रूपांतर (भाग ३-अंतिम)

Submitted by Abuva on 27 October, 2025 - 21:21
Gemini generated image

यथावकाश महेशचं लग्न झालं. बायको मॉड होती पण थिल्लर नव्हती. त्याला हवी तशी होती. (मित्राच्या बायकोला, माजी का होईना, माल असं म्हणायला जीभ वळत नाही खरं तर) काय नाव होतं तिचं? विसरलो बघा. झाली तीसेक वर्षं आता.

(भाग २ - https://www.maayboli.com/node/87380)

तेव्हा ती मुंबईत नवी होती. त्यामुळे तिचं आमच्याकडे येणं जाणं होतं. हिच्याशी चांगलं जमायचं. पण सहा महिन्यांत परत गेली. पुढे कौन्सेलिंग वगैरे झालं. पण शेवटी झाला डायव्होर्स. का? कधी तरी माझ्या बायकोनं बोलताबोलता सांगितलं की महेशच्या शरीरसंबंधांच्या कल्पना त्या हिला, काय तिचं नाव, तिला झेपल्या नाहीत.
हे खरं असेल तर ही साली वाईट‌ गोष्ट होती. इतके वर्षं आम्ही त्याची‌ बडबड ऐकायचो, आणि फॅंटसी म्हणून सोडून द्यायचो. त्या वयात असतात भरकटलेल्या कल्पना. ब्ल्यू फिल्म आणि पिवळी मासिकं बघून, वाचून, थोड्या मोठ्यांच्या वल्गना ऐकून होतात असे भ्रम. पण नंतर उतरते ती नशा. याच्या बाबतीत ती फक्त कल्पना न रहाता त्याची विकृती झाली होती का?

---

त्याच काळात त्यानं आमची‌ कंपनी सोडली‌ आणि गेला टाटा-बिर्ला-अंबानी टाईपच्या कंपनीत. मॅनेजर म्हणून. डोळ्यावर सोनेरी‌ चष्मा, हातात सोनेरी घड्याळ, नवा नवा आलेला‌ मोबाईल नामक प्रकार, बरेच बदल झाले होते. तो सप्लायरच्या डीलमधे पैसे काढतो हे आता सर्वमान्य होतं. पण त्यामुळे कंपनीचा लॉस होतो हे कोणीही म्हणू शकत नव्हतं. आता मी प्रॉडक्शनला होतो ना. तो होता तोपर्यंत क्वालिटी वा शेड्यूल कधी चुकलं नाही. त्यामुळेच लोकं गप्प होती, बोलायला वावच नव्हता. नवे कस्टमर वाढत होते. त्यामुळे कंपनीचाही धंदा, प्रॉफिट वाढत होता. मलाही चाळीत रहायची गरज उरली नव्हती. पण हा एरिया, हा शेजार सोडवत नव्हता हे खरं.

----

त्याच काळात एक जागतिक अरिष्ट आलं. महेशच्या फ्लॅटचा मालक अडचणीत आला. त्याचा फायदा घेत त्यानं‌ तोच फ्लॅट विकत घेतला. पार्किंगमध्ये टू व्हिलर होतीच. तिच्या जोडीला एक नवी कोरी फियाट (प्रिमीयर नाय) उभी राहिली.

----

एकदा सेकंडात्सून परत येत होतो. रातचे बारा होऊन गेले होते. ह्याच्या बिल्डिंग खाली एका बाईला तो टॅक्सीत बसवून देत होता. कोण आहे तर कलीग आहे म्हणाला. इतक्या रात्री कलीग काय करत असेल? किडा वळवळला. हा प्यायलेला आणि... जावं द्या.

