हा नाद

Submitted by बिपिनसांगळे on 13 November, 2025 - 10:13

हा नाद
=====

ती त्याच्या नजरेस प्रथम पडली , तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला . आणि यामध्ये काही आश्चर्यही नव्हतं म्हणा . ती होतीच तशी आकर्षक ! गूढाचा वेध घेणारे तिचे चमकदार घारे डोळे , तिचा रंग,रेशमी केस, तिची फिगर , तिची चाल आणि यावर कळस म्हणजे तिची अदा ! तिचा तोरा !
तुमचं मन काय विचार करतंय ते मला माहिती आहे ; पण तसं नाहीये . ती एक काळ्या रंगाची मांजर होती. एकसारखा ,पूर्ण काळा रंग असलेली. फक्त तिच्या पाठीवर एक नाजूक पट्टा होता . सोनेरी केसांचा.
राजा एका पॉश सोसायटीमध्ये राहत होता . एकटाच. तो सावळा होता , साध्याच चेहऱ्याचा . पण अंगाने भरलेला .एका मोठ्या कंपनीमध्ये तो मॅनेजर होता . तो रोजच रात्री उशिरा यायचा. कामामुळे तरी उशीर नाहीतर पार्ट्या . बॅचलर असण्याचा पुरेपूर आनंद तो लुटत होता .
एके दिवशी तो असाच आला. त्याने पार्किंग लॉटमध्ये गाडी लावली. तो किल्ली फिरवत निघाला. पार्किंगच्या पलीकडे सोसायटीची बाग होती. तिथे झुडपांमध्ये काहीतरी खसफसलं . त्याने चमकून पाहिलं . झुडपाच्या आत प्रकाश पोहोचत नव्हता. त्याने नजर ताणून पाहिलं . मग काहीतरी चमकलं . ते तिचे डोळे होते ,चमकदार . एलइडी लाईट लावल्यासारखे.
वर अशोकाची पानं सळसळली .मग तो हसला . त्याने तिला फिसफिस करून जवळ बोलवलं . ती आली की जवळ...
त्याने बिचकत हात पुढे केला . ती आणखी पुढे आली . त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला . तिने आनंदाने अंग आक्रसलं . मग त्याने धीटपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला . तिला ते अजून आवडलं. ती नाजूकपणे म्याव करून ओरडली. मांजरांच्या राज्याचा विचार केला तर तिचा आवाज भलताच गोड होता .
माणूस प्रेमळ आहे ! - तिच्या मनाने याची नोंद घेतली.
मग तो गेला.
दुसरा दिवस . पुन्हा तेच सगळं . त्याला ती आवडली, तिला तो.
त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र तो खुशीत होता . आज त्याने कॅटफूडचा एक पुडा आणला होता. ती दिसल्यावर त्याने तो फोडला .तिला त्याचा वास आला . ती आनंदाने नाजूक ओरडली . आणि अधाशासारखे ते खाऊ लागली . त्याला बरं वाटलं.
तिचं खाणं झाल्यावर तो गेला. आता ते रोजचं झालं . तिने त्याच्याशी दोस्ती केली. पक्की ! ती रोज त्याची वाट बघायची . वाट बघण्याची तिची जागा ठराविक होती . तो आला की ती आनंदाने म्याव करायची आणि त्याच्याकडे पळत जायची . लुटूलुटू ! त्याच्या पायाला ती आनंदाने अंग घासायची . त्याला प्रदक्षिणा घालायची . तिला ते आवडायचं . त्यालाही ते आवडायचं. तो तिच्यासाठी आठवणीने खाऊ आणायचाच .
वॉचमन ते पहात असायचा.
एके दिवशी तो तिला ‘चल’ म्हणाला ; तर ती निघाली की नखरेल पळत . ती त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेली . ती घरात सगळीकडे फिरली . मग ती सोफ्यावर चढून मजेत शेपूट हलवत बसली . जणू काही ते घर तिच्यासाठी नवीन नव्हतंच.
राजाचा टू बीएचके फ्लॅट होता . साधाच पण ठीक सजवलेला . सोफ्यासमोरच्या भिंतीवर एक मोठंसं पोस्टर होतं - ब्लॅक फॉरेस्टचं . जर्मनीमधलं घनदाट जंगल . त्यामध्ये नजर गेली तर हरवून जायला कितीसा वेळ ?...
सकाळ झाली. ती त्याच्याच पायाशी झोपली होती . बेडवर चढून, मुटकुळं करून. त्याला आश्चर्य वाटलं . त्यानेच तिला घरात घेतलं होतं ;पण ती कधी त्याच्या बेडवर आली होती , कोणास ठाऊक !
