आक्रांतवाडी बुद्रुक आणि खुर्द यातून नदी वाहत नाही.
म्हणजे नदी होती, पण तिच्या पाण्यावरून दोन्ही गावात वाद झाले. दोन्ही गावचे गावकरी सुलतानाकडं गेले. सुलतानानं नदीच्या मधोमध पार्टिशन उभारायला सांगितली. अर्धं पाणी तुमचं आणि अर्ध त्यांचं असं दोन्ही गावांना सांगितलं.
आक्रांतवाडी बु गावानं अगदी तसंच केलं आणि नदीत मधोमध भिंत घातली. त्या वेळी खुर्द गावाला खर्चाचा अर्धा भाग मागितला असता ते म्हणाले कि आम्ही पण भिंत घालणार आहे. यावरून प्रचंड वाद झाला. दुसर्या दिवशी सकाळी बघितलं तर बुद्रुक भागातल्या नदीला पाणीच नाही. बुद्रुक गावानं मग नदीच्या काठाकाठानं वर जाऊन शोध घेतला तेव्हां समजलं कि खुर्द गावानं नदीवर आडवा बांध घातला होता तो ही बुद्रुक हद्दीत. तो नदीतल्या उभ्या बांधाला जोडल्यामुळं एल आकाराचं धरण तयार झालं होतं. आडवा बांध बुद्रुक हद्दीत असल्यानं पाणी खुर्द गावात वहायला लागलं. अशा पद्धतीनं सगळंच पाणी खुर्द हद्दीतून वाहीलं.
तेव्हांपासून आक्रांतवाडी बुद्रुकला देवाची आक्रांतवाडी आणि खुर्द गावाला चोराची आक्रांतवाडी असं नाव पडलं. देवाची आक्रांतवाडी मधे देव कुणीच नव्हतं. संतही नव्हतं. पण चोराची आक्रांतवाडी हे नाव अर्थपूर्ण असल्यानं गावाला त्याचा अभिमान होता. पाणी चोरल्यानं गावाची भरभराट झाली. तरीही इतरांच्या वस्तूंवर डल्ला मारण्याचा कुटीरोद्योग गावात फोफावला होता. सुलतानाकडं पुन्हा तक्रार गेल्यानंतर सुलतानानं मग बांध इकडचा तिकडं केला. त्यानंतर चोराच्या आक्रांतवाडीचं पाणी बंद झालं. मग चोराच्या आक्रांतवाडीनं काहीही न करता देवाच्या आक्रांतवाडीतून रात्रीची पीकं कापून आणायचा धंदा उभारला. यामुळे दिवसभर निवांत रहावं आणि रात्री कामावर जावं असा त्यांचा दिनक्रम झाला.
आता दिवसभर करायचं काय ?
त्यामुळं गावातल्या पारावर बसून महत्वाच्या विषयांवर चर्चा करणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. या चर्चा एव्हढ्या इरेला पेटत कि काही वेळाने कुर्हाडी, फावडी, कुदळ अशा अवजारांचा त्यात उपयोग होई. काही गावकरी गावच्या वैदूकडे जात तर काही देवाच्या आक्रांतवाडीतल्या दवाखान्यात जात. चार दिवस शांत जीवन चाले.
पण पुन्हा मग काही तरी कारणावरून चर्चा होई.
हेमामालिनीने धर्मेंद्रशी लग्न करावे कि जितेंद्रशी या विषयावरून एकदा एव्हढा वादविवाद झाला होता कि जांबुवंत पैलवानानं सरट्या चिंपाटाचं पाय धरून त्याला जमिनीवर धुणी धुतात तसं आपटलं होतं. चिंपाट हे त्याचं नाव गावानं त्याच्या प्रकृतीवरून ठेवलं होतं. नशीब थोर म्हणून त्याचं डोकं ओट्यावर आपटायच्या ऐवजी गवतात आपटलं होतं. नाक फुटलं होतं आणि कपाळाला खोक पडली होती. मग जांबुवंत पैलवानानंच त्याला वदूकडं नेला होता. वैदूनं त्याच्या डोक्याला पाला चोळला. पण डोकं हललं ते हललंच.