---

एकदा रात्री त्याचा फोन आला. मध्यरात्र उलटून गेली होती. काही तरी अर्धवट, असंबद्ध बोलत होता. पण त्याच्या आवाजात एक अर्जंसी होती. चडफडत मी उठलो, आणि कपडे चढवून तसाच त्याच्याकडे गेलो. अर्ध्या-उघड्या दरवाज्यामागेच तो आडवा पडला होता. तोंडावर पाणी मारलं, थोडं पाजलंही. आईस्क्रीम होतं फ्रीजमधे, ते भरवलं. पहाटे शुद्धीत आला. मग कळलं की रस्त्यावरून उचलून आणलेली बाई त्याचं घड्याळ, पाकीटातले पैसे घेऊन पसार झाली‌ होती. पोलिस तक्रार वगैरे विषयच नव्हता.
लक्षणं बिघडत होती. मी रीतसर शिविगाळ केली. पण मामला आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. आता तो माझ्या सांगण्याबोलण्या पलीकडे गेला होता.
एक सैतान थैमान घालत होता - त्याच्या डोक्यात, मनात. शुद्धीवर असताना कमाल करणारा महेश संध्याकाळ झाली की लोपायचा. त्याची जागा घ्यायचा एक भेसूर राक्षस - लिंगपिसाट, मद्यासक्त.
त्याला मानसोपचाराची गरज होती का? एकदा म्हणालोही त्याला तसं. पण माझ्यावरच सटकला. मग मी पुन्हा विषय काढला नाही.
काय घडलं होतं? काय घडत होतं? पूर्वी तो थोडासा अश्लील, कदाचित जास्त मोकळेपणानं, निर्लज्जपणे बोलणारा होता. असे अनेक असतात, मी पायलेत. पण कुणाचं हे असं झालेलं एकच उदाहरण. एक बुद्धिमान, असाधारण मुलगा माझ्या डोळ्यांसमोर मर्यादा तोडून खोल खोल गर्तेत चालला होता. ज्याला मित्राच्या बहिणी-बायकोवर वाईट नजर ठेवायची नाही याचं उपजत भान होतं, तो आता कुठलीच बंधनं मानत नव्हता. ही दारू होती, का लैंगिक विकृती? का दोन्ही? का तिसरंच काही तरी? मग मी कोण होतो? मित्र? म्हणजे काय फक्त एक बघ्या?

---

आणि मग तो एपिसोड घडला.
असाच अपरात्री वेड्यावाकड्या वेळेला मोबाईल वाजला. चार गल्ल्यांपलीकडच्या नाक्यावरचा गणेश. त्यानं अवेळी फोन करावा‌ इतकी ओळख नाही.
काय भाऊ? काय झालं?
- राजाभाऊ, तो महेश तुमचा दोस्त ना?
हो. त्याचं काय?
मी उठून बसलो.
- ॲक्सिडेंट झालाय इथे. आमच्या नाक्यावर..
काय झालंय?
- जिवंत आहे. मार लै लागलाय. या लगंच.

पॅंट चढवली, पाकीट अन् मोबाईल खिशात कोंबलं. कोपऱ्यातली छत्री उचलली. जाग्या झालेल्या बायकोला सांगितलं आणि तसाच धावलो.
जोरदार सर आली होती. मुंबैचाच पाऊस तो. जाताना हायवेला सिग्नलला हीऽ गर्दी. ॲम्ब्युलन्सचे आवाज. मी तिकडे धावलो. गणेश दिसेना. एक ट्रक थांबलेला. आणि एक बॉडी थोडी मागे, रस्त्यावर पडलेली. चाकाखाली आली असावी. नारळ फुटावा तसं डोकं उकललेलं. अजूनही रक्त वहात होतं. पावसाच्या पाण्याबरोबर.
पण हा महेश नाही. एक निश्वास सोडला. तरूण मुलगी होती. पुलाखालची वाटत होती. पुन्हा श्वास अडकला.