त्याने दोन अंडी उकडली . एक स्वतः खाल्लं . एक तिला दिलं . ती खुश ! तो बाहेर निघाला . त्याने तिला पार्किंग पलीकडच्या हिरवळीवर सोडलं.
रात्र झाली. ती वाट बघत बसली होतीच . तिच्या ठराविक ठिकाणी . तो आला , तिला फ्लॅटवर घेऊन गेला . तिने मांजरखाद्य खाल्लं .
झोपण्याआधी तो मोबाईल चेक करत होता . सोसायटीच्या ग्रुपवर मेसेज आला होता - सध्या पाण्याचं शॉर्टेज आहे . पाणी जपून वापरा आणि भरूनही ठेवा. त्याने चक केलं आणि मान उडवली . त्याची पाण्याची गरज कमी होती ; तरी त्याला आता पाणी भरून ठेवावं लागणार होतं . ठीक आहे , तो मनाशी म्हणाला.
तो झोपला . ती पसरली तशीच फरशीवर. केव्हातरी गार लागलं , तेव्हा ती त्याच्या उबदार कुशीत शिरली होती.
आणि हे रोजचंच झालं.
कधी तो घरी यायचा नाही. मित्रांकडेच झोपायचा वगैरे. पण आता तो रोज घरी येऊ लागला . त्याला घरची ओढ वाटू लागली . त्या एकट्या ब्रह्मचाऱ्याला कोणीतरी होतं आता . वाट बघणारं .
ती त्याची वाट बघत असायची . मग तो यायचा. तिला वर न्यायचा . खाऊ घालायचा . ती त्याच्या पायापाशी घुटमळायची . त्याच्या पायाला अंग घासायची. लाडात यायची . तिच्या संगतीत तो दिवसभराचा शीण विसरून जायचा.
तो तिच्या प्रेमातच पडला जणू.
तो तिला बेडवर ठेवायचा. कुरवाळायचा. ती पण मजेत असायची . एके दिवशी तो तिला म्हणाला , ' शोना , तू माझ्यासारखी माणूस का नाहीस ?' त्यावर ती त्याच्याकडे गोड लाडीकपणे पहात राहिली . त्याचं ते वेड , त्याचा तो विचार वाढतच गेला.
एखाद्या तरुण मुलीच्या प्रेमात पडावं, तसा तो तिच्या प्रेमात पडला . त्याने ऑफिसमध्ये हे सांगितलं असतं ; तर त्याला लोकांनी वेड्यातच काढलं असतं .
पण ती मांजर नव्हतीच . ती तर जणू त्याची प्रेयसीच होती .
त्याला वाटायचं की ती मनुष्य रूपात अवतीर्ण का होत नाही ? … तसं झालं असतं तर त्याने तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी केल्या असत्या. मिठीत घेतलं असतं. चुंबनांचा वर्षाव केला असता आणि पुढे सगळंच...
त्याच्या या विचारांचा ग्राफ काही केल्या खालीच येईना .
त्याचं मन सतत तिच्याबरोबरच्या ' त्या ' गोष्टीचा , त्या आनंदाचा विचार करत रहायचं .
नाहीतरी तो एकटाच होता. त्याला आत्तापर्यंत कोणी भेटलं नव्हतं. दोन - तीन मुलींशी मैत्री झाली होती ; पण ते तेवढ्यापुरतंच . प्रत्येकाची - प्रत्येकीची सध्या जगण्यावागण्याची तऱ्हाच वेगळी ! एन्जॉय आणि स्वातंत्र्य या गोष्टींचा अतिरेक एवढा की खरं जगणंच बाजूला पडू लागलेलं. लग्न वगैरे गोष्टींचं गांभीर्य तर नाहीच.
ती तर त्याची सर्वार्थाने प्रेयसीच होती . फक्त ती एक गोष्ट सोडता; कारण ती माणूस नव्हती . आता मात्र तो सदोदित त्याच एका गोष्टीचा विचार करू लागला . शेवटी तरणाबांड गडी होता तो . त्याच्या तरुण शरीराचीही काही गरज होती . पण त्याचा त्याने शोधलेला पर्याय मात्र ? ... हे काहीतरी विचित्र होतं ; पण ते तसं होतं खरं . आपल्या जगाबाहेरचं .
पण हे प्रत्यक्षात कसं उतरणार होतं ?...
