युट्यूबने मला काय दिलं ?

Submitted by रानभुली on 4 November, 2025 - 05:24

खरं तर शीर्षक वाचून करमणूक होईल.
युट्यूब, इन्स्टा वर असतं काय ? नुसते रील्स आणि सवंग व्हिडीओज.

खरं तर मला असंच वाटत होतं. युट्यूब येऊनही कित्येक दिवस त्याची सवय लागलेली नव्हती. असंच कधीतरी कॅज्युअली उत्सुकता म्हणून बघायचं. त्यातल्या त्यात सेलेब्रिटींच्या व्हिडीओजला पटकन क्लिक केलं जायचं. पण युट्यूब हे उथळ माध्यम आहे असंच आमचं सर्वांचं मत होतं.

आपल्या हातात नसणार्‍या काही घटना सर्वांच्या वाट्याला येतात. जिव्हाळ्याची माणसं पुन्हा कधीही न येण्यासाठी सोडून जातात. जगणं व्यर्थ वाटू लागतं. असं वाटतं कि काही बरं वाईट झालं तर पडद्याच्या मागच्या त्या जगात जाऊन आपल्या माणसांना भेटता येईल. कदाचित हीच नाती पुढच्या जन्मात मिळायची असतील तर या जगाचा त्याग करणं गरजेचं आहे. अशा निरर्थक विचारात हरवून जाताना सारासारविवेक हरवून जातो. अशा वेळी मन रमवण्यासाठी काही तरी आवश्यक असतं.

खाण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष ही सवय असल्याने सात वर्षांपूर्वी उजव्या हाताचं दुखणं आलं. ते कसं बसं निभावलं. त्या काळात घरी बसणं आलं होतं. नंतर लगेचच कोविड सुरू झाला. त्यामुळे दुखण्याबद्दल फॉलो अप घ्यायचा होता त्याचा विसर पडला. त्यामुळे विचारांचा वेगळा ट्रिगर दाबला गेला. निराशावादी विचारातून बाहेर पडायला मदत झाली. पण या काळात सिनेमावरचं मन विटलं. काल्पनिक कथातून मन उडालं. आयुष्य खूप चॅलेंजिंग आहे. ते चॅलेंज मनोरंजक नाही. त्याचा सामना करायची हिंमत भल्याभल्यात नसते. प्रत्येकाला तेव्हढी मानसिक ताकद दिलेली नाही. क्षीण अशी मानसिक स्थिती असतानाही कसं बसं निभावून नेलं पण पुन्हा घरातली एक प्रिय व्यक्ती कालवश झाली, जिने आम्हा सर्वांना आधार दिला होता.
या वेळी मानसिक रित्या कोसळून जायची वेळ आली होती.

अशात निरूद्देशपणे इंटरनेटवर वेळ घालवताना युट्यूबवर खरा खजिना हाती लागला.
जंगलात जाऊन राहणारी एक मुलगी. जी जंगलाच्या मधोमध जाऊन टेन्ट लावून राहते. या काळात ती स्वतः जेवण बनवते. गारगोटीने जाळ निर्माण करते. त्यावर चूल पेटवते. जंगल जसं असेल तसं तिचं घरटं असतं. हिंस्त्र प्राणी असतील तर मग ती झाडावर लावायचा टेन्ट नेते. त्याच्यावर चढण्यासाठी बांबूची किंवा लाकडाची शिडी तिथेच बनवते. अस्वलासारखा प्राणी वर आला तर तो आत येणार नाही असा अडसर बनवते.
तिचे व्हिडीओज बघताना उत्सुकता निर्माण झाली. मग असेच व्हिडीओज फीड मधे येऊ लागले.

बहुतेक युट्यूबने अ‍ॅडव्हेन्चर मधे या व्हिडीओजना टाकलेले असेल. मग एक भारतीय मुलगा जो अक्साई चीन,चीन, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया , थायलंड या मार्गे सायकलवरून ऑस्ट्रेलियाला गेला होता. त्याचे म्हणजे जेरी चौधरीचे व्हिडीओज येऊ लागले. ही पूर्ण मालिका पाहताना जग पाहिल्याचा आनंद मिळाला. त्याने बनवून घेतलेली सर्ली लाँग हॉल ट्रकर सायकल आवडली. सहज तिची किंमत सर्च केली तर ती उपलब्ध नाही. तिची फ्रेम मिळते. तीच ४५००० पासून आहे. संपूर्ण सायकल बनायला दोन लाखांचा खर्च येतो. एव्हढं सामान घेऊन एव्हढे देश बघायचे तर ती टिकाऊ पाहीजे, धोका द्यायला नको. हा खर्च आवश्यक आहे.

