मनी वसे ते AI दिसे
शकुंतला साठे, एका आयटी कंपनीत नोकरीला होती. रिया भटनागर तिची जीवश्च कंठश्य मैत्रीण . दोघी ही समवयस्क होत्या. एकाच वेळेस कामाला लागल्या होत्या. दोघी सुंदर होत्या पण नावाप्रमाणे शकुतंलाचे केस विलोभनीय होते. मोकळे सोडले किंवा एक वेणी घातली तर फार घोट्यापर्यंत पोहचणारी आणि केसाचा अंबाडा घातला तर हमखास तिची मान दुखायची. बऱ्याच मैत्रिणींनी केस कमी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु तिचे केसांवर खूपच प्रेम होते. या केसांमुळे ऑफिसमधील पुरुष वर्गच नव्हे तर जाणारे येणारे लोकं सुद्धा आश्चर्यचकित होत. कित्येक मुली सुद्धा तिच्या केश संभारावर जळत असत. ती स्वतःच्या कारने प्रवास करत होती म्हणून ठीक नाहीतर मुंबईच्या लोकलमध्ये किंवा बस मध्ये तिचे केस केव्हांच कापले गेले असते.
शकुंतला तुसडी नव्हती. ती बोलघेवडी होती. पण कोणीही फारच जवळ यायचा प्रयत्न केल्यास तिने फटकारले होते. एक दोघांनी श्रीमुखात खाल्यावर लोकं तिला बिचकून असायचे. तस म्हंटल तर ती पार्टीत सामील व्हायची. गप्पात भाग घ्यायची. ट्रिपला यायला तयार व्हायची पण हे सगळं ठराविक अंतर राखूनच.
ऑफिस तस छोटंस होत. दोनशे लोकांची टीम एका वेळेस काम करत असे. टीम मध्ये दहा-दहा चे वीस ग्रुप होते. प्रत्येक ग्रुप चा एक टीम लीडर होता. पाच टीम लीडरवर एक ग्रुप लीडर होता आणि चार ग्रुपवर एक प्रोजेक्ट मॅनेजर होता. प्रोजेक्ट मॅनेजर होता शशी मुखर्जी त्याचा ऑफिस मध्ये एवढा दरारा होता कि सर्व जनता त्याला मोगॅम्बो म्हणायची. मोगॅम्बो खुश होण्याचे प्रसंग तसे कमीच होते. त्यामुळे त्याची बदली दोन तीन महिन्यात दुसऱ्या ब्रांचला होणार आहे या बातमीने लोकं खुश होते. शकुंतलाला ऑफिस मध्ये सगळेच शला म्हणत. शला आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यांचा पार्ल्यात हनुमान रोडवर थ्री बीएचके प्लॅट होता. पूर्वी तिथे आई वडीलही राहत असत परंतु त्यांना मुंबईचे धकाधकीचे जीवन नको असल्यामुळे त्यांनी कामशेतला दहा एक्कर जागा घेऊन फार्महाऊस बांधले होते. पाणी असल्यामुळे शेतीत बारमाही भाजीपाल्याचे उत्पन्न भरपूर होते. शला आणि रिया फ्लॅट मध्ये राहत होत्या. त्या दोघीचा अलिखित नियम होता की पुढे मागे कुणाचाही बॉयफ्रेंड फ्लॅट मध्ये येणार नाही. त्यांचं ऑफिस वेस्टर्न एक्सप्रेसवेवरच गोरेगाव जवळ होत. दोघेही एकत्र जायच्या आणि यायच्या. शला आणि रियाचं गतिमान पण शांत जीवनचक्र चालू होत. रिया आणि शलाच्या घट्ट मैत्रीमुळे तिच्यापासून ऑफिस रोमिओ दूरच राहत असत. त्यांच्या ऑफिसमध्ये निम्याहून जास्त मुलीच होत्या आणि सर्वच मॉर्डन होत्या. काही विकेंडला शलाची 15-20 मंडळी तिच्या फार्महाऊसवर घालवून परत येत असत. एकंदरीत आयुष्य कसं छान चालल होते. त्यात ऑफिस मध्ये एक बातमी पसरली. मोगॅम्बोच्या जागी येणारा , अमेरिकेतच शिकला आहे आणि तिथे जरी त्याचा जन्म झाला असला तरी त्याला अमेरिकन संस्कृती अजिबात पटलेली नाही. त्यामुळे त्याने मुद्दामहून भारतात बदली करून घेतली आहे. अशातच एकेदिवशी रिया आणि शलाला ऑफिस मध्ये यायला उशीर झाला. रिया धावत पळत वर गेली पण शलाला गाडी पार्क करून वर जाईपर्यंत अजून उशीर झाला. ऑफिसेसमध्ये ती पोहचली तेव्हा रेसिसपशन मध्ये एक तरुण बसला होता. ढगळ टीशर्ट त्याहून ढगळ जीन्स आणि कोल्हापुरी चपला. असा त्याचा गबाळ्यासारखा पोशाख होता. आज तिने केसांची वेणी घालून केस खालपर्यंत सोडले होते. रिसेपशन मध्ये तिने मोगॅम्बो आला नसल्याची खात्री करून घेतली आणि ती आत जायला वळली. त्याच वेळी त्या तरुणाच्या तोंडातून एक शीळ बाहेर पडली. त्याच बरोबर एक फ्लाईन्ग किस चा आवाज ही तिला ऐकू आला. तिची दृष्टी आग ओकत होती पण ती चटकन वळल्यामुळे शेपटा तिच्या पुढ्यात आला होता. तरुण 'काय सुंदर केस आहेत हो तुमचे'
'शला 'माझी चप्पलही सुंदर आहे पाहिजे का?'
तरुण 'नको माझ्याकडे छान कोल्हापुरी आहे'
त्या तरुणाचा राग तर आला होता पण जास्त शोभा करणे योग्य नाही असे वाटून ती रिसेप्शनच्या मायाकडे वळली. मायाला तिनें डोळ्यानेच कोण आहे असे विचारले. मायाने एक सील्ड इन्व्हलप दाखवून सांगितले की तो सिव्ही घेऊन आला आहे आणि तो नोकरीच्या शोधात आहे. शलाने वळून त्या तरुणाकडे पहिले तो मिश्किलपणाने हसत होता. आणि त्याचे निळसर डोळे खोडकर मुलाप्रमाणे चमकत होते. शला चरफडतच आत गेली आणि आपल्या क्युबिकल मध्ये जाऊन बसली. थोड्या वेळाने मोगॅम्बो आला. तो बंद इन्व्हलप घेऊन आत गेला. मोगॅम्बो आणि त्याचे काही बोलणे झाले. मोगँबोने त्या तरुणाला बाहेर नेऊन वेगवेगळे ग्रुप लीडर, टीम लीडर आणि टीम मेम्बर्स यांची ओळख करून दिली आणि त्याला इथे काम करायला आवडेल का? असे विचारले. ओळख करून देता देता शलाच्या ग्रुप जवळ येताच तिला दिसेल असा हळूच डोळा मारला. शला एकदम ओरडली सर हा माणूस गुंड आणि मवाली आहे आता त्याने आणि ती थबकली. पुढे काय बोलावं तिला काही कळेना. तो मात्र तिच्याकडे खोडकर पणाने पाहत होता. ग्रुप मधल्या इतरांनाही काय झाले हे कळेना. शला दिवसभर धुसमुसत होती. शेवटी तिने रियाला झालेले सर्व सांगितले. रिया तिला म्हणाली, 'त्यात त्या गरीबाचा काय दोष, तू सुंदरच आहेस. तू असताना आमच्याकडे कोण बघेल?'. थट्टा मस्करीत दोघी रमून गेल्या. दुसऱ्या दिवशी रविवारी दोघीत तीच चर्चा , रिया तिला म्हणाली तो अजागळासारखा राह्तो खरा पण किती हँडसम होता आणि त्याचे ते निळसर डोळे तुमचा वेध घेतात. शला म्हणाली आणि तो मारला गेला की मनाला जखमा होतात आणि आपल्या सारख्या पोरीने अशा अजागळाशी का म्हणून बोलावे.
तो आठवडा तसाच गेला मन शांत करण्यासाठी पुढच्या विकेंडला तिने एकटीनेच कामशेतला जायचे ठरवले. गाडी नेण्या पेक्षा तिने शुक्रवारची दुपारची डेक्कन एक्सप्रेस पकडली. लोणावळ्याला तिचे वडील कार घेऊन येणारच होते. लोणावळा स्टेशन बाहेर येताच तिला पहिला अपशकुन झाला. पंचवीस-तीस फुटावर तो अजागळ उभा होता. फक्त आता त्याच्या पाठीवर सॅक होती. बरच वेळ वाट पाहिल्यावर तिने शेवटी टॅक्सी करून यायचे ठरवले. तोपर्यंत तो तरुण रस्त्याने चालत निघाला होता. बरं झालं कटकट गेली असे म्हणून ती टॅक्सितून निघून गेली. घरी गेल्यावर तिला कळले की गाडी नादुरुस्त असल्यामुळे येऊ शकली नाही. चहा होऊन संघ्याकाळी गप्पा टप्पा सुरु झाल्या. साधारणतः अर्ध्या पाऊण तासाने त्यांच्या घराची बेल वाजली. ज्याअर्थी कुत्री भुंकली नाहीत त्या अर्थी कोणीतरी ओळखीचे आले असावे असे सर्वाना वाटले. घाई घाईत ती दार उघडायला लागली. दारात तो मघाशी भेटलेला अजागळ उभा होता. हसत त्याने हळूच डोळाही मारला. त्यांची कुत्री जेनी शांतपणाने त्या माणसाशेजारी उभीं होती आणि तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तेवढ्यात तिचे वडीलही मागून आले.
तो तरुण म्हणाला 'नाही हो कुत्री सुद्धा माझ्यावर भुंकत नाहीत'. शलला ते शब्द चांगलेच झोंबले . तिचा स्फोट झाला व ती म्हणाली गुंड , मवाली मेला, माझ्या मागे मागे का आलास इथे?. तरुण म्हणाला, 'मी सोंदर्याचा भोगता आहे जिथे सौन्दर्य दिसते तिथे मी जातो'. वडिलांनी शलाला शांत केले आणि विचारले कोण तुम्ही आपल्याला काय पाहिजे ? तो तरुण म्हणाला आपणच साठे साहेब का? मी आपल्याकडेच येणार होतो. माझे नाव समीर मराठे. वडिलांनी समीरला आत बोलावले आणि शला आईकडे निघून गेली.
साठे त्या तरुणाला म्हणाले, 'क्षमा करा गाडी पाठवता नाही आली पण आपण कसे आलेत ?'
समीर म्हणाला ' मी चालत चालत आलॊ, मला असे आवडते.'