-------
एकदा त्याला उशिरा रात्री तो भेटला . राजा कार चालवत होता . एका माणसाने त्याला हात दाखवला . एखादा महाराज वगैरे असावा तसा तो माणूस होता .
तो होता फाटकाच. साधे कपडे अंगावर असलेला . पण त्याच्या डोक्यावरचे अन दाढीमिशांचे केस मात्र प्रचंड वाढलेले होते . काळे-पांढरे . त्यामुळे त्याचा बारकुडा देह आणखीच कृश दिसत होता .
त्या माणसाने राजाच्या डोळ्यांत पाहिलं मात्र -
'मांजराच्या प्रेमात पडला आहेस ?' त्या माणसाने धाडकन विचारलं.
त्यावर हा उडालाच .त्याला भारीच आश्चर्य वाटलं. त्याने डोळे विस्फारले.
त्यावर तो महाराज म्हणाला,' तिला मी मनुष्य रूपात आणू शकतो.'
आता मात्र हद्दच झाली होती . ह्याला हे सगळं कसं काय कळतंय ? त्यात दिवस कुठले आणि हा काय अशक्य स्वरूपाच्या बाता मारतोय ? राजाच्या मनात विचारांचं आवर्त घोंगावलं .
महाराजाची स्वप्नं फार मोठी होती . त्याला पंचमहाभूतांवर सत्ता गाजवायची होती. त्यासाठी साधना आणि त्यासाठी वेळ पाहिजे होता.आणि पोट ? ते तर मांत्रिकालाही चुकलेलं नाहीच . या सगळ्यासाठी त्याला पैसा पाहिजे होता.
मांजराचा माणूस करणे हा त्याच्यासाठी एक साधा प्रयोग होता . पाच लाखाच्या बदल्यात तो हे काम करणार होता.
‘पाच लाख ?’ हा म्हणाला . मुळात त्याचा या गोष्टीवर विश्वास नव्हता . फ्रॉडचे वेगवेगळे प्रकार . त्यातलाच हा एक. येडागबाळा , फाटका माणूस हा , म्हणून . नाहीतर ऑनलाईन फ्रॉड केला असता शहाण्याने , त्याला वाटलं .
पण तरी शेवटी तो तयार झाला . त्याचं वेड शहाणपणाला भारी होतं. त्याने चान्स घ्यायचा ठरवलंच . मनीचं रूपांतर एका आकर्षक तरुणीत होणार असेल तर ... ही रक्कम कमीच आहे , त्याला वाटलं .
अमावस्येच्या रात्री बारा वाजता तो मनीला घेऊन महाराजाच्या घरी गेला. ती बंगल्यांची एक शांत गल्ली होती . एक बंगला होता . जवळजवळ गल्लीच्या बंद टोकाशीच . तोही बंदच होता. फाटक लोटलेलं. अंगणात दिवा नाही. रानटी झुडपं मन मानेल तसं वाढलेली . आतमध्येही दिवे नव्हते . मागच्या बाजूच्या एका खोलीत प्रकाश असावा . ती खोली म्हणजे त्या बंगल्याचं आउटहाऊस होतं . महाराजाचं घर.
महाराजाने विधी करायला सुरुवात केली...
राजाचं डोकं वेडंवाकडं पळत होतं . महाराजाला हे सगळं जमतं ; तर तो काय काय मजा करू शकतो ? काय काय मजा मारू शकतो ? पण तो असं काही करेलसं वाटत नव्हतं . त्याच्या जागी आपण पाहिजे होतो , त्याला वाटलं .
अर्थात , फरक तिथेच तर होता .
तासाभराने तो तिथून बाहेर पडला. तेव्हा त्याच्या कुशीत एक सुंदर, उबदार तरुणी होती . फिकट निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये. त्याच्या मनीचे सगळे फीचर्स तिच्यात असलेली . नाजूक, नखरेल,नवयौवना - घाऱ्या डोळ्यांची !
त्याने कार चालू केली . या क्षणाला तो अतिशय खुशीत होता . त्याने शीळ वाजवली. मध्येच त्याला एफएमची आठवण आली . त्याने कारचा रेडिओ सुरू केला . त्यावर नाट्यसंगीताच्या एका कार्यक्रमाची जाहिरात लागली होती . गाणं लागलं होतं -
हा नाद सोड सोड...
काय तरी एकेक योगायोग असतात !
पण आता तो मागे फिरणं शक्यच नव्हतं . गडी भलत्याच नादाला लागला होता...
