालं."
"टार्गेट थोडक्यात मिस झालं म्हणजे? कितीने?"
"सर, फक्त ४५० डॉलर्स!"

- भूषण करमरकर

Group content visibility: 
Use group defaults