आई ने तांब्या-भांडे बाहेर आणले आणि ती समीरकडे थोड्याश्या तिरस्कारानेच पाहत होती. हा समीर मराठे याच्याबद्दल मी तुला सांगितलेच आहे आणि समीर ही माझी बायको. आईचा चेहरा एकदम आनंदाने फुलाला तिने तिथूनच हाक मारून सांगितले शला पाहुण्यांकरिता चहा आणि बिस्कीट आण पाहू? काही मिनिटातच शला चहाचा कप घेऊन आली आणि तिने तो टी पॉय वर धाडकन आपटला. समीर तिच्याकडेच रोखून बघत होता. आई वडील मंद हसत होते. शला थोडे रागाऊनच म्हणाली सांगा सांगा पाहुण्यांची अजून काही सरबराई करायची आहे का ? फारच प्रेम बसलं असेल तर त्याला जावई करून घ्या असं म्हणून नाक मुरडून परत आत निघून गेली. बाहेर आई आणि बाबा का हसत आहेत तिला कळले नाही. पण आपल्याच बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन ती ओशाळली.
रात्री जेवायला सगळे एकत्रच बसले. राधाबाई वाढत होत्या . वाढता वाढता राधाबाई बाबांना म्हणाल्या, 'बाबा , ताईंना नवरा आवडलेला दिसतोय त्या जावई करून घ्या म्हणतात , मग घेताय का ?' हे ऐकताच आई-बाबा जोर जोरात हसू लागले. शलाचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. समीर म्हणाला राधाबाई तुमच्या ताईंकडे पहा कश्या रागावल्या आहेत आणि तो चक्क गाणे म्हणायला लागला 'नच सुंदरी करु कोपा, मजवरी धरी अनुकंपा.' हे ऐकल्यावर शला भडकली. ती फटक्करून बोलली लायकी तरी आहे का तुझी ? मी एका एमएनसी सॉफ्टवेअर कंपनीत टीम लीडर आहे आणि तू हातात कागदाची भेंडोळी घेऊन फिरतो. हे ऐकताच त्याला हसून हसून ठसका लागला. त्या दिवशी शलला जेवण काही गेले नाही . आई-बाबा, राधाबाई सगळेच तिच्याकडे पाहून हसत आहेत हे पाहून दन-दन पाऊले टाकत झोपायला गेली. रात्री काही तिला लवकर झोप लागली नाही. सहाजिकच सकाळी ती उशिरा उठली. आई-बाबा व्हरांड्यात चहा घेत बसले होते आणि समीर चक्क गड्यांबरोबर शेतात काम करत होता. जेनी कुत्री त्याच्या मागे टून-टून पळत होती. बाबा म्हणाले, 'शला मुलगा चांगला आहे रूपवान आहे जिद्दीचा आहे, त्याच सर्व घरं माझ्या परिचयाचे आहे, बरं आपण दोघेही एकाच जातीतील आहोत तर मग काय हरकत आहे लग्न ठरवायला?.' शला म्हणाली, बाबा काहीतरी बोलू नका, मी जाते माघारी मुबंईला. ते बघितलं का? तो चिखलात काम करतोय, गाड्या माणसांबरोबर गप्पा मारतोय त्यांच्या बरोबर कदाचित बिड्याही फुंकेल आणि कदाचित हातभट्टी ही घेईल. अशा माणसाशी मी लग्न करू का ?'
पोरी कुणालाही कमी लेखू नये आणि शेतीबद्दल म्हणशील तर अगदी हार्लेस्ट स्ट्रीटवरचा प्रख्यात सर्जनही शनिवार-रविवार बटाटे लावण्यात दंग असतो. उद्या दुपारी मी आणि आई तुझ्या बरोबर मुंबईला येतो. समीरलाही बरोबर घेऊ, तुला तुझ्या फ्लॅटवर सोडून समीरला आम्ही त्याच्या घरी पोहचवू आणि परत तुझ्याकडे येऊ ?
शला, 'त्याच्या घरी ? म्हणजे तुम्ही धारावीत जाणार तर ?'
सकाळचे जेवण कसे बसे उरकले त्यानंतर समीरला कारल्याची लेणी बघायची होती. आई -बाबांना येणे शक्यच नव्हते शेवटी नाइलाजाने शला त्याच्याबरोबर गेली. वर चढता चढता उंच टाचेच्या चप्पलमुळे टचामळ तिला प्रचंड त्रास होत होता. त्याच्या कोल्हापुरी चपला मात्र छान चालल्या होत्या. शेवटी त्याचा आधार घेत कसे बसे ते दोघेही वर गेले. संध्याकाळी घरी आल्यावर जेवण उरकून ती झोपीच गेली इतकी ती दमली होती.
दुसऱ्या दिवशीचे जेवण आटपून सगळेजण त्यांच्या इनोव्हाने मुंबईला जायला निघाले. पण आयत्यावेळी ड्राइवर धडपडला. शेवटी समीर बाबांना म्हणाला ' बाबा तुमची हरकत नसेल तर मी गाडी चालवू का?' शला फटकन त्याला म्हणाली, 'अशी मोठी गाडी पहिली आहेस का कधी? चालवायच्या गोष्टी करतोस.'
समीर अतिशय सफाईने गाडी चालवत होता. गूगल मॅप नुसार त्याने पोवई वरून वेस्टर्न एक्सप्रेसला येऊन त्यांना पार्ल्यात सोडले. इमारतीपाशी पोहचल्यावर गाडी बंद करून त्याने किल्ली बाबांना दिली. पण बाबांनी अतिशय आग्रह केल्यामुळे तो त्यांच्याबरोबर शलाच्या फ्लॅटवर गेला. आत रिया होतीच समीरला पाहून ती दचकलीच. शेवटी समीर उठला आणि जायला निघाला , तो बाबांना म्हणाला नका येऊ सोडायला कारण परत येताना त्रास होईल त्यापेक्ष इथेच आराम करा . आणि दोन दिवसांनी तुमचा ड्राइवर आला की परत जा. जर ड्राइवर आलेला नाही तर मी ड्राइवर अरेंज करून देईन. असे म्हणून तो बाहेर गेला. जाता जाता परत शलाला डोळा मारायला तो विसरला नाही. रिया बाबांना म्हणाली, 'हा कसा काय इथं आला आहे?.' बाबा म्हणाले, मला काय माहित? शला आणि समीर दोघे मुंबईहून एकदमच घरी आलेत . बाबा पुढे म्हणाले, रिया शलाला तर तो फार आवडला आहे आणि त्याला आमचा जावई करून घ्या म्हणून आमच्या पाठीमागे लागली आहे'. रिया डोळे विस्फारून पहाताच राहिली. शलाच्या डोळ्यातून अंगार झिरपत होते. रिया शलाकडे वळून म्हणाली अभिनंदन शला हे केव्हा जमवलंस ?
बाबा म्हणाले, 'एक तर दोघे जोडीने आले आणि काल जोडीने एकविरा देवीच्या दर्शनालाही जाऊन आले. विचार तिला हे खोटं आहे का?'
अर्थात ते खोटं तर नव्हतंच पण बाबांच्या बोलण्याचा भलताच अर्थ निघत होता. शलाने कपाळावर हात मारून घेतला. ऑफिसमध्ये पोहचल्यावर थोड्या वेळातच मोगँबोने पब्लिक अनाउन्समेंट केली. 'अटेन्शन प्लिज ,माझ्या एका जवळच्या मित्राच्या मुलाला आपल्या ऑफिस मध्ये काम करण्याची इच्छा आहे. पण त्याला त्याची खात्री होत नाही तो काय काम करू शकेल. त्यामुळे पुढील चार दिवस तो प्रत्येक ग्रुप सोबत ओळख करून घेईल आणि ग्रुप लीडरसोबत चर्चा करून मग ठरवेल कुठल्या ग्रुप मध्ये काम करायचं. हा मित्र आपल्या एका मोठ्या इन्वेस्टरचा मित्र असल्याने समीरला आपल्याला सांभाळून घ्यावे लागेल. गुडलक.'
दुसऱ्या दिवशी समीर ऑफिसमध्ये आला. आज तो जरा बऱ्या वेशात होता.आज जरा शर्ट तरी बरा होता. मोगॅम्बोने समीरसोबत चारही ग्रुप लीडरची ओळख करून दिली. त्यानंतर पुढचे तीन-चार दिवस प्रत्येक ग्रुप सोबत नावाने ओळखी करून घेतल्या आणि ग्रुप लीडर सोबत कामाबद्दल बोलला. ग्रुप मध्ये बोलताना त्याने बावळटासारखे असंख्य प्रश्न विचारले. साध्या साध्या गोष्टी त्याला माहित नव्हत्या असे सर्वांच्या लक्षात आले. प्रत्येक ग्रुपला हा आपल्यामध्ये नकोच असे वाटत होते. शलाच्या ग्रुप मध्ये तर तिला तो नकोच होता. पण तिच्या ग्रुप मधील दुसऱ्या टीम मधील सॅली तिला म्हणाली, 'हा दिसतो तितका बावळट आणि गबाळा निश्चित नाही. त्याचे कपडे अजागळासारखे दिसले तरी ते टॉप ब्रँडचे आहेत. पर्सनॅलिटी तर चांगली आहेच. सहा फुटाच्या आसपास उंची गोऱ्या वर्णावर शोभणारे निळसर डोळे आणि भक्कम शरीरयष्टी आणि तो श्रीमंत आणि उच्च कुळातील असावा.' रियाने विचारले, 'कशावरून तो श्रीमंत असावा'? सॅली म्हणाली, 'माझे लहानपण आणि शिक्षण स्विझर्लंड मध्ये झाले आहे हे तुम्हाला माहित आहे तो वापरत असलेला पर्फुम प्रायोरी कंपनीचा आहे. त्या कंपनीचा कुठलाही पर्फुम एक हजार डॉल च्या खाली नसतो.' शला म्हणाली, 'त्या बावळटावर तू भाळलेली दिसतेस. शंभर रुपयाचा पुटपाथवरून घेतलेला पर्फुम वापरात असेल'. तेवढ्यात समीर त्यांच्या बाजूने जाताना सॅलीला दिसला. धीटपणाने तिने पुढे जाऊन विचारले. समीर, प्रायोरी कंपनीचा कोणता पर्फुयम तुम्ही वापरत आहे? समीरने दचकून तिच्याकडे पाहिले. रिया आणि शला दोघीही त्याच्याकडे पाहत आहेत हे त्याच्या लक्षात आले. मला पर्फुम मधील काही कळत नाही. हा वापरलेला पर्फुम माझ्यासाठी एका मित्राने परदेशातून मला भेट दिला. सॅली हिरमुसली झाली तर शला तिच्याकडे कुत्सितपणे बघून हसत होती.
