'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

Submitted by संजय भावे on 11 December, 2025 - 12:49


सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

एकतर हेरकथा वाचणे आणि हेरगिरीवर आधारित चित्रपट पाहणे हा माझा आवडता छंद, त्यात आर. माधवन, संजय दत्त, रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल अशी माझी आवडती कलाकार मंडळी आणि पदार्पणातच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सारखा चांगला चित्रपट देणारा 'आदित्य धर' हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली नसती तरच नवल होते!

काही दिवसांपूर्वी ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर तर ती उत्सुकता अगदी शिगेला पोचल्याने प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी लगेच तो पाहूनही आलो.

आपल्याकडे अ‍ॅक्शन, क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर चित्रपटांच्या अनेक मालिका आल्या आणि त्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाल्या. परंतु हेरगिरीवर आधारित चांगल्या चित्रपटांची मालिका मात्र अद्याप निर्माण होऊ शकली नव्हती. नाही म्हणायला YRF स्पाय युनिव्हर्स म्हणून ओळखली जाणारी आठ चित्रपटांची एक सर्वात यशस्वी मालिका आहे आणि त्यातले बरेच चित्रपट मनोरंजक/करमणूकप्रधान असल्याने पॉपकॉर्न खात आवडीने पाहिलेही आहेत, पण 'त्यांच्या दर्जाविषयी काही न बोललेलेच बरे' म्हणावे अशा प्रकारचेच ते वाटले असल्याने मनात त्याविषयी एक प्रकारची खंतही होती आणि दर्जेदार हेरपटांची एखादी मालिका यावी अशी खूप इच्छाही होती.

'धुरंधर' हा दर्जेदार चित्रपट पाहिल्यावर ही खंत बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि भविष्यात येऊ घातलेल्या ह्या मालिकेच्या आगामी भाग/भागांविषयी अतीव उत्सुकता निर्माण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. सदर मालिकेच्या शुभारंभाचा हा पहिला भाग मलातरी 'आरंभ तो प्रचंड है!' असा वाटल्याने आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली वरील 'इच्छा' लवकरच पूर्ण होण्याची आशाही पल्लवित झाली आहे.

असो, चित्रपटाचे परीक्षण किंवा त्याचे समीक्षण करणे हा माझा प्रांत नसल्याने त्या भानगडीत न पडता हा चित्रपट पाहिल्यावर 'एक प्रेक्षक' म्हणून मला काय वाटले, त्याचे सादरीकरण, मला तो का आवडला हे सांगण्याचा आणि ह्या चित्रपटाचा परिचय करून देताना त्यातल्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखा/पात्रांची ओळख करून देण्याचा 'रसग्रहणात्मक' प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करत आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायची इच्छा असेल त्यांचा तो पाहताना रसभंग होऊ नये म्हणून 'स्पॉईलर्स' टाळण्याची काळजी घेईनच, परंतु 'अविश्वसनीय सत्यघटनांवर आधारित असा हा काल्पनिक' चित्रपट असल्याने आणि त्या 'सत्यघटना' आपणा सर्व भारतीयांच्या परिचयाच्या व भारतीय समाजमनाला खोलवर जखमा देऊन गेलेल्या असल्याने त्यांचा उल्लेख, त्यावरचे भाष्य आणि ट्रेलरमध्ये आलेली दृष्ये, संवाद अशा गोष्टी 'स्पॉईलर्स' वाटणार नाहीत अशी अपेक्षा आहे, पण तरी कोणाला ते तसे वाटलेच किंवा लिहिण्याच्या ओघात अनवधानाने एखाद-दुसरा उल्लेख आला तर त्यासाठी (आगाऊ) क्षमस्व!

-----

सादरीकरण आणि पात्र परिचय :

'हरकत-उल-मुजाहिद्दीन' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या (IC 814) विमानाचे अपहरण करून अमृतसर-लाहोर-दुबई असा प्रवास करत २५ डिसेंबर १९९९ रोजी हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहार विमानतळावर उतरवले होते.