मग लक्षात आलं हा गणेशचा नाका नाही. तो पुढे आहे. छत्री सावरत धावत निघालो. नाक्यावर दिवा नव्हता, इकडतिकडचा येणारा लाईट अंधार गडद करत होता. पानटपरीशेजारी गणेश उभा दिसला. मागे आणखी कुणी एक जण उकिडवा बसला होता. त्याच्या पलीकडे एखादा बेवडा पडलेला असावा असा एक देह. गणेशनं हात केला. दहा बारा फूट फरपटली होती गाडी. फूटपाथला अडकली होती. पण महाश पार पलीकडे भिंतीला धडकला होता. म्हणजे वेगाचा अंदाज येत होता. बाप रे!
महेश बेशुद्ध होता. पाय गाडीखाली अडकून नडगी मोडली होती. घासटत गेल्यानं सोलपटला होता. चष्मा फुटून डोळ्याच्या वर जखम झाली होती. बाकी मोठी इजा दिसत नव्हती.

गणेश सांगत होता. मी शिग्रेट फुकाय हुभावतो. पाठ होती. सिग्नलला ब्रेकचा आवाज ऐकला अन् वललो. तर ही‌ बाईक ट्रकच्या हिथून आली. काय कंट्रोल नवता. आन गल्लीत येगात वलताना सटकलं आन फुटपाथ सोडून हे टपरी मागं यून पडलं. तुमच्यासंगं पायलंवतं यांना. त्या मिलात रावतात नाय? 
"सोड ते. तू अर्जन् त्या ॲम्ब्युलन्स घेवन ये."
त्यानं सिग्नलच्या गर्दीत आलेली एक ॲम्ब्युलन्स बोलावली. ही‌ परिस्थिती पाहून ड्रायव्हर म्हणाला, तिथे पोलिस आहेत त्यांना सांगा पहिल्यान.
मग पोलिस आले. तोवर आजूबाजूच्या चाळींतून चारसहा ओळखीची टाळकी जमा झाली. काही फार प्रोसीजर न करता पोलिसांनी महेशला उचलला, भरला आणि ॲम्ब्युलन्सला पिटाळलं. मी पण ॲम्ब्युलन्समधून गेलो. सुन्न होतो.
डोक्यात विचार भिरभिरत होते.
खरं काय अन् खोटं काय
भूत, वर्तमान, भविष्य
सायरनचा आवाज
आसमंतात चमकणारा, डोक्यावर फिरणाऱ्या बत्तीचा लाल प्रकाश
काळा-ओला चकाकणारा रस्ता
त्यात परावर्तित होणारे रस्त्यावरचे लाईट
उघडझाप करणारे सिग्नल...

---

दुसऱ्या दिवशी‌ पुण्याहून महेशचे आईवडील, ते दादरचे नातेवाईक सगळे आले.

मला गणेशचा फोन. बराच वेळ चालला. पोलिस दोन अपघातांची सांगड घालायचा प्रयत्न करत होते. करणारंच. मी नव्हतो करत? रात्रीची वेळ आणि पावसामुळे प्रत्यक्ष अपघात बघणारे कोणी‌ नव्हतं. अपघातात मेलेली मुलगी बांग्लादेशी सेक्स वर्कर होती. या पलिकडे तिची ओळख नव्हती.  तिचं नावगाव, ठावठिकाणा, नातं सांगणारं कोणी‌ नव्हतं. आणि ॲक्सिडेंट बघणारा तसा गणेश एकटाच होता. बाकी नाक्यावर त्यावेळी कोणी‌ नव्हतं. त्यानं तरी कुठे बघितला होता तो ॲक्सिडेंट?

महेश शॉकमधून बाहेर यायला चार दिवस लागले. तो पर्यंत पोलिसांचाही उत्साह मावळला होता. महेशने स्टेटमेंट दिलं, की त्या ट्रकच्या अपघाताच्या आवाजानं त्याचं लक्ष विचलित झालं आणि टू व्हीलर चिखलात स्लिप झाली... रोडसाईड वेश्येचा अन् माझा काय संबंध?
गणेशला मी तसंच सांगायला‌ समजावलं. महेशने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे त्याची समजूत पटकन पटली. कुठल्याश्या अनामिक वेश्येला कोण किंमत देतं?
महेशचा अल्कोहोल कंटेंट मात्र जास्त, खूप जास्त होता. पण त्याच्या वडलांनी लग्गा लावून ते सांभाळलं. कदाचित आणखीही बरंच काही सांभाळून घेतलं असेल.