असेच काही दिवस गेले आणि एक तारखेला मोगॅम्बो जाऊन त्याच्या जागी नवीन प्रोजेक्ट मॅनेजर येणार हे निश्चित झाले. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांची संख्या दोनशे पासून वाढवून चार-पाच प्रोजेक्ट मॅनेजर आणि एक कंट्री मॅनेजर असे निश्चित झाले. जवळच्याच एका वीस माजली बिल्डिंग मध्ये कंपनीने नवीन ऑफिस घेतले असून तिथे आपल्याला उद्यापासून शिफ्ट व्हायचे आहे. नवीन रचनेत सध्याचे ग्रुप लीडर्स प्रोजेक्ट मॅनेजर होतील तर सध्याचे टीम लिडर्स ग्रुप लीडर्स होतील. प्रत्येक ग्रुप फ्लेक्सिबल असेल आणि आवश्यक्तयेनुसार टीम मधील संख्या आणि टीम लीडर्स ठरवले जातील. अशा प्रकारच्या सूचना देऊन आणि पुढच्या दिवसापासून सर्वाना नवीन ऑफिस मध्ये शिफ्ट होण्याचे सांगून मोगॅम्बो निघून गेला. मोगॅम्बो जाताच ऑफिस मध्ये एकच हलकल्लोळ माजला. वाढलेली कर्मचारी, प्रमोशनच्या शक्यता, संभाव्य जास्त पगार आणि अनेक संधी .
दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सर्वजण नवीन ऑफिसपाशी जमले. मोगॅम्बोने स्वतः नवीन ऑफिस दाखवले. आता त्याचे चार-पाच दिवसच उरले होते. नवीन इमारतीत ग्राउंड फ्लोअरवर रिसेप्टिव हॉल होता . फस्ट आणि सेकंड फ्लोअरला छोट्या कॉन्फरन्स रूम होत्या. मोगाम्बोने सांगितले बाहेरील कोणी माणूस किंवा कस्टमर थेट ऑफिस मध्ये जाणार नाहीत. तर त्या त्या टीमला किंवा ग्रुपला दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील कॉन्फरन्स रूम मध्ये येऊनच चर्चा कराव्या लागतील. चौथा आणि पाचव्या मजल्यावर डुप्लेक्स ऑडिटोरियम केले होते आणि तिथे प्रेजेंटेशन आणि इतर कामाकरिता हजार आसनांची व्यवस्था होती. सहावा मजला हा पूर्णतः कॅन्टीनला राखून ठेवण्यात आला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर छोट्या पॅन्ट्रीज होत्या आणि तेथूनच कॉन्फेरंस रूममध्ये चहा कॉफी , स्नॅक्स घ्यायची व्यवस्था होती. सातवा -आठवा- नववा- दहावा आणि अकरावा या पाच मजल्यावर प्रत्येकी एका प्रोजेक्टच्या कर्मचाराची व्यवस्था होती. बाराव्या मजल्यावर पाच प्रोजेक्ट मॅनेजर ऑफिस होती. इमारतीला तेरावा मजला नव्हता. चौदा आणि पंधरा मजल्यावर एकझुकेटीव्ह ऑफिस असून त्यात कंट्री मॅनेजरचे मोठे ऑफिस आणि इतर सपोर्ट सर्विसेसचा स्टाफ होता. सोळा ते वीस मजले पुढील एक्सपान्शकरिता राखून ठेवण्यात आले होते. सातव्या मजल्यापासून पंधराव्या मजल्यापर्यंत त्या त्या मजल्यासाठी पॅन्ट्री कँटीन होत्या. कंट्री मॅनेजर चे कॅन्टीन फाईव्ह स्टार हॉटेलच्या तोडीचे होते आणि अर्थातच तिथे सर्व प्रकारच्या डिशेस आणि पेय सर्वांकरिता मिळत होते. एकंदरीत कंट्री मॅनेजरचा रुबाब औरच होता.
खचाखच भरले होते. स्टेज वर नवीन पाच प्रोजेक्टचे पाच प्रोजेक्ट मॅनेजर आणि मोगॅम्बो होते. एक खुर्ची कंट्री मॅनेजर करिता रिकामी ठेवली होती. मोगॅम्बोनी उभे राहून बोलायला सुरवात केली. आपल्या नवीन ऑफिस मध्ये सर्वांचे स्वागत असो. आजपर्यंत मला आपण पुष्कळ सहकार्य केले आता जरी मी रिटायर होत असलो तरी मनाने इथे आहेच पण मला नवीन कंट्री मॅनेजर ने सूचना केली आहे की मी सल्लागार म्हणून राहावे त्यामुळे मी सर्वाना भेटायला अधून मधून येतच राहीन.
आपले नवीन कंट्री मॅनेजर अतिशय शिस्त प्रिय असून , उच्च विद्या विभूषित आहेत. अवघ्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी पर्ड्यू विद्यापीठातून ऑटोमेशन मध्ये मास्टर डिग्री घेतली आणि एकविसाव्या वर्षी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून AI मध्ये PHD केली. त्यानंतर कॅलिफोर्नियातून काही स्टार्टअप सुरु करून ते सहा-सात वर्षातच अब्जाधीश झाले आणि आज केवळ सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी अमेरिकेत आणि भारतात अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. या सर्वापासुन त्यांचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी शंभर मिलियन डॉलर्स एवढे आहे. अमेरिकन जीवन पद्धतीचा कंटाळा येऊन त्यांनी भारतात स्थायिक व्यहायचे ठरवले आणि आपल्या पेरेंट कंपनीचे पन्नास टक्के शेअर्स विकत घेतले. खरे म्हणजे त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही परंतु त्यांना भारतात उद्योग विश्व पसरावायचे असल्याने त्यांनी हे ऑफिस घेतले. भारतात अतिपारंगत विषयात संशोधन करून काही लोकउपयोगी पण फायदेशीर अशी कामे करण्याची त्यांची इच्छा आहे. सो लेट्स आवर कंट्री मॅनेजर , बाजूने एक उंचपुरा थ्रीपीस, नेव्ही ब्लू कॉलरचा सूट घातलेला तरुण आत आला. मोगँबो बोलतच हो,ता आवर कंट्री मनेजर मिस्टर समीर मराठे . ऑडिटोरियम मधील सर्व मुली धडधडीत हृदयाने त्याच्याकडे बघत होत्या. सॅलीचा अंदाज खरा ठरला होता. शला आणि रिया बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत होत्या तर सॅली आपली कॉलर ताठ करून त्यांच्याकडे बघत होती. बऱ्याच जणांशी समीर गेल्या दोन-तीन आठवड्यात बोलला होता त्या सगळ्यांनाच आपल्या वर्तनाची लाज वाटत होती. समीर बोलायला उभा राहिला. प्रिय मित्रांनो, काही पोरी चित्कारल्या आम्ही आहोत, आम्ही आहोत. खास मिश्किल हास्य करून समीर परत बोलायला लागला. माझ्या मित्रानो आणि शत्रुंनो ऑडिटोरियम हास्यात बुडाले. केवळ तुमच्यावर भाव मारण्यासाठी मी हा सूट घालून आलो आहे पण मला साधे जीवन जगणे पसंत आहे. कार्यावर माझी निष्ठा आहे. कुठलेही काम असो त्याच्यात कमीपणा वाटून देऊ नका. तुमच्या IT कामा इतकेच तुमच्या आईचे किचन मधील काम, गड्यांचे शेतातील काम, हे महत्वाचे असते त्यात प्रामाणिकपणा मात्र हवा. आता आपल्या भेटी गाठी होणारच आहेत तेव्हा मी जास्त वेळ घेत नाही. काही महत्वाच्या अनाउन्समेंट मला करायच्या आहेत . पहिली म्हणजे, जुन्या दोनशे कर्मचाऱ्यांचे पगार सरसकट वीस टक्के वाढवत आहोत. कॅन्टीन करिता प्रत्येक प्रोजेक्ट मधून एकाची नियुक्ती व्हावी आणि त्याने मेनू ठरवावे, दर सहा महिन्यांनी हि माणसे बदलावीत. स्मोकिंगला अर्थातच परवानगी नाही. कँटीन मध्ये स्मोकिंग करिता स्वतंत्र कक्ष ठेवला आहे. लक्षात ठेवा इमारत सेंट्रल ऐरकंडिशनल आहे आणि ओढलेल्या एका सिगारेटचा खर्च त्यामुळे बाराशे रुपये होतो शिवाय त्याचा वास दरवळत राहतो ते वेगळेच. दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरच्या काही रूम्स स्मोकींग रूम्स आहेत. कुठल्याच स्मोकिंग रूम्स ऐरकंडिशन्स नाहीत. IT शिवाय अजूनही काही फुचुरिस्टिक काम करण्याचा आमचा विचार आहे. कोणाकडूनही अशा सूचना आल्यास त्याचा विचार केला जाईल आणि अशा प्रोजेक्टमध्ये त्याला संधीही दिली जाईल. तर चला आपण कमला लागूया. जय हिंद. असे म्हणून त्याने मोगाम्बोशी हस्तोआंदोलन केले आणि ते सातही जण स्टेजवर गप्पा मारू लागले. ऑडिटोरियम मधून बाहेर पडून मंडळी आपापल्या कामाच्या ठिकाणी जाऊ लागले. पन्नासजण बेसमेंट्च्या दोन फ्लोवरवर काम करत होते. बिल्डिंगचा पाया बेसमेंटहून उंच होता. त्यामुळे पाणी आत झिरपायची शक्यता फारच अत्यल्प झाली होती. त्या दोन मजल्यावर कंपनीचे डेटा सेंटर पॉवर इक्विपमेंट्स होती. मेन्टेनन्सची सर्व लोकं याच दोन मजल्यावर काम करत होती. आपल्या स्पेस मध्ये जाताच रिया आणि शला यांना काही सुचेनासे झाले. सुन्न अवस्थेतच शला घरी परतली. घरी तिचे आई बाबा येऊन बसले होते. तुम्ही दोघे कसे इकडे ? शला . रियासकट आपल्या सर्वांना धारावीला जेवायला जायचे आहे. तुझ्या समीर साठे ने त्याच्या नवीन जॉब प्रीत्यर्थ आपल्या सर्वाना जेवायला बोलावले आहे . सात वाजता त्याचा ड्राइवर आपल्याला न्यायला येईल. सात वाजता एक भली मोठी लँड क्रुएझेर त्याच्या घरापाशी आली. थोड्यच वेळात कार मलबार हिलवर एका भव्य बंगल्याच्या दारात उभी राहिली. बंगला कसला तर चार एक्करवर पसरलेला तो एक राजवाडाच होता. बाजूला भरपूर महागड्या गाड्या उभ्या होत्या. त्याच्यात लँड रोव्हर , बेंटले , रोल्स रॉयस , ऑडी इत्यादी.. बाबांनी