PLUR1BUS (There is no 'I' in 'we'!)

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 November, 2025 - 10:06

'ब्रेकिंग बॅड' या ऑल टाईम बेस्ट टीव्ही सिरीजचा लेखक दिग्दर्शक विन्स गिलिगन याची नवीन मालिका अ‍ॅपल टीव्हीवर शुक्रवारी सुरू झाली.
पहिल्या सीझनमध्ये ९ एपिसोड असणार आहेत, दर शुक्रवारी एक याप्रमाणे रिलीज होतील.
त्यांचा कीस किंवा पिसं काढायला, त्यावरून वाद घालायला, प्रसंगी हमरीतुमरीवर यायला हा धागा उपयोगी पडेल.

****************************************************************************************************************
इथे स्पॉइलर्स येतील. नको नको म्हणत कधी अनवधानाने, कधी राहावत नाही म्हणून दिले जातील. त्याला इलाज नाही.
ज्यांनी मालिका अजून बघायला सुरुवात केलेली नाही त्यांनी आपापल्या जबाबदारीवर धागा वाचावा किंवा वाचू नये!
****************************************************************************************************************

गिलिगनचे अनेक फॅन्स इथे आहेत, त्यांना पेशल आणि सहर्ष आमंत्रण.
ज्यांनी अजून ब्रेबॅ किंवा बेकॉसॉ पाहिलेली नाही किंवा गिलिगन माहीत नाही, त्यांना ... 'We just want to help!' Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांनी अजून ब्रेबॅ किंवा बेकॉसॉ पाहिलेली नाही किंवागिलिगन माहीत नाही, त्यांना ... 'We just want to help!' >>> Proud
हो, We can't wait for you to join us Happy

पहिले दोन एपिसोड बघुन आता पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याबद्दल मला काहीही ठोकताळे बांधता येत नाही आहेत.
पहिला एपिसोड बघून आता कसे एकेक झॉंबी बनताहेत, डिमेंटर्स किस ऑफ डेथ वगैरे डोक्यात विचार येऊ लागलेले. पण हे काही तरी वेगळंच निघालं.
बाकी सहा इंग्लिश स्पीकिंग लोकांत भारतीय, जपानी, एशियन/ साउथईस्ट एशियन येऊन गेल्यावर इंग्रजी न बोलणारे आता नक्की कोण असतील ती पण उत्सुकता आहे.
भारतीय बाई लक्ष्मी तिची आई पद्मा Lol ती इतकी अस्खलित भेंxx म्हणते, Wink ते पण टिपिकल मान हलवत! Lol बास रे बास!

फक्त ११ लोक आहेत हे पहिल्या भागात सांगून दुसर्‍याची सुरुवात प्रेते उचलणार्‍या बाईने होते. मी आकडे मोजू लागतो. मग डंपर चालक, मग अ‍ॅक्टिव्हा चालक, मग रस्त्यातले लोक, मग विमानचालक.. माझा आकडा बराच मोठा झाला. मग ११ म्हणजे बेस शंभर वगैरे मधले अकरा असणार असले जोक मारुन झाले.
प्रेतं उचलणे, अ‍ॅक्टिव्हा चालवणे, प्रसंगी रहदारीतून वाट काढायला अ‍ॅक्टिव्हा फुटपाथ वरुन चालवणे, मग अ‍ॅक्टिव्हाची किल्ली देवून एकदम ढींनचॅक जेट इंजिनची किल्ली घेणे आणि ते उडवून (बहुतेक) अल्बुकर्कीला येणे. हे सगळे उपद्व्याप का? तर तिकडच्या शॉवर मध्ये नग्न होऊन तिची आंघोळ आपल्याला दाखवायला. Lol नंतर समजलं हे सगळं त्यांचे मेंदू एकमेकांशी जुळलेले आहेत. आणि सगळ्यांना सगळ्यातलं सगळं कळतं हे दाखवायला हा उपद्व्याप होता. कणेकर खुष झाले असते. आंघोळ मिळाली! Lol
बाकी सगळ्यातलं सगळं कळतं.... हे ऐकल्यासारखं वाटतंय का? Wink Lol

किती प्रकाशवर्षं लांबून आला होता संदेश?
असा 'कलेक्टिव कॉन्शसनेस' तयार करण्यामागे पाठवणार्‍यांचं मोटिव्हेशन काय असेल?
मग आता त्या उंदरांनाही आपलं सगळं माहीत झालं का? आणि व्हाइसे व्हर्सा? प्राण्यांचं काहीतरी म्हणाले ना?