ह्या सत्यघटनेची पार्श्वभूमी असलेल्या ओपनिंग सीनमध्ये टारमॅकवर उभे राहून ह्या विमानाकडे बघणाऱ्या 'अजय सन्याल' (ही अजित डोवाल सदृश्य) व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आर.माधवनच्या क्लोज-अप शॉटने वेब सीरिजच्या धर्तीवर आठ अध्यायांच्या स्वरूपात सादर केलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या मुख्य कथानकाची प्रस्तावना म्हणता येईल अशा पहिल्या अध्यायाची सुरुवात होते आणि पुढच्या पाच अध्यायातून आपल्याला नवनवीन पात्रांची ओळख होत जाते...

चॅप्टर - १ : 'द प्राईस ऑफ पीस'

३० डिसेंबर १९९९ रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री (तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग सदृश्य) 'देवव्रत कपूर' नावाचे एक पात्र विमानाजवळ येऊन पोचल्यावर 'ओलीसांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेल्या मागण्या भारत सरकारने मान्य केल्याचा' त्यांनी आणलेला निरोप विमानातल्या पाच दहशतवाद्यांपर्यंत पोचवण्यासाठी ते दोघे विमानात प्रवेश करतात हा प्रसंग आणि त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी 'जैश-ए-मोहम्मद' ह्या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर केलेल्या हल्ल्याचा प्रसंग अशा दोन सत्यघटनांचा समावेश काही ओरिजनल फुटेजेससह ह्या पहिल्या अध्यायात आहेत.

ह्या दोन्ही घटनांदरम्यान आणि त्यानंतरही सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेविषयीची नाराजी, सामर्थ्य असूनही दहशतवाद्यांसमोर झुकण्याबद्दलचा राग/विषण्णता, त्याची पुढच्या काळात मोजावी लागलेली किंमत आणि अधिकारपदावर असूनही आपण काहीच करू शकत नसल्याबद्दलचे वैषम्य, हतबलता अशा भावना आय.बी. चीफ अजय सन्यालची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन ह्या गुणी कलाकाराने काहीप्रसंगी बोलून तर काही प्रसंगी केवळ चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील हाव-भावांतून खूप छानप्रकारे व्यक्त केल्या आहेत.

"सर मुहं तोडने के लिये मुठ्ठी बंद करना जरुरी हैं... We must infiltrate the very core of terrorism in Pakistan... ताकी वो भारत के खिलाफ अगर निंद मे भी सोचें ना, तो उनके ख्वाब में भी हम बैठे नजर आने चाहिये" - अजय सन्याल

ह्या अध्यायाबद्दल मुद्दाम अजून काही लिहीत नाही, फक्त पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे निर्दालन करण्यासाठी त्याने सरकारला लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना, योजना, आराखडा, मागण्या ह्यापैकी केवळ 'धुरंधर' नामक एक योजना मान्य झाल्याचे कळते आणि इथूनच चित्रपटाची 'खरी' सुरुवात होते एवढेच सांगून पुढच्या अध्यायाकडे वळतो.

चॅप्टर - २ : 'स्ट्रेंजर इन द लँड ऑफ शॅडोज'

"२००४ साली ईशान्य अफगाणिस्तानच्या 'बार्ग-ए-मतल' प्रांतातून पिकअप ट्रक आणि हेलिकॉप्टरने प्रवास करत तोरखम ह्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील इमिग्रेशन चेक पोस्टवरच्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पासपोर्टमधे ठेवलेल्या पैशांची लाच देऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत तिथून बसने प्रवास करून कराचीला पोचलेला 'हमझा अली मझारी' कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याच्या टोळीत शिरकाव करण्याच्या उद्देशाने कराचीच्या 'लयारी टाऊन' मध्ये दाखल होतो."