सरट्या चिंपाट त्यानंतर ज्योतिषविद्या सांगू लागला.
तो मग ज्योतिषावरचे विषय पारावर काढत असे. गावाच्या तब्येतीला ते मानवत होते. त्याच्यावर यथासांग चर्चा होई. आता जांबुवंत पैलवानाची पण त्याच्यावर मर्जी बसली.
गावात शिक्षकी पेशामुळं माझ्याकडं पत्र लिहायचं काम यायचं. म्हणून मला लेखक म्हणत. माझ्यावर लोकांचा तसा विश्वास होता. तसा म्हणजे गावात सगळी बेणीच राहत होती. त्यातल्या त्यात कमी बेणं म्हणून माझ्यावर विश्वास टाकला जायचा. पण कमी बेणं आहे असं दाखवणं हा आमच्या घराण्याचा फंडा होता. यामुळंच अनेक उद्योग करूनही आमच्यावर संशय येत नसे. आमच्या घराण्याचा ज्ञात आद्यपुरूष होता त्याने सुलतानाच्या काळात आडवा बांध घालायचं काम केलं होतं, पण या कानाचं त्या कानाला कळू दिलं नव्हतं.
एक दिवस असं झालं कि हा चिंपाट का नाही वेष बदलून आला. आमचं घराणं एव्हढं वस्ताद पण आम्हालाही ओळखू आला नाही. चिंपाट तसा नेहमीच वेष बदलत असायचा. दशावतार मधे तो रावण, भीम, हनुमान अशा धिप्पाड भूमिका सोडून सगळ्या भूमिका करायचा. यात नल आणि नीलचा सहाय्यक वानरपासून काटकुळा नकुल, सहदेव, द्रौपदी, सीता, नारदमुनी, इंद्र, कृष्णाचा किरकोळ गुराखी मित्र, दुर्योधनाचा शहात्तरावा कुपोषित भाऊ अशा सर्व भूमिका असायच्या.
या वेळी हा डॉक्टरच्या वेषात आला होता.
गाव चर्चेचं भुकेलं. पारावर डॉक्टर बसलाय म्हणताना गाव गोळा झालं. रात्री पीकपाणी जोरात हाती आल्याने आता वेळच वेळ होता.
डॉक्टर म्हणाले "ब्रह्मांडा वर चर्चा करायचा मानस होता"
बास...
लोक एव्हढे पेटले, एव्हढे पेटले की ज्याचं नाव ते.
हल्ली प्रत्येकाच्या मोबाईलमधे गुगल घालून येत असल्यानं आता कुणालाही कुठल्याही विषयाचं वावडं नव्हतं.
रामा टेलर म्हणाला " ब्रह्मांडाची उत्पत्ती बिग बँग थिअरीतून झाली"
यावर भुलाबाई रानवडे म्हणाल्या " अॅ हॅ रे चंपाट, तुझ्या खानदानात तरी कुणी बिग बँग थिअरी ऐकलीय का?"
रामा टेलर उसळून म्हणाला "मग काय तुझ्या बा नं मांडली का बिग बँग थिअरी ?"
प्रकरण पेटतंय बघून पृथ्वी गॅरेजवाला मानव म्हणाला " भांडू नका. बिग बँग थेअर ना टेलरनं मांडली, ना रानवडेंनी मांडली. ती सरपंचांनी मांडली "
यावर सगळे एकमेकांच्या तोंडाकडं बघायला लागले. सरपंचाकडून जांबुवंत पैलवानाला भरपूर पैसे मिळत. त्यामुळं त्याचा आखाडा त्याच्या बाजूणं असे. आताही जांबुवंताच्या चेहर्यावर खुषीचे भाव आल्याचं बघून सर्वांनी सबुरीनं घेतलं.