नंतर भेटला सूरज बी एल व्लॉगवाला बिहारचा एक खेडवळ मुलगा. त्याने अठरा राज्यातून सायकलवर प्रवास केला होता. आता तो बिहार ते लडाख प्रवास करणार होता. त्याचा तो प्रवास लाईव पाहिला. अगदी गरीब असून एकोणिसाव्या वर्षी त्याने आपला हा छंद जोपासला. सुरूवातीच्या मोहीमेत तो गावात असते त्या बिना गिअरच्या सायकलवरून फिरला. आता स्वस्तातली गिअरवाली सायकल घेऊन निघालेला.
त्याला ना लाईक्स ना सबस्क्राईबर्स. पण त्याला मोटिव्हेशनल व्हिडीओ ब्लॉग म्हणून युट्यूबने स्वतःच रिमकेण्ड केलं आणि मग त्याचा चॅनल सुसाट सुटला. लडाखचा त्याचा प्रवास जीवनाबद्दल वेगळा विचार करायला लावणारा होता. मन रमवायला यापेक्षा उत्तम छंद नाही हे लक्षात आलं.

मग एक तीन चाकांची सायकल घेऊन आफ्रिकन देशात फिरणारा फ्रेंच भेटला. या वर्षीच्या सुरूवातीला त्याचा पाच वर्षांचा प्रवास संपला. फ्रान्समधून निघून त्याने रस्तेमार्गे युरोप पालथा घातला. मग अरब देश , आशिया असं करत तो आफ्रिकेत आला. वरपासून ते खाली दक्षिण आफिक्रेचा प्रवास माहितीत भर घालणारा होता. या प्रवासात त्याने विविध जंगलं दाखवली. त्यांची माहिती दिली. जगातली अविश्वसनीय अशी स्थळं दाखवली.

कोण असतात ही माणसं ?
यांच्या पोटापाण्याचं काय हे प्रश्न आपल्याला पडतात. पण त्यांना नाही. यातल्या काहींचे नंबर्स मिळवले. बोलणं झालं.
यांचा दृष्टीकोण समजला.

नोकरी / व्यवसाय हे नाईलाजाने पोटाची खळगी भरायला करावं लागतं. पण ते जीवन जगणं नाही असं या फ्रेंच माणसाने सांगितलं. तो ही महत्पयासाने इंग्रजी बोलायचा आणि मी ही. पण संभाषण छान व्हायचं. जग फिरायला जायचं , आपण जिवंत आहोत तोपर्यंत ही पृथ्वी जेव्हढी होईल तेव्हढी बघायची हे त्याचं ध्येय होतं. त्याच्या घरच्यांनी त्याच्या या निर्णयाचा आदर केला. साथ दिली. त्याची ती झोपून चालवायची सायकल विशेषच. त्यात मागे सामान ठेवायची चांगली सोय आहे. भारतीय चलनात चार पाच लाख किंमत होईल. इथे मागवायची तर ड्युटीज भरून कुठल्या कुठे जाईल. याने सेव्हिंग्ज बाजूला ठेवली होती.

सोमालियामधे तिथल्या गुंडांनी त्याला लुटलं, सायकल तोडून टाकली. पण तो खचला नाही. त्याने फ्रान्सला जाऊन सायकलचे पार्टस आणले, दुरूस्तीची सोय केली आणि पुन्हा त्याच पॉईण्टवरून प्रवास पुढे चालू केला. हा प्रवास विलक्षण होता.

एक युरोपियन मुलगीही त्याच दरम्यान मोटरसायकलवरून आफ्रिकेत फिरत होती. या दोघांची भेट व्हावी असे मनापासून वाटत होते. पण दोघांचा रस्ता वेगळा होता. ती अलिकडेच भारतात येऊन गेली एव्हरेस्ट बेस कँपला राहिली. तिथून पाकिस्तानात के२ ला गेली. एव्हरेस्टची उंची पुन्हा वाढल्याने आता के२ पुन्हा नंबर दोन झाले ही माहिती छान वाटली.