रणवीर सिंगला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात सशक्त अशी 'हमझा अली मझारी' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ह्या चित्रपट मालिकेतून मिळाली आहे असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही अशाप्रकारे त्याने ती वठवली आहे! ट्रेलर पाहताना त्याचा सुरुवातीचा 'रॉ अँड रस्टीक' लूक चांगला वाटला असला तरी डोळ्यांचा बदललेला रंग मला काहीसा खटकला होता पण चित्रपटात बलोच तरुणाच्या रूपात त्याला पाहताना ते नैसर्गिक वाटले.

क्लोज-अप्स, लॉंग शॉट्स, ड्रोन कॅमेरा आणि 'इश्क जलाकर' ह्या १९६० सालच्या "ना तों कारवां की तलाश हैं" जुन्या गाण्याच्या फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जनचा पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापर केल्याने त्याचा उपरोल्लिखित एंट्री सीन चांगला उठावदार झाला आहे.

चॅप्टर - ३ : 'द बास्टर्ड किंग ऑफ लयारी'

नव्वदच्या दशकात वयाच्या १३व्या वर्षी 'लयारी' मधून गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करून पुढे कराचीचा अंडरवर्ल्ड डॉन बनलेला रेहमान बलोच उर्फ 'रेहमान डकैत' ह्याने स्वतःच्या आईचीही हत्या केली होती. गुन्हेगारी जगतात एकही क्षेत्र असे नसेल ज्यात ह्या रेहमान डकैतचा सक्रिय सहभाग नव्हता. सडपातळ शरीरयष्टीचा आणि वरकरणी शांत वाटणारा हा रेहमान बलोच प्रत्यक्षात अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारा, त्यांना वेळोवेळी मदत करणारा त्यांचा 'मसीहा' अशी आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ह्या अट्टल गुन्हेगाराला पाकिस्तानातल्या राजकारण्यांचा वरदहस्तही लाभला होता आणि तो स्वतः राजकारणात सक्रियही होता!

प्रत्यक्ष जीवनात होऊन गेलेल्या 'रेहमान डकैत'ची व्यक्तिरेखा अक्षय खन्नाने साकारली असून ह्याा भूमिकेचे त्याने अक्षरशः सोने केले आहे.

ह्या अध्यायात अजून एक महत्वाचे पात्र आपल्या समोर येते ते म्हणजे 'पाकिस्तान अवामी पार्टी' (PAP) चा आमदार 'जमील जमाली'. अतिशय बेरकी, वारा वाहील त्याप्रमाणे दिशा बदलणाऱ्या ह्या आमदाराच्या भूमिकेत राकेश बेदीने कमाल केली आहे. आजपर्यंत मुखतः विनोदी भूमिका करणारा कलाकार अशी जी त्याची ओळख होती तीला छेद देत त्याने आपल्या अभिनय क्षमतेचा एक नवा पैलू दाखवून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

अक्षय खन्ना आणि राकेश बेदी बरोबरच रेहमान डकैतचा उजवा हात असलेला 'उझैर बलोच उर्फ उझैर डकैत' आणि त्याचे अन्य दोन साथीदार 'डोंगा' आणि 'सियाही' अशा भूमिका अनुक्रमे दानिश पंडोर, नवीन कौशिक आणि रौहल्ला गाझी ह्या कलाकारांनी छान वठवल्या आहेत.

उषा उत्तप ह्यांनी गायलेले 'रंबा हो हो हो ... ' हे ऐशीच्या दशकात प्रचंड गाजलेले गाणे आणि अन्यही 'रेट्रो' गाण्यांचा ह्या अध्यायात पार्श्वसंगीत म्हणून खुबीने केलेला वापर प्रेक्षकांना नॉस्टॅल्जीक करून जातो.

चॅप्टर - ४ : 'बुलेट्स अँड रोझेस'

अध्यायाच्या शीर्षकात 'गुलाब' दिसल्यावर प्रेक्षकांना आता 'हिरोईनची' एंट्री होणार असा आलेला अंदाज खरा ठरतो.