ड्रायव्हरला विचारले खूप पाहुणे जेवायला बोलावले आहेत का? ड्राइवर म्हणाला नाही. मग या इतक्या गाड्या ? आमच्याच आहेत . साहेबांना गाड्यांचा फार शौक आहे पण त्यांचे आवडते वाहन म्हणजे सायकल , ड्राइवर हसून म्हणाला. रिया शलाला कोपराने ढोसत म्हणाली हे सर्व तुला माहिती होते का ? आणि म्हणूनच तू जावई करून घ्यायला सांगितलेस का? शलाला अतिशय राग आला होता. तो राग आपल्या वर्तनाचा होता कि त्याने तिला फसवले याबद्दलचा होता सांगणे कठीण आहे. लॉन मध्येच पाच सहा खुर्च्या मांडल्या होत्या. आणि पांढऱ्या वेशातील नोकर धावपळ करत होते. बाबा आणि समीर यांनी स्कॉच घेतली तर बाकीच्यांनी सॉफ्ट ड्रिंक्स घेतली. तासाभराने नोकराने जेवण तयार असल्याची वर्दी दिली. आतील भाग आणि सजावट देखणी आणि आकर्षक होती. डायनिंग रूम मध्ये वीस जण सहज बसतील एवढे शिसवी टेबल होते. दोन्ही बाजूला दोन दोन बसून शिरोभागी समीर बसला होता. जेवण हसत खेळत आणि विनोदात झाले. बरेसे पदार्थ सर्वानाच नवीन होते. दोन तासाच्या जेवणानंतर त्यांना घरी सोडायला दुसरा ड्राइवर आला. दुसऱ्या दिवसापासून ऑफिसची रणधुमाळी सुरु झाली प्रत्येक मजल्यावर सजेशन बॉक्सेस ठेवल्या होत्या. कंपनीनुसार आता ई-मेल नोटिफिकेशन येत होती. शला बोलता बोलता रियाला म्हणाली मला खर तर क्षमा मागायला पाहिजे परंतु त्याचीही मला लाज वाटते आता मी काय करू ? लंच नंतर समीर त्यांच्या ग्रुप मध्ये आला आणि सॅलीला त्याने एक इन्व्हलप दिले. त्या दिवशी तू परफ्युम ओळखलस पण पायात त्या दिवशी काफ पेटंट लेदरच्या शूज होते ज्याची किंमत सहज सहाशे-सातशे डॉलर असते. असच काम करत राहा. एवढे बोलून तो शला कडे न पाहता निघून गेला. इन्व्हलप उघडताच सॅली चित्कारलीच इन्व्हलपमध्ये टीम लीडर म्हणून अपॉइंटमेंट होती आणि चॅनेल नंबर 5 पर्फ्यम ची छोटी बाटली होती. इकडे रिया आणि शला त्यांच्या क्युबिकल मध्ये बोलत बसल्या होत्या. ऑफिस सुरु होऊन एक महिना होत आलेला होता. प्रोजेक्ट टाईमिंग अतिशय महत्वाचे होते. कुठल्याही परीस्थित डेडलाईन पाळणे अतिशय महत्वाचं असायचं. प्रोजेक्ट अगोदर पूर्ण झाल्यास कंपनी बोनस देत असे. समीरचा हात मिडास सारखा होता. ऑपेरेशनच्या पहिल्याच वर्षी टर्नओव्हर तीस पटीने वाढला. प्रॉफिट पर्सेंटेजही वर गेले. शलाने रियाला विचारले ,काय याच्यातून उपाय आहे माझे डोके भणभणू लागले आहे. पूर्वकाली उषा वाहिनीचा सल्ला अशी सदरे असायची आता तू चाट जीपीटीला विचार पण . त्या दोघीनी जीपीटीवर पॉईंट्स मांडायला सुरवात केली. सुरवातीचे काही प्रसंग आणि आत्ता आढळले वेगळं स्वरूप. जीपीटीच उत्तर आलं, मुली तू त्याच्यावर प्रेम करू लागलीस परंतु तो श्रीमंत असल्यामुळे तर नाही ना . तू त्याच्या पुढे पुढे अजिबात करू नकोस. तो श्रीमंत आणि कर्तबगार आहे म्हणून तर तुझे प्रेम नाही ना ? तू स्वतःलाच नीट तपासून पहा.
त्यानंतर समीरची आठवड्यतून एकदा प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये एक फेरी असायची. शलाच्या प्रोजेक्टमध्ये तो आल्यावर ती नम्र असायची पण अंतर ठेऊनच वागायची. समीरने ही तिच्याकडे लक्ष देणे कमी केले होत. खरं म्हणजे त्याला पाहिल्यापासूनच ती त्याला आवडली होती. नंतर कामशेत भेटीत तर जास्तच आवडू लागली होती. त्याला जवळपासचे कोणीच मित्र नव्हते. म्हंटल तर खूप असिस्टंट होते आणि उच्चभ्रू समाजातील कन्यका आणि ललना त्याच्याभोवती घोटाळत होत्या. येथून तेथून मेजवानीसाठी आमंत्रण येत होती. परंतु तो कशातच इंटरेस्ट नाही त्याच्यातून त्याला भारतात किंवा अमेरिकेत वडीलधारे माणूसही नव्हते. शेवटी त्याने एआय मेटालाच प्रॉम्प्ट टाकले. AI मेटाने त्याला उत्तर दिले. तू नेहमीसारखाच वागत रहा आणि बाबासाहेबां सोबत ठरवून परत कामशेतला जा. जाण्यापूर्वी त्या विकेंडला शला तिथेच असल्याची खात्री करून घेतली.
त्याने लगेच साठेंना फोन लावला. साठे हे अत्यंत साधे गृहस्थ होते. पहिल्या भेटीच्या अगोदरच साठेंना त्याच्याबद्दलची सर्व माहिती होती. परंतु त्याने कधीही त्याचे अवास्तव कौतुक केले नव्हते. परंतु त्याला शला आवडली आहे हे त्यांना माहिती असूनही त्यांनी कधी त्याच्यापुढे पुढे केले नव्हते. त्या दोघांनाच काय ठरवायचे ते ठरवू दे.
समीरने साठेंना फोन करून त्याला कामशेतला कुठल्या विकेंडला येणार आहे ते कळवण्यास सांगितले. तो पण त्यावेळेस तिथे जाणार होता. आणि शलाला यातले काहीही कळू देऊ नये असे सांगितले. त्याप्रमाणे दोन तीन आठवडयांनी बाबासाहेबांचा निरोप आला की शला शुक्रवारी संध्याकाळी कामशेतला येणार आहे , त्याप्रमाणे साठे आणि समीरने बेत ठरवला. शुक्रवारी संध्यकाळी शला ट्रेन ने लोणावळ्याला गेली. त्या अगोदरच समीर कारने तेथे पोहचला होता. गाडी येण्यापूर्वीच अर्धा तास तो कामेशतकडे चालू लागला. आजचा त्याचा वेष ढगळ टी शर्ट , ढगळ जिन्स पॅन्ट आणि कोल्हापुरी चप्पल असाच होता. साठे शलाला घेऊन त्याच रस्त्यावरून निघाले. वाटेत त्यांनी समीरला चालताना पाहिले. शलाला ते म्हणाले बहुतेक समीर चाललेला आहे आपल्याच घरी जात असावा, त्याला गाडीत घेऊ. शला एकदम म्हाणाली समोर असला तरी त्याला एवढा भाव द्यायची गरज नाही. आणि नसला तरी कोणत्यातरी उपटसुम्भाला कशाला गाडीत घ्यायचे. गाडी पुढे गेल्याचे पाहून समीर स्वतःशीच हसला. शला आणि बाबा त्यांच्या घरी पोहचले. त्यांनी पत्नीला काहीच सांगितले नव्हते. काही वेळानी बंगल्याच्या दाराची बेल वाजली. साठेंना माहिती होते म्हणून ते जागचे उठलेच नाहीत. राधाबाईनी दार उघडले. त्यांना समीर विषयी फारशी माहिती नव्हती. राधाबाई म्हणाल्या या जावईबापू . समीर म्हणाला 'कशाला गरीबाची चेष्टा करताय. बाबांना सांगा दाराशी एक मवाली उभा आहे.' तुम्ही आत तरी या आणि गंमत म्हणजे ताईसाहेबही आल्या आहेत थोड्या वेळापूर्वी. अरेच्चा हे तर मला माहीतच नव्हतं. असे म्हणून तो आत येऊन कोचवर बसला. शला आपल्या खोलीतून सर्व ऐकतच होती पण ती बाहेर आली नाही. कोचवर बसल्यावर बाबांनी विचारले थोड्या वेळात जेवायला बसू आपण तो पर्यंत ड्रिंक्स घ्यायची का ? समीरने नकार दिला. आईने शला अशी जोरात हाक मारली. आल्यावर समीरकडे तिने न पाहिल्यासारखेच केले. शलाने आई ला विचारले 'आई काय काम आहे ? आई म्हणाली अग तुझे सर आलेत. आता त्यांची ओळख आपल्याला पटली आहे ? शलाने निर्विकारपणे विचारले मी आता काय करू ? असे म्हणून समीरकडे तिने पहिले. समीरने मिश्किलपणे तिला हळूच एक डोळा मारला. तशी ती तण तण करत आपल्या रूम मध्ये गेली आणि AI वर प्रॉम्प्ट टाकायला सुरवात केली. AI चा सल्ला होता निर्विविकार मुद्रेने वावर. फार तुसडेपणा नको आणि फार गोडीगुलाबी नको. उपदेश वाचून शला परत दिवाणखान्यात आली.
तिकडे समीर आईला म्हणत होता 'आई तुम्ही मला सर वगैरे म्हणू नका. मला फक्त समीर म्हणा. तुम्हाला भेटल्यावर मला आई बाबा भेट्ल्याचाच आनंद होतो. अमेरिकेतच मी जन्मलो , दहा-बारा वर्षाचा असतानाच माझे आई बाबा एका कार आक्सीडेंट मध्ये गेले. त्यानंतर थोड्या दिवसांनी मला फॉस्टर होम मध्ये ठेवण्यात आले म्हणजे आपल्याकडचे अनाथालय. आई बाबांच्या इन्शुरन्सच्या पैशाच्या जोरावर मी माझे शिक्षण पुरे केले आणि यानंतर स्वबळावर कंपनी स्थापन केली. पुढचं तर तुम्हाला माहित आहे. म्हणून तुम्ही मला समीरच म्हणा. मी तुम्हाला आई बाबा म्हणलेले चालेल ना ?'
आई च्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्या म्हणाल्या होय समीर तू आमचाच आहेस. शलाच्या म्हणण्याप्रमाणे तू आमचा जावई होशील का नाही माहित नाही पण मुलगा तर निश्चितच आहेस. शलाचे डोळेही खरे पहिले तर पाणावले होते. परंतु आईचा टोमणा ऐकल्यावर ती तावातावाने तिथून निघून गेली. शलाने खोलीत जाऊन AI वर परत प्रॉम्प्ट टाकले आणि सल्ला विचारला. उत्तर आले फारसा भाव देऊ नकोस पण नॉर्मल वाग. जेवायला बसल्यावर बाबा समीरला म्हणाले ' समीर आमच्या गरिबा घरचे जेवण गोड मानून घे.'