धनवंती बाई मोरमारे म्हणाल्या "ब्रह्मांड आक्रांतोबाच्या मुखातून उत्पन्न झालंय " असं म्हणत त्यांनी एक चित्र दाखवलं. अशी चित्र पूर्वी रामा टेलरच्या कटींगच्या दुकानात असत. यात पृथ्वी एका देवाच्या मुखातून बाहेर येतीय हे दाखवलेलं असायचं. तर शेजारच्याच चित्रात पापी लोकांना नरकात मोठ्या तेलाच्या कढईत तळलेलं दाखवलं असायचं. त्यामुळं कुणी प्रश्न विचारत नसे.
गावात सुटीला शिवरामचं पोरगं आलं होतं. ते मुंबईला धोंडीराम इंटरनॅशनल कॉलेजमधे प्राध्यापक होतं.
ते लंबुळका चेहरा करून म्हणालं " ब्रह्मांडाचा आकार ज्याच्या तेव्हढ्या मेंदू एव्हढा "
याला गण्या पवारनं स्ट्राँग ऑब्जेक्शन घेतलं. सखा पाटलानं विचारलं.
"तुला काय झालं रं गण्या ?"
" हा प्राध्यापक झाला म्हणून रिप्सेक्ट दिला तर हा आपला मेंदू छोटा आहे म्हणतोय "
सखा पाटील यावर खवळला.
"प्रोफेसर हे बरं नाही. शिवरामाचं पोरगं शिकलं म्हणून तुला आम्ही मान दिला तर गावच्या लोकांना डोकंच नाही म्हणायला लागला लका "
शिवरामाचं पोरगं तसं नाही म्हणून खुलासा करू लागलं. पण बहुमत त्याच्या बाजूनं नव्हतं.
थोड्याच वेळात चर्चेला स्फोटक वळण लागलं.
ब्रह्मांड म्हणजे रोमन देवांनी पाठीवर घेतलेली पृथ्वी असा खुलासा गावातल्या एकमेव ख्रिस्ती घर असलेल्या पीटर तांबोळीनं केला. त्यावरून त्याच्ञा अंगावर धावून जात रामा त्याला " ए बाटग्या गप" म्हणाला. यावर गावातला एकमेव देखणा मनुष्य लाजरा याने हे चूक असल्याचे सांगितले.
रामा म्हणाला " लका लाजर्या, लाह बाळग की, ब्रह्मांड म्हणजे पृथ्वी असतीय व्हय ? त्याच्या जोडीला स्वर्ग, नरक पण नाही का येत ?"
लाजरा म्हणाला " तू बाटग्या म्हणाला हे चूक आहे "
रामा यावर काही बोलणार इतक्यात गावचं पुरोगामी मंडळ त्याच्यावर तुटून पडलं.
जांबुवंत पैलवानानं पण आपल्या पोरांना इशारा केला. मग एकच धुमश्चक्री उडाली.
पीटर हे बघून आक्रांतोबाच्या देवळात जाऊन लपला.
पीटर न सापडल्यानं रामानं काळू सुताराला ठोसा मारला. काळू सुतार पीटरचा शेजारी होता. पण झालं भलतंच. काळूचा डोळा पीटरच्या बहीणीवर होता. त्यावरून दोनच दिवसांपूर्वी पीटरनं काळूला धुतला होता. आता रामानं काळूला धुतल्यामुळं काळू चिडला आणि रामाच्या छाताडावर बसून म्हणाला"
"पीटरची सुपारी घेतली व्हय ? बोल राम्या "
यावर रामानं पीटर कडून लाच घेतली असा समज करून घेऊन रामानं काळूला उचलला आणि पूर्ण शक्तीनं गंगीच्या घरावर फेकला. हे बघून गंगीचा बाप काठी घेऊन बाहेर आला. पण जांबुवंताला बघून काठी मागं जमिनीला टेकवून त्यावर बूड टेकवल्यागत गुमान उभा राहिला.