बालकलाकार म्हणून ज्यांनी 'सारा अर्जुन'ला पाहिले असेल त्यांना 'त्या कळीचे एवढ्या सुंदर फुलात' रूपांतर झालेले पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही!

आमदार जमील जमालीची मुलगी, 'यलीना जमाली'ची भूमिका सारा अर्जुनच्या वाट्याला आली आहे. हे पात्र तसे महत्वाचे असले तरी तिला अभिनयाची चुणूक दाखवण्यासाठी फार काही वाव ह्या पहिल्या भागात मिळालेला नाही, पण दिसली मात्र खूप छान आहे.

नायिकेच्या बरोबरीने ह्या अध्यायात आणखीन एका खलनायकाचीही एंट्री होते.

ओसामा बिन लादेनच्या हयातीतच त्याचा संभाव्य उत्तराधिकारी मानला गेलेल्या आणि २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या 'इलियास कश्मिरी' ह्या अत्यंत क्रूर अशा कुख्यात दहशतवाद्यावर बेतलेली आय.एस.आय. अधिकारी 'मेजर इकबाल' ही व्यक्तिरेखा अर्जुन रामपालने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही!

पाकिस्तानात छापलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटा राजकीय नेत्यांच्या सहभाग/कृपादृष्टीने नेपाळमार्गे भारतात (उत्तर प्रदेशमध्ये) कशाप्रकारे पोहोचत होत्या ह्यावरही या अध्यायात थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे.

चॅप्टर - ५ : 'द जिन्न'

ट्रेलरमध्ये नवीन कौशिक रणवीर सिंगला, "बहोत साल पहले ना... एक शैतान और एक जिन्न में जबरदस्त सेक्स हुवा, नौ महिने बाद जो पैदा हुवा उसका नाम पडा चौधरी अस्लम"
अशी ज्याची ओळख सांगतो त्या 'जिन्न उर्फ एस.पी. चौधरी अस्लम'ची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. नव्वदच्या दशकात पाकिस्तान आणि भारतात ज्या 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे' गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या गाण्याचा वापर पार्श्वसंगीत म्हणून केल्याने सुंजूबाबाचा एंट्री सीनही झकास झाला आहे!

खोट्या चकमकी, राजकारण्यांशी साटे-लोटे अशा अनेक कारणांनी कारकीर्द वादग्रस्त ठरलेला 'चौधरी अस्लम' नावाचा एक खराखुरा पोलीस अधिकारी पाकिस्तानात प्रत्यक्षात होता. संजूबाबाला ही भूमिका वठवण्यासाठी कुठलेही वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीयेत. त्याने अशा प्रकारच्या अनेक भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत आधी करून झाल्या असल्याने तो ड्रेसिंग रूममध्येच 'सेट' होऊन आलेल्या बॅट्समन सारखा वाटला आहे.

चित्रपट सुरु झाल्यापासून तब्बल दोन तासांनी होणाऱ्या मध्यंतरापूर्वी संपणाऱ्या ह्या पाचव्या अध्यायात आणखीन बऱ्याच रोचक घटना पाहायला मिळतात.

पहिल्या पाच अध्यायांमधून सर्व प्रमुख पात्रांची ओळख झाल्यानंतर पुढच्या चॅप्टर - ६ : 'द डेव्हील्स गार्डियन', चॅप्टर - ७ : 'द बटरफ्लाय इफेक्ट' आणि शेवटच्या चॅप्टर - ८ : 'एट टू ब्रुटस' ह्या तीन अध्यायांमध्ये घडणाऱ्या थरारक घटना/प्रसंग अधिक वेगवान होऊन चित्रपट क्लायमॅक्स पर्यंत पोचतो. अर्थात चित्रपटाचा पुढचा भाग १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार असल्याची पाटी दिसते त्यामुळे 'क्लायमॅक्स' म्हणणे योग्य ठरणार नाही, त्याला 'चित्रपटाचा हा पहिला भाग संपतो' असे म्हणू शकतो.