घरच जेवण मिळायला भाग्य लागत आणि हे माझाच घर आहे म्हंटल्यावर ते रुचकर लागणारच. राधाबाईच्या हाताला चांगली चव आहे. बाबांनी विचारले समीर तुमचे ऐश्वर्य संपन्न रूपही आम्ही पाहिले आहे आणि अतिशय साधेपणाही पाहत आहोत. यातील खरे रूप कोणते ?
दोन्हीही.
उद्योग, संपत्ती, सत्ता आणि माझी जीवन शैली ही मी वेगळी ठेवण्यास शिकलो आहे आणि श्रीमंतीमुळे खरं सुख मिळत असे थोडेच आहे. श्री चारसो बीस मध्ये दाखवल्या प्रमाणे माझे कामाचे आणि जीवनशैलीचे मुखवटे वेगळे आहेत. कामाच्या पाच दिवसात माझं कामात अतिशय बारकाईने लक्ष असतं. पण मी वीकेंडला अतिशय वेगळा असतो. त्यावेळा मी कामाबद्दल अजिबात चर्चा करत नाही. सुख मिळण्यासाठी मनाची शांती जरुरुची असते. कामाशिवाय विचार करण्याची मनाला सवय लागते. बाबा म्हणाले आश्चर्य आहे. अमेरिकेत राहूनही तु असा विचार करतोस. मग तू विकेंडला काय करतोस? आणि तुझी सुखाची कल्पना काय आहे?
त्या दिवशी मी समुद्राकडे तासंतास पाहत बसतो. जंगलातून फेर फटका मारत बसतो किंवा छान पैकी एखादे पुस्तक घेऊन आराम करतो. तासन्तास मी कित्येक गूढ विचारत गढलेला असतो परंतु चालू कामाचा मी मिनिटभरही विचार करत नाही. सुखाची कल्पना म्हणाल तर एखाद्या छोट्याश्या झोपडीत बाहेर पाऊस पडत असताना शेकोटी समोर बसून शाल पांघरून घेऊन ओल्ट्स संगीत ऐकत बसने किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर , घराच्या व्हरान्ड्यात बसून समुद्राचा घन गंभीर आवाज ऐकत साहचरणीसोबत शांत बसणे.
अरे व्वा हा तुमचा वाढता व्याप जेव्हा पाहतो, तेव्हा हे किती वर्ष जमणार आहे तुम्हाला ? 'बाबा
अमेरिकेत दोन गोष्टी मी शिकलो आहे एक तर आठवड्याचे सातही दिवस वर्षानुवषे काम करणे आणि पुढे पुढे जातच राहणे. जसे की एलोन मस्क. हे लोकं सतत पुढं जाण्याचाच नादात असतात आणि त्यात त्यांना आपण जीवनातील अर्थ कधी गमावून बसलो आहोत हेच कळत नाही. किंवा एका ठराविक टप्यावर पोहचल्यावर बिल गेट्स सारखेच आपल्या साम्राज्यातून बाहेर पडून आपले छंद जोपासणे. मायक्रोसॉफ्टच्या भव्य यशानंतर बिल गेट्सने मेलिंडा सह अनेक ठिकाणी समाज उपयोगी कामे केली. आता सुद्धा त्याने हजारो एक्कर जमिनी कोलोरॅडो मध्ये घेतली आहे आणि तो स्वतःच्या छंदात रमला आहे. पण या दोघांनाही किंवा अमेझॉनच्या बेझोसलाही जेव्हा वर्षनुवर्षे साथ दिलेल्या जोडीदाराला सोडावेसे वाटते त्या वेळेला मला त्यांची किव येते. माझे म्हणाल तर मी माझ्या साम्राज्यातून ठराविक टप्प्यानंतर बाहेर पडेन आणि माझे संशोधन , आत्मचिंतन सुरु ठेवेन. बाबा तुमचेच उदाहरण घ्या ना. तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंट मध्ये सेक्रेटरी होतात. निवृत्तीनंतरही अनेक संधी तुम्हाला उपलब्ध होत्या परंतु तुम्ही छोट्या गावात शेती करत आहात.
शला आता समीरकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागली होती.
बाबा मला तुमची थोडी मदत हवी आहे. मला काही जमिनी घ्यायच्या आहेत. भारतातील त्या कायदेशीर बाबी मला कळणार नाहीत. अरे बाबा पण तुला कसल्या जमिनी घ्यायच्या आहेत ? एक तर 150-200 एक्कर शेत जमीन. त्यात मला काही प्रयोग करायचे आहेत. तुमच्या जवळच मिळाल्यास उत्तम म्हणजे मला सुंदर सहवास तरी मिळेल.
शलाने चमकून समीरकडे पाहिले. बाबा तर हसतच होते. शला चटकन उठून आपल्या खोलीत गेली आणि परत AI प्रॉम्प्ट टाकत बसली. कुठलयही मैत्रिणीपेक्षा गप्पा मारायला AI बरे वाटत होते. तिचं तिलाच कळत नव्हतं की आपल्याला खरंच काय वाटतंय. तिच्याशी फ्लर्ट करण्याचं धाडस कोणीच दाखवलं नव्हतं. तिने लग्नाचा कधी विचारच केला नव्हता. आई बाबांना सोडून राहायचेही तिच्या जीवावरच आले होते. दुसरीकडे त्या तरुणाने तिला भुरळ घातली होती.
शनिवारचा सगळा दिवस समीर आणि बाबांनी आजूबाजूला हिंडण्यातच घालवला. बाहेर पडताना त्यांनी शलाला विचारलं होत. शलाला खरं जायचं होत. बाहेर पडताना आईने समीरला विचारले आज जेवायला काय करायचं ? काही नको आम्ही दोघेही बाहेरच खाऊन येऊ. रात्री मात्र घरीच जेऊ पण काही गोडधोड मात्र करू नका. गाडीत बसल्यावर बाबांनी एक ड्राइवर मागवून घेतला. कारण गाडी मागे ठेऊन काही वेळा जायला लागणार होते. समीर म्हणाला, बाबा मला त्या जागेत पुढच्या काही वर्षात सेल्फ सफीसेन्ट कॅम्युनिटी उभारायची आहे. मिठाशिवाय बाहेरून कुठल्याही गोष्टी मला आणायला लागता काम नये. काही एकरांवर ग्रीन हाऊसेस उभारून त्यात धान्य कडधान्य याची शेती असेल. तर हायड्रोफोनिक पद्धतीने भाज्या आणि भुईमूग सुद्धा पिकवले जातील. काही भागात ऊस लावून त्यापासून गूळ तयार होईल. किंवा उपदव्याप फार वाढला तर मिठाबरोबर साखरपण बाहेरून येईल. इथे कामगारांना व माझ्या सहकार्यांना मी शेतीचे आणि कुकुट पालनाचे इझ्राएल मध्ये शिक्षण देईन. कामगार व इतर लोकांसाठी वस्ती ही असेल. तेथे डॉक्टर्स असून तो सर्वांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देईल. गाई पाळल्या जातील आणि त्याचे दूध सर्वाना उपलब्ध असेल. थोडक्यात म्हणजे तेथील रहिवाश्याना बाहेरच्या लोकांवर फारसे अवलंबून राहावे लागू नये. कुठलाही प्रकारचा जीवाष्म इंधन वापरणार नाहीत. सर्व प्रकारची उपकरण विजेवर चालणारी असतील. दहा बारा एक्करावर एलेवेटेड सोलर फ्रेम वापरून सतत सहज भरपूर सौर ऊर्जा मिळेल. त्याच्या खाली कमी वाढणारी फळभाज्या किंवा गाजर , रताळे, सुरण अशी कंदमुळे आणि कांदा, आलं , लसूण अशी बरीच मसाल्याचे पदार्थ लावता येतील. मला असे कळले की आदिवासी भागात बरीच उपयोगी कंदमुळे सापडतात. त्यांच्यावरही संशोधन करून त्याची लागवड करण्याचा माझा विचार आहे. बऱ्याच जागेत आंबा , फणस, पेरू, काजू , इत्यादी झाडांची लागवड होईल. जागेत लोकांकरिता मोकळे पटांगण , खेळण्याकरिता आणि व्यायामाकरिता जागाही असेल. जास्त जागा असलीतरी काही हरकत नाही. एका बाजूला भविष्यकाळातील माझ्या संशोधनाकरिता जागा राखून ठेवली पाहिजे. चाळीस पन्नास घरांसह एक इको फ्रेंडली खेडं तयार होईल.
बाबा म्हणाले कल्पना स्तुत्य आहे. तुझ्याकडे हे सर्व करण्याकरिता संपत्ती आणि बुद्धीही आहे. मला एक शंका आहे की या कुटुबांच्या मुलां-मुलींच्या शिक्षणाची काय व्यवस्था करणार ?
एकतर पाच वर्षापर्यंत मुलांकरिता येथेच पाळणाघर , अंगणवाडीची सोय असेल. कारण अशीच कुटूंबे नेमली जातील की ज्यांच्या घरातील सर्वजण कामं करत असतील. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाकरिता मुलांना बाहेर नेण्या आणण्याची व्यवस्था केली जाईल. अर्थात हे सर्व विषय अजून पूर्णत्वाला गेले नाहीत.
त्या दिवशी लोणावळ्या पासून तळेगाव पर्यंत बऱ्याच जागा बघून झाल्या. परंतु समीरला कुठलीच जागा पसंत पडली नाही. वाटेत त्यांनी टोनी ढाब्यावर थांबून मस्तपैकी परोठा आणि भाजलेल्या कोंबडीचा झणझणीत रस्सा खाल्ला. टोनी बाबांच्या चांगलाच ओळखीचा होता आणि त्यांनी आग्रह करून दोघांनाही बियर पाजली. बाबा म्हणाले ग्रह खात्यात पार IPS पासून चाळीस वर्ष घालवल्यामुळे प्रचंड अनुभव आले आणि ओळखी झाल्या, त्यामुळे सर्वांची सवय झाली आहे. मग ते स्मितहास्य करून म्हणाले आज आपण परोठा आणि मटर पनीर खाल्लं आहे हे लक्षात ठेव. आपण कोंबडी खाल्ली हे जर माझ्या बायकोला कळले तर आपल्याला आज घराबाहेरच राहावे लागेल आणि उद्या गोठ्यातील गोमुत्राने शुद्धी करून घरात घेतील. तिला माहिती असते आपण काय केलं ते पण तसे बोलायचं नाही. ती पण खोदून काय विचारत नाही. हा आमचा करार पण गेली चाळीस वर्ष टिकला आहे. लग्नानंतर आमची पहिली दोन्ही मुलेही अल्पशा आजाराने दगावली. अशावेळी तुमच्या पोझिशनचा , संपत्तीचा काहीही फायदा होत नाही.