---

एकेकाचं नशीब असतं.
एक अनामिक, अभागी जीव हकनाक बळी गेला होता.
एक मद्यधुंद, मदांध, वासनांध अपराधी संशयाचा फायदा घेऊन निसटून गेला होता.
मी? माझ्या नशीबी तळमळ, अस्वस्थता आली आहे.

मी मात्र मनातली अपराधी भावना टाळू शकलो नैये.
का?
मित्राला केलेली मदत का अश्राप जीवाच्या खुन्याला मदत?
खून? मी कोण ठरवणारा तो खून होता का नुसताच अपघात?
तरी ते मी ठरवलंच होतं ना? माझ्या मनाशी?

ती वेश्या त्याच्याबरोबर होती असा माझा वहीम आहे.
माझ्याकडे काय पुरावाय की तोच ह्या अपघाताला, त्या मृत्यूला कारणीभूत आहे? नाहीये ना? त्यानंही कधीच ते मान्य केलं नाही, बरोबर?
मग मी मित्राची मदत केली यात चुकीचं ते काय?

त्याचं वेश्यागमन पोलिसांनाही कळलंय. पण त्यांनाही हिशेब जुळवता आला नाही ना? त्या काळी हे सीसीटिव्हीचं पेव फुटलं न्हवतं. तो एक सर्वसाक्षी वर, अन चर्मचक्षूंनी बघणारे खाली. सालं ते असतं ना तर या संशयाच्या धुक्यातून बाहेर पडलो असतो रे!

बरं, समजा तसा पुरावा सापडला असता, तरी मी महेशला मदत केलीच असती ना? नाही तर मग मैत्री ती काय? पण मग मी स्वतःशी आणि मित्राशीही इमानदार राहू शकलो असतो.

आता कळत नाही काही.
काय कळायचंय त्यात? मी फक्त खऱ्या मित्राचं कर्तव्य पार पाडलंय.
फक्त?!
ते मित्रकर्तव्य करताना मी पण... मीही माणुसकी सोडलीये का?
नरो वा कुंजरो वा मुळे त्या धर्मराजाचाही गाडा जमिनीवर आला, तर माझं काय?
महेशचा सैतान झाला असेल, राक्षस झाला असेल, तर मग माझं रूपांतर कोणात झालंय?
सैतानाचा मित्र का हस्तक?

का? का? मी काय केलंय?
का... मी काय केलं नाहीये???? करायला पाहिजे होतं, पण केलं नाहीये?

माझं मन मला खातंय
मी गुंतलोय
मी अडकलोय
संशयानं, संभ्रमानं ग्रासलोय.

---

अशा ओल्या रात्री, लालनिळे दिवे अन् उघडझाप करणारे सिग्नल माझी झोप उडवतात.

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान फुलवलीय कथा. आवडली. हुशार माणसे अशी वाया गेलेली बघुन जीव हळहळतो.

एक खासगी बस पुर्ण जळुन १५-२० लोक मेले अशी बातमी आताच वाचली. एक विडिओ बाहेर आलाय ज्यात एक
मध्यधुंद विशीतला पोरगा बाईकवर बसताना दिसतोय. पुढे जाऊन ही बाईक दुभाजकावर आपटली, एकजण जागीच मेला, एक उडाला. उडालेल्याने शुद्धीवर आल्यावर मित्राला दुभाजकावर घेतले पण बाईक बाजुला करणे त्याला जमले नाही. कावेरी बस ह्या बाईकवरुन गेली, सोबत बाईक घासत गेली आणि आग लागली. गाडीत मोबाईलचे पोते होते ते धडाधड फुटुन आग अजुन वाईट झाली. ह्या इतक्या भयंकर अपघाताला कोण जबाबदार म्हणायचे.. Sad