असो... जवळपास साडेतीन तासांचा हा पहिला भाग कुठेही कंटाळवाणा वाटला नसून खूपच आवडला आहे आणि त्याच्या पुढच्या भाग/भागांबद्दल चांगलीच उत्कंठा निर्माण झाली आहे. पार्शवसंगीतात जुन्या गाण्यांचा केलेला वापर मजा आणतो. 'कास्टिंग' तर इतके परफेक्ट वाटले की कुठलीही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराच्या जागी अन्य कोणी कलाकार असायला पाहिजे होता असा विचारही मनात आला नाही.

संगीताबद्दल बोलायचे तर 'इश्क जलाकर' हे एक गाणे सोडले तर बाकी कुठलेच गाणे लक्षातही राहिले नाही. अर्थात जी काही अन्य गाणी आहेत ती बघताना वैतागवाणीही वाटली नाहीत हे विशेष.

सत्यघटना आणि प्रत्यक्ष जीवनातल्या व्यक्तिरेखांना सिनेमॅटिक लिबर्टी घेत काल्पनिक घटना आणि पात्रांची जोड देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी छान कथा/पटकथा लिहिता येऊ शकते, आणि आपल्या दिग्दर्शकीय प्रतिभेचा वापर करून त्यावर एक छान व्यावसायिक कलाकृती कशी निर्माण करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण लेखक/दिग्दर्शक आदित्य धर ह्याने या चित्रपटाच्या रूपाने चित्रपट रसिकांसमोर पेश केले आहे!

_____

एक विशेष सूचना : चित्रपटात हिंसा आणि रक्तपाताची अनेक दृश्ये असल्याने सेन्सॉर बोर्डाने त्याला (A) प्रमाणपत्र दिलेले आहे. अशी बहुसंख्य दृष्ये CGI/VFX तंत्रज्ञानाने निर्माण केली असली तरी आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये आणि ज्यांना अशा गोष्टींचे वावडे नसेल त्यांनी हा चित्रपट शक्यतो मोठ्या पडद्यावरच पाहावा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह संजय भावे.. कडक चित्रपट ओळख. कुठलाही स्पॉयलर न देता चित्रपटाची झलक दाखवली. प्रत्येकाची एन्ट्री आणि व्यक्तिरेखा कशी असेल हे डोळ्यासमोर आले आणि चित्रपट बघायची उत्कंठा फार वाढली. बघणार होतोच. आता नक्कीच बघणार!

मस्तं लिहिले आहे !
आवडलाच धुरन्धर.. काहे तृटी आहेत पण तरीही, स्टोरी टेलिंग, सादरीकरण आणि परफेक्ट कास्टिंग !
मला सगळ्या चॅप्टर्सची नावं पण खूप आवडली , जुनी गाणी रिमिक्स स्वरुपात येतात तीही आवडली !
रणवीर सिंग, अक्शय खन्ना , अर्जुन रामपाल एका वेळी स्क्रीन वर येतात तेंव्हा ‘हॉटनेस ओव्हरलोड’ इतकेच मनात येते..आग लगादी आग लगादी आग लगादी Happy
सगळीकडे अक्षय खन्नाची जास्तं स्तुति होतेय, स्टोल द शो वगैरे.. नो डाउट अक्षय खन्ना उत्तम अभिनय केला आहे पण रणवीरपेक्षा भारी नाही , मला तरी सर्वात भारी रणवीरसिंगच वाटला, कॅरॅक्टरमधे घुसणे हा त्याचा हातखन्डा आहे.. हवे तिथे लाउड आणि बरेचदा फक्तं डोळ्यातून्/बॉडी लँग्वेज मधून अभिनय करतो.. ज्या ज्या फ्रेम मधे रणवीर आहे, डोळे खिळून रहातात त्याच्यावर !
अर्जुन रामपाल, माधवन, संजय दत्त सगळे आपापल्या रोल मधे मस्तं.
संजय दत्त आधी डोळ्यात खुपत होता, मिसफिट वाटत होता पण ओरिजिनल अस्लम चौध्॑रीचे इंटरव्ह्युज बघितल्यावर संजय दत्तच बरोबर आहे असे वाटले !
राकेश बेदी इज टोटल सरप्राइज.. मस्तच केलय त्याचं कॅरॅक्टर !
बॉलिवुड वाल्यांना कायम मिड्ल एज हिरोजसाठी इतकी यंग हिरॉइनच का पाहिजे असे वाटत असताना पुढे जस्टिफाय होत जाते याचे कारण स्टोरीमधे !
त.टि :
सिनेमात कुठेही इस्लामिफोबिया दिसत नाही, इन फॅक्ट पाकिस्तान हेट्रेड वगैरे अ‍ॅजेन्डाही नाही.
भारतावरचे अ‍ॅटॅक्स दाखवताना त्यात पाकिस्तान बरोबरच भारतातल्या इन्टरनल पॉलिटिक्सलाही हाय्॑लाइट केले आहे "इंडियाका पहला दुश्मन इंडिया खुद है, पाकिस्तान तो नंबर २ पे आता है" - इति अजित दोबल.