माझी अशी सूचना आहे तू तातडीने दक्षता घ्यायला जागा ठेव. लोणावळ्याच्या मागे दुर्गम भागात असलेल्या अंबी व्हॅलीत विमान उतरायची सोय आहे. सूचना मिळाल्यापासून वीस ते पंचवीस मिनिटात एअर अम्बुलंन्स मध्ये उपचार सुरु करता येतात.
ते घरी पोहचले तेव्हा आठ वाजायला आले होते. घरी वंदना आणि शला वाटच पाहत होते. जेवण झाल्यावर गप्पा करताना बाबांनी समीरची कल्पना दोघीना सांगितली आणि भरूपूर जागा पाहिल्याचे सांगितले. शला आपल्या खोलीत उषा वाहिनीचा सल्ला विचारायला गेली. AI ने तिला उत्तर दिले , तुझी आवडती जागा दाखव. ती बाहेर येऊन परत गप्पात भाग घेऊ लागली. ती त्यांना म्हणाली बाबा मला एक लोकेशन असे माहित आहे कि ते यांना निश्चितच आवडेल. ठिकाण तसे जवळच आहे आणि नितांत रमणीय आहे. हवं असल्यास उद्या आपण ब्रेकफास्ट करून तिकडे जाऊ. रविवारी सकाळी ब्रेकफास्ट करून नऊ वाजता तिघेही बाहेर पडले. गाडी निघाल्यावर शला बाबांना म्हणाली आपण यांना किवळेला घेऊन जाऊ. एक दोन किलोमीटर नंतरच गाडी कान्हे फाट्याला लागली. बाबा सांगू लागले शिवाजीचे मावळे जे होते ते बारा मावळांमधून आलेले होते. बारा मावळ म्हणजे बारा नद्यांचा उगम असलेला भाग. आपण चाललेल्या भागाला आंदर मावळ असे म्हणतात. इथे झालेला प्रकल्प हा टाटा उद्योग समूहाचा राष्ट्र उभारणीचा एक भाग आहे. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी टाटानी वळवण धरण बांधले आणि अवाढव्य पाईपने पाणी खाली नेऊन खोपोलीत वीज निर्मिती केली. तसेच हे त्या काळातच मोठे आंदर धारण बांधले आणि त्यावर भिवपुरीला वीज निर्मिती सुरु केली. कान्ह्यावरून आत गेल्यावर चार पाच किलोमीटर नंतर कच्चा रस्ता लागला आणि उंच टेकड्यांच्या कडे कडेने तो पुढे जात राहिला . मध्येच छोट्याश्या वाड्या सोडल्या तर लोक वस्ती नव्हतीच. वीस एक किलोमीटरवर धरणाचे अथांग बॅक वॉटर दिसू लागले. मोठ्या पाणीसाठ्यामुळे आणि गर्द झाडीमुळे हवेत गारवा होता. तिघेही गाडीतून खाली उतरताच समोर पसरलेला अथांग जलाशय आणि शांत परिसर पाहून समीर भराहून गेला. भावनातिरेखाने त्याने शलाचे हात हातात घेऊन एकदम उद्गार काढले सिम्पली आऊट ऑफ धिस वर्ल्ड . शला I LOVE YOU आपण काय बोलले हे लक्षात येताच तो गोरामोरा झाला आणि त्याने हात झटकन सोडून दिला. शला पण शांतच होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर कुठलीही रागाची किंवा तिरस्काराची भावना नव्हती. आता पुढच्या जागा पाहायलाच नको असे म्हणून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व परत टोनी ढाब्यावरच येऊन पोहचले. नावाला ढाबा असला तरी चांगल्या स्वच्छतेमुळे आणि अतिशय रुचकर जेवणामुळे तिथे नेहमीच गर्दी असायची. कारण तिथल्या किंमती आजूबाजूच्या इतर ढाब्या पेक्षा तिप्पट असायच्या. बाजूला मोठे पार्किंग असल्यामुळे ढाब्यात उच्चभ्रू मंडळी फॅमिली सकट यायची. समीर म्हणाला बाबा कालचा मेनू सुंदर होता . आज पण तुम्हीच ऑर्डर करा. बाबांनी टोनीला बोलावून विचारले काय रे बाबा आज खास काय आहे. तो म्हणाला सर तुम्ही आज प्रॉन्स आणि फ्राईड कार्प मासा घ्या. तुमच्याकरिता खास मासा ब्रेड क्रम्ब मध्ये फ्राय करून देता आणि प्रॉन्स पकोडे , शेवटी तुम्हाला आमची खास बिर्याणी आणि गुलाबजाम देतो.कोणती बिअर आणू ? बाबा म्हणाले शलाला माहिती आहे. गृह खात्यात चाळीस वर्ष गेल्यामुळे मी फक्त होम मिनिस्टरला घाबरतो.पाच फूट पाच इंच उंची, शेलार बांधा , रेखीव चेहरा , बदामी डोळे आणि मुख्य म्हणजे लांब सडक केस.यामुळे पुरुषांचीच नव्हे तर बायका सुद्धा तिच्याकडे बघत बसले. दोन छोट्या मुली तर तिच्या केसाला हात लावूनही बघून गेल्या.
समीर म्हणाला याच जागेवर आपण कार्यक्रम करू. जितकी जागा मिळेल तितके तुम्ही गोळा करा. बजेटकडे अजिबात लक्ष देऊ नका. निदान साडेतीनशे - चारशे एक्कर तरी जागा हवीच. त्याहून जास्त मिळाली तर उत्तमच.
बाबा म्हणाले 'समीर ते एवढे सोपे नाही कारण सलग जमीन एकाच नावावर नसते. मिळतील ते तुकडे गोळा करून मधल्या जागा भरायला लागतात. त्याबरोबरच वन खात्याची मोठी जागा मिळाली तर आपला कार्यक्रम प्रकल्पाद्वारे सरकारकडून जमीन मिळू शकेल. यासाठी वेळ जाणारच आहे. काही तुकड्यांकरिता आपल्याला तेथील लोकांना प्रकल्पात समाविष्ट करावे लागेल.
समीर म्हणाला 'बाबा ही सर्व जबाबदारी तुमची. तुमच्या बरोबर काम करण्याकरिता मी दोन सहायक , एक SUV आणि एक ऑल टेरेन वेहिकल पाठवून देतो.
बाब म्हणाले 'काही जमिनीच्या एजंट्सना कमला लावावे लागेल आणि मिळतील त्या जागा पदरात पडून घ्याव्या लागतील. पण या प्रोजेक्टचे नाव काय ठेवायचे आहे ? '.
समीर उद्गारला 'आनंदवन '
वा छानच नाव आहे. या नावाने तुम्ही येथे एक अकाउंट उघडा खर्चाकरिता . अकाउंट उघडताच मी दहा कोटी रुपये ट्रान्सफर करतो. शिवाय त्यातील बॅलन्स जर दोन कोटीपर्यंत खाली गेला तर बॅलन्स चोवीस तासात टॉपअप होईल. आणि बाबा याची सर्व प्रक्रिया तुम्हीच संपवायची आहे.
अरे आनंदच आहे. निवृत्तीनंतर माझा बरासा वेळ रिकामा जातो. शिवाय माझ्या नोकरीमुळे सर्व गावातील पोलीस पाटलांना मी माहित आहे त्याचाही उपयोग होईल. माझी एक सूचना आहे की आनंदवनच्या बाहेर असणाऱ्या गावांचा थोडा विकास तू कारावास. थोडक्यात आनंदवनच्या बाहेर एखादा सुसज्ज दवाखाना, प्रथमिक आणि माध्यमिक शाळांची सोय तुझ्या तज्ज्ञांमार्फत त्यांचं राहणीमान सुधारेल अशी काळजी घे. त्यातून काहीजण कामालाही येऊ शकतील.
शाळा आणि दवाखाना याला माझी काहीच हरकत नाही. परंतु त्यांना कामाला घेण्याविषयी मी काही बोलत नाही.
बाबा विचारणं चुकीचंच आहे पण तुम्हीही या कामाबद्दल काहीतरी मोबदला घेतलाच पाहिजे. सांगा काय देऊ ?
अरे मुलगा म्हणतोस आणि अशी किंमत विचारतोस ? तुझे प्रोजेक्ट मला आवडले आहे. देवदयेनी मला काहीही कमी नाही. तुझ्या प्रोजेक्ट मध्ये सामील होणे निश्चितच आवडेल. बराचवेळ गप्पा चालू होत्या. घरी पोहचायला सात वाजले. रात्री बेरात्री मुंबईला जाण्याऐवजी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून ऑफिसात सहजपणाने नऊ पर्यंत पोहचता आले असते. शलाने समीर सोबत जायला मान्यता दिली. घरी गेल्यावर सुद्धा आनंदवन हा विषय चालू होता. समीरने ड्राइवर आणि त्याची अल्फा रोमिओ गाडी मागवून घेतली. बाबांनी दोन -तीन दिवसातच बँक फॉर्मॅलिटी पूर्ण होतील असं सांगितलं.
आनंदवन हा विचार न करता समीर आपल्या कामात गढून गेला. शलाने रियाला मात्र सगळे सांगितले.
काय तो तुला I LOVE You म्हणाला ?
चल चावट कुठली. त्यावेळी त्याच्या भावना इतक्या अनावर होत्या आणि मी जवळच होते. माझ्या जागी शूर्पणखा असती तरी तो असाच म्हणाला असता. रात्रभर विचारच करत राहिली. अजूनही तिचे मन कुठलाच निर्णय घेत नव्हते.
शेवटी तिसऱ्या दिवशी तिने AI कडे मोहरा वळवला. तिला उत्तर मिळाले की त्याचा जाऊदेत पण असे दिसते की त्याच्या स्वभावामुळे आणि एकंदरीत आनंदवन प्रकल्पामुळे तो तुला आवडू लागला आहे. त्या आठवड्यात समीरने तिला फोनही केला नाही किंवा ग्रुप मध्ये येऊन सुद्धा तिच्याशी फारसा बोलला नाही. सर्व दिवस तो कामात मग्न होता.
बाबांनी त्यांचं अकाउंट असलेल्या जवळच्याच स्टेट बँकेमध्ये आनंदवन या नावाने खाते उघडले. त्यांनी खात्याची माहिती समीरला कळवताच, ताबडतोब दहा कोटी रुपये ट्रान्सफर झाले. समीरने प्रोजेक्ट करिता anadvan.in या डोमेन खाली ई-मेल तयार करायला सुरवात केली. त्याच प्रमाणे त्याने नवीन टेलेफोन नंबर बाबांना दिला. एका मेसेज मध्ये सांगितल्याप्रमाणे बाबांनी त्याला सांगितले कि त्याच्या जवळच त्याने पाच सहा खोल्याचे घर बघावे. जागेत साधरणतः दोन ड्रायव्हर्स , एक सर्वे माहिती असणारा माणूस आणि एक हरकाम्या नोकर राहील. हा नोकरच साफ सफाईपासून स्वयंपाकासकट सर्व कामे करेल. असे घर मिळेपर्यंत ड्राइव्हर आणि पाहणी करणाऱ्या माणसाची व्यवस्था जवळच्या हॉटेल मध्ये करावी. त्यांच्या बरोबर तुमच्याकरिता एक आफ्रिकन सफारी पाठवत आहे . कसल्याही ओबड धोबड रस्त्यानी जाताना तुमच्या पोटातील पाणीही हलणार नाही त्याशिवाय मिसत्सुभिशीचे एक व्हेईकल पाठवत आहे. ते रास्ता नसणाऱ्या ठिकाणावर , टेकडीवर ही जाण्यास समर्थ आहे. या सर्वांचा खर्च आपण आनंदवन खात्यातून करावा. प्रकल्पाचा खर्च एकाच ठिकाणी असणे सोयीस्कर.