नंतर युट्यूब कडे दुर्लक्ष झालं. कामानिमित्त बरंच फिरणं होत होतं. पुन्हा जेवणाची हेळसांड होत गेली.
मग पुण्यात आल्यावर वर्षभर सायकल सुरू केली. पण आहार आणि व्यायाम यांचा बहुतेक मेळ बसला नाही आणि दुसर्‍या हाताने मान टाकली. असह्य झिणझिण्या येऊ लागल्या. पुन्हा बी१२ चा अभाव आणि मग जोडूनच येणारे डी ३ , कॅल्शियम डिफिशियन्सी निदानात आले. पुन्हा तेच डॉक्टर. या वेळी त्यांनी मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे फॉलो अपला न आल्याने छान झापलं. ट्रीटमेंट करायचीय कि नाही हे ठरव आणि सांग असं म्हणून ते दुसर्‍या ओपीडीत पेशंट बघायला गेले पण. पंधरा मिनिटांनी आल्यावर पुन्हा "मग काय करायचं? " विचारलं. भरपूर टोचून बोलल्यावर चूक समजली. आता आराम चालू असल्याने पुन्हा युट्यूबकडे मोर्चा वळवला.

सध्या एक युरोपियन जोडपं भारतात आहे.कन्याकुमारी ते लडाख असा त्यांचा मोटरसायकल प्रवास आहे. कन्याकुमारीपासून त्यांना फॉलो केलं. पु ण्यात आल्यावर त्यांची भेट ठरली होती, पण थोडक्यात मिस झाली. काल ते लडाख मधे पोहोचले. श्रीनगर मार्गे आणि रोहतांग पास /अटल टनलमार्गे दोन्ही रस्ते बंद असताना त्यांनी झस्कर व्हॅलीतून जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा रस्ता याच वर्षी बनला आहे. अजून काम चालू आहे. त्यांच्या मुळे लडाखचं या भागातलं अनडिस्कवर्ड सौंदर्य पहायला मिळालं. यातली ती जर्मन आहे आणि तो ब्रिटीश. आपल्याकडे भारत - पाकिस्तान असं लग्न किती स्विकारतील ? ( जर्मन आणि ब्रिटन हे गेल्या शतकापासूनचे पारंपारिक शत्रू असल्याने). आता या देशात शत्रूत्वाची भावना नाही. तरीही जेम्स बॉण्ड अजूनही जर्मन कारस्थानं उधळून लावत असतो. मग कशाला बघायचा बॉण्डपट ? दिवाळीत सेलेब्रेशन मूड मधे आपण बाहेर जेवायला जातो तशी फाईव्ह स्टार डिश म्हणून अधून मधून बघायला हरकत नाही. तो मूडही वेगळाच असतो.

संगीताची तोंड ओळख आहे. पण चांगलं शिकता नाही आलेलं. शास्त्रीय संगीत शिकूनही गाता येतंच किंवा गाणं बनवता येतंच असं नाही. ती कला युट्यूबने शिकवली. हळू हळू क्रिएटिव्ह काही करण्यापेक्षा अ‍ॅप्रेशिएट करण्यात आनंद मिळत गेला.

वाईल्ड आणि ह्युमन यांच्यातल्या कहाण्या खर्‍या कि खोट्या या भानगडीत कधी पडत नाही. हिंस्त्र श्वापदं माणसाशी नातं ठेवतात ते गोड वाटतं. तसं असावं कि नसावं हा वेगळा आणि स्वतंत्र विषय आहे. प्राण्यांची रेस्क्यू ऑपरेशन्स , त्यातून झालेली मैत्री हे जास्त मनोरंजक वाटतं. प्राणी आधीपासूनच आवडतात. त्यांच्या मुळे आपलं दु:ख विसरायला मदत होते हा माझा अनुभव शास्त्रीय आहे हे समजल्यावर झालेला आनंद सांगता येत नाही.

जंगल समजावून सांगणारे व्हिडीओज हल्ली येतात. रात्री बेरात्री जंगलात जाऊन व्हिडीओज बनवणे हे फक्त युट्यूबसाठी करतील असे वाटत नाही. ती आवडच असायला लागते. नाहीतरी लोक रील्स बनवतातच कि.