तो घरी आला . त्याने दार लावलं. मनी बेडरूमकडे पळाली . त्याच्या डोक्यात आता फक्त एकच विचार घोळत होता ... त्याने स्वतःचं आवरलं . ती बेडवर लोळत होती . कपडे काढून ... जे कपडे तिने महाराजाच्या घरी चढवले होते. एक फिकट निळ्या रंगाचा गाऊन आणि इनर. राजा जातानाच ते बरोबर घेऊन गेला होता . तिला ते कपडे अंगावर नकोसे वाटत असावेत. त्याने डोळे विस्फारले . ती पालथी पडली होती . एखाद्या लाटेसारखी - गोलाकार उंचवट्यांसहित . तिच्या पाठीवर सोनेरी लव होती . मनीची आठवण करून देणारी . त्याने त्यावरून हात फिरवला . ती फिस्कारली . त्याने परत हात फिरवला मऊसर लव होती . रेशमी . या वेळी ती चित्कारली . जीवघेणं . तो पेटला . त्याने तिला जवळ ओढलं . तीही त्याला घट्ट बिलगली .
हवेत सुखद गारवा होता . कपडे अंगावर नसताना नकोसा वाटणारा ; पण मिठीत तो गारवा हवासा वाटू लागला .
मग त्यांनी आनंद लुटला. पुरेपूर ! क्रिया तीच . त्यात वेगळं ते काय ? पण हे काहीतरी विचित्र स्वरूपाचं होतं , हे नक्की .
पण एक गोष्ट होती - तिच्या सगळ्या क्रिया या रानटीपणाच्या जवळ जाणाऱ्या होत्या . वाइल्ड !
दोघे झोपले . रात्रभरात त्याने एकदाही डोळे उघडले नव्हते. सकाळ झाली .प्रकाशाची तिरीप पाहून त्याने डोळे उघडले. ती घरात आनंदाने फिरत होती . शेपटी फलकारत . मनी बनून .
मध्यरात्र झाल्यानंतरचे दोन प्रहर काय ते ,ती माणूस होऊ शकणार होती. बाकी इतर पूर्ण वेळ ती मांजरच होती . ती पूर्ण वेळासाठी माणूस नव्हती , हा तर मोठाच प्रॉब्लेम होता ; पण त्याने विचार केला - समथिंग इज बेटर ...
दोन प्रहर तर दोन - तेवढ्यात त्यांचे दोन कहर व्हायचे !
त्यांचे दिवस म्हणजे त्यांच्या रात्री मजेत सरत होत्या. दोघेही एकमेकांच्या खूप प्रेमात होते . आणि का नसावेत ? तिला तो आधीपासून आवडायचा आणि आता तर ते आवडणं द्विगुणित झालं होतं .
दिवसेंदिवस त्यांची देहसोहळ्याची गोडी वाढतच चालली होती .
धरलेल्या उंदराला मांजर जसं खेळवतं तशी ती त्याला खेळवायची . हेही वेगळंच . एखाद्या स्त्रीला ते जमणार नव्हतंच . त्याला तर मजाच वाटायची . नंतर तो मेल्या उंदरासारखा निपचित पडायचा . ते वेगळं .
-------
एके दिवशी रात्री त्यांचा कार्यक्रम झाला . त्याने अभावितपणे तिची मानगूट धरली . तेव्हा तिला ते फार आवडलं . मग तो गाढ झोपला . तिला काय ? तिला दमणं माहितीच नव्हतं . ती जागीच होती . तिला खिडकीत कशाची तरी चाहूल लागली.
खिडकीत बाहेर एक दांडगट , आगाव बोका आला होता . जाडगेलासा , भरल्या मानेचा . काळे- पांढरे कॅमोफ्लाजसारखे पट्टे असलेला . कुठून तिथे पोहोचला होता ? कोणास ठाऊक ? अर्थात इमारतीची रचना तशी होती खरी . त्यामुळे तिथे तो पोहोचू शकत होता.
तो विशिष्ट आवाजात ओरडला- तो आवाज म्हणजे मादीला साद होती . कामविव्हल साद ! ... कारण त्याला माजावर आलेल्या मांजराचा वास आला होता . पण ते सालं मांजर कुठं दिसत नव्हतं त्याला .त्यामुळे तो बावचळला होता .
वाऱ्यावर तो वास पसरतच चालला होता . भावना चाळवणारा . प्राण्यांना वास तर पटकन येतात . त्यात तो उग्र वास .
ती बेडवर बसली होती . तिने त्या बोक्याला बोलवलं तर तो धीटपणे जवळ आला . त्याने तिच्या अंगाचा वास घेतला . तो वास जवळ आला होता . पण काहीतरी चुकत होतं . तो आणखी बावचळला .