स्पॉयलरः
चित्रपटाची लेन्थ थोडी कमी चालली असती, शेवटच्या फाइट सीन्सला तर कात्री लावली असती तरी चालले असते !
अक्षय खन्ना सारखा किरकोळ शरीरयष्टीचा माणुस संजय दत्त, रणवीर सिंग अशा धिप्पाड माणसांच्या उरावर बसून मारामारी करून त्यांना लोळवेल हे अगदीच अनबिलिवेबल वाटते.
बाकी पूर्ण सिनेमातल्या ‘गोअरी’ सीन्स नंतर शेवटची मारामारी मात्रं ७० च्या दशकातल्या ढिशुम ढिशुम बॉलिवुड टाइपची वाटली.
कॅरॅक्टरसच्या भाषेवर/ अ‍ॅक्सेन्ट्सवर मेहनत घ्यायला हवी होती, सगळे लोक इन्डियन हिन्दीतच बोलतात ,
आयाबहिणींच्या शिव्याही कधे बम्बैय्या , कधी अनुराग कश्यपच्या युपी बिहार कॅरॅक्टर सारख्या देतात, पाकी/बलुची/सिन्ध लोकांचे अ‍ॅक्स्नेट्स कुठे दिसतच नाहीत, मुंबई मधले/युपी मधले गँगवॉर वाटते अशावेळी.
सिनेमातली कॅरॅक्टर्स कट्टरपंथीय दाखवले अहेत पण मेन लिड कॅरॅक्टरची कानाची भोकं फार प्रॉमिनन्टली टोचलेली दिसतात Happy
पाकिस्तानत अशा फॅन्सी बाइक्स, असे फॅन्सी नाइटक्लब्ज वगैरे आहेत का हे बघून पाकिस्तानी लोकच कनफ्युज झालेत म्हणे, असतील तर शोधायला पाहिजेत असे काहींचे म्हणणे आहे Proud

वाह काय मस्त डिटेल मध लिहिले आहे. अगदी वाटत होतं कोणीतरी (चांगल्या अर्थाने) चिरफाड करावी. Happy एवढं कसं लक्षात राहिलं तुम्हाला चॅप्टर्सची नावं वगैरे.. मानलं... ते नावं देणं ब्रेकिंग बॅड किंवा प्लुरिबस टाईप्स वाटलं. नावं एकदम गोंडस पण आत काहीतरी खतरनाक!