साधनाची पोस्ट वाचून final डेस्टिनेशन सिनेमा आठवले...
चूक कोणाची आणि सजा कोणाला ?
जाणारा जातो, मागे राहिल्याची होरपळ होते, त्याला कोण जबाबदार ? ही अशी दारू पिऊन गाड्या उडवणारी पोरे, माणसे ???

जरा अपूर्ण वाटली मला. म्हणजे कॅरेक्टर्स चा बिल्ड अप चांगला झाला पण त्या मानाने अ‍ॅब्रप्टली संपली असे वाटले.

मैत्रेयी बरोबर सहमत..

भाग पटपट येत होते, त्यामुळे अजून फास्ट संपली असे वाटले.
दोन भागात दोन तीन दिवस अंतर असते तरी चालले असते.
कथा संयत भाषेत लिहिली आहे.

मैत्रेयीशी सहमत.
सुंदर वातावरण निर्मिती, पात्र परिचय आणि विस्तार !
पण कथा घाईघाईत गुंडाळल्या सारखी !
थोडे अधिक प्रसंग टाकून, महेश ला एखाद्या अपघातातून निसटते वाचवून, तरीही तो सुधारला नाही असे दाखवून रिराईट करा बरं!
Happy

मला कथेचा शेवट आवडला!
कथा नायक मित्राचे जे काही अधःपतन आहे ते उघड्या डोळ्यांनी पहात असतो, पण ते थांबवण्याचा फारसा अधिकार त्याच्याकडे नाही. सगळ्याची परीणीती शेवटी अपघातात होते. मात्र यावेळी एक अभागी जीवही गेलाय. भक्कम पुरावे नाहीत, जे काही आहे ते मॅनेज केले जाते, यात कथा नायकालाही सहभागी करुन घेतले जाते. मित्र त्याचे बेताल आयुष्य जगायला मोकळा होतो. पुन्हा एकदा कथा नायक बघ्याच्या भुमिकेत मात्र त्याचा परीपाक म्हणून एक प्रकारचा ट्रॉमा आयुष्यभरासाठी वाट्याला आलाय , त्याची विवेकबुद्धी आणि असहायपणा यामुळे आतुन पोखरला जातोय.. ओली रात्र आणि इमर्जन्सी वेहीकल्सचे लाईट दर वेळी त्याला मागे घेवून जातात, आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात. याला क्लोजर नाही.

वावे, साधना, स्वाती२, धनवन्ती, maitreyee, स्वानंदी१
प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
स्वाती२, मार्मिक विश्लेषण. कथानिवेदकाच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या याचा लेखक म्हणून मला आनंद आहे.

कथा ही निवेदकाच्या (एकांगी) दृष्टीतून मांडल्याने याच टप्प्यावर सोडणं भाग होतं कारण, सर्वसामान्यांच्या जीवनात असणारी परिस्थितीविवशता हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न होता. अनेक वेळा कर्तव्यपालनाच्या अपरिहार्यतेने आपण एखाद्या अपकृत्यात, असत्यात इच्छेविरुद्ध, संमतीशिवाय, अभावितपणे कसे खेचले जातो, आणि त्याचा विवेकी, संवेदनाशील मनावर, आयुष्यावर कसा परिणाम होतो ते मांडण्याचा हा प्रयत्न होता.

अबुवा यांच्या कथा खुप वेगळ्या प्रकारच्या असतात. त्यांचे समाजातील बहुढंगी माणसांचे निरीक्षण करण्याचे कौशल्य उत्तम आहे असे वाटते त्यामुळेच त्यांच्या कथांमध्ये विविधरंगी पात्रे गुंफली जात असावीत.