अमलताश

Submitted by अमुक on 21 November, 2025 - 06:04

बऱ्याच दिवसांपासून पहायचा म्हणून नोंद करून ठेवलेल्या या अनुभूतीला आज मुहूर्त सापडला. उरकून टाकायच्या कामांच्या यादीत टाकण्यापेक्षा, निवांतपणे रसपरिपोष करायचा ठरवले त्याचे चीज झाले असे वाटले. मराठी चित्रपट या आपत्तीच्या मी सहसा वाटेस जात नाही कारण तेथे पाहिजे जातीचे! माझ्या या धारणेस मराठी सिनेजगताने फारच मनावर घेऊन मला माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सहसा भाग पाडले नाही. नाही म्हणायला जब्बार पटेल, अमोल पालेकर, निशिकांत कामत, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी अशा काही मातब्बर मंडळींनी मला थेटरात खेचून नेले खरे, पण त्यांना अपवाद म्हणून जमेस धरून माझ्या मूलभूत धास्तीस फारसा फरक पडला नाही. शिवाय जगभरातील उत्तमोत्तम कलाकृती पाहता येणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलने वर्षानुवर्षे आमचे फिल्म रसास्वादन अधिकच समृद्ध केल्याने दिवसेंदिवस अधिकच सरधोपट, उथळ, बाष्कळ, बटबटीत, प्रचारकी आणि म्हणून असह्य होत चाललेल्या मराठी चित्रपटांकडून मला शून्य अपेक्षा असतांनां 'अमलताश'ने खूपच आनंदी (आय मीन सुखद!) धक्का दिला... अगदी सतीश राजवाडेच्या 'प्रेमाची गोष्ट' सारखा

तीन महत्वाच्या गोष्टी या निमित्ताने निदर्शनास आल्या - १. सोशल मीडियाने कितीही आव आणला तरी वृत्तपत्रांना निदान महाराष्ट्रात तरी पर्याय नाही. बहुतेकांनी लोकसत्ता मधला राहुलचा लेख वाचल्यामुळे युटूयबवर येऊन अमलताश बघितल्याच्या उल्लेख केलाय. २. नेहमीच्या(च) प्रथितयश(?) निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गायक, संगीतकार यांच्या युतीपेक्षा वेगळे जातिवंत, खानदानी कलाकार किती फ्रेश वाटू शकतात आणि कमाल करू शकतात याचा आनंद अवर्णनीय. चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक सुहास देसले हा आमच्या धुळ्याचा असल्याने वाढीव कौतुक आणि विशेष अभिमान. ३. कथा, कल्पना, निर्मिती, सादरीकरण आणि प्रदर्शन या सगळ्यांत केलेल्या अभिनव प्रयोगाने थिएटर, मल्टिप्लेक्स यांच्याबरोबरच ओटीटीची मुजोरी देखील मोडून काढता येऊ शकते आणि त्या निमित्ताने काही उत्तम, दर्जेदार, सकस, अर्थपूर्ण आणि म्हणून अभिजात असे काही करता येऊ शकते या शक्यतेने उमेद वाढून भविष्य खूपच आशादायक वाटते.

सगळ्यांनी हा तरल अनुभव निवांतपणे नक्कीच घ्यावा आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाच्या प्रमाणात, मल्टिप्लेक्समधल्या तिकीट आणि पार्किंग राहू दे, निव्वळ पाणी आणि पॉपकॉर्नच्या जीएसटीसह किमतीस स्मरून, यथाशक्ती योगदान करावे... तरच अशा प्रयोगांना बळ मिळेल आणि प्रेक्षकांना क्वालिटी कन्टेन्ट! सुहास, राहुल आणि संपूर्ण अमलताश टीमला मनापासून शुभेच्छा... निरंतर!

शुभम भवतु !

(१० महिन्यांपूर्वी अमलताशच्या युट्युब व्हिडीओवर प्रकाशित माझा अभिप्राय)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर आणि तरल चित्रपट!
दुर्दैवाने त्याला खूप जास्त उचलून घेतलं नाही ( मुख्य करून इतर सर्व कलाकारांनी) , कंपूशाहीचं हे अजून एक उदाहरण.

राहुल देशपांडे च मला कौतुक वाटलं त्याचा वसंतराव पण फार सुंदर बनवला आहे आणि हाही, छान काम केलंय त्यांनी. म्हणजे तो गायक आहे की अभिनेता आहे असा प्रश्न पडावा.

धनश्री जरूर बघ, YouTube वर आहे.