बाबांनी समीरचे कौतुक केले आणि आपला होकार कळविला. पुढचे दोन तीन आठवडे बाबासाहेबांचे उत्साहातच गेले. राधाबाईंना बरे वाटत होते त्याही त्यांच्याबरोबर कामात रस घेऊ लागल्या होत्या. राधाबाई घर सांभाळायला समृद्ध होत्या. सात आठ दिवसातच त्यांना हायवे लगत एक सहा खोल्यांचा दुमजली बागंला भाड्याने मिळाला. खालच्या मजल्यावर किचन , डायनिंग, व्हरांडा आणि वर तीन बेडरूम असलेलाहा छान उतरत्या छपराचा बंगला होता. त्यांनी समीरला तसे कळवताच भाड्याने घेण्यापेक्षा तो विकतच घेता आला तर घेऊन टाका.नाहीतर आपल्या प्रकल्पाच्या दृष्टीने दहा वर्षाच्या लीज ने घ्या. बाबांनी बांगला ताब्यात घेतला. बांगला ताब्यात आल्याबरोबर दोन - तीन दिवसातच ड्राइवर गाड्या आणि एक असिस्टंट तेथे येऊन पोहचले. समीरने बाबांना कळविले दोन्ही गाड्या नवीन विकत घेतल्या आहेत त्याचे पैसे आणि या माणसांचा त्या दिवसापासूनच सर्व खर्च प्रकल्पातूनच व्हावा. हवा असला तर ऑफिस कामाकरिता एखादा माणूसही नेमावा. त्याला संगणकही घेऊन द्यावा तशीच जवळ एखादी मोठी जागा दोन-तीन वर्षाच्या भाड्यानी मिळवा आणि तेथेच त्या सहाय्यकाला नेमावे. या सगळ्या प्राथमिक तयारीतच चार-पाच महिने गेले. या चार-पाच महिन्यात बाबांनी ऍजेंट्स आणि गावोगावच्या पोलीस पाटलांना पत्रं पाठवली होती. कोणालाही स्वतःच्या बंगल्यात येऊ न देता ऑफिस मध्येच ते भेट घेत असत. या काळात शला तरी तीन-चार वेळा येऊन गेली होती तर समीर मात्र एकदाही आला नव्हता. समीर आणि शलाच्या जुजबी भेटी गाठी होत होत्या. पण प्रेमाचे गाडे अडकूनच बसले होते. AI चा वारंवार सल्ला घेऊनही फारशी प्रगती होत नव्हती. पुढील एका आठवड्यात तिला समीरचा फोन आला. तो शुक्रवारी संद्याकाळी कामशेतला जाणार आहे आणि सोमवारी सकाळी परत येणार आहे तर तुला यायला आवडेल का ?
शलाला तर आता AI ची सवयच लागली होती . तिने अगदी detailed प्रॉम्प्ट टाकले तिला उत्तर मिळाले 'बघ बाई तू त्याच्या प्रेमात पडली आहेस हे निश्चित. त्याला रोज ऑफिसातून, तो राहत असलेल्या हाय फाय एरियातुन , प्रेमभल्या इमेल्स आणि व्हाट्सअप येत असतात. त्याची एक सेक्रेटरी सर्व मेसेजेस गाळून त्यातील कामाचा आवश्यक भागच त्याच्याकडे पोहचवते आणि उत्तरही पाठवते. त्यामुळे तुझे प्रेम व्यक्त करायला काहीच हरकत नाही. यावेळी रियालाही तुझ्याबरोबर घेऊन जा.
शलाने समीरला उत्तर पाठवले मला यायला आवडेल. पण माझ्याबरोबर रिया ही असेल. समीरने होकार दिला. गाडी घेऊन तिघेही सात सव्वातासला साठ्याच्या घरी पोहचले. समीर त्यांना सोडून तसाच पुढे निघाला. त्यावेळी शलाने त्याला जेवूनच जा असा आग्रह केला. समीरच्या घरी त्याचे होणारे आगत स्वागत पाहून रिया थक्कच झाली. साठेही त्याला म्हणाले तुमच्या करिता एक खोली मी राखून ठेवली आहे. ड्रायव्हरला जाऊद्या तुमच्या बंगल्यावर . शिवाय आपल्याला बोलताही येईल. समीरने होकार भरला . साठे म्हणाले पहिल्यांदा जेऊन घेऊ मग सावकाश बोलत बसू. म्हणजे सर्व स्त्रियाही कामे आटपून झोपून जातील.
मोटारसायकलीही ठेवू. ते ऑफिस पूर्णपणे स्वतंत्र असेल. अशा जागा भाड्याने घेण्यासाठी वेळ वाया घालवू नका. आपल्याला बदल करता येईल अशी जागा किंवा एखादी बांधलेला बंगला पहा.
बाबा म्हणाले, “समीर, छान कल्पना! असं केल्याने प्रोजेक्टला खूप मदत होईल. मला अशी एक जागा माहिती आहे ज्याची किंमत साधारणपणे चाळीस –पंचेचाळीस लाखांच्या आसपास असेल .”
समीर म्हणाला, “बाबा, तीच जागा खरेदी करा. आनंदवन नावाची एक कंपनी उघडा आणि सर्व व्यवहार त्या नावाने करा. त्या कंपनीचे पूर्ण अधिकार तुमच्याकडे राहतील नंतर दोन –तीन वर्षांनी आपण योग्य स्ट्रक्चरबद्दल विचार करू.”
असं बोलत बोलत गप्पा बराच वेळ चालल्या होत्या. गप्पा मारत मात्र दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर आणि शला मुंबईला गेले, आता त्यांच्या नात्यांत मात्र जास्त आपुलकी वाढली होती.
दिवसामागून दिवस जात होते. समीर आणि शलाच्या भेटी जवळ जवळ होतच नसत. शेवटी शला ने वैतागून AI ला विचारले. अरे हे काय चाललं आहे ? उत्तर मिळालं 'अग तो कुठे? , तू कुठे ? तू त्याला आवडत असलीस तर तुझ्या मागे धावायला तो काय रोडचा रोमिओ आहे काय?. त्यातून त्याचे मोठ्ठाले प्रोजेक्ट्स कुठल्या बाबतीत तुमची बरोबरी होऊ शकते. या उत्तरामुळे शला जास्तच निराश झाली. कामातही तिचे लक्ष लागेना. तीन चार वेळा ग्रुप लीडरनेही तिला झापलं . शेवटी तिला प्रोजेक्ट लीडर कडून प्रेम पत्र आले आणि त्यात तिला सक्तीच्या एक आठवडा रजेवर पाठवण्यात आले. अशा पत्रांची कॉपी नेहमीच CEO म्हणजेच समीरकडे जाते.
शला अर्थातच कामशेतला घरी गेली. तिला अचानक आलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. मग ती कारणही सांगेना . तिचे बाबा तर प्रोजेक्ट मध्ये रात्रदिवस गढून गेले होते. तिसऱ्या दिवशी समीरचा बाबांना फोन आला. समीर म्हणाला, 'शलाचे हल्ली कामात लक्ष नाही. तीन-चार वेळा ग्रुप लीडरने समजावून सांगितले पण काही फरक पडला नाही. मला आजच कळले की प्रोजेक्ट लीडर ने तिला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. जरा बोलून बघा काय आहे ते. सध्या मी केरळ मध्ये एका कामात गुंतलो आहे. एवढे बोलून फोन कट झाला. त्या रात्री आई-बाबा या विषयावर शलासोबत बोलले. आई शलाला म्हणाली, अशी मध्येच कशी आलीस ग?. तुला रजा कशी मिळाली एक आठवड्याची. शला खाली मान घालून बसून राहिली. बाबा म्हणाले ,'तुझा तो समीर माझ्या कामाचा कुठला तो आढावा तो घेत नाही. त्याने मला एकदा उत्तर दिले की मी योग्य माणसाला काम दिल्यावर त्याचा रिपोर्ट घेत बसत नाही. माझा कामाशी मतलब आहे रेपोर्टशी नाही. त्यातून माझे पुढच्या दोन -तीन वर्षाकरिता सॉफ्टवॅरशिवाय अजून प्रोजेक्ट चालली आहेत त्यात मी बिझी आहे. आता मी दोन-तीन आठवड्यासाठी इज्राइलला चाललो आहे. शलाने आश्चर्याने विचारले म्हणजे तो इथे नंतर आलाच नाही ? अजिबात नाही. जागा विकत घेणे , माणसे नेमणे , वहाने विकत घेणे हा सर्व उदयॊग मलाच करावं लागतो. त्याचे इन्व्हेस्टमेंट बँकर्स मला पैशाला कधीही कमी पडू देत नाहीत.
आठवड्यानंतर शला परत गेली आणि पाट्या टाकण्याचे काम करू लागली. तिचे कशातच लक्ष लागेना. शेवटी तिने AI च्या सल्ल्यानुसार कामाचा राजीनामा दिला. दुसऱ्या दिवशी तिला कॉम्पेन्सेशनच्या चेकसह रिलिव्हिन्ग लेटर मिळाले. रियालाही काय होत आहे हे समजेना. शला कामशेतला परत गेली आणि वेळ घालवण्यासाठी बाबा बरोबर आनंदवन प्रोजेक्टवर काम करू लागली. पुढच्या तीन-चार महिन्यातच तिला प्रोजेक्टच्या खाचा खोचा समजू लागल्या ती उत्साहानं काम करू लागली. तिचा सो कॉल्ड प्रेमभंग AI च्या सूचनेनुसार विसरून गेली. चार महिन्यांनी बाबांना समीरचा फोन आला. बाबा मी दुसऱ्या एका प्रोजेक्ट करिता आंबोली, मोशी, सावंतवाडी या भागात बाराशे एक्कर जागा संपादन केली आहे. तिथे इस्रायलच्या सहकार्याने लोकोउयोगी प्रोजेक्ट सुरु करण्याचे ठरवले आहे. वेंगुर्ला रिसर्च स्टेशनचे उपप्रमुख डॉक्टर तावडे हे मला ह्या प्रोजेक्टसाठी मिळाले आहेत. आपण एकदा तीन एक दिवस भेटलो तर बरे होईल तुम्ही इकडे या. हल्ली सिंधुदुर्गमध्ये एअरपोर्ट सुरु झाला आहे. विमानाने तुम्ही तिथं या मला तारीख, वेळ आणि किती जण येणार आहेत हे कळवा म्हणजे पुढची व्यवस्था मी करेन.