मलाही खूप दिवसांनी एक मस्त सिनेमा थिएटरला बघितल्याचं समाधान वाटलं. कारण ते जे ड्रोन इफेक्ट, सिनेमॅटोग्राफी, म्युजिक चा त्या त्या सीनवर असलेला इफेक्ट हे कॉन्संट्रेशनने बघण्यासारखंच आहे मोठ्या पडद्यावर. घरी ती मजा अजिबात वाटणार नाही आणि कधीकधी हे सोशोपॉलिटिकल मुव्हीज कंटाळवाणे वाटण्याची शक्यता असते पण इथे डायलॉग्ज, स्टोरीलाईन एकदम कडक आहे. ३-३.५ तास कसे संपले कळलं नाही.
डीजे ने लिहिलंय तसं काहीकाही त्रुटी नक्की आहेत पण डोळेझाक करू शकतोय. एका रील मधे खुद्द अजित डोवाल कान टोचल्यावरच्या खर्‍या अनुभवाबद्दल बोलले आहेत. त्यामुळे तो मुद्दा विचारात घ्यायला हवा होता.
रणवीर तर उफ्फ!! त्याची ती कधी भेदक, कधी हळवी, कधी हताश, निराश, रागीट,संशयी, कधी सगळं काही टिपणारी नजर केवळ डोळ्यातून दाखवणं अफाट आहे. मलाही अक्षयपेक्षा त्याचाच रोल जास्त आवडला. अक्षयचं तोंड वाकडं करत बोलणं थोडं टाळता आलं असत का वाटून गेलं.
राकेश बेदी वॉज रिअल सरप्राईज पॅकेज पण तरी मधेच एकदम कॉमेडी करेल का अशी भिती वाटत राहिली. एकेक कॅरेक्टर सही पकडलेत आर माधवनच्या सकट!

ओव्हरॉल गुड पॅकेज मुव्ही.

रणवीर तर उफ्फ!! त्याची ती कधी भेदक, कधी हळवी, कधी हताश, निराश, रागीट,संशयी, कधी सगळं काही टिपणारी नजर केवळ डोळ्यातून दाखवणं अफाट आहे. मलाही अक्षयपेक्षा त्याचाच रोल जास्त आवडला. अक्षयचं तोंड वाकडं करत बोलणं थोडं टाळता आलं असत का वाटून गेलं.
<<<
+111111

मस्त लिहिलेय. स्पॉयलर न देता छान ओळख करून दिलेय.आदित्य धर' चे आधीचे चित्रपट पाहता हा दमदार लेखक / दिग्दर्शक पुन्हा त्याच दुहेरी भूमिकेत म्हंटल्यावर मलाही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.मी अजून पाहिला नाही पण पाहायचाय.

गाणी मला आधी जेव्हा नुसतीच ऐकली तेव्हा खास वाटली नाहीत.पण आता अक्षयवर चित्रित अरेबिक गाणं कॅची वाटतंय वाजून वाजून हिट होण्यासारखं, झालंय पण .रणवीर चा लूक सॉलिड जबरदस्त वाटतोय प्रोमोत एकंदरीत सगळ्यांच्याच लुकवर मेहनत घेतलेली दिसतेय.

अतिशय संथ चित्रपट... एडिटिंग खराब आहे... रियल इव्हेंट्स वापरून फिक्शन स्टोरी मारली आहे... Rरणवीर मिसफिट वाटतो..
खरा भाव अक्षय खन्ना खाऊन गेला आहे..
गँग्स ऑफ वासेपूर बघतोय कि काय असेच वाटत रहते......

व्वा! कडक चित्रपट ओळख.
विशेष सूचना विशेष आवडली .
त्यानुसार मी तरी पाहणार नाही.

आजच्या काळातल्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या वेब सिरीज पाहून आणि रक्तरंजित व्हिडीओ गेम्स खेळूनही ज्यांची नजर अशाप्रकारच्या दृष्यांना सरावली नसेल त्यांनी हा चित्रपट बघू नये >> Lol

ट्रेलरमधे पाहिलेले दृश्य ज्यांना भयानक वाटले त्यांना वेब सिरीज मधली हिंसाचाराची दृश्ये आवडत असतात आणि ते रक्तरंजीत व्हिडीओ गेम्सही खेळत असतात, तरीही त्यांना धुरंधरवर शंका घ्यायचीय , असेच ना Proud

सूचनेबद्दल आभार.