रानवडेंच्या भुलाक्का म्हणाल्या "मारामारी काय करताय ? आपण चर्चा करू "
लाजरा म्हणाला "पण विषय काय आहे ?"
तिकडं आपटा आपटी रंगात आली होती आणि ज्यांच्या अंगात शक्ती होती त्यांना हा कार्यक्रम संपावासा वाटत नव्हता.
एकदाचे मार खाऊ शकणारे गलितगात्र होऊन पडले.
मग मोरमारे बाई लाजर्याकडे वळून म्हणाल्या
"म्हंजे ? विषय काय माहिती नाही ?"
रानवडे बाई म्हणाल्या " तेच तर म्हंते ना विषय काय ?"
रामा कण्हत म्हणाला "ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हा विषय होता "
रानवडे बाई ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी पारावरच्या सीसीटीव्हीचं फूटेज आणायला सांगितलं.
तर डॉक्टरांनी ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं काहीच विचारलेलं ऐकू आलं नाही.
जांबुवंत खवळला.
"कसला डॉक्टर म्हणायचा हा ? एव्हढं महाभारत झालं तरी गप बसलाय . बर्या बोलाने सांगतो का कुटू ?"
यावर चिंपाट चित्कारला "नको नको "
ते ओळखीचं वाटल्यानं जांबुवंतानं त्याची दाढी खेचली तर दाढीच्या आतून सरट्या चिपाट बाहेर आलं.
" याच्या मायला याच्या चिंपाटाच्या. तुला रं काय ब्रह्मांडावर चर्चा करायची ? सांगतो का आपटू परत ?"
यावर सरट्या चिंपाटानं हात जोडत सांगितलं.
" मारू नका, काल रातच्याला नदीवरून येताना नवीन दुकान दिसलं म्हणून बघितलं. जवळ जाऊन बघितलं तर "ब्रह्मांड देशी दारूचे दुकान" असा बोर्ड लावला होता. चौकशी केली तर आज उद्घाटन आहे असं सांगितलं. म्हणून सांगायला आलतो "
त्याच्या या खुलाशावर पृथ्वी गॅरेजवाला मानव म्हणाला " लका फटफटीचा सायलेन्सरच काढला तू आमच्या "
मी पण म्हणालो "लका क्लीन बोल्ड केलं कि रं चिंपाटा "
"आवं पण मी काहीच बोललो नाही उतापती बद्दल "
रानवडे बाई म्हणाल्या "दहा वेळा इचारलं , तोंडाला कुलूप होतं का ?"
चिंपाट चाचरत म्हणाला " गुटख्याचा बार भरला होता "
याबर जांबुवंत पैलवानानं चिंपाटाच्या कमरेला हात घातला होता.
पण तेव्हढ्यात पीटर देवळातून बाहेर आला.
आणि म्हणाला " या सगळ्या गोंधळाला चिंपाट कारणीभूत आहे. म्हणून आज ब्रह्मांडाच्या उद्घाटनाला गावकर्यांचं जे बिल होईल ते चिंपाटानं भरायचं "
हा ठराव एव्हढ्या मोठ्या आवाजी मतदानाने मंजूर झाला कि चिंपाटाचं करवादनं कुणालाच ऐकू गेलं नाही
समाप्त
टीप " या कथेतली सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत.
....अप्रतिम!!!
ओ...
ओ...
ते शेरूचा पुढचा भाग लिवायचं सोडून हे काय मधेच?
बाकी हे बी भारी हाय...
(No subject)
(No subject)
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.
संजय पाटीलजी, टाकतो लवकर.
(No subject)
धन्यवाद मानवजी.
धन्यवाद मानवजी.
इतर मायबोलीकरांना आवडत नाही असे दिसतेय.