बाबा म्हणे हा माणूस खोरखरच विचित्र आणि चक्रंम आहे. त्यामुळे तिकट काढून बाबा, आई आणि शला असे तिघेही ओरोसला गेले. एका विमानातून उतरताच त्यांची नावं तपासून त्यांना एका गाडीतून थोडे बाजूला नेण्यात आले. तिथे बारा सीटर दुहेरी पंख्याचे हेलिकॉप्टर तयारच होते. केवळ वीस मिनिटात ते प्रोजेक्टच्या हेलिपॅड यावर उतरले. थोड्या दूरवर त्यांना कॅज्युरींना नावाचे हॉटेल दिसत होते. हॉटेलची टुमदार इमारत आणि आजूबाजूला वीस पंचवीस कॉटेजेस असा पसारा होता. त्यांचे सामान नोकरांनी एका कॉटेज मध्ये नेले आणि त्यांना ते डायनिंग रूम मध्ये घेऊन गेले. तेथे समीर त्यांची वाटच पाहत होता. तो या तिघांना म्हणाला तुम्ही दमला असाल आधी जेवण करू आणि नंतर बोलत बसू. जेवण रुचकर होते. आई म्हणाली समीर जेवण छानच आहे आणि हॉटेलही . या भागात टुरीस्ट येतात त्यामुळे हे हॉटेल इथे बांधले आहे. इथे पडझड झालेले तीन-चार वाडे होते ते पाडून इथे हॉटेल बांधले. अर्थात या प्रिफ्याब स्ट्रक्टरमुळे याचे बांधकाम दीड महिन्यात झाले आहे . माणिक आणि बकुळा सस्त्रबुद्धे हे दोघे जण हा पसारा सांभाळतात. इथले प्रोजेक्ट सुरु झाल्यावर इथेच ऑफिस आणि बाकीची व्यवस्था करण्यास सोपे जाईल. मी काहीही बघत नाही. सर्वजण त्याच्याकडे बघत बसले होते. बाबा म्हणाले , समीर काय तुझा प्रोजेक्ट आहे हे तरी सांग. तो म्हणाला प्रोजेक्ट सोपा आहे. सात दिवस मी केरळ मध्ये काढल्यावर माझ्या असे लक्षत आले कि कोवलम सारख्या छोट्या भागातून हजारो टन काजू जगभर निर्यात होतो. पण हा सर्व काजू व्हिएतनाम किंवा दक्षिण अमेरिकेतील काही छोट्या राष्ट्रातून आयात होतात. आपल्याकडे पश्चिम किनारपट्टीवर काजूचे पीक चांगले येते. परंतु त्याची शास्त्रोक्त किंवा मोठ्या प्रमाणावर लागवड होत नाही. आपल्या हवामानाशी सुसंगत असणाऱ्या वेंगुर्ला सहा, सात, आठ असे अनेक चवदार काजू आहेत. त्यामुळेच मी डॉक्टर तावडेंना या प्रकल्पात घेतले आहे. त्यांना घेऊन मी इस्राएल मध्ये गेलॊ आणि तेथील दोन -तीन लोकांना घेऊन व्हियेतनाम, ब्राझील असे भरपूर काजूचे मळे पाहिले. त्यानंतर तावड्यानी बाराशे एक्कर जागा प्रोजेक्ट करीता संपादन केली. इथे चांगली वाढू शकणारी, चांगल्या रोपांचे टिशू कल्चर चालू आहे. लवकरच अशी लॅब येथेही सुरु होईल. प्रत्येक विभागातले सॉईल सॅम्पल गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी आमच्याकडे एक हजार टन तरी पीक येईल आणि ते हळू हळू वाढत पंधरा हजार टना पर्यंत पोहचेल. तर आजू बाजूच्या शेतकऱ्यांना ज्ञान देणे, अतिशय चांगल्या प्रतीची टिशू कल्चर रोपे त्यांना मोफत देणे, शास्त्रीय पद्धतीने रोपांची लागवड करायला शिकवणे आणि त्यांची भरभराट करणे हा मुख्य उद्देश आहे. त्याच प्रमाणे फक्त शेतीवरच अवलंबून न राहता पूरक असा दुग्ध व्यवसाय सुरु करता येतो. थोडक्यात अतिशय उत्तम असा हा प्रकल्प आहे आणि डॉक्टर तावडेंनी त्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. यामुळे या परिसरातील दीड-दोन लाख कुटूंबाला याचा फायदा होईल. बघू कसं काय जमतंय ते. रात्री डॉक्टर तावडेही आले आणि परत गप्पा रंगल्या. त्यातून एवढ्या उपद्व्यापातूनही तो शांत कसा राहू शकतो हे कोणालाच कळत नव्हते.
डॉक्टर तावडे निघून गेल्यावर आनंदवनच्या गप्पा सुरु झाल्या. आता मात्र शला गप्पामध्ये अतिशय उत्साहाने भाग घेऊ लागली. प्रोजेक्ट विषयी बरीच माहिती सांगू लागली. समीर तिच्याकडे बघतच राहिला. शेवटी बाबा म्हणाले अरे तिने सॉफ्टवेअर कंपनी सोडून आनंदवन जॉईन केले आहे. पाच-सहा महिन्यापूर्वी तू मला फोन केला होतास त्यानंतर काही दिवसातच तिने सॉफ्टवेअर ची नोकरी सोडली आणि आता ती चिखलात हात पाय बुडवू लागली आहे. तुझ्या या सर्व पसाऱ्यात तुझी एक एम्प्लॉई आहे काय नाही काय याचा तुला पत्ता नसणारच. बाबा म्हणाला, माझे व्यवस्थापन डेलिगेट केलेले असते त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे मला ज्ञान नको असते. त्यातून आता कंपनी भरभराटीला आली आहे. मला स्वतःला फास्ट लाइफ , पार्टी, क्लब अशा कशाचाही मोह नाही. मी निसर्गातच रमणारा माणूस आहे. त्यामुळे एक-दोन वर्षातच मी सॉफ्टवेअर कंपनी विकून टाकेन आणि निसर्गातच रमून जाईन. तोपर्यंत आनंदवन आणि कॅज्युरींना ही प्रोजेक्ट्स ही छान सुरु झाली असतील. आणि आनंदवन मध्ये हेलिपॅड केले तर मला दोन्ही प्रोजेक्टवर काम करणे सोयीचे होईल. मुंबईतील सर्व प्रॉपर्टी मी विकून टाकेन. मला अजून पुढच्या दोन तीन वर्षात
कूर्ग मध्ये कॉफी वर संशोधन करायचे आहे तर श्रीलंकेत नुवारा इलिया येथे चहावर संशोधन करायचे आहे. या चार संशोधनातं मला प्रचंड आनंद आणि यश मिळेल. तुम्ही पाहिले तर हे सर्व प्रोजेक्ट्स निसर्गाच्या कुशीत असतील. येथेच मला खरा आनंद लाभेल. बाबा म्हणाले, छान कल्पना आहे पण तुझ्या पर्सनल आयुष्याविषयी काय ?
समीर म्हणाला, त्याविषयी मी पूर्वीच विचार केला आहे. निसर्गातच रमणारी मुलगी मी पहिली आहे . बघू लवकरच मी लग्न करेन. हे सर्व ऐकताना शलाचा चेहरा पार पडला होता. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. आई-बाबांनाही वाईट वाटत होतेच. शला डोळे पुसत आपल्या खोलीत जायला निघाली. तेवढ्यत समीर तिचा हात धरून म्हणाला शला माझ्याशी लग्न करशील ? आणि हो , आत्ता विचारलेल्या प्रश्नच उत्तर AI ला विचारून देऊ नकोस .
शला त्याच्याकडे बघतच राहिली. समीर पुढे म्हणाला रियाची आणि माझी फार छान मैत्री जमली आहे. त्यामुळे तुझ्या सर्व भावना आणि AI ची उत्तरे मला समजत होती. पण शला अशा बाबतीत AI फसवे असते. आपल्या मनात असलेली उत्तरे AI कडून मिळायला लागतात. तांत्रिक बाबतीत AI चा उपयोग छान आहे. तू नोकरी सोडलीस हे मला कळले आणि मला बरे वाटले. पण जर तू दुसऱ्या IT कंपनीत जॉईन झाली असतीस तर मी तुझा विचार सोडून दिला असता. शला समीरकडे पाहतच राहिली. समीर पुढे म्हणाला IT हे काय माझे आयुष्य नाही मला लोकउपयोगी बरीच कामे करायची आहेत. म्हणून मी मुद्दामूनच माझ्या प्रोजेक्ट बद्दल तुझ्या कुटुंबाशी खुलेपणाने बोललो. मला IT तील सहचारिणी नकोच होती. पण माझ्या बरोबर उत्साहाने कुठल्याही कामात रस घेणारी सहचारिणी हवी होती. त्यामुळे तू जेव्हा आनंदवन जॉईन केलेस आणि त्यात नवीन कल्पना मांडून धडाडीने काम करू लागलीस त्याचवेळेस मला पटले की तूच माझ्याकरिता योग्य आहेस. अर्थात मी तुला योग्य वाटतो का ? ते तू सांग.
शला लाजून आपल्या खोलीत पळून गेली. बाबा आणि आई जोरात हसू लागले. बाबा हसत म्हणाले, 'समीर आता चला अजून एका प्रोजेक्टला सुरवात झाली.
मनी वसे ते AI दिसे
Submitted by अविनाश जोशी on 11 December, 2025 - 03:22
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कथा मनोरंजक वाटते आहे. मोठी
कथा मनोरंजक वाटते आहे. मोठी असल्याने अर्धी वाचली. उद्या पूर्ण करेन.
सेम हिअर.
सेम हिअर.
दोन तीनदा वाचूनही पूर्ण झाली नाही. उत्सुकता वाढली आहे.
छान .एकंदरीत श्रीमंतीचं वर्णन
छान .एकंदरीत श्रीमंतीचं वर्णन जरा जास्तच झाल्यामुळे प्रेमकथा न राहता रिच कथा झालेय. कथेची लांबी त्यामुळे फारच वाढलीय ती कमी करता आली असती तर... ."मनी वसे ते AI दिसे "हे कथेचे शीर्षक आवडले.
छान परीकथा आहे. पण इतकी
छान परीकथा आहे. पण इतकी लांबलचक वर्णने वाचताना मजा येत नाही. बरीच वाक्ये गाळून गाळून वाचली. शेवट अपेक्षित च होता तसा झाला.
कथेचे संकलन केल्यास बरे होईल.