"शाब्बास स्वराज, हस्ताक्षर स्पर्धेत तू पहिला आला आहेस. हे घे तुझे बक्षिस, मोठी कॅडबरी."
आजपासून साधारण पंचवीस वर्षापूर्वी कड बाईंनी सकाळी प्रार्थनेच्या वेळी स्वराजला स्टेजवर बोलावून पाठीवर थाप टाकली होती. राजगुरुनगरमधील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या भव्य परिसरात माईकवरुन स्वत:चे नाव ऐकून हुरळून गेलेला स्वराज कॅडबरी पाहून मात्र थोडा नाराज झाला होता. हस्ताक्षर स्पर्धेत दुसरा आलेला अनिल त्या दिवशी उपस्थित नव्हता त्यामुळे त्याला बक्षिस म्हणून मिळाणारा बिस्कीटचा पुडा अजूनही स्टेजवरच्या टेबलवर होता.
"बाई, मला कॅडबरी नको, बिस्कीटपुडा द्या." स्वराजची नजर अजूनही बिस्कीटपुड्यावर स्थिरावलेली होती.
"अरे पण कॅडबरी छान आहे की, शिवाय महाग आहे म्हणून तर पहिल्या क्रमांकाला ती ठेवली आहे, तुला का बिस्कीट हवे आहे? तसेही तुला आवडते ना कॅडबरी? " कड बाईंचे कुतुहल वाढले होते.
"कॅडबरी आवडते, तरीही मला बिस्कीटचा पुडा द्या, कॅडबरी अनिलला दिली तरी चालेल. त्यालाही फार आवडते." स्वराज आणि अनिल चांगले मित्र असल्याने स्वराज कॅडबरी त्याला देत असेल असा विचार करुन कड बाईंनी बिस्कीटचा पुडा स्वराजच्या हातावर ठेवला. सकाळच्या परिपाठातील प्रार्थना पार पडली. दिवसभरात आपल्याच दुनियेत हरवलेला स्वराज कड बाईंच्या नजरेतून मात्र सूटला नव्हता. कदाचित बक्षिस मिळाले म्हणून आनंदात असल्याने तो तसा वागत असेल असा समज करुन बाईंनी त्याकडे तेव्हा दुर्लक्ष केले होते.
शाळा सुटल्यानंतर सर्व शिक्षकांना महिना अखेरच्या कामामुळे शाळेत थांबावे लागले त्यामुळे कड बाईंना निघायला उशीर झाला. शाळा ते त्यांचे चाळीतील भाड्याचे घर हे अंतर साधारण अर्धा कोस अंतर बाई रोज चालतच पूर्ण करायच्या. नेहमीप्रमाणे आजही त्यांनी चालायला सुरुवात केली. कड बाई इतर शिक्षकांच्या मानाने मुलांवर फार प्रेम करायच्या. हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करून स्वखर्चाने मुलांसाठी बक्षीस ठेवायच्या. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर त्यांचा विशेष भर असायचा.
हिवाळ्याचे दिवस चालू झाल्याने अंधार लवकर पडू लागला होता. सूर्य मावळला असला तरीही अजून संधीप्रकाशातून समोरचा रस्ता स्पष्ट दिसत होता. रस्त्याच्या कडेने वाढलेले गवत एखाद्या झुळुकेपाठी डोलत होते. गावच्या वेशीजवळ येताच बाईंची नजर दूरच्या झोपडीवर पडली. आपल्या शाळेचा गणवेश घालून कोणीतरी उभे असल्याचे चित्र त्यांच्या जाड भिंगाच्या चष्म्याने टिपले होते. गणवेशातील मुलगा आठ दहा वर्षाचा असावा एवढाच काय तो अंदाज लागत होता. गेली सहा वर्षे त्याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याने शाळेतील बहुतांश मुले आणि त्यांचे पालकही कड बाईंच्या परिचयाचे होते. बाईंचे घर तसेही जवळ आले होते त्यामुळे आपल्या शाळेचा हा कोण विद्यार्थी आहे आणि इथे काय करतो आहे या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी बाईंनी झोपडीकडे पाय वळविले. दिवसभर आपल्याच दुनियेत हरवलेल्या स्वराजला तिथे त्याच्या समवयस्क मुलाबरोबर खिदळताना पाहून बाईंना थोडे आश्चर्य वाटले. "काय रे स्वराज, अजून घरी गेला नाहीस तू, इथे काय करतो आहेस?", स्वराजने मान खाली घातली. "काही नाही बाई, हा माझा दोस्त राणू ,त्यालाच भेटायला आलो इथे."
