जीवनांत. मी आत्महत्या हा शब्द नाही वापरला, मी माझ्या जीवनाचा अंत केला. माझ्या स्वतःच्या इच्छेने, कोण्या दुसर्याच्या इच्छेने वा दबावाने नाही. मी माझी स्वतःची हत्याही केली नाही. ज्या क्षणी मी जीवनांत केला त्या क्षणी माझ्यासाठी काळ तिथेच थांबला. या बाजूला काळ पुढे सरकत नाही. तो तुमच्यासाठी सरकतो आहे. माझ्या आयुष्याला मात्र पुर्णविराम मिळाला. पुर्णविराम या शब्दाचा खरा अर्थ मृत्युच. अजून दुसरा कुठलाही शब्द त्याचा खरा अर्थ अधिक समर्पकतेने दर्शवू शकत नाही.
लोक म्हणतील हा भ्याडपणा झाला, मी पळून गेलो. पण मला ते मान्य नाही. माझ्या जीवनावर, माझ्या शरीरावर माझा संपूर्ण हक्क होता. मी स्वतःहून स्विकारलेली कोणतीही जबाबदारी अपूर्ण सोडली नाही. मुलांचे योग्य ते संगोपन करून ती स्वतःच्या पायावर उभी राहिलेली पाहिली. आर्थिक दृष्ट्या कोणतीही कर्जे, देणी मागे ठेवली नाहीत. पत्नीस आर्थिक तोशिस पडणार नाही याची खात्री केली.
तुम्ही म्हणाल पत्नी, मुले, सुना, जावई, मित्र यांच्याबरोबरच्या नातेसंबंधांचे काय? त्या सर्व संबंधांना मी जेव्हा एक पूर्ण व्यक्ती होतो तेव्हा अर्थ होता. जर मी स्वतःला पूर्ण समजत नसेन तर तो मी पूर्वीचा "मी" तरी आहे का? ते नातेसंबंध आजच्या "मी"ला लागू तरी होतात का?
स्नायुंवरचे नियंत्रण गमावणार्या दुर्धर आजाराने मला हालचाल करणे कठीण झाले. मी पडू लागलो, ठेचाळू लागलो. दुसर्याची मदत घ्यायला लागत होती. ही अवस्था मला मान्य नव्हती. मी विचार करत होतो पण ते व्यक्त करायला माझी जीभ साथ देत नव्हती. दहा वाक्ये बोलायची तिथे शेवटले एक वाक्य बाहेर पडत होते. दृष्टी आणि श्रवणाच्या इंद्रियांनी असहकार पुकारला होता. गाणे वाजवायला बोटांची साथ नव्हती. मित्रांसोबत गप्पा मारता येत नव्हत्या. पत्नीसोबत सुख दु:खे वाटता येत नव्हती. नातवंडांसोबत खेळता येत नव्हते. शब्दांच्या सामर्थ्याने दिपवून टाकणार्या साहित्यिकांना वाचता येत नव्हते. वाट फुटेल त्या रस्त्याने फिरता येत नव्हते. मी जो होतो तो या सर्वांनी बनलेला होतो. हे काहिही न करता येणारा मी "मी" होतो का?
हा आजार मलाच का झाला, माझीच ही अवस्था का झाली असे प्रश्न मला पडत नाहीत. आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने लांबवलेल्या या आजच्या आयुष्यात असे आजार व्हायचेच. याच आधुनिक विज्ञानाने मला इतर व्याधींवर उपचार देवून आयुष्यभर सन्मानाने जगण्याची संधी दिली. केवळ शंभर दोनशे वर्षांपुर्वी जन्मलो असतो तर कदाचित बालपणीच दगावलो असतो. बालपणातून वाचलो असतो तर अधू इंद्रियांमुळे फारसे शिक्षण न होता काम करण्याच्या लायकीचा न राहिल्याने तरुणपणीच संपलो असतो. यातले काहिही न होता मला एक संपन्न जीवन लाभले. तेव्हा शेवटी मी दुर्धर आजाराने अधू झालो यात काही खास वैषम्य मला वाटत नाही.
माझ्या शरीरावर आयुष्यावर माझा हक्क होता. समाजाने मला दिले, मी समाजाला दिले. फिट्टंफाट. नातेवाईक, समाज यांनी माझ्या आयुष्यावर हक्क सांगू नये. मी जो उरलो होतो तो "मी" मला मान्य नव्हतो. मला सन्मानाने , कायदेशीर मार्गाने जीवनांत करण्याची संधी भारतात उपलब्ध नव्हती. ती कुठे उपलब्ध आहे याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. पण माझ्या त्या अवस्थेत मला दुसर्या देशात जाऊन त्या संधीचा उपभोग घेण्यासाठी लागणारी उस्तवार ही एकट्याने करणे शक्य नव्हते. पत्नी मुलांवर ती जबाबदारी आणि मानसिक ओझे टाकणे मला पटत नव्हते. तेव्हडे सविस्तर बोलणे सुद्धा या आजाराने शक्य होत नव्हते.
म्हणून मी माझ्या मर्जीने जीवनांत केला.
काहीजण क्षणभर हळहळतील. जवळचे कदाचित पुढे अनेक दिवस हळहळतील. कधीतरी आठवण काढत राहतील किंवा नाही देखील. माझ्यासाठी काळ त्या क्षणीच थिजला ज्या क्षणी मी जीवनांत करण्याची कृती प्रत्यक्षात आणली. त्यानंतर जे काही वैद्यकीय सेवेन प्रयत्न केले ते त्यांच्यापाशी. माझी त्यास ना संमती होती ना विरोध. काही दिवसांनी ते प्रयत्नही थिटे पडले.
माणूस या जगात संपूर्ण नग्न येतो आणि संपूर्ण नग्न जातो हे सत्य. जन्मापुर्वीचा काळ त्याचा नसतो. मृत्युनंतरचा काळ त्याच्यासाठी नसतो. या दोन बिंदूंच्या मधल्या काळात मी पूर्णपणे जगलो. त्याबद्दल माझ्या मनात कोणतीही खंत नाही. जेव्हा ते जगणे शक्य राहिले नाही तेव्हा मी त्याचा अंत केला, हत्या नाही.
मी जीवनांत केला, आत्महत्या नाही.
खूप सुंदर लिहिले आहे.
खूप सुंदर लिहिले आहे.
पटणारे, भिडणारे!
पटले लेखन, आवडले.
पटले लेखन, आवडले.
याअनुषंगाने थोडे अजून
याअनुषंगाने थोडे अजून
शेवटचा दिस गोड व्हावा...- डॉ अनिल जोशी यांच्या पुस्तकाचा परिचय
https://www.maayboli.com/node/86321
जगायचीही सक्ती आहे... या मंगला आठलेकरांच्या पुस्तकात जगण्याचा विचार हा मृत्यू ही संकल्पना मध्यवर्ती धरुन केलेला आहे तसाच मृत्यूचा विचार जगण्याच्या परिप्रेक्षात केलेला आहे.
https://www.maayboli.com/node/55417
'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते
https://www.maayboli.com/node/12105