तो पुन्हा ओरडला.त्या आवाजाने ती घायाळ झाली . तिला कसंतरी झालं . तिच्या आदिम प्रेरणा आत कुठेतरी जाग्या झाल्या ; पण त्या क्षणाला ती मनुष्यरूपात होती . थोड्यावेळाने तो बोका गेला. तेव्हा ती पुन्हा मार्जार रुपात गेली.
दुसऱ्या दिवशी तो बोका पुन्हा आला . त्यावेळेला ती मांजर होती . कालच्यासारखाच पुन्हा तो विशिष्ट आवाजात ओरडला . हिनेदेखील त्याला साथ दिली. ती खिडकीतून बाहेर गेली . त्यांना त्यांची ओळख पटली . त्यांच्या अंतःप्रेरणांची त्यांना जाणीव झाली .
त्याने जंगलीपणे तिची मानगूट धरली. आणि मग त्यांचा कार्यक्रम सुरु झाला . बाहेर अशोकाची पानं सळसळली . थोड्या वेळाने बोक्याची सळसळ थांबली . तो बाजूला झाला . ती खुश ! हे काहीतरी वेगळं होतं . रासवट! वाइल्ड !
आणि असं रोजच होऊ लागलं . आधी राजा मग बोकोबा . मनीची डबल धमाल चालू झाली .
पण पुढे प्रॉब्लेम झाला. बोकोबाला तिचं मानवी रूप , राजाबरोबर येणारे तिचे रोजचे संबंध या गोष्टी लक्षात आल्या . या गोष्टीवरून तो सारखा मनीचं डोकं खाऊ लागला . तिच्याशी भांडू लागला . तो राजाचा दुस्वास करू लागला . त्याच्या त्या विचारांचा ग्राफ काही केल्या खालीच जाईना. तो वरच जाऊ लागला .
या बाबतीत तो जणू काही माणूसच होता .
पण मनीला मनुष्यरूपात जास्त मजा येत होती . प्राणीरूपात तोच व्यवहार म्हणजे उरकल्यासारखं वाटायचं . तिला वाटायचं - हे बोक्याला का कळत नाही ? हे एक रहस्यच होतं . शेवटी तिला कळलं की त्यासाठी बोका पुरुषरुपात यायला हवा . जसं राजाला तिच्याबद्दल आधी वाटत होतं , अगदी तसंच तिला बोक्याबद्दल वाटू लागलं .
काय करता येईल ? तिचं मन विचार करू लागलं .
-------
शेवटी मनी त्याला घेऊन महाराजांकडे गेली . त्यालाही मनुष्यरूप धारण करता येण्यासाठी... अर्थात ती स्वतः मनुष्यरूपात असतानाच .
आणि पैसे ? अर्थातच राजाचे पैसे लंपास होणार होते. बोकोबा त्याला रीतसर लुटणार होता . मनुष्यरूपात गेल्यावर.
महाराजाने विधी केले.
झालं . बोकोबालाही मनुष्यरूप धारण करण्याची युगत गवसली . तो कधी त्या रूपात तर कधी मांजररूपात मनीचा उपभोग घेऊ लागला . दोघे खुश ! मनुष्यरुपात तो एक बलदंड तरुण व्हायचा . अर्थात त्यांना घराबाहेर जायची चोरीच होती . घरात राजा . मग त्यांचा सगळा कारभार चोरीछिपेच चालायचा .
राजाला खबर न लागू देता .
पण बोक्या मांजररूपात असताना मनीला जास्त मजा येत होती . कदाचित ते त्यांचं मूळ असावं शेवटी . निसर्गनियमबद्ध .राजापेक्षा जास्त सुख देणारं . वाइल्ड !
बोका मनुष्यरूपात आल्यावर जास्त मजा येईल असं तिला वाटलं होतं . पण तिचा तो अंदाज चुकला होता .
एके दिवशी मध्यरात्री राजाला जाग आली , तेव्हा त्या दोघांचा मांजररूपात कार्यक्रम चालू होता. बोकोबा पटकन थांबला. बाजूला झाला . झोप मोडलेल्या राजाला काही कळलं नाही. त्याला फक्त असं वाटलं की घरामध्ये आणखी एक मांजर फिरतंय म्हणून. भास होत असेल म्हणून त्याने कूस बदलली आणि तो झोपला .
बोका खूप नाराज झाला . राजाने त्याला व्यत्यय आणला होता . अन तो ? त्याने आत्तापर्यंत राजाला कधी व्यत्यय आणला नव्हता . त्याच्या मनातली चीड आणखीच वाढली .
राजाच्या रात्री मजेत चालल्या होत्या.
-------
त्यानंतर बरेच दिवसांनी-
वॉचमन म्हणाला की त्याने बऱ्याच दिवसांत राजासाबला पाहिलं नाही . ते कुठे जातानाही दिसले नाहीत . त्यांची गाडीही एका जागेवरच उभी आहे.
बरीच चर्चा झाली तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आलं . दाराला कुलूप नव्हतंच . ते आतून बंद होतं. पोलिसांनी दार तोडलं .
आतमध्ये एक उग्र वास येत होता . तीव्र दुर्गंध . नकोसा , अती नकोसा ! कुठून ते कळत नव्हतं . राजा कुठेही दिसत नव्हता . पोलिसांनी सगळीकडे शोधण्याची सुरुवात केली.ते बाथरूममध्ये पोहोचले. तिथे एक मोठा निळा ड्रम होता पाण्याचा. राजाने खास पाणी साठवण्यासाठी आणलेला . घट्ट झाकण लावून बंद केलेला . पण त्यामध्ये आता पाणी नव्हतं; तर त्यामध्ये राजा तुकड्यातुकड्यात विसावला होता.
लोकांचे हात नाकावर गेले. त्याहीपेक्षा जास्त म्हणजे सगळ्यांना प्रचंड धक्का बसला होता. राजा मेला होता. त्याची हत्या करण्यात आली होती .
नंतर सोसायटीचं सीसी टीव्ही फुटेज तपासण्यात आलं . त्यामध्ये राजा कुठे जाताना दिसला नाही . किंवा कोणी अनोळखी माणूस येताना दिसला नाही . राजाचे जे काही ठरविक मित्र यायचे . तेही येताना काही दिसले नाहीत . पण हे सगळं नंतरचं .
जेव्हा पोलिसांचं काम चालू होतं, त्यावेळी खिडकीमध्ये मनी आणि बोकोबा बसले होते.
वॉचमनला राजाचं मनीप्रेम माहिती होतं . त्याला वाटत होतं की राजा गेला- आता मनी काय करणार ?
पण मनी आणि बोकोबा मस्त मजेत बसून, रुबाबात शेपटी फलकारत होते . एवढं मोठं कांड त्यांनी केलं होतं; पण पोलिसांची संशयाची सुई त्यांच्याकडे कधीही वळू शकणार नव्हती. राजाची हत्या करणारे गुन्हेगार त्यांच्या तावडीत कधीच येणार नव्हते .
विधी करण्यापूर्वी महाराजाने बोक्याच्या डोक्यांत पाहिलं होतं, त्यावेळी तो चमकला होता… पण त्याला त्याच्या स्वतःसाठी फक्त पैसे हवे होते . पुढच्या बऱ्यावाईटाशी त्याला काहीच घेणंदेणं नव्हतं .
जेव्हा राजाची हत्या करायची होती, तेव्हा त्या दोघांनी साहजिकच मनुष्यरूप धारण केलं होतं. त्याशिवाय ते शक्यच नव्हतं ! ... पण आता ते मनुष्यरूप हवेत जणू विरून गेलं होतं . बोका मनीला म्हणाला होता - आता आपल्याला त्या भंगार मनुष्यरूपाची काही आवश्यकता नाही . आपला प्राणीजन्मच ठीक आहे . मनीलाही नीटसं ठरवता येत नव्हतं - मांजररूप की माणूसरूप ? तिला वाटलं - प्राणी हे रानटी असतात . आणि माणसंही ; पण माणसं त्या रानटीपणाला घातक विचारांची जोड देतात. त्यामुळेच तर माणूसरूपात त्यांची डोकी अतिघातक रूपात चालली होती . त्यांनी इतका मोठा गुन्हा सहजी पार पाडला होता .माणसं दर दिवशी अशा गोष्टी करताहेत , हे तिला माहिती नव्हतं . ते तिला कळलं असतं तर तिला अपार खिन्नता आली असती . मनुष्यरूपाची आणि मनुष्ययोनीची किळस आली असती . मनुष्यरूपात गेलो नसतो तर कदाचित राजाला आपण मारलंही नसतं, मनीला असंही वाटलं . तिने ठरवून टाकलं - आपलं मांजररूपच बरं आहे .
आत्ता खिडकीत बसून माणसांकडे पाहताना त्यांच्या नजरेत भीतीही नव्हती आणि पश्चातापही. माणसं भावनाशून्य होऊ शकतात , मग प्राण्यांकडे भावना कितीशा ? मनीची नजर ड्रमकडे रोखलेली होती .
राजा जिवंत असता, त्याने मनीची ती थंड नजर पाहिली असती ; तर त्याला मात्र तिच्यावरच्या प्रेमाचा पश्चाताप झाला असता.
समोर ब्लॅक फॉरेस्टचं पोस्टर निश्चल होतं . ब्लॅक हे नुसतं नाव आहे त्या हिरव्यागार जंगलाचं . पण माणसाचं आयुष्य मात्र - काळ्या जंगलात हरवून जाण्यासारखंच आहे ! पावलापावलाला काय धोके असतील याचा अंदाज न येणारं , कोण जीवाचे लचके तोडायला टपून बसलं आहे हे कधीच लक्षात न येणारं . कोण आपलं कोण परकं ? या जटिल कोड्याचा उलगडा न होणारं…
एका गुलाबी प्रेमाचा शेवट एका निळ्या ड्रममध्ये झाला होता , एवढं मात्र खरं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे
तुम्ही प्रतिसाद दिलात . या कथेवरचा पहिलाच . तुम्हाला दखल घ्यावीशी वाटली.
खूपच आभार .
कृपया खालील प्रतिसादही पहावा .

वाचक मंडळी,
नमस्कार.
महत्त्वाची सूचना –
ही प्रतिक्रिया खरं तर द्यायला नकोय . पण आत्ता देतोय . कारण ती वाचल्यावर कथेतील टर्न्स आणि ट्विस्ट्स आधीच कळतात . मग वाचनातली मजा जाते.

कथा सरळ असावी . ती सहजपणे स्पष्ट व्हावी . लेखकाला उलगडून सांगण्याची गरज पडू नये खरं तर .
पण सांगतो-
ही कथा पोस्ट करताना साशंक होतोच मी स्वतः . की ही कथा वाचक कशी स्वीकारतील ? मला लिहितानाच माहिती होतं की ही नेहमीची गोड गोड कथा नाही , त्यात तिचा शेवट निगेटिव्ह,
माझ्यासाठी हा एक प्रयोग होता आणि वाचकांनाही ही कथा माझ्या नेहमीच्या वाचनशैलीच्या बाहेरची वाटली असेल , असं वाटतं . त्यात लेखकाने त्याचे प्रयोग वाचकांवर का करावेत ? असं एखादा सुज्ञ वाचक म्हणेलसुद्धा .
त्यामुळे कदाचित कथेला प्रतिसादही कमी व प्रतिक्रियाही ...
ही कथा काल्पनिक आहे . पण त्याला एक ताजा जिवंत संदर्भ आहे . जिवंत ? ...
ऑगस्टमध्ये उत्तर प्रदेशात एक केस झाली . एका बायकोने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला आणि त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे केले . ते तिने घरातील पाणी साठवण्याच्या निळ्या ड्रममध्ये भरले . नंतर निळ्या ड्रमची अशी अजून एक केस झाली आणि नंतर बायकोने नवऱ्याला मारल्याच्या कितीतरी केसेस झाल्या . त्यानंतर आणखी एक केस म्हणजे हनिमूनला गेल्यावर नव्या नवरीने तिच्या आधीच्या मित्राच्या मदतीने आपल्याच नवऱ्याचा खून केला . अजून एक केस - एका लिव इन पार्टनर मुलीने दोन नंबरच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने पहिल्या बॉयफ्रेंडचा खून केला व आग वगैरे लागल्याचा देखावा निर्माण केला वगैरे वगैरे वगैरे
नेटवर शोधल्यास या बातम्या लगेच सापडतील . हिंदी बातम्यांच्या चॅनेल्सवर अशा बातम्या चालूच असतात पण या बातम्या मी मराठी वृत्तपत्रांत वाचल्या आहेत .
सर्वसाधारणपणे गुन्हेगारी कृत्यांत पुरुष पुढे असतात . आणि खून करणं मुळात वाईटच; पण नवऱ्याने बायकोचा खून केलाय अशा केसेस जास्त प्रमाणात असतात . तेही चुकीचंच . पण एखादी स्त्री पार्टनर किंवा बायको आपल्याच नवऱ्याचा किंवा प्रियकराचा खून करते म्हणजे ?
स्त्रिया या नैसर्गिकरित्या मृदू ,प्रेमळ , काळजी घेणाऱ्या अशा असतात . त्या पार्श्वभूमीवर हे फार फार धक्कादायक वाटतं . स्त्रियांनी कणखर भूमिका घेणं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं , एखाद्या गुन्हेगाराला मारणं वगैरे - हे ठीक . पण हे असे आपल्याच माणसांचे कोल्ड ब्लडेड, पद्धतशीर, नियोजन करून केलेले मर्डर म्हणजे ? ... बरं - या स्त्रिया मूळच्या गुन्हेगार नाहीत . त्यांचं असं काही रेकॉर्ड नाही . त्या चांगल्या घरातल्या आहेत .
एकूणच माणसं हिंसक झाली आहेत . हिंसा कॉमन व्हायला लागली आहे , प्रतिष्ठाही पावू लागली आहे . जरा आपल्या आजूबाजूला कुठेही पहा . पण स्त्रिया का अशा हिंसक होऊ लागल्या ?
अर्थात हा एक सामाजिक, वैद्यकीय , मनोविकारशास्त्र यांचा विषय असू शकेल . पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून नकोसं वाटतं .
आणखी एक - खून करणं वाईटच ; पण हे असे तुकडे तुकडे करणं ? विचित्र पद्धतीने जीव घेणं ? ... हा क्रूरपणा येतो कुठून ? ही पाशवी वृत्ती येते कुठून ?
असो -
तर तो निळा ड्रम प्रसिद्ध झाला . त्यावरही लोकांनी अनेक रिल्स वगैरे बनवले . याला काय म्हणायचं ? ... उत्तर भारतात मित्राच्या लग्नात चेष्टा म्हणून मित्रमंडळ नवऱ्याला असा निळा ड्रम भेट म्हणून देऊ लागले . वगैरे -
कथा त्या कोनातून पाहावी .
मला सरळ सरळ तेच म्हणायचं आहे . काहीसं रूपक अंगाने मी हे लेखन केले . त्यासाठी मांजर हा प्राणी निवडला आहे. कारण मांजराचा संबंध गूढाशी असतो . आणि मला हेही म्हणायचंय - मनी आणि बोका त्यांच्या मूळ प्रवृत्तीवरच जातात . ते माणसाच्या रूपात राहू शकत नाहीत, ते माणसाच्या रूपात हत्या करतात . म्हणजे ही मूळ प्रवृत्ती महत्त्वाची . त्या वृत्तीवर जाणं अशा अर्थाने ही कथा . गुन्हेगारी मानसिकता आणि अशी मानसिकता असलेल्याचं दुसऱ्या गुन्हेगाराशी सहज जमतं, एखाद्या तंबाखू खाणाऱ्या माणसाचं दुसऱ्या तंबाखू पंटरशी जमतं तसं . मग हे गुन्हेगारी मानसिकतेचे लोक एकत्र येतात , गुन्हा करतात . आणि खूप धक्कादायक आणि वाईट गोष्ट अशी की त्यांना या कृत्याचं दुःख नसतो की पश्चाताप !
आपण कुठे चाललोय ?
बाय द वे कथेचे नाव खरं तर मला - निळ्या ड्रमचे रहस्य - असंच ठेवायचं होतं.
सहमत असाल / नसाल , एवढं वाचलंत यासाठीं खूप आभार .
कल्पना आहे की कदचित -कथा आवडली नसेल . त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला नको वाटलं असेल
पण
सर्वच वाचकांचे मनापासून आभार मानतो .

रोचक मांडणी!
कथा नेहमीप्रमाणे सुंदर रंगवली आहे.
प्रतिसादात लिहिलेले कथेचे विश्लेषण हि उत्तम.!
कथेचा शेवट वाचताना मेरठ हत्याकांड आठवलं..

पण माणसाचं आयुष्य मात्र - काळ्या जंगलात हरवून जाण्यासारखंच आहे ! पावलापावलाला काय धोके असतील याचा अंदाज न येणारं , कोण जीवाचे लचके तोडायला टपून बसलं आहे हे कधीच लक्षात न येणारं . कोण आपलं कोण परकं ? या जटिल कोड्याचा उलगडा न होणारं…>> अगदी अचूक शब्दांत लिहिलयं..!

तर तो निळा ड्रम प्रसिद्ध झाला . त्यावरही लोकांनी अनेक रिल्स वगैरे बनवले . याला काय म्हणायचं ? ... उत्तर भारतात मित्राच्या लग्नात चेष्टा म्हणून मित्रमंडळ नवऱ्याला असा निळा ड्रम भेट म्हणून देऊ लागले . वगैरे -> हे खूप विचित्र वाटले वाचून. लोक खरंच असं वागू शकतात ???