चित्रपट अती लांबलाय असे वाटते.
मी कुठेतरी ऐकले की एकाऐवजी दोन भाग करणे हा शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय होता. त्याचा परिणाम असू शकतो.

पण एकंदर सिनेमा एकदम एपिक प्रकारचा फील देतो, एकदम मोठा पट, कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स आणि त्यांच्यातले लागे बांधे... बोअर करणार नाही.

पुढील पार्ट मध्ये गोष्ट शिल्लक असो इतकीच आशा.

संजयजी , परीक्षण मात्र झकास लिहीलंय. वाचून उत्सुकता वाटू लागली आहे. चॅप्टर पद्धतीने चित्रपट पहिल्यांदाच ऐकला. अशा पद्धतीचं परीक्षण पण पहिल्यांदाच वाचलं.

अक्षय खन्ना ताल मधे सुद्धा प्रचंड आवडला होता. अर्जुन रामपाल देखणा आहेच. पण अभ्हिनयात ठोकळा होता. आताचं माहिती नाही. रणवीर सिंग अजिबातच आवडत नाही. रोस्ट शो मधलं त्याचं आणि अर्जुन कपूरचं बळंच हसणंं इतकं डोक्यात गेलं होतं कि पैसे देऊन थेटरला सोडाच, फ्री मधे घरात सुद्धा यांचे सिनेमे बघायची तयारी नाही. एखाद्याला बघायला जायचं तर त्याच्या बद्दल थोडा तरी रिस्पेक्ट हवाच कि. Happy

आजच शोले - फायनल कट सुद्धा रिलीज होतो आहे. आम्ही सगळी फॅमिली एकत्र जमलो कि बघायला जाणार आहोत. दोन्ही सिनेमे एकत्र आल्याने एक गोष्ट जाणवली. त्या वेळी शोले वर हिंसा दाखवल्याचे खूप आरोप झाले होते. त्यांना शेवट सुद्धा बदलायला लावला. मागच्या पिढीतल्या लोकांना अजूनही शोले म्हणजे हिंसा हे समीकरण डोक्यात पक्के आहे. आज अंगाची त्वचा सोलून काढताना दाखवली तरी लोकांना काही वाटत नाही. कुठल्या कुठे फरक पडलाय. अवघड आहे.

वाह संजय भावे.. कडक चित्रपट ओळख. कुठलाही स्पॉयलर न देता चित्रपटाची झलक दाखवली. प्रत्येकाची एन्ट्री आणि व्यक्तिरेखा कशी असेल हे डोळ्यासमोर आले आणि चित्रपट बघायची उत्कंठा फार वाढली. बघणार होतोच. आता नक्कीच बघणार!

+१०८

धुरंधर पाहून मोदीजींनी केलेल्या बऱ्याच गोष्टींच्या मागे काय लॉजिक होते ते समजले. नोटबंदी च्या मागे नक्की काय कारण होते ते समजले.

छान सविस्तर परिचय करून दिलात. प्रतिसाद ही आवडले.

अति रक्तरंजित हिंसाचार नाही बघू शकत, वेबसिरीजमध्येही नाही बघू शकत, तिथे सीन्स पुढे नेता येतात. त्यामुळे थिएटरमध्ये नाही बघणार. ओटीटी वर आल्यावर विचार करेन.

बहुतेक उद्या बघणार अहे. पण गोअर असल्याने जरा साशंक आहे कितपत आवडेल. तेवढे दुर्लक्ष करायचे, डोळे मिटायचे न काय.

मोदींनी नोटबंदी केल्यावर पाकिस्तानातला नकली नोटा छापणार माणूस हार्ट अटॅक येऊन मेला ते दाखवलंय का?