"अरे पण तुझ्या घरी वाट पाहत असतील ना, तू असा बिनधास्त इथे कसा काय थांबला आहेस?", "नाही बाई, मी सकाळीच सांगितले आहे घरी, उशीर होणार आहे म्हणून", कड बाईंना एकंदरीत त्याचे हे वागणे फारसे आवडले नव्हते. एव्हाना झोपडीच्या आजूबाजूला बाईंची नजर पडली. झोपडीच्या बाहेर तीन दगडांच्या चुलीवर एक कळकट पातेल्यात भात शिजण्याचा आवाज येत होता. बाजूलाच साधारण चार वर्षाचे एक पोरगं चक्क पाण्यात बिस्कीट बुडवून खात होते. त्याच्या हातातील बिस्कीट पुडाही तोच होता जो स्वराजला सकाळी बक्षीस म्हणून कड बाईंनीच दिला होता. त्या कुटुंबातील जी दोन तीन माणसं नजरेस पडली त्यांच्या अंगावरील कपडे वापरुन वापरुन विरलेले दिसत होते. चेहऱ्यावर कष्टी भाव, डोळ्यात असलेला उगाचच खजिलपणा, धिप्पाड शरीरयष्टी असली तरीही पाठीत वाकून दिसणारा नम्रतेचा भाव बाईंनी टिपला होता.
एका बाजूला गणवेशातील स्वराज आणि दुसऱ्या बाजूला ती कफल्लक माणसं हे एकाच समाजाचे वास्तव बाईंच्या समोर उभे ठाकले होते. स्वराजला कदाचित यातले गांभीर्य माहीत नव्हते. निरागसपणे त्याने राणूशी दोस्ती केली होती, आठवड्यातून किमान दोनदा तो त्याच्याकडे खेळायला येत होता. घरातून खाऊला मिळालेली किरकोळ चिल्लर जमा करुन तो एकतरी बिस्कीट पुडा त्यांना घेऊन यायचा. त्यांच्या घरी बिस्कीट आवडीने खाल्ले जायचे असे राणूने सांगितले तेव्हा बाईंना थोडे गहिवरून आले होते. नेहमीप्रमाणे आजही झोपडीतील सर्वांनी बिस्कीटे खाल्ली होती.
वर्गातल्या स्वराजकडे असलेला हा समंजसपणा बाईंना आवडला होता. "शाळेत जातोस का?" या बाईंच्या प्रश्नावर राणूने नकारार्थी मान डोलविली होती. त्या दिवशी स्वराजला लवकर घरी जायला सांगून बाई त्यांच्या घराकडे परतल्या.
शिक्षिकेची नोकरी लागण्याआधी समाजसेविका म्हणून कड बाईंनी हिंगोलीत काम केले होते. मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या गरीब महिलांसाठी त्यांनी अनेक शासकीय योजनांच्या माध्यामातून ठोस कार्यक्रम राबविले होते. शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर मात्र मुलांमध्येच रमल्यामुळे त्यांची समाजसेवा थोडी दुरावली असली तरी समाजातील कोणतेही दु:ख पाहून त्यांचे संवेदनशील हृदय पाघळून जायचे. आज घडलेल्या प्रसंगामुळे त्यांच्यातील समाजसेविका खडबडून जागी झाली होती. त्या लोकांसाठी काय करता येईल ह्याचा विचार रात्रभर बाईंच्या डोक्यात घोळत होता.
दुसऱ्याच दिवशी बाई कामाला लागल्या. मुख्याध्यापकांच्या परवानगीने राणूला शाळेत दाखल करणे शक्य होते. जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत शाळेत शिधा मिळत होता. गणवेश वगैरे ह्या किरकोळ बाबी गावातील दानशूर मंडळीकडून मिळणे शक्य होते. दिवसभरात बाईंनी राणूच्या शिक्षणाचा बऱ्यापैकी जुगाड केला होता.
संध्याकाळी आपल्या घरी जाताना बाई पहिल्यांदा कालच्याच झोपडीवर गेल्या. जाताना बिस्कीटचा पुडा घ्यायला मात्र त्या विसरल्या नव्हत्या. राणूच्या वडिलांनी झोपडीच्या बाहेरच बाईंना बसण्यासाठी घोंगडी टाकली. बाईंनी बोलणे चालू केले, "राणूला शाळेत टाका, त्याला पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळेल, शाळेत जेवणाची सोय होईल, कपडा लक्ता गाववाल्यांकडून आम्ही मिळवून देऊ.", कड बाईंना दिवसभर काम केल्याचा वेगळाच अभिमान वाटू लागला होता.
"पर राणूला साळंत धाडल्यावं बकऱ्यामागं कोण जाणार, शंभराला पाच कमी बकऱ्या हायीत आमच्या, म्या आन त्याची आई रोजानी जातुया रस्त्याच्या कामावर, कोणतरी पाहिजे नव्ह घराकड बकऱ्या बघायला?" राणूच्या वडीलांनी थेट त्यांची अडचण पुढ्यात मांडली.
"अहो भाऊ, हे काय वय अहे का त्याला कामाला लावायचे, त्याला आता शिकू द्या, बकऱ्या द्या कोणालातरी सांभाळायला, नायतर वहिनीला सांगा सांभाळायला पण पोराचे कल्याण होऊ दे, पुढे जाऊन त्याने आणि त्याच्या पोरानेपण बकऱ्याच हाकायच्या आहेत का?", कड बाई चिडून आग्रहाला पेटल्या होत्या. सर्व गोष्टी व्यवस्थित सांगून बाई तिथून निघाल्या. बाईंच्या अशाच दोन चार चकरा राणूच्या वडिलांना समजावण्यात गेल्या. शेवटी राणूचे वडील त्याला शाळेत धाडायला तयार झाले.
राणूला शाळेत पाहून स्वराजला खूप आनंद झाला होता. आता मधल्या सुटीत ते एकत्रच जेवायला बसत होते.
हळूहळू हिवाळा संपत आला. झाडांची पाने नुकतीच गळू लागली होती. हिरवेगार डोंगर पिवळी दुलई पांघरु लागले होते. राणू जिथे राहत होता तिथे अजून चार झोपड्या नव्याने उभ्या राहिल्या होत्या. एकदा शाळेच्या पहिल्याच तासाला स्वराजने एकट्या बसलेल्या बाईंना विचारले, "अजून दोन बिस्कीटचे पुडे मिळतील काय?"
बाईंना कळायचे ते कळून गेले होते. "तू कशाला नेतोस, आपणच जाऊ संध्याकाळी त्या वस्तीवर, आता तुझे मित्र म्हटल्यावर शाळेत आणलेच पाहिजे, नाही का?"
"हा.. हा.."
स्वराजच्या चेहऱ्यावरचा ओसांडून वाहणारा आनंद आणि कड बाईंच्या समाजसेवेचे समाधान याचा सुंदर मिलाप बहुधा त्या विधात्यानेच लिहिलेला असावा. त्यानंतर अनेकदा त्या घटनेची पुनरावृत्ती झाली होती.
आज उच्च महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करणाऱ्या स्वराज आपल्या बॅगेत एकतरी बिस्किटाचा ठेवतो. कड बाईंकडून मिळालेले समाजसेवेचे व्रत त्याने आयुष्यभर जोपासले आहे. राणूसारखी अजून खूप मुले शाळेच्या शोधात असतील असे त्याला आजही वाटते.
राणू जिथे शिकला त्याच शाळेत पुढे जाऊन पी टी मास्तर म्हणून लागला. तब्बल वीस वर्षांनी राणू स्वराजला भेटायला आला. स्वराजच्या बायकोने त्या दोघांसाठी चहा आणला तसा राणू म्हणाला " बिस्कीटचा पुडा कुठं हाये वहिनी, आम्ही जव्हा जव्हा भेटतू का नाय, बिस्कीट खातू म्हणजी खातूच."
किचनमधून आधीच तयार केलेली बिस्कीटची प्लेट तिने तातडीने आणली. "हो, मला माहीत आहे बरे सगळे भावजी, तुमच्या दोस्तीचे आणि बिस्कीटच्या पुड्याचे महात्म्य." स्वराजच्या घरातून बऱ्याच दिवसांनी मोठमोठ्याने हसण्याचा आवाज बाहेर पडत होता. राणूची नजर मात्र राहून राहून त्या रिकाम्या झालेल्या बिस्किटाच्या पुड्याकडे जात होती. डोळ्यात कृतज्ञतेचा भाव आणून तो काही बोलणार एवढ्यात स्वराजने त्याला थांबविले.
"मी काही केले नाही, जे काही घडले ते घडणारच होते, मी नसतो तर आणखी कोणीतरी असते...पण हो, कड बाईंचे मात्र उपकार विसरू नकोस. तू सुद्धा एक बिस्कीट पुडा नेहमी जवळ ठेवता जा, नाही एखादा राणू सापडला तर देत जा एखाद्या उपाशी माणसाला" त्यात जे समाधान मिळतं ना ते मलातरी आजवर दुसऱ्या कशातच मिळालेले नाही."
अबोल झालेल्या राणूने स्वराजला घट्ट मिठी मारली. अश्रूचा एक नाजूक थेंब खांद्यावर पडल्याची जाणीव स्वराजला झाली होती पण त्याचीही अवस्था फार काही वेगळी नव्हती.
- किरण कुमार
छान सकारात्मक कथा.
छान सकारात्मक कथा.
छान सकारात्मक कथा. +१
छान सकारात्मक कथा. +१
खूप छान
खूप छान
छान. असे मित्र आणि अशा बाई
छान. असे मित्र आणि अशा बाई सर्व गरजू मुलांना मिळोत.
>>छान सकारात्मक कथा.>>+१
>>छान सकारात्मक कथा.>>+१
आवडली..
आवडली..
कथा फार फार आवडली. खूप खूप.
कथा फार फार आवडली. खूप खूप. प्लीज लिहीत रहा.
छान कथा
छान कथा
खूप छान
खूप छान
धन्यवाद वाचक मित्रांनो ......
धन्यवाद वाचक मित्रांनो ........./\.........
छान आहे कथा.
छान आहे कथा.
मस्त कथा.
मस्त कथा.
छान कथा . मुलीला सांगितली काल
छान कथा . मुलीला सांगितली काल , तिलाही आवडली.
छान कथा.
छान कथा.
स्वदेशचा सीन आठवला ज्यात शाहरुख घरोघरी जाऊन मुलांना शाळेत पाठवायचे आवाहन करत होता. प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम. कुठे गरिबी, तर कुठे जातपात, तर कुठे मुलींना जास्त शिकवायचे नाही..
छान कथा .
छान कथा .
छान सकारात्मक कथा
छान सकारात्मक कथा
धन्यवाद मित्रांनो, आपले
धन्यवाद मित्रांनो, आपले प्रतिसाद लेखनास प्रेरणा देणारे आहेत. ......./\........
छान आहे कथा.
छान आहे कथा.
आवडली.
आवडली.
छान कथा
छान कथा
छान सकारात्मक आणि हृदयस्पर्शी
छान सकारात्मक आणि हृदयस्पर्शी कथा.
आज सकाळीच दोन बिस्किटांचे
आज सकाळीच दोन बिस्किटांचे पुडे घेतले गरजूंना देण्यासाठी आणि कथा पण आजच वाचली
>>>आज सकाळीच दोन बिस्किटांचे
>>>आज सकाळीच दोन बिस्किटांचे पुडे घेतले गरजूंना देण्यासाठी आणि कथा पण आजच वाचली
क्या बात है.
छान कथा, आवडली.
छान कथा, आवडली.