आपल्याला आनंद देतील असेच व्हिडीओज बघायचे तर मग फीड नियंत्रित करायचं आव्हान असतं. त्यासाठी वाटेल तिथे क्लिक करायच्या सवयींवर नियंत्रण आणावं लागतं. वेगाळ्या विषयावरच्या व्हिडीओजला आवर्जून नॉट इंटरेस्टेड म्हणून रिपोर्ट कारावा लागतो. मग युट्यूब हळूहळू आपली आवड समजून घेऊन व्हिडीओज सजेस्ट करायला लागतं. त्यासाठी रेसिपीज ला ही नॉट इंटरेस्टेड करावं लागलं कारण एकदा का रेसिपीजची एंट्री झाली कि दुसरं काहीही दिसत नाही. हा चकवा आहे. त्यातून बाहेर पडणं कठीण.

या साहसी पर्यटनामुळे दृष्टीकोण एकदम बदलून गेला. ़ काही तरी आव्हान समोर ठेवायला पाहीजे असं वाटलं. ते पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या गोष्टींची माहितीही युट्यूबच देतं. विजयीच झालं पाहीजे असं काही नाही, प्रयत्न करणे गरजेचे आहे असं यातल्या खूप जणांनी शिकवलं. याच दृष्टीकोणातून ते यशस्वीही झाले. अधून मधून विनोदी, के ड्रामा, सायन्स, एन जी असे व्हिडीओज पण असतात पण ते एकसुरी मनोरंजन नको म्हणून तोंडी लावायला असतात. अजून वेगळे विषय एक्स्पोअर करायचे आहेत. अंटार्क्टिका एक्स्पोरेशनच्या डॉक्युमेंटरीज राहिल्यात. त्यासाठी मुहूर्त लागत नाहीये.

ञा युट्यूब व्हिडीओजने खूप काही दिलं जे शब्दात नाही सांगता येत. ते बघायलाच हवेत. ओटीटीचं सबस्क्रीप्शन असूनही सिनेमे त्या प्रमाणात बघून होत नाहीत. एव्हढा स्क्रीन टाईम पण शक्य नाही. प्रत्येकाला पोट दिलंय, त्यामुळं काही न काही करण्यात वेळ घालवावा लागतो. मोबाईलने मात्र कनेक्टेड राहता येतं. एक दिवस हे सगळं बंद करून असं जगून पहायचं आहे. ती वेळ कधी येईल हे आज माहिती नाही. पण नक्क्की येईल हा विश्वास वाटतो. युट्यूबर्स मंडळींनी तो विश्वास दिला आहे.

एकाही चॅनेलचं नाव मुद्दाम देत नाही. सर्वांना एकच गोष्ट आवडेल असं काही नाही. शोधले तर सापडतात सहज. जर आवडले तर पटेल. एक व्हिडीओ सध्या सजेशन मधे आला आहे. मागे जाऊन सुरूवातीपासून बघायचा आहे. सायकलने दूरचा प्रवास याचासारखं साहस नाही, त्यापुढे मोटरसायकलने फिरणं तेव्हढं साहसी वाटत नाही. पण दूरच्या देशातून येऊन मोटरसायकलवर देश प्रदेश एक्स्लोअर करणं हेच साहस आहे.

कुणाला आवडलंच तर कदाचित आपण एकाच वेळी बघत असू.
https://www.youtube.com/watch?v=wYggy7vrLuY

तुम्ही कुठल्या विषयावरचे व्हिडीओज बघता ? फक्त लिंक नको, थोडं त्याबद्दल लिहा. म्हणजे समजून उमजून क्लिक करता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे

भटकंती, खादाडी असे चॅनेल्स विशेषतः आवडतात
भटकंती मध्ये हटके भटकंती चॅनेल जास्त पाहिले जातात
स्वतःचे रोजचे आयुष्य दाखवणारे चॅनेल्स नाही पाहिले
हल्ली।पॉडकास्ट देखील बघतो
प्रचंड विषय वैविध्य असलेले पॉडकास्ट एका क्लिकवर आहेत.
काही शिकायचं असेल तर खूप काही आहे.
ते फारसे नाही पाहिले जात.
मूड चांगला करायला cute animal व्हिडीओ आहेत
जुने सिनेमे अथवा सेरीज असतात त्या ही पाहतो मूड असेल तसे.
कोविड मध्ये रामायण आणि महाभारत बघणे झाले
घरातल्या ज्युनियरना देखील थोडीफार स्टोरी कळाली
व्योमकेश बक्षी देखील फार आवडीने।पाहिली ज्युनियरनी
केव्हातरी नॉस्टलाजिया वाटला तर जुन्या जाहिराती बघतो युट्युबवर.
किंवा मग indipop गाणी