अरे आंघोळ करणारी बाई ११पैकी नव्हती! >> हो हो. पण ते नंतर समजलं. आधीचा एपिसोड ११ आहेत वर संपला आणि मग एकदम प्रेतं काढणार्‍या काकू दिसल्या.

संदेशाचं, क्वाडचं नीटसं समजलं नाही मला.
हे कनवर्जन बरेच दिवस चालू आहे असं एका संवादातून वाटलं. मग त्या उंदरांचं आणि व्हायरसचे प्रयोजन नक्की काय होते? फक्त त्या उंदरांतून तो प्रसारित झाला नसेल ना/ का? तो जगभरात डोनटला लावून, आणि चुंबनं घेऊन असा वायुवेगे पसरणे शक्य नाही. वायुवेगे कारण ८ बिलियन वजा ११ लोक अफेक्ट झाली आहेत. ही अकरा कशी समजली? वरती आयनोस्फिअर का काय मध्ये आहे परमात्मा बघणारा पण ... असो बरेच प्रश्न आहेत.
तो जगात क्षणात कसा पसरला? प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींनाच सीझर येऊ शकते. माणसांना कशी येईल? थोडक्यात कॅरलच्या रागाने प्रादुर्भाव होणे शक्य नाही. प्रादुर्भाव झालेले लोक मरतील फारतर.
परत ६ पैकी ५ लोक कूल होते. त्याअर्थी त्यांना याबद्दल अनेक दिवस माहिती असणार असं वाटलं. म्हणजे कॅरलला जसं काल समजलं आणि आज ती सगळ्यांना भेटली (ऑफकोर्स कबर खोदून ... कोई शक!) तसं त्या ५ जणांचं नसावं. ते या परिस्थितीला शरण गेले आहेत किंवा त्यांना यात नवं काही दिसलं नाही असं वाटलं.

ज्यांनी अजून ब्रेबॅ किंवा बेकॉसॉ पाहिलेली नाही किंवा गिलिगन माहीत नाही, त्यांना ... 'We just want to help!' >>> Lol

कॅरोलचे वन लाईनर्स मस्त आहेत. "She is available to anyone who asks" वगैरे. न पाहिलेल्यांना खुलासा - सिरीज अजिबात कॉमिक वगैरे नाही. पण गंभीर सीन मधे काहीतरी मधेच कॉमिक असणे ही ब्रेबॅ व बेकॉसॉ ची खासियत इथेही असावी असे पहिल्या दोन भागांवरून वाटते.

अजूनही "कॅरोल" म्हणायला खास प्रयत्न करायला लागतोय Happy अमजदबद्दल ("गब्बर") शोलेनंतर असे झाले होते हे वाचले आहे.

अल्बुकर्की लोकांना अजिबात विसरू देणार नाही हा ही एक विन्स चा अजेंडा दिसतोय. आधीच्या दोन सिरीजबद्दल काही सटल संदर्भ येतात का पाहू.

She is available to anyone who asks >> अगेन हॅरी पॉटर!
Help will always be given at Hogwarts to those who ask for it! - अल्बस डंबरडोर!

प्रेतं काढणार्‍या काकू >>> Rofl

सिरीज मधे एक "देशपांडे" कॅरेक्टरही आहे. अगदी सुरूवातीला दोन शास्त्रज्ञ/डॉ दाखवलेत त्यातला एक बहुधा. तो फ्रण्ट डेस्कवाला "डी मॅन" का काहीतरी म्हणतो त्याला.

दुसर्‍या भागातली देसी बाई एकदम शिवी घालते तेव्हा रविचंद्रन आश्विन विराट कोहलीसारखे बोलू लागल्यासारखे वाटते (क्रिकेट संदर्भः ती शिवी विराट कोहलीने फेमस केली होती)

तो मुळात "कुणी तरी" पाठवलेला मेसेज आहे की नुसताच वायरस आहे? हे मला नीट कळले नाही. त्यामुळे हेतूही नाही कळत. (की आतापर्यन्त चं "ऑटोनॉमस लाइफ" हाच ग्लिच होता आणि असे कलेक्टिव कॉन्शस असणे हाच युनिवर्स चा नॉर्मल असायला हवा ? )

She is available to anyone who asks >> अगेन हॅरी पॉटर! >>> ओह हॅपॉ संदर्भ माहीत नव्हता. पण तो नसला, तरी त्याच्या थोडे आधी एअर फोर्स वन बद्दल हेच वाक्य येते ना? तेच वापरून कॅरोल इथे ती कॉमेन्ट मारते.

मला कॅरलचं घर बघून हॅन्क आणि मरी राहात होते त्या कल डी सॅकची आठवण झाली होती - पण ही घरं नवीन उभारलीत म्हणे.

वर लावलेल्या फोटोतला तिच्या जॅकेटचा किंवा त्या स्मायलीचा रंग पाहून वॉल्टच्या हॅझमॅट सूटचीही आठवण झाली होती - पण हे बहुतेक 'द जॅकेट इज क्ष्क्ष्क्ष यलो!' कॅटेगरीत मोडेल. Lol

वर्ल्ड पीस ही अत्यंत भितीदायक गोष्ट आहे >>>
गिलिगन हलकट आहे. नेहमीच्या जगातल्या गोष्टी तो आपल्यासाठी कायमच्या बदलून टाकतो किंवा डिस्ट्रॉयच करून टाकतो !! वॅक्यूम रिपेअर वाला झाला , एक्स्टर्मिनेटर्स झाले, लॉन्ड्रोमॅट झाले. आता हापिसातले डोनट आणि वर्ल्ड पीस चा नंबर !! Lol

मला कॅरलचं घर बघून हॅन्क आणि मरी राहात होते त्या कल डी सॅकची आठवण झाली होती - पण ही घरं नवीन उभारलीत म्हणे. >>> ओह. मलाही आठवण झाली पण अगदी सेम वाटले नाही.

पण हे बहुतेक 'द जॅकेट इज क्ष्क्ष्क्ष यलो!' कॅटेगरीत मोडेल >>> Lol

वॅक्यूम रिपेअर वाला झाला , एक्स्टर्मिनेटर्स झाले, लॉन्ड्रोमॅट झाले. आता हापिसातले डोनट आणि वर्ल्ड पीस चा नंबर !! >>> Happy हे भारी निरीक्षण आहे.

यल्लो चं प्रयोजन म्हणजे हॅझमॅट चा सिंबॉल त्या रंगात असतो ना. टॉक्सिक , रेडिओ अ‍ॅक्टिव डेन्जर वॉर्निंग वगैरे त्या रंगात असतात त्यामुळे तो रंग असा मी धरला.

ह्म्म.. ते प्लुरिबस लोगो मध्ये कॉटन स्वॅबने पिवळ्या चिकट पीट्री डिश मधल्या द्रावणात लिहिणे... ते मधमाशांचे वॅक्स वाटलं. आणि मधमाशांना कलेक्टिव्ह ब्रेन, कलेक्टिव्ह अक्कल असते ना? तसं काही असेल ही वाटलं.

प्लुरिबस लोगो मध्ये कॉटन स्वॅबने पिवळ्या चिकट पीट्री डिश मधल्या द्रावणात लिहिणे>>> आणि लिहिलंय तेही ते वेडपट स्माइल!
>मधमाशांना कलेक्टिव्ह ब्रेन, कलेक्टिव्ह अक्कल असते ना>>> हो राइट! असेल ही काहीतरी संबंध.

>>> मधमाशांना कलेक्टिव्ह ब्रेन, कलेक्टिव्ह अक्कल असते ना
इन्टरेस्टिंग!

>>> गिलिगन हलकट आहे.
हो!!
मला कोविडच्या काळात जुन्या सिनेमांतदेखील मास्क न लावता जमलेले घोळके पाहिले की अस्वस्थ वाटायचं तसं आता रेस्टॉरन्ट्समध्ये वाटेल. Proud

चांगुलपणाचा उंदीर चावला.... Wink
बघितले पहिले २ एपि. बघावासा वाटतोय तिसरा.. सध्या इतकंच!
देसी ग्रंपी असेल वाटलंच होतं चेहेरा बघून.

असं कसं? ग्रेनेड फुटला ना? Proud
अजून तो कलेक्टिव कॅरलच्या वाटवाटेल त्याही इच्छा पुर्‍या करायला तयार आहे, आणि इतर कुठल्याच सर्वायवरबरोबर अजून तिला कनेक्ट करता आलेलं नाहीये.
कलेक्टिव हे का करतोय हेही अजून नीट कळलेलं नाही - झोशाने त्याचं 'बुडती हे जन | पाहवेना डोळा' असं काहीतरी उत्तर दिलं.
कॅरलच्या 'इन्डिपेन्डन्ट' असण्याच्या भ्रमाचा भोपळा सुपरमार्केटमध्ये फुटला.

विचार करायला लावणारे प्रसंग होते, पण अजून इथून पुढे कुठे जाणार गोष्ट याचा काही म्हणजे काही अंदाज येत नाहीये!

स्वाती +१
मी स्वतंत्र स्त्री आहे म्हणून एक एरंड करायला १० बिग रिग आणि ५० माणसे जेव्हा लागलेली दिसली तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचे भाव बघण्यासारखे होते.
कथेच्या दॄष्टीने डीएचएल डिलिवरी ड्रायव्हरने शस्त्रक्रिया करणे, हँड ग्रेनेड ते अणुबाँब द्यायची तयारी दाखवणे यात कलेक्टिव्ह माईंड आणि फक्त माहिती, डेटा हाच कलेक्टिव्ह आहे त्यावरचं प्रोसेसिंग कॉन्टेक्स्ट, डिसिजन मेकिंग, भावना इ. ह्या अल्गोरिदमच्या परेच आहेत हे दोन-चारदा अधोरेखित झालं, पण कथा म्हणावी तशी काही पुढे सरकलेली नाही.
कॅरल तीला जनरेटिव्ह एआय सारखे क्विझ करते... त्यात मात्र एक रत्न सापडले... शुभमस्तु! Proud त्याचा काल रात्री वापर केला. Lol पुढच्या वेळी वापर करताना समोरच्याने प्लुरिबस बघितलेली असावी अशी देवाकडे प्रार्थना! ... तर जनरेटिव्ह एआय जसं सतत आपल्याला खुष ठेवायचा प्रयत्न करते तसेच हे हाईव्ह लोक वाटतात. जनरेटिव्ह एआय मध्यंतरी स्युसाईड कोच सारखं एका टीनशी वागला होता. सुरुवातीला आत्महत्येपासून परावृत्त करायला हेल्प लाईन वगैरे दिल्यानंतर जेव्हा त्या मुलाने परसिस्टंटली तेच संभाषण चालू ठेवलं तेव्हा आत्महत्या करतोय हे पालकांपासून लपव आणि कसं लपव इ. कोचिंग चॅटजीपीटीने दिले होते. इथेही मला तेच दिसलं. अणुबॉंबचे धोके आम्ही सांगू पण शेवटी फुटबॉल हातात ठेवूच!

त्या स्पॅनिश बोलणार्‍या माणसाशी चार वेळा कॉल करुन एकमेकांना शिव्यांची देवाणघेवाण करुन नक्की काय साधलं याची उत्सुकता आहे.
(तिला स्पॅनिश येतं आणि अरेबिक आणि कोरियन आणि काय त्या चार भाषा सांगितल्या त्या येत नाहीत. आणि ती त्यांचा ट्रान्सलेटर वापरण्यापेक्षा स्वतःच्या अक्कलेवर विश्वास ठेवेल. इतकं समजलं. पण चार वेळा कॉल करुन पूता ... हा एक स्पॅनिश शब्द मला नार्कोस मुळे समजतो... एकमेकांना म्हणून काय साधलं?)
बाकी कोण हाईव्ह आणि कोण नाही हे विचारायला ती त्यांच्यावर विश्वास ठेवते. कौन अपना कौन पराया हे समजायची काही लिटमस टेस्ट मला तरी दिसली नाही. मग ते इतर १० का ११ लोक कशावरुन खरंच असे आहेत किंवा तसे नाहीत?

कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन कसं करतात?
आता ग्रोसरी स्टोअर्स कंसॉलिडेट करायची ठरवली. पण हे कोण आणि कसं ठरवतं? हा इनपुट काही ह्युमन्सकडून आलेला नाही.
मग त्यांची काही गायडिंग प्रिंसिपल्स आहेत का? की 'कॉन्झर्वेशन ऑफ रिसोर्सेस' .. मग रात्री सिटीचे लाईट बंद करा. पण जरी अशी प्रिंसिपल्स असली तरी अल्गोरिदम त्यांच्या मागे किती फरफटत जाणार? कुठे थांबायचं हे कसं कळतं याची ही मला उत्सुकता आहे.
किती रिसोर्सेस आर टू मच? हा जो समतोल आहे, जो अमेरिकेत, कॅनडात, युरोपात आणि भारतात वेगळा असतो आणि त्यानुसार तिकडचे लोक तसे निर्णय घेतात ते हाईव्ह लोक कसं करतील? आणि जिवंत मेलेली काय असतील ती किमान ७ बिलियन हाईव्ह लोक आहेत धरुन चाललं तर सात बिलियन लोकांत हे शेअर्ड कम्युनिकेशन, रिझोल्युशन एकुणच हार्मनी... अगेन हार्मनी सोडून देऊ... बेसिक कामकाज कसं चालतं.

ती देसी काकू एकदम अभिमानाने म्हणते की माझा मुलगा ओबिजीवायएन आहे. तर त्याचं काय इतकं? तो तर पायलट, रॉकेट सायंटिस्ट, गारबेज कलेक्टर सगळंच आहे की! थोडक्यात प्रश्नच प्रश्न! Happy

Pages