लेखन आवडले, विचार समजले.
---------
विडिओ पाहून प्रतिक्रिया देता का?
- हो.
प्रतिक्रियांना उत्तरे मिळतात का?
- कमी सबस्क्राईब झालेल्या चानेलसकडून उत्तरे मिळतात. त्यांचे आवडीने पाहतो ते कधी प्रतिक्रियांना देत नाहीत असे वाटते.

छान लेख.
युट्युब वर मी अनेक टेक्निकल ट्युटोरियलस पाहतो. त्याचबरोबर जवळपास रोज महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहतो.
त्याचबरोबर अनेक चांगले मराठी हिंदी इंग्रजी पौडकास्ट पाहतो. काही मराठी नाटके आणि सिनेमे पण पाहिले आहेत युट्युब वर.
युट्युब खरंच खूप आवडते आहे त्यामुळे प्रीमियम प्लान घेतला आहे. आता जाहिराती दिसत नाहीत.

मी अ‍ॅफर्मेशन्स, सेल्फ इम्प्रुवमेन्ट आणि ९९%बोगस आणि क्वचितच जेन्युइन असे स्पिरिच्युअल कंटेंट पहाते. जेनुइन म्हणजे स्तोत्रे. बाकी सारे बोगसच असते जास्त करुन.
शरद उपाध्ये - भविष्यावर बोलू काही. महामिष्किल व्यक्ती.

युट्यूब आणि ओटीटी आधीही बघत होतो, पण कोविडने नवं भान दिलं, आणि या मेडियाकडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली, याबद्दल कोविडचे आभार. होतं काय की बर्‍याच वेळा आपल्या शेजारीच कंटेंट असतं, माहितीही असतं, पण नजर नसते. ती एखादा अपघात घडून, ठेच लागून किंवा साक्षात्कार घडूनच मिळते.

हा फारच इंटरेस्टिंग विषय आहे, आणि याबद्दल धागा आधीच कसा निघाला नाही (स्पेसिफिकली युट्यूबबद्दल) याचं नवल वाटलं. आपल्या जाणीवा आणि समज बर्‍ञाच अंशी सतत कोणा तरी इतरांच्या एक्स वाय झेड अ‍ॅक्सिसच्या ग्राफ्सवरच्या इंडेक्सेसवर अवलंबून असतात हे खरंच.

ओटीटी सोडून फक्त युट्यूबवर बोललं तरी सुद्धा हा फारच मोठ्या लेखाचा विषय आहे हे आता लक्षात आलं. पण आता पटकन आठवलं, ते म्हणजे परमबीर पॅसेंजर नावाचं युट्यूब अकाऊंट. अनेकांना अर्थातच माहिती असेल, पण मला हे कळलं आपल्या इथल्याच रॉबिनहुडमुळे.

हा भिडू सर पे कफन बांधके वगैरे शेकडो देश फिरतो आणि तिथलं सारं दाखवतो, हे आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपण स्वतः एक देश म्हणून जगाच्या नकाशावर आकाशातून घेतलेल्या बर्ड्स आय व्ह्यू मध्ये नक्की कुठे आहोत, हे कळतं. सारे सेपियन्स कसे एकसारखे वागतात, आणि कसे वेगळे वागतात आणि त्यामागे असलेलं संस्कृती, परंपरा, प्रदेश, भाषा आणि साधनसंपत्तीचं प्रमाण- या सार्‍याचं नेपथ्य- हे सारं स्क्रीनवर बघणं हे फार भारी आहे. आपले सारे अभिमान, अस्मिता आणि गर्व गळून पडण्यासाठी हे सारं बघणं आवश्यक आहे. हे सारं दाखवायला तो रोजमर्रावाली आणि कधीकधी स्लँग लँग्वजही वापरतो. कुठचाही तात्विक आणि शिकवण्याचा, सत्य वगैरे दाखवण्याचा भाव न आणता फॅक्ट्स दाखवण्याच्या त्याची पद्धत अफलातून आहे.

इतके सारे देश मी फिरणं कधीही शक्य नाही. मात्र इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स मध्ये अनुभवलेलं सारं फिक्शन हे अशा पद्धतीने बघणं हा माझ्यासाठी सॉलिड अनुभव होता. इतरांसाठी नसेल, किंवा माझ्याहीपेक्षा जास्त तीव्रतेने असेलही.

बाकी अजून सावकाश लिहितो.

चांगले लिहिले आहे.
गेल्या वर्षीपासून मी फक्त युट्युबच बघतो; इतर काहीही नाही.
मुलाखती, संगीताचे विविध कार्यक्रम, सह्याद्री वाहिनीवरील संगीत व साहित्य विषयक निवडक कार्यक्रम सर्व आवडीने पाहतो. तसेच काही नवे-जुने चित्रपट देखील पाहतो.

जुनी मराठी नाटके तर खूप पाहिली आणि त्याचा वृत्तांत इथे लिहीत असतो : https://www.maayboli.com/node/83308

चांगलं लिहिलंय.

मी ही हल्ली युट्यूब खूप पाहतो. माझ्या माहितीत वा ज्ञानात भर घालणारे (मग ते कुठल्याही विषयावरील असू द्यात) व्हिडिओज पाहिले जातात.

धनवन्ती, माबो वाचक, धनश्री , कुमार सर तुमच्या प्रतिसादांबद्दल आभार.

झकासराव (झरा), छान लिस्ट आहे तुमची.

एस आर डी - धन्यवाद.
कमेण्ट्स करणे न करणे हा पर्सनल चॉईस आहे. त्यावर प्रतिसाद येणं न येणं हा त्यांचा. अ‍ॅडव्हेनचर चॅनल्स कडून कमेण्टला उत्तराची अपेक्षा ठेवू नये. कारण दिवसभर त्यांचा वेळ प्रवासात जातो, नंतर थकवा, त्यातून मग आवरा आवरी, सोबतचे डिवाईस चार्जिंगला लावणे आणि यातून वेळ मिळाल्यावर दिवसभराचं शूट एडीट करून लवकरात लवकर प्रेक्षकांना पुढचा एपिसोड देणे हे काम एकहाती करत असतात. अशात कमेण्ट्स वाचून प्रतिसाद देणं जमेलच असं नसतं. कधी कधी रेंजही नसते.

पण जर कमेंटला उत्तर न देणं हे सेलेब्रिटी झाल्यासारखं कुणाला वाटत असेल तर अशांना इग्नोर मारावं सरळ. ते लक्षात येतं.

छान धागा. मी फारसे यु ट्युब बघत नाही. पाहण्यापेक्षा वाचायला जास्त आवडते.

साजिरा धन्यवाद, हे चॅनेल इन्टरेस्टिंग आहे. आता पाहिन.

आपल्याकडे भारत - पाकिस्तान असं लग्न किती स्विकारतील >>>> मुस्लिमांमध्ये आजही अशी लग्ने होतात. काहींचे नातलग दोन्ही देशात आहेत. वाघा बॉर्डरवर जी बस सर्विस होती त्यातुन सामान्य लोक प्रवास करत होते. आता बस व ट्रेन दोन्ही बंद आहेत.

छान धागा. +१,
मी पण प्रवास वर्णन असलेले धागे मागचे २-३ वर्ष बघत होतो. यात भारतिय लोक बाहेरच्या देशात जाउन बनवतात तो आणि परदेशी लोक भारतात आल्यावर विडियो बनवतात . हे दोन्ही बघत होतो. हल्ली मात्र त्याच प्रकारचे विडियो परत येत असल्याने बघायचे बंद केले.

साजिरा, तुम्हाला प्रतिसाद दिलेला, पण बहुतेक भलत्याच धाग्यावर दिला. Happy

खूपच सुंदर पोस्ट आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.
दक्षिणा , खरंच खजिना आहे.

साधना, जर्मनी, ब्रिटन मधे कटुता नाही ना आता.
साहिल शहा